सत्य

एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. आपण सर्वांनी सत्याचे पालन करत पुढची वाटचाल करावी, हेच उचित. मी वृद्ध झालो आहे, आता आयुष्याचा शेवटचा काळ हिमालयात परमेश्वराचे स्मरण करत घालवावा हेच योग्य. तुम्ही सर्व पृथ्वीवर जाऊन सत्याचा प्रचार करा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा मानवाचे अस्तित्वच पृथ्वीवरून नाहीसे होईल.

वृद्ध ऋषीचा निरोप घेऊन बाकी सर्व मृत्यूलोकात परतले. त्यांनी सत्याचा प्रचार सुरु केला. त्यांचे लाखो शिष्य झाले. वृद्ध ऋषीने दिलेली चेतावणी ते विसरले. अहंकाराने ग्रस्त होऊन त्यांनी अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू लागले. काळाचा प्रभावाने ते सर्व मरण पावले. त्यांच्या शिष्यांनी अधिक जोमाने त्यांच्या सत्याचा प्रचार करणे सुरु केले. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व युक्त्या ते वापरू लागले. दुसर्याने स्थापन केलेल्या मठ-मंदिरांना नष्ट करण्यात त्यांना आनंद येऊ लागला. अखेर त्यांनी अनुभवलेले सत्यच पृथ्वीवरील मानव जातीच्या विनाशाचे कारण बनेल असे वाटू लागले आहे. बहुतेक सत्याला पचविणे कठीण असते हेच सत्य.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet