वाढता वाढता वाढे

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

वाढता वाढता वाढे

- सामो

हात दाखवून अवलक्षण कशाला म्हणतात सांगा पाहू! मी सांगते.

माझ्या एका दुष्ट मैत्रिणीला मी भोळसटपणे विचारले होते, "तुझी सेल्फी नेहमी कशी आकर्षक येते? सेल्फी मस्त यावी म्हणून तू काय करतेस, मलाही टिप्स दे." यावर ती म्हणाली, "अगं त्यात काय मोठं अवघड आहे! जर आपल्याला आपली सेल्फी भारी यावी असे वाटत असेल तर काय करावं सांगू, आपल्यापेक्षाही बेताच्या रूप-रंग-बांध्याच्या मैत्रिणीला बाजूला उभे करून, सेल्फी काढावी." हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला; अच्छा, ही नटमोगरी आपल्याला, तिच्याबरोबर, सेल्फी काढण्याचा नेहेमी आग्रह करत असते त्याचे गुपित हे आहे होय! अरेरे! किती मंद आपण. तर मंडळी असे आहे.

आमचे लहानपणही टिपिकल ममव! त्यात आई मराठीची शिक्षिका. एकदा शिक्षिका म्हणजे आयुष्यभर शिक्षिका. लहानपणी सज्जड, टिपिकल ममव शिकवण मिळालेली होती. सतत आरशासमोर उभं राहायचं नाही, बाह्यरूपापेक्षा अंगच्या कलागुणांवर भर द्यायचा, दिसणं अजिबात महत्त्वाचं नाही. यामुळे झालं काय बाह्यरूप मुळात नव्हतंच, तेही घासूनपुसून लख्ख, प्रेझेन्टेबल होईना; परत नसलेले कला-गुण निर्माण झाले नाही ते नाहीच. म्हणजे तेल जाते, तूप जाते, वरती धुपाटणेही आपल्या कानाशिलात लगावून कोणी तरी घेऊन जाते अशातली गत झाली. पुढेपुढे कळत गेले; स्वप्रतिमा, बाह्यरूप ही सर्व साधनं असतात, आपल्याला हाताळायची अक्कल हवी. अंगी चतुरपणा, कौशल्य हवं. पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हाडामांसात रुजलं होतं.

स्वप्रतिमेचा विषय निघालाच आहे तर, लठ्ठपणा या विषयावर बोलू या. लठ्ठपणा आणि अमेरिकन जीवनमान हे एका वाक्यात यायलाच पाहिजे; कारण हा देश लठ्ठपणा या व्याधीमुळे बदनाम झालेला आहे. लठ्ठपणा आणि तदनुषंगिक रोगांमुळे मृत्युमुखी पडण्याचा दर अमेरिकेमध्ये अचाट आहे - https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6070145/. ‘ओबेसिटी’ला ‘ग्लोबेसिटी’ म्हणजे जागतिक समस्या मानले आहे बऱ्याच काळापासून. अमेरिकेसमोर लठ्ठपणाची समस्या 'आ’ वासून (श्लेष घेतला तरी हरकत नाही ) उभी आहे, हे सर्वज्ञात आहे. लठ्ठपणा हा स्टिग्मा, कलंक आहे. त्याचे अनेकविध पैलू आहेत - जसे स्वत:ला लठ्ठ समजणारे लोक, कमी मोबदल्यात, कमी पैशांत, नोकरी करायला तयार होतात. लठ्ठपणा असा स्टिग्मा आहे ज्यामुळे व्यक्तीची स्वप्रतिमा खालावते, आणि एकंदर स्वत:च्या जीवनमानाचा दर्जा, मूड, आत्मविश्वास साऱ्याचाच कमीअधिक प्रमाणात बळी जातो. अधिक तपशिलात पाहू गेलं असता असं आढळतं की अमेरिकेतील, काही विशिष्ट राज्ये/प्रदेश यांमध्ये लठ्ठ लोक अधिक आढळतात. म्हणजे हा पॅटर्न clustered असल्याचे आढळून आलेले आहे.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4310761/bin/nihms636719f1.jpg

हा सर्व्हेच घ्या ना. या सर्व्हेमध्ये मांडल्याप्रमाणे, सलग तिसऱ्या वर्षी व्हरमाँट हे राज्य सर्वाधिक निरोगी राज्य म्हणून निवडलं गेलं. हे तर काहीच नाही, सलग २० वर्षं, व्हरमाँट हे राज्य पहिल्या ५ सर्वाधिक निरोगी राज्यांच्या यादीत येत राहिलं. आरोग्याच्या बाबतीत, एकंदर खाणं-पिणं-व्यायाम सर्वच बाबतीत किती सजगता असेल तिथल्या लोकांची, याची कल्पना या विदेवरून तुम्हाला येऊ शकते. मी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. कंत्राटी नोकरीमुळे, व्हरमाँटमध्ये मी बरीच वर्षं राहिले. प्रत्येक राज्यातल्या लोकांची काही वैशिष्ट्यं असतात. व्हरमाँटमधले माझे अनुभव सांगते.

माझ्या ऑफिसमधल्या, सहकाऱ्यांपैकी बरेच लोक जेवणाच्या मधल्या सुट्टीत कमीत कमी अर्धा तास पळायला जात. व्हरमाँटमध्ये बर्फ अचाट म्हणजे अचाट पडतो, वर्षातला मोठा काळ कडाक्याची थंडी असते. पण हे लोक तशा बर्फात, थंडीतही योग्य ते बूट घालून पळायला नेमाने जात. आमच्या ऑफिसमध्ये जे काही लठ्ठ लोक होते त्यातील अनेक जण 'वेट वॉचर्स ग्रुप' मध्ये सहभागी होते. ट्रेकिंग व बायकिंग हा तर कित्येकांचा छंद होता. अगदी कोणीच लठ्ठ नव्हतं असं मी म्हणणार नाही, परंतु आरोग्याबद्दल जागरुकता, बर्फ पडत असूनही मैदानी छंद जोपासणंअशा अनेक कौतुकास्पद सवयी व्हरमाँटीयर लोकांच्या होत्या खऱ्या.

आता वळू या, 'लठ्ठपणा' संसर्गजन्य असतो का, या प्रश्नाकडे. तुम्ही म्हणाल, काय आचरट प्रश्न आहे! लठ्ठपणा कसा काय संसर्गजन्य असू शकेल? जिवाणू-विषाणूंचा संबंधच नाही इथे. एक वेळ लठ्ठपणा अनुवांशिक असू शकेल. व्यक्तीने स्वतःकरता निवडलेले पर्याय स्वातंत्र्य हेच लठ्ठपणाचे कारण असू शकेल. ती व्यक्ती किती खाते, किती व्यायाम करते, व्यायामातली नियमितता अथवा अनियमितता, तिची खाण्यापिण्यामधील आवडनिवड, तिला असलेल्या व्याधी व त्यावरील औषधांचे दुष्परिणाम ,यावर लठ्ठपणा अवलंबून असणं हे सहज शक्य आहे. परंतु लठ्ठपणा संसर्गजन्य असणं शक्यच नाही. पण कधीकधी आपली धारणा चुकीची असूही शकते; विशेषत: जेव्हा ती फक्त गट फीलिंगवर, मला-वाटतं-म्हणून यावर बेतलेली असते. जरा आठवून बघा, 'ओबेसिटी एपिडेमिक' अर्थात लठ्ठपणाची साथ असा शब्द तयार केला गेलेला आहे. वरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 'होय', लठ्ठपणा संसर्गजन्य आहे. तुमच्या मित्रमंडळींमध्ये लठ्ठ् लोक आहेत अथवा सडपातळ लोक आहेत, याचा तुमच्या शरीरयष्टीवरती नकळत परिणाम होतो, असं आता लक्षात आलेलं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि सॅन डिएगो, कॅलिफोर्निया या दोन संस्थांच्या अभ्यासामधून निष्कर्ष निघालेला आहे की - लठ्ठ व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती लठ्ठ होण्याची शक्यता नाट्यमयरीत्या निर्माण होते. तुम्ही लठ्ठ व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्ही लठ्ठ बनण्याची शक्यता अतोनात वाढते. शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं, अभ्यास केला. जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा शास्त्रज्ञांनी अनेक मुद्दे लक्षात घेतले. लठ्ठ व्यक्तीचे शेजारीपाजारी, नात्यातील लोक, समान गुणसूत्रं असलेले नातेवाईक आणि वास्तव तसेच आभासी जगतातील मित्रमंडळ अशा सर्व व्यक्तींचा अभ्यास केला, त्यांच्यातील घनिष्ठता, मैत्रीमधील जवळीक मोजली. तेव्हा त्यांना हे आढळलं, की ही 'लागण' नात्यानात्यांत, शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये होण्याऐवजी, मित्रमंडळात होते. गंमत म्हणजे, ते मित्रमंडळ आभासी जगातलं असो अथवा वास्तव जगातलं, it doesn’t matter. जितकी जास्त घट्ट मैत्री तितकी ही लागण होण्याची शक्यता अधिक वाढते, असं आढळून आलं. या अभ्यासातील प्रमुख निरीक्षक डॉक्टर निकोलस क्रिस्टॅकिस ( Dr. Nicholas Christakis) यांच्या मते कदाचित असंही कारण असू शकतं की, प्रत्येक व्यक्तीच्या मतांवर, पर्सेप्शनवर मित्रमैत्रिणींचा प्रभाव खूप असतो. तेव्हा जर आपले जवळचे मित्र अथवा मैत्रीणच लठ्ठ असतील तर कदाचित लठ्ठपणा तितकासा नकारात्मक वाटत नसावा.

https://static01.nyt.com/images/2007/07/25/health/26fat.graphic.gif?quality=75&auto=webp&disable=upscale

मनोहर आणि शिरीष हे दोन मित्र आहेत. मनोहर जाडगेला आहे. शिरीषचं वजन आटोपशीर आणि सरासरी आहे. शिरीषने मनोहरच्या पावलावर पाऊल टाकून जाड होणं या घटनेमध्ये दोघांच्या मैत्रीचा कार्यकारणभाव किती याचे संशोधन डॉक्टर क्रिस्टॅकिस यांनी केलं. या अभ्यासापश्चात जे निष्कर्ष काढले, त्यांवर अनेकांनी आक्षेपही घेतले. टीकाकारांचं म्हणणं होतं - मनोहर आणि शिरीष हे दोन मित्र आहेत. मित्र आहेत याचा अर्थ ते एकमेकांच्या जवळ राहाणारे म्हणजे समान स्थानीय परीघातले असू शकतात. म्हणजे मनोहर जर लठ्ठ झाला तर शिरीषदेखील लठ्ठ होण्याचं प्रमाण कदाचित त्यांच्या परीघावर अवलंबून असू शकतं. उदाहरणार्थ वाणसामानाचं दुकान मिठाई विकत असेल तर दोघांनाही तीच मिठाई उपलब्ध असणं, किंवा वाणसामानाचं दुकान जरा जास्त अंतरावर असेल तर दोघांनाही तितकंच अंतर चालावं लागणं आणि तत्सम परिणाम करणारे घटक. दुसरा मुद्दा होता homophily, म्हणजे समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, असू शकतं. आपण बरेचदा पाहतो की जाडे, गुटगुटीत लोक एकमेकांची संगत-पंगत पसंत करतात, एकमेकांबरोबर काळ घालवतात. जोडप्यांमध्ये बरेचदा जाडेपणा सामायिक गुण आढळून येतो. तर असं असू शकेल का की, लठ्ठ व्यक्ती एकमेकांत जास्त मिसळतात, किंवा परस्परांबरोबर जास्त गटागटाने राहतात. तर वरचे दोन मुद्दे पाहता, खरोखर लठ्ठपणा हा संसर्गजन्य आहे का? ५,००० व्यक्तींच्या ३२ वर्षांच्या अभ्यासानंतर पहिले २ मुद्दे निकालात काढले गेले. कसे ते पाहा - या लोकांना, प्रत्येकाला, खाजगीमध्ये म्हणजे अन्य व्यक्तीस कळू न देता, आपापल्या निकटच्या मित्राचं/मैत्रिणीचं नाव विचारलं. असं आढळलं की - लठ्ठ मनोहरने जर शिरीषचं नाव मित्र म्हणून सुचवलं तर शिरीष जाडा होण्याची म्हणजे मनोहरच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता १३% आढळली. याउलट जर आटोपशीर आकाराच्या शिरीषने सांगितलं की मनोहर त्याचा मित्र आहे, तर शिरीष मनोहरसारखा लठ्ठ होण्याची शक्यता ५७% झाली. पण जर दोघांनी एकमेकांना यादीत घातलेले असेल, तर शिरीष लठ्ठ होण्याची शक्यता १७१% वाढली. यावरून मग क्रिस्टकिस यांनी प्रतिवाद केला की, पाहा जर फक्त समान स्थानीय परीघ हा मुद्दा असता तर वरच्या टक्केवारीत असा फरक झालाच नसता. दुसरे म्हणजे शिरीष आधी जाडा नव्हता, त्याचं वजन सरासरी, सामान्य होतं. पण तो पुढे लठ्ठ झाला म्हणजे homophily हा वादाचा मुद्दादेखील निकालात निघाला. मग राहाता राहिला लठ्ठपणा संसर्गजन्य असण्याचा मुद्दा. तर होय, प्रत्येक लठ्ठ व्यक्ती स्वत: तर लठ्ठ होतेच परंतु आपल्या काही मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊनच.

तुम्हालादेखील अनुभव असेलच की - समाजात स्वीकारार्ह शरीरयष्टी आपण आजूबाजूचे लोक पाहूनच ठरवत असतो. जेव्हा आपण जाड्या मित्रमैत्रिणी, किंवा नातेवाईकांच्या ग्रुपबरोबर जेवायला जातो तेव्हा हां हां म्हणता थोडं जास्तच खाल्लं जातं. याउलट जे लोक हेल्थ-कॉन्शस असतात, सडपातळ असतात ते सुचवतात - आपण डेझर्ट शेअर करायचं का आणि आपसूकच त्या मूडमध्ये आपण सहज हो म्हणून डेझर्ट शेअर करून जातो. तर कधी लोकलाजेखातर आपण जेवणावरती आडवा हात मारत नाही. एकटं असताना आपण किती खातो, लठ्ठ लोकांच्या संगतीत किती खाल्लं जातं आणि याउलट हेल्थ-कॉन्शस लोकांच्या गटात आपले नियंत्रण कसे राहाते, याचं निरीक्षण नक्की करा, असे सुचवेन. आपली अमकी मैत्रीण जाडी आहे, आपल्यामध्ये परस्पर जिव्हाळा असतो, ती खूप आवडत असते, तिचं सर्वच आदर्श वाटतं, आणि मग तिचा जाडेपणा 'चलता है' बरोबर आपलाही 'चलता है' कधी होऊन जातो आपल्याला पत्ताही लागत नाही, बरोबर? व्हाय नॉट! आपल्याला वजनाबद्दल लागावी तशी बोच लागत नाही. कारण सगळेच आपल्यासारखे लठ्ठ आहेत असा सोयिस्कर ग्रह सहज होतो. तसं नसतं, सर्वजण लठ्ठ नसतात तर फक्त आपल्या परीघातले, आपले निकटवर्तीय काही लोकच लठ्ठ असतात. परंतु आपल्या डोळ्यांवर गैरसमजाची, चुकीच्या समजुतीची, झापड येते. हा अनुभव अगदी दर वेळेचा आहे. अमेरिकेत वावरताना मला आपण सामान्य चणीच्या आहोत असं वाटत असतं पण तेच भारतवारीत दर वेळेस मी गुन्हेगारीचं मोठ्ठं ओझं शिरावर घेऊन येते. कारण तिकडे गेल्यावर कळतं किती नीटस बांध्याचे, सडपातळ चणीचे लोक दिसतात व आपण कसे बेढब सुटलेलो असतो. भारतवारी प्रत्येक वर्षी माझ्याकरता, डोळे उघडवणारी ठरते पण अमेरिकेत आल्यावर परत ये रे माझ्या मागल्या होऊन जातं.

याचा अर्थ असा नाही की, लठ्ठ मित्रमैत्रिणींना वाळीत टाका. या लेखाचा उद्देश एवढाच की डोळे उघडे ठेवून, सजगतेने मैत्री करा. फायदे जरूर मिळवा पण दुष्परिणाम टाळा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी दुष्ट आणि सामोच्या मैत्रिणींपैकी एक असले तरीही लेखात उल्लेख केलेली दुष्ट मैत्रीण मी नाही!

लेख छान झालाय गो. त्याचा आनंद साजरा करायला आता जागच्या जागी उड्या मार बघू! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता जागच्या जागी उड्या मार बघू! Wink

हाहाहा आणि भूकंप झाला तर बायडेन कुमक पाठवणारे का त्याचा विचार कर आधी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बायडनला अजूनही पावर नाहीये. त्यामुळे शब्दशः स्वतःच्या बुडावर लाथा मारून पाहा! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती, हा लेख लिहीतेवेळी, तुझी जी काही मदत मिळाली त्याबद्दल आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा जिव्हाळ्याचा विषय.:) खूप मस्त लिहिलायस लेख. संसर्गजन्य मुद्दा पटलेला आहे. ओबेसिटी मॅप बघून आश्चर्य वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्स वर्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बायबल पट्टा किंवा ट्रंपराज्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या जास्त दिसते किंवा पांढरा रंग आहे. उदारमतवादी, डेमोक्रॅट राज्यांमध्ये निळा किंवा फिटनेसचा रंग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घ्या व्हरमाँटने ८०% लसीकरणाचा टप्पा गाठला Smile
https://www.forbes.com/sites/alisondurkee/2021/06/14/vermont-becomes-fir...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदर्श लाईफ स्टाईल चे उदाहरण द्यायचे असेल तर जपान चे उदाहरण देणे योग्य आहे.
भारताची पारंपरिक लाईफ स्टाईल पण अतिशय आदर्श आहे.
अमेरिका हा चंगळवादी देश आहे.
सर्व फास्ट food च जनक.
सर्व unhealthy soft ड्रिंक चा जनक.
सर्व प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थ चा जनक.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0