म्हणींच्या गोष्टी ... (५)

आधीच्या म्हणी .. (१) , (२), (३), (४)

मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात? त्यांच्या मागे काय कथा असतील? तर काही म्हणींच्या या गोष्टी ...

मराठीतील म्हणी या अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. एखाद्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्दं आणि वाक्ये खर्ची पडतात. पण तेच काम म्हणींच्या प्रयोगाने काही शब्दातच आणि अधिक नेटकेपणाने करणे शक्य होते. आता ही एक सर्वपरिचित अशी म्हण आहे..

"बाजारात तुरी आणि भट भटीणीला मारी"

ही म्हण वाचल्यानंतर/ऐकल्यानंतर त्याचा अर्थ साधारण लगेच लक्षात येतो. भविष्याचे कुतूहल सर्वांनाच असते. आयुष्यात पुढे काय घडणार याची उत्सुकता असते. काही जण भविष्याबद्दल सतत चिंताग्रस्त असतात. तर काही भविष्याची अजिबात चिंता करीत नाहीत. ही दोन्ही झाली टोकाची उदाहरणे.

सर्वसामान्य माणसे भविष्याबद्दल चिंतीत नसली तरी बेफिकीरही नसतात. घरातील कर्ती माणसे आपल्या सर्व कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. भविष्यात भासणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ते आवश्यक त्या साधन संपत्तीची बेगमी करीत असतात. भविष्यात उद्भवू शकतील अशा संकटांचा सामना करण्याची थोडीफार पूर्वतयारी करीत असतात. त्यांतूनही भविष्यकाळातील घडणाऱ्या घटनांची थोडीफार चाहूल लागली असेल तर त्यासाठी काही योजना देखिल आखल्या जातात.

हे सगळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेहमीच घडत असते. परंतु काही लोक भविष्याबद्दल दिवास्वप्ने बघू लागतात. अजून न घडलेल्या, घडण्याची फक्त शक्यता असणाऱ्या घटना, त्यांच्या या स्वप्नांमध्ये घडून देखिल जातात. स्वप्न आणि सत्य या मधील जाणिवेची सीमारेखा विरळ होते. असेच काहीसे या कथेतील भटजीबुवांच्या बाबतीत घडले.

(ऐकलेली) कथा :-

एका गावात एक भटजी राहत असत. श्यामभट त्यांचे नाव. गावामध्ये त्यांचे एक लहानसे घर होते. त्यांची पत्नी आणि चार मुले हे त्यांच्या कुटुंबाचे सदस्य. तसे खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. भटजीबुवा कुणाच्या अध्यातमध्यात नसत. गावातील काही घरातील पुजारीपण ते सांभाळीत असत. प्रत्येक सण समारंभात त्यांना आवर्जून आमंत्रण असे. पंचांग पाहणे, जन्मपत्रिका करणे, थोडेफार भविष्यकथन, हेही ते करीत असत. गावातील देवळात त्यांचा पूजेचा एक वार असे. एकंदरीत त्यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला. परंतु मिळकत फारच कमी असे.
त्यांची पत्नी मोठी कामसू. नाव तिचे रुक्मिणी. परंतु सर्व गावकरी तिला, भटजींची पत्नी म्हणून भटीणबाई म्हणत. ती मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीतदेखील नेटका संसार करीत असे.

तिला कधी वाटे, पतिदेवांच्या कानावर टपोऱ्या मोत्यांची भिकबाळी असावी, आपल्याकडे देखिल चार दागिने असावेत, मुलांच्या माथ्यावर जरतारी टोपी असावी, मुलीला खणाचे परकर पोलके घ्यावे. पण मिळणाऱ्या मोजक्या पैशात ते काही जमत नसे. तसे पूजेला बोलावणारे यजमान शिधा देत, गोडाधोडाचे पदार्थ पाठवीत. परंतु रोख पैका फारसा हाती लागत नसे. असे असले तरी भटीणीचा चेहरा कधी त्रासलेला नसे. प्राक्तनात जे असेल ते विनातक्रार भोगायला पाहिजे हे तिला मान्य होते.

