“अंतर्यामी खजुराहो”ची मालिका येऊ दे…

गोपाळ आजगावकर यांची “अंतर्यामी खजुराहो” ही कादंबरी आपणाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. जे आज वयाच्या साठी, सत्तरीत आहेत त्यांनाही पुनर्नुभवाचा आनंद देईल व ज्यांना हा काळ अनुभवता आलेला नाही त्यांना आश्चर्य वाटेल की फक्त काही वर्षापूर्वी आपल्या इथे अशा प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक वास्तव होते! किती वेगाने समाज बदलत आहे!! जे काल होते ते लोप होतेय व काहीतरी नवेच उदयाला येत आहे!!! समाजात ही अशी स्थित्यंतरे इतक्या तडकाफडकी का होत आहेत? ती होत असताना या बदलांचा एकंदरीत परिणाम समाजावर का व कसा होत आहे, समाजातील वेगवेगळे घटक याला कसे सामोरे जात आहेत, त्यांचे आपापसातील संबंध कोणते स्वरूप धारण करत आहेत, त्या समाजातील एकेक व्यक्ती या बदलांना कसा प्रतिसाद देत आहे या सर्वाचे बारीकसारीक वर्णन या कादंबरीत आले आहे. त्या अर्थाने ही कादंबरी या कालखंडाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे असे म्हणता येईल.

Antaryami Khajuraho - Gopal Ajgaonkar

कादंबरीचा नायक दासू हा कवीमनाचा, सामाजिक जाणिवेचा, राजकारणाच्या मुळाशी जाणारा, नातेसंबंधांतील हळूवारपणा जपणारा एक अस्वस्थ तरुण आहे. सर्व कथानक त्याच्याभोवती फिरते पण खरा नायक या कादंबरीत चित्रित झालेला सत्तरीचा कालखंड आहे. या कालखंडाची गडद छाया संपूर्ण कादंबरीभर जाणवत राहते. मुंबईतील त्यावेळच्या चाळीतील बकाल वास्तव व जोडीला अधोविश्वातील सर्वसामान्यांच्या सहसा अनुभवाला न येणारा परिणामकारक अमानवीय परिसर यांच्या धाग्यादोऱ्यांनी या कादंबरीचा पट विणलेला आहे. म्हणून ही कादंबरी फक्त एका अस्वस्थ नायकाची कथा न राहता ती समाजाच्या व्यापक पटाला कवेत घेणारी चिरस्मरणीय कादंबरी झाली आहे.

प्रा. हरिश्चंद्र थोरात या महत्त्वाच्या समीक्षकाने ब्लर्बमध्ये कादंबरीची प्रशंसा करताना म्हटले आहे की “गोपाळ आजगांवकर यांच्या या कादंबरीमधून सत्तरीच्या दशकातील महानगरीय सामाजिक-सांस्कृतिक विश्व प्रत्ययकारक रीतीने उभे राहते.” या वातावरणाचा कादंबरीचा नायक दासूवर का व कसा परिणाम होतो याचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी थोडक्यात पण अतिशय मार्मिक व नेमके वर्णन केले आहे.

कादंबरी वाचताना असं वाटत राहतं की कादंबरी अश्लीलतेकडे झुकत आहे की काय! स्त्रीपुरुष संबंधांतील सर्व लैंगिक शब्द, स्त्री-पुरुष जननेंद्रियांना असणारे विविध शब्द, त्या संबंधातील वाक्प्रचार, म्हणी, नावे, उपनावे, गुप्त संकेत यांचा मुक्त वापर केल्यामुळे कादंबरी अश्लील आहे की काय असा सामान्य वाचकाचा समज होऊ शकतो, पण ते तेवढ्यापुरतेच आहे. कादंबरी दासू या नायकाच्या रूपाने त्या काळातील तरुणांची झालेली लैंगिक कुंठावस्था नेमक्या शब्दांत पकडण्यात यशस्वी झाली आहे. आणि याकरता शब्दांचे सोवळे पाळण्यात काही अर्थ नव्हता व अशा धगधगत्या, स्फोटक आशयाला शब्दात पकडायचे तर तेवढीच स्फोटक, धगधगती शब्दकळा वापरणे आवश्यक होते.

कादंबरीत जी नेमकी वर्णने आली आहेत, आशयाला अनुरूप अशी ताकदीची शब्दकळा लेखकाच्या लेखणीतून (की कीबोर्डातून?) कशी प्रमाणबध्दतेने झरली आहे, त्यामुळे आशयाला कशी खोली प्राप्त होऊन कादंबरीला कशी वेगळी उंची प्राप्त होते याची वाटेल तेवढी उदाहरणे देता येतील. पण ते तितकेसे महत्त्वाचे नाही. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे ही कादंबरी एक ठराविक कालखंड त्याच्या सर्व वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ताण्याबाण्यासह अतिशय बारकाईने व बारकाव्याने उलगडत नेते व वाचकाला त्याशी साक्षात सन्मुख करते. संपूर्ण कादंबरी अनेकानेक घटना, प्रसंग, व्यक्ती, त्यांच्यातील नातेसंबंध व याला पार्श्वभूमी असलेला कवितेच्या रिमझिमसारखा निसर्ग याने संपृक्त आहे. तरीही मोह आवरत नाही म्हणून काव्यात्मक चित्रमय शैलीतील एक परिच्छेद उद्धृत करतो.

“दासू पारावर गेला. बाहेर आलेल्या मुळावर डोकं टेकून तो पाठीवर झोपला. पाठीच्या कण्याला सुखद असा कडक स्पर्श होत होता. वर पाना-फांद्यामधून आकाश दिसत होतं. आकाशात काळे-पांढरे वेगवेगळ्या आकारांचे ढग संथपणे जात होते. ढगापलीकडचं आकाश तलम निळसर दिसत होतं. आता साडेसात होऊन गेल्यामुळे घामट तलखी कमी झाली होती. एका फांदीवर अनेक कावळे कावकाव करीत बसत होते, उडत होते, परत बसत होते. दासूचं मन भरून आल्यासारखं झालं. सालं या आकाशात विरून जावं. अशरीर व्हावं. शांत, निवांत असं. मदन एडक्याचीच नव्हे तर कुठलीच इच्छावासना नसावी किंवा या चिखलातच लोळायचं असेल तर लोळता लोळता त्यातून सुंदर, चैतन्यमय, दीर्घकाल टिकणारं असं निर्माण करता यावं.”

तर काही वाक्ये,

“तो स्वत:ला अत्यंत शहाणा समजत असल्यामुळे अत्यंत फालतू गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्यासारख्या अत्यंत हळू आवाजात अत्यंत सावकाशपणे बोलत असे.”,

“पोरी साल्या अशाच असतात. स्वत:कडे खूप कमीपणा घेऊन पुरुषावर वर्चस्व गाजवतात.”,

“आता खोली कामसन्मुख झालीये असं त्याला वाटलं.”,

“बहुतेक वेळा दु:खी माणसाची कहाणी ऐकून घेणं एवढाच दिलासा आपण त्याला देऊ शकतो याची तीव्र जाणीव त्याला होत होती.”

तर असे परिच्छेद व वाक्ये यांची पखरण कादंबरीच्या पानोपानी आहे. त्यामुळेच कादंबरी कितीही वेळा वाचली तरी ती नेहमी तेवढीच जिवंत, रसरशीत वाटते व त्या कालखंडाची प्रचंड अस्वस्थकारक, घालमेल उडवणारी सफर घडवून आणते.

या कादंबरीचे मूल्यमापन करताना यातील फक्त कथानक विचारात न घेता या कादंबरीचा एकूण आवाका लक्षात घ्यायला हवा. यात आदिम प्रेरणांचा उत्स्फूर्त आविष्कार आहे, स्खलनातून सावरताना मनाला येणारा ताजेपणा आहे, लैंगिक भावनांचा नैसर्गिक निचरा आहे, दैनंदिन सामान्य मानवी जीवनातील घुसमट आहे, संतांचा व त्यांच्या साहित्याचा समागम आहे, मिथककथांची निर्मिती आहे, समाजाला आधारभूत ठरणाऱ्या वैचारिक व्यूहांचा मूलगामी वेध आहे, अस्मितांच्या बाजारातील फोलपणा आहे, लादलेल्या पारंपरिक व्यापात गुरफटून प्रागतिक दिशा हरवलेल्या समाजात दुरावा न मानता राहताना होणारी उलघाल आहे, समाजातील विविध घटकांचा त्यांच्या सर्व गुणदोषांसह आपुलकीने केलेला स्वीकार आहे, कमकुवत घटकांची विनाकारण होणारी फरपट पाहत राहण्याची असहायता आहे. थोडक्यात सत्तरीच्या दशकातील समाजाचे सर्वार्थाने उमटलेले जिवंत प्रतिबिंब कादंबरीच्या पानोपानी आहे.

सत्तरीच्या दशकातील कालखंड ज्या पध्दतीने या कादंबरीत उभा करून समाजात होणाऱ्या स्थित्यंतरांचा लेखाजोखा मांडला आहे, समाजात घडणाऱ्या व्यापक घडामोडींचा आढावा घेत त्या कालखंडालाच खऱ्या नायकाचे रूप ज्या पध्दतीने प्राप्त करून दिले आहे ते पाहता ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानावा लागेल. इथे तुलनेसाठी 'चक्र' (जयवंत दळवी), 'वैतागवाडी' (भाऊ पाध्ये) व 'कोसला' (भालचंद्र नेमाडे) या महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा विचार करता येईल. त्या कादंबऱ्यांत एका मर्यादित वास्तवाचा आलेख मांडण्यात आला आहे. त्यातल्या त्यात 'वैतागवाडी' ही सामाजिक स्थित्यंतराच्या एका टप्प्यावर कनिष्ठ मध्यमवर्गियांचे चित्र उभे करताना दिसते; पण “अंतर्यामी खजुराहो” समग्र समाजालाच एका धाग्यात गुंफताना मराठी कादंबरीलाच एक नवे परिमाण प्राप्त करून देते. इथे श्री. ना. पेंडसे यांच्या 'हत्या' व 'कलंदर' या कादंबरीद्वयीचा व शरच्च्चंद्र मुक्तिबोध यांच्या 'क्षिप्रा’, 'सरहद्द' व 'जन हे वोळतु जेथे' या कादंबरीत्रयीची आठवण येते. या धर्तीवर व सी. पी. स्नो यांच्या इंग्रजीतील ‘Strangers & Brothers’ या कादंबरीमालिकेप्रमाणेच आजगावकरांनी नंतर सतत बदलत जाणाऱ्या सामाजिक वास्तवाला दासू कसा सामोरा जातो, त्याविषयी त्याचे काय आकलन आहे, त्याच्यात काय व कसे बदल होत गेले याची पुन्हापुन्हा मांडणी करण्याची गरज आहे. आपल्या लेखणीच्या बळावर “अंतर्यामी खजुराहो”ची कादंबरीमालिका लिहून महाराष्ट्रातील इतर विषयांचाही कादंबरीमय दस्तावेज तयार करावा; ती मराठी साहित्यात मोलाची भर ठरेल.

शब्द पब्लिकेशनने “अंतर्यामी खजुराहो”ची अतिशय सुबक व देखणी छपाई केली आहे. रियेश पाटील यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाला बोलके करणारे आहे.

- युसुफ शेख
अंतर्यामी खजुराहो
लेखक : गोपाळ आजगावकर
मुखपृष्ठ : रियेश पाटील
प्रकाशक : शब्द प्रकाशन

(संक्षिप्त स्वरूपात हा पुस्तक-परिचय 'महाराष्ट्र टाइम्स' रविवार संवाद पुरवणी, ७ मार्च, २०२१, यात प्रकाशित झाला होता.)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कादंबरीत जी नेमकी वर्णने आली आहेत, आशयाला अनुरूप अशी ताकदीची शब्दकळा लेखकाच्या लेखणीतून (की कीबोर्डातून?) कशी प्रमाणबध्दतेने झरली आहे, त्यामुळे आशयाला कशी खोली प्राप्त होऊन कादंबरीला कशी वेगळी उंची प्राप्त होते याची वाटेल तेवढी उदाहरणे देता येतील.

हं.

काही वाचकांना नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0