करोना काळात कॅलिफोर्निया ते कोल्हापूर

करोनाचा उद्रेक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा

माझ्या मुलीच्या PhD प्रबंधाचे अंतिम सादरीकरण व पदवीदान समारंभासाठी आम्हीं मार्चमध्ये अमेरिकेत आलो. मेमध्ये पदवीदान समारंभानंतर परतायचे असा बेत होता. त्यानुसार २५ मेचे परतीचे तिकिट केले होते. पोहोचल्यानंतर आठ दिवसात करोना साथीने जोर धरला आणि सगळ्या जगाला वेढून टाकले. निरनिराळ्या सामाजिक माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांनी साथीचे उग्र स्वरूप समोर आले.

हा नवीनच साथीचा आजार होता. त्याची ना लस उपलब्ध होती ना औषध. तो अतिशय झपाट्याने वाढत होता. थोड्याच काळात त्याचे भयंकर परिणाम दिसत होते विशेषत: वयस्कर व्यक्ती व ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार ह्यांपैकी काही आजार आहे अश्या लोकांना जास्त काळजी घेण्यास सांगितले जात होतें. सुरुवातीच्या काळात तो रुग्णांच्या खोकल्यातून, शिंकेतून येणाऱ्या थेंबातून संक्रमित होतो एव्हढेच माहिती होते. नंतर तो हवेतूनही पसरू शकतो असे कळाले. त्यामुळे थोड्याच दिवसात घराबाहेर जाण्यावर निर्बंध आले.

कार्यालयीन कामकाज घरातूनच संगणकाच्या माध्यमातून करणे, गरजेपुरते बाहेर जाणे, घरी आल्यावर आंघोळ किंवा कमीत कमी हाततरी कोपरापर्यंत धुणे, किराणा सामान धुवून अथवा वाइप्सने पुसून घेणे असे चालू झाले. सोशल डिस्टंसिगसारख्या नव्या संकल्पनांना महत्त्व आले.

मुलीच्या डॉक्टरेटच्या प्रबंधाचे अंतिम सादरीकरण सुद्धा संगणकाचे माध्यमातून ऑनलाईन झाले आणि पदवीदान समारंभ (ज्या समारंभासाठी आम्ही आलो होतो) अनिश्चित काळासाठी प्रलंबित झाला.
अश्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक ठप्प झाली.

आमचे अगोदरचे बुकिंग मे अखेरचे लुफ्तांसा एअरलाइन्सचे होते ते आपोआपच रद्द झाले. चौकशी करता असे समजले की आपल्याला पाहिजे त्या तारखेचे नवीन तिकिट मिळेल, पण ते विमान ठरल्या तारखेला उडेल ह्याची खात्री नाही. कारण सर्व परिस्थिती अनिश्चित आणि अनियंत्रित आहे. कोणीच कसलीच खात्री देत नव्हते. तरी आम्ही जूनअखेरचे बुकिंग घेतले. जसे ते रद्द झाले तसे जुलै मग ऑगस्ट असे प्रयत्न केले पण नेहमीचे ते विमान रद्द झाले. सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली त्यावेळी असे वाटत होते की "होइल चालू. असे महिनोन्‌ महिने बंद कसे ठेवता येईल. कारण त्यावर सर्व आर्थिक व्यवहार, दळणवळण, पर्यटन अवलंबून आहे." पण जशी जशी रुग्ण संख्या वाढू लागली तशी विमाने चालू होण्याची कोणतीच चिन्हे दिसेनात. मे नंतर ऑगस्टपर्यंत कालावधी गेला तरीही आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंबंधी कोणतीही आशादायक बातमी नव्हती.

'वंदे भारत' मिशन

दरम्यान भारत सरकारने 'वंदे भारत मिशन' या नावाने निरनिराळ्या देशात अडकून राहिलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची विमान सेवा चालू केली होती. त्यांनी ह्या सेवेअंतर्गत भारतात परतण्यासाठी काही निकष लावले होते; आजारी व्यक्ती, विद्यार्थी, अडकलेले पर्यटक, अल्प मुदतीचा व्हिसा संपलेले लोक, इत्यादी इत्यादी. तसेच परत आल्यावर साथीचा प्रसार रोखण्यासाठी विलगीकरणाचे नियम करण्यात आले होते. याचे नवीन तिकिटदर ठरवले जे साहजिकच नेहमीच्या दरांपेक्षा खूपच जास्त होतें (~$१३००). या मिशनचीपण माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ज्या भारतीयांनी या सेवेचा लाभ घेतला त्यांनी त्यांचे अनुभव विविध सामाजिक माध्यमातून सांगितले. ते खूपच क्लेशदायक होते (विशेषतः विलगीकरणासंबंधी). परंतु हळूहळू मिशनच्या कार्यप्रणालीमध्ये सुलभता आली. तिकिटदरही प्रमाणित झालें (~$७००). आम्ही खूप विचार करून व एकंदर परिस्थितीत नजीकच्या भविष्यात काही सकारात्मक बदल होणार नाही असे लक्षात घेऊन एअर इंडियाच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत परत जायचे असे ठरवले. आम्ही २७ ऑगस्टचे नेवार्क - मुंबईचे आणि सॅन डीएगो ते नेवार्क २६ ऑगस्टचे यूनायटेड एयरलाईन्सचे बुकिंग केले. त्या विमान प्रवासाचे व नंतरच्या हॉस्पिटल-हॉटेल विलगीकरणाचे हे वर्णन. त्याची सविस्तर पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की या संपूर्ण प्रवासाला कोरोनामुळे आणि सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे (विशेषतः अमेरिकेत व आता भारतातही) एक भीतीचे सावट होते.

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून मुंबईसाठी या मिशनअंतर्गत थेट विमानसेवा नव्हती. सॅनफ्रान्सिस्कोहून दिल्लीसाठी विमानसेवा आहे पण त्यावेळच्या नियमानुसार दिल्लीत १४ दिवस विलगीकरण करावे लागत होते. मुंबईला गेल्यास थेट आपापल्या अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन विलगीकरण करण्यास परवानगी मिळत होती, त्यामुळे आम्हांला न्यूयॉर्कला येणे व तेथून मुंबईला येणे गरजेचे होते.

या सर्व गोष्टींमुळे आमचे विमान सॅन डिएगो ते न्यूयार्क २६ तारखेला रात्री ९ वाजता निघून न्यूयॉर्क सकाळी ५ वाजता (न्यूयॉर्क वेळेप्रमाणे ); आणि न्यूयॉर्क-मुंबई २७ तारखेला दुपारी १२ वाजता निघून मुंबईत दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २८ रोजी सकाळी १२ वाजता पोहचणारे असे ठरले. सॅन डियागो ते न्यूयॉर्क प्रवासासाठी विनाथांबा फ्लाईट शोधणे, एअर इंडियाच्या साईटवरून ‘वंदे भारत’चे बुकिंग करणे, या सगळ्यात इतर प्रवाशांशी कमीत कमी संबंध येईल अशा सीट्स निवडणे इत्यादी तांत्रिक गोष्टींचें श्रेय पूर्णपणे जावयालाच जाते. त्याने शेवटच्या दिवशीसुद्धा बुकिंग पोजिशन बघून सीट्स पुन्हा बदलल्या. त्याचा असा उपयोग झाला की संपूर्ण प्रवासात आमच्या दोघांच्या मधली एक सीट कायम रिकामी होती.

सॅन डिएगो ते न्यूयॉर्क

सॅन डिएगोहून रात्री ९ वाजता फ्लाईट होती पण चेक-इन, सिक्युरिटी इत्यादी औपचारिकतेसाठी ६ वाजता घरून निघालो, सोबत भरपूर sanitiser, सॅनिटासिंग वाईप्स, मास्क, मास्क कानाला काचू नयेत म्हणून इअर सेव्हर्स, फेस शिल्ड, हाताचे ग्लोव्हस अशी सर्व तयारी मुलगी व जावयाने करून दिली होती आणि त्यांच्या वापराची रंगीत तालीमही आधी दोन-चार दिवस करून घेतली होती. साधारण ७ वाजता विमानतळावर पोहोचलो. मास्क, ग्लोव्हस आणि फेस शील्ड अश्या सर्व जामानिम्यानिशी गाडीतून उतरलो. विमानतळावर पूर्ण शुकशुकाट होता, आपल्याकडे जमावबंदी असताना जशी परिस्थिती असते तशी होती. अतिशय मर्यादित विमाने चालू होती. जे काही थोडे प्रवासी होते ते मास्क लावूनच होते. चेक इन / सेक्युरिटी सर्व ठिकाणी गर्दी कमी असल्याने सगळी प्रक्रिया जलदगतीने पार पडली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व तपासणी व्यवस्थित केली, कुठेही शॉर्टकट नाही. अगदी मास्क खाली करायला लावून identification केले. सर्व प्रक्रिया करताना सोशल डिस्टंसिंग पाळले. बोर्डिंग गेटच्या अलीकडे सर्व प्रवासी एक खुर्ची सोडून बसले होते. आम्हीपण फक्त खाण्यापुरते मास्क बाजूला केले, बाकी इतरवेळी प्रवासात पूर्ण वेळ मास्क, शील्ड, ग्लोव्हस घालूनच बसलो होतो. एव्हाना मास्कमुळे घामेजल्यासारखे व्हायला सुरुवात झाली होती, पण तो काढणेची सोय नव्हती. तसेच सर्व घालून रेस्टरूमला जाऊन आलो, कारण बंदिस्त जागेतील वावर कमी होण्याचे दृष्टीने विमानात टॉयलेट कमीतकमी वापरायचे होते. खाणे झाल्यावर पाणी पितानाच चूळ भरल्यासारखे करून पाणी पिऊन टाकले आणि चूळ भरल्याचे समाधान मानून घेतले. बोर्डींग सोशल डिस्टंसिंग पाळूनच झाले पण एकदा विमानात आल्यावर डिस्टंसिंग पाळणे शक्य नव्हते. युनाइटेड एअरलाईनने सर्व सीटची तिकिटे विकली होती एका आड एक असे बसण्याची सोय नव्हती. आमच्या सिटवरील तीन जागांपैकी एक जागा रिकामी होती. जागेवर आल्याआल्या संपूर्ण सीट, समोरील ट्रे अशा हात लागू शकतील अश्या सर्व जागा आम्ही sanitizing wipes ने पुसून घेतल्या. बरेच प्रवासी ही काळजी घेत होते. शेवटी हॅन्डग्लोव्हस बदलले ( प्रत्येक वेळेस ग्लोव्हस बदलले, एकूण प्रवासात अनेक वेळा ग्लोव्हस बदलावे लागले) व शांतपणे डोळे मिटून घेतले. विमानप्रवासातही काही महाभाग मास्क हनुवटीवर / खाली ओढून इकडे तिकडे फिरत होते. जणू काही विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर हवेत करोनाचा संसर्ग होणार नव्हता पण कोण सांगणार? आपण आपली काळजी घेणे एवढेच आपल्या हातात. विमानामध्ये स्नॅक्स आणि पाणी देणेसाठी पर्सर होते पण तेसुद्धा मास्क घालणेबाबत कोणालाही सूचना देत नव्हते. रात्रीची फ्लाईट असल्याने थोड्याच वेळात प्रवासी पेंगुळले, झोपले व फारसे काही न घडता ५ ते ६ तासात न्यूयॉर्क आले. स्थानिक वेळेनुसार पहाटेचे पाच वाजले होते. शक्य तितके अंतर राखून बाहेर पडलो आणि आम्ही बॅगेज क्लेमकडे वळलो.

न्यूयॉर्क - चेक इन- वंदे भारत विमान.

आमचे विमान टर्मिनल ‘सी’ला आले होते व आमचे एअर इंडियाचे विमान टर्मिनल ‘बी’ला होते. हे विमानतळ बऱ्यापैकी मोठे आहे त्यामुळे आतल्या आत एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी एअरट्रेन आहें. आम्ही बॅगेज क्लेम मधून आमची चेक इन केलेली बॅग घेतली, ६ डॉलर भरून ट्रॉली सोडवून घेतली (इथे ट्रॉली पेड सर्व्हिस आहे) आणि सर्व सामान ट्रॉलीवर चढवून टर्मिनल ‘बी‘साठी एअर ट्रेनमध्ये बसलो. टर्मिनल ‘बी’ला पोहोचलो व तिथून एअर इंडियाच्या चेक-इन काउंटरवर गेलो. तिथे आमच्यासारखे रात्रभर प्रवास करून आलेले आणि भारतात परतणारे अशी एक/ दोन कुटुंबं होती. बाकी सर्व एअरपोर्ट सूनासूना होता. एकतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती, दुसरे म्हणजे एअरइंडियाचे विमान दुपारी १२ वाजता होते आणि अजून सकाळचे ६ वाजले होते त्याचे चेक-इन सुरू व्हायला अजून दोन-तीन तास अवकाश होता. आम्ही टॉयलेट शोधून त्यातल्या त्यात काळजी घेऊन फ्रेश झालो आणि चेक-इन काउंटरसमोर ६ फूट अंतर ठेऊन रांगेत उभे राहिलो. आता हळूहळू प्रवासी येऊ लागले व गर्दी वाढू लागली तसे तसे अंतर पाळणे अवघड होऊ लागले.

