पृथ्वीची सैर

//बाळबोध ॲलर्ट सुरु

तरी तुला सांगत होते या वर्षी ब्रह्म, तप किंवा सत्यलोकात व्हेकेशन एन्जॉय करु यात. पण माझं जर तू ऐकलस तर जसं काही परत महाभारतच होणार होतं. आता बसा एका खोलीत. कुठे बाहेर जायला नको अन यायला नको. राधा सात्विक संतापाने बोलत होती. खरं तर द्वारकेचा भला थोरला कारभार, भक्तांचे मनोरथ पुरविणे, अर्जुन-सुदामा-पेंद्या यांच्याबरोबर गोल्फ खेळणे यातून कृष्णाला खरच वेळ मिळत नसे. बऱ्याच कल्पांपासून राधा मागे लागली होती, - जरा मनावर घे, मला वेळ दे. कुठेल्यातरी न अनुभवलेल्या लोकात सैर करुन येउ यात. मस्त व्हेकेशन पॅकेज घेउन , फ्रेश होउन येउ यात. खरं तर दोघं ब्रह्मलोकात गेल्याच वेळी जाउन ब्रह्मदेव-सरस्वतीचा पाहुणचार झोडुनआले होते. तपोलोक रसिक कष्णाच्या विशेष आवडीचा नव्हता कारण तिथे तपस्वी ढुढ्ढाचार्य भेटणार ज्यांचा आणि रसिकतेचा ३६ चा आकडा. त्यामुळे २०२० साली कृष्णाने पृथ्वीलोक निवडला आणि दोघे स्वर्गातून अवनीवरती दाखल झाले. कृष्णाने एक एअरबीएनबी आधीच बुक केलेले होते. पण आल्या आल्या पहातात तो काय जिकडे तिकडे सामसूम .लोकंही मास्क लावुन. एकमेकांत भरपूर म्हणजे दो गज की दूरी ठेउन फिरत होते. हां लोकांची गर्दी क्षीण झालेली असली तरी एका गटाचा राबता जोरदार वाढलेला होता तो गट म्हणजे यमदूतांचा गट. जिकडेतिकडे त्यांची लगबग आणि लवलवाट होता.
खरं तर एक काळ होता कृष्ण आणि राधा 'हम तुम एक कमरेमे बंद हो ...." फेझमध्ये अतिशय आनंदात असते किंबहुना तशी संधी मिळावी म्हणुन दोघांनी आटापिटा केला असता, आता प्रेमाला जरा प्लॅटु आला होता, प्रगल्भता आली होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एका खोलीत एकमेकांबरोबर न भांडता फार काळ रहाणे पॉसिबल नव्हते त्यामुळे दोघे शेवटी खोलीबाहेर पडलीच, अर्थात नेहमीच्या वेशात नाही तर पृथ्वीला साजेलशा वेशात.
दोघांना पहील्यांदा एक जोडपे भेटले आणि हाय /हॅलो झाल्यावरती गप्पा सुरु झाल्या. दोन चार ड्रिंकस पोटात गेल्यावरती सर्वजण जरा सैलावले आणि मनातील कोंडलेल्या वाफेला जरा वाट मिळू लागली.जोडप्यामधील पुरुषाची तक्रार होती की करोनामुळे घरुन काम करावे लागत आहे. एरवी पाट्या टाकता येत असत त्या आता टाकता येत नाहीत. कारण घरुन काम करायचं म्हणजे सतत माऊस हलता ठेउन, 'ऑनलाइन'स्टेटस मेंटेन करावं लागत. बरं एवढं करुनही मॅनेजरला शंका असतेच की याची प्रॉडक्टिव्हिटी घटली तर नाहीये त्यामुळे दुप्पट काम अंगावर पडतं. घरी बायको काम एक्स्पेक्ट करते. पूर्वी शनिवारी रात्री निदान मित्रांबरोबर उंडारायला मिळत असे, आता कोव्हिडच्या भीतीमुळे सोशल लाईफचाही बोऱ्या वाजला आहे. तर जोडप्यातील स्त्रीची तक्रार होती की ऑफिसचे काम आणि घरचे काम पूर्वी कंपार्टमेन्टलाइझ्ड होते. घरातून बाहेर पडले की 'मी टाईम' मिळे, ऑफिसात मैत्रिणींशी गप्पा होत, सुखदु:ख वाटले जाइ. नवीन खरेदी, साड्या, कपडे, शॉपिंग मिरवता येई. आता दुसऱ्या व्यक्तीच्ञा डोळ्यातील ॲप्रिसिएशन आणि क्वचित असूयेला मुकावे लागल्याने, खरेदीत म्हणावा तसा राम राहीला नाही. बरं लिप्स्टिकचा स्टॉक खरोखर धूळ खात पडला आहे. एक ना दोन.खरं तर कृष्ण राधेने एक कर्टसी म्हणुन, पोलाईटली त्या जोडप्याचे म्हणणे ऐकून घेतले होते खरे पण दोघेही मनात विचार करु लागले - किती स्वार्थी आहेत काही लोकं. इतरांचे नातलग, सख्खे जीवाभावाचे कोणीतरी कोरोनाचे बळी पडलेले आहेत आणि यांना पडलीये सोशल लाईफ आणि लिप्स्टिकची. चला ती भेट आवरती घेउन दोघे खोलीत परतले खरे पण खिन्नच.
पुढील काही दिवशी मात्र, परत पृथ्वीची सैर करायला बाहेर पडले. यावेळेस मात्र रस्त्यावरती भटक्या श्वानांना पोळ्या, बटरबिस्कीटस घालणारी काही तरुण मुलं मुली त्यांनी पाहीली. तर कुठे कामगार, मजूर, ज्यांचे हातावर पोट आहे समाजातील त्या वर्गाला लिफ्ट देणारे, अन्न-पाणी देणारे काही गट भेटले. त्यांच्याशी गप्पा झाल्या. कुठे नर्सेस स्त्री-पुरुष भेटले. हे लोक हीरो होते. अगदी गपचूप पण महत्वाचे कार्य हे लोक पार पाडत होते. कुठे म्हाताऱ्या लोकांपर्यंत वाणीसामान पोचविणारे कॉलेज युवक-युवती भेटले. कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवणारे. काही संस्थळांवर लोकांना माहीती उअपलब्ध करुन देणारे सदस्य भेटले. हे लोक पब्लिक फोरमचा उत्तम उपयोग करुन लोकांना कोरोनाबद्दल सजग आणि सक्षम करत होते. तर समाजात काही लिंबुटिंबु खेळाडुदेखील होते. आपल्या आसपासच्यांना व्हॉटसॲप मधुन धीर देणारे. फेक न्युझ विरुद्ध आपल्या आपल्या लहानशा रीतीने का होइना, आवाज उठवणारे निदान आपल्या सोशल सर्कलमध्ये जागरुकतेचे योग्य संदेश पोचविणारे. आपला आपला खारीचा वाटा पार पाडणारे.
असे विविध अनुभव घेउन, सुरुवातीला, खिन्नतेचा पण त्यापश्चात सार्थकतेचा अनुभव घेउन, राधा-कृष्ण सुट्टी संपल्यावरती परत स्वर्गलोकात जाण्यास सज्ज झाले.

//बाळबोध अ‍ॅलर्ट समाप्त

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet