मजल दरमजल करत वीरसेन एका अपरिचित नगरीजवळ पोहोचला. सायंकाळचा समय होता. सोबतच्या भाकरतुकड्याचे सेवन करून, निर्झराचे मधुर जल प्राशन करून वीरसेनाने नगरीत प्रवेश केला. एका कनवाळू रहिवाश्याची त्याच्या ओसरीत झोपण्याची परवानगी घेऊन वीरसेनाने अंथरूण पाहून हातपाय पसरले.
पहाट फुटायच्या समयी रहिवाश्याच्या व त्याच्या परिवाराच्या रूदनाने वीरसेनाला जाग आली. मुखप्रक्षालन वगैरे आटपून त्याने रूदनाच्या कारणाची पृच्छा केली. ते कारण समजल्यावर त्याने यजमानाला धीर दिला, व यजमानाने दर्शवलेला गाडा स्वतः ओढत त्याने नगरीबाहेरील पर्वतराजीकडे कूच केले.
पर्वतराजीमधील विवक्षित गुंफेबाहेर वीरसेन थांबला. गुंफेच्या मुखाजवळील हाडे पाहून दुसरा कुणी गर्भगळित झाला असता, पण वीरसेनाला भयाचा स्पर्शदेखील झाला नाही.
वीरसेनाने गाड्यातील द्रवाचे प्राशन करण्याची तयारी केली, आणि "चीअर्स" अशी रणगर्जना करून तो त्या द्रवावर तुटून पडला. गुंफेतून एक प्रतिसादात्मक आरोळी आली, आणि त्यामागोमाग "बी व्हाॅट यू वान्ना बी, टेकिन्ग थिन्ग्ज द वे दे कम, नथिन्ग इज अॅज नाईस अॅज फाईन्डीन्ग पॅरडाईझ अॅन्ड सिपिन्ग ऑन बकार्डी रम" या युद्धगीताच्या लकेरी घेत खुद्द बकार्ड्यसुर चाल करून आला.
"आपल्या लाडक्या बकार्डीचा आस्वाद घेणारा हा कोण उपटसुंभ" असा विचार बकार्ड्यसुराच्या मनात आला. नजीकच्या दुसऱ्या केसचे आवरण फोडून त्याने एक बाटली उघडली व एका घोटात संपवून टाकली. आपला प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहे याची जाणीव झालेल्या वीरसेनाने एका चिकन लाॅलीपाॅपचे सेवन केले, व त्यातील हाड नजीकच्या हाडांच्या ढिगाऱ्यावर फेकले. तुंबळ युद्धाला सुरूवात झाली होती.
बकार्ड्यसुराच्या कॅपॅसिटीची ख्याती पंचक्रोशीत होती. त्याचा रोजचा त्रास होऊ नये म्हणून तर नगरीतील रहिवाश्यांनी त्याला नगरीबाहेर राहिल्यास दररोज एका घरून बकार्डी रमच्या केसेस व सोबत सुयोग्य खाद्य पाठवण्यात येईल असा तह केला होता.
पण वीरसेनदेखील कच्च्या गुरूचा चेला नव्हता. मिशीवर ताव देत तो पेयखाद्यावरही ताव मारत होता. एकोणीस बाटल्या रिचवून बकार्ड्यसुर थांबला तेव्हा वीरसेनाने आपली तेवीसावी बाटली संपवली आणि तो गगनभेदी हसला.
बकार्ड्यसुराने आपला पराभव मान्य केला, व खाली मान घालून तो दूर कोठेतरी निघून गेला. नगरीच्या रहिवाश्यांना पुन्हा कधीही त्याचे दर्शन झाले नाही.
ॲडॅप्टेशन छान आहे, परंतु...
...बकार्ड्यसुराला घाबरण्याचे कारण कळले नाही.