सकाळी ८ वाजता एअर इंडियाचे ऑफिसर आले. त्यांनी प्रथम दोन फॉर्म वाटले, एका फॉर्ममध्ये व्यक्तिगत माहिती गोळा केली उदाहरणार्थ नाव, पासपोर्ट नंबर, मोबाइल नंबर, फ्लाईट नंबर, सीट नंबर, कुठून आलात, कुठे जाणार, पूर्ण पत्ता. दुसरा फॉर्म हमीपत्रासारखा होता, ज्यात ‘मला ताप नाही, कोव्हिडची लक्षणे नाहीत, प्रवासादरम्यान मास्क व शील्ड वापरेन, तसेच गेल्यानंतर सरकारी नियमानुसार स्वखर्चाने १४/७ दिवस अलगीकरणात राहण्यास तयार आहे. नाहीतर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची मला कल्पना आहे’ असा हमीपत्रासारखा मजकूर होता. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम हे फॉर्म्स गोळा केले. त्यानंतर एक वैद्यकीय अधिकारी आले. त्यांनी सर्वांना तपासून ताप नाही याची खात्री केली व सर्वांना चेक-इन साठी जाऊ दिले. बहुतेक सर्व प्रवाशांना जाऊ दिलें, कोणालाही ताप नसावा. चेकइनचे चार ते पाच कॉउंटर्स होते इथे त्यांनी चेकइन बॅग्स घेतल्या, इथे नेहमीप्रमाणे प्रत्येकाला २३ किलोच्या २ बॅग्स चेकइन साठी देता येत होत्या. आम्ही प्रवास सुटसुटीत व्हावा म्हणून सामान कमीच आणले होते. तरी दोन बॅग चेकइन करून एक लहान बॅग बरोबर घेतली इथे त्यांनी छापील बोर्डिंग पास दिले गेले, ते पुढे मुंबई विमानतळावरही बाहेर जाताना उपयोगात आले. सर्व चेकइनची प्रक्रिया फार वेळ न लागता सुरळीत पार पडली. त्यानंतर परत सिक्युरिटी चेक, वैयक्तिक चेकिंग इत्यादी सर्व सोपस्कार अंतर ठेऊन परंतु सविस्तर झाले. कारण माहिती नाही पण पर्सनल बॅग आणि खाण्याचे सामान सर्व काढून पूर्णपणे स्कॅन केले, तपासले गेले. (नेहमीपेक्षा जास्तच कडक तपासणी झाली). यानंतर आम्ही गेट नंबर ६२जवळ बोर्डिंगसाठी जाऊन बसलो. प्रत्येक ठिकाणी बसताना जागा वाईप्सनी पुसून घेत होतो. कॉफी घेतली. इथे रोख रक्कम घेत नव्हते, आंतरराष्ट्रीय कार्ड लागते. कार्ड वापरल्यानंतर sanitise करूनच परत ठेवले. हे रेस्टॉरंन्ट आमच्या गेटजवळच होते. इथे येणारे लोक मास्कबद्दल एकंदरीत फार काळजीपूर्वक वागत नव्हते. कित्येकांनी तर मास्क हनुवटीवर ठेवले होते आणि तोंड-नाक मोकळेच ठेवले होते. सुरुवातीला गेटजवळ लोक एका आडएक असे बसले होते पण जसे जसे बोर्डिंग चालू झाले तसे लोक गडबड गर्दी करू लागले जसे काही हे विमान त्यांना न घेताच जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम केवळ नियमच राहिला.

न्यूयॉर्क ते मुंबई

विमानात आलो त्यावेळी प्रत्येक सीटवर एक मास्क, शील्ड, छोटे सॅनिटायझर पाऊच आणि खाण्याचे २ बॉक्स ठेवले होते.त्यात कुकीज, बिस्किट्स, नमकीन असा कोरडा खाऊच जास्त होता. सुरुवातीलाच ‘ही evacuation फ्लाईट असल्याने आवश्यक तेवढेच कर्मचारी आहेत त्यामुळे विमानांतर्गत सेवा असणार नाहीत तुमचे खाण्याचे पदार्थ, पाणी इत्यादी सीटवर ठेवले आहे याशिवाय पाणी हवे असल्यास मागे सर्विंग जागेत आहे ते आपले आपण घ्यावे’ अशी सूचना पायलटकडून माईकवरून झाली. विमानांतर्गत करमणूकपण बंद होती. ( का, कोण जाणे! त्यासाठी काही जादाचा कर्मचारी वर्ग लागत नाही!) त्यामुळे विमान कुठपर्यंत आले, किती प्रवास झाला किती राहिला, अजून किती वेळ आहे इत्यादी ट्रॅकिंगद्वारा मिळणारी माहिती मिळत नव्हती. असो. एकंदरीत सर्व प्रवास अत्यंत प्राथमिक सुविधा देऊन करावा, अशी योजना होती. आम्ही सीट आणि सगळे पृष्ठभाग सॅनिटासिंग वाईप्सने पुसून घेतले, शेजारील सीट रिकामी होती त्यामुळे त्या सीटवर पर्सनल बॅग्स, खाण्याच्या वस्तू इत्यादी ठेवल्या व डोळे मिटून घेतले. मध्ये-मध्ये वाईट हवामानामुळे थोडे धक्के बसत होते त्यावेळी सीटचे पट्टे लावून घेण्याच्या सूचना तेवढ्या येत होत्या बाकी काही सूचना / संपर्क नव्हता. एकूणच प्रवासात पायलटकडून माहिती देणे, सूचना, सेवा, नियंत्रण असा काहीच संपर्क नव्हता.

