IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)

(भाग १)

पुरुषांचा सिनेमा?

‘बायकांचा सिनेमा’ असा एक पोटविभाग केल्यामुळे आपोआप ‘पुरुषांचा सिनेमा’ असलं काही का असू नये, असा प्रश्न मनात आला. थोडा वेळ वाटलं, या पुरुषप्रधान समाजात गोष्टी पुरुषांच्या असण्याला इलाज नाही. आपल्या पुराणातल्या सगळ्या गोष्टी राजे, राजपुत्र यांच्याभोवती फिरतात; तर आपण म्हणतो का, की पुराणं सरंजामी आहेत, पुराणं लिहिणाऱ्यांना सामान्यजनांविषयी जराही आपुलकी नाही?
पण नाही, समाजाच्या दोऱ्या पुरुषांच्या हाती असूनही ‘पुरुषांचा सिनेमा’ असतो! उदाहरणार्थ, इफ्फीचं उद्‌घाटन ‘अनदर राउंड’ या चित्रपटाने झालं; तोच पुरुषांचा चित्रपट आहे!

Another Round (2020)

चार मित्र असतात. (पुरुषीपणाला इथूनच सुरुवात. अधिक खोलात जाण्याची ही जागा नव्हे; पण अशा प्रकारची आत्मलोपी मैत्री पुरुषांच्यात असण्याची शक्यता.) एकाच शाळेत शिकवत असतात. तारुण्य केव्हाच ओलांडून उताराला लागलेले. जगण्यातला जोम हरवलेले. काहीसे कंटाळलेले. संसाराला, नोकरीला, रोज तेच ते करण्याला. त्यातल्या एकाच्या वाचनात येतं, की मानवाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण वाजवीपेक्षा कमी असतं. वेगळ्या शब्दांत म्हणायचं, तर रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण वाढवलं आणि ते ‘नॉर्मल’ला आणून त्याच पातळीवर राहील, अशी दक्षता घेतली तर जगण्याचा स्तर उंचावेल. यासाठी काय करायला लागेल? रोज दिवसभर थोडी थोडी दारू पीत रहावं लागेल. हा प्रयोग करायला ते सिद्ध होतात आणि मग काय होतं, याची कथा म्हणजे हा चित्रपट.

विषय फार कठीण आहे. ‘दारू प्यावी,’ किंवा ‘दारू पिऊ नये,’ यापैकी एक संदेश देणारा, तात्पर्य काढणारा, उपदेशात्मक चित्रपट होऊ द्यायचा नाही, ही तारेवरची कसरत आहे. या चित्रपटाला (दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग) ती बऱ्यापैकी जमली आहे. चार मित्रांच्या जगण्याचे तपशील मांडतानाच खूप वेळ गेला असता; ते एकाला थोडं मध्यवर्ती बनवून टाळलं आहे. चौघेही ‘मध्यममार्गी’ आहेत. कोणाचंच जगणं जगावेगळं नाही. पण पोटात कायम दारू असण्याचा परिणाम सगळ्यांवर सारखा होत नाही. सुरुवातीला अर्थातच ते उत्तेजित होतात; दारूमुळे संकोच कमी होतो, प्रयोगशीलता वाढते, बेदरकारी वाढते. यातली सर्वात थोर गोष्ट म्हणजे जे होतं, ते प्रेक्षकाच्या साक्षीने होतं. नुसतं कोणाच्या तरी तोंडून सांगितलं जात नाही. साहित्यापासून चित्रपटापर्यंत कृतीतून, घटनांमधून मुद्दा विशद करण्याचा मार्ग फारच कमी वेळा अवलंबला जातो. कारण प्रतिपादनाला मानवी व्यक्तिमत्वाचं, मानवी संबंधांचं रूप देणं बहुतेकांना झेपत नाही.

दारूचा अंमल राहू देण्यातून मिळालेल्या यशामुळे प्रमाण वाढवण्याचं ठरवणे, याला आशयाचं पुढचं पाऊल म्हणायचं की ‘दारू’ नामक नशेविषयी विधान करण्यासाठी शोधलेला सोयीचा रस्ता? तर, हे मित्र प्रमाण वाढवतात आणि परिणामांना सामोरे जातात. कुटुंब, विद्यार्थी, सहकारी आणि समाज, सगळीकडे सुधारू लागलेली स्थिती वेगाने बिघडते. तिघांना याचं भान येतं; पण एकाची वाताहात होते. शेवट पुन्हा आशावादी असला, तरी दारू चांगली की वाईट, असलं कसलंही ढोबळ विधान चित्रपट करत नाही. (यामुळे काही प्रेक्षक गोंधळतात, हिरमुसतात.) शेवटी जाणवतं की ‘दारू पिणे’ हा मुळी चित्रपटाचा विषय नव्हताच! पुरुषी ‘मेनोपॉज’, निरुत्साहामुळे, निराश वर्तनामुळे आपण जगाला दुरावतो आणि जग आपल्या गैरहजेरीशी जुळवून घेण्याचे मार्ग शोधतं; पण नवीन रस्ता शोधायचा, तर पुढेच जाणं भाग असतं, वगैरे ‘ज्ञान’ त्या मित्रांना होतं, अर्थात काही किंमत चुकवून.

चार मित्रांच्यातलं मुख्य पात्र असणाऱ्या मॅड्स मिकेल्सनचा संयमित अभिनय फार चांगला आहे. विद्यार्थी त्याला गिनत नसतात, तेव्हाचं त्याचं वागणं आणि नंतर बदललेलं वागणं, यातला फरक सूक्ष्म आहे; पण तो विद्यार्थ्यांनाच काय, प्रेक्षकालासुद्धा जाणवतो! इतर सर्वांची कामं चांगलीच झालीत. एकूण फिल्म फेस्टिवलची सुरुवात इतक्या आशादायी, समाधानकारक प्रदर्शनाने होणे, हे दुर्लभ!

स्वीटी, यू वोण्ट बिलीव इट हासुद्धा ‘पुरुषांचा’ चित्रपट. आणि खास फेस्टिवलचा चित्रपट. याला ‘हिंसा-विनोद’ प्रकारचा चित्रपट म्हणता येईल. भरपूर विनोद आणि भरपूर हिंसा. विनोद हिंसक नाही आणि हिंसेला विनोदी म्हणवत नाही.

यात तीन मित्र फिशिंगला जातात, त्याची गोष्ट आहे. सुरुवातीलाच चित्रपट वेग धरतो. एक नवरा आणि त्याची दिवस भरत आलेली गरोदर बायको मॉलमध्ये खरेदी करत आहेत. दोघांमध्ये अखंड संभाषण चालू आहे आणि त्या संभाषणाचं स्वरूप दुसऱ्याला जास्तीत जास्त मनस्ताप देणारं आहे. दोघांपैकी कोणीही दुसऱ्याचा शब्द खाली पडू देत नाही. दोघांची हजरजबाबीपणाची, लागट बोलण्याची क्षमता अफाट आहे. दुसरा मित्र पोलीसवाला आहे पण शूर नाही. तिसरा सोबत माणसांच्या आकाराच्या सेक्स डॉल्स घेऊन आलेला आहे (त्या सगळ्या चोरीला जातात; फक्त एक पुरुषी लिंग मागे रहातं). याला भविष्याची पूर्वकल्पना देण्याचा सोस आहे.

Sweetie, You Won't Believe It

बायकोला फसवून तो मित्रांबरोबर जातो आणि त्याच वेळी साधारण त्याच ठिकाणी तीन गुंड कर्जवसुलीसाठी येतात. वाटेत एका गुंडाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे एक कुत्रा मरतो आणि कुत्र्याचा मालक या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पेटून उठतो. तिघे मित्र एका ठिकाणी काहीतरी खरेदी करायला थबकतात, तिथला एक जण (हा हातातली दुधाची बाटली अशी हलवत रहातो की तो हस्तमैथुन करतो आहे, असंच पाठीकडून पहाता वाटावं) आणि त्याची मुलगी यांची नजर त्यांच्यावर पडते. कुत्र्याचा मालक प्रचंड ताकदीचा, कराटे एक्स्पर्ट असतो. महाक्रूर असतो. त्या मुलीचा बाप मुलीला मूल मिळवून देणाऱ्या पुरुषाच्या शोधाने पछाडलेला असतो. आणखी एक घोडासुद्धा यात सामील आहे.

आणि मग प्रचंड हिंसेचा महापूर येतो. रक्तपात होतो, आगी लागतात, बंदुकी उडतात, चाकू-तलवारी चालतात. एक कान फाटतो, एकाच्या तळहातात दाभण घुसते, एकाची पोटरी फाटते. कुणाचा जबडा हाताने फाडला जातो. आणि ह्या सर्व घटना विनोदी असतात. अर्थात सर्व प्रकार वेगवान आहे. घटनांना सर्रियल रूप आहे. जिवावर बेतत असताना मित्र जोरजोरात वाद घालतात. अतिरेकी वास्तव; पण फँटसी नाही. हा फार्सचा प्लॉट आहे. मरणारे सगळे दुष्ट असतात, अशी स्वत:ची समजूत काढण्याची मुभा प्रेक्षकाला ठेवण्यात आली आहे.

अशा चित्रपटातली हिंसा मान्य केली, की मग त्याचा आस्वाद घेण्यात अडचण नाही. भारतात अगदी अलीकडेपर्यंत ‘मजेदार हिंसा’ नावाचा प्रकार चित्रपटात, कुठल्याच कलेत नव्हता. आता येऊ लागला आहे. आधी आपल्या (हिंदी) चित्रपटात खलनायक मरता मरत नाही. तो रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला चोप देताना नायक थकत नाही. नैतिक समर्थन असलेल्या हिंसेचा मनमुराद आस्वाद घेणाऱ्या भारतीय प्रेक्षकाला हा नवा प्रकार निश्चित पसंत पडेल. रघुवीर यादवसारख्या विनोदासाठी घेतलेल्या कलाकाराला शेवटी अमाप मार पडण्याची, त्यात त्याची हाडं मोडण्याची उदाहरणं आहेतच.

तरी स्वीटी, यू वोण्ट बिलीव इट हा चित्रपट सफाईदार आहे, हे मान्य करायला हवं. त्याची पटकथा गोळीबंद आहे. अभिनयात कोणी कमी पडत नाही. कॅमेरा, एडिटिंग, कोणत्याही तांत्रिक अंगात त्रुटी नाही. कझाकस्तानसारख्या देशातून इतका पक्क्या बांधणीचा चित्रपट आला आहे. चित्रपटाची भाषा रशियन-कझाक आहे. बहुधा कझाकस्तानातले शहरी लोक रशियन, तर ‘गावठी’ लोक कझाकी भाषा बोलत असावेत, असं असेल का?

Sweetie, You Won't Believe It_trailer (eng sub) from Festagent on Vimeo.

आल्फा हे जर चित्रपटाच्या नायकाचं नाव असेल, तर चित्रपटाला ‘पुरुषी’ म्हणण्याला इलाज नाही, असं मला वाटतं.

हा बांगलादेशी चित्रपट. याला कथानक आहे, असं मी म्हणणार नाही. काही प्रसंगांच्या साखळीतून नायकाचं व्यक्तिचित्र उभं केलं जातं. हा कलाकार आहे, म्हणजे सिनेमासाठी पोस्टर्स बनवतो. त्याला त्याचे परिचित ‘आर्टिस्ट’ याच नावाने हाक मारतात. तो ढाका शहराजवळ एका विस्तीर्ण तळ्यात बांबूंवर उभ्या असलेल्या घरात रहातो. तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. कलावंत असल्याने तो स्वत:च्या जगात हरवलेल्या मन:स्थितीत रहात असतो. त्याच्या घराजवळ झोपडपट्टी आहे. तिथले सगळे रहिवासी त्याला ओळखतात, त्याची विचारपूस करतात. तिथली एका शादीशुदा तरुण बाई त्याला जेवण आणून देते. तिला त्याच्यापासून दिवस गेलेत; पण ते चित्रपटाचं कथानक सुरू होण्याच्या अगोदर. चित्रपटाच्या कथनात तो तिच्याशी प्रेमाने सलगी करत नाही. झोपडपट्टीतल्या एका काली माँ नामक तृतीयपंथीयाचं गाढव हा आर्टिस्ट त्याची चित्रं नेण्यासाठी वापरत असतो. त्या तृतीयपंथीयाने काही अनाथ मुलं सांभाळलेली असतात. तिथे एक आंधळा दुकानदार असतो, जो नुसत्या चाहुलीवरून माणसं तर ओळखतोच; त्यांची मन:स्थितीसुद्धा जोखतो. वगैरे.
एकदा आर्टिस्टच्या घराखाली कापडात घट्ट गुंडाळलेलं प्रेत वहात वहात येऊन थडकतं. आर्टिस्ट त्याला घालवून देण्याचा प्रयत्न करतो; पण प्रेत पुन्हा पुन्हा येत रहातं. मग तो त्याच्याशी बोलतो. त्याच्या खिशात मिळालेल्या कागदावरून त्याचा थांगपत्ता लावतो. पोलीस येऊन प्रेत घेऊन जातात आणि बेवारशी म्हणून त्याची विल्हेवाट लावणार असतात; पण आर्टिस्ट प्रेत पळवतो आणि त्याच्याशी दोन गोष्टी बोलून त्याला पाण्यात दूर पाठवून देतो.

एका मनाने चांगल्या कलावंताची ओळख त्याच्या दिनक्रमातून, इतरांशी होणाऱ्या संबंधातून करून देणे, हा चित्रपटाचा वरवरचा उद्देश असावा. पण तसं करताना झोपडपट्टीतल्या लोकांची मानसिकता, न राहणाऱ्यांची मानसिकता, ढाका शहराचं दर्शन, पोलिस, अशा तपशिलांशी आपला परिचय होतो. तिथली गरिबी दिसते. गरीब लोकांमधला बंधुभाव दिसतो. बांगलादेश हा मुसलमान देश; पण चित्रपटात धर्म ठळक नाही. उगाच मागे अजान ऐकू येते, तेवढंच. बांगलादेशातल्या सर्वसाधारण वातावरणाची ही झलक मानायला हरकत नाही.

पण एक तक्रार करावीशी वाटते. बहुतेक भारतीय चित्रपटांप्रमाणे आल्फामध्येसुद्धा तरलतेचा अभाव आहे. जे सांगायचंय, ते लोक बोलून दाखवतात. आणि ते सांगणंदेखील तरल नाही. याचा संबंध इथल्या समाजाच्या संवेदनशीलतेशी लावण्याचा मोह जरूर होतो; पण त्याअगोदर इथल्या चित्रभाषेचा, कलाभाषेचा चांगला धांडोळा घ्यावा लागेल. या समाजात, संस्कृतीत तरलता नव्हती, असं तर म्हणता येत नाही. मग इथे ‘कला’ हा विषय अभिजनांपुरता मर्यादित होता का? संगीत, चित्र, चित्रपट यांसारख्या कला जशा बहुजनांपर्यंत पोचत गेल्या, तशी तरलता लोपली का? कलेला अभिजनांचा आश्रय होता तोपर्यंत कलेचा ‘विकास’ विशिष्ट दिशेने होत राहिला आणि अभिजनांपुरती मर्यादित अशी एक कलाभाषा बनली, असं काही झालं का?

असो. विषय गहन आहे.

डेथ ऑफ सिनेमा अँड माय फादर टू हा चित्रपट डॉक्युमेंटरीच्या अंगाने जातो. काही दिवसांचा सोबती उरलेल्या आपल्या बापाच्या आयुष्यातले शेवटचे क्षण जतन करण्यासाठी एकजण तो काळ शूट करून ठेवू बघतो आणि त्यासाठी चक्क एका नटाला कामाला लावतो. एका लहान मुलाला हाताशी धरतो. पण त्याचा स्वत:चा बाप काही त्याला नीट सहकार्य करत नाही. खरा बाप, अभिनेता, खरे क्षण, रचलेले सीन्स यांची सरमिसळ होते. बापाच्या जगण्यातला प्रत्येकच क्षण मुलाला महत्त्वाचा वाटत असला; तरी प्रेक्षकाला तो तितकाच धरून ठेवेल, असं नाही. (खुद्द बापालाच ही कल्पना भावत नाही!) एक दिग्दर्शक बापाच्या शेवटच्या काळाची डॉक्युमेंटरी कशी बनवतो, याचा हा चित्रपट काही वेळा या विषयाच्या चमत्कारिकपणामुळे वेगळा, इंटरेस्टिंग वाटतो; पण एकूण परिणाम कंटाळा येण्याचाच होतो. मरणार असलेल्या बापाला मृत्यूने भेडसावण्याऐवजी दिग्दर्शक मुलाचाच धीर सुटत चाललेला मात्र जाणवतो. पण खरं आणि अभिनीत यांच्यातला तोल सांभाळल्यासारखा होत नाही. त्यामुळे चित्रपट एन्जॉय करता येत नाही.

पोलीस दल हे पुरुषांचं राज्य होय, असं आता म्हणता येणार नाही. पण अनआयडेंटिफाइड हा चित्रपटसुद्धा ‘पुरुषी’ म्हणावा लागेल. पोलिसांचा राकटपणा, अरेरावी ही पुरुषी गुणवैशिष्ट्यं आहेत. बायकांना काही बाबतीत गृहीत धरण्याची वृत्ती ही तर पुरुषीच. पोलिसांत ती कार्यक्षमतेचा भाग ठरू शकते.

Unidentified (2020) Bogdan George Apetri

या चित्रपटाचा ‘नायक’ हसत नाही. एका न उलगडलेल्या गुन्ह्याच्या तो हात धुवून मागे लागला आहे. त्याचा बॉस त्याला निक्षून सांगतो की त्या गुन्ह्याचा तपास तुझ्याकडे नाही, तू त्यात नाक खुपसू नकोस; पण तो ऐकत नाही. फाइली पळवतो, कागदांच्या चोरून कॉप्या काढतो, पण त्या गुन्ह्याचा पाठलाग सोडत नाही.

ॲपल्स’ या चित्रपटात गोष्ट जरी नायकाबरोबर फिरली, तरी नायकाच्या मनाचा अंदाज प्रेक्षकाला ‘बाहेरून’, घ्यावा लागतो, कॅमेरा, निवेदन आपल्याला काही सांगत नाही, असं म्हटलं होतं. या, अनआयडेंटिफाइडमध्येदेखील असंच होतं. मात्र, या दोन प्रकारांमध्ये फरक आहे. पहिल्या वेळी हे वैशिष्ट्य लवकर ध्यानात येतं. हे ‘तंत्र’ चित्रपटाच्या आशयाचा भाग असावा, असं वाटून प्रेक्षक त्याप्रमाणे आस्वाद घेऊ लागतो. त्या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना स्मृतिभ्रंशाची असल्याने (आणि नायक विसरला तरी त्याचं घर प्रेक्षकाने पाहिलेलं असल्याने) नायकाच्या व्यक्तिमत्वाला एक गूढपणा मिळतो. स्मृतीच नसलेल्या, व्यक्तिमत्व हरवलेल्या माणसाचं हे दर्शन आहे, या माहितीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षक निवेदकाचा तटस्थपणा स्वीकारतो. मग तो तटस्थपणा ‘खास’ही वाटू लागतो. अनआयडेंटिफाइडमध्ये तसं होत नाही. इथे चित्रपट सुरू होतो, तो अगदी ‘प्रायोगिक’ थाटात. गवत की रान की जंगल अशा कशाचं तरी पडदाभर दर्शन देत कॅमेरा पुढे पुढे सरकत रहातो आणि शेवटी उंच सरकून कड्यावरून दिसणारं एक गाव दाखवतो. पुढे एकेक सीन संपला की पुढचा सुरू होण्याअगोदर या गावाची विहंगम दृश्यं – बर्ड्स आय व्ह्यू – दिसत रहातात. मागे ताण निर्माण करणारं संगीत वाजत रहातं. याचं प्रयोजन नीटसं ध्यानात येत नाही. तरी प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याची खोड स्वस्थ बसू देत नाही आणि असं ठरवायला होतं की गावातल्या दोन हॉटेलांना लागलेल्या आगीविषयी तपास या इन्स्पेक्टरला करायचा आहे, म्हणून सस्पेन्स निर्माण करण्याचा हा एक वेगळा प्रयत्न असावा. तो तितका भावतही नाही.

पुढे असे न भावणारे प्रसंग समोर येत रहातात. म्हणजे, इन्स्पेक्टर एका टेकडीवरून तिसऱ्या हॉटेलवर नजर ठेवताना गाड्यांच्या येण्याजाण्याच्या नोंदी करू लागतो. त्याचा काहीच खुलासा होत नाही. वाटतं, नायकाच्या कामसूपणाला, बारीक तपशिलांना निरखून सुगावे शोधण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्याचा हा कच्चा दिग्दर्शकीय प्रकार असावा. नायक जेव्हा त्याच्या घरात असतो, तेव्हा घर बऱ्यापैकी अस्ताव्यस्त दिसतं. हा खातो काय, झोपतो कधी हे प्रश्न अधांतरी राहिल्यागत होतात. त्याचं वर्तनच समजत नाही. एका जिप्सीशी तो जसं वागतो, ते पटत नाही; पण ‘सुव्यवस्था’ सांभाळणाऱ्याला ह्मूमन राइट्सची – मानवी अधिकारांची – पत्रास फार बाळगता येत नाही, असं स्वत:ला सांगायला होतं. पुन्हा मनात येतं, गुन्हेगाराच्या मागे लागलेल्या एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची प्रतिमा तयार केली जात असावी! बाकीचे पोलीसवाले कसे ढिसाळ आहेत (भ्रष्टही असावेत) हे दाखवून या गुन्ह्यांमागे काहीतरी राजकारणी किंवा धनाढ्य शक्ती असाव्यात आणि हा नायक त्यांच्याशी पंगा घेत असावा, असा एक धागा मनात तयार होतो.
यातून चित्रपटाबद्दल, दिग्दर्शनाच्या धाटणीबद्दल फार बरं मत होत नाही. पण पुढे चित्रपट भलतंच वळण घेतो आणि अगोदरच्या सगळ्या विसंगतीची बरोबर संगती लागते! चित्रपटाचं नाव कसं नेमकं आहे, हे पटतं.
असा चित्रपट पाहिला, की तो लगेच पुन्हा बघावासा वाटतो. ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ या कादंबरीच्या वाचनात माझं असं झालं होतं. ‘ठीक आहे, तपशिलात चांगली आहे, प्रयत्न कौतुकास्पद आहे,’ असं वाटता वाटता अचानक कादंबरी सणसणीत थप्पड मारते आणि त्यापुढचं सोडून सगळं परत पहिल्यापासून वाचायला भाग पाडते, तसं होतं. क्राइम थ्रिलरमध्ये, सस्पेन्स चित्रपटांमध्ये – किंवा अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांमध्ये – रहस्याची उकल करणारे सुगावे हळूच इथे तिथे सोडून दिलेले असतात, पण दिशाभूल करणाऱ्या बिनमहत्त्वाच्या सुगाव्यांच्या गर्दीत ते निसटून जातात; तसं हे नाही. आपला बघण्याचा कोनच चुकीचा होता, असं होतं. हॉलिवुडचे बहुतेक चित्रपट संपताना सामान्य ठरतात, त्याच्या उलट हा अनुभव.

UNIDENTIFIED Trailer 2020 from PFX on Vimeo.

तर हे इफ्फीतले ‘पुरुषी’ चित्रपट. पुरुषी चित्रपटांच्याबद्दल सर्वसाधारण विधान करता येईल का?

काही निरिक्षणं सुचतात. बाई आणि पुरुष, दोघांच्यात पझेसिवनेस दिसतो. पण त्यात फरकही दिसतो. अनदर राउंडमधला पुरुष आपल्या बायकोने तिच्या समाधानासाठी दुसरा पुरुष शोधला आहे, हे कळून आक्रस्ताळा बनतो आणि त्या आक्रस्ताळेपणातून तोडफोड करतो. पण त्यामागे त्याच्या नैराश्याचा दबाव असतो. स्वीटी यू वोण्ट बिलीव इटमध्ये ‘अंगठी कुठे गेली तुझी?’ असा जाब नवऱ्याला विचारणारी बायको त्याच्यावर हक्कच सांगत असते; पण गृहीत धरलेला सामाजिक हक्क डळमळीत होण्याची आशंका त्यामागे असते. स्वातंत्र्याची चाहूल, आत्मनिर्भरतेची जाणीव, हे विषय बायकांचेच; पुरुष या गोष्टी गृहीत धरतो. उलट, हे जग आपणच चालवतो, या आत्मविश्वासातून पुरुष बाईला बऱ्यापैकी गृहीत धरतो. पुरुषाच्या मनसुब्यांच्या आड दुसरा पुरुष येतो; बाईच्या मनासारखं न होण्यालासुद्धा पुरुषच कारणीभूत ठरतो. या पुरुषांच्या जगात बाईला अंग चोरून रहावं लागतं, पुरुषाशी जुळवून घ्यावं लागतं; जी समस्या पुरुषांच्या बाबतीत उद्‌भवतच नाही. एकाकीपणा हा जेवढा पुरुषी प्रॉब्लेम आहे, तेवढा बायकांचा नाही!
यातल्या प्रत्येक विधानाला आक्षेप घेता येईल. तर तसा अवश्य घ्यावा आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत न्याव्यात.

इफ्फीत पुरुष-पुरुष संबंधांवर एक चित्रपट होता; पण तो मी पाहिला नाही (पहावासा वाटला नाही!) हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की समलिंगी आकर्षण, समलिंगी संबंध आणि त्यातून उलगडणारे मानवी संबंधांविषयीचे धागेदोरे, हा महत्त्वाचा असला तरी वेगळा विषय आहे. तिथे बाई-बाई संबंध आणि पुरुष-परुष संबंध यांना बाजूबाजूला ठेवल्यास काय सापडतं, याची वेगळी मांडणी करावी लागेल.

(क्रमशः)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet