गोष्ट एका कातळाची

संध्याकाळची वेळ होती. सगळीकडे धूसर गुलाबी निळा प्रकाश पसरला होता. दूरवर कुठे तांबडे पट्टे दिसत होते. सूर्य मावळतीला आला होता.पाखरं बऱ्यापैकी घराकडे परतली होती. मध्येच कुठेतरी एखादा चुकार बगळा फडफड करताना ऐकू येई. देवीच्या देवळाच्या मागे असलेल्या कातळावर दोन मित्र बसले होते.ते आपल्या गप्पांमध्ये कधीचे गुंग झाले होते. आसपासची खेळत बसलेली मुलं कधीच पांगली आहेत ह्याची ही त्यांना जाणीव राहिली नाही. त्यांच्या आपल्या बऱ्याच वेळ गप्पा चालु होत्या. निवडणुका, आठवड्याचा बाजार, नव्याने बघितलेलं लॉकडउन, जमिनीच्या सातबारा ह्या सगळ्या विषयांवर ते रंगले होते. आजखूप दिवसातून मिळालेला निवांतपणा त्यांना त्या कातळावर जाणवत होता. बोलता बोलता घरचे विषय कधी निघाले हे त्यांना कळलंही नाही.

"कारभारणीची इचछा हाय, मुलगा चांगला मोठा बँकेत हाफिसर व्हावा., परीक्षा द्यायचं पण म्हणतंय त्यो. तसा बीकॉम ला चांगल्या मार्कांनी पास झालाय.पण शहरास्नी कलास लावावा लागेल."
एकानी आपल्या बरेचदिवस डोक्यात असलेला सवाल मित्रास बोलून दाखवला.
"चांगलं हाय. पण तुमची शेती, तिकडं कोण पाहणारं??"
मित्राने लगेच प्रतिसवाल केला.
"आता शेतीचं काय हाय, कसलं दिवस येतील काय माहित. आपण होतों तोसवार केलं, एरवी नुसती भागत न्हाई, म्हणून शेठ कडे नोकरींही धरलिया. पण पोरगा हाफिसर झाला तरं बरं होईल,चार पैसे आणील तर त्याचं तरी चार चोघांसारखं होईल, आपण आहोत तोसवार पाहू शेती. नंतर चं नंतर ".
जरा विचार केल्यासारखं करुन मित्राने पण हो त हो मिळवली, कदाचित त्यालाही त्याचे विचार पटले असावेत.नाही म्हटलं तरी ह्या दोन मित्रांची मैत्री ही फार जुनी होती. हे तिथं असलेल्या कातळाला चांगलंच ठाऊक होतं. त्याची ह्या दोन मित्रांची ओळख ही फार जुनी. त्याने शाळेतून घरी जाताना बोरं खाताना ह्या दोघांना पाहिलं होतं. चोरून तोडलेल्या केऱ्या चोखत मारलेल्या गप्पा त्याला आठवत होत्या आणि नंतरही नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी परताना आपली मोनगतं ह्याचं कातळावर मांडली होती.लग्नाच्या गोड आठवणी, पोरं बाळांचाआनंद, सगळी सुख दुःख वाटून घेतली होती. जेवढी एकमेकांशी तेवढीच ह्या कातळाशीदेखील.नंतर तारुण्य सरून उतारी कडे वाटचाल करताना देखील बऱ्याच रविवारच्या संध्याकाळी ते ह्या कातळावर भेटत होते.

आज बरेच प्रसंग कातळ स्वतःच्या मनाशी आठवत होता.अशा बऱ्याच खूण गाठी त्याने साठवल्या होत्या. एरवी दोघांच्या संभाषणे चुकारपणे ऐकणारा तिसरा अशी त्याची स्वतःविषयी समजून होती. नाहीतर दुसरं असं करण्यासारखे त्याच्याकडे काय होतं. पण ह्या दोन मित्रांची आजची चर्चा ऐकून त्याला त्याच्या आयुष्यातील सगळीच संभाषणे आठवली. असे केवळ दोनच मित्र नाहीत तर बऱ्याच व्यक्तींची सुखदुःख त्याने प्रामाणिकपणे वाटून घेतली होती अगदी त्यांनी न सांगता देखील.

खूप वेळ तो कातळ स्वतःशीच विचार करत बसला होता. जसा तो ह्या दोन मित्रांना ओळखत होता. तशीच बरीच माणसं त्याच्या आयुष्यात आली होती. आणि पुढेही येणार होती. अनंत कालासाठी तो एका जागी उभा होता. अगदी निश्चल. जसे हे दोन मित्र त्याच्या माहितीतील होते तसंच परवाचं जोडपं त्याला आठवलं. तशा अनेक जोडप्यांना तो ओळखत होता. बऱ्याच प्रेमकथा त्याने अनुभवल्या होत्या. त्यांच्या आनंदात त्यालाही सुख गवसलं होतं आणि दुःखात अश्रू न ढाळताही त्याच्या मनास पाझर फुटले होते.

परवाचीच गोष्ट आहे बऱ्याच संध्याकाळ एकमेकांच्या सहवासात घालवाणारे ते प्रेमीयुगुल एकमेकांचे निरोप घेत होते. दोघांचे डोळे अश्रूनीं डबडबले होते खरे पण ओठावरचं स्मित त्यांनी तसंच जपलं होतं. मुलीचं उच्च शिक्षणासाठी परवागी जाणं होतं आणि मुलाचं नोकरीमुळे शिक्षण थांबलेलं. कदाचित वर्षा दोन वर्षात तिचं लग्न लागेल आणि उच्चशिक्षित झाल्यावर तीचे आईबाप का बरे आपल्याला देतील? आपण नोकरी, घरखर्च व आयुष्य ह्यात इतके बांधले जाऊ की आता ह्या प्रेमचित्रपटाला वळण देणं हे आपल्याला तरी कधी जमणार? त्याच्या ह्या गप्पातील संदर्भानी कातळाला कसंस भरून आलं.नाही म्हटलं तरी त्यांच्या सगळ्या भेटीगाठी त्यानं पहिल्या होत्या. त्याच्या मनातील प्रेमांकुर ह्या कातळावरच फुटले होते. पुढे काहीदिवस ते नियतीने तसेच जपले होते. पहिल्या काही संध्याकाळ त्या दोघांनी नुसत्या अबोल शांततेच काढल्या. आपल्या मनातील भावना एकमेकांना उमगून दाखवणंदेखील त्यांना लगेच जमलं नव्हतं. हळूहळू ह्याच शांततेचं मोजक्या संभाषणात, मग प्रदीर्घ गप्पांमध्ये आणि कधीतरी उत्कट क्षणात रूपांतर झालं पण ह्या सगळ्याला एक सात्विक वळण होतं. आज त्याच सगळ्याचा एक शेवट आला होता. ह्या विचाराने तो मूक कातळही गहिवरला. असे अनेक प्रसंग तो रोज नव्याने पाहत होता. पण तरीदेखील असं काही घडलं की त्यालादेखील वाईट वाटे.

चार दिवसापूर्वी दोन नवरा बायको आपल्या वर्षाच्या मुलीला घेऊन देवीच्या पाया पडायला आले होते. दर्शन झाल्यावर जरा बसू ह्या विचारांनी त्यांनी कातळावर पाय मोकळे केले. शहरातून आल्यामुळे त्यांना तिथल्या चित्रस्वरूप दृष्याचं विशेषच अप्रूप वाटतं होतं.एरवी कथा कादंबऱ्यांमध्ये अनुभवतो ती शांतता त्यांना अनुभवायला मिळत होती. त्याच शांततेत त्यांच्या मनातील संवाद मोकळे झाले.
"लॉकडाउन नंतर बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो आपण नाही"
पत्नीने बोलायला सुरुवात केली.
"हो ना. खूप दिवसांनी असा निवांतपणा मिळाला " पतीने साथ दिली.
"तसं अवनी आता मोठी होईस्तोवर म्हणजे जरा तीन चार वर्षाची होईपर्यंत जरा कठीणच आहे म्हणा!"
"असं का म्हणतेस?"
"आपण येत जाऊ, फिरत जाऊ अधून मधून "
"पण तिला ला झेपेल का नीट प्रवास?" पत्नीने विचारले.
"आपण तिला रफ अँड टफ बनवणार आहोत. "
"ते तर झालंच म्हणा. गेलं आयुष्य इतकं भरभर सरलंय.लग्नानंतरचे दिवसपण फारच लवकर निघून गेले नाहीत."
पत्नी म्हणाली.
"तू ही बदललीयेस आता.."पतीच्या तोंडून पटकन निघून गेलं.
"मी एकटीच नाही, तू पण आता बदललायेस "
"पूर्वी वाटणारी ओढ कुठे राहिलीये आता??आता सगळं रुटीन झालंय."
पत्नीने उत्तर दिलं.
"असं तुला वाटतं "
पतीच्या ह्या वाक्यावर पत्नीने मनातलं सांगायला सुरुवात केली.
"नाही असंच आहे. कॉलेजात असताना माझा असा कोणता मित्र नव्हता. अभ्यास आणि घरचं वातावरण ह्यामुळे तिकडे फारसं लक्ष देणं झालंच नाही. वाटलं लग्न ठरल्यावर तरी हे सारं एन्जॉय करु. पण ते झाल्यावर सगळ्यांच्या अपेक्षा आणि नोकरी ह्यात आपण इतके वाहून गेलो आणि अवनी झाली आणि तिच्या रूपाततरी आनंद गवसला."
"हो पण म्हणून आयुष्य थांबलेलं नाहीये."
"ते नाहीच थांबत हे गेल्या वर्षात चांगलंच कळलंय मला."पत्नी ने पतीच्या वाक्यावर उत्तर दिलं
"हो पण आपण परत त्याच चुका नको करायला. आता आपण आयुष्यदेखील तितक्याच सवडीने एन्जॉय करु. आणि अवनीला देखील जीवनाचा आनंद घ्यायला शिकवू."पती म्हणाला.
"खरंय नाहीतरी आयुष्य अनुभवांनी समृद्ध होतं नाही. केवळ पैशानी नाही."थोडावेळ विचार करत पत्नी म्हणाली.

काही वेळ शांतता झाली आणि मग परत पती पत्नीचे संवाद सुरु झाले. बदलती परिस्थिती, सध्याचं वातावरण आणि त्यांची स्वप्न ह्यात ते गढून गेले.कातळाला त्यांना पहिल्यांदा बघूनही त्याच्याबद्दल बरंचसं आपलेपण वाटलं. खरं सांगायचं तर कातळाला त्यांच्यातील संवाद माहित होते.त्यांचं स्वरूप थोडंफार बदललं होतं इतकंच. अनेक संसाराला लागलेली जोडपीदेखील येत होती. त्यांच्यात होणारा बदल कातळाला चांगलाच ठाऊक होता.प्रेमात पडणारी त्यांची भाबडी मनं संसार नावाच्या वाटेला लागली की हळूहळू वास्तविक होयला लागतात. जगाची बोलचाल त्यांना कळायला लागते. त्याचा पोरकटपणा हळूहळू बोथट होऊन तिथे वास्तविक पोकतापणाची धार चढायला लागते. जी तशीच भाबडी राहतात ती कुस्करली जातात. काहींना नियती पुढे रेटते.काहीमात्र स्वतःला सावरत बदलत आयुष्यात पुढे जात राहतात.

कालची तरुणीदेखील तशीच होती. तरुणी म्हणजे अगदी लहान पोर नव्हे पण तारुण्याची निम्मी वाटचाल करत पुढे निघालेली. तिच्या कातळावर निवांत विचार करत बसण्यानी कातळालाच तिचा ठाव लागला होता. तिच्या वागण्यात बोलण्या चालण्यात तिनं बरंच काही सोसलंय असं कातळाला जाणवलं होतं. पण म्हणून हताश ती अजिबातच नव्हती. उलट रोज नव्याने आलेल्या दिवसाच्या प्रेमात पडण्याची कला ती शिकत होती. मैत्रिणींबरोबर ती अनेकदा कातळावर बसायला येई. गप्पा मारे.इकडचे तिकडचे विषय होत.आणि कधी कधी शांत निसर्गाचा अनुभव घेई. कधी वडापाव खात आजूबाजूचा परिसर न्याहाळे. कधी scooty घेऊन रोज चालवायला शिके. कातळाला तिचे कुतूहलच वाटे आणि कौतुकही. नियती कशीही असो पण आपण आपले पाय घट्ट रोवू शकलो की तिचेही आपल्यापुढे फारसे चालत नाही. ह्याचा अनुभव कातळाला अशा माणसांच्या परिचयाने झाला होता.

कातळासारख्या दगडानेदेखील आजवर बरंच काही अनुभवलं होतं. ते केवळ माणसाच्या सहवासात आल्यानेच.परवाच दोन कुणबीणी आपली पोरं घेऊन आल्या होत्या.त्यांनी देवीला कसला तरी नवस केला होता म्हणे.दोघींचे नवरे रोज दारू पिऊन येत आणि तमाशे करत. वेळप्रसंगी त्यांनी त्यांच्यावर हात चालवायचादेखील प्रकार केला होता. पोरांचीदेखील त्यांच्यापुढे काही बोलण्याची टाप नव्हती फारशी. बिचारी ती तर निष्पाप मनं. कातळास लहान पोरं फार आवडत. त्यांचा निरागसपणा बघण्यात त्याचा वेळ फार छान जाई. देवीची तितकी कृपा त्याच्यावर होती.त्यामुळे बरीच लहान पोरं त्याला पाहायला मिळत. ती त्याच्यावर सरकत, उड्या मारत. कधी त्यांच्या आईबापसंग तर कधी आजीआजोबांसोबत त्याच्या बाळलीला बघण्यात तो हरवून जाई.

पण आजच्या ह्या बायका फार शांत वाटत होत्या. एरवी पोरांना घेऊन देवीला येणाऱ्या बायकांसारखा त्यांचा कलकलाट नव्हता. नाहीतर अशा सांसारिक बायका आल्या म्हणजे त्यांच्या घरच्या गप्पा, शेजारपाजारच्या उठाठेवी, बाजारातले भाव हे सारंकाही एकमेकींना तिखटमीठ लावून सांगत. पोरं आपली खेळण्यात मग्न आणि बायका गप्पांमध्ये. पण आज तसा काहीच प्रकार नव्हता. पोरं तेवढी समोरच्या मातीत खेळत होती.पण बायका मात्र शांतच. एक डोळ्यातून आसवं गाळत होती आणि दुसरी मात्र शांतच होती.ती शून्यात पाहत होती खरी पण तिच्या डोक्यात काहीतरी विचार चालूच होता.
थोड्यावेळाने दोंघीचे संभाषण चालु झाले.

"ह्यो देवीचा नवस फळंल तर बरं व्हाईल. गोगट्यांची आजी सांगत व्हती, देवी लगच पावते म्हनून. नवरा चटदिशी जागावर आणील. तसं झालं तर देवीला चोळी घालू म्हटलं. आपली ऐपत तेवढीच हाय म्हणा. धुणंभांडी करुन असं कितीसं हाती येनार हायेत.पन देवीला माहिताय सारं. आय लेकरास्नी समजून घीलच न्हाई."
आसवं गाळणारीने आपले अश्रू पुसत शेजारणीस म्हटलं.पण शेजारीण अजून शांतच होती. तोंडातून सुस्कारा काढत कसलातरी विचार करत म्हणाली.
"हम्म "
"काय म्हटलीस??"दुसरीनं तसंच भाबड्या आशेने विचारलं.
"व्हय.. तसं झालं तर बरंच व्हाईल पन "
"पन काय म्हणत्येस??"दुसरीनं विचारलं.
"पन नाय झालं तर म्या काय आता थांबनार न्हाय."
" थांबनार न्हाय म्हंजी?? "
दुसरीनं काही न कळून विचारलं.
"काडीमोड घेनार."
"आता सगळं लय झालया. पोरं पदरात म्हनून थांबलीया."शांत बसलेल्या बाईंनी सांगितलं.
"अगं पन नवऱ्यास्नी सोडनं म्हंजी.काय बी झालं तरी नवरा हाय तो."दुसरीनी आपलं मत लगेच मांडलं.

"हो असल म्हनून काय झालं? आता कसंस काय?? प्रेमबीम न्ह्याय माझं. पोरांसाठी केलया सहन. आता नाही व्हायचं. आज माजावर हात धरील. उद्या पोरांवर. कसला नवरा अनं कसलं काय?"पाहिलीनी वैतागून उत्तर दिलं.

"अगं पन मग करनार काय??"दुसरीनी काकूळतिनी विचारलं.
"शहरास्नी जाईन. धुणंभांडी करेन, मावसभावाकडे राहीन काही दिवस. मग स्वतःचीं खोली पाहीन. पोरं साळत जातील. राबून खपून खायला घालीन त्यांस्नी. तसं पण आता मीच राबतिया."
हे ऐकून दुसरीनं आवासला.
"अगंपण नवरा म्हटलं की आलंच ह्यो सगळं. असाच तर लगीन हाय. त्याला टाकणं म्हंजी लोकं काय बोलतील?"
शेजारीण शांतपणे म्हणाली.
"लोकं आता काय कमी बोलत हाईत. उद्या पोरंबी तशीच झाली की लोकं ह्येच म्हननार बाप असलाच होता म्हनून. त्यांची काय मदद हाय.अनं कसला गं नवरा? लगीन काय म्या एकटीनंच केलंय. त्यानी कसही केलं तरी चालताय. फार झालया. पोरास्नी नगं का चारचोघांसारखं."

हे सगळं ऐकून ती आसवं गळणारी आवाकच झाली. असं काही पाऊल उचलण्याची ताकद तिच्यापाशी नव्हती किंवा तसा काही विचार तिच्या मनास शिवलाच नाही. संसार म्हणतात तो हाच आणि तो असाच निभवायचा हेच तिच्यावर बिंबवलं होतं.किंवा तिच्या मनानं घेरलं होतं. .एक आहे तेच निभावायला आणि दुसरी प्रसंगावर मात करुन पुढं जायला पहात होती. रोजचं मरण तिला नको झालं होतं. पण सारख्या परिस्थितीतुन जाणाऱ्या दोन व्यक्तींची मने देखील किती भिन्न असतात हे कातळास ठाऊक होतं. असे अनेक प्रसंग त्यानी पहिले होते आणि त्यात तो बरंच काही शिकला होता.

कातळ विचारात इतका हरवला की सायंकाळ संपून दिवसाची आता रात्रीकडे वाटचाल चालु झालीये हे त्याच्या लक्षात आलंच नाही. ते मित्रही आता घरी परतले होते.सगळीकडे रातकिडे सोडले तर कसलाही आवाज नव्हता. सगळं काही सामसूम होतं. देवीचा पुजारीदेखील सगळं आटपून घरी परतला होता. आता वातावरणात एक्कल्ली शांतता होती.पण रात्कीड्यांच्या आवाजाने ती भंग पावत होती.पण कातळाला कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. कुणीतरी पोरगं मुसमूसत कातळाकडे येताना दिसलं. क्षणभर शांत बसलं. आणि आता बसल्यावर परत स्वतःशी पुटपुटत रडणं चालु.पोरगं तारुण्यात आलेलं होतं. कातळ फारसा त्याला ओळखत नव्हता. त्याने पूर्वी त्याला ह्या वाटेला आलेलं पाहिलं नव्हतं. कातळ कान देऊन ऐकू लागला. पोरगं स्वतःशीच काहीतरी बडबडत रडत होतं.

"उगाच दिसली मला ती sssss"
"उगाच भेटलो तिला "
"काय नाही केलं मी तिच्यासाठी "
"घरी खोटं सांगून कल्याणला picture बघायला गेलो."
"ती आली तेव्हा सगळं जग थिटं झाल्यासारखं वाटतं होतं. वाटलं हा दिवस कधीच संपू नये. गेले काही दिवस किती खूष होतो आम्ही दोघं. पूर्वीही आनंद झालाय पण असा आनंद??"
"आता तिच्याशिवाय मनं तयारच होत नाही."
"कसलंच लक्ष लागत नाही."
"देवा असंच जर पुढे होणार होतं तर का हे दिवस तरी दिले?"
"कसं मी पाहिल्यासारखं वागू? जर मला काहीच दुसरं दिसत नाहीये"
कातळाला मुलाची दया आली. कदाचित हे त्याचं पाहिलंच प्रेम आणि पहिलाच प्रेमाभंग असेल. त्याचं वयदेखीलतर कोवळच आहे. त्यामुळे त्याचा आघातदेखील त्याला मोठा वाटत असेल.
पण अनेकवार पाहिलेल्या प्रसंगामुळे कातळाला ठाऊक होतं की आज त्याला तीव्र वाटणारं दुःख दिवसादिवसांनी बोथट होईल. त्याची थोडीफार जखम एक खूण म्हणून राहील.
पण नंतर त्याला त्याचा इतका त्रास होणार नाही. आणि आयुष्यात तो पुढे निघून जाईल. कारण इतक्या दिवसाच्या अनुभवातून कातळाला एक गोष्ट चांगलीच कळली होती ती म्हणजे आयुष्य पुढे जातच राहतं. ते कोणासाठीही थांबत नाही. आज त्या पोराला त्याला हेच सांगावंसं वाटत होतं पण तो बोलू शकत नव्हता. आज पहिल्यांदाच त्याला स्वतःच खुप वाईट वाटलं. जीवनाचं तत्वज्ञान इतके वर्ष पाहूनही त्याला कुणासमोर मांडता कधीच आलं नाही. काळाच्या ओघात तो सर्वस्वी बदलूनही त्याचा हा बदल फारसा कुणीच लक्षात घेतला नाही.जगाविषयीं कुठेही न जाता त्याला जे पाहायला मिळालं होतं ते त्याला कुणासोबतही व्यक्त कधीच करता आलं नाही. इतरांसाठी तो एक केवळ दगडच होता आणि दगड म्हणूनच राहिला. देवीच्या मूर्तीत बसवलेल्या पाषाणला तरी लोकं मानत, पाया पडत पण कातळ बिचारा तसाच उभा आहे. इतरांसाठी केवळ एक दगड म्हणून.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनेक घटीत-अघटीताच्या, अबोल साक्षीदाराचा अनुभव मांडण्याचा कल्पक प्रयोग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

त्याच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या भाव भावना, संघर्ष मांडण्याचा एक प्रयत्न..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतनागुणोक्तीचं सुंदर उदाहरण. कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या गावी देवीच्या देवळामागे खरंच असा कातळ आहे. मागच्यावेळेस गेले होते तेव्हा संध्याकाळी दोन मित्र गप्पा मारताना पाहिले आणि मनात विचार आला अशी किती संभाषणे यानी ऐकली असावीत आणि म्हटलं लिहावं. जगात अशी कितीतरी माणसं असतात ज्यांनी जग खऱ्या अर्थानी अनुभवलेलं असतं पण ती व्यक्त होत नाहीत त्यामुळे जग त्यांना अजाणतेपणानीच पाहतं. तेच मांडण्याचा एक प्रयोग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0