Skip to main content

शरीरविक्रय बेकायदाच?

"मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त : सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत": दै लोकसत्ता, ऑक्टोबर २५, २०२०.

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-police-bust-high-profile-se…

वरील घटना, तिला गुन्हा ठरवणे, तदनुषंगिक कायदेशीर कारवाई आणि तत्सबंधी (पुरोगामी) वृत्तपत्रातील बातमी हे सारे काही, लैंगिक व्यवहाराविषयी समाजात प्रचलित असणाऱ्या प्रथांबद्दल, समजुतींबद्दल आणि एकूण सामाजिक लिंगभानाबद्दल काय सांगतात?

लैंगिक व्यवसाय हा सर्वात जुना व्यवसाय आहे. दोन किंवा अधिक प्रौढ (संमतीवय ओलांडलेल्या) व्यक्तींमधे परस्पर संमतीने घडणाऱ्या लैंगिक व्यवहारात इतरांनी "दखलबाजी" का करावी? या व्यवहारात शोषण होत असल्यास किंवा रोगप्रादुर्भाव होत असल्यास जरूर करावी. अन्यथा हे चालू द्यावे. एक पायरी पुढे जाऊन असेसुद्धा म्हणता येईल की हा व्यवसाय योग्य रीतीने करणे संबंधितांसाठी सुकर होईल आणि केवळ दुष्प्रवृतींना पायबंद बसेल असे कायदे करावेत. इतर व्यवसायांना लागू असणारे नियम (उदा. कामगार हक्क, कर इत्यादि) लागू करावे. आजारांपासून संरक्षण देऊ शकणाऱ्या साधनांबद्दल माहिती आणि त्यांचा सुलभ पुरवठा करावा. अश्या आणि तत्सम तऱ्हेने नियमित केलेल्या लैंगिक व्यवसायाने समाजातील लिंगविकृती कमी होण्यास मदत होऊ शकेल.

आता वरील बातमीच्या तपशिलासंबंधी: प्रस्तुत घटनेत कोणतीही बळजबरी किंवा इतर दुष्कृत्य होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटत नाही. असल्यास बातमीत ते सांगितलेले नाही. पैसे कमावण्याची इच्छा हे सर्वच व्यवसायांचे मुख्य कारण आहे. "पैशाचे आमिष दाखवणे" आणि वेश्याव्यवसायात "ढकलणे" हा तर शुद्ध वदतोव्याघात आहे. पर्याप्त संमतीने केलेला लैंगिक व्यवसाय हा गुन्हा नाही हे न्यायालयांनीही वेळोवेळी नमूद केले आहे. मग अशा गोष्टीचे गुन्हेगारीकरण कशासाठी? त्यात कुणाचे कल्याण आहे? कुठल्यातरी जुनाट आकसाने कारवाई करायचीच होती तर मग ती फक्त संबंधित स्त्रिया आणि दलाल यांच्यावरच का? सोदे (ग्राहक) निर्दोष कसे? त्यांचा तर बातमीत उल्लेखही नाही. की बातमीत सांगितलेल्या लैंगिक व्यवहारासाठी दहा लाख रुपये मोजण्याएवढी क्रयशक्ती असणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळी फुटपट्टी? पुरवठा हा गुन्हा असेल तर मागणी हा सुद्धा असावयास हवा. आणि पुरवठा व मागणी हे दोन्ही जर गुन्हे नसतील तर मग दलाली तरी बेकायदा कशी?

शेवटी वार्तांकनाविषयी. पुरोगामी म्हणवणाऱ्या वृत्तपत्रात अशा घटनेचे वार्तांकन कसे असावे? मुळात असावेच का? आणि असल्यास ते करताना वार्ताहरांनी आणि उपसंपादकांनी आवश्यक तितकी प्रगल्भता आणि सामाजिक जाणीव दाखवावयास नको का? सनसनाटी मथळे आणि सवंग भाषा कशासाठी?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

Rajesh188 Mon, 26/10/2020 - 01:04

आवक वाढली की कीमत कमी होते..
स्त्री देह बाजारात विकायला बंदी असल्या मुळे किँमत जास्त आहे.
पण असा बाजार कायद्यांनी ,समाजानी मान्य केला की बाजारात प्रचंड आवक वाढेल आणि निर्माण झालेल्या स्पर्धेत किँमत अत्यंत नगण्य होईल.
मग ह्याचा परिणाम काय होईल 20 ते 30 रुपयाला विकली जाणारी वस्तू म्हणजे स्त्री.
समतोल विचार केला आणि स्त्री ला समाजात आत्मसन्मान नी राहण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर देह विकण्याची स्थिती निर्माण च झाली नाही पाहिजे.

माचीवरला बुधा Mon, 26/10/2020 - 13:38

In reply to by Rajesh188

या व्यवसायाचे अर्थशास्त्र भारतात काय असेल याचा अंदाज करणे अवघड आहे. लोकांना या व्यवसायात मनाविरुद्ध यावे लागू नये हे मात्र खरे.

Rajesh188 Mon, 26/10/2020 - 14:11

In reply to by माचीवरला बुधा

भारत,नेपाळ,बांगलादेश ह्या देशातील प्रचंड गरिबी आणि प्रचंड असलेली लोकसंख्या ह्याचा विचार केला तर स्थिती कशी होईल ह्याचा अंदाज येईल.

चिमणराव Tue, 27/10/2020 - 14:36

हे पेपरवाले सांगत नाहीत.
आणि कायदा कलमाप्रमाणे साक्षीदार, पुरावे सिद्ध करणे अवघडच असते. अल्पवयीन हे सुद्धा कसं ठरवणार?

प्रकाश घाटपांडे Fri, 13/11/2020 - 15:23

खर तर शरीरविक्रय या कायदेशीर करुन त्या सेक्स वर्कर्स ना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या निश्चित करुन द्यायला हव्यात. वैद्यकीय सुविधा व प्रतिबंधात्मक उपाय यांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. जोर जबरदस्ती हा गुन्हाच आहे. वस्तुविक्रय जसा आहे तसा शरीर विक्रय. ज्यांना स्वेच्छेने करायचा आहे त्यांनाच तो करु द्यावा.