थोड्याच वेळात प्रवासी सैलावले. काहीजण मास्क काढून खाणे पिणे करून इकडे तिकडे फिरू लागले. काही लहान मुले मधल्या रांगेतून पळापळी खेळू लागली. एकदा विमानाने झेप घेतल्यानंतर कोणीही मास्क-शील्ड बद्दल सांगणारे नव्हते त्यामुळे नेहमीची फ्लाईट असल्यासारखे लोक वावरत होते. फ्लाईटमध्ये एकमेकांपासून अंतर ठेवणे शक्यच नव्हते. त्यातल्या त्यात मास्क आणि शील्डने सुरक्षितता मिळाली असती पण खाण्यासाठी एकदा बाजूला सरकावलेले मास्क तसेच ठेवून लोक निर्धास्तपणे फिरत होते. एकंदरीतच मार्गदर्शक सूचना कागदावरच राहिल्या. शील्डचा तर या लोकांना उपयोग माहीत आहे की नाही अशी शंका येत होती. शेवटी सामाजिक जबाबदारीची जाणीव ही मुळातच असावी लागते ती अशी हमीपत्र घेऊन येत नाही हेच खरे. ''जाको राखे साईया, मार सके ना कोई',' या विश्वासाने प्रवास पूर्ण केला. मुंबई आल्याची आकाशवाणी झाली. आमच्या स्वागताला मुंबईत आज पाऊस आलेला दिसत होता. प्रवाशांनी गडबड गर्दी करत जमिनीवर पाऊल ठेवले.

मुंबई विमानतळ

मुंबई विमानतळावर गर्दी नेहमीपेक्षा खूपच कमी होती पण जी माणसे होती ती नेहमीसारखी गडबड करत होती; पण बहुतेकांनी मास्क घातले होते. बॅगेज क्लेममधून बॅगा घेतल्या. कस्टम्स, इमिग्रेशनसाठी नेहमीसारख्या रांगा लागल्या होत्या, बॅगा फारशा तपासत नव्हते. ते सर्व सोपस्कार पार पाडून पुढे आलो. पण त्यानंतर कोव्हिड १९संबंधी बऱ्याच औपचारिकता पार पाडण्यासाठी स्वतंत्र काउंटर्स होते. उदाहरणार्थ आरोग्यसेतू ॲप डाउनलोड करून त्यावर रजिस्टर करणे. यात खूपच अडचणी होत्या, डाउनलोड झाल्यावर रजिस्ट्रेशन सहज होत नव्हते. त्यात ज्या अडचणी होत्या त्या कोणाला सांगायच्या हा प्रश्नच होता, शेवटी एक फ़ॉर्मल डिक्लरेशन घेऊन ते पूर्ण करत होते. त्यानंतर जिल्ह्याप्रमाणे काउंटर्स केले होते. तिथे परत कुठून आलात, कुठे जाणार, जाण्याची व्यवस्था काय इत्यादी चौकशी करत होते तसेच पुणे वगैरे जवळच्या अंतरासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस होत्या, मुंबईत जाण्यासाठी बेस्ट बसेस होत्या. त्याप्रमाणे इ-पास बनवून देत होते. आम्ही कोल्हापूरला जाणार व आमची कार येणार आहे असे सांगितल्यावर ड्रायव्हरचे नाव, मोबाईल नंबर, कार नंबर इत्यादी नोंदवून आमचे नाव, पत्ता, अलगीकरणाचा जिल्हा- कोल्हापूर असे उल्लेख करून आमचा इ-पास बनवून दिला गेला. आमच्या बरोबर कार व ड्राइवर तपासणीसाठी एक हवालदार जोडून दिला. तो हवालदार आमच्याबरोबर एअरपोर्ट गेटमधून पार्किंगपर्यंत येऊन, ड्रायव्हर व कार तपासून आम्हांला कारमध्ये बसवून गेला. आम्ही कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो. ही सर्व प्रक्रिया म्हणजे कस्टम्स, इमिग्रेशन, नंतर आरोग्य सेतू ॲप, इ-पास देणे - खूप वेळखाऊ आहे. त्यावर त्यांनी एअरपोर्टच्या पोर्टलवर हीच माहिती अगोदर भरून हा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्याप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करून त्याचा सिरीयल नंबर घेऊन आलो होतो, पण प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग झाला नाही. इथे सर्व परत करावेच लागते. विमान जमिनीवर उतरल्यानंतर एअरपोर्टवरून बाहेर पडण्याला अडीच-तीन तास लागतातच आणि हा सर्व वेळ उभे राहून काढावा लागतो. सर्व प्रवासी कंटाळलेले, मास्क घालून अवघडलेले असतात पण काही इलाज नाही. गाडीत बसल्यानंतर पाय बोलायला लागतात. असो.

मुंबई ते कोल्हापूर

आम्ही मुंबईत साधारण १२ वाजता पोहोचून वरील सर्व सोपस्कार करून अडीच-तीन तासात बाहेर पडून तासाभरात कोल्हापूर हायवेला लागलो, मुंबईत पावसाचा चांगलाच जोर होता, पावसाळी मुंबईचा गंध हवेत भरून राहिला होता. मुंबईतील रस्त्यांवर बऱ्यापैकी रहदारी दिसत होती. एकदा हायवेला लागल्यावर रहदारी विरळ झाली. नेहमी दुतर्फा गजबजलेली हॉटेले, धाबे, चहाच्या टपऱ्या सगळे पूर्णपणे बंद होते. साहजिकच बाहेर बघताना उदास उदास वाटत होते. येताना ड्रायव्हरला आधीच प्यायचे पाणी आणि सॅनिटायझर स्प्रे आणायला सांगितला होता. बसण्यापूर्वी बॅगांवर स्प्रे मारून मगच गाडीत ठेवल्या. हायवेवरच गाडी बाजूला घेऊन प्रथमच मास्क, शील्ड सर्व बाजूला करून तोंड चेहेरा सर्व धुवून फ्रेश झालो, करोनाच्या भीतीने पूर्ण प्रवासात चेहेऱ्याला हातच लावला नव्हता. हॉटेल नसल्याने आणलेल्या पदार्थाचाच फराळ करून परत प्रवास सुरू केला. येताना साधारण खाण्याच्या वेळा लक्षात घेऊन त्या त्या वेळेनुसार खाण्याची भरपूर पाकिटे मुलीने करून दिली होती. शक्यतो खाण्याच्या पदार्थाला हात न लागता/लावता खाता येईल अश्या कौशल्याने पदार्थ पॅक केले होते. हायवे पूर्ण रिकामा असल्याने मुंबई-कोल्हापूर प्रथमच विना थांबा प्रवास केला. वाटेत प्रत्येक गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी पोलीस गाडी थांबवून, कोठे जाणार अशी चौकशी करून इ-पास तपासून पुढे सोडत होते. एकंदरीत बंदोबस्त कडक होता. पासशिवाय कोणी जाऊ शकेल अशी शक्यता नव्हती.
अश्या रीतीने आम्ही कोल्हापूरच्या किणी टोल नाक्याला आलो. साधारण संध्याकाळचे साडेसात वाजले होते. नाक्यावर खूपच पोलीस होते, एकंदरीत परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. कोव्हिडच्या साथीत रात्रंदिवस इथे रस्त्यावर उभे राहून धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबद्दल कृतज्ञता वाटली. इथे कुठे जाणार अशी चौकशी झाली. कोल्हापूर म्हणून सांगितल्यावर गाडी बाजूला घेऊन, कोल्हापूर प्रशासनाने कोव्हिडसाठी उभारलेल्या बूथकडे पाठविण्यात आले. बूथवरील कर्मचाऱ्यांना इ-पास दाखविल्यावर त्यांनी परत कुठून आला, कुठे जाणार, पूर्ण पत्ता इत्यादी पासवर असलेलीच माहिती पुन्हा विचारली. मग एक सरकारी व एका खासगी हॉस्पिटलचे नाव सांगितले आणि कुठे तपासणी करणार असे विचारले. यावर आम्ही “ही कसली तपासणी होणार आहे म्हणजे कोव्हिड संदर्भात आहे हे माहीत आहे, पण तपासणी म्हणजे नेमके काय करतात? Swab घेतात की नुसते तपमान पाहतात? त्यानंतर काय? “ असे विचारले असता ते काही आम्हांला माहीत नाही, हॉस्पिटलमध्ये कळेल, असे ठरावीक उत्तर मिळाले. आम्ही खासगी तपासणी केंद्रात ( Private Lab ) गेलो तर चालेल का असे विचारल्यावर, "आमच्याकडे ही दोन हॉस्पिटले आहेत; त्यांपैकीच कोणते ते तुम्ही सांगा" असे सांगितले. आम्ही खासगी हॉस्पिटलचा पर्याय सांगितला. त्यांनी एका चिठ्ठीवर आमचे नाव व हॉस्पिटलचे नाव लिहिले व आम्हाला हॉस्पिटलकडे पाठविले.

खासगी हॉस्पिटल : एक सरकारी अनुभव

खासगी हॉस्पिटलमधील अनुभव फारसा सुसह्य नव्हता. हॉस्पिटलच्या इतर विभागांशी संपर्क येऊ नये अश्या रीतीने कोव्हिड वॉर्ड हा मागल्या बाजूस एका बाजूला होता. गेल्या गेल्या प्रथम केसपेपर काढण्यास सांगितले, पण तेथे संबंधित कर्मचारी हजर नव्हते, काही करता येईल का असे विचारता, “येतील; ते जेवायला गेले असतील”, असे उत्तर मिळाले. आम्ही तिथेच ताटकळून उभे राहिलो. याच परिसरात कोव्हिडचे रुग्ण उपचारासाठी ठेवले असल्याने एक प्रकारचा ताण होता. अर्ध्या-पाऊण तासाने ते आले व म्हणाले “मी नाही केसपेपर करत. मी सरकारी कर्मचारी आहे. मी फक्त नावनोंदणी करतो आणि मी इथेच होतो पण इथे जास्त थांबत नाही कारण इथे positive पेशंटपण आहेत. त्या शेजारच्या खुर्चीवर बसतात ते हॉस्पिटल कर्मचारी आहेत व ते केस पेपर बनवतात.” थोड्या वेळाने ते संबंधित कर्मचारी आले. ज्यांना आम्ही अगोदर केस पेपर संबंधात विचारणा केली होती तेच हे!

त्यांना विचारता त्यांनी आपण अगोदर हजर होतो ही ओळखच दिली नाही. शांतपणे कॉम्प्युटरवर केसपेपर तयार केला व त्याची प्रिंट दिली. ते प्रिंट केलेले कागद रेलिंगच्या बाहेर पडत होते. (कोव्हिड काळात स्टाफ आणि तपासणीसाठी येणारे यांच्यात अंतर राखण्यासाठी एक रेलिंग बनवण्यात आले होते) त्यांनी आम्हांला ते सांगण्याची तसदीपण घेतली नाही. तिथे असणाऱ्या व आमची धडपड पाहणाऱ्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने आम्हाला ‘ते तिकडे तुमचे पेपर पडले असतील. ते घेऊन आत डॉक्टरकडे द्या’ असे सांगितले. त्यानंतर नोंद करणारे डॉक्टर, पैसे भरून घेणारे कर्मचारी, प्रत्यक्ष swab घेणारे डॉक्टर असा लपंडावाचा खेळ झाला. आम्ही हॉस्पिटलला आल्यानंतर चार तासानी swab देऊन बाहेर पडलो. (टेस्टचा खर्च प्रत्येकी २२०० रुपये व साठ वर्षांवरील माणसांसाठी मोफत.) ह्यात प्रत्यक्ष तपासणी साठी ( swab घेणेसाठी ) फक्त दोन मिनिटे लागत होती. बाकीच्या नोंदी, पैसे भरणे इत्यादींसाठी फारतर १० मिनिटे लागत असावीत. बाकी सर्व वेळ संबंधितांची जुळवाजुळव करण्यात गेला. हा आहे तर तो नाही! आम्ही सर्व संबंधितांना डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, सगळ्यांना, आम्ही ३० तास विमान प्रवास, नंतर ८ तास कार प्रवास करून थकून आलो आहोत, तर जरा लवकर करा अशी विनंती केली; पण काही उपयोग झाला नाही. आम्हांला काही दुसरा मार्गच नव्हता. आम्ही फ्रेश होण्यासाठी हॉटेलवर गेलो असता त्यांनी सहकार्य म्हणून चेकइन तर करू दिले; पण हॉस्पिटल मध्ये जाऊन swab देऊन मगच या, असे सांगितले. त्यामुळे आम्ही थांबून राहिलो. टेस्ट झाल्यानंतर आम्ही एकदाचे सुटलो अश्या भावनेने बाहेर पडलो तर दरवाजात परत एका सरकारी कर्मचाऱ्याने इथे नोंद करावी लागते म्हणून परत थांबवून परत सगळी तीच ती माहिती नोंदवून घेतली. का, कोण जाणे! पण रात्रीचे १२ वाजल्याने त्यांच्याशी चर्चा करण्याइतकी ताकदच नव्हती. खासगी हॉस्पिटलच्या सरकारी कारभाराचा अनुभव घेऊन आम्ही चार तासांनी हॉटेलकडे रवाना झालो.

ही सर्व प्रक्रिया पार करून, हॉटेलवर जाऊन आंघोळी वगैरे आटोपून थोडेसे खाऊन झोपेस्तोवर रात्रीचा १ वाजला. आणि एकंदरीत ४० ते ४२ तासांचा प्रवास आणि सर्व दगदग संपली.

हॉटेल विलगीकरण

आम्ही अमेरिकेत असतानाच हॉटेलशी संपर्क करून बुकिंग करून ठेवले होते. हॉटेलचे दर दिवसाला ३०००, ज्यात ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. कोल्हापुरात अजूनही काही हॉटेल्सचा पर्याय होता. (तिकडे दिवसाला साधारण १८००मध्ये ब्रेकफास्ट आणि दोन्ही वेळचे जेवण असे पॅकेज उपलब्ध होते.) परंतु तेथे काही पॉसिटीव्ह रुग्णदेखील राहत असल्याचे समजल्यामुळे आम्ही हे हॉटेल ठरवले. हॉटेलला गेल्यावर आम्ही आमच्या खोलीत आलो. हा संपूर्ण मजला विलगीकरणासाठी राखीव होता. प्रत्येक खोली बाहेर एक टीपॉय ठेवला होता. आम्ही खोलीत आल्यानंतर कोणाशीही प्रत्यक्ष संपर्क नव्हता. खाण्यासाठी जर काही हवे असल्यास इंटरकॉमवर मागवायचे, हॉटेल कर्मचारी ते बाहेरील टीपॉयवर ठेवून बेल वाजवून जात. थोड्या वेळाने आपण ते आत घ्यावयाचे. वापरलेली भांडी परत देतानापण तसेच. खोलीची अंतर्गत साफसफाई इत्यादी सर्व सेवा बंद होती. आपणच आपल्याला आवश्यक वाटेल तेवढी स्वच्छता करायची. आम्ही हॉटेलमध्ये आल्यापासून ते सोडून येईपर्यंत हॉटेलचे कुणीही कर्मचारी दिसलेसुद्धा नाहीत. सर्व व्यवहार मानवी संपर्काशिवाय पार पडले. अर्थात त्यामुळे कसलीही गैरसोय झाली नाही.

व्हॉट्सॅपवर आलेला रिपोर्ट
व्हॉट्सॅपवर आलेला रिपोर्ट

आम्ही टेस्ट देऊन आल्यानंतर आमचे रिपोर्ट मात्र २४ तासात मोबाईलवर आले. ते आम्ही दुसरे दिवशी सकाळी आमच्या भागातील करोना विलगीकरणाचे काम पाहणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे पाठविले. त्यांनी अत्यंत तत्परतेने आम्हांला १४ दिवस गृह-विलगीकरणाचे पत्र व्हाट्सॲपवर पाठविले, आणि परत फोन करून तुम्ही घरी जा, तुमच्या घरावर लावण्याचे स्टिकर मी नंतर पाठवतो असे सांगितले. त्यांनी या काळात सरकारी कर्मचाऱ्याकडून तत्पर आणि व्यक्तिगत सेवेचा सुखद अनुभव दिला. आम्ही आमच्या नेहमीच्या ड्रायव्हरना बोलावून हॉटेल मधून चेकआऊट करून बाहेर पडलो.

मिशन पूर्ण झाले.

एकंदरीत करोना काळातील विमान प्रवास - सॅन डियागो ते मुंबई नंतर मुंबई ते कोल्हापूर प्रवास, हॉस्पिटल व हॉटेल विलगीकरण सर्व पार पडून ( ४० तास प्रवास आणि ३६ तास हॉटेलमधील अनिवार्य अलगीकरण संपवून) तीन दिवसांनी घरी आलो. सहा महिन्यांनी घराचे दार उघडताना एक वेगळाच आनंद होत होता. आमच्या गच्चीतील बागेतली झाडे हिरवीगार होती, थोडी मोठीपण झाली होती. तेवढ्यात पाऊस आला, झाडे वाऱ्यावर डोलू लागली, एक ओळखीची गार झुळूक अंगावर आली. "हुश्श! घरी आलो".

घरी आल्यानंतर स्वगृही, स्वदेशी आल्याचा आनंद वेगळाच होता. एक मिशन पूर्ण झाल्यासारखे वाटत होते.

All's well that ends well.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet