आपल्याला ठाऊक असलेल्या जगाचा अंत : कोव्हिड-१९ आणि हवामानबदल

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

आपल्याला ठाऊक असलेल्या जगाचा अंत : कोव्हिड-१९ आणि हवामानबदल

अनुवाद - सोनिया वीरकर

मूळ लेख: The end of the world as we know it
मूळ लेखक: बिल मककिबन

हा लेख जुलै महिन्यात प्रकाशित झाला होता, त्यामुळे त्यातले काही संदर्भ (उदा. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, युरोपमधल्या दुसऱ्या लाटेचा उल्लेख नसणं, इत्यादी) तेव्हाचे आहेत.

उन्हाळा सरत आला आहे आणि युरोपातले बहुतेक देश आता सुटकेचा निःश्वास सोडत आहेत. इटलीसारख्या ज्या देशांवर करोना व्हायरसचा मोठा आघात झाला तिथे जनजीवन पुन्हा मूळपदावर येत आहे, म्हणजे ते थोडेसे 'नेहमीसारखे' दिसत आहे. त्यांनी त्यांचं काम केलं आहे - लॉकडाऊन पाळला, त्याची किंमत चुकवली - आणि आता ते काही तोंडात टाकण्यासाठी किंवा सुटीची चैन करण्यासाठी घराबाहेर पडू शकतात; अटलांटिकच्या पलीकडे पाहून 'काही खरं नाही' अशी मान हलवू शकतात.

२०२० ही केवळ झलक होती असं म्हणणं वाजवी आहे, असं वाटतं. या शतकात यापुढे काहीही, कुठेही 'नेहमीसारखं' असू शकणार नाही. आतापर्यंत वैज्ञानिकांनी केलेला जागतिक तापमानवाढीचा अंदाज वास्तवापेक्षा कमीच आहे. त्यांनी दिलेला हा इशारा जरा जरी खरा ठरला तरी ती अनेक संकटांची नांदी ठरेल. ही संकटं रीघ लावून, सातत्यानं येणारी, आणि वाढत्या तीव्रतेची असणार आहेत. ती पुन्हापुन्हा आपला पाडाव करणार आहेत. कधी हे नुकसान स्थानिक असेल : उदाहरणार्थ, एखादं शहर जलमय करणारं चक्रीवादळ. पण हा संहार जगभर होईल, अगदी ह्या महामारीसारखा; आणि त्याचे परिणाम चढत्या भांजणीत वाढतील. ह्या वसंतऋतूच्या अखेरीला भारताचा इतर सर्व देशांसारखाच कोव्हिड -१९शी लढा सुरू होता. पण याशिवाय भारताला एका वेगळ्याच क्रूर संकटाचा सामनासुद्धा करावा लागत होता.

winter is not coming

उष्णतेच्या लाटेनं दिल्लीचा पारा ४८अंश सेल्सियसच्याही वर गेला. हे शहरही असं आहे, जिथे एसी नसेल तर डेंग्यूच्या डासांच्या भीतीपोटी अनेक घरांच्या खिडक्यादेखील उघड्या ठेवता येत नाहीत. आपल्या पृथ्वीचं तापमान जसजसं वाढत आहे तसतशी डेंग्यूची लागण नाट्यपूर्ण रीतीनं वाढत आहे. मे महिन्यात देशाच्या दक्षिण भागात, बंगालच्या उपसागरात, आतापर्यंत नोंदलेलं सर्वांत मोठं वादळ झालं. जूनच्या सुरुवातीला संपूर्ण उपखंडात आणि पूर्व आफ्रिकेत टोळधाड आली. हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाच्या प्रमाणात जे बदल झाले, त्यानं ही टोळधाड आली. यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं; लाखो कोट्यवधी लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागलं.

जगाचं तापमान सरासरी १ अंश सेल्सिअसनं वाढल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रकार आता वरच्यावर होत आहेत. जगाचं तापमान कमीत कमी ३.५ अंश सेल्सिअसनं वाढवण्याच्या मार्गावर आहे, जरी पुढे प्रत्येक देशानं पॅरिस करारामध्ये घेतलेली शपथ पाळली तरीही. (त्या कराराच्या प्रस्तावनेत अशी शपथ आहे की आपण तापमानवाढ २ अंश सेल्सिअसच्या बरीच खाली ठेवायचा प्रयत्न करू. पण अनेक देशांनी प्रत्यक्षात केलेले वायदे काही वेगळीच कहाणी सांगतात.)

मार्क लायना, 'Our Final Warning' (२०२०) या आपल्या नवीन पुस्तकात, काळाच्या चौकटीबद्दलच्या संशोधनाचे निष्कर्ष सांगतात : २०३०पर्यंत तापमानात बहुतेक २ अंश सेल्सिअसची वाढ होईल; शतकाच्या मध्यापर्यंत ३ अंश आणि २०७५पर्यंत ४ अंश सेल्सिअस वाढ होईल. ह्या तापमानामुळे असं काही जग निर्माण होईल जे आतापर्यंत आपण पाहिलेल्या जगासारखं बिलकुल नसेल. त्या स्थितीची तुलना करायचीच तर ती अनेक युगांच्या आधी, मानवजात अस्तित्वात येण्याआधीच्या परिस्थितीशीच करता येईल. तेव्हा आपलं कर्तव्य 'नेहमीच्या' जीवनाकडे न जाण्याचं आहे, हे खेदानं सांगावं लागेल. येणारा काळ अधिक फूट पाडणारा, ध्रुवीकरण झालेला असेल. आताच्या स्थितीच्या वेगळेपणाचा उपयोग करून, त्या काळासाठी व्यावहारिकरीत्या आणि भावनात्मकरीत्या तयार राहण्याचा कसून प्रयत्न करायला हवा. अशा आशेनं की आपल्याला त्याचे काही परिणाम टाळता येतील आणि इतर परिणामांसमोर तग धरता येईल.
विलक्षणरीत्या, मागच्या काही महिन्यांमधून आपण काय धडे घेऊ शकतो याची यादी करणं कदाचित उपयोगी ठरावं. एक म्हणजे, आपण ज्या ग्रहावर रहातो तिथे भौतिक जगातले नियम लागू पडतात. बहुतांश पाश्चात्त्य लोक गेल्या दोन पिढ्या ज्या जगात जगले आहेत, तिथे पाणी नळातून येतं, आणि अन्न दुकानातून. त्यामुळे त्यांनी वास्तव जग गृहीत धरलं तर त्यासाठी त्यांना माफ करावं लागेल. गेली पिढी आयुष्यभर स्क्रीनकडे टक लावतच जगली. या स्क्रीनवरचं सगळंच, काहीही काटछाट करता येतं, 'एडिट' करता येतं. यामुळे वास्तवाचा गांभीर्यानं विचार करणं त्यांना अवघड जाऊ शकतं. पण भौतिक जग म्हणजे निव्वळ पार्श्वभूमी नव्हे.

समजा आपण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचं अस्तित्व विसरायचा प्रयत्न करू शकतो (हवामानबदल नाकारणारे गेली अनेक वर्षं हेच करत आहेत). तसंच आपण जीवशास्त्रही विसरायचा प्रयत्न करू शकतो. (डोनाल्ड ट्रम्प यांनी तर दोन्ही प्रयत्न केले.) पण विज्ञानाला त्यात रस नाही. भौतिक जगाचा एक कळीचा नियम म्हणजे ते त्याच्या गतीनं जात असतं, तुमच्या गतीनं नाही. अगदी हवामानबदलासारख्या गोष्टींबद्दल काळजी असणारे राजकीय पुढारीही नेहमी ठामपणे सांगतात की एका ठरावीक वेगापेक्षा जास्त वेगानं ते बदल होणार नाहीत. बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदावर असण्याच्या त्यांच्या शेवटच्या वर्षात सांगितलं की, हवामानबदल हा त्यांना मानवजातीसमोरचा सर्वांत मोठा प्रश्न वाटला; तरीही "दुर्दैवाने, आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे, मला प्रसंगी काही नागमोडी वळणं घ्यावी लागली. अतिशय वास्तव असलेले काही प्रश्न आणि हितसंबंध यांसाठी हे गरजेचे आहे." त्यांचा मुद्दा जितका उघड आहे तितकाच खरासुद्धा आहे. राजकीय वास्तवही महत्त्वाचं असतं. या संदर्भात "अतिशय खरे असलेले प्रश्न" म्हणजे तेल आणि गॅस कंपन्या होत्या. दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या कारकीर्दीत ह्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन नाट्यपूर्णरीत्या वाढवलं. यामुळे रशिया आणि सौदी अरेबिया या जगातल्या हायड्रोकार्बनच्या सर्वात मोठ्या उत्पादकांना अमेरिकेनं मागे टाकलं. (आणि कदाचित ओबामांना याचा अपेक्षेपेक्षा कमीच त्रास झाला असेल. गेल्या वर्षी टेक्ससमधल्या एका उत्साही श्रोत्यांच्या समुदायापुढे त्यांनी बढाई मारली होती, "मी राष्ट्राध्यक्ष असताना दर वर्षी उत्पादन वाढत होते. हे सगळं, म्हणजे... अचानक अमेरिका सर्वांत मोठा तेल आणि गॅस-उत्पादक झाला. हे सगळं माझ्यामुळेच झालं. त्यामुळे लोकहो, माझे आभार माना." दुवा.) पण विज्ञानाला मात्र राजकीय वास्तवाचीही पर्वा नसते. हवामानधोरण आणि कोव्हिड-१९चं धोरण हे लोकहिताच्या किंवा घरबांधणीच्या धोरणासारखं नसतं. जेव्हा प्रश्न प्रत्यक्ष भौतिक शक्तींचा असतो, तेव्हा सावधगिरी आणि तडजोड हे मित्र नाही तर शत्रू असतात.

याचं आपल्या आयुष्यात घडलेलं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे सध्याची महामारी. काही देश, विशेषतः आशियाई देश या लढ्यात ताबडतोब उतरले. हे त्यांच्या सार्सच्या भीषण अनुभवामुळे असू शकेल. पण याउलट अमेरिकेत कोव्हिडचा पहिला रुग्ण जानेवारीमध्येच सापडूनही त्यांनी फेब्रुवारीचा सबंध महिना काहीही न करता घालवला. त्यामुळे तिथलं दैनंदिन जीवन जास्तच ढवळून निघालं आणि त्यांच्याकडच्या मृतांच्या संख्येत वाढ होत राहिली. या कोव्हिडच्या परिस्थितीला समांतर असलेली हवामानाची स्थिती बघू : हवामान बदलावरच्या सरकारांच्या समितीने (Intergovernmental Panel on Climate Change) आपल्याला २०१८मध्ये सांगितलं होतं की आपण म्हणजे सर्व पृथ्वीवासियांनी २०३०पर्यंत उत्सर्जन निम्म्यानं कमी केलं नाही तर आपल्याला पॅरिस करारान्वये ठरवलेलं तापमानाचं ध्येय गाठणं अशक्यच होईल. आताची महामारी येण्यापूर्वी जगाची ह्यावर प्रतिक्रिया काय झाली तर, आतापर्यंत जाळला त्यापेक्षा कितीतरी जास्त कार्बन जाळला गेला.

आता आपल्याला एक संधी मिळाली आहे. निसर्ग आपल्या स्वत:च्या नियमांनी चालतो आणि कृतीच्या वेगाला महत्त्व आहे, हे दोन धडे परिस्थिती आपल्याला देत आहे. आपल्या राजकीय व्यवस्था जर ते आत्मसात करू शकल्या, तर आपण हवामान बदलाशी मुकाबला करू शकतो. मुकाबल्यात जिंकण्यासाठी नव्हे (ती संधी तर कधीच वेगाने निघून गेली आहे). तापमानातली वाढ आपण अशा एका ठिकाणी रोखून ठेवू शकतो, जिथे ती आपल्या आधुनिकतेला वेढा घालेल, पण अगदीच चिरडून टाकणार नाही.
आता आपण, हवामानबदलाला सामोरे जाणे प्रत्यक्षात कसं असेल त्याची कल्पना करू. त्यासाठी सध्याच्या, आपल्या नव्या विषाणूयुक्त जगाचं एक उघड असलेलं वैशिष्ट्य बघा : प्रचंड प्रमाणातली बेरोजगारी. माझ्या स्वतःच्या देशात, अमेरिकेत, आज बेरोजगार असलेल्यांची संख्या कधी नव्हती इतकी जास्त आहे. १९२९च्या महामंदीनंतर पहिल्यांदाच असं झालं आहे. १९३०मध्ये फ्रॅन्कलीन रुझवेल्ट यांनी बेरोजगारीवर उपाय म्हणून लोकांना काम मिळवून द्यायचा एक मार्ग काढला होता : लायब्ररी, रस्ते, धरणं अशा लोकोपयोगी बांधकामाचा रोजगार त्यांनी अमेरिकन नागरिकांसाठी निर्माण केला. त्यामुळे आजपर्यंत अनेक पायाभूत सुविधा देशभर तयार झाल्या. मानवी श्रमाचा भरपूर वापर होईल अशा कुठल्या कामाची आजच्या घडीला आपण कल्पना करू शकतो?

अगदी उघड दिसणारा पर्याय म्हणजे - अजूनपर्यंत तरी - ऊर्जा व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचं महत्त्वाचं काम. उदाहरणार्थ, आपल्याला हजारो-लाखो इमारतींची पुनर्रचना करता येईल. त्यांची कार्यक्षमता बरीच वाढली पाहिजे. आणि ती कशी याचा इलाज आपल्याकडे आधीच आहे : Air source heat pumps. हा पंप बाहेरची गरम हवा (गरजेनुसार) बंद जागेमध्ये आत आणतो आणि तशीच बंद जागेमधली आतली गरम हवा बाहेर नेतो. आपल्याला अशी व्यवस्था उभारायची आहे जी पेट्रोलऐवजी माणसांचं बळ किंवा वीज वापरून माणसं आणि त्यांच्या वस्तूंची वाहतूक करेल : सायकल मार्गिका, मोटार-चार्जर, बस रॅपिड ट्रान्सपोर्ट. आपल्याला आपल्या जमिनीचा कार्बन शोषणारा स्पंज करण्याची गरज आहे. त्यासाठी पिकं घेण्याच्या नव्या पद्धती वापराव्या लागतील, (त्यासाठी खाण्याच्या पद्धतीही बदलाव्या लागतील). तसंच, सध्याचे कोळसा आणि गॅस यांच्यावर चालणारे पॉवर-प्लांट काढून टाकून सौरऊर्जा आणि पवन-ऊर्जा वापरणारे प्लांट बनवावे लागतील.

दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २००८नंतरच्या आपल्या आर्थिक संकटानंतरसुद्धा हीच यादी योग्य होती. पण त्यानंतर एक गोष्ट बदलली आहे : या सर्व तंत्रज्ञानाची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सौरऊर्जेसाठी होणारा खर्च तेव्हापेक्षा १० टक्क्यांवर आला आहे. आपल्याकडे व्यावसायिक वापरासाठी योग्य आकाराच्या बॅटरी फारशा उपलब्ध नव्हत्या; आज त्या पुरेशा मोठ्या असतात आणि त्यांचा उत्पादन-खर्चसुद्धा कमी झाला आहे. एअर सोर्स हीट पंपासाठी सुरुवातीची उभारणी करायला बरीच प्रत्यक्ष गुंतवणूक करावी लागेल - ह्यात कामाला लावण्यासाठी कमी किमतीच्या भांडवलाचा अक्षय वाटणारा पुरवठा आपल्याकडे आहे ही म्हणूनच एक चांगली बाब आहे. पण ही गुंतवणूक सर्वांत उत्तम आहे, कारण एकदा ती उभी राहून काम करायला लागली, की जणू ती पैसे छापत आहे असं वाटण्याइतका फायदा होतो. नवीकरणीय (renewable) ऊर्जेचा कळीचा मुद्दा हाच असतो की ती नवीकरणीय असते - आणि कोणत्याही खर्चाशिवाय! नेमक्या ह्याच कारणासाठी जीवाश्म इंधनाच्या कंपन्या तिला दूर ठेवण्यासाठी इतका झगडा करत होत्या.

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे हा जीवाश्म-इंधन उद्योग दहा वर्षांपूर्वी होता तितका आता बलवान राहिला नाही. नवीन तंत्रज्ञानाची वाढती उपयुक्तता आणि उपलब्धता यांमुळे काही प्रमाणात ह्या उद्योगांचं बळ कमी झालं आहे. तसंच गेल्या काही दशकांमध्ये कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक ह्या उद्योगाबद्दल लोकांना जागृत केल्याचाही हा परिणाम आहे. जीवाश्म-इंधन निर्मूलन चळवळ ह्या इतिहासातल्या जवळजवळ सर्वांत मोठ्या कॉर्पोरेट-विरोधी मोहिमेनं हे काम केलं. मी या चळवळीत सुरुवातीपासून सहभागी आहे - आज आम्ही मिळवलेला निधी / हमी १४ ट्रिलियन डॉलरपर्यंत आहे. २२ एप्रिलला 'अर्थ डे'च्या पन्नासाव्या वाढदिवशी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांचे जीवाश्म-इंधन कंपन्यांचे शेअर्स विकण्याची घोषणा केली. हा हल्लीचा सर्वांत मोठा विजय आहे. ह्या चळवळीनं आणि शोध पत्रकारांनी बऱ्याच गोष्टी उजेडात आणल्या आहेत; उदाहरणार्थ, या कंपन्यांना जागतिक तापमान वाढीबद्दल अगदी १९७०- ८०मध्येही संपूर्ण माहिती होती.

आज हा उद्योग जर्जर झाला आहे. आपल्यापैकी बहुतेकांना कोव्हिड-१९ची काहीही कल्पना नव्हती तेव्हा, म्हणजे जानेवारीमध्ये अमेरिकेत जिम क्रेमर हा स्टॉक-गुरू टीव्हीवर काय बोलला ते पाहा : 'जीवाश्म- इंधन शेअर्स मरणपंथाला लागले आहेत. त्यांचं काम संपलं आहे. पूर्ण जगभर अशीच निर्गुंतवणूक होताना दिसायला लागली आहे'. हिवाळा सुरू होण्यापूर्वी 'ब्लॅकरॉक' या जगातल्या सर्वांत मोठ्या ॲसेट मॅनेजरनं जाहीर केलं, की ते त्यांच्या गुंतवणुकीची धोरणं हवामानबदलाशी जुळवून घेण्याजोगी करत आहेत. "जाणीव-जागृती भरभर बदलत आहे. मला असं वाटतं की, आपण अर्थकारण मुळापासून बदलण्याच्या अवस्थेत आहोत," असं 'ब्लॅकरॉक'चा सी. इ. ओ. लॅरी फिंक त्यांच्या वार्षिक अहवालात म्हणतो. "हवामान बदलाचे पुरावे आता मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची आधुनिक अर्थकारणाबद्दलची मूलभूत गृहीतकं तपासणं भाग पडत आहे." अगदी खुद्द तेल कंपन्यासुद्धा, विशेषतः युरोपमधल्या, २०५०पर्यंत "संपूर्ण शून्य उत्सर्जन" अशी वचनं द्यायला लागल्या आहेत. प्रत्यक्षातल्या परिस्थितीपेक्षा अशी वचनं अतिशयोक्त आहेत. पण दोन वर्षांपूर्वी तर ती कल्पनातीत होती.

आता ही महामारी आपल्यासोबत आहे, आणि ती एक्स-रेसारखं, सत्तेतले हे बदल उघड करून दाखवत आहे. जे बदल सुरू झाले होते त्यांचा वेग वाढवत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये आपला ऊर्जेचा वापर पटकन कमी झाला. आणि तेलाच्या किंमती मागणीनुसार बदलत असल्यामुळे त्याहूनही जलद खाली आल्या. खरं तर, तेलाचा साठा करायला येणाऱ्या खर्चामुळे, मार्चमध्ये काही दिवस तर त्यांनी उणे किंमत दाखवली. ह्यामुळे तेल कंपन्या आणि त्यांचे गुंतवणूकदार दोघांनाही पुन्हा धक्का बसला. २०२०च्या पहिल्या चार महिन्यांत जीवाश्म इंधन कंपन्यांचे शेअर चाळीस टक्क्यांनी खाली आले. तर नवीकरण होणाऱ्या ऊर्जा कंपन्यांचे शेअर दोन टक्क्यांनी वाढले. हाच कल पुढे सुरू राहील अशी चिन्हं दिसत आहेत. याचं विश्लेषण करणारे तज्ज्ञ आता असा अंदाज व्यक्त करतात की, २०१९ हे वर्ष जगातल्या तेलाच्या उच्चांकी मागणीचं ठरेल. आता जसजशी अर्थव्यवस्था रुळावर येईल, तशी आशा आहे की आपला ऊर्जेचा वापर वाढेल. नवीकरण होणारी इंधनं आता इतकी स्वस्त झाली आहेत की, ही वाढीव मागणी ती पूर्ण करतील.

पण बदलांचा वेग कळीचा आहेच. महामारीनं आपल्याला ही सूचना दिली आहे. इतके लोक घराबाहेर पडत नव्हते तरीही उत्सर्जन १० ते १५ टक्क्यांनीच कमी झालं. म्हणजे या मोठ्या आणि दुःखद प्रयोगातून आपण शिकलो, की बरीचशी विमानवाहतूक बंद ठेवली आणि बहुसंख्य लोकांचा प्रवास कमी झाला तरी उत्सर्जनावर फारसा परिणाम होत नाही. लॉकडाऊनच्या कळसावर असतानाही जीवाश्म इंधनं आपल्या दैनंदिन जीवनातल्या मध्यवर्ती व्यवस्था चालवत होत्या : इमारती, संपर्कमाध्यमं आणि शेती. कार्बन भरभरून उत्सर्जित होण्याचा नवा नवा उच्चांक गाठतो आहे. मे महिन्यात हवाईमधल्या मौना लोआ ज्वालामुखीच्या जवळच्या कार्बनडायऑक्साईडची नोंदीतून असं दिसतं की, तिथे दर दशलक्षमध्ये ४१८ भाग (parts per million) असा उच्चांक नोंदला गेला. गेल्या अनेक दशलक्ष वर्षांमध्ये ही पातळी इतकी वर गेली नव्हती. ही आधीच्या वर्षापेक्षा दर दशलक्षमध्ये दोनपेक्षा जास्त भाग वाढली.

जर येत्या दशकात आपण काही अर्थपूर्ण प्रगती करणार असू, (कारण आपल्याला अजूनही काही करण्याची शक्यता असलेलं हे अखेरचं दशक आहे), तर... त्यासाठीचे बदल हे शासनप्रणित, मोठ्या प्रमाणात आणि जगाच्या पुनर्रचनेची कृती करणारे असायला हवेत. म्हणजेच आपल्याला पुन्हा एका 'न्यू डील'कडे वळावं लागेल. असे प्रस्ताव आधीपासूनच चर्चेत आहेत, हे उत्साहवर्षक आहे. गेल्या दोन वर्षांहून जास्त काळ अमेरिकेत 'ग्रीन न्यू डील'ला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचाराचा तो मुख्य मुद्दा होतो आहे. (अर्थात ट्रम्पच्या प्रशासनात हे अशक्य आहे, पण सध्या तो निवडणुकीत पुन्हा जिंकण्याच्या प्रयत्नात मागे पडतो आहे : त्याच्या घटत्या लोकप्रियतेमागचं एक कारण त्याचं पर्यावरणाचं धोरण हेदेखील आहे - मतदानाचा अंदाज घेणाऱ्यांनी नोंदवलं आहे की त्याला पाठिंबा देणाऱ्यांमध्येदेखील त्याचं हे धोरण सर्वांत कमी पसंतीचं ठरत आहे.) ह्या परिस्थितीचे प्रकार युरोपातही आहेत - त्यांपैकी एक युरोप खंडाची परिस्थिती सुधारण्यासाठीचा आराखडा ठरू शकेल. दक्षिण कोरियातली परिस्थितीही अशीच आहे. चीनबद्दल इतक्यात काही सांगता येत नाही. (टीप : हा लेख प्रकाशित झाल्यानंतर चीननं आपलं ध्येय जाहीर केलं.) पण आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे : आता आपण ज्या आपत्तीत सापडलो आहोत त्यावरच्या प्रतिक्रिया येऊ घातलेल्या संकटाला तोंड द्यायला आपण वापरणार आहोत का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशा स्थितीत जाऊन पूर्वीच्याच चुका पुन्हा करणार आहोत?
अखेर मला वाटतं, आपली प्रगती कशावर अवलंबून आहे तर - या विषाणूशी दिलेल्या लढ्यातून आणि वंशवादी हिंसेला आणि पोलिसांच्या क्रौर्याला सध्या होणाऱ्या तितक्याच महत्त्वाच्या विरोधातून आपण तिसरा धडा शिकणार आहोत का? ज्याप्रमाणे हे वास्तव आहे, बदलाचा वेग महत्त्वाचा आहे, तशीच सामाजिक एकात्मतेची गरज आहे. (हा तो तिसरा धडा.)

गेल्या शतकात रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर यांनी पाश्चात्त्य राजकीय विचारांमध्ये मोठा बदल केला. त्यांचा असा समज होता की बहुतेक सगळे प्रश्न सोडवण्यासाठी बाजारव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. समाज आणि शासकीय व्यवस्था यासारख्या गोष्टींवर त्यांचा अविश्वास होता. (रेगनच्या नेहमीच्या कॉमेडी रुटीनमधलं त्याचं एक आवडतं विधान होतं : "इंग्लिशमधले नऊ धोकादायक शब्द म्हणजे 'मी सरकारमध्ये आहे आणि मी तुम्हांला मदत करण्यासाठी इथे आहे.'") अशा प्रकारचे विचार काही वर्षं ऐकून आपल्या समाजाचं संतप्त आणि ध्रुवीकरण झालेल्या गटांमध्ये विभाजन झालं आहे. पण कोव्हिड-१९नं एक महत्त्वाची आठवण करून दिली आहे की, आपल्याला सोसाव्या लागणाऱ्या गोष्टी जरी भिन्न असल्या, तरी आपली प्रगती किंवा सर्वनाश मात्र एकत्रच होतो.

महामारी असताना चांगली शासनव्यवस्था आवश्यक आहे; ती नेहमी तशी नसेल हे मान्य करूनही, आपल्याला हव्या असलेल्या एकात्मतेसाठी ती गरजेची आहे. आपण या परीक्षेत फार चांगली कामगिरी केली नाही. विशेषतः अमेरिकेत बऱ्याच खुळचट लोकांनी निर्बंध धुडकावून लावले. उदाहरणार्थ, त्यांनी मास्क वापरायला तत्त्वाच्या मुद्द्यावरून नकार दिला. पण बऱ्याच लोकांनी घरांमध्ये थांबून त्यांची इतरांप्रती असणारी जबाबदारी गंभीरपणे पार पाडण्याची तयारी दाखवली. युकेमध्ये जेव्हा बोरिस जॉन्सनचे प्रमुख सल्लागार डोमिनिक कमिंग्स यांनी क्वारंटाईनचा भंग केला आणि जेव्हा त्याला शिक्षा दिली नाही, तेव्हा बरेच जण संतापले. हे चांगलं चिन्ह आहे कारण काहीएक सामाजिक सहमती अजूनही अस्तित्वात आहे असंच यातून सूचित होतं. लाखो अमेरिकन लोक 'ब्लॅक लाईफ मॅटर्स'चे नारे देऊन मोर्चा काढत होते, ते पाहणं खरोखरच स्फूर्तिदायक होतं. सामाजिक एकात्मता वांशिक भेदांच्या पलीकडे जाते हेच त्यांना दाखवायचं होतं. पूर्वी ह्या भावनेला वांशिक भेदांवरून खात्रीशीररीत्या तडे जात असत. (सगळ्यांनी मास्क घातले होते, हेसुद्धा लक्षणीय होतं; आणि बऱ्याच पोलिसांनी मास्क घातले नव्हते.) अमेरिका आपल्या वंशवादी भेदांच्या इतिहासापासून निर्णायकरीत्या पुढे जाईल का नाही, (आणि हा इतिहास म्हणजे केवळ त्या कन्फेडरेट पुतळ्यांमधला दुर्दैवी वारसा नव्हे,) याचं जणू सार्वमतच अमेरिकेत येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये घेतलं जातं आहे. आणि तेव्हाच रेगनवादाचा आणि ट्रम्पवादाचाही वारसा टिकवला जाईल की, कार्यात्मक राहण्यासाठी आवश्यक त्या राजतंत्राचा, यावरचं सार्वमत कळेल. जर त्या नागरिकांनी कार्यात्मकता निवडली तर अमेरिकेलाही हवामान बदलाशी मुकाबला करणं अखेर शक्य होईल. बाकीच्या जगालाही ते करता यावं ह्यासाठी अमेरिकेनं ते करणं आवश्यक आहे.

काही प्रमाणात तापमानवाढ रोखण्यासाठीच केवळ ही एकजूट गरजेची नव्हे. तर जी तापमानवाढ आपल्याला रोखता येणार नाही, ती सोसण्यासाठीही आपल्याला त्या एकजुटीची गरज आहे. आहे. वाढत्या प्रमाणात येणारी वादळं, पूर, पसरणारे वणवे हे त्या बदलांचं त्यातल्या त्यांत बरं स्वरूप असेल. आपल्या मानवजातीच्या कसोटीची ही तर सुरुवात आहे.

बिल मककिबन हे 'द न्यूयॉर्कर'चे सहसंपादक होते. ते 'द ग्रासरूट क्लायमेट कॅम्पेन ३५०'चे संस्थापक आहेत. त्यांचं नवीन पुस्तक: 'Falter: Has the human game begun to play itself out?' २०१९

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

Copyright rests with The Times Literary Supplement Limited. This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. भविष्याचे चित्रं अगदीच अंधारमय नाही. अजुन तरी आपल्या हातात आहे - हा आशातंतू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुख्य म्हणजे एकेका प्रश्नाचा एकेकटा विचार करता येणार नाही, हा विचार पुन्हा पुन्हा, वेगवेगळ्या अंगांनी मांडण्याची आणखी गरज वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.