इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे

इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी

“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.

शैलेन भांडारे

Prachi Deshpande

‘महाराष्ट्र आणि इतिहास यांचे भावनिक नाते आहे’, हे आपल्या सगळ्यांनाच अगदी नेहमीच्या परिचयाचे विधान ठरेल, आणि त्यातही मराठा काळाचा इतिहास म्हणजे या भावनिक नात्याचे क्षितिज आणि शिखरही! विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी दीडेकशे वर्षांपूर्वी ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणून स्वतःचा (इंग्रजीमध्ये!) केलेला गौरव असो, किंवा “महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे” ही आचार्य अत्र्यांची दर्पोक्ती असो, यांतून अनुस्यूत होते ती महाराष्ट्राची गेल्या सुमारे चारशे वर्षांतली इतिहासविषयक भावनिक एकात्मता. हा काळ तसा वैशिष्ट्यपूर्णच म्हणायला हवा कारण महाराष्ट्राप्रमाणे भारतातल्या इतर भूभागांतही या काळात अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी झाल्या आणि त्यांचे परिणाम, तसेच परिणती अगदी आजही आपण अनुभवत आहोत. त्याचमुळे मराठा इतिहासावर कोणी संशोधन करत आहे असे म्हटले की, महाराष्ट्रातल्या यच्चयावत इतिहासप्रेमींचे कान लगेच टवकारतात. महाराष्ट्राची गेल्या दोनशे वर्षांतली बौद्धिक जडणघडण आणि सामाजिक घुसळण यांचा एक परिणाम असा झाला आहे की, या इतिहासप्रेमींमध्ये व्यावसायिक अथवा अकादमिक आणि लोकानुययी किंवा हौशी असे दोन ढोबळ वर्ग पडले आहेत. साहित्यिकांसारखे काही बौद्धिक जगाचे प्रतिनिधी अनेकदा या दोन्ही वर्गांत आढळतात आणि/किंवा त्यांच्यात चालणाऱ्या मंथनाचा ते स्वतःच्या आस्वादक कृतींसाठी अगदी मोकळेपणाने आधार घेतात. हे व्यवहार अर्थातच मुख्यत्वेकरून मराठीत चालतात. अशा प्रकारचे इतिहास-विषयक बौद्धिक अभिसरण हे भाषिक, सामाजिक, साहित्यिक आदि व्यवहारांचा अत्यंत घनिष्ठ भाग असणे आणि त्याची अभिव्यक्ती मराठी भाषेत सतत होत राहणे हे महाराष्ट्राच्या बौद्धिक चर्चाविश्वाचे महत्त्वाचे लक्षण ठरलेले आहे. त्याचमुळे या अभिव्यक्तीचे धागेदोरे उकलणे आणि त्यांचे विश्लेषण करणे यासाठी मराठी भाषेशी ‘आतड्याचे नाते’ असणे आवश्यक आहे. पण ज्या गेल्या दोनशे वर्षांकडे आपण पाहत आहोत, त्यांत (आणि त्याआधीही) भाषिकदृष्ट्या महाराष्ट्राचा संबंध पूर्ण भारताशी येत होता. अखंड भारतातल्या राजकीय व्यवहारांचे धुरीणत्व काही दशके तरी महाराष्ट्रातल्या जनसमूहाकडे राहिले होते. या जनसमूहाला ढोबळमानाने ‘मराठे’ असे म्हटले जाते, पण त्यांत अर्थातच मराठी भाषिक असलेल्या अठरापगड जातीजमातींचा समावेश होतो. या धुरीणत्वाचा परिणाम मराठीचा फारसी, बंगाली, तसेच उत्तर भारतातल्या राजस्थानी (डिंगल), ब्रजभाषा, बुंदेली इत्यादी हिंदी पट्ट्यातल्या अतिशय जवळून संबंध आला. कानडी, तेलुगु या भाषांशी मराठीचे बंध तर याहूनही पाचशे वर्षे मागे खेचता येतात. याचमुळे बहुभाषिकत्व हा मराठीच्या भाषिक व्यवहाराचा एक महत्त्वाचा पाया राहिलेला आहे.

डॉ. प्राची देशपांडे यांच्या संशोधनपद्धतीचा महत्त्वाचा आयाम म्हणजे त्या जन्मतःच बहुभाषिकतेशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या छायाप्राकारात म्हणजेच उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट इथे त्यांची कौटुंबिक मुळे आहेत, म्हणून साहजिकच मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला पण शालेय शिक्षण पांचगणी इथल्या संजीवन विद्यालय या शाळेत झाले, कारण तिथे त्यांचे आईवडील हे भाषाशिक्षक होते - वडील संस्कृत शिकवत आणि आई मराठी! अशा प्रकारे भाषिक विविधतेशी त्यांची घडत्या वयातच गाठ जुळत गेली. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात इतिहास विषयात पदवी शिक्षण घेतले, आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या (जेएनयू) अग्रगण्य अशा मानल्या जाणाऱ्या ‘सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीज’ (सीएचएस) या इतिहासविषयक शिक्षण आणि संशोधन केंद्रात रुजू झाल्या. या केंद्रात मिळालेल्या शिक्षणामुळे त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी आमूलाग्र बदलली आणि विस्तृत झाली असे त्या आवर्जून नोंदवतात. पुण्यासारख्या इतिहासप्रसिद्ध आणि इतिहासाभिलाषी जागी राहून आणि शिक्षण घेऊनही असे का झाले याची मीमांसा करताना त्या म्हणतात की, “फक्त इतिहासाची साधने एकत्र गोळा करणे आणि त्यांच्यातली माहिती वेचून इतरेजनांच्या कुतूहलशमनार्थ पुन्हा मांडणे, म्हणजे इतिहास ‘संशोधन’ नसते, तर भूतकाळाची यथायोग्य जाण करून घेण्यासाठी त्या साधनांतील माहिती प्रश्नांकित करणे, त्यांच्याकडे चिकित्सक आणि विश्लेषक दृष्टीने पाहणे, आणि व्यापक अशा आंतरशाखीय अभ्यासातून त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन”, या महत्त्वाच्या तथ्याकडे त्यांचे लक्ष सीएचएसमधल्या अभ्यासामुळे केंद्रित झाले. नेमक्या याच गुणाचे परिपोषण आपल्याला महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अकादमिक आणि हौशी अशा दोन्ही प्रवाहांत विशेषसे झालेले दिसत नाही. इतिहास या शब्दाची फोड इति+ह+आस म्हणजे ‘हे असे झाले’ अशी करण्याकडे आणि त्या चौकटीतून इतिहासाकडे बघण्याकडे सहसा मराठी परंपरेचा प्रवाह असतो. पण ‘असे झाले’ याचबरोबर, ‘का झाले’, ‘कसे झाले’ ‘कुठे झाले’, ‘केव्हा झाले’ इत्यादी प्रश्नही आपसूकच उद्भवत असतात आणि ते जाणण्यासाठी आपल्याला कितीही साधने उपलब्ध असली तरी अन्वयाच्या दृष्टीने ती अखेरीस मर्यादितच ठरतात; कारण अगदी काल घडलेल्या एखाद्या घटनेबद्दलही वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन, अन्वय, जाणीव इत्यादी निरनिराळे असू शकतात, तर मग शेकडो किंवा हजारो वर्षांमागे झालेल्या घटनांचे संदर्भ आपण सत्यान्वेषी नजरेतून कसे लावू शकणार? सबब, इतिहासात सत्य नेमके काय आहे हे जाणण्यापेक्षा तथ्य जाणून, त्या तथ्यांबद्दल प्रश्न विचारणे, आणि तथ्यांच्या मांडणीकडे ‘हस्तामलकवत्’ पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहणे, ते पाहणे वेगवेगळ्या सैद्धांतिक पातळ्यांच्या अंगांनी विश्लेषित करून मांडणे, त्या पाहण्याला आंतरशाखीय अभ्यासाची जोड देणे हे आधुनिक इतिहास-संशोधन-प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे, ही बौद्धिक जाणीव डॉ. देशपांडे यांना जेएनयूमध्ये झाली. तिथले बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक विद्यार्थी विश्व, त्यांच्यातली तीव्र अशी विश्लेषणात्मक जाणीव, त्याला तिथल्या अध्यापकवर्गाकडून मिळणारा पाठिंबा, अशा इतर गोष्टींतून देखील डॉ. देशपांडे यांची संशोधन आणि विचारपद्धती घडत गेलेली आपल्याला दिसते.

जेएनयूनंतर वाचस्पती (डॉक्टरेट) पदवीच्या अभ्याससाठी डॉ. देशपांडे यांनी अमेरिकेला प्रयाण केले. बॉस्टनजवळच्या ‘टफ्ट्स विद्यापीठा’त अग्रगण्य इतिहासज्ञ प्रा. सुगतो बोस यांच्या पर्यवेक्षणाखाली त्यांनी डॉक्टरेटसाठी "मराठीतला इतिहासविचार आणि इतिहासलेखनाच्या विविध पद्धती" या विषयावर संशोधन सुरू केले. इथेही त्यांनी पारंपरिक मराठी इतिहास-चर्चाविश्वात फारसा कुठे विशेष चर्चिला न गेलेला विषय निवडला. इतिहास कसा लिहिला जातो याचाही ‘इतिहास’ असतो. भालचंद्र नेमाड्यांच्या ‘हिंदू’ कादंबरीतल्या नायकाला “जाणिवांचा इतिहास कोण लिहिणार?” असा एक मर्मभेदी प्रश्न, हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष पुरातत्त्वीय पद्धतीने उकरून काढताना पडतो. जसा ‘जाणिवांचा इतिहास’ असू शकतो तशीच ‘इतिहासाची जाणीव’ही असते आणि ही जाणीवच इतिहासलेखनावर प्रभाव पाडत असते. इतिहासाचा इतिहास लिहिणे म्हणजे एका परीने या जाणिवेचाच इतिहास लिहिणे असते. पण असा इतिहास लिहिणे म्हणजे केवळ ही जाणीव धुंडाळणे नव्हे तर या जाणिवेच्या अभिव्यक्तीच्या, विकासाच्या आणि प्रसाराच्या पाठपुराव्यातून एकंदरीत सामाजिक जडणघडणीवर तसेच इतिहासाच्या सामाजिक उपभोगावर कसा प्रभाव पडत गेला, याची तपासणी करणे होय. इतिहास लेखनपद्धतीच्या आणि प्रकारांच्या इतिहासाचा याचमुळे सामाजिक इतिहासाशी अत्यंत जवळचा संबंध असतो आणि या संबंधाचे धागेदोरे उलगडण्यातून आपल्याला समाजातल्या ‘इतिहासभाना’चा मागोवा घेता येतो. शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर महाराष्ट्रासारख्या ‘इतिहासाच्या समंधाने झपाटलेल्या’ समाजात तर या भानाचा मागोवा आपल्याला वर्गीय/वर्णीय जाणिवा, समाजातले अभिसरणात्मक राजकारण, भूतकाळाकडे बघण्याच्या विशिष्ट नजरा आणि त्यातून भूतकाळ आणि वर्तमान यांचे सांधे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे जुळून येतात यांची उकल, अशा पुष्कळच मनोरंजक विषयांकडे घेऊन जातो!

Creative Pasts - Prachi Deshpande

डॉ. देशपांड्यांनी त्यांच्या डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी केलेल्या संशोधनातून "क्रिएटिव्ह पास्ट्स - हिस्टोरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया १७००-१९६०" हे पुस्तक उभे राहिले. या पुस्तकाचा मुख्य विषय काळाच्या एका ठरावीक टप्प्यावर आणि सामाजिकतेच्या विकासातल्या एका महत्त्वाच्या वळणावर ही ऐतिहासिक जाणीव महाराष्ट्रात कशी विकसित होत गेली, असा आहे; त्या जाणिवेमागे आणि तिच्यामुळे भूतकाळाकडे बघण्याच्या आणि वेगवेगळ्या परीने तो भूतकाळ ‘जगण्या’च्या आविष्कारांत कसा फरक पडत गेला, याचे मनोज्ञ दर्शन आपल्याला घडते. विशिष्ट जाणिवांनी प्रेरित अशा इतिहास-लेखन-पद्धतीतून त्या जाणिवांचे प्रतिबिंब उमटलेला आणि त्या जाणिवांतून वाहणाऱ्या प्रवाहांना पोषक ठरणारा इतिहास कसा लिहिला जातो; त्याचे अशा प्रवाहात्मक पूर्वसूरींशी काय नाते असते; हे प्रवाह पुढे कसे मिसळतात किंवा वेगळ्या मार्गाने जात राहतात आणि त्यांची परिणती अगदी आजच्या राजकीय धारणांशी थेट संबंध सांगण्यात कशी होते याची विविधांगी चर्चा डॉ. देशपांड्यांनी या पुस्तकात केली आहे. या चर्चेतून महाराष्ट्राची आधुनिक अस्मिता ही अशा इतिहास-विचारांतून आणि लेखन-पद्धतींतून निर्माण झालेल्या इतिहासाला - विशेषतः मराठा कालाच्या इतिहासाला - केंद्रस्थानी धरून वाढत गेली आहे असे मनोज्ञ निरीक्षण डॉ. देशपांड्यांनी मांडले आहे. हे मांडताना त्यांनी बखर आणि पोवाड्यांसारख्या पारंपरिक स्रोतांतून भूतकाळ कसा सांगितला जातो, एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या शैक्षणिक आणि वैचारिक उलथापालथींतून बुद्धिजीवी वर्गाच्या इतिहासविषयक धारणांत कुठले बदल आणि कसे झाले; त्यांतून साधनांच्या शोधाच्या आधारे ‘सत्यान्वेषणा’वर भर दिले गेलेले प्रत्यक्षज्ञान-वादी (पॉझिटिव्हिस्ट) प्रकारचे इतिहासलेखन कसे रुजत गेले; या इतिहास-लेखन-पद्धतीचा आणि प्रकारांचा साहित्यिक आणि भाषिक व्यवहारांवर, वाङ्‌मयावर कसा प्रभाव पडला अशा काही मूलगामी विचारप्रवर्तक प्रवाहांचा साद्यन्त विचार केला आहे. पण हे करताना त्यांची दृष्टी केवळ महाराष्ट्रावरच केंद्रित राहिलेली नाही, तर महाराष्ट्राच्या भिंगातून त्यांनी एकंदरीतच ‘वासाहतिक आधुनिकता’ आणि इतिहास-विचाराच्या उत्क्रांतीचे या आधुनिकतेतले स्थान, ‘राष्ट्र’ आणि ‘प्रांत’ यांच्याबद्दलच्या अस्मितांच्या जडणघडणीचे व्यापक राष्ट्रवादाच्या विकासात निर्माण होणारे हितसंबंध अशा काही व्यापक प्रेक्ष्यातल्या प्रश्नांचाही आढावा घेतला आहे. स्मृती आणि तिचे ऐतिहासिकता आणि इतिहास-विचारातले स्थान या प्रश्नांवरही विचारगामी चर्चा डॉ. देशपांडे घडवतात. चांगल्या प्रतीचे संशोधन हे उभ्या केलेल्या प्रश्नांची चर्चा करून निरीक्षणे नोंदवूनच थांबत नाही, तर ते त्या अनुषंगाने नवीन प्रश्नांकडेही लक्ष वेधत असते; कारण संशोधन ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे; या तत्त्वाचे उत्तम दर्शन आपल्याला डॉ. देशपांड्यांच्या इतिहास-लेखन-पद्धतीवरील लेखनात दिसते.

टफ्ट्स विद्यापीठातून डॉक्टरेट मिळाल्यानंतर प्राची देशपांडे यांनी कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी, रटगर्स युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली या अमेरिकन विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. २०१० साली त्या भारतात परतल्या आणि कोलकाता इथल्या ‘सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस’ या मान्यवर संस्थेत असोशिएट प्रोफेसर ऑफ हिस्टरी म्हणून रुजू झाल्या. ही संस्था म्हणजे सामाजिक इतिहास-अभ्यासाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. आधुनिक भारताच्या इतिहासकारांपैकी अनेक उल्लेखनीय इतिहासकार इथे अध्यापन आणि संशोधन या कार्यांत कार्यरत आहेत आणि होते. ‘सबाल्टर्न स्टडीज’ म्हणजे शोषित-वंचितांच्या दृष्टीकोनातून इतिहासाचे धागेदोरे उलगडणाऱ्या अभ्यास-प्रवाह-गटाचे संस्थापक सदस्य पार्थो चॅटर्जी आणि गौतम भद्र, तसेच पुरातत्त्व आणि कलेच्या इतिहासविचारावर भाष्य करणाऱ्या तपती गुहा-ठाकुर्ता अशा संशोधकांचा या मान्यवरांत समावेश होतो. सामाजिक विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण या संस्थेत दिले जाते. कोलकात्यात आल्यावर मूळच्याच बहुभाषिक असलेल्या डॉ. देशपांड्यांच्या भाषिक संपदेत आता बांगला भाषेची भर पडली! तसेच संस्थेत कार्यरत असलेल्या इतर अध्यापक-संशोधकांच्या ज्ञानपिपासेचा आणि सुरू असणाऱ्या बहुशाखीय अभ्यासाचा त्यांना त्यांची स्वतःची बौद्धिक आणि विश्लेषक क्षितिजे विस्तारित करण्यासाठी उपयोग झाला. बांगला भाषेशी जवळीक निर्माण झाल्यावर आणि कोलकात्यातील मुख्यत्वे बंगाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना बहुभाषिक प्रकारे केल्या जाणाऱ्या विद्याभ्यासात काय अडचणी येतात, त्यात कुठले फायदे-तोटे आहेत, स्थानिक भाषेतले ज्ञानविश्व आणि इंग्रजीसारख्या ‘वाघिणीच्या दुधा’तून मिळणारे शिक्षण यांचे अनुबंध कसे जुळत जातात, अशा प्रकारच्या प्रश्नांशी त्यांचा जवळून परिचय होत गेला. यातूनच त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्या आणि त्यांचे लक्ष ‘भाषिक विचार’, ‘भाषा आणि इतिहास’ यांचा सामाजिक दृष्टिकोनातून करता येणारा अभ्यास, अशा विषयांकडे वळले.

२००८-२०१० या काळात मराठी इतिहासविचार आणि इतिहास-लेखन-पद्धती यांचा महाराष्ट्राची सामाजिक ‘ओळख’ घडवण्यात कसा झाला या विषयाकडून त्या बहुभाषिकता, तिच्या प्रेक्ष्यात घडत जाणारे साधनांचे एकत्रीकरण आणि त्यांची अभिलेखनीयता (अर्कायव्हलिझम) यांचा विशिष्ट ऐतिहासिक घटनांकडे पाहण्यासाठी केला जाणारा वापर अशा विषयांकडे शोधक वृत्तीने पाहू लागल्या. या सुमारासच त्यांनी त्यांचे काही लेखन मराठीतूनही प्रसिद्ध करण्यास आरंभ केला. ही बाब मराठीत अशा चिकित्सक लेखनाचा जो एकंदरीत अभाव आहे, तो पाहता अभिनंदनीय म्हणायला हवी. एका विशिष्ट व्यक्तीचा इतिहास लिहिताना त्या लेखनाची लेखी साधने एकत्र करून, म्हणजेच एक ‘साधन-संपुट’ अथवा आर्काइव्ह निर्माण करून, त्यातील महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण केल्याने त्या इतिहासलेखनावर झालेले परिणाम कसे उलगडता येतात अशा दृष्टिकोनातून त्यांनी या काळात केलेले संशोधन हे महत्त्वाचे आणि मूलगामी आहे. त्यांनी या विश्लेषणासाठी निवडलेली व्यक्ती म्हणजे झांशीची राणी लक्ष्मीबाई हे इतिहासप्रसिद्ध व्यक्तिमत्व. लक्ष्मीबाईंसंबंधीची साधने निवडताना त्यांनी ‘राष्ट्रवादी’ काळात लिहिली गेलेली साधने निवडून त्यांचे एक संपुट केले. यांमध्ये वृंदावनलाल वर्मा यांची ‘झाँसी की रानी’ ही कादंबरी (१९४६), रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी लिहिलेले ‘झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र’ हे पुस्तक (१८९४) आणि त्याचे हिंदी भाषांतर (१९३८), चिंतामणराव वैद्य यांनी संपादित केलेली विष्णुभट गोडसे वरसईकर यांच्या ‘माझा प्रवास’ या पुस्तकाची आवृत्ती (१९०७) आणि दत्तो वामन पोतदार आणि न. र. फाटक यांच्या प्रयत्नाने प्रसिद्ध झालेली गोडसे यांच्या लेखनाची यथादृष्ट (मुळाबरहुकूम) संहिता (१९६६) या साधनांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या काळांत लिहिल्या गेलेल्या आणि वेगवेगळ्या वाङ्‌मयीन तसेच अभ्यासक शैलींतल्या साधनांचे डॉ. देशपांड्यांनी सूक्ष्म वाचन केले; लक्ष्मीबाईंचे चरित्र वाचकांसाठी उभे करताना या लेखकांनी त्यांतले कुठले तपशील कसे वापरले, कुठले वगळले, कुठे स्वतःच्या पदरचे मसुदे घातले, कुठे इतिहासात मुळातच ‘गाळलेल्या जागा कशा भरल्या’ याचे ही साधने वापरून अतिशय मनोरंजक असे विश्लेषण सादर केले. याच अभ्यासाचा वैद्यांच्या आवृत्तीबद्दलचा भाग त्यांनी मराठीतूनही प्रसिद्ध केला. असे करताना या साधनांच्या लेखकांची मूळची उर्मी ‘राष्ट्रवादी’ जरी असली तरी त्यात ते हिंदी-भाषिक असल्याने किंवा पुरुष असल्याने त्यांनी लक्ष्मीबाईंच्या मराठी पार्श्वभूमीकडे, त्यांच्या वैधव्याकडे, किंवा त्यांच्या पतीच्या स्त्रैणपणाकडे कसे पाहिले हे पदर डॉ. देशपांड्यांनी विशेषेकरून उलगडून दाखवले. असे करताना त्यांनी एकंदरीत ‘राष्ट्रवादी’ दृष्टिकोनातून १८५७च्या हकीकतींकडे पाहण्याचा मूलस्रोत, ज्याचा निर्देश सहसा वि. दा. सावरकरांकडे केला जातो, तो एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच कसा निर्माण पावला याचे दर्शन घडवले आहे. त्याचप्रमाणे लिंगभावात्मक अभिव्यक्तीसारख्या आधुनिकोत्तर विषयाकडे इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहताना आपल्याला काय दिसते याकडेही त्या लक्ष वेधतात. या संदर्भात त्यांनी लक्ष्मीबाईंचे पती राजे गंगाधरराव यांच्या स्त्रैण वागणुकीसोबतच त्यांचा समकालीन असलेल्या अवधचा नवाब नासिरुद्दीन हैदर याच्या त्याच प्रकारच्या अभिव्यक्तीकडे लक्ष वेधून या बाबतीत अधिक संशोधन व्हायची गरज असल्याचे साक्षेपी निरीक्षण नोंदवले आहे.

मराठी वाङ्‌मयात आढळणारी इतिहासदृष्टी हाही डॉ. देशपांडे यांच्या अभ्यासाचा एक विषय राहिलेला आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या गाजलेल्या कादंबरीकडे चिकित्सक दृष्टिक्षेप टाकणारे त्यांचे लेखन हे या बाबतीत प्रातिनिधिक म्हणता येईल. “स्मृती आणि भाषेतून रचलेल्या ज्ञानाच्या दस्तावेजांत स्वतः सहभागी होऊन ते ‘जगावं’, की त्याला ज्ञानचौकटीच्या शास्त्रीय भाषेतून ‘रिक्लेम’ करावं” हा ‘हिंदू’च्या नायकाला पडलेला मूलभूत प्रश्न आहे हे त्यांचे मत अतिशय चिंत्य असे आहे. पुस्तकी, दस्तावेजी किंवा सैद्धांतिक ज्ञान आणि वास्तविक जगणे यांच्यात उभ्या राहणाऱ्या दुबेळक्यात हा नायक अडकलेला आहे, आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या परात्मतेकडे तो आकर्षित होत आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. या दस्तावेजीकरणात वासाहतिक प्रशासकांनी बजावलेली कामगिरी, त्यांच्यातल्या ‘तटस्थ’ पण तरीही वासाहतिक हितसंबंधांनी बद्ध असलेल्या अशा ज्ञानप्रवाहांची ओळख आणि त्या ओळखीतून त्यांच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या ‘देशी’ जनांची पारंपरिक गावगाड्याच्या वास्तविकतेपासून होत जाणारी फारकत या द्वंद्वावर ‘हिंदू’च्या नायकाचे हिंदकळणे त्यांनी उत्तम रीतीने समजावले आहे. त्याच्या आधारासाठी सामाजिक शास्त्रांच्या अंगाने ऐतिहासिक प्रवाहाचे विश्लेषण करणाऱ्या, लोकजाणिवांच्या शोधांच्या सैद्धांतिक बैठकीची वाट त्यांनी चोखाळली आहे. यासाठी त्यांनी रणजित गुहा, सुमित सरकार प्रभृती प्रणित ‘सबाल्टर्न स्टडीज’, फूको आणि एडवर्ड सैद-प्रणित उत्तर-संरचनावादी मार्गाने जाणारे सैद्धांतिक प्रवाह, त्यांचा भारतीय इतिहासाच्या संदर्भात निकलस डर्क्स, शाहीद अमीन यांच्यासारख्या संशोधकांनी केलेला वापर अशा वेगवेगळ्या ज्ञानचौकटींचा आधार घेतला आहे. या प्रवाहांचा आणि विश्लेषण-प्रणालींचा मराठी चर्चाविश्वाला जवळून परिचय करून देण्याची महत्त्वाची कामगिरी ‘हिंदू’च्या निमित्ताने डॉ. देशपांडे यांनी बजावली आहे. कुठल्याही मराठी वाङ्‌मयीन कृतीचे अशा प्रकारे केलेले विश्लेषण हे विरळाच म्हणायला हवे. नेमाडे यांच्या भूमिका सामाजिक-राजकीयतेच्या दृष्टीने अनेकदा वादग्रस्त ठरत असल्याने विशेषतः त्यांच्या साहित्यकृतीचा अशा विश्लेषक दृष्टीतून केलेला पाठपुरावा हे डॉ. देशपांड्यांचे मोठे योगदान आहे असेच म्हणावे लागेल.

राष्ट्रवाद, लिंगभाव, वासाहतिक आधुनिकता अशा संशोधक-प्रिय, अकादमिक विषयासंबंधी लेखन करतानाच, कोलकात्यातील वास्तव्यात आलेल्या बहुभाषिकतेच्या अनुभवामुळे डॉ. देशपांडे यांचे लक्ष भाषिक व्यवहाराच्या इतिहासाकडे अधिकाधिक वळायला लागले. भाषेचा इतिहास म्हणजे सहसा तिच्यात निर्माण झालेल्या आणि होत असलेल्या साहित्याचा इतिहास असतो, किंवा तिच्या व्यापक उत्क्रांतीचा इतिहास असतो. या दोन्ही बाबतीत मराठीत लिहिले गेलेले अतिशय समृद्ध असे चर्चा-वाङ्‌मय उपलब्ध आहे. मराठी साहित्याच्या, भाषा-संप्रदायाच्या इतिहासात अगदी चिपळूणकर-राजवाड्यांपासून ते अलीकडच्या मालशे-सारंगांपर्यंत अनेक नामवंतांनी आपली मुद्रा उमटवली आहे. मराठी भाषेची उत्पत्ती आणि स्थिती यावर शं. बा. जोशी, ना. गो. कालेलकर आणि विश्वनाथ खैरे यांच्यासारख्या अभ्यासकांनी विचारप्रवर्तक आणि वादविवादाला आमंत्रण देणारे असेही लेखन केले आहे. पण याचबरोबर, भाषेचा इतिहास म्हणजे तिच्या वापराचाही इतिहास असतो, आणि हा वापर अर्थातच स्थळकाळबद्ध अशा ऐतिहासिक प्रवाहांमुळे परिणत होत जात असल्याने सामाजिक आणि राजकीय इतिहासातल्या घडामोडींशी त्याचे अत्यंत जवळचे नाते असते. मराठी भाषेकडे आणि वाङ्‌मयाकडे सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक नजरेतून पाहणारे आणि त्यातून भाषिक, सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय तथ्यांचा पाठपुरावा करणारे असे पुष्कळसे लेखन झाले आहे. मराठीत या अंगाने लिहिणारे शं. गो. तुळपुळे किंवा रा. चिं. ढेरे यांसारखे विद्वान आहेत. पण असे लेखन पुष्कळसे इंग्रजीत झाले आणि होते आहे, याचे मराठी वाचकांना काहीसे आश्चर्यच वाटेल! महानुभाव वाङ्‌मयाचा अभ्यास करणारे इयन रेसाईड, ॲन फेल्डहाऊस हे संशोधक, संत-वाङ्‌मय आणि यादवकालीन मराठीचा अभ्यास करणारे ख्रिश्चन ली नॉव्हेच्के, सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे गावावर अनेक दशके संशोधक दृष्टीने ‘लक्ष ठेवून’ असणारे ली श्लेसिंगर, अशा पाश्चात्य विद्वानांचा या बाबतीत उल्लेख करावा लागतो.

पण वाङ्‌मयासोबतच भाषा ही प्रशासकीय व्यवहारासाठीही वापरली जात असते, आणि इथे तिची वळणे आणि वागणूक ही साहित्यिक किंवा वाङ्‌मयीन व्यवहारापेक्षा वेगळी असू शकतात. मूलतः मराठी भाषिक असलेले महाराष्ट्रातले मराठे ऐतिहासिक प्रवाहामुळे किमान काही दशके तरी संपूर्ण भारतात पसरलेल्या राजकीय सत्तेच्या पटलावरचे अग्रणी राहिले. या धुरिणत्वामुळे मराठी भाषेचा प्रशासकीय भाषा म्हणून पश्चिमेला गुजरात ते पूर्वेला ओडिशा, तसेच उत्तरेला बुंदेलखंड ते दक्षिणेला तंजावर अशा विस्तृत भौगोलिक क्षेत्रात परिसंचार (circulation) झाला. मराठी भाषेचा प्रशासकीय व्यवहार मोडी लिपीतून चालत असे. हा व्यवहार करणारे पारंपरिक जन आणि ज्ञातीसमूह होते. महाराष्ट्राच्या राजकीय महत्त्वाच्या कक्षा आणि धुरीणत्व वाढत गेल्याने मोडी लिपीचा प्रशासकीय वापर आणि तो करू शकणारे व्यावसायिक-व्यावहारिक अभिजनसुद्धा भारतभर पसरले. हा प्रसार होत असताना फारसी, तामिळ, कानडी अशा वेगवेगळ्या भाषांशी, लिपींशी आणि त्यांच्यातही परंपरागत चाललेल्या अशा व्यवहारांशीही संबंध येत गेला. हा व्यवहार अर्थातच लेखनाशी अधिक संबंधित होता, कारण प्रशासकीय प्रवृत्तीमुळे त्यात वाङ्‌मयीन हुंकारांना स्थान नव्हते. लिहिणे हेच उपजीविकेचे साधन असलेला एक मोठा वर्ग या व्यवहारांशी संबंधित होता. प्रशासकीय लिखाण कसे करावे याचाही एक इतिहास अशा घडामोडींमुळे हळूहळू घडत गेला. जुन्या पिढीतले इतिहास संशोधक शं. ना. जोशी, रा. वि. ओतुरकर तसेच अलीकडच्या काळातल्या रोझलिंड ओहॅन्लन यांनी या प्रशासकीय लेखनव्यवहाराच्या इतिहासासंबंधी थोडेबहुत काम केलेले आहे पण अजूनही या क्षेत्रात विशेष संशोधकीय लेखनाची उणीवच भासत आहे.

डॉ. देशपांड्यांनी या पोकळीचा फायदा घेऊन अशा इतिहासाकडे आपल्या संशोधनाचा मोर्चा वळवला. ही प्रशासकीय व्यवहाराची लेखन-संस्कृती कशी निर्माण झाली, बहुभाषियता आणि बहुलिपीयता यांच्याशी तिने कसे जुळवून घेतले, लेखी भाषा आणि बोली भाषा यांच्यात कसा आणि कुठला फरक पडत गेला, लेखन करणारे कारकुनादि व्यावसायिक लोक या दोन्हींकडे कसे बघत, त्यातून त्यांच्या भाषिक जाणिवेसंबंधी आपल्याला काय बोध होतो, उत्तर मध्ययुगीन, आधुनिक-पूर्व काळात दैनंदिन भाषावापर कसा होत असे अशा अत्यंत मनोरंजक आणि विचिकित्सक प्रश्नांकडे (Meta-inquiry) त्या विश्लेषक दृष्टीने पाहू लागल्या. या संदर्भात लेखन करताना त्यांनी मराठी भाषेतूनही त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले. ‘कारकून, दफ्तर, आणि कागदपत्रे : अभिलेखागाराच्या इतिहासाकडे’ हा त्यांचा लेख आधुनिक-पूर्व काळातल्या कारकुनी पद्धतींचे आधुनिक काळातल्या नोकरशाहीकडे परिवर्तन होताना घडलेल्या प्रक्रियांचे विश्लेषण करतो. गेल्या दोन दशकांत मुघलांच्या इतिहासकारांनी प्रशासकीय पद्धतींच्या इतिहासाकडे दिलेले लक्ष त्या मराठा काळ आणि मोडी लिपीतून लेखनव्यवहार करणाऱ्या ‘कसबी’ कारकुनांकडे वळवतात. या प्रक्रियांत ‘इनाम कमिशन’सारख्या वासाहतिक ‘नियामक संस्था आणि यंत्रणे’चा काय हातभार होता, त्यातून कागदपत्रांच्या बनावटीकरणाची, लपवाछपवीची कृत्ये कशी बळावली, त्यात या पारंपरिक कारकूनवर्गाचा कसा सहभाग होता, याबद्दलचे उत्तम विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यातून विकेंद्रित अशा दफ्तरखान्यांकडून केंद्रीकृत अशा आर्काइव्ह्ज किंवा अभिलेखागारांमध्ये या संस्थांचे रूपांतरण कसे झाले हेही त्यांनी दाखवले आहे. या प्रक्रियांत जुन्या कारकुनी पद्धतीच्या हितसंबंधीयांबाबत वासाहतिक सरकारची भूमिका कशी राहिली, त्यांनी त्यांचे परंपरागत कसब कसे वापरले, आणि त्यातून निरनिराळ्या प्रकारची प्रशासकीय द्वंद्वे कशी उभी राहिली, ग्वाल्हेर किंवा कर्नाटकासारख्या महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतातही ही कारकुनी यंत्रणा कशी कार्यरत होती, अशा अनेक बाबींवर अतिशय मनोरंजक प्रकाश टाकण्यात डॉ. देशपांडे यशस्वी झाल्या आहेत.

Modern South Asian Vernaculars

मराठा काळातल्या लेखनिक किंवा कारकून वर्गाच्या ‘कसबी’ कौशल्याचा, त्याच्या देवाणघेवाणीचा आणि एकंदरीतच या पेशाची जडणघडण आणि त्यातून दिसणारे सामाजिक कवडसे यांचा वेध घेणारे लेखन डॉ. देशपांडे अलीकडच्या पाचेक वर्षात प्रसिद्ध करत आलेल्या आहेत. या लेखनांत मराठी सुलेखन-शास्त्रावर त्यांनी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. एखादी भाषा ‘नीट’ लिहावी कशी याबाबतीतले वादविवाद जगातल्या अनेक भाषांच्या बाबतीत झाले आहेत आणि अर्थातच मराठी त्याला अपवाद नाही. पण मोडीसारख्या लिपीत, जिथे विरामचिन्हे किंवा ऱ्हस्वदीर्घविचार यांना जात्याच सूट मिळालेली होती, तिथपासून ‘बाळबोध’ लिपीचा अंगीकार करताना ही चिन्हे किंवा उच्चारजन्य फरकांचा समावेश मराठीच्या शुद्धलेखनात कसा होत गेला, त्यासाठी वासाहतिक आणि वसाहतोत्तर, अगदी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरही, कसकसे बदल होत गेले याचा इतिहास मनोरंजक आहे; आणि तो केवळ तपशिलांपुरताच मर्यादित नाही, तर लेखनाची शुद्धाशुद्धता, प्रशासकीय किंवा इतर बाबीत (उदा. पत्रलेखन) लेखनासाठी वापरले जाणारे संकेत इत्यादी बाबी उघडच जातीय किंवा वर्गीय उच्चनीचता, धुरीणत्व अशा सामाजिकतेशी जवळून निगडित असलेल्या गोष्टींची प्रतिबिंबे म्हणूनही अभ्यासता येतात. त्यातून या सामाजिकतांचा वेगळा इतिहास दिसायला लागतो. या दृष्टिकोनातून सुलेखनशास्त्र या विषयाकडे पाहणाऱ्या डॉ. देशपांडे या आजमितीच्या बहुदा एकमेव विदुषी आहेत. त्यांनी ‘लेखनकल्पतरू’सारख्या बहुशः अज्ञात आणि दुर्मिळ अशा वसाहतकालीन पुस्तकाचे सूक्ष्म परिशीलन करून लिहिलेल्या लेखाचा इथे उल्लेख करणे आवश्यक आहे. १८५३ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात पत्रलेखन आणि त्यासंबंधीचे नियम व संकेत, प्रशासकीय कागदपत्रांचे नमुने आणि खर्डे, कालनिर्णययासंबंधी माहिती अशी माहिती एकत्र संग्रथित केली आहे. पेशवाई किंवा छापील लेखन-वाचनव्यवहारपूर्व काळ आणि वासाहतिक किंवा छापील लेखन-वाचनव्यवहारोत्तर काळ अशा दोन काळांच्या संधीत हे पुस्तक लिहिले गेले. पुस्तकात आलेल्या बाबींचा वाचकांना नीट परिचय करून देऊन डॉ. देशपांडे त्याच्या वाचनातून उभ्या राहणाऱ्या काही ठळक प्रश्नांना तोंड फोडतात. हे प्रश्न एकूणातच “व्यापक लेखनसंस्कृती आणि पत्रव्यवहारावर आधारित अशा सामाजिक संपर्काच्या प्रक्रिया” यांच्याबाबत विचार करायला भाग पाडणारे आहेत, यांच्याकडे त्यांनी या लेखात लक्ष वेधले आहे. अशा प्रक्रियांच्या मागे सामाजिक उतरंडी कायम ठेवण्याकडे आणि लेखनासारख्या कळीच्या व्यवहारात ‘ब्राह्मणी धुरीणत्व’ राखण्याकडे असलेला कल या पुस्तकातल्या संकेत-नियमांवरून स्पष्ट दिसून येतो असे त्यांचे निरीक्षण आहे. छापील वर्तमानपत्रे किंवा पुस्तके यांच्या प्रसारातून एकोणिसाव्या शतकात मराठीचा एक सामाजिक अवकाश तयार होऊ लागला होता. रचनात्मक दृष्ट्या पाहायला गेले तर हा अवकाश तयार होण्याच्या पूर्वकाळात, सार्वजनिक लोकसंचार आणि संपर्ककक्षा रुंदावत जात असताना अशा पुस्तकांचे नक्की स्थान काय होते याबद्दल अधिक विचार करायला ते प्रवृत्त करते याकडे त्यांनी बोट दाखवले आहे. अशा प्रकारच्या संशोधनांतून देश आणि देशभाषा यांच्यात अध्याहृत समजले जाणारे जे नाते असते, त्याची आणि एकंदरीतच भाषिक राष्ट्रवादाची ऐतिहासिकता तपासण्याचा त्यांचा मनोदय आहे, आणि तो त्यांच्या आगामी पुस्तकाच्या रूपाने आपल्याला लवकरच वाचायला मिळणार आहे. या पुस्तकात वसाहतपूर्व काळातल्या लेखनविश्वातल्या घडामोडी, त्यांचे वासाहतिक काळात बदलत जाणारे स्वरूप, छापण्याच्या कलेचा पारंपरिक लेखनविचार आणि संपर्कसंस्कृतीवर झालेला परिणाम यांच्या अभ्यासाबरोबरच विसाव्या शतकात एक ‘देशी’ भाषा म्हणून मराठीची घडलेली ओळख, सामाजिक ताण्याबाण्यांतून त्या ओळखीवर झालेले परिणाम, देशी भाषिक व्यवहाराच्या धुरिणत्वासाठी झालेले सामाजिक वाद आणि संघर्ष यांच्यापासून अगदी साठोत्तरी काळात देशीवाद कसा घडत गेला आणि त्याचे प्रादेशिक अस्मिता, शहरी-निमशहरी-ग्रामीण समाजातील भाषिक आस्था आणि विचारविश्व यांच्यावर कसे परिणाम होत गेले याचा विस्तृत आढावा घेण्याचा त्यांचा मनोदय आहे.

महाराष्ट्रातलय प्रचलित इतिहास-विचारविश्वात डॉ. प्राची देशपांडे यांचे वेगळेपण उठून दिसते आणि त्याचे मुख्य कारण हे आहे की, त्या त्यांच्या अभ्यासातून इतिहास-प्रक्रियेबद्दल नवनवीन प्रकारे प्रश्न विचारत असतात. साधने वाचणे आणि त्यांच्या अस्सलपणाची चर्चा करणे, त्यातून सत्य काय होते ते शोधणे, ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती ‘नक्की कशा होत्या’ याबाबत उहापोह करणे यावर पारंपरिक महाराष्ट्रीय ऐतिहासिक विचारविश्वाचा भर राहिलेला आहे. खरे म्हणजे ‘साधने गोळा करून ती प्रसिद्ध करणे आणि त्यांच्यातून तपशिलांची जंत्री उभी करणे म्हणजे इतिहासलेखन नाही’, असा इशारा वा. सी. बेंद्रे यांनी १९२५ सालीच लिहिलेल्या ‘साधन चिकित्सा’ या पुस्तकात दिला आहे. प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे व्यवहार सोडून उर्वरित पुराव्यांच्या भांडाराची मराठीतल्या इतिहासाभ्यास परंपरेने अनेकदा ‘तेलातुपाची पत्रे’ यासारख्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली! त्याचाच परिणाम म्हणजे आजही महाराष्ट्राच्या उत्तर-मध्ययुगीन आणि आधुनिक-पूर्व काळातील अनेक सामाजिक प्रक्रियांचा इतिहास अज्ञात राहिलेला आहे. प्राची देशपांडे यांनी हा मार्ग चोखाळला नाही. त्यांची दृष्टी सतत इतिहासाचा अन्वय सामाजिक प्रक्रियांचा मथितक्रम म्हणून लावण्यात व्यग्र राहिलेली आहे. त्यामुळेच त्या एकाच वेळी सूक्ष्मगामी आणि विस्तृतकाक्षी असलेले संशोधन सादर करू शकतात, हे त्यांच्या इतिहाससाधनेचे मुख्य मर्म आहे.

---***---

हा लेख लिहिण्यासाठी वापरलेल्या डॉ. प्राची देशपांडे यांच्या संशोधनपर लेखनाची सूची -

Creative Pasts: historical memory and identity in western India, 1700-1960
Columbia University Press, 2007

The Making of an Indian Nationalist Archive: Lakshmibai, Jhansi, and 1857, The Journal of Asian Studies, Jan 1, 2008

माझा प्रवास, व आधुनिक भारतीय इतिहासाची कूळकथा - इतिहास लेखन मीमांसा: निवडक समाज प्रबोधन पत्रिका, खंड १, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१०

‘हिंदू’ची इतिहासकल्पना: एक चिकित्सा - ‘मुक्त शब्द’ (मासिक), जून २०१४

Scripting the Cultural History of Language: Modi in the Colonial Archive - in Partha Chatterjee, Tapati Guha-Thakurta and Bodhisattva Kar, eds. New Cultural Histories of India: Materiality and Practices, OUP, 2014

कारकून, दफ्तर आणि कागदपत्रे: अभिलेखागाराच्या इतिहासाकडे - समाज प्रबोधन पत्रिका, वर्ष ५३, क्रमांक २११, जुलै-सप्टेंबर २०१५

"लेखनकल्पतरु" - बदलत्या चिटणिसी पद्धतींचा कानोसा - ‘अक्षर पुस्तके’ सदर, आपले वाङ्मयवृत्त (मासिक), डिसेंबर २०१५

Shuddhalekhan: Orthography, Community and the Marathi Public Sphere - EPW Economic & Political Weekly, Vol. LI, no 6, February 6, 2016

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

लेखाबद्दल भांडारे सरांचे आभार.
एकदाच थोडीशी भेट झालेल्या डॉ देशपांडे एवढया थोर संशोधक आहेत याची त्यांच्याशी बोलताना जाणीव नव्हती.
भारताचे काही विषयातील 'नोबेल' समजले जाणारे इन्फोसिस अवॉर्ड त्यांना मिळाल्यावर थोडा अंदाज आला होता.
ही ओळख करून दिल्यामुळे जाणीव झाली याबद्दल भांडारे सरांचे आभार.
नमः.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय उत्तम लेख आहे. शैलेनचे आभार.... आणि पुन्हा एकदा प्राचीचं अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर लिखाण! आता शैलेन सरांच्या मराठी पुस्तकाची वाट पाहतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान ओळख करून दिली आहे. डॉ. देशपांडे यांचे अभिनंदन.
( डॉ. देशपांडे यांच्या 'ऐसी अक्षरे'वरच्या लेखनाची लिंक प्रतिसादात देता येईल का? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डॉ. देशपांडे यांच्या 'ऐसी अक्षरे'वरच्या लेखनाची लिंक प्रतिसादात देता येईल का?

ऐसीवरील लेखन इथे सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !