फाफे फॅफि

"ट्टाॅक्!" अक्साच्या समुद्रकिनाऱ्यावरचा वाॅचटाॅवर बघून बनेश आपसूक उद्गारला.

"उचलली जीभ, लावली टाळ्याला!" प्रसादने त्याला चिडवण्याची संधी सोडली नाही.

"मी विचार करतोय; ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर टेहळणी बुरूज असायचे, त्यांचीच ही अर्वाचीन आवृत्ती ना?" बनेश म्हणाला.

"किल्ल्याविना बुरूज!" प्रसादने उत्तर दिले. "आणि याचा हेतूही पूर्ण निराळा आहे. कोणी उगाचच समुद्रात पोहायला गेलं आणि गटांगळ्या खायला लागलं, तर या वाॅचटाॅवरवरच्या गार्डला दिसतं, आणि तो बुडणाऱ्याला वाचवायला धावत जाऊ शकतो."

"धावत? मला वाटलं की पोहत जावं लागेल." सुभाषने विनोद करायचा प्रयत्न केला.

"इथे दगड खूप आहेत रे. पायाला लागायची भीती. त्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या बीचवर जाऊया," शार्दूलने सुचवलं.

"मढ आयलंड? ते फार दूर नसेल. थांब, मी गूगल मॅप्सवर शोधतो," प्रसादने लगेचच खिशातून फोन काढला.

विद्यार्थी आदानप्रदान योजनेअंतर्गत पार्ले टिळक विद्यालयाचे दोन विद्यार्थी एका महिन्यासाठी विद्याभुवनला गेले होते. प्रसादच्या म्हणण्यानुसार बनेश आणि सुभाष यांना पाठवून विद्याभुवनने उट्टे फेडले होते. पण खरंतर प्रसाद आणि शार्दूलचं आपल्या पाहुण्यांशी चांगलं मेतकूट जमलं होतं. या रविवारी सकाळी सायकली हाणत अक्साला यायचा बूट शार्दूलने काढला होता, आणि इतर तिघांनीही त्याला अनुमोदन दिलं होतं.

"मढ आयलंड फार दूर नाहीये. पटकन पोचू." प्रसाद म्हणाला.

"हे इथलं बेट का?" फोनवर बोट ठेवत बनेशने विचारले. "पण इथे जायला काही पूल वगैरे आहे का?"

"नाही नाही. ते बेट नाही. मढ हे इथे उजवीकडे. त्याला आयलंड म्हणतात, पण खरंतर ते भूशीर आहे." प्रसादने शंकासमाधान केलं, आणि चौकडी आपापल्या सायकलींवर आरूढ होऊन निघाली.

मढ आयलंडला किनार्‍यावर मनसोक्त भटकल्यावर भाजलेल्या कणसाचा आस्वाद घेताना बनेशनं विचारलं, "गूगल मॅप्सवर दिसणारं ते बेट कोणतं?"

"काही ठाऊक नाही रे. कणीसवाल्या काकांना विचारूया," शार्दूल म्हणाला.

प्रसादने फोनवर नकाशा दाखवला तेव्हा कणीसवाले काका म्हणाले, "ते अंबू बेट. तिकडे फार कोणी नसतं. हां, उरूस असतो तेव्हा तोबा गर्दी असते."

चौघांच्याही मनात एकदम आलेला विचार सुभाषने बोलून दाखवला, "तिकडे जायला काही बोट वगैरे मिळेल का?"

कणीसवाले काका जरा विचार करून म्हणाले, "मिळेल. पण पाचशे रूपये लागतील. सोडायचे आणि दोन तासांनी परत आणायचे. जर एका तासात परत यायचं असेल तर हजार रूपये."

"कमी वेळाचे जास्त पैसे? हे कुठलं त्रैराशिक?" प्रसादनं विचारलं.

"सेपरेट बोट पायजे तर जास्त पैसे. मास्तरवाडीला जाणार्‍या फेरीला डायवर्ट करून सोडलं तर कमी पैसे. सिंपल!"

कणीसकाकांच्या सेपरेट बोटीच्या ऑफरएवढे पैसे विद्यार्थी कशाला खर्च करतील? त्यांनी दोन तासांचा पर्याय निवडला, आणि थोडेसे तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन ते लवकरच अंबू बेटावर पोहोचले.

बेटावर चिटपाखरू नव्हतं. थोडी पायपीट करून चौघांनी मंदिर, मशीद, चर्च तिन्हींचं बाहेरूनच दर्शन घेतलं, आणि मग जुन्या भुईकोट बुरूजाकडे मोर्चा वळवला.

"आणखी एक किल्ल्याविना बुरूज!" बनेश म्हणाला.

"इथे काय बरं ठेवत असतील?" शार्दूलने शंका काढली. "कैदी? धान्य? पैसाअडका?"

"इथे एक रुपया सापडला तर आपण याला रूपया बुरूज म्हणूया. आणि तिथे सेल्फी काढून नाव देऊया - रूपया बुरूज आणि धाडसी चमू!" सुभाषने विनोद करायचा आणखी एक प्रयत्न केला.

"आधी या दीपस्तंभावर जाऊया," बनेश म्हणाला आणि दीपस्तंभाच्या शिडीवरून माकडासारख्या चपळाईने चढूही लागला. बाकी तिघेही शिडीवरून चढू लागले.

बनेश अचानक थबकला, आणि तोंडावर बोट ठेवण्याची खूण करत खाली उतरू लागला. सर्वजण उतरल्यावर तो दबक्या आवाजात बोलू लागला, "बुरूजाच्या आत एकाला बांधून ठेवलंय. आणि दोन गुंड त्याला सुरा दाखवून धमकावत आहेत."

"आता काय करायचं?" सुभाषनं विचारलं. "सरळ आत जाऊन त्यांच्यावर हल्ला करायचा का?"

"जरा थांब," शार्दूल म्हणाला. "त्या गुंडांकडे फक्त सुरे आहेत, का बंदुका वगैरे?"

बनेशनं विचार केला. "बंदूक दिसली नाही, पण लपवलेलं पिस्तुल असेल तर कळणार नाही."

शार्दूल एकदम म्हणाला, "एक आयडीया आहे. किनार्‍याजवळ एका बोटीत मासेमारीची जाळी ठेवली आहेत. ती टाकून पकडलं तर?"

"ठीक आहे. मी जाळी आणतो. तुम्ही त्या गुंडांवर नजर ठेवा. सांभाळून हां," म्हणत सुभाष किनार्‍याकडे निघाला.

"आपण बुरूजात जाण्याऐवजी त्यांना बाहेर काढता आलं तर बरं होईल," बनेश म्हणाला.

"आयडिया. यूट्यूबवर एखादा व्हिडिओ मोठ्या आवाजात लावूया. आवाज ऐकून ते बाहेर येतील," प्रसाद म्हणाला.

"रेंज येतेय का इथे पण?" शार्दूलनं विचारलं.

"फिअर नाॅट. माझ्याकडे डब्ल्यूडब्ल्यूईचे डाऊनलोड केलेले व्हिडिओ आहेत!" प्रसाद हे सांगतोय तोवर सुभाष जाळी घेऊन परतला.

चौघांनी परत एकदा सल्लामसलत केली, आणि बुरूजाच्या दाराच्या दोन्ही बाजूंना दोनदोन जण तयार उभे राहिले. प्रसादने मोठ्ठ्या आवाजात व्हिडिओ लावला. कसला आवाज ते पहायला दोन्ही गुंड बाहेर आले. सुभाषने शिताफीने त्यांना मासेमारीच्या जाळ्यात अर्धबंदिस्त केले, आणि बनेशने आपल्या स्काऊटच्या दोरखंडाने बांधून त्यांना पूर्ण बंदिस्त केले.

"मारू नका. आमचे पैसे वगैरे घ्या, पण मारू नका!" गुंडांचे हे अनपेक्षित उद्गार ऐकून चौघे एकमेकांकडे बघून लागले.

"कोण आहात तुम्ही?" बनेशने विचारले.

"आम्ही वेब सिरीजचं शूटिंग करायला आलोय. घरगुतीच सगळं." एका गुंडानं सांगितलं.

"मग आत त्या बिचाऱ्याला बांधून ठेवलंय तो कोण?" शार्दूलनं विचारलं.

"तो माझा चुलतभाऊ. तोपण सिरीयलमधे काम करतोय," दुसरा गुंड म्हणाला.

"साॅरी साॅरी, सोडतो तुम्हाला," सुभाषने माफी मागितली पण प्रसादने त्याला थांबवले. "तुम्ही सगळेच अ‍ॅक्टर्स, तर मग शूटिंग कोण करतंय? आम्हांला गंडवताय काय?"

"ते बघा," एका गुंडाने मान वर केली. चौघांनी वर बघितलं; थोड्या उंचीवर एक ड्रोन उडत होता.

काही न बोलता बनेश आणि प्रसादने दोन्ही "गुंडांना" जाळ्यातून मुक्त केलं.

"एका दिवसासाठी भाडं देऊन ड्रोन घेतला, आता तेपण पैसे फुकट गेले." एक "गुंड" सात्विक संतापानं बोलला. पण आता काहीच करण्यासारखं नव्हतं. सुभाषनं कचोरी-बालूशाहीची पिशवी उघडली, तेव्हा वातावरण थोडं निवळलं.

थोड्या वेळानं वेब सिरीजवाल्यांची निर्माता-दिग्दर्शक मढवरून बोट घेऊन आली. तिचे नट मान खाली घालून उभे होते. पण तिने "ब्राव्हो!" म्हणतच किनार्‍यावर उडी मारली.

"कसले मस्त अनस्क्रिप्टेड शाॅटस् आलेत! स्टोरीलाईन बदलीन मी. पण असले व्हिज्युअल्स म्हणजे हे एकदम हिट होणार!" ती उत्साहाने बोलत होती. बनेश आणि त्याच्या मित्रांकडे वळून ती म्हणाली, "तुमची काही हरकत नाही ना? तुम्हांला क्रेडिट देईन अर्थातच!"

बनेशने मित्रांशी विचारविनिमय केला, आणि तिला आपला निर्णय सांगितला.

लवकरच यूट्यूबवर आलेल्या इंडी शाॅर्टला उत्तम प्रतिसाद मिळाला. काही समीक्षकांनी तिची तुलना "जाने भी दो यारों"बरोबर केली. विद्याभुवन आणि पाटिवितली मुलं मात्र सुरूवातीचे क्रेडिट्सच पुन्हापुन्हा पाहत:

"चुलीवरच्या शाॅर्टफिल्म्स सादर करत आहेत

बनेश, प्रसाद, शार्दूल आणि सुभाष या पाहुण्या कलाकारांसह

रूपया बुरूज आणि धाडसी चमू"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा हा हा डेडली मस्त आहे हे!
आणि भा. रां. ची शैली आणि तुझीसुद्धा मस्त मिळून आलीये!!
आगे बढो फा फे (पन इन्टेन्डेड)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'रुप्या बुरूज आणि धाडसी चमू' हे ईनिड ब्लेटनच्या एका कथेचं ज्ञानदा नाईकांनी केलेलं मराठी रूपांतर.
'किशोर' मासिकाच्या १९८५-जून*च्या अंकात सुरू झालेली ही रंजक कथा १९८५-ऑक्टोबरपर्यंत चालली. अंकांचे दुवे -
जून*, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर.

पुस्तक स्वरूपातही ही कथा इथे उपलब्ध आहे.

*'न'वी बाजू ह्यांनी चूक दाखवल्यानंतर केलेली सुधारणा. त्यांचे आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा संदर्भ माहीत नव्हता. (आणि म्हणूनच, लक्षात नाही आला.)

-----------

(अवांतर:) एनिड ब्लायटनच्या कोठल्या कथेचे रूपांतर म्हणे हे? (तेथे 'किशोर'मध्ये फक्त 'फेमस फाइव्ह' इतकाच उल्लेख केलेला आहे. त्या मालिकेतील कोठले पुष्प, याबद्दल काहीही नाही.) (अर्थात, 'फेमस फाइव्ह' मालिकेतील कोठलेच पुष्प मी वाचलेले नसल्याकारणाने, मला तरीही लिंक लागणार नाही, हे वेगळे. परंतु तरीही, केवळ कुतूहल म्हणून.) (एनिड ब्लायटनच्या इतर मालिकांतील काही पुष्पे मी वाचलेली आहेत, परंतु, फेफा-मालिका वाचण्याचा कधी योग आला नाही. असो.)

----------

(सवांतर:) जुलैच्या नव्हे. जूनच्या.

----------

(अतिअवांतर - १:) त्या कथेतील कुत्र्याचे का होईना, परंतु, नाव 'तैमूर' आहे. म्हणजे, निदान १९८५च्या इसवीपर्यंत तरी 'तैमूर' हे नाव भारतवर्षात आक्षेपार्ह नव्हते तर!

----------

(अतिअवांतर - २:) त्या कथेतील तैमूर इंग्रजीतून 'वुफ वुफ' असे भुंकतो. मराठी कथेतील कुत्र्याने 'भू भू' म्हणून भुंकावे, ही अपेक्षा तथा मागणी अति नसावी. शिवसेना, मनसे आदि मराठी पक्ष यात लक्ष घालतील काय?

==========

असो, तर (देवदत्त यांच्या) मूळ कथेबद्दल. हे असे संदर्भ हुकल्यामुळे तितकीशी मजा आली नाही; परंतु, तो दोष सर्वस्वी माझा! (किंबहुना, फॅफि जॉन्रची ती मर्यादा असावी.)

मात्र, जाता जाता एक शंका: हे फाफे फॅफि आहे, की फाफे(/भा.रा. भागवत) तथा फेफा(/एनिड ब्लायटन) या दोन्हीं जॉन्रांची संयुक्त पॅरडी(/हजामत)?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे खरंच फॅफि आहे हो.

(स्वगत: एकदा नाव कानफाट्या पडलं की ... )

बाय द वे, अंबू बेटाबद्दल हा एक लहानसा व्हिडीओ आहे.

https://www.youtube.com/watch?v=16JsRvO4emg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवसेना, मनसे यांना मराठी पक्ष म्हटल्याबद्दल तुमचा निषेध. पोरं कॉन्व्हेंटात शिकणाऱ्यांचे पक्ष मराठी कसे? हां, भाऊबंदकी हे एकमेव मराठी वैशिष्ट्य मात्र म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0