बॅड ब्लड - जॉन कॅरीरु

Bad Blood

नुकत्याच चालू झालेल्या एखाद्या छोट्याश्या कंपनीचं मूल्यांकन झपाट्याने एक अब्ज डॉलर्सच्या वर गेलं की तिला व्हेंचर कॅपिटॅलिस्ट भाषेत ‘युनिकॉर्न’ म्हणतात. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सॅनफ्रान्सिस्कोजवळ पालो अल्टो नावाचा एक भाग आहे, तिथे अशा अनेक छोट्या कंपन्या त्यांचं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्नशील असतात. १९९०च्या आसपास सॅनफ्रान्सिस्को बे एरिआमध्ये प्रामुख्याने असलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाच्या कंपन्यांमुळे तो भाग 'सिलिकन व्हॅली' म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून आजपर्यंत या सिलिकन व्हॅलीनं जगाला अनेक रत्नं दिली आहेत. आपल्या आयुष्यात मिसळून गेलेल्या 'गूगल', 'फेसबुक', 'अ‍ॅपल' अशा कंपन्यांची सुरुवात इथून झाली, आणि त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. छोटी कंपनी युनिकॉर्न श्रेणीत आली, की तिला एखादी मोठी कंपनी विकत घेते किंवा मग ती युनिकॉर्न कंपनी स्वतःच शेअर बाजारात पदार्पण करते. 'फेसबुक', 'उबर', 'एअर बीएनबी', 'फ्लिपकार्ट' अशा अनेक कंपन्या काही काळ युनिकॉर्न श्रेणीत होत्या. त्या आता वेगवेगळ्या मार्गे मोठ्या झाल्या आहेत. 'उबर'च्याच उदयाच्या काळात तिच्या जोडीला राजकारण्यांनी आणि व्हेंचर कॅपिटॅलिस्ट लोकांनी लाडावलेली अजून एक कंपनी होती. तिचं नाव थेरानॉस. या कंपनीचा प्रवास मात्र उलट्या दिशेनं झाला. त्या घसरणीतलं प्रत्येक वळण थक्क करून टाकणारं, तसंच विचार करायला लावणारं आहे.

पुलित्झर पुरस्कार मिळालेल्या जॉन कॅरीरु या पत्रकारानं वॉल स्ट्रीट जर्नल नावाच्या अमेरिकन नियतकालिकातून या कंपनीतल्या घोटाळ्यांना, पहिल्यांदा वाचा फोडली. त्या बातमीनंतर अनेक बेसावध लोक सावध झाले आणि अनेकांची नजर असलेली सिलिकन व्हॅलीमधली सगळ्यांची लाडकी कंपनी एकाएकी बंद झाली. कंपनीचे संस्थापक एलिझाबेथ होम्स आणि सनी बलवानी यांच्यावर सध्या अमेरिकेत फसवणुकीचा खटला चालू आहे. येत्या काही दिवसांतच सुनावणी होणार आहे. त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले तर त्यांना वीस वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या सगळ्या प्रकारावर बातमी करून झाल्यावर जॉन कॅरीरुनं त्यावर 'बॅड ब्लड' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकावर आधारित असलेल्या आगामी चित्रपटात जेनिफर लॉरेन्स एलिझाबेथ होम्सच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावर 'एचबीओ'नं 'इन्व्हेंटर' नावाचा एक माहितीपटही केला आहे, तो भारतात 'डिस्नी हॉटस्टार'वर उपलब्ध आहे. 'इन्व्हेन्टर' बघूनच मला पुस्तक वाचायची इच्छा झाली. या माहितीपटात दाखवलेल्या काही तांत्रिक गोष्टींबद्दल जास्त खोलात जाऊन वाचावंसं वाटलं, म्हणून मी हे पुस्तक घेतलं.एबीसी न्यूजनंही यावर 'द ड्रॉप आऊट' नावाचा एक माहितीपट केला आहे. तोही आवर्जून बघण्यासारखा आहे.

मी मोठी होऊन 'बिलियनेयर' होणार' असं एलिझाबेथ होम्सनं लहानपणीच ठरवलं होतं. एका नातेवाईकानं यावर, "पण तुला प्रेसिडेंट व्हायचं नाही का?" असं विचारल्यावर ती म्हणाली, "मी बिलीयनेयर झाले की प्रेसिडेंट माझ्याशी लग्न करेल." हे जरी एका लहान मुलीचे बालिश उद्गार असले, तरी तिच्या पुढच्याआयुष्यातल्या कामगिरीकडे बघता ती तिच्या आयुष्यामधल्या एका भावी वळणाची भविष्यवाणी होती असंच म्हणावं लागेल. एलिझाबेथच्या पणजोबांचा यीस्ट बनवायचा मोठा व्यवसाय होता. पण त्यात कमावलेलं सगळं धन मधल्या एका पिढीनं खर्च केल्यामुळे एलिझाबेथच्या आईबाबांच्या वाट्याला त्यातलं फार काही आलं नाही. एलिझाबेथचे बाबा एके काळी एन्रॉन कंपनीचे उपाध्यक्ष होते. पण त्या कंपनीच्या भानगडी चव्हाट्यावर आल्यावर त्यांच्यावर काही काळ बरीच तणावपूर्ण परिस्थिती ओढवली होती.

स्टॅनफर्ड विद्यापीठात रासायनिक अभियांत्रिकीची (chemical engineering) पदवी घ्यायला एलिझाबेथ दाखल झाली. आणि काही दिवसांतच 'आपल्याला पीएचडी वगैरे करण्यात वेळ न घालवता पैसे कमवायचे आहेत' असं तिला वाटायला लागलं. एका इंटर्नशिपसाठी सिंगापूरला गेलेली असताना एलिझाबेथ एका रक्त तपासाच्या प्रयोगशाळेत काम करत होती. तेव्हा, म्हणजे २००२मध्ये, सार्स विषाणू त्या भागात धुमाकूळ घालत होता. एखादी रक्तचाचणी करताना कोपराच्या पुढच्या नसेतून रक्त ओढून घेतलं जातं (venipuncture). या प्रक्रियेत एक मोठी सुई नसेत खुपसून पाच ते दहा मिलिलिटर रक्त काढून घेतलं जातं. अनेकांना या पद्धतीची भीती वाटते. एलिझाबेथ त्यांतलीच एक होती. त्यामुळे तिच्या डोक्यात एक कल्पना आली. नसेतून मोठ्या प्रमाणात रक्त न काढून घेता जर रक्तचाचण्या करता आल्या तर? ही कल्पना सुचली तेव्हा एलिझाबेथ अवघ्या अठरा वर्षांची होती. पण अमेरिकेत परत आल्यावर तिनं शरीरावर चिकटवायच्या एका पट्टीचं पेटंट काढलं. या पट्टीमधून सतत रक्त तपासलं जाईल आणि काही आजार उद्भवतोय असं वाटलं तर लगेच तिथूनच औषध देता येईल, अशी त्या पट्टीमागची कल्पना होती. हे सगळं एखाद्या विज्ञानकथेत शोभेल असं वाटलं, तरी आत्ताच्या काळात ते हास्यास्पद ठरावं असंच आहे. पुढे अनेक बारीकसारीक बदल करून या कल्पनेची अनेकदा पुनरावृत्ती झाली. शेवटी दहा मायक्रोलिटर रक्त वापरून ८०० रक्तचाचण्या करायची महत्त्वाकांक्षी कल्पना एलिझाबेथनं मनावर घेतली. फक्त बोटावर एक छोटं छिद्र पाडून त्यातून येणाऱ्या रक्ताच्या थेंबातच सगळ्या चाचण्या करता येतील आणि लोकांना प्रयोगशाळांमध्ये जावंच लागणार नाही, असं यंत्र आपण बनवायचं अशी तिची कल्पना होती. पण विश्लेषणात्मक रसायशास्त्राच्या (analytical chemistry) अभ्यासकांची मतं या कल्पनेबद्दल अर्थातच फारशी बरी नव्हती. तिनं तिची कल्पना स्टॅनफर्डमधल्या अनेक प्राध्यापकांना ऐकवली. पण त्यातल्या बऱ्याच जणांनी असं करता येणं अजिबात शक्य नाही हे तिला समजावून सांगितलं.

तरीही स्टॅनफर्डमधल्या एका प्राध्यापकांच्या गळी ती कल्पना उतरवायचा तिचा प्रयत्न यशस्वी झाला. त्या प्राध्यापकांचं नाव होतं चॅनिंग रॉबर्टसन. त्यानंतर तिच्या बालमैत्रिणीच्या व्हेंचर कॅपिटॅलिस्ट वडिलांकडून भांडवल मिळवलं आणि स्वतःची कंपनी चालूदेखील केली. काही दिवसातच 'थेरपी' आणि 'डायग्नोसिस' हे दोन शब्द मिसळून 'थेरानॉस' कंपनी उदयाला आली. तेव्हा एलिझाबेथ अवघ्या १९ वर्षांची होती. बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झकरबर्गप्रमाणे आता तिच्यावरही 'ड्रॉपआउट'चा शिक्का बसला होता. एखाद्या मोठ्या विद्यापीठात प्रवेश मिळवून मग शिक्षण सोडून देऊन काहीतरी अद्वितीय करून दाखवणं हे आता या क्षेत्राला इतकं सवयीचं झालंय, की शिक्षण पूर्ण करून आलेल्यांपेक्षा अर्धवट सोडून आलेल्यांकडे जास्त आदरानं बघितलं जातं! पण एलिझाबेथनं ज्या क्षेत्राची निवड केली होती, ते क्षेत्र म्हणजे फक्त संगणकीय तंत्रज्ञान नव्हतं. तिला जे करायचं होतं, त्यात वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवरसायनशात्र, संगणकीय तंत्रज्ञान आणि यंत्र तयार करण्याचं तंत्रज्ञान, अशा विज्ञानाच्या अनेक शाखा एकत्र येणार होत्या. जर या सगळ्या शाखांचं काम सुरळीतपणे एकत्र आलं नाही तर अक्षरशः लोकांच्या जीवावर बेतण्याचा धोका होता. फेसबुकसारख्या कंपनीच्या आलेखाशी या कंपनीची तुलना करताना लक्षात ठेवायला हवं की फेसबुक, गूगल या कंपन्यांच्या उत्पादनांनी आपली आयुष्य बदलून टाकली असली तरी अशा प्रकारच्या धोक्यांना आपल्याला त्यांच्यामुळे सामोरं जावं लागत नाही. तसंच ती तयार करण्यासाठी एक संगणक आणि कोडिंगमध्ये निष्णात लोक एवढंच गरजेचं असतं.

खरं तर इतक्या कमी प्रमाणात असलेल्या रक्तावर एवढ्या सगळ्या चाचण्या करणं का अशक्य आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे यावर एखादं प्रकरणच पुस्तकात असायला हवं होतं. रक्तामध्ये सापडणारे घटक एका विशिष्ट प्रमाणात आढळले तर ते नॉर्मल असतात. त्यांचं प्रमाण सर्वसाधारण प्रमाणापेक्षा खाली किंवा वर गेलं, तर आपल्याला आजार आहे असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ वरच्या आणि खालच्या दोन्ही, तसंच मधल्या सगळ्या संख्या चाचणीयंत्राला नीट पकडता आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, रक्तशर्करा दर डेकालिटरमागे ७० मिलिग्रॅम या प्रमाणाच्या खाली गेली, की आपण त्याला 'हायपोग्लायसीमिया' म्हणतो. पण हे एकाच चाचणीतून कळलेलं प्रमाण झालं. आपलं यंत्र एकापाठोपाठ एक अशा अनेक चाचण्या करून जर दर वेळी वेगवेगळं उत्तर देत असेल, तर त्या आकड्याला काही अर्थच उरत नाही. रासायनिक पृथक्करणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे, ज्या पदार्थातून (इथे रक्तातून) आपल्याला एखादा घटक (इथे शर्करा, पोटॅशियम, टीएसएच) तपासायचा आहे, तो पदार्थ जितक्या जास्त प्रमाणात उपलब्ध असेल, तितकी अचूक उत्तरं काढता येतात. पदार्थ जितका कमी प्रमाणात उपलब्ध असेल, तितकं त्यांचं पृथक्करण करणं मापकयंत्रांना कठीण होत जातं. कितीही सरस तंत्रज्ञान असलं, तरी एका नळीतून, बाटलीतून, पायपेटमधून जेव्हा तपासायचा पदार्थ हलवला जातो, तेव्हा दर हलवाहलवीमध्ये पदार्थ थोडथोडा वाया जातो. त्यात उत्तरोत्तर घट होत जाते. ही घट टाळणं वा कमी करणं अत्यंत अवघड आहे. आणि उपकरण जितकं लहान, तितकं उत्तरं चुकायचं प्रमाण जास्त हा त्या कृतीचाच गुणधर्म म्हणता येईल. त्यात बदल घडवणं कुणाच्याही हातात नाही.

मापकयंत्राच्या साहाय्याने या घटकांचं पृथक्करण नीट करता येतं हे सिद्ध करून दाखवण्याचे अनेक मार्ग असतात. हे पुन्हा-पुन्हा केल्यावरही दर वेळी दिसणार्‍या विशिष्ट चढ-उतारांसह ते एका विशिष्ट प्रमाणातच येतं आहे हे सिद्ध करून दाखवण्याला 'व्हॅलिडेशन' असं म्हणतात. थोडक्यात, व्हॅलिडेशन म्हणजे एखाद्या मोजणीपद्धतीचा अचूकपणा पडताळून बघणे. आधी एका यंत्रावर अनेक वेळा एकच नमुना, मग एकाच प्रयोगशाळेतल्या दोन यंत्रांवर अनेक वेळा तोच नमुना, वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडून, वेगवेगळ्या तापमानाच्या वेळांना, अशा अनेक प्रयोगांच्या अनेक जोड्या एकमेकांशी ताडून हा अचूकपणा तपासला जातो. एका प्रयोगशाळेत हे काम झालं की अनेक प्रयोगशाळांत एकाच वेळी अशीही पडताळणी करून बघावी लागते. प्रत्येक देशात प्रयोगशाळांच्या परीक्षा घेणाऱ्या मान्यताप्राप्त संस्था असतात. दर काही महिन्यांनी, प्रयोगात भाग घेतलेल्या प्रयोगशाळांना एकच नमुना अनेक भाग करून पाठवला जातो, जेणेकरून सगळ्या प्रयोगशाळांना मिळणारा नमुना एकाच प्रकारचा असावा. तरीही सगळ्यांचं उत्तर जवळपासचं आलं, म्हणजेच सगळ्या प्रयोगशाळांची उत्तरं सरासरी उत्तराच्या आजूबाजूला नीट बसली, तर ती पडताळणी उत्तीर्ण होते. याला 'प्रोफिशियंसी टेस्टिंग' म्हणजेच 'प्रावीण्य-चाचणी' असं म्हणता येईल.

नवीन तंत्रज्ञान असेल तर त्याची तुलना अशाच प्रकारे जुन्या यशस्वी तंत्रज्ञानाशी करून दोन्हींची उत्तरं सारखी येतात हे सिद्ध करायला लागतं. कुठलीही विश्लेषणात्मक पद्धती विकसित करायचा हा पाया आहे. जोपर्यंत या सगळ्या तुलनांमध्ये, तुमची पद्धत जवळपासची (म्हणजे सरासरीहून ठरावीक प्रमाणातच मागे वा पुढे असलेली) उत्तरं देत नाही, तोपर्यंत ती वापराला योग्य मानली जात नाही. हा अभ्यास झाल्यावर त्या-त्या देशांतल्या नियामक संस्था (Food and Drug Administration एफ.डी.ए) तुमचं काम तपासतात. आणि त्यांच्या निकषांमध्ये ते बसत असेल, तर कामाला मान्यता मिळते. या प्रकारचे कुठलेही निकष व नियम गांभीर्यानं न घेता थेरानॉसचा कारभार चालू होता. प्रावीण्य-चाचणीचे नमुने थेरानॉसच्या नवीन यंत्रांवर न मोजता इतर सर्वसाधारण प्रयोगशाळांतून असणार्‍या यंत्रांवरच मोजले जात होते. ही नुसतीच फसवणूक नव्हती. हा कायदेभंगही होता!

'एफ.डी.ए.'पासून सुटका करून घेण्यासाठी एलिझाबेथ आणि सनी यांनी एक पळवाट शोधून काढली. 'एफ.डी.ए.'चे जाचक नियम प्रयोगशाळेत विकसित केलेल्या पद्धतींना लागू नव्हते. त्यांना 'लॅबोरेटरी डेव्हलप्ड टेस्ट' (LDT) अशी संज्ञा वापरली जाते. एखाद्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनं जर तिथल्या यंत्रांच्या साहाय्याने एखादी पद्धत तयार केली, तर त्यांना 'एफ.डी.ए.'कडून तपासणी करून घ्यावी लागत नाही. पण अशा प्रयोगशाळा सातत्यानं निरनिराळे शोधनिबंध लिहून त्यांचं काम प्रकाशित करत असतात, असं गृहीतक ही सवलत देण्यामागे होतं. थेरानॉसनं असं काहीही प्रसिद्ध केलं नाही. त्यामुळे ते इतकी लहान उपकरणं वापरून नेमकी उत्तरं कशी काढतात हे जगासमोर कधी आलंच नाही. तसंच दहा मायक्रोलीटर रक्त वापरायचा अट्टहास बाळगल्यामुळे, ही पद्धत विकसित करताना, मिळालेल्या नमुन्यांमध्ये सलाईन घालून ते नमुने त्यांना पातळ करावे लागायचे. त्यामुळे त्या चाचण्या सतत चुकीची उत्तरं द्यायच्या.

या सगळ्या अडचणी थेरानॉसचे अनेक कर्मचारी वेळोवेळी एलिझाबेथच्या कानावर घालत होते. पण कंपनीच्या विरोधात बोलणाऱ्यांना वाळीत टाकायचं किंवा काढूनच टाकायचं असा संचालकांचा खाक्या होता. अनेक तरुण लोक स्टॅनफर्ड, हार्वर्ड, कॅलटेक अशा मोठमोठ्या विद्यापीठांतून थेरानॉसमध्ये काम करायला आले आणि काही दिवसांतच भ्रमनिरास होऊन निघून गेले. आपल्याला जशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करायचं होतं, तसं ते होत नाही हे कळायला लागल्यावर एलिझाबेथ आणि सनीनं कर्मचाऱ्यांवर चक्क पाळत ठेवायला सुरुवात केली. तसंच, अभियांत्रिकी, रसायनशास्त्र आणि गुणवत्ताचाचणी विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी बोलू नये याची खबरदारी कंपनीतर्फे घेण्यात येऊ लागली. सोडून जाणाऱ्या लोकांकडून कंपनीमधली माहिती बाहेर फुटू नये म्हणून जाचक करार करून घेण्यात येऊ लागले. आणि करार न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे वकिलांचा ससेमिरा लावून त्यांना जेरीला आणण्यात येऊ लागलं. यादरम्यान केम्ब्रिज विद्यापीठाची पीएचडी आणि अनेक पेटंट्स मिळवलेला इयन गिब्बन्स नावाचा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ थेरानॉसमध्ये काम करता करता इतका खचला, की शेवटी त्यानं आत्महत्या केली.

पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं, की इतक्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिकलेली, काम केलेली माणसं एलिझाबेथ आणि सनीसारख्या तद्दन फालतू लोकांपुढे इतकी हतबल कशी काय होत असतील? पण सत्तेचा आणि पैशांचा दुरुपयोग करून कर्मचाऱ्यांना सतत भयग्रस्त ठेवल्यानं काही वेळानं त्या वातावरणाची इतकी सवय होत असावी, की यातून आपण बाहेर पडू शकू असा विश्वासही वाटेनासा होत असावा.

प्रयोगशाळेत येणारं अपयश दृष्टीआड करायला एलिझाबेथनं कंपनीच्या संचालकमंडळात एकापेक्षा एक प्रसिद्ध आणि प्रतिथयश व्यक्तींचा भरणा केला. अमेरिकी सुरक्षायंत्रणेत आणि सरकारी पदांवर यशस्वी कामगिरी केलेले राजकारणी या मंडळात होते. यातच अमेरिकेचे पूर्व परराष्ट्र सचिव जॉर्ज शुल्झ होते. योगायोगानं त्यांचा नातू टायलर काही काळ या कंपनीमध्ये रुजू झाला आणि हे सगळं प्रकरण बाहेर काढायला त्यानं जॉन कॅरीरुला मदत केली. सुरुवातीला राजीनामा देऊन जेव्हा तो आजोबांना खरी परिस्थिती सांगायला गेला, तेव्हा आजोबांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला साफ नकार दिला. कंपनी सोडून गेलेल्या एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन तो पुन्हा आजोबांना खरी परिस्थिती सांगायला गेला, तेव्हाही "तुम्ही तरुण आहात. दुसरीकडे काम बघा," असा सल्ला देऊन आजोबांनी त्याची बोळवण केली. जॉर्ज शुल्झ ९४ वर्षांचे होते. त्यांच्यावर या वयात मानहानीचा प्रसंग ओढवू नये म्हणून टायलरनं बरेच प्रयत्न केले. शेवटी त्याच्याकडे 'व्हिसल ब्लोअर' होण्यावाचून काहीच पर्याय उरला नाही. टॅप न करता येणारे फोन वापरून टायलर कॅरीरुला माहिती पुरवायचा. तरीही एलिझाबेथ आणि सनीनं टायलरला पकडून त्याच्यावर खटला भरला. आईवडिलांकडे बक्कळ पैसे असल्यानं टायलर तो खटला शेवटपर्यंत लढू शकला आणि जिंकला.

यासगळ्या संचालकमंडळावर मोहिनी घालणारी एलिझाबेथ होती तरी कशी? आणि तिनं या भल्या-भल्या मंडळींवर मोहिनी घालणं जमवलं कसं? तिनं तिच्या वेशभूषेत मोठा बदल केला होता. तिला स्टीव्ह जॉब्सचं वेड असल्यासारखं होतं. त्यामुळे त्याच्यासारखेच पूर्ण काळे, टर्टलनेक शर्ट ती घालायची. तिचे डोळे मोठे आणि निळेशार आहेत. लोकांशी बोलताना ती पापण्या अजिबात न हलवता बोलायची, त्यामुळे ती त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देते आहे असं लोकांना वाटायचं आणि ते हरखून जायचे. तिचा खरा आवाज एखाद्या बाईसारखा वरच्या पट्टीतलाच असला, तरी ती कृत्रिम आवाज काढून खर्जात बोलायची. तिला पहिल्यांदा भेटल्यावर अनेकांना तिचा आवाज ऐकून धक्का बसायचा. तिनं तिच्या खोट्या व्यक्तिमत्त्वाचा एक देखावाच रचला होता. इराक युद्ध बघितलेले, सैन्यात काम केलेले, निष्णात वकील असलेले अनेक पुरुष तिच्या या देखाव्याला भुलत राहिले. कुणाला ती आपली नात वाटायची, कुणाला मुलगी. ती काही चूक करू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसू नये इतपत परिस्थिती आली होती. तिच्यापेक्षा वयानं वीस वर्षांनी मोठा असलेल्या सनीबरोबरचं तिचं प्रेमप्रकरणही तिनं यांच्यापासून लपवून ठेवलं होतं. हे सगळं किती विचित्र आहे हे आजूबाजूला वावरणार्‍या कर्मचार्‍यांना कळायचं. पण त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवायचं नाही.

तंत्रज्ञानाबद्दल प्रचंड गोपनीयता आणि एलिझाबेथनं प्रयत्नपूर्वक कमावलेली प्रसिद्धी या दोन गोष्टींच्या जोरावर थेरानॉसनं 'वॉलग्रीन्स'सारख्या दिग्गज कंपनीबरोबर करार केला. सेफवे आणि वॉलग्रीन्स या दोन कंपन्यांनी थेरानॉसची उपकरणं त्यांच्या दुकानांत ठेवून छोट्या-छोट्या प्रयोगशाळा उभारायचं ठरवलं. अ‍ॅरिझोनामध्ये हे सगळं काम चालूही झालं, पण तेव्हाही त्यांची उपकरणं सातत्यानं चुकीचीच उत्तरं देत होती. पोटॅशियमचं प्रमाण तर इतकं जास्त दिसायचं, की कधी-कधी आलेला अहवाल मृत व्यक्तीचा आहे का असा प्रश्न तो वाचणाऱ्या डॉक्टरांना पडायचा. 'थेरानॉस'नी दिलेले अहवाल बघून अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल व्हायचे आणि तिथे पुन्हा तपासण्या केल्यावर आधीचे अहवाल चुकीचे होते हे लक्षात यायचं. हे होत असतानाच जॉन कॅरीरुनं या सगळ्याचा गौप्यस्फोट 'वॉलस्ट्रीट जर्नल'मधून केला. त्या वेळी 'थेरानॉस'चं मूल्यांकन ९ अब्ज डॉलर इतकं प्रचंड होतं आणि थेरानॉस कंपनी ही उबर आणि स्पॉटीफाय या समकालीन कंपन्यांच्या पुढे होती. एलिझाबेथकडे कंपनीची ५०% मालकी असल्यामुळे तिची वैयक्तिक संपत्तीही ४.५ अब्ज डॉलर्स एवढी होती.

या शिखरावरून शून्यावर यायला तिला फार वेळ लागला नाही. २००३ साली चालू झालेली कंपनी, २०१६मध्ये कॅरीरूनं केलेल्या लिखाणामुळे २०१८ साली पूर्ण बंद झाली. एलिझाबेथ आणि सनी दोघांवरही खटले भरले गेले.

विशेष म्हणजे, ज्या 'वॉलस्ट्रीट जर्नल'मध्ये ही बातमी आली, तिचे सर्वेसर्वा असलेले रुपर्ट मरडॉख 'थेरानॉस'मधले एक गुंतवणूकदार होते. अशी बातमी येणार आहे याचा सुगावा एलिझाबेथला जेव्हा लागला, तेव्हा तिनं थेट त्यांचा नंबर फिरवला. पण, "जिथे बातमीच नसेल, तिथली बातमी आमचे पत्रकार छापणार नाहीत. आजवर मी ढवळाढवळ न करताही 'वॉलस्ट्रीट जर्नल' चांगलं चालू आहे. मला ते तसंच चालू ठेवायचं आहे." असं उत्तर त्यांनी तिला दिलं. ही या प्रकरणातली अतिशय दिलासादायक बाब आहे. जॉनवर विश्वास ठेवून, त्याच्या कामात ढवळाढवळ न करता, त्याला त्याची बातमी करू देणाऱ्या रुपर्टकडून एलिझाबेथनी भांडवलाबरोबरच व्यवस्थापनाचेही धडे घ्यायला हवे होते.

हे सगळं वाचत असताना सतत आपल्या आजूबाजूला कमी-अधिक प्रमाणात घडणाऱ्या अशाच गोष्टी आठवत राहतात. अनेक वेळा तंत्रज्ञ त्यांना कशी उत्तरं हवी आहेत हे आधी ठरवतात आणि मग ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण विज्ञान असं चालतं का? आधीच निष्कर्ष लिहून मग प्रयोग करायचे हे काही वेळा एक गृहीतक म्हणून वापरायला हरकत नाही. पण आपल्याला जे करायचं आहे ते शक्य नाही हे कळल्यावर पुन्हा वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करायला हवी. कोणत्याही सच्च्या शास्त्रज्ञाला सर्वांत जास्त क्लेश कोणत्या गोष्टीनं होत असतील, तर त्याचा वा तिचा फसलेला प्रयोग कुणीतरी खोटेपणा करून विकतं आहे या गोष्टीनं. कंपनीचं अब्जावधींचं मूल्यांकन असूनही अनेक हुशार लोक एका पाठोपाठ एक 'थेरानॉस' सोडून निघून जाण्यामागे हेच कारण होतं. अशी यंत्रं आणि तंत्रज्ञान बनवताना अनेक वेळा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. असे अनेक प्रयोग करण्यासाठी कर्मचाऱ्यांना शांतता आणि मोकळीक या दोन्हींची गरज असते. अनेक वेळा एका विभागातले लोक दुसऱ्या विभागातल्या लोकांशी गप्पा मारत असताना काहीतरी नवीन कल्पना सुचते. या सगळ्यावर बंदी घालून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून काम करायचा अजब मार्ग एलिझाबेप्रमाणे अनेक लोक अवलंबत असतात. विद्यापीठांमधून होणाऱ्या संशोधनातही गाईडच्याच महत्त्वाकांक्षा साकार होतील अशा प्रकारे काम करण्यावर सररास भर दिला जातो. पण खरंतर आपण लिहिलेला शोधनिबंध वाचून कुणी पुन्हा तो प्रयोग करून बघावा नि त्या प्रयोगाचा निष्कर्ष आपल्यासारखा वा आपल्या निष्कर्षाच्या जवळपासचा यावा या एकाच प्रेरणेनं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं काम व्हायला हवं. तरच आपण वैज्ञानिक प्रगतीच्या आदर्शवादी प्रतिमेच्या थोडेफार जवळ जाऊ शकू.

एखादं गणित सुटावं, एखादं उत्तर पाच-सहा प्रकारे प्रयोग करूनही एकसारखं नि अचूक यावं, आपण करतो ते काम निर्दोष, भ्रष्टाचारमुक्त, आणि लोकांना उपयुक्त असावं अशा धारणेनं जगणारे अनेक लोक जगात असतात. मात्र अशा लोकांचं काम प्रकाशात येण्याकरता तंत्रज्ञान तयार करणारे आणि तंत्रज्ञान विकू पाहणारे हे दोन्ही लोक एकाच विचारांचे, कुवतीचे आणि नैतिकतेचे असायला हवेत. मार्क झकरबर्ग नऊ वर्षाचा असताना त्याच्या बाबांच्या संगणकावर कोडिंग शिकला. एलिझाबेथला अभियांत्रिकीच्या दोन सत्रांमध्येच ती विकसित करू पाहत असलेल्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळालं होतं का? एलिझाबेथनं स्टीव्ह जॉब्सचा वेष धारण केला असला, तरी त्याची त्याच्या कामावर जशी पक्की मांड होती, तशी ती मिळवू शकली का? जर अजून पाचसहा वर्षं थांबून, शिक्षण पूर्ण करून, अभ्यास करून, कुठेतरी उमेदवारी करून - थोडक्यात साग्रसंगीत धोपटमार्ग निवडून - तिनं कंपनी काढली असती, तर परिणाम वेगळे झाले असते का? कदाचित.

शिक्षण सोडून झटपट श्रीमंत होऊ पाहणारे 'ड्रॉपआऊट्स' सगळ्याच क्षेत्रांमध्ये यशस्वी होत नाहीत याचं उदाहरण एलिझाबेथच्या रूपानं सिलिकन व्हॅलीला मिळालं. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात असे झटपट प्रायोग होत असतील, तर त्याकडे योग्य त्या संशयानंच बघायला हवं हे या पुस्तकातून मनावर ठसतं. हे पुस्तक वाचून आणखी एका गोष्टीचा अचंबा वाटतो. ती म्हणजे, इतक्या लोकांना तब्बल एक दशक गुंगवून ठेवणाऱ्या एलिझाबेथच्या बाबतीत इतक्या धोक्याच्या घंटा वाजत असतानाही इतका आंधळा विश्वास कसा ठेवला गेला? प्रसिद्धिमाध्यमांना जेव्हा एखादी रिक्त जागा भरायची असते, तेव्हा कुठलाही पडताळा न करता एखाद्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं जातं. सिलिकन व्हॅलीमध्ये शेरील सँडबर्गसारख्या मोजक्या स्त्रिया त्याआधीही प्रकाशझोतात होत्या. पण स्वतःची कंपनी चालू करून ती युनिकॉर्न श्रेणीत नेणाऱ्या उद्योजिकेची प्रसारमाध्यमं वाट बघत होती. एलिझाबेथमध्ये त्यांना ती उद्योजिका गवसली आणि मग तिच्या कामातून उद्भवणाऱ्या धोक्यांकडे सगळ्यांनीच पाठ फिरवली. परिणामी तिच्यापेक्षा जास्त अनुभवी, शिकलेल्या, हुशार... अशा कितीतरी लोकांचं अकारण मानसिक खच्चीकरण झालं आणि अब्जावधी डॉलर्स एका आत्मकेंद्रित आणि हट्टी व्यक्तीपायी वाया गेले.

यशाचं सर्वोच्च शिखर आणि अपयशाची दरी अशी दोन्ही टोकं पाहणारा एलिझाबेथचा प्रवास आहे. पण तशी बेफिकीर कामं करणारी ती एकटी नव्हे. यशापयशाचे इतके चढ-उतार न पाहिलेल्या, पण थेट 'थेरानॉस'सारखंच व्यवस्थापन असलेल्या अनेक कंपन्या आपल्या नजरेसमोर सतत असतात. शेअर बाजारातलं मूल्यांकन, नफा, बाजारपेठ काबीज करायची हाव... या आणि अशा अनेक हावरट महत्वाकांक्षा बाळगणारे मोठे उद्योजकही लोकांचे जीव धोक्यात घालायला मागेपुढे बघत नाहीत. राजकारणी लोकांना खिशात घालून पर्यावरणाची नासधूस करणे, कर्मचाऱ्यांना धाकात ठेवणे, त्यांच्या मानसिक आरोग्याची पर्वा न करता त्यांच्यावर सतत कामाचा ताण ठेवणे, तरुण आणि मध्यमवयीन कर्मचाऱ्यांमध्ये गळेकापू स्पर्धा लावणे, असल्या अनेक घातक प्रथा खाजगी कंपन्यांमध्ये सररास बघायला मिळतात. सिलिकन व्हॅलीमधल्या 'यशस्वी' कंपन्याही याला अपवाद नाहीत. तिथे कर्मचार्र्‍यांना भरपूर पगार असला तरी मानसिक स्वास्थ्याचा आणि वेळेचा हिशोब केला, त्यांच्या नि ग्राहक म्हणून आपल्याची वेळेची किंमत उत्तरोत्तर कमीच होताना दिसते.

पडद्यामागे हे वास्तव असलं, तरी जाहिरातीतून मात्र प्रत्येक कंपनीचा काहीतरी उद्दात्त हेतू दिसतो. जसा एलिझाबेथचा होता! कुणाला शेतकऱ्यांचं भलं करायचं असतं, कुणाला गरीब विणकरांची कला जपायची असते, कुणी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशातला काही भाग देणगी म्हणून देणार असतं. पण पडद्यामागे हे सगळे उद्दात्त हेतू निदान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जरी सफल झाले, तरी आपण आहोत त्यापेक्षा बऱ्याच चांगल्या जगात राहू यात शंका नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

विशेष म्हणजे, ज्या 'वॉलस्ट्रीट जर्नल'मध्ये ही बातमी आली, तिचे सर्वेसर्वा असलेले रुपर्ट मरडॉख 'थेरानॉस'मधले एक गुंतवणूकदार होते. अशी बातमी येणार आहे याचा सुगावा एलिझाबेथला जेव्हा लागला, तेव्हा तिनं थेट त्यांचा नंबर फिरवला. पण, "जिथे बातमीच नसेल, तिथली बातमी आमचे पत्रकार छापणार नाहीत. आजवर मी ढवळाढवळ न करताही 'वॉलस्ट्रीट जर्नल' चांगलं चालू आहे. मला ते तसंच चालू ठेवायचं आहे." असं उत्तर त्यांनी तिला दिलं. ही या प्रकरणातली अतिशय दिलासादायक बाब आहे. जॉनवर विश्वास ठेवून, त्याच्या कामात ढवळाढवळ न करता, त्याला त्याची बातमी करू देणाऱ्या रुपर्टकडून एलिझाबेथनी भांडवलाबरोबरच व्यवस्थापनाचेही धडे घ्यायला हवे होते.

हे वाचून भडाभडा ओकलो.

रूपर्ट मर्डॉक याच्याइतका धूर्त, आपमतलबी आणि हलकट मनुष्य त्रिभुवनात शोधून सापडणार नाही. त्याने त्या पत्रकाराची या प्रकरणात पाठराखण जर केली असेल, तर ती altruistic motivesमधून निश्चित नव्हे, आणि त्या पत्रकारावरील विश्वासातून तर नव्हेच नव्हे. त्याने प्रस्तुत कंपनीतील आपली गुंतवणूक एक तर हळूच काढून तरी घेतली असली पाहिजे, नाहीतर मग या कंपनीतील गुंतवणूक बुडण्यातून होणाऱ्या तोट्याच्या तुलनेत या स्कँडलच्या प्रसिद्धीतून वॉलस्ट्रीटजर्नलचा खप वाढून होणारा फायदा कित्येक पटींनी अधिक असेल, असा हिशेब तरी केला असला पाहिजे. (किंवा दोन्ही.) "जिथे बातमीच नसेल, तिथली बातमी आमचे पत्रकार छापणार नाहीत" वगैरे वाक्ये समोरच्या नको असलेल्या मनुष्याला कटविण्यासाठी/गप्प बसविण्यासाठी तोंडावर फेकायला छान असतात, आणि त्रयस्थाला ऐकायला इंप्रेसिवही वाटू शकतात, परंतु ती दर्शनीमूल्यावर घ्यायची नसतात. (तशी ती घेणारा तो एक मूर्ख!) आणि, Rupert Murdoch does not do anything that is not likely to enrich him financially. By whatever means.

("जिथे बातमीच नसेल, तिथली बातमी आमचे पत्रकार छापणार नाहीत", माझे डावे पाऊल! हा रूपर्ट मर्डॉक जो 'फॉक्स न्यूज़' नावाचा अमेरिकेतला सर्वात मोठा रंडीखाना चालवितो, तिथले त्याचे ते टकर कार्लसन, शॉन हॅनिटी, नि इतरही अनेक नेहमीचेच यशस्वी दीडदमडीचे रांड पित्थे निर्लज्जपणे, हलकटपणे, आणि बेजबाबदारपणे, "ट्रम्पच जिंकला; डेमोक्रॅटांनी हलकटपणे निवडणूक चोरली"पासून ते "करोना, लस, मास्क वगैरे सर्व थोतांड आहे; अमेरिकनांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा डेमोक्रॅटांचा हलकट कावा आहे"पर्यंत काय वाटेल तो खोटा अपप्रचार आजही अहर्निश करत असतात, आणि त्याबद्दल हा त्यांच्या तोंडावर दिडक्या फेकत असतो, ते काय "जिथे बातमीच नसेल, तिथली बातमी आमचे पत्रकार छापणार नाहीत", म्हणून?)

(रूपर्ट मर्डॉक हा मनुष्य, त्याला त्यातून जर काही आर्थिक फायदा होणार असेल, तर स्वत:ची आईसुद्धा विकेल, अशातला आहे. (त्याची आई विकत घेऊ कोण इच्छील, हा मुद्दा अलाहिदा.) असा हा रूपर्ट त्याच्याकडून कोणी काही धडे घ्यावेत, असा जर कोणाला वाटत असेल, तर अशा व्यक्तीस त्याच्याकडून नक्की कशाच्या धड्यांची अपेक्षा आहे, याबद्दल जबरदस्त कुतूहल मला आहे. असो.)

(डिस्क्लेमर: वरीलपैकी काही भाषा असभ्य वाटण्याचा संभव आहे, परंतु त्याला माझा नाइलाज आहे. रूपर्ट मर्डॉक, फॉक्स न्यूज, झालेच तर टकर कार्लसन, शॉन हॅनिटी, यांविषयी शक्य तेवढी सौम्य भाषा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे; या संदर्भात याहून सौम्य भाषा वापरणे प्रस्तुत मर्त्य मानवाच्या बस की बात नहीं| क्षमस्व.)

----------

बाकी, लेख एकंदर सकाळीसकाळी पिसाळलेला अच्युत गोडबोले चावल्यामुळे लिहिल्यासारखा वाटला. टू विट:

आपल्याला जशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करायचं होतं, तसं ते होत नाही हे कळायला लागल्यावर एलिझाबेथ आणि सनीनं कर्मचाऱ्यांवर चक्क पाळत ठेवायला सुरुवात केली.

'चक्क' या शब्दाचा जेथेतेथे, नको तेथे, आणि गरज नसतानासुद्धा (जणू काही काहीतरी भयंकर चमत्कारिक घडले, अशा थाटात) अतिवापर, ही अच्युत गोडबोल्याची सिग्नेचर आहे. (तसेच, लेखविषय असलेल्या इसमाबद्दल, जणू काही तो आपला लंगोटीयार आहे, अशा थाटात, 'पठ्ठ्या' या शब्दाचा वापर. याला नेम्सड्रॉपिंगचा अप्रत्यक्ष प्रकार समजावा काय? तर ते एक असो. तरी बरे, प्रस्तुत लेखिकेने प्रस्तुत लेखात कोणाला पठ्ठ्याबिठ्ठ्या म्हटलेले नाहीये, आणि 'चक्क' हा शब्द फक्त एकदाच वापरलेला आहे - तोही अनावश्यक होता, खरे तर, परंतु ते असो. अर्थात, प्रस्तुत लेखिकेला भविष्यात या त्रुटी दुरुस्त करायला प्रचंड वाव आहेच. लेखिकेच्या यापुढील लेखांत 'चक्क'ची आणि 'पठ्ठ्यां'ची खैरात अपेक्षितो. असो.)

तसेच, इकडूनतिकडून वाचून आपल्याला अर्धवट समजलेल्या गोष्टींबद्दल अत्यंत आत्मविश्वासानिशी पुड्या सोडणे/वाटेल ती मते धडधडीतपणे ठोकून देणे, हीदेखील एक टिपिकल अच्युत गोडबोले-अस्क ट्रेट. (डिस्क्लेमर: मला स्वत:ला कशातलेही विशेष काही कळते, असा माझा दावा मुळीच नाही. सबब, मी लेख पाडण्याच्या भरीस पडत नाही.) असे लेख अर्थात मराठीमध्यमवर्गीयनिरुद्योगीनवसाक्षरथेरडेशाही वाचकवर्गात अत्यंत लोकप्रिय होतात - आपल्याला उभ्या आयुष्यात ज्यांच्याशी घेणेदेणे नव्हते, आणि उरलेले जे काही थोडे असेल, त्या आयुष्यात संबंध येणार नाही, अशा (अमेरिकनगौरवर्णीय) लोकांच्या कुचाळक्या चवीचवीने चघळून, नेम्सड्रॉपिंग करून, आपले नसलेले महत्त्व आपल्या आजूबाजूच्या (बहुतकरून सह-मराठीमध्यमवर्गीयनिरुद्योगीनवसाक्षरथेरडेशाही) मंडळींत आपण वाढवत आहोत, अशी स्वत:चीच समजूत करून घेण्याची या वर्गाची प्रॉपेन्सिटी लक्षात घेता, यात आश्चर्यकारक असे अर्थातच काही नाही.

प्रस्तुत लेखिकेने अच्युत गोडबोल्याचा हा कित्ता - कदाचित अनभिज्ञपणे, टू गिव हर द बेनेफिट ऑफ दि डाउट - छान गिरविलेला आहे. कोठलीतरी मामूली घटना उचलून - विशेषेकरून त्या घटनेची इतर इंटरप्रेटेशन्स शक्य असताना - त्यातून रूपर्ट मर्डॉकच्या गुणग्राहकता, स्वत:च्या बातमीदारावरचा विश्वास, वगैरे (नसलेल्या) सद्गुणांचा उदोउदो, हा अच्युत गोडबोलेगिरीचा आविष्कार जर नसेल, तर मग दुसरे काय आहे? ठोकून देतो ऐसा जे...

(अवांतर: सॉरी. अच्युत गोडबोले हा इसम माझ्या व्यक्तिश: प्रचंड डोक्यात जातो. इतका, की, त्या पठ्ठ्याला उलटे टांगून त्याला चक्क खरकट्या हातांनी थोबाडीत मारावी, असे असुरी विचार मनात घोळू लागतात. (अर्थात, पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना - चूभूद्याघ्या.) वर वर्णन केलेले दुर्गुण त्याला अर्थात कारणीभूत आहेतच; त्याउपर, या इसमाच्या मुखचंद्रम्यावर जी एक डुकरासारखी स्वप्रसन्नता (श्रेयअव्हेर: ही उपमा पु.लं.कडून साभार.) झळकते, ती तिडीक आणते. प्रस्तुत लेखिकेच्या मुखचंद्रम्याबद्दल मला यत्किंचितही कल्पना नसल्याकारणाने - आणि, कल्पना करून घेण्याचीसुद्धा यत्किंचितही इच्छा नसल्याकारणाने - त्या मुद्द्यावरून अर्थातच टीका करू इच्छीत नाही - ती अर्थातच रास्त होणार नाही. मात्र, प्रस्तुत लिखाणात अच्युत गोडबोल्याच्या लिखाणातल्या (माझ्या मते) वाईटातल्या वाईट ट्रेट्स ओझरत्या का होईना, परंतु जाणवल्यामुळे, त्या पोटतिडिकीतून ही भडास. क्षमस्व.)

प्रस्तुत लेखिकेने प्रस्तुत किंवा तत्सम लेख एखाद्या मीडियोकर मराठी वृत्तपत्रपुरवणीत अथवा मासिकात अवश्य सादर करावेत; त्यातून भरघोस यश तथा प्रसिद्धी, झालेच तर घवघवीत करियर (ऑल्दो, करियरकरिता 'घवघवीत' असे विशेषण वापरले जाऊ शकते, किंवा कसे, याबद्दल तूर्तास मी दुग्ध्यात आहे.) प्राप्त होण्याचे पोटेन्शियल पुष्कळ आहे, अशी (अनाहूत तथा आगाऊ) सुचवण या निमित्ताने प्रस्तुत लेखिकेस करू इच्छितो.

इत्यलम्|

Wow! You are out of control!!
I am delighted to have made you react that way!

If you think that I am out of control, then you do not know me.

(I am fully in control, thank you. This is my usual self; just business as usual.)

----------

च्या**! ऑफिसच्या वेळात मी 'ऐसीअक्षरे'वर चकाट्या अवश्य पिटत असेन. परंतु, ऑफिसच्या वेळात प्यायला (अद्याप तरी) सुरुवात केलेली नाही.

मर्डॅाक, फॅाक्स न्यूज, आणि अच्युत गोडबोले यांबद्दलची तुमची निरीक्षणे ग्राह्य असली, तरी मूळ लेखाचा आणि त्या बाबींचा collision cross-section अगदीच कमी आहे, असे नाही का वाटत?

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

तरी मूळ लेखाचा आणि त्या बाबींचा collision cross-section अगदीच कमी आहे

हेच न.बांच व्यवच्छेदक लक्षण आहे, तुम्ही एक भडकाऊ श्रेणी (गेली बिचारी) दिलीत तर न.बा कृतकृत्य होतील.

(न.बा - च्युत गोडबोलेंबद्दल सहमती. शिवाय "मराठीमध्यमवर्गीयनिरुद्योगीनवसाक्षरथेरडेशाही" हा शब्द आवडलेला आहे. )

मराठीमध्यमवर्गीयनिरुद्योगीनवसाक्षरथेरडेशाही या शब्दाचे मनापासून स्वागत. माझ्यासारख्या थेरड्यांचा यांत नक्कीच समावेश होईल. फक्त त्यांत नुसते नवसाक्षर न म्हणता नवजालसाक्षर म्हणावे. (दोन अक्षरांनी फारसे काही बिघडणार नाही)

वैज्ञानिक पद्धतीबद्दल तू लिहिलं आहेस, तसं वेगवेगळ्या संदर्भांत, वेगवेगळ्या लोकांनी लिहिण्याची फार गरज वाटते.

शेवटच्या काही वाक्यांमुळे गूगलची गंमत आठवली. त्यांच्या धोरणात लिहिलं होतं, "Do no harm." मुळात असं कुणी लिहिलं असेल तर मला त्यांच्याबद्दल आधी संशय येईल. पण ते असो. २०१७मध्ये (का त्या सुमारास कधीतरी) हे वाक्य त्यांनी काढूनच टाकलं. आता तर संशय किती तरी पटीनं वाढला.

फेसबुकच्या झकरबर्ग-सँडबर्ग जोडगोळीबद्दल बरंच काही लिहून येत असतं. माझ्या लाडक्या न्यू यॉर्करमधला दोनेक आठवड्यांपूर्वी आलेला लेख उदाहरणार्थ - Facebook’s Broken Vows

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख खूपच आवडला. पण आयुष्यभर केमिस्ट्रीत पायपीट करुनही पायपेटला आम्ही पिपेट म्हणायचो, त्याचं दु:ख झालं! आता ब्युरेटचा खरा उच्चार काय, याची उत्सुकता लागली आहे.

पिपेट ब्रिटिश उच्चार आहे. तो जास्त बरोबर आणि पॉश आहे. पायपेट अमेरिकन आहे. पण मला तो जास्त आवडतो. ब्युरेट सगळीकडे ब्युरेट असते.

पुस्तक आणि डॉक्युमेंटरी परिचय आवडला. पुस्तक वाचायला आवडेल.

हा प्रकार ऐकला होता, अचाट आहे.
वैद्यकीय क्षेत्रात असला काही फ्रॉड "चालून" जाईल - असं मुळात का वाटलं असेल एलिझाबेथला?

किंवा मुळात खरंच काहीतरी नवीन करायची इच्छा होती - आणि तशा चाचण्या आपण विकसीत करू शकू असा आत्मविश्वास असल्याने कंपनी सुरू केली.
पण नंतर हवे ते रिझल्ट येत नसल्याने - कंपनीची बिलिअन डॉलर ऐपत , अवाढव्य पसारा ह्यासगळ्यामागे मूळ संशोधन बाजूलाच राहिलं आणि हा सगळा डोलारा सांभाळायला मग वाट्टेल ते उद्योग सुरू झाले.

अमेरिकन चित्रपटकर्त्यांना ह्या असल्या फ्रॉडविषयी भयानक कुतूहल असतं - ह्या ताई असो, किंवा मग जॉर्डन बेल्फोर्ड, कॅच मी इफ यू कॅन वाला तो फ्रँक कोणसासा ज्यू. - त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांना मस्तपैकी हिरो करून टाकतात.
आता ही एलिझाबेथ - हिने हजारों कर्मचाऱ्यांना फसवलं, कुणावर पाळत ठेवली, खोटं बोलून एक अख्खी कंपनी दीर्घकाळ चालू ठेवली - हे सगळं नीट लक्षात ठेवा!

कारण उद्या तिच्यावर चित्रपट आला की तो बघून "कसली कूल आहे ही, लबाड!!!" एवढंच तुम्हाला लक्षात रहाणार आहे.

“It was like riding a tiger...not knowing how to get off without being eaten', said the Satyam founder in his resignation letter confessing to fraud amounting to over Rs 8000 crores over the last many years and offering himself to "the laws of the land and face the consequences…”

पण वैद्यकीय क्षेत्रात ह्या प्रमाणावर बहुधा पहिल्यांदाच.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ह्या पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. तुमच्या लेखामुळे पुस्तक वाचायची इच्छा झाली आणि अक्षरशः (चक्क!!) चार-पाच बैठकीत वाचून संपवले. हेन्री किसिंजर, जेम्स मॅटिस, लॅरी एलिसन किंवा सेफवे/वालग्रीनच्या सी सूट मधील स्टेट्समन, बिझनेस टायकून वगैरे मंडळींना एका काॅलेज ड्रॉपाऊट मुलीने मामा बनवण्याची कथा थरारक आहे. तुमच्याआमच्या सुदैवाने काही प्रामाणिक लोकांमुळे हा प्रकार उघडकीला आला. पुस्तक वाचताना अनेकदा हे सगळं काल्पनिक आहे असं वाटत होतं.

एलिझाबेथ होम्सने तिच्या कायदेशीर लढाईत हा सगळा दोष तिच्या बॉयफ्रेंडवर ढकलल्याची बातमी नुकतीच वाचली.

समीक्षा आवडली.
न'वी'बाजू कोणती पुस्तके वाचत असतील हा प्रश्न पडला Smile

अगदी छान समीक्षण. मी आधी यावरची डॉक्युमेंटरी प्राईम वर पाहिली आहे. त्यामुळे या विषयाबद्दल कल्पना होती. आता पुस्तक वाचून बघेन.

“Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth.” -Albert Einstein.

डॉक्युमेंटरीचे नाव लिहाल का इथे प्लिज ?

वरचीच. The Inventor. मी पाहिलं त्यावेळी ती प्राईम वर होती (माझ्या आठवणीप्रमाणे. कारण माझ्याकडे नेटफ्लिक्स ही आहे). आता दोन्हींवर दिसत नाही.

“Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth.” -Albert Einstein.

ती HBO ने प्रोड्युस केली आहे. त्यामुळे तुमच्या देशांत एचबीओ जिथे दिसतं तिथे दिसेल. भारतात Disney-Hotstar वर आहे.

अगदी बरोबर. Hotstar वर आहे. आत्ता पुन्हा अर्धी पाहिली.

“Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth.” -Albert Einstein.

मी हे पुस्तक वाचले नाही किंवा ह्यावरील डॉक्युमेंट्रीही बघितली नाही. नेटवरील लेख,बातम्या वाचल्या त्यात कंपनी ह्या उपकरणावर फारच थोड्या रक्तचाचण्या करायची ,स्पर्धक कंपनीच्या उपकरणांवर जास्त चाचण्या करत असे समजले. हे कसे शक्य आहे? बोटातून रक्ताचे काही थेंब घेऊन चाचण्यांसाठी रक्ताचे जास्त प्रमाण लागणाऱ्या स्पर्धक कंपनीच्या उपकरणांवर कसे तपासणार?

Elizabeth च्या मिनीलॅबमध्ये ज्या चाचण्या व्हायच्या त्या chemiluminescence immunoassay या पद्धतीनं व्हायच्या. एखादा थेंब रक्त घेऊन चाचणी करता येण्यासारखी ही पद्धत असते. रक्तातला जो घटक मोजायचा आहे त्याला चिकटणारे enzyme वापरले जाते. पण एका थेंबात अशाही शेकडो चाचण्या होणं शक्य नाही. म्हणून मशीनमध्ये त्या रक्तात सलाईन सोल्युशन घालून त्याचे प्रमाण वाढवायचे. यामुळे त्यांची CLIA पद्धतही गडबडली.
पण एलिझाबेथनं कबूल केलेल्या सगळ्याच चाचण्या या पद्धतीनं होणाऱ्या नव्हत्या. म्हणून मग Walgreens मध्ये त्यांची केंद्रं उभी राहिल्यावर त्यांनी आलेल्या लोकांचे venipunctures सुद्धा करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या नॅनो कंटेनरमध्ये एकदा आणि इतर लॅब मध्ये घेतात तसंही रक्त गोळा करायला सुरुवात केली.
हे तिच्या मूळ प्रेरणेच्याच आणि तिनं केलेल्या जाहिरातीच्याही विरुद्ध होतं. कदाचित Walgreens मध्ये लॅब सुरू केल्या नसत्या तर अजून काही वर्ष ती लोकांना आरामात फसवू शकली असती.

खटल्याची सुनावणी काल सुरू झाली.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या तिहिंचा योग्य संगम झाला की कंपनी/ धंधा भरभराटीला येतो.
आणखी एक म्हणजे 'मला यात काय मिळेल ' हा प्रश्न सर्व थरांंतील व्यक्ती आणि कंपन्या आणि वापरकर्ता विचारात असतो. यापैकी कुणाचं गणित चुकलं की किंवा मर्यादेबाहेर भरभराटीची अपेक्षा ठेवल्याने पत्त्यांचा बंगला कोसळतो.

पुस्तकाची ओळख आवडली. मी वाचणार नाहीये कारण गोषवारा कळला.
पुढचा प्रश्न/मुद्दा म्हणजे लेखांत/प्रतिसादांतल्या मोठ्या व्यक्तींंचे उल्लेख, त्यांचा मोठेपणा अथवा लुच्चेपणा. त्यांनी त्यांचा लाभ बघितला. ओके. पुस्तक प्रकाशक विचार करतो की गोडबोलेंचं नाव सहलेखकांत ( मानसिक आजारावरच्या पुस्तकात डॉक्टरचं नाव सहलेखिका म्हणून आहे!) असल्याने पुस्तकाचा खप वाढणार आहे का?
मर्डोकसाहेबही बातमी न/छापण्यात तसाच विचार करत असणार.

पेप्रात लिहिणारे लेखक त्या वेळी षयांतले गुरू/पंडित असले तरी पेपरवाल्यांना फार माहितीपर लेख नकोच असतात. सामान्य वाचकाने मान डोलवावी एवढीच अपेक्षा असते. शिवाय स्थानिक/ विवक्षित अस्मिता वाढवणे उपयुक्त ठरते.

धन्यवाद. लेखामुळे पुस्तक कळलं.

पुस्तकाच्या लेखकाचा ताजा पाॅडकास्ट इथे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर नवीन उगवत्या आणि बहुतेक चमकणार अशा उद्योगांत ( स्टार्टप) पैसे गुंतवत असतातच. मध्यंतरी टाटा आणि अमिताभने कोणकोणत्या स्टार्टपात गुंतवणूक केली ते कुठे तरी वाचलेलं. न जाणो भरभराट होईल तर वाटा असावा.

तर स्टार्टप निर्मात्यानेच प्रामाणिकपणा सोडून भलतेच काही केले तर गुंतवणूकदाराचा दोष कसा?

एखाद्या स्टार्टप कंपनीत व्हेंचर कॅपिटल गुंतवलं जातं तेव्हा जे काही उत्पादन, सेवा विकणार आहेत, व्यवसायाचं स्वरूप वगैरेंची काही अंशी चिकित्सा होते. ओळखीपाळखीतून, नातेवाईक-मैत्रांकडून गुंतवणूक होते तेव्हा अशी चिकित्सा होत नाही. त्यामुळेही वाईट कल्पना, बुडीतखात्यातल्या उद्योगांना भांडवल मिळत राहतं. बाहेरून पैसा आणून ओतत राहिलं की व्यवसाय खरोखर चालतोय का नाही, हे सहज दिसत नाही; आणि मैत्र-नातेवाईक आपल्या ओळखीच्या व्यावसायिकांवर भलता विश्वासही सहजच टाकतात.

कंपनी शेअर बाजारात असेल तर मग खूपच चिकित्सा होते. अशा कंपन्यांवर लोक जास्त विश्वासही टाकतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एलिझाबेथ होम्सला ११ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा आजच ठोठावली गेली, गुंतवणूकदारांना फसवल्याबद्दल.

मधल्या काळात तिच्यावर आलेली सहा भागांची मालिका, द ड्राॅपाऊट, चांगली आहे. अमांडा सिफ्रीडनं तिचं काम केलंय; ते आणि सनी बलवानीच्या पात्राचंही काम उत्तम वठलंय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.

घोटाळ्यांचा खास करून आर्थिक घोटाळ्यांचा वा गुंतवणूकदारांना टोप्या लावायचा इतिहास अमेरिकेला (आणि भारतालाही) नवीन नाही. एनरॉन ते सध्या गाजत असलेले एफटीएक्स बरीच प्रक्ररणे आहेत. एफटीएक्स संदर्भात तर काही सेलेब्रेटीजवर पण आरोपांचे शिंतोडे उडतायत. त्यामुळे यावरपण पुस्तक वा सिरिज येईल कदाचित. फायनान्शिअल शेनानिगन्स या पुस्तकात गेल्या २०-३० वर्षात अमेरिकेतल्या काही आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात लिहिले आहे. यात अगदी एनरॉनच नव्हे ते मायक्रोसॉफ्ट, सन मायक्रोसिस्टीम सारख्या कंपन्यांनीही कधीकाळी कशी लपवा-छपवी केली आहे याची उदाहरणे आहेत. हेतू हाच की, असे घोटाळे वा लपवा छपवी जगजाहीर होण्याआधीच कसे ओळखायचे (फॉरेन्सिक अकांउटीग) यावर हे पुस्तक बेतलेले आहे. पुस्तक बिलकूल रंजक पद्दध्तीने लिहेलेल नाही. किंबहूना ते फक्त अ‍ॅनालिस्ट लोकांसाठीच लिहिलेले आहे. भारतातल्या घोटाळ्यासंदर्भात (सत्यम, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज, एमटेक ऑटो इ. वर) गेल्या वर्षी आलेले सौरभ मुखर्जीचे डायमंड इन द डस्ट हे पुस्तक बाजारात आहे. हे पुस्तक त्या मानाने रंजक पद्धतीने लिहिलेले आहे. अर्थात, संभाव्य एचएनाय गुंतवणूकदारांसाठी मार्सेलेसिसचे मार्केटींग करणे हा त्यामागचा उद्देश असल्याने ते तसे रंजक पद्धतीने लिहिलेले आहे.

घडून गेलेल्या घोटाळ्यावर एका बातमी मूल्यापेक्षा अधिक मला फार काही आहे असे वाटत नाही. त्यामुळे त्यावर खोलात वाचावेसे वा त्यावरची सिरिज/चित्रपट (उदा. मागे आलेला हर्षद मेहेतावरचा चित्रपट) पहावीशी/पहावासा वाटत नाहीत. पण त्यावरची परीक्षणे नजरेखालून घालायला आवडतात.