सायकलींचे आगळे वेगळे ‘विश्व’

p2आपल्यातील बहुतेकांना सायकल चालवायला शिकताना दोन चाकीच्या या वाहनावर पेड्लिंग करत करत कसे बसायचे, बसून बॅलन्स कसे साधायचे, कुणीही मागून न ढकलता पेड्लिंग करत हवेत तरंगल्यासारखे कसे जायचे, मित्र-मैत्रीणी-भाऊ-बहिणींना डबल सीट घेऊन या रोमांचकारी अनुभवात कसे सामील करून घ्यायचे, न धडपडता कसे उतरायचे इ.इ गोष्टींची नक्कीच मजा आली असेल. हा रोमांचकारी अनुभव फक्त तुम्हालाच नव्हे तर जगभरातील बहुतेकांना गेली शंभरेक वर्षे तरी आला असेल. मुलांच्यापेक्षा मुलींचा अनुभव नक्कीच वेगळा असेल. घरात हे करू नको, ते करू नको, मान वर करून बोलू नको, सातच्या आत घरात, अशा चित्र-विचित्र अटी-नियमांच्या जोखडातून मुक्त होत आपण सायकल चालवू शकतो, सायकलीवर बसून मुक्त स्वातंत्र्य भोगू शकतो; हा अंगावर काटे आणणारा अनुभव घेतलेल्या मुलींना सायकल ही एक त्यांच्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचे फक्त एक साधन न राहता वेगळेच काही तरी आहे याची जाणीव झाली असेल.

गरीबातील गरीब देशापासून अती श्रीमंत देशापर्यंत सायकली वापरल्या जातात. बहुतेक शहरात व निमशहरात सायकल विक्रीची दुकानं असायची. गल्ली-बोळात सायकलींची दुरुस्ती करणारे सायकलचे ‘दवाखाने’ असायचे. त्यासमोर सायकल आडवे टाकून पंक्चर काढण्याचे दृश्य शहरातील मुलं-मुलींच्या कुतूहलाचा व टाइमपासचा विषय होता. स्वतःची सायकल नसणाऱ्यांना दर ताशी/दिवशी नाममात्र भाड्याने सायकली घेण्याची सोय असायची. कदाचित बहुतेक जणांनी भाड्याच्या सायकली घेऊनच सायकल चालविणे शिकले असेल. पोहणे व सायकल चालविणे या गोष्टी शिकल्याच पाहिजेत असा दंडक असल्यासारखे बालपणी या गोष्टी शिकविल्या जात होत्या. सगळ्यांच्या आवडत्या या वाहनाला कधीच ओहोटी लागणार नाही असेच त्याकाळी वाटत होते.

सायकलचा शोध
आता आपण वापरत असलेल्या सायकलीचा इतिहाससुद्धा मजेशीर आहे. हाडं खिळखिळे करणारे बोनशेकर्स (boneshakers) व एक लहान व दुसरे मोठे चाक असलेले पेनी-फार्दिंग सायकली एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. सायकलींना केव्हाही आडवे पाडून हाडं खिळखिळे करणारे वाहन (बोनशेकर्स) असे म्हटले तरी त्याकाळीसुद्धा सायकली भविष्यासाठीचे वाहन म्हणून मिरवत होत्या.

1810च्या सुमारास इंडोनेशियातील माउंट तंबोरा येथील ज्वालामुखी गंधकाची धूर ओकत होती. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, युरोप खंडातील पिकं जळून खाक झाले. दुष्काळी परिस्थितीत अन्न-पाणीविना घोडे मरू लागल्या. सर्व जनजीवन ठप्प झाले. कारण त्या काळी घोडेच वाहतुकीचे प्रमुख साधन होत्या. जर्मनी येथील कार्ल फॉन ड्राइसला घोड्याऐवजी दुसरे कुठले तरी घास-पाणी यांची अपेक्षा न करणाऱ्या साधनाचे स्वप्न दिसू लागले. त्याच्याच या कल्पनाविलासातून सायकलचा जन्म झाला. 1817च्या सुमारास कार्ल फॉन ड्राइसने तयार केलेला घोड्याच्या आकारात असलेला हा ओबड-धोबड स्वरूपातील सायकलीच्या (“dandy horse”) प्रारूपात आताच्या सायकलीत असल्याप्रमाणे पेडल्स, चेन-स्प्रॉकेट, ब्रेक यासारख्या गोष्टी नव्हत्या. या दोन-चाकी डँडी हॉर्सच्या सांगाड्याला पायाने सरकवत सरकवत पुढे नेले जात होते. जरी हे अल्पजीवी ठरले तरी त्या काळच्या युरोपमधील संशोधक-उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्यातून प्रेरणा मिळाली. अनेक नवे उद्योजक त्या डँडी हॉर्समध्येच सुधारणा करत त्याला आधुनिकतेचे साज चढवू लागले. 1860च्या सुमारास या डँडी हॉर्सला बॉलबेरिंग्स, स्पोक्स असलेली रिम व रिमभोवती पोकळ नसलेले भरीव रबराचे चाक, तरफाचा वापर करुन गीअर बदलण्याची यंत्रणा अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या. एशिया व आफ्रिका खंडातील देशांच्या सायकलींना मागच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी कॅरियरची सुविधा देण्यात आली. भारतीय महिलांच्यासाठी खास ‘लेडीज’ सायकली बनविण्यात आल्या. काही काळानंतर खेळाडूंसाठी स्पोर्टस् सायकलींची भर पडली.
p1
२१व्या शतकाच्या अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानयुगातसुद्धा संगणक व कार्सच्यापेक्षा जास्त पटीने सायकलींचे उत्पादन होत आहे. प्रदूषणाची होत असलेली वाढ व आकाशाला भिडत असलेल्या इंधनाच्या किंमतीमुळे सायकल हे यानंतरच्या जगाचे वाहतुकीचे एकमेव पर्यायी साधन ठरले जाणार आहे. त्याची लवचिकता हेच त्याचे गुणविशेष ठरत आहे.

सायकलचे डिझाइन
मुळात सायकलचे डिझाइन फारच सोपे व सुटसुटीत आहे व त्याची जोडणीसुद्धा तितकीशी किचकट नाही. सायकलीत काही मोजकेच सुटे भाग असल्यामुळे त्याची जोडणी एखादा अर्धप्रशिक्षित कामगारही सहजपणे करू शकतो. सर्व सुटे भाग एकाच शेडमध्ये बनवून जोडणी करण्याचे कारण नाही. त्यामुळे सायकलीचे महत्वाचे सुटे भागच मोठ-मोठ्या काऱखान्यात तयार केले जातात व जोडणी नंतर केली जाते. कमीत कमी मजूरीवर काम करणारे कामगार ज्या देशात मिळतात तेथेच 80-90 टक्के सुटे भाग तयार होतात.

सायकलीचे पार्टस् बनविण्यासाठी स्टील, अल्युमिनम व अलीकडे कार्बन फायबर अशा गोष्टी वापरून भरपूर दणकट, वजनात कमी व भरपूर दिवस टिकणाऱ्या सायकलींचे उत्पादन करण्याकडे कल वाढू लागला. स्टील, अल्युमिनम वा कार्बन फायबरपासून स्पेर पार्ट बनविणे युरोप-अमेरिकासारख्या श्रीमंत राष्ट्रांना अती खर्चिक (वा तंत्रज्ञानाच्या खालच्या पायरीवरचे) वाटत असल्यामुळे सायकलीच्या सुट्या भागांचे उत्पादन करणारे तेथील कारखाने केव्हाच बंद पडले आहेत. आता सायकलींचे बहुतेक पार्ट तैवान, चीन, भारत या देशात तयार होतात, व हे सुटे भाग युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल व अमेरिकासारख्या श्रीमंत देशांना पाठवून त्या त्या देशात जोडणी करून विकले जातात. खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाचे प्रारूप सायकलीत मिळू शकते. रिम तैवान/भारतातून, स्टील अलॉय/अल्युमिनम/कार्बन फायबर चीन-जपानमधून, हबगीअर अमेरिकेतून, ट्यूब-टायर आणखी एखाद्या देशातून असे करत करत सायकलीचे विक्री व्यवस्थापन होत आहे. अशा प्रकारे उत्पादनाच्या व्यवस्थापनामुळे कळत न कळत सायकलींच्या पार्टचे प्रमाणीकरण होत असून ग्राहकाला याचा फार मोठा फायदा होत आहे. मोठ-मोठ्या कार्पोरेट्सची मक्तेदारी मोडून स्थानिक उत्पादकांचा सहभाग वाढविणे यातून शक्य होत आहे.

आधुनिक सायकली
परंतु अलीकडील काही वर्षात सायकलींचा वापर पूर्वीसारखे न राहता श्रीमंतांच्या व्यायामाचे व/वा छंदपूर्तीचे साधन म्हणून होत आहे. त्याचप्रमाणे सायकलीच्या वेगावर जास्त लक्ष दिले जात आहे. कमी वजन हे महत्वाचे घटक असून सायकलीच्या वायुगतिकीला जास्त महत्व प्राप्त होत आहे. जागतिक स्तरावर सायकलींचे मानक ठरविणाऱ्या संस्थेने सायकलीचे वजन 6.8 किलो असे ठरविल्यामुळे बहुतेक उत्पादक हे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. या कमी वजनामुळे जास्तीत जास्त वेग मिळू शकेल याची खात्री वाटू लागली आहे. त्याचबरोबर खडकाळ व कच्च्या रस्त्यावरून वेगाने धावू शकणाऱ्या ट्यूब-टायरसाठीसुद्धा शोध चालू आहे. नवीन प्रकारच्या आताच्या या दणकट सायकली जगभरातील कुठल्याही प्रदेशात हजारो किलोमीटर्सचे अंतर एकही पार्ट न बदलता सहजपणे पार करू शकतील असे उत्पादकांचा दावा आहे.

सायक्लिंगची आवड
पर्यावरण रक्षण व आधुनिक समाजाच्या गरजा यात मोठी दरी आहे. या गरजा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या प्रदूषणात भर घालत आहेत. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे व त्यातून होत असलेले हवामान बदल मानवी जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत आहे. ही दरी मिटविण्याचा एक मार्ग सायकलींच्या पुनरुज्जीवनात आहे. समाजात सायक्लिंगची आवड निर्माण झाल्यास काही प्रमाणात प्रदूषण कमी करण्यास शक्य होईल असे तज्ञांना वाटत आहे. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी 5-10 अश्वशक्तीच्या गाड्या वापरून वायू व ध्वनी प्रदूषणात भर घालण्यापेक्षा सायकलींचा वापर करणे इष्ट ठरेल. सायकलींच्या वापरासाठी पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची गरज नाही. त्यामुळे प्रदूषण शून्य, परंतु जनसामान्यात पर्यावरण रक्षणाची मानसिकता विकसित न झाल्यामुळे गेल्या 30-40 वर्षापासून सायकली हद्दपार होत आहेत. एके काळचा घर-घरातील हा सोबती आता सायक्लिंगचे छंद जपणारा म्हणून वा वजन कमी-जास्त करण्याचे व्यायामाचे साधन एवढ्यापुरतेच राहिला आहे.

p4
सायकलींचे उत्पादन वा त्याची उपलब्धता या गोष्टी फार महत्वाच्या नसून जनसामान्यात पुन्हा एकदा सायकलींची आवड निर्माण करण्याची गरज आहे. सायकल संस्कृती रुजविण्याची गरज आहे. शहरवस्तीतील जनसामान्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी सायक्लिंगबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज आहे व त्यासाठी अनुकूलता उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. व हे काम फक्त जागृत नागरिकच करू शकतील.

काही तज्ञांच्या मते आताच्या सायकलीच्या डिझाइनमध्ये बदल केल्यास शहरातल्या शहरात सायकलींचा वापर वाढविणे शक्य होईल. सायकलीचे डिझाइन शंभर वर्षापूर्वीचे असून काही क्षुल्लक अपवाद वगळता त्यात फार मोठा बदल झालेला नाही. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी लुकमध्ये फार वेगळे दिसत असले तरी मूळ ढाचा तसाच आहे. काही सायकलींची सीट जास्त उंचावलेली असेल, काहीतील हब-गीअर उच्च प्रतीचे असू शकेल, काहींच्यात ट्यूबलेस् टायर्स असतील. परंतु डिझाइनमध्ये फार बदल नाहीत.

लोकप्रतिनिधीकडून उत्तेजन
जगभरातील काही शहरात यासंबंधीचे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यात त्या त्या शहरातील लोक प्रतिनिधींचा वाटा जास्त आहे. सायक्लिंगची आवड असणारे लोकप्रतिनिधी जिवाचे रान करून सायकल संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे प्रयत्नही करत आहेत. जगभरातील सायकलींचे छंदिष्ट यासाठी पुढाकार घेत आहेत. काही नगरपालिका सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅकची सोय करत आहेत. काही शहरात नगरपालिका नागरिकांना सायकल वापरण्यास उत्तेजन देण्यासाठी एखाद्या कंत्राटदाराला नेमून शहरभर सायकलींची सेवा देत आहेत. सायक्लिंगची आवड निर्माण करण्यासाठी सायकल विकत घेणे, पार्किंगसाठी जागा शोधणे, त्याची देखभाल करणे वा चोरीस जाऊ नये यासाठी उपाय शोधणे या गोष्टींना फाटा देत मोबाइलवर पैसे भरून व क्यूआर कोडच्या सहायाने लॉक-अनलॉकची सुविधा व कुठेही सायकली सोडून आपापल्या कामासाठी जाण्यास योग्य अशी यंत्रणा काही नगरपालिका राबवित आहेत.

लोकांचा सायकलीचा वापर शासनांच्या ध्येय-धोरणावर पूर्णपणे अवलंबून आहे असे म्हणता येईल. सायकलींचा वापर सार्वजनिक रस्ते व इतर भागात होत असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक निर्णयावर विसंबून रहावे लागते. लोकांच्या दबावाविना सायकलींचा रस्त्यावरील वावरावर मर्यादा येऊ शकतात. सायकली चालविण्यासाठी सुरक्षित रस्ते हवेत. जेथे कार्स/बसेससारखी वेगवान वाहने धावत असतात, त्या रस्त्यांच्या कडेकडेनीसुद्धा सायकली चालविणे असुरक्षित ठरते. कुठल्याही क्षणी अपघात होऊन सायकलस्वार मरण्याची शक्यता असते. खड्डे, खाच खळगे असलेल्या वा निसरड्या रस्यावर सायकल चालविणे कसरतीच्या खेळासारखे वाटेल व छोट्यातला छोटा अपघातसुद्धा सायकलीच्या वापराला परावृत्त करू शकेल. कार्स व मोटाराइज्ड बाइकच्या गर्दीत सायकल चालविणे जिवावर बेतू शकेल. २१व्या शतकातील रस्ते व रस्त्यांची देखभाल सायकल-फ्रेंड्ली नाहीत असे म्हणावेसे वाटते. त्यामुळे सायकलींना उत्तेजन देण्यासाठी नगरपालिका व नगरपरिषदांचे सकारात्मक दृष्टिकोनच हवे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास स्थानिक प्रशासन सायकली वापरण्यास अनुकूल नीती-नियम करू शकेल. खरे पाहता सार्वजनिक वाहन व्यवस्थेच्या ठिकाणापासून घरापर्यंत सायकली वापरण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे सहज शक्य आहे. तसे केल्यास जनसामान्यसुद्धा काही प्रमाणात सायकली वापरतील.

बायसिकल मेयर
नेदरलँड्स येथील बीवायसीएस ( BYCS ) ही स्वयंसेवी संस्था निरनिराळ्या शहरातील सायक्लिंगचा छंद असलेल्या गटांशी संपर्क साधून सायकलींचा प्रचार व प्रसार करण्याचा विडा उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शहरातील या सायक्लिस्ट्सच्या म्होरक्यांना बायसिकल मेयर म्हणून निवडले जात आहे. त्यांचा उद्देश '50/30'. म्हणजे 2030 पर्यंत त्या त्या शहरातील लोकांनी किमान 50 टक्के तरी त्यांच्या मोटराईजड वाहनांचा वापर कमी करणे. मुंबईकरांसाठी फिरोजा सुरेश यांची पहिले बायसिकल मेयर म्हणून निवड झाली आहे. तिला सायक्लिंगचे अक्षरशः वेड आहे. लहानपणापासून तिने हा छंद जोपासला आहे. कॉलेजमध्ये शिकताना कॉलेजच्या आवारात सायकलीचे स्टँड नसल्यामुळे संघर्ष करून स्टँडची सुविधा उपलब्ध करून घेतली. 50 टक्के मुंबईकर कामासाठी सायकलीवरून जावे हा तिचा आग्रह आहे. तिला तर मुंबई सायकलींची राजधानी व्हावे असे वाटते. अशाच प्रकारचे अनेक गट पुणे, बेंगळूरू, हैदराबाद, दिल्ली येथेही कार्यरत आहेत.

फोल्डेबल् सायकल
तरुणाईत सायक्लिंगचा आवड निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारच्या कल्पना लढविल्या जात आहेत. 15-20 किलोमीटर्सची सायकल सहल, शहरातील रस्त्यावरील स्वयंचलित वाहनांची गर्दी कमी असलेल्या वेळी सायकलींच्या मॅराथॉन/ट्रायथ्लॉन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शहराबाहेरच्या महामार्गावर सायकल शर्यतींचे आयोजन केले जात आहे. तरीसुद्धा हे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे सायक्लिंगला आपल्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनविण्यासाठी काय करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.

एके काळी शहरामध्ये सायकल पार्किंगसाठी भरपूर जागा होती. परंतु गेल्या 50-60 वर्षात जमीनीच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे गोर-गरीबांच्या या वाहनाच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. काही उद्योजकानी त्यासाठी फोल्डेबल सायकलीचे उत्पादन करून पार्किंगचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपमधील ब्रॉम्पटन ही कंपनी स्विस नाइफप्रमाणे फोल्डेबल सायकलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. 20-25 सेकंदात घडी उघडून सायकल वापरता येते. अर्ध्या मिनिटात पार्किंग स्प़ॉटमध्ये सायकल लावता येते. कारमध्ये, घराच्या कोपऱ्यात वा ऑफिसच्या टेबलाखाली ठेवता येण्याजोग्य या पोर्टेबल सायकली असून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

इ-बाइक
आधुनिक समाजाला वेगाचे अक्षरशः वेड लागलेले आहे व त्याला फार महत्वही दिले जात आहे. पूर्वीची संथगती बिनकामाची ठरत आहे. वाहतुकीच्या साधनात जास्तीत जास्त वेग असणे व या वेगाला साजेशे बुलेट ट्रेन्स, एक्सप्रेस हायवे, 6-8 पदरी रस्ते, शहरांतर्गत एकेरी मार्ग, फ्लायओव्हर्स, भुयारी मार्ग तयार करणे व त्यांची देखभाल करणे एवढेच काम जगभरातील कल्याणकारी राज्यसंस्था करत आहेत. व यासाठी पैसे मोजण्याला समाजाची पूर्ण तयारी असते. त्यामुळे या रॅट-रेसमध्ये सायकलीचे उत्पादकही उडी न घेतल्यास नवल वाटेल. त्यासाठी इ-बाइकची संकल्पना राबविली जात आहे.

इ-बाइक इंधनावरून चालणाऱ्या व किक् स्टार्ट वा स्टार्टिंगसाठी बटन दाबल्यावर गती घेणाऱ्या स्कूटर-मोटरसायकल्ससारख्या दुचाकीपेक्षा वेगळी असून सायक्लिंगच्या आनंदाबरोबरच काही प्रमाणात मानवी श्रमाची बचत करत वेगाची भूक पण मिटवणारी आहे, असा दावा उत्पादकांकडून केला जात आहे. जर्मनीत याचे यशस्वी प्रयोग झाले असून हे इ-बाइक लोकप्रिय होत आहेत. सायकलीला बॅटरीच्या ऊर्जेवर चालणारी मोटर व दीर्घकाळ ऊर्जा पुरविणारी बॅटरी यांची योग्य प्रकारे सांगड घालून इ-सायकल तयार केली जाते.

इ-बाइकची संकल्पना तशी फार जुनी आहे. 1895 साली याचे पेटंट घेण्यात आले होते. त्यासुमारास काही उद्योजकांनी सायकलीच्या मागच्या चाकाजवळ डीसी मोटर जोडली व त्यासाठी 100 अँपीयर – 10 व्होल्ट बॅटरीची सोय केली. परंतु बोजड मोटर व त्यासाठीची बॅटरी यांचे वजन, त्याची देखभाल, वारंवार करावी लागणारी दुरुस्ती इत्यादीमुळे अशा प्रकारच्या सायकलींची विक्री अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. नंतरच्या काळात मोटर्स व बॅटरीत फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. मोटर्सचे गात्र आकुंचित झाले. बॅटरींचे आयुष्य वाठले. देखभालीचा खर्च कमी झाला. याच गोष्टींचा वापर नंतरच्या काळात करून इ-बाइकचे पुनरुज्जीवन होत गेले. 1990मध्ये टॉर्क सेन्सार्स व पॉवर कंट्रोल वापरून इ-बाइकला आधुनिक स्वरूप दिले. निकेल-कॅड्मियमची बॅटरी वापरल्यामुळे सायकलीचे वजन कमी करणे शक्य झाले. जपानची यामाहा ही कंपनी 1995 ते 2004 पर्यंत अशा प्रकारच्या इ-बाइक – त्याला झाइक असेही म्हटले जाते – उत्पादन करून विक्री करू लागली. तरी या प्रकारच्या सायकलींना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 2007नंतर मात्र चीन येथील प्रमुख शहरांच्या रस्त्यावर या प्रकारच्या इ-बाइक दिसू लागल्या. याची बॅटरी चार्ज करण्यासाठी 8 तास लागत होते. एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ताशी 20 किमी वेगाने 40-50 किलोमीटर्स अंतर पार करू शकते. पेडलिंग करून सायकलीला एकदा वेग दिल्यानंतर विनाश्रम ती सायकल चालते. नंतरच्या हायब्रिड इ-बाइक मध्ये मानवी ऊर्जेची विद्युत ऊर्जेत बदल करून व जास्त ऊर्जा बॅटरीद्वारे घेण्याची सोय केली गेली. अशा प्रकारे स्नायु ऊर्जा व बॅटरीच्या ऊर्जा यांचे संगनमत करून सायकली विकसित करण्यात येत आहेत.

यामुळे आता जगभरात खालील प्रकारच्या सायकली रस्त्यावर आहेतः
• केवळ स्नायु ऊर्जेवर चालणाऱ्या सायकली
• केवळ विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या सायकली
• स्नायु ऊर्जा व विद्युत ऊर्जा या दोन्हींचा वापर करून चालणाऱ्या हायब्रिड सायकली

p7
इंधनावर चालणाऱ्या 50-80 सीसी मोपेड्समध्येसुद्धा पेडलिंग वापरत असले तरी त्या प्रदूषणमुक्त नाहीत. हायब्रिड इ-बाइकमध्ये गरजेनुसार विद्युत ऊर्जा वापरली जाते. व या प्रकारच्या बाइकमध्ये वेग हा गौण समजला जातो. पारंपरिक सायकली व हायब्रिड इ-बाइकची तुलना साधे मोबाइल व स्मार्ट फोनशी करता येईल. कदाचित अशा प्रकारचे इ-बाइकच पुढील काळातील शहरांतर्गत वाहन ठरण्याची शक्यता आहे. हे इ-बाइक ताशी 45 किमी धावण्याची शक्यता असल्यामुळे इंधनांचा वापर करून धावणाऱ्या दुचाकी-चारचाकी गाड्यांचा वापर कमी कमी होत जाणार आहे. तरुणाई अशा गाड्या वापरण्यास उत्सुक आहे. जर्मनी व नेदरलॅड्समध्ये हे बाइक चांगलेच बस्तान मांडत आहेत.

सायक्लिंगचा धोका
आजच्या प्रदूषणदूषित जगात मानवी स्नायु बलावर धावणाऱ्या सायकलींसारखा दुसरा योग्य पर्याय सापडणार नाही. तरीसुद्धा पर्यावरण स्नेही असलेल्या या वाहनाचा वापर फार कमी देशात होत आहे. अती असुरक्षित व धोकादायक वाहन म्हणून सायकलीवर न पुसणारा शिक्का बसलेला आहे. थंडी-ऊन-पावसाच्या काळात त्याला घरात ठेऊन दुसरा पर्याय शोधावा लागतो. ब्रिटन, अमेरिका व आस्ट्रेलिया या देशात फक्त 1 टक्के लोकच याचा नियमितपणे वापर करतात. यालाही अपवाद आहेतच. नेदरलँड्स येथे 27 टक्के वापर होतो. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरात 50 टक्के लोक नियमितपणे सायकलींचा वापर करतात. सायकलींचा वापर कमी होतो म्हणून मृत्यृदर काही कमी होत नाही. अमेरिकेत दर 100 मिलियन किलोमीटर सायक्लिंगमागे 5.8 मृत्यु दर आहे. ब्रिटनमध्ये 3.6. परंतु सायकलीचा छंद जोपासणाऱ्या जर्मनीत हाच मृत्युदर फक्त 1.7 आहे व डेन्मार्कमध्ये 1.5 आहे. या आकडेवारीवरून जास्त प्रमाणात सायकलींचा वापर होत असल्यास मृत्युदर कमी होऊ शकतो व सायक्लिंग जास्त सुरक्षित असू शकते असा निष्कर्ष काढता येईल.

वेगमर्यादा
मुळात वेगाच्या बाबतीत सायक्लिंग मोटरिंगशी स्पर्धा करू शकत नाही, हे लक्षात ठेवावे लागेल. शिवाय गेल्या शंभर वर्षात शहर नियोजन व/वा शहर सुधारणा मोटराइज्ड वाहनांना डोळ्यापुढे ठेऊन केली आहे. शहरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था, गल्ली-बोळातील घरापर्यंत जाणारे रस्ते, पदपथ, चौकांची रचना इत्यादीत कार्सच्या अनुकूलतेकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांनासुद्धा घाबरत, अडखळत चालावे लागते, रस्ते क्रॉस करावे लागते. कित्येक शहरात सायकलींसाठी स्वतंत्र रस्ते नाहीत, जेथे आहेत येथे बिनधास्तपणे दुचाकी पार्किंगसाठी वापरले जात आहेत. पदपथावर चालायचे असल्यास झाडं, विद्युत वितरण यंत्रणा (व पथारीवाले) हे अडथळे पार करत जावे लागते.

सायक्लिंग करत असताना वेगाने जाणाऱ्या कार्स/मोबाइककडे संपूर्ण लक्ष ठेऊनच पुढे जावे लागते. चुकून जरी थोडेसे दुर्लक्ष झाल्यास अपघाताला निमंत्रणच. कार्सचे तंत्रज्ञान कितीही प्रगत असली तरी कार चालविणारी माणसच असल्यामुळे थोडीशी चूक झाली तरी जीवावर बेतू शकते. बाइकस्वारं तर कुठल्या तरी युद्धाला तातडीने पोचावे यासाठी वाटेतील सर्व अडथळ्यांच्यावर हल्ला चढवत, वाकडे-तिकडे मिळेल त्या जागेत बाइक घुसवत जात असतात. त्यामुळे सायकलस्वारांना यांच्यापासून चार हात दूर असावे असे वाटत असेल. कार्समधील व्यक्ती मोबाइलवर किंवा कारमधील इतर प्रवाश्याशी बोलत असल्यास शेजारून धावत असलेल्या सायकलीला धक्का लागण्याची शक्यता जास्त. लंडनसारख्या शहराप्रमाणे सायकलीसाठीचे स्वतंत्र रस्ते अरुंद असल्यामुळे अपघात होण्याचा संभव जास्त.

या सर्व अपघाती अवस्थेतून जात असलेल्या सायकलींना पुनरुज्जीवित करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रदूषणातील वाढ व हवामान बदल यांच्यात अन्योन्य संबंध आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. शहरांतर्गत प्रदूषण पातळी सर्व दैनंदिन जनजीवनावर विपरीत परिणाम करत आहे. हे स्रर्व टाळण्यासाठी सायकलींचा वाहन म्हणून उपयोगात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. हे एकदा लक्षात घेतल्यास तातडीचे काही उपाय नक्कीच सुचतील. उदाहरणार्थ शहर वस्तीतील कुठल्याही खासगी वाहनाची वेगमर्यादा कमाल ताशी 25-30 किमी इतके नियंत्रित केल्यास प्रदूषण कमी होईल, वाहतुकीची कोंडी टाळता येईल व सायक्लिंग सुरक्षित होईल. एकदा हे वास्तव समजून घेतल्यास काही अपवाद वगळता सायकलीचे फायदे लोकांच्या अंगवळणी पडतील व पुन्हा एकदा सायकलींना चांगले दिवस येतील.

सायकलीसाठी प्रगत तंत्रज्ञान
डच वा डेनिश नागरिकांच्या मनातील कल्पनाविश्वाचे प्रारूप सगळीकडे राबविणे शक्य आहे का? प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, घातक धूर ओकणाऱ्या चार चाकी वाहनाऐवजी सर्व देशात सायकली वापरल्या जातील का? विशेषकरून पावसाळ्यातील निसरड्या रस्त्यावरून सायकल प्रवास सुरक्षित राहील का?

प्रगत तंत्रज्ञान सायक्लिंगला स्मार्ट करू शकेल का?
तीन-चार-पाच रस्ते मिळत असलेल्या चौकातून सायकलीवरून जाताना सायकलस्वारांची भरपूर तारांबळ उडते. हे चौकच सायक्लिंगला सर्वात मोठे अडथळे ठरतात. कार्सचालकांना चौक ओलांडण्याची घाई. मोबाइकस्वारांना आपल्या बाइकच्या इंजिनाच्या प्रचंड क्षमतेचे/त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्याचे प्रदर्शन करण्याची घाई. त्यामुळे सायकलस्वार मेटाकुटीला येतो. व भांबावलेल्या अवस्थेत सायकल चालविण्याचा प्रयत्न करतो. यातून मार्ग काढण्याचे ठरविल्यास चौकातील सिग्नल यंत्रणेत सुधारणा करावी लागेल. पादचारी व सायकलींना चौक ओलांडताना गाड्यांचा अडथळा येऊ नये यासाठी हिरव्या दिव्यातील काही वेळ फक्त यांच्यासाठी ठेवणे वा सायकलींच्यासाठी राखीव ठेवलेल्या रस्त्यावर वेगळे हिरवे सिग्नल ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लाल सिग्नलच्या वेळी सायकलस्वारांना पाय टेकण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे हिरवा सिग्नल लागल्यानंतर तत्परतेने ते पुढे जाऊ शकतील. जास्त चढ असलेल्या रस्त्यावरून जाताना सायकलस्वारांसाठी मदत करणारी Trampe Bicycle Liftसारखी यंत्रणा असल्यास सायकलस्वाराचे श्रम वाचतील. ही यंत्रणा असल्यास सायकलस्वार संतुलन संभाळत एकच पेडल वापरत पुढे पुढे जाऊ शकतो.
p8
सर्वात महत्वाचे म्हणजे सायकलस्वारांना कारचालकांनी प्रयत्नपूर्वकपणे अवकाश देण्याची आवश्यकता आहे. पार्किंगस्पेस वा रस्त्यावर सायकलींना योग्य प्रमाणात स्पेस दिल्यास सायक्लिंग करण्यास उत्तेजन मिळेल. ‘सायकल प्रथम’ हे धोरण राबविल्यास सायकल चालविण्यात आत्मविश्वास वाढेल. पालकांना सायकलीवरून जाणाऱ्या आपली मुलं-मुलीं धडधाकट परत येतील, याची खात्री वाटेल. पार्किंग स्पेसमध्ये ‘सायकल प्रथम’ हे धोरण राबविताना कार पार्किंगसाठी कारचालकांना नक्कीच भुर्दंड बसेल. त्यापायी तरी कार्सच्या बेधुंद वापरण्याला आळा बसू शकेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे सायक्लिंगला पोचविणे सहज शक्य आहे. मोबाइल अ‍ॅप्सद्वारे सायक्लिंगच्या वेळी एकमेकाच्या संपर्कात राहून सायक्लिंग करता येईल. जवळचा रस्ता शोधण्यास मदत होईल. गर्दीचे रस्ते टाळता येईल. अडचणीच्या प्रसंगी एकमेकांना मदत करता येईल. सायकलची चोरी होऊ नये यासाठी पूर्व सूचना देता येईल. रस्त्यावरील खड्ड्याबद्दलच्या माहितीचे देवाण घेवाण होईल.

सायक्लिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा केवळ मोबाइलपुरते सीमित न ठेवता इतर ठिकाणीसुद्धा पोचवता येणे शक्य आहे. कार्समधील एअरबॅगचे तंत्रज्ञान वापरून सायकलस्वारांच्या हेल्मेटची रचना करणे शक्य आहे. कार्समध्ये कार्सच्या अगदी जवळून जाणाऱ्या सायकलींचा वेध घेणारे सेन्सार्स कारमध्ये बसविल्यास संभाव्य अपघात टाळता येईल.

चीन येथील एका विश्वविद्यालयाने कारमधील डॅशबोर्डसारखी सायकलीसाठीच्या डॅशबोर्डबद्दल संशोधन करत आहे. सायकलीवर विविध प्रकारचे सेन्सार्स बसवून, पेडल्सचा वेग, त्याची वारंवारता, सायकलस्वाराच्या हृदयाचे ठोके इत्यादीबद्दलची माहिती प्रदर्शित करण्याची सुविधा हँडलच्या जवळपास बसविलेल्या डॅशबोर्डवर असेल. GPS जोडलेले असल्यामुळे कार्समधील डॅशबोर्डप्रमाणे सायकलीच्या मार्गक्रमणाची माहिती त्यात असेल. स्मार्टफोनशी जोडल्यास आणखी अनेक प्रकारची माहिती त्यात प्रदर्शित करता येईल. अल्ट्रासॉनिक सेन्सार्स बसविलेले असल्यामुळे वाटेवरील खड्यांची माहिती मिळेल व त्याप्रमाणे सायकलीची गती व दिशा बदलता येतील. अशा प्रकारच्या स्मार्ट सायकली एके दिवशी जवळपासच्या कार्स/मोबाइकशी परस्पर संवाद साधून अपघाताचे प्रमाण शून्यावर आणू शकतील. ही स्मार्ट सायकल अत्यंत सुरक्षित व सायक्लिंगचे आनंद देणारी असेल.

पुढील काळात अशा प्रकारे सर्व सोईनीयुक्त स्मार्ट इ-बाइक रस्त्यावर आणणे सहज शक्य आहे. हे सर्व करूनसुद्धा कार्स/मोबाइकवाहक सायकलीवर स्वार करण्यास तयार होतील का हा प्रश्न अनुत्तरितच राहील. काही तज्ञांच्या मते सुरक्षिततेची हमी असल्यास 10-60 वयोगटातील शहरवासीय शहरांतर्गत 10-15 किमीच्या प्रवासासाठी नक्कीच सायकली वापरतील, मात्र यासाठी त्यांच्या सायकलविषयीच्या व पर्यावरण रक्षणाविषयीच्या मानसिकतेत फार मोठा बदल झाल्यास हे शक्य होईल.

सायकल मेयर, फिरोजा सुरेशच्या स्वप्नातील मुंबई सायकलींची राजधानीऐवजी इ-बाइकची राजधानी होण्याचे शक्यता जास्त असून ते दिवस फार दूर नाहीत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सातच्या आत घरात, बाइक चालवताना हेल्मेट घालणं, कार चालवताना सीटबेल्ट घालणं, वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं*, अशा चित्र-विचित्र अटी-नियमांच्या जोखडातून मुक्त होत आपण सायकल चालवू शकतो, सायकलीवर बसून मुक्त स्वातंत्र्य भोगू शकतो; हा अंगावर काटे आणणारा अनुभव घेतलेल्या मुलींना सायकल ही एक त्यांच्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचे फक्त एक साधन न राहता वेगळेच काही तरी आहे याची जाणीव झाली असेल.

हा भाग सोडला तर लेख रंजक वाटला. धन्यवाद!

*अधोरेखित शब्द मूळ लेखात नसले तरी त्या वाक्याचा एकूण रोख पाहता ते तिथे अगदी फिट बसतील, नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाइक चालवताना हेल्मेट घालणं

येथे 'बाइक' हा शब्द बहुधा 'सायकल' या अर्थाने वापरला नसून 'मोटरसायकल' या अर्थाने वापरला असावा, अशी शंका येते. अमेरिकेतील बहुतांश राज्यांत विविध वयोगटांतील सायकलचालकांनीसुद्धा हेल्मेट घालण्याबद्दल कायदे आहेत. (काही राज्यांत असे कायदे फक्त (राज्याप्रमाणे) १६ किंवा १८हून कमी वर्षांच्या वयोगटातील सायकलचालकांस लागू आहेत, तर काही राज्यांत सर्व वयोगटांकरिता. तशी वेगळी हेल्मेटेसुद्धा मिळतात. त्याशिवाय, भर रस्त्यांव्यतिरिक्त, बहुतांश ठिकाणी (जेथे उपलब्ध असतील तेथे) साइडवॉकचासुद्धा (मराठीत: 'फूटपाथ'चा) वापर करण्यास सायकलस्वारांस पूर्ण मुभा असते, आणि काही स्वल्प (अत्यल्प!) ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूस सायकलस्वारांकरिता एक वेगळी (बारकीशी) लेनसुद्धा काढून दिलेली असते. अर्थात, या बाबतीत कायदे करण्यास प्रत्येक राज्य स्वतंत्र असून, राष्ट्रव्यापी असा कोणताही कायदा नाही.)

(अर्थात, अमेरिकेत एकंदरीतच भर रस्त्यात सायकलस्वारांचे (आणि पादचाऱ्यांचे!) प्रमाण अत्यल्प आहे. In general, it is not a very bicycle-friendly - or pedestrian-friendly - country. पादचाऱ्यांच्या आणि सायकलस्वारांच्या संरक्षणार्थ बहुतांश ठिकाणी कडक कायदे असूनसुद्धा. एकंदरीत infrastructure पादचारी आणि सायकलस्वार यांकरिता बहुतांश ठिकाणी फारसे अनुकूल नाही. त्यामुळे, सायकलचा वापर हा बहुतकरून कॉलेजची (रेसिडेन्शियल) कँपसे, झालेच तर अपार्टमेंट काँप्लेक्सची किंवा सबडिव्हिजनची (मराठीत: 'सोसायटी'ची किंवा 'कॉलनी'ची) आवारे यांच्या आतमध्ये एवढाच मर्यादित आहे. क्वचित्प्रसंगी एखाद्या गावठाणात नाहीतर उपनगरात (जेथे साइडवॉकची आणि/किंवा वेगळ्या बाइसिकल लेनची सुविधा असेल तेथे) तुरळक एखादा सायकलस्वार दिसतो, नाही असे नाही, परंतु प्रमाण एकंदरीत नगण्यच आहे.)

बाकी,

बाइक चालवताना हेल्मेट घालणं, कार चालवताना सीटबेल्ट घालणं, वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं*

या साऱ्या गोष्टी आपल्याच सुरक्षेकरिता आहेत, याची समाजव्यापी जाणीव ज्या दिवशी वाढीस लागेल, तो सुदिन.

('सातच्या आत घरात'बाबत मात्र तसे नाही. किंवा, किमानपक्षी, असू नये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...सायकलसाठी लायसन नावाचा प्रकार लागत नाही, हा मुद्दा लेखात (बहुधा) राहून गेला. (चूभूद्याघ्या.)

==========

अंग्रेज़ों के ज़माने में, पुणे शहरात बहुधा या वाहनाकरितासुद्धा लायसन लागत असावे, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.) (अर्थात, त्यामागचा उद्देश हा बहुधा वाहतूकसुरक्षेपेक्षा करआकारणी हा असावा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन्ग्रेजोंके जमाने में नाही, स्वातंत्र्योत्तर काळात बरीच वर्षे सायकल चालवण्यासाठी परवाना नाही, पण बिल्ला लागायचा. सायकलला बिल्ला नाही, डबलसीट आहे, घंटी नाही, दिवा नाही, अशा अनेक कारणांनी तेव्हाचे नेव्ही ब्लू हाफचड्डी गणवेशातले मामा लोकांना आज दुचाकीवाल्यांना खाकी गणवेशातले मामा जसे त्रास देतात तसेच शेम-टू-शेम त्रास देत असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी २५ पैशात तासभर चिटुकली भाड्याची सायकल चालवता यायची. फार मजा येत असे. तेव्हाच अन्य कोणी जर ती सायकल भाड्याने घेतलेली असेल तर मग नंबर लावावा लागे.
पुढे कॅन्टॉन्मेन्ट एरीयात रहात असल्याने, नेताजी नगर ते कॅम्प & बॅक. किती किती चालवली सायकल. भणाणणारा वारा, चढ तर कधी झुउउउउम उतार. सायकलच्या, फार सुखद आठवणी आहेत. अतिशय सुखद.
दोझ वेअर द डेज, ....... शरीरात सुखद संप्रेरकांचा कल्लोळ आणि सायकलची साथ. हवेचा सुगंध, नशा स्मरणातुन जाणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अशी सायकल मीही मुंबईत खूप चालवली आहे. एकदा वाईला सुटीत काकाकडे राहायला गेले होते. तिथे सायकली भाड्याने घेऊन मेणवलीपर्यंत गेलो होतो ते अचानक आठवलं यावरनं. आता मात्र अनेक वर्षांत सायकल चालवलेली नाही, आत्मविश्वास पार गेलेला आहे. लेकीच्या नव्या सायकलवर सराव करायला हवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

काही वर्षांपूर्वी बेला बॅटहर्स्ट या ब्रिटिश लेखिकेबरोबर मी आठवडाभर फिक्सर म्हणून काम केलं होतं, ती द बायसिकल स्टोरी हे पुस्तक लिहीत होती तेव्हा. जगभरातल्या अनेक देशांत फिरून ती या पुस्तकासाठी तपशील गोळा करत होती. भारतातही अर्थात सायकल अनेक वर्षांपासून वापरली जाते त्यामुळे ती इथे आली होती. मी तिला मुंबई पुणे सायकल शर्यतीचा रस्ता म्हणजे जुना एनएच ४ दाखवला, दिल्ली, कोलकाता या शहरांतून फिरवून आणलं. खूप लोकांना भेटवलं. मजा आली होती.
दुसरी गंमत, लेकीला मागच्या शुक्रवारी नवी सायकल घेतली. दुकानाचं शटर बंद. समोर एक टेम्पो लावलेला त्यात सायकली होत्या. तिला बघून तिथल्या माणसाने दोन सायकली खाली उतरवल्या, गिअरची आणि विनागिअर. गिअरची हवी होती. आवडली. घेतली. पण आता लाॅकडाउनमध्ये सायकलिंगलाही मनाई आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

अभय कानविंदेची ही कालचीच पोस्ट, विषयाला साजेशी.
https://www.facebook.com/abhay.kanvinde/posts/10159027778273168

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

नेटफ्लिक्सवर 'सायकल' हा मराठी चित्रपट उपलब्ध आहे.थोडासा संथगतीने व भावनात्मक अंगाने चित्रित केला असला तरी आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाहीला आहे. छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाघुर या नियतकालिकेचा दिवाळी विशेषांक. शक्य झाल्यास वाचावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सायकलिंग हा माझा अत्यंत जिव्हाळृयाचा विषय आहे. सिनियर सिटीझन असूनही मी आजही दररोज किमान १० कि.मी. सायकलवर जातोय. सायकलिंगचे फायदे:
मधुमेही व्यक्तींनी तर सायकल चालवणे अत्यावश्यक आहे. रक्तातील शर्करा कमी होते,हा माझा अनुभव आहे.
प्रदूषणापासून मुक्ती मिळते.
ईंधनावरील अवलंबित्व नाहिसे झाल्याने स्वत:चा व देशाचाही आर्थिक लाभ होतो.
सायकलिंग प्रचारात आल्यास रस्तारूंदी ची गरज नाही. अगदी गल्लीबोळातूनही सराईतपणे जाता येते.
शासनाने पेट्रोलचे /डिझेलचे दर सार्वजनिक वाहनांसाठी कमी ठेवून इतर खाजगी वाहनांस तिप्पट करावेत, निम्मा भाग सार्वजनिक वाहनास कमी दरात देण्यात व निम्मा भाग सायकली स्वस्त करण्यात वापरावा. देश प्रदूषणमुक्त, ईंधनाबाबत स्वयंपूर्ण , जनतेचे आरोग्य उत्तम होऊन आरोग्यावरील खर्च कमी इत्यादी अनेक फायदे मिळतील.
सरकारने हे करावेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0