वीरसेनाने जेव्हा (अत्यंत अहिंसक मार्गाने) बकार्ड्यसुराचे फक्त रेकॉर्ड ब्रेक केले (त्याला मारले नाही, की काही नाही), तेव्हा बकार्ड्यसुरसुद्धा काहीही न करता अत्यंत अहिंसक मार्गाने (कोणालाही न मारता किंवा काहीही न करता) गावातून चालता झाला. याचा अर्थ, तो मुळात अत्यंत अहिंसक तथा सज्जन असला पाहिजे. आता, असते एकेकाला व्यसन. (म्हणजे, त्याला जर तुम्ही व्यसन म्हणत असाल, तर.) पण, म्हणून त्याला घाबरायचे? तो काय कोणाला खात होता की काय?
किंबहुना, गावकऱ्यांनी जर त्याला शांतपणे सांगितले असते, की बाबा रे, तुला रोज इतक्याइतक्या बकार्डीच्या केसेस नि त्याबरोबर कोंबडीच्या इतक्याइतक्या तंगड्या लागतात, ठीक आहे, तो तुझा प्रश्न आहे; परंतु भो**च्या, त्याचे बिल स्वतःच्या क्रेडिट कार्डावर टाक की! पब्लिकला कशाला गंडा पाडतो? म्हणून, तर आय ॲम प्रेटी शुअर की बकार्ड्यसुराने हिरमुसल्या तोंडाने आपले प्रस्थान तेथून हलवले असते, म्हणून. लोकांनीच त्याला इतके चढवून ठेवले!
पण कसे असते, की पिणाऱ्या माणसाबद्दल (खास करून आपल्या समाजात) फार चमत्कारिक समज असतात. आता, स्टॅटिस्टिकली स्पीकिंग, पिणाऱ्या माणसांपैकी काही टक्के लोकांत कथित (बोले तो, पिणाऱ्या माणसांच्या नावांवर ज्यांची बिले सामान्यतः फाडली जातात, असे) दुर्गुण असतीलही; माझी त्याबद्दल ना नाही. परंतु, न पिणाऱ्या लोकांपैकी किती टक्के लोकांत प्रस्तुत दुर्गुण असतात किंवा नसतात, याचे सर्वेक्षण कोणी केले आहे काय? तर, (कन्व्हीनियंटली) नाही! किंबहुना, असे सर्वेक्षण जर कोणी केलेच, तर, आय डेअरसे, कथित दुर्गुणांचे प्रमाण हे पिणाऱ्या आणि न पिणाऱ्या माणसांत बहुधा सारखेच आढळावे. पण लक्षात कोण घेतो?
त्यापुढे जाऊन, मला तर अशी शंका येते, की बकार्ड्यसुराला रोज खुराक पुरविण्यात नि त्याची ती भीतीदायक इमेज प्रोमोट नि मेन्टेन करण्यात गावकऱ्यांचाच (किंवा, त्यांच्यातील काही चालू पुढाऱ्यांचा१) व्हेस्टेड इंटरेस्ट असला पाहिजे! म्हणजे, एक तर 'सर्वे दुर्गुणाः वारुणीमाश्रयन्ति' या प्रचलित गैरसमजास धक्का लागावयास नको; त्यातून 'दारुड्या = दुर्गुणी' असे समीकरण२ जनमानसात एकदा का पक्के बसले, की बिगरपिणेकरी मंडळी कॉलर ताठ करून समाजात (बाय डीफॉल्ट) 'सज्जन' म्हणून मिरवायला मोकळी! (भले ती प्रत्यक्षात तशी नसली, तरीही.) ही झाली गावातील जनतेची गोष्ट. दुसरे म्हणजे, गावातील चालू पुढाऱ्यांपैकी कोणाची बकार्डीची एजन्सी वगैरे असावी काय? किंवा कदाचित बकार्डी कंपनीत शेअर्स, वगैरे? (किंवा, गेला बाजार, गावात एखादा पोल्ट्री फार्म वगैरे?)
बकार्ड्यसुराला गावातून घालवून देऊन वीरसेनाने खरे तर या व्हेस्टेड इंटरेस्ट्सना धक्का पोहोचविला! पुढेमागे लवकरच त्याचा गावात संशयास्पद मृत्यू (किंवा, सोप्या मराठीत: खून. बहुधा सुपारी देऊन, वगैरे.) झालेला आढळल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही.
असो. तर, बॅक टू युअर ष्टोरी. पिणेकऱ्यांबद्दल समाजात जे काही टॉक्सिक गैरसमज पसरलेले आहेत, ते दूर करण्यासाठी, झालेच तर, पिणाऱ्या लोकांची समाजातील प्रतिमा टीटोटॅलिटेरियन३ लोकांनी जी मलीन करून ठेवलेली आहे, ती पुसून टाकून, तिच्या जागी सज्जन, अहिंसक, खिलाडू वृत्तीचे४ अशी त्यांची पॉझिटिव इमेज प्रोमोट करण्यासाठी (थोडक्यात, त्यांचा इमेज मेकओव्हर करण्यासाठी) तुमची कथा अत्यंत उपयुक्त आहे. जमल्यास वशिला लावून 'बालभारती'त धडा म्हणून रुजू करता आल्यास पाहा, असे (शुभेच्छापूर्वक) सुचवू इच्छितो. तेवढीच समाजसेवा!
जाता जाता एक शंका: बकार्ड्यसुराला बकार्डीऐवजी ओल्ड मंकचा खंबा चालला नसता काय? नाही म्हणजे, तेवढीच परकीय चलनाची बचत, वगैरे...
- (बकार्डीचा भोक्ता, परंतु ओल्ड मंककरिता पार्शल५) 'न'वी बाजू.
==========
तळटीपा:
१ कॉमन पब्लिकला अक्कल नसते. चालू पुढाऱ्यांनी उठवलेल्या वाटेल त्या वावड्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात, त्यावरून उगाचच नसत्या लोकांचा द्वेष करतात, तसे करत असताना हे चालू पुढारी आपल्यालाच लुटत आहेत, या बाबीकडे (ती लक्षात आलीच, तर) सपशेल दुर्लक्ष करतात, नि वर त्याच पुढाऱ्यांना पुन्हा निवडून देतात. चालायचेच!
२ प्लीज़ नोट: एकदा 'समीकरण' म्हटले, की, द कॉन्व्हर्स ऑल्सो ऑटोमॅटिकली होल्ड्ज़ ट्रू, बाय डेफिनिशन.
३ मद्यार्कयुक्त पेयांचे सेवन न करणाऱ्या मंडळींकरिता टीटोटलर असा शब्द इंग्रजी भाषेत रूढ आहे (टीटोटॅलिटेरियन असा नव्हे), याची आम्हांस पूर्ण कल्पना आहे. सबब, या बाबतीत आमची चूक काढण्याचा आगाऊपणा कोणी कृपया करू नये. ही चूक नाही; टीटोटॅलिटेरियन असा शब्द येथे आम्ही जाणूनबुजून३अ वापरलेला आहे.
३अ म्हणजे कसे आहे, की, कोणी काय प्यावे, नि कोणी काय पिऊ नये, हा ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे; त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही; आक्षेप तर नाहीच नाही. आमचा आक्षेप, विरोध तथा राग आहे, तो इतरांनी काय पिऊ नये, ते ठरवू पाहणाऱ्यांबद्दल; अशांकरिता टीटोटॅलिटेरियन असा नवीन शब्द आम्ही योजलेला आहे. सूचना समाप्त.
४ बकार्ड्यसुर खिलाडू वृत्तीचा जर नसता, तर, आपले रेकॉर्ड मोडले, म्हटल्यावर कन्सीड करून, प्रतिस्पर्ध्याशी शेकहँड करून चालता झाला असता काय? नाही! उलट, तो जर खिलाडू वृत्तीचा नसता, तर आजतागायत या रेकॉर्ड ब्रेकला चॅलेंज करणारे त्याचे खटले विविध कोर्टांतून चालू असलेले आपल्याला ऐकू आले असते. ते तसे ऐकू येत नाहीत, याचे श्रेय अर्थात त्याच्या टीटोटलर नसण्याला आहे.
५ अ मॅन शुड नेव्हर फर्गेट हिज़ रूट्स, वगैरे वगैरे.
प्रतिभेचा प्राणवायू?
हा शब्द तुम्हाला झाला तेव्हा तुम्ही काय पीत होतात?
बकार्ड्यासुराचा पराभव
बकार्ड्यासुराचा पराभव करणाऱ्या वीरसेनाचं मंदिर बांधा, जरा बिझनेस वगैरे सुरू करा मह्याबरोबर!
यावरून आठवले... (अवांतर)
या निमित्ताने एक जुनी लोककथा आठवली. साधारणतः १९९०च्या दशकाच्या सुरुवातीच्या आसपास लोकांना बिझनेस व्हिसावर यूएसएला पाठविणाऱ्या ज्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्या मुंबईत कार्यरत होत्या, त्यांपैकी सर्वात मातब्बर कंपनीच्या नावावर ही कहाणी खपविली जात असे. (कंपनीचे नाव लिहिण्याची गरज नाही; ते तसेही प्रातिनिधिक आहे. या धंद्यातील जवळपास सर्वच कंपन्यांची स्थिती नि कार्यपद्धती तेव्हा थोड्याफार फरकाने जवळपास सारखीच असे. त्यामुळे, पैकी कोणत्याही कंपनीच्या नावावर ही कथा खपविली असती, तरी काहीही फरक पडला नसता. तर ते एक असो.)
तर होते काय, की एका गावात एक वानर घुसते, नि गावकऱ्यांना त्रास देऊ लागते. कोणाची टोपीच काय उडव, कोणाला डोक्यावर टप्पलच काय मार, कोणाची केळीच काय हिसकावून घे, वगैरे वगैरे.
गावकरी हैराण असतात. परंतु करणार काय? शेवटी हनुमानाचा जातवाला; त्याला मारता तर येत नाही! गावकऱ्यांची सभा घेतात, विचार करकरून थकतात. इकडे हाल चालूच असतात. शेवटी गावात दवंडी पिटतात. "जो कोणी वानराला न मारता त्याच्यापासून गावाची सुटका करून देईल, त्याला पन्नास हजार रुपयांचे इनाम मिळेल होऽऽऽऽऽऽ! ढुम् ढुम् ढुमाक्! ढुम् ढुम् ढुमाक्!"
(त्या काळी पन्नास हजार रुपये ही मोठी रक्कम होती.)
पण अर्थात, गावातून कोणीही पुढे येत नाही. कारण उघड आहे; गावातील कोणाला जर उपाय माहीत असता, तर मुळात दवंडी पिटण्याची गरज पडली असती काय?
परंतु, दैववशात् म्हणा, किंवा योगायोगाने म्हणा, ही दवंडी पिटली जात असताना एक शहरी (= मुंबईचा) मनुष्य गावातून जात असतो. तो ही दवंडी ऐकतो, नि दवंडी पिटणाऱ्यास म्हणतो, "टेक मी टू युअर चीफ़!"
होते. मुंबईवाल्यास गावच्या पाटलासमोर उभे केले जाते. पाटलाला "हौडी, चीफ़!" वगैरे रिवाजपुरस्सर वंदन वगैरे करून मुंबईवाला म्हणतो, "मी बघतो काय करायचे ते. लेट मी गिव इट अ ट्राय."
"तू???" पाटील अविश्वासाने म्हणतो. "अरे, आमच्या गावातल्या मातब्बर मंडळींना जे जमले नाही, ते तू - एक शहरी मनुष्य - काय करून दाखवणार? वानर म्हणजे काय असते, ते राणीच्या बागेबाहेर पाहिले तरी आहेस काय तू?"
"मी काही उगाच बोलत नाही. मला पूर्ण आत्मविश्वास आहे, की ही कामगिरी मी पार पाडू शकेन म्हणून. पण मी ती पार पाडल्यानंतर तुम्ही मला इनाम द्याल, याची मला खात्री काय? मुळात मला द्यायला इतके पैसे तुमच्याजवळ आहेत, हे मला दाखवा."
"आम्ही काय उगाच असेतसे इनाम जाहीर नाही केले! हे बघ पन्नास हजार रुपये. पाचशे पाचशेच्या कोऱ्या करकरीत शंभर नोटा!" (त्या काळी पाचशेच्या नोटा चलनात होत्या.) "तू जर काम करून दाखवलेस, तर या तुला मिळतील. पण तू नक्की काय करणार?"
"तो माझा प्रश्न आहे. तुम्हाला तुमचे काम झाल्याशी मतलब."
"बरे ठीक. पण अट लक्षात आहे ना? वानराला मारायचे नाही आहे. फक्त घालवून द्यायचे आहे. आणि, वानराला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये."
"हो, लक्षात आहे, आणि मान्य आहे."
"ठीक तर मग. डील!"
"डील. दाखवा मला कोठे आहे ते वानर ते. घेऊन चला मला त्या वानराकडे."
घेऊन जातात.
मुंबईचा पाव्हणा त्या वानराच्या कानात काहीतरी कुजबुजतो. वानर एकदम मुंबईच्या पाव्हण्याकडे 'कसला येडा आहे!' अशा आविर्भावात बोटेबिटे दाखवून खो खो हसू लागते.
मग मुंबईचा पाव्हणा त्या वानराला आणखी काहीतरी सांगतो. ते ऐकून वानराचा एकदम मूड पालटतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात.
मग मुंबईचा पाव्हणा पुढे होतो, वानराच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोपटतो, आणि पुन्हा काहीतरी सांगतो. त्याबरोबर वानर जे धूम ठोकते, ते पुन्हा गावात कधीही दिसत नाही.
गाववाले ठरल्याप्रमाणे मुंबईकरास पन्नास हजार रुपये देतात. परंतु, त्याने नेमके काय केले, याबद्दलचे कुतूहल त्यांना भेडसावीत राहाते. शेवटी त्याला विचारतात.
तो म्हणतो, "ते माझे शीक्रेट आहे."
"अरे, पण, सांग ना आम्हाला! वाटले तर हे आणखी पन्नास हजार घे, पण सांग!"
मुंबईकर आधी ते अधिकचे पन्नास हजार रुपये मोजून खिशात घालतो, नि म्हणतो, "ठीक आहे, सांगतो."
"सर्वप्रथम, मी वानराजवळ गेलो, नि माझी ओळख त्याला करून दिली. म्हणालो, 'मी मुंबईत xxx कंपनीत काम करतो.' म्हटल्यावर वानर माझ्याकडे पाहून, बोटेबिटे दाखवून हसायला लागले. 'हाहाहाहाहाहा हा येडा मुंबईत xxx कंपनीत काम करतो रे!' म्हणून."
"मग मी त्याला सांगितले, की मला पुढच्या आठवड्यात यूएसएला असाइनमेंटवर पाठवणार आहेत म्हणून. नि माझा तिथला अलाउन्स सांगितला. तो ऐकून त्याला माझी दया आली, नि ते रडू लागले."
"मग मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, नि त्याला म्हणालो, 'बोल, मी तुला xxx कंपनीत जॉब मिळवून देऊ काय? माझी ओळख आहे तिथे...'"
असो चालायचेच.
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)