कोविड डायरी (भाग १) : डॉ . तुषार पंचनदीकर

कोविड डायरी : प्रास्ताविक
झाकोळलेलं मन

कुठल्याही घटनेला पार्श्वभूमी असावी लागतेच असं नाही; पण मला जेव्हा १४ सप्टेंबर २०२०पासून कोविड ड्यूटी करावी लागणार असं कळलं तेव्हा नजिकचा भूतकाळ मनामध्ये नक्की तरळला. आणि एक झाकोळलेलं मन समोर आलं.

वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर झालेली आंदोलने :

व्यवसायाने डॉक्टर आणि त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ यामुळे virologyशी तसा मर्यादित संबंध. त्यात Corona वायरसबद्दल माहिती नाहीच हेच सत्य होतं. (नाही म्हणायला घरी दोन Golden Retriever श्वान असल्याने त्यांना करोनाची लस देतात ह्याची कल्पना होती.) पण दर दहा वर्षांनी जगात Flu Pandemic येऊ शकते असे जे MBBSच्या दुसऱ्या वर्षी शिकलो होतो त्याचा प्रत्यय म्हणजे १९९०-२००० चा HIV-AIDS, २००९-२०१०चा H1N1 – Swine Flu आणि आता २०१९-२०२०चा COVID19 – Corona. त्यामुळे हा उद्रेक किती दिवस चालेल याची साशंकता. इतिहासातील प्लेग आणि स्पॅनिश फ्लूच्या गोष्टी “युद्धस्य कथा रम्या” म्हणूनच वाचलेल्या.. तरीसुद्धा या वैश्विक महामारीवर उपाय निश्चित हा आशावाद.
स्वतःच्या झाकोळलेल्या मनात अनेक आशादायी किरणे होती.

व्यावसायिक पातळीवरील आंदोलने फारच वेगळी.

  1. ४०० ते ५०० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात असलेला वायरस समूह.. वेळोवेळी होणारी त्यांच्यातील उत्क्रांती आणि परिवर्तन (Evolution & Mutations)
  2. मानवतेच्या उद्धारासाठी निर्माण केलेल्या विविध लशी आणि त्याचबरोबर मानवतेच्या संहारासाठी निर्माण होत असलेले Engineered viruses
  3. डॉक्टरांची व्यावसायिकता आणि डॉक्टरांविषयी बदललेली जनभावना
  4. अनुभव आणि कसोटी – पुरावे (Experience Vs Evidence-based) यांची फारकत झालेली प्रॅक्टिस
  5. वेगवेगळ्या Pathies (Allopathy, Ayurveda etc.) यांचे अहं आणि ठराविक पातळीपर्यंत त्यांच्यात हवी असलेली एकात्मता (Integration of Pathies)
  6. शिखर संस्थांचे (ICMR, WHO etc.) महत्त्व, त्यांची आपत्ती व्यवस्थापनातील झालेली अगतिकता आणि त्यातही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चाललेली नाहक आणि दाहक अहमहमिका

झाकोळलेलं व्यावसायिक मन जास्त गर्द होतं; तरी त्यातून शुभ्र किरणे नक्कीच फाकत होती.

Dr. Panchanadikar

कोविड डायरी : प्रास्ताविक

मार्च २०२०पासून सुरू झाल्या कथा आणि व्यथा

पहिल्या दिवशी ड्युटीवर जाताना मार्च २०२०पासून सुरू झालेल्या कोविड कथा आणि थोडे दिवसांनी त्याच्याबरोबरच चालणाऱ्या कोविड व्यथा साथीला होत्या. २५ मार्च ते ३१ मेपर्यंतचे lockdownचे चार टप्पे आणि १ जून ते या महिनाअखेरीपर्यंत चालणारी unlockची प्रक्रिया ही शब्दश: अचंबित आणि प्रलंबित ठरली.

सुरवातीला या प्रकोपाचे गांभीर्य नीट लक्षात न आल्याने सुरस कथानिर्मिती खूप झाली. वेगळ्या जीवन शैलीचे स्वागत झाले. वेगवेगळ्या पाककृती, नवराबायकोंचे घरकामातील अदलाबदलीचे किस्से, अचानक सुरू झालेल्या छंदोपासना इत्यादी घरोब्याच्या गोष्टी. वर्क फ्रॉम होम, मर्यादित स्वरूपाची कार्यालयीन उपस्थिती, नेटवर्किंगचे नवे कल्चर, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि बेलगाम वार्तांकन यावर बेतलेल्या चमत्कारिक कथांचा जन्म झाला. राजकीय अराजकतेच्या वेताळ कथांवर तर बोलायलाच नको.

हळूहळू या सर्व गोष्टींना व्यथांची जाणीव व्हायला लागली. घरातल्या वाढायला लागलेल्या कुरबुरी; परदेशी वा परगावी असणाऱ्या नातेवाईकांची कुचंबणा; नोकरदारांच्या पगारावरच काय तर नोकरीवर चाललेली कात्री; पोटपाणी आणि कमावणारे हात यांचं व्यस्त प्रमाण; ठप्प होत गेलेली व्यवसायाची आणि पर्यायाने अर्थ व्यवस्थेची चाकं आणि प्रस्थापित सरकारविरोधी (पक्षातीत) भावना (Anti-incumbency) तेवत ठेवण्याचा भारतीय मानस... हे त्या व्यथेचे काही कंगोरे.. केवळ उद्धृत करण्यासाठी.

अशाच कथा आणि व्यथातून डॉक्टरी पेशा कसा मागे राहील? (दर्पोक्ती की उपरोक्ती!!)

जागतिक महामारी जरी मार्च २०२०पासून अस्तित्वात आली तरी या कथेचे मूळ नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ वुहान प्रांतातून झाली हे आता सर्वज्ञात आहे. अत्यंत कमी दिवसात मानवसंहार प्रचंड होवू लागल्यावर संसर्गप्रसार थांबवण्याचे एक अस्त्र म्हणून प्रांत वा देशच नव्हे तर जगच बंदिवान केले गेले. प्राथमिक विचार करता हे योग्यच होते असे म्हणायचे. संसर्ग प्रसाराची व्याप्ती माहीत नव्हती – संक्रमणांची रीत (Mode Of Transmission – Surface Contact / Air Borne / Droplet) नक्की करता येत नव्हती – विषाणूंच्या विषारीपणाचे (Virulence & lifecycle of Corona virus) चित्र धूसर होते – त्यामुळे उपचारांचा आणि उपाय योजनांचा मागोवा घेता येत नव्हता. ...

... आणि यातून अनेकानेक कथांचा जन्म झाला.

कथा क्र. १ : मास्क – Mask
रुमाल, ओढणीपासून कापडी मास्क, Surgical मास्क, Surgical Three-ply मास्क, N-95 मास्क, N-95 Unidirectional valve mask ते Designer मास्क असे अनेक नायक व नायिका कथेत समाविष्ट झाले. धुणे, वापरुन फेकून देणे, पुनर्वापर यावर कल्पनाविस्तार झाले. आणि मास्क लावणे हा संक्रमण थांबवण्याचा प्रभावी उपाय आहे या टिप्पणीवर कथेचा सुखांत झाला असे वाटते.

कथा क्र. २ : स्वसंरक्षण – Hand Wash, Sanitizer, PPE, Room Sterilization And Social Distancing

ही कथा सगळ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठी लिहिली गेली...

सहा फुटांचे अंतर, हँड वॉशचे प्रकार व महत्त्व, पाणी + अल्क + रंग वा अल्कोहोल मिश्रित sanitizer यांचा अविचारी आणि अवास्तव वापर, सपाट पृष्ठभागांवर निर्जंतुकीकरणासाठी वापरात येणारे sodium hypochloride, खोल्या, घरं वा सोसायटी निर्जंतुक करण्यासाठी वापरण्याची अद्भुत कल्पना याने ही कथा अकलेच्या कांद्याचीच ठरली. कथेचं तात्पर्य मात्र हँड वॉशचं अनन्यसाधारण महत्त्व हेच आहे.

कथा क्र. ३ : उपाय आणि उपचारांची कथा (साथीचा जोगवा आणि गोंधळ !!)

... ही कथा दीर्घ आणि क्रमश: असू शकते

अनुक्रमणिका १ : औषधोपचार : प्रतिबंधात्मक व प्रत्यक्ष

  • क्लोरोक्वीन, हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन (HCQ), अर्सेनिका अल्बम ३०, कॅम्फोरेक्स, व्हिटामिन बी–सी, झिंक, अॅझीथ्रोमायसिन पासून ते स्टीरॉईड, रेमडेसिविर इत्यादी इत्यादी

अनुक्रमणिका २ : निदान व तीव्रता

  • कोविड टेस्टिंग
    • नाक आणि घशाचा स्वाब – (PCR) वा अँटीजेन टेस्ट
    • रक्तातील अँटीबॉडी
  • लक्षणविराहित आजार, आयसीयू ची वारी पासून थेट मृत्यू

अनुक्रमणिका ३ : उपचारपद्धती

  • विलगीकरण : घरच्या घरी वा हॉस्पिटल मध्ये
  • ऑक्सिजन वॉर्ड
  • आय. सी. यू .
  • व्हेंटीलेटर

अनुक्रमणिका ४ : शोध आणि संशोधन

  • शोधनिबंधांचा वर्षाव
  • सततच्या बदलणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा भडीमार
  • क्लिष्ट असणाऱ्या लशीच्या निर्मितीची कळकळ आणि स्पर्धा

अशी एक विचित्र पार्श्वभूमी मनाशी ठेऊन मी कोविड ड्युटीवर रुजू होणार होतो १४ सप्टेंबर २०२० रोजी ..
(पुढील भाग)

© डॉ . तुषार पंचनदीकर
M.D. (Obstetrics & Gynaecology)
(लेखक भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय कॉलेजात Obstetrics & Gynaecology विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतेय Smile
पुढील भाग लवकर लिहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0