परंतु एकदिवस काही निराळेच घडले. त्याचे असे झाले की .. ..

त्या गावचे सावकार अनेक वर्षे निपुत्रिक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने व्रतवैकल्ये केली, नवससायास केले, तीर्थयात्रा केली, दानधर्म केला. परंतु सारे काही निष्फळ. त्याच्या घरावर लक्ष्मीचा वरदहस्त होता, पण संपत्तीला वारस नाही म्हणून पतिपत्नी दुःखी होते.

मात्र एकदिवस सारे चित्र पालटले, सावकाराची व्यथा परमेश्वराने जाणली आणि त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सावकाराच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्यांनी मोठ्या झोकात पुत्राचे बारसे करण्याचे योजले. संपूर्ण गावाला आमंत्रण होते. त्या दिवशी गावातली एकही चूल पेटली नाही. सावकाराने घरासमोर भव्य मांडव घातला होता. त्यामध्ये भोजनाच्या पंगती मागून पंगती उठत होत्या. मोठा दानधर्म केला . सारेजण तृप्तं होऊन बाळाला शुभाशीर्वाद देत होते, "शतायुषी भव! आयुष्यमान भव! "

बारशाला अर्थात श्यामभटांना आमंत्रित केलेले होतेच. सारा समारंभ पार पडला. सावकारीणबाईंनी दिलेला शिधा आणि दक्षिणा घेऊन भटीणबाई मुलांसमवेत घरी परतली. सावकाराने भटजींना थांबण्यास सांगितले होते. त्यांना त्यांच्या पुत्राची जन्मपत्रिका करून घ्यायची होती. तसेच त्याचे भविष्य देखिल जाणून घ्यायचे होते.

भटजीबुवांनी मुलाची जन्मवेळ, तिथी इत्यादी जाणून घेतले, आणि पंचांग उघडून ग्रहांची गणिते मांडण्यास सुरुवात केली. सावकार आणि त्यांचे कुटुंबीय भटजींकडे उत्सुकतेने बघत होते. भटजींनी जन्मपत्रिका सावकारांच्या हाती दिली. सावकार म्हणाले, "भटजीबुवा तुम्हीच सांगा काय आहे त्या पत्रिकेत. आम्हाला काय कळतंय त्यातले? "
मग भजीबुवांनी पत्रिका हाती घेत म्हणाले,
"यजमान, या पत्रिकेत तर साऱ्या शुभग्रहांनी गर्दी केली आहे. शुभ नक्षत्रावर जन्मलेले तुमचे पुत्र कर्तृत्ववान, कीर्तिमान होणार आहेत. पत्रिका तर स्पष्टच सांगते आहे की त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे".
भटजीबुवांचे बोलणे ऐकून सावकार आणि त्यांच्या कुटुंबातील समस्त सदस्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग सावकार म्हणाले,
"भटजीबुवा काही भविष्य कथन करा. कृपा होईल. "
आता भटजींना देखिल उत्साह आला होता. त्यांनी परत एकदा आपले पंचांग उघडले. मुलाची त्यांनीच केलेली पत्रिका उलगडली आणि काही गणिते मांडली. ग्रहांची गृहस्थाने, त्यांचे चलनवलन, राशी इत्यादींचा ताळमेळ नीटपणे जोखला. इतके सारे केल्यानंतर, संथ लयीमध्ये भविष्य कथनास सुरुवात केली. सावकार आणि सावकारीण बाई जीवाचे कान करून त्यांच्या पुत्राचे भविष्य ऐकत होते. भविष्य कथन संपले आणि भटजीबुवांनी सावकाराकडे पाहिले. सावकार अत्यंत समाधानी दिसत होते. कारण भटजीबुवांनी भविष्यच तसे सांगितले होते ना. त्यांनी भटजींचा यथायोग्य आदर-सत्कार केला. कोरे धोतराचे पान दिले. रेशमी शाल आणि भरजरी उपरणे सुद्धा दिले. गोड कंदी पेढ्यांनी भरलेले चांदीचे पात्र दिले. भटजीबुवा आनंदीत मुद्रेने उठणार, इतक्यात सावकाराने त्यांना थांबण्याची खूण केली. काही काळासाठी सावकार घराच्या आतील भागात दिसेनासे झाले. परत आले तेव्हा त्याच्या हाती एक तबक होते. त्यात होते चकचकीत, झळाळणारे बंदे रूपये. सावकारांनी ते तबक भटजींच्या झोळीमध्ये रिकामे केले. भटजीबुवा डोळे विस्फारून पाहत होते. मग स्वतःला सावरत म्हणाले,
"हे आणिक कशाला? दक्षिणा तर मिळाली आहे मला आधीच. "
सावकार म्हणाले, "तुम्ही माझ्या पुत्राचे भविष्य सांगितलेत, त्यासाठी हे आहे. स्वीकार करावा."

भटजींना ते घेणे नको थोडेच होते? मोठ्या खुशीत त्यांनी घरचा रस्ता धरला. आज मंदिरात जायचे देखिल त्यांनी टाळले. त्यांना लवकरात लवकर घरी जायचे होते. पत्नीसमोर आजची कमाई ठेवायची होती. इतके सारे रूपये पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया कशी होईल, या कल्पनेने त्यांना हसू येत होते.

आजूबाजूला त्यांचे बिलकुल लक्ष नव्हते. आयुष्यात पहिल्यांदाच इतके रोख रुपये त्यांच्या हाती आले होते. त्याचे काय करावे या विचारात ते गुंग होते, पण काही सूचेना. त्यांचे आजवरचे आयुष्य अगदी एकमार्गी होते. पुजा, पोथी, पंचांग या पलिकडचे जग त्यांना ज्ञात नव्हते. खूप विचार करूनही त्यांना कळेना की ते रूपये कसे खर्च करता येतील? मग त्यांनी ठरवले की भटीणीला विचारावे. ती फार हुशार आणि व्यवहारी. ती बरोबर सांगेल काय करायचे ते. असा विचार करीतच ते घरी आले.

भटीण घरात कापसाच्या वाती वळत होती. भटजीबुवांना पाहून ती पुढे आली आणि त्यांच्या हातातील सामान घेऊ लागली, तर भटजी म्हणाले थांब मीच आत ठेवतो सगळे. थोड्या वेळाने भटजी परत बाहेर आले. वाती वळत असलेल्या भटीणी समोर उपरण्यातील सारे बंदे रूपये ओतले. खणखण आवाज करीत बंद्या रूपयांची रासच तेथे तयार झाली होता. भटीण चकीत होऊन बघतच राहिली. आजवरच्या आयुष्यात तिने इतकी नाणी कधी पाहिलीच नव्हती. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. प्रश्नार्थक मुद्रेने ती भटजींकडे पाहू लागली.
"सावकारांनी दिले" भटजींनी खुलासा केला.
"आहो मग लक्ष्मीला असे जमिनीवर का ठेवता? " असे म्हणत ती लगबगीने उठली. स्वयंपाकघरातून पितळीचा लहानसा गोल डबा आणला आणि त्यात सारी नाणी काळजीपूर्वक भरून ठेवली. डब्याचे झाकण लावीत तिने विचारले, "इतके दिले? "
भटजी म्हणाले, "हो ना, अगं मी त्यांच्या पुत्राचे भविष्य सांगितले म्हणून... "

भटीणीच्या मस्तकात विचारांची चक्रे भिरभिरत होती. अनेक अपुऱ्या इच्छा तिला खुणावीत होत्या. पण लगेच ती भानावर आली. तिच्या इच्छा, आकांक्षा जरी अमर्याद असल्या, तरी त्यांच्या पूर्तीसाठी तो लहानसा नाण्यांचा ढीग काही पुरेसा नव्हता. तिने भटजींना विचारले,
"तुम्ही काय करायचे ठरवले आहे? "
भटजी म्हणाले, "ठरवायचे काय? तुला एखादा दागिना करूया, मुलांना नवीन कपडे करता येतील. मग राहिलेल्या पैशात आपल्या घराला जरा बरासा रंग लावूयात. कित्येक वर्षे नुसत्या चुनखडीवर भागवले आहे आपण. घर नव्यासारखे दिसेल, बरे वाटेल मग. "

भटजींना वाटले की हे ऐकून भटीण खूश होईल परंतु ती गप्पच होती. जरा वेळाने सावकाश म्हणाली,
"दागिने, कपडे वगैरे नकोत. मी काही रोज सडा, सारवण करताना दागिने मिरवणार नाही. कपडे वर्ष सहा महिन्यात जुने होतील, फाटून जातील. घराचा रंग राहील वर्ष दोन वर्षे, पण मग नंतर आपल्या हाती काहीच उरणार नाही."
"मग काय नुसते डब्यात ठेवून द्यायचे म्हणतेस? "
भटजींनी चिडून विचारले. इतका विचारपूर्वक आखलेला त्यांचा बेत तिने क्षणात निरुपयोगी ठरविला होता.
भटीण म्हणाली,
"तसे नाही हो, खर्च करायचे ते रूपये, पण अशा पद्धतीने, की आपल्याला दामदुपटीने परत मिळायला पाहिजेत."
भटजींनी आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणले, " म्हणजे काही जादू वगैरे आहे का, की खर्च केलेले पैसे परत मिळतील ते सुद्धा दुप्पट? का जमिनीत पेरून त्याचे झाड उगवणार आहेस?"
भटीण म्हणाली, "जादू नाही, व्यवहार आहे हा. माझ्या तोकड्या बुद्धीला सुचते आहे ते सांगते. आपण एक दुभती गाय विकत घेऊ. अंगणातल्या जागेत तिचा गोठा उभा करता येईल."
भटजी म्हणाले, "त्याने काय होईल? उलट तुझेच काम वाढेल. गायीची देखभाल करणे सोपे नाही."
"मी करीन सारे, मला कष्टाचे काही भय नाही. आपल्या मुलांना रोज दूध मिळेल. आणि उरलेले दूध विकता येईल. त्याचे पैसे जमा होतील."
भटीण बोलली. अजून बरेच काही होते तिच्या मनात, परंतु तिच्या या बेताला पतिची मान्यता मिळायला हवी होती. भटजींना ही कल्पना आवडली. "खरच की, उत्पन्नाचा अजून एक स्त्रोत तयार होइल, मिळकत वाढेल." त्यांनी मान डोलवत संमती दर्शवली.
"चालेल.. " भटजी म्हणाले. "थोडे पैसे साठले की अजून एक गाय घेता येईल. तिला देखिल कालवड होईल. महामूर दूधदुभते मिळेल. ते सारे विकल्यावर भरपूर पैसे देखिल मिळतील. मग एखादा लहानसा जमिनीचा तुकडा विकत घ्यायचा." भटजीं कल्पनेच्या विश्वात रंगून गेले होते. भटीण मोठ्या कौतुकाने तिच्या पतीचे बोलणे ऐकत होती. त्यांच्या दरिद्री संसारात आता आशेचे किरण चमकत होते.
"बरं का, जमीन घेतली की आधी तिथे भाजीपाला घ्यायचा. कारण आपली जमीन काही खूप मोठी नसेल, आणि जमिनीची मशागत करायला अवजारे तरी कुठून आणणार आपण? " भटजीबुवा म्हणाले.
"हो ना आणि बैल जोडी पण लागेल की नांगरणी, पेरणी करता. त्यापेक्षा थोडा भाजीपाला विकून आणखी पैसे जमा होतील. मग थोडे तांदूळ पेरूयात. तुम्हाला मिळणाऱ्या शिध्या मध्ये तांदूळ येतोच, पण प्रत्येक घरचा वेगळा. त्या पेक्षा आपल्या शेतातला तांदूळ आणि भाजी मिळेल." भटीणीने तिची कल्पना सांगितली, पण भटजींना ती पसंत पडली नाही. ते लगेच म्हणाले,
"तांदूळ नको तूर बरी. तांदुळाला पाणी भरपूर लागते आणि लहानशा शेतातून असा कितीसा तांदूळ हाती येणार? तुरीला बाजारात भावपण चांगला मिळेल. तूरच पेरायची. "
भटीणीला ते काही पटले नाही. तिला स्वतःच्या शेतातील तांदुळाचा भात रांधायचा होता. ती म्हणाली, "नाही तांदूळच घ्यायचा."
भटजी रागाने जरा उंच आवाजात बोलले, "तू कोण ठरविणारी? मी सांगतो तूरच पेरणार."
दोघांना स्वतःचे म्हणणे सोडायचे नव्हते. संवादाचे रूपांतर आता वादात झाले होते. दोघांचे आवाज चढले होते. कुणी कुणाचे ऐकून घेईना.

शेजारीपाजारी आश्चर्याने घराभोवती गोळा होऊ लागले. शांत, सरळमार्गी भट आणि भटणीला असे मोठ्या आवाजात बोलताना, भांडताना, कुणी कधीच पाहिले नव्हते.
भटजींचा रागाचा पारा चांगलाच चढला होता. "मी घरचा कर्ता, आणि ही माझ्याशी वाद घालते आहे? " त्यांनी रागाने कोपऱ्यातली काठी उचलली. ते पाहून भटीण चांगलीच घाबरली. रडत रडत ती बाहेर ओसरीवर आली. तिच्या पाठोपाठ काठी घेऊन भटजी देखिल आले, म्हणत होते, "तूरच पेरायची, काय समजलीस? "

घरा समोर जमलेल्या शेजाऱ्यांना पाहून ते थांबले. आता त्यांना वास्तवाचे भान आले होते. लोकांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य बघून शरमेने त्यांचा जीव कसानुसा झाला. आजवर जे कधी घडले नव्हते, ते घडले होते. त्यांच्या घरातले भांडण चव्हाठ्यावर आले होते. भटजी मान खाली घालून जागीच उभे राहिले. शेजारचे विष्णुशास्त्री पुढे होत बोलले,

"अरे शामभटा, काय रे हे तुझे वागणे? घरच्या लक्ष्मीवर हात उगारतोस? कुठे फेडशील असले पाप? आणि असे झाले तरी काय रे तुला इतके बिथरायला? "
भटजींनी खालच्या मानेने सारे काही कथन केले. त्यांचे बोलणे ऐकून जमलेले सारेजण हसू लागले. अजून कशात काही नाही आणि पत्नीवर काठी उगारण्यापर्यंत यांची मजल गेली.
विष्णुशास्त्री हसत म्हणाले, "कसा रे तू असा? तुझी तूर अजून बाजारात, आणि आतापासूनच बसला आहेस बायको बरोबर भांडत. देवा रे याला काही शहाणपण दे."

भट आणि भटीणीला आता धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटत होते.

******

उपकथा :

रहदारीचा मुख्य रस्ता सोडून त्याची आलिशान कार एका लहान रस्त्याला वळली. तो रस्ता अगदी शांत होता. तुरळक वाहने दिसत होती. कडेच्या नीटस पदपथावर चार दोन लोकं होती. रस्ता एका मोठ्या लोखंडी दरवाज्यापाशी येऊन थांबत होता. दरवाजा होता 'संचीत सोल्युशन्स' चा. त्या भव्य दरवाज्यातून आत गेल्यावर एक वळणदार रस्ता सरळ कार्यालयाच्या इमारतीजवळ नेऊन सोडत होता. दोहोबाजूने कसोशीने जपलेली फुलझाडे आणि काही शोभेच्या झाडाच्या कुंड्या होत्या. सभोवताली असलेल्या दगडी सीमा भिंतीने त्या परिसराला एक ठळक बाह्यरेखा दिलेली होती. सीमा भिंतीलगत गर्द हिरव्या पानांच्या मोठाल्या फांद्यांनी लगडलेले काही विशाल वृक्ष उभे होते. बाहेरच्या कोलाहलाचा मागमूसही त्या सर्व परिसरात जाणवत नव्हता.

चारूदत्तने नेहमीप्रमाणेच कार मधून उतरताना तिथल्या काचेच्या झुलत्या दाराकडे आणि त्याच्याच बाजूला लावलेल्या संचित सोल्युशन्सच्या सुबक नामफलकाकडे अभिमानाने पाहिले. परंतु आज त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट होते. तिथल्या चारपाच पायऱ्या घाईने चढून त्याने कार्यालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. समोरील स्वागत कक्षात नेहमीप्रमाणेच कविता आणि सुनील उपस्थित होते. त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत तो त्याच्या कक्षात प्रवेशला.

चारुदत्त प्रधान "संचित" चा एक भागीदार होता. संजय देवकर आणि त्याने मिळून "संचित" ची स्थापना केली. अथक परिश्रम आणि व्यावसायिक सचोटीच्या बळावर आज दोघे यशस्वी आणि सन्माननीय व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. दोन खोल्यांच्या जागेत सुरुवात करून, आज त्यांचा व्यवसाय सहा मजली अद्ययावत इमारतीमध्ये स्थिरावला होता. व्यावसायिक नीतिमत्ता आणि गुणवत्ता यात त्या दोघांनी कधीच तडजोड केली नव्हती. व्यावसायिक स्पर्धेमध्ये अग्रेसर राहण्याकरता कधीच अनैतिक मार्ग स्वीकारला नव्हता.

त्यांचा असा नावलौकिक ऐकूनच मेडीकॉर्प ने त्यांच्याबरोबर करार केला होता. 'मेडीकॉर्प' ही भारतातील एक अग्रगण्यं औषध निर्मिती करणारी व्यावसायिक संस्था होती. मेडीकॉर्प चे प्रमुख जे. के. मेहेरा होते. मेहेरांचा अनेक वर्षांचा व्यावसायिक अनुभव आणि त्यांचे त्यांच्या क्षेत्रासंबधी असलेले ज्ञान याची क्वचितच कुणी बरोबरी करु शकले असते. आणि अशा जे. के. मेहेरांनी त्यांच्या व्यवसायासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी 'संचित' कडे सोपविली होती. हे म्हणजे संचितच्या व्यावसायिक गुणवत्तेला मिळालेले प्रमाणपत्रंच होते.

मेडीकॉर्प चे काम दोघांनी अर्थातच यशस्वीरीत्या पूर्ण केले. 'संचित'ची व्यावसायिक नीतिमत्ता आणि कामाच्या दर्जाबाबत जराही तडजोड न करण्याच्या वृत्तीने मेहेरा चांगलेच प्रभावीत झाले होते. 'संचित' कडून देण्यात आलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल ते पूर्णत: समाधानी होते, आणि ते त्यांनी बोलूनही दाखवले. त्यांच्या व्यावसायिक वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तींसमोर त्यांनी 'संचित' आणि त्यांनी विकसित केलेल्या कार्यप्रणालीची तोंडभरून स्तुती केली होती. त्याचाच परिणामस्वरूप सुपर फार्मा कडून संचितकडे व्यवसायासंबंधी विचारणा करण्यात आली होती. 'सुपर' परदेशी कंपनी होती. मेडीकॉर्प प्रमाणेच व्यवसायातील एक अग्रगण्य संस्था होती. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार खूपच मोठा होता. संजय आणि चारूदत्तच्या व्यावसायिक महत्वाकांक्षेला अजून बळ मिळणार होते.. जर त्यांना 'सुपर फार्मास्युटिकल्स' चे काम मिळाले असते तर...

दोघांनीही आता सुपर चा प्रकल्प मिळविणे प्रतिष्ठेचे केले होते. सतत त्यांचे त्यांसंबंधीच बोलणे चाले. अनेकवेळ चर्चा होई. तो प्रकल्प हस्तगत करण्यासाठी काय काय करणे जरूरीचे आहे, आणि तो प्रकल्प मिळाल्यावर तो कसा पूर्ण करता येईल हाच विचार त्यांच्या ध्यानी मनी असे. सदा सर्वकाळ त्याचेच चिंतन चाले. म्हणतात ना.. 'जळी स्थळी, काष्ठी. पाषाणी.. अगदी तसंच. जर त्यांना सुपरचा प्रकल्प मिळाला आणि तो त्यांनी उत्तम प्रकारे पूर्णत्वास नेला तर, ते त्यांच्या कार्यानुभवातील मानाचे पान ठरले असते. त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती सातासमुद्रा पलीकडे जाणार होती.

पण असे असले तरी दोघांचे पाय अजूनही जमिनीवरच होते. व्यवसायाची सर्वदूर वृद्धी होणे हे त्यांचे स्वप्नं होते, परंतु त्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. सारे ज्ञान, सारा अनुभव कसाला लावायला हवा याची त्यांना पुरेपूर जाणीव होतीच.
संजय आणि चारूदत्तने जीवापाड मेहनत करून संचित नावारूपाला आणली होती. भारतातील व्यावसायिक क्षेत्रात त्यांचा चांगलाच जम बसलेला होता. आजवर त्यांचे कार्यक्षेत्र भारतापुरतेच मर्यादित होते. परंतु सुपरचे काम मिळाल्यास त्यांची झेप सातासमुद्रापार जाणार होती. त्यांची महत्वाकांक्षा अजून विस्तारणार होती. खरे म्हणजे 'सुपर'कडून नुसतीच व्यावसायिक बाबींची चाचपणी करण्यात आली होती. अजून मुख्य कामासंबंधी काहीच बोलणी झालेली नव्हती. आणि संचित प्रमाणेच इतरही काही संस्थांकडे सुपरकडून विचारणा करण्यात आली होती. म्हणजे हा करार मिळविण्यासाठी मोठीच स्पर्धा होती. अजून तरी सारे अनिश्चित होते.

दोघांनी त्यांचे सारे ज्ञान, अनुभव पणाला लावून योजना तयार केल्या. एकमेकांच्या योजना ऐकून घेऊन त्यावर मतप्रदर्शन केले. दोघांनाही स्वत:चीच योजना सर्वोत्कृष्टं वाटत होती. पण दुसऱ्याला ते मान्य होत नव्हते. चर्चा, वादविवाद दोघांनाही काही नवीन नव्हते. पण आता त्या चर्चांना वेगळाच रंग येऊ लागला होता. तो रंग होता मानापमानाचा. स्वत:च्या विचारपूर्वक आणि कष्टाने तयार केलेल्या योजनेत दुसऱ्याला त्रुटी दिसते हे त्यांना मानवत नव्हते. मग तो दुसरा म्हणजे जीवलग मित्रं आणि अनेक वर्षांचा व्यावसायिक भागीदार असला तरी.

आजवर असे कधी घडले नव्हते. दोघांमधील अभंग सांमजस्य हा त्यांच्या यशस्वी भागीदारीचा पाया होता. परिस्थितीने अनेक बरी वाईट वळणे घेतली, व्यावसायिक वाटचाली मध्ये अनेक खाचखळगे लागले होते. समृद्धीचा मार्ग देखिल चढ उतारांचा होता. पण या सर्वामध्ये त्यांचा एकमेकांवरील विश्वास कधीच ढळला नव्हता. दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या चुका सावरून घेतल्या होत्या. यश आणि अपयश समसमान वाटून घेतले होते. पण आज त्या नात्यामधे जणु कली शिरला होता. महत्वाकांक्षेचा कली. दोघांना सातासमुद्रापलीकडील यश खुणावत होते.

दोघांनी इरेसरीने स्वत:ची बाजू मांडली आणि दुसऱ्याने ती नाकारली. तासनतास चर्चा करून देखिल कुठल्याच मुद्द्यावर एकमत होईना. हे दोघांसाठी अगदी नवीन आणि वेगळे होते. कारण आजवरच्या वाटचालीत अनेकदा कठीण परिस्थितीशी सामना करण्याची वेळ आली होती. कधी अपयश देखिल स्वीकारावे लागले होते. परंतु या सर्वाची जबाबदारी त्यांनी बरोबरीने वाटून घेतली होती. गैरसमजाची कसर त्यांच्या नात्याला कधीच लागली नव्हती. चारुदत्त आणि संजय त्यांच्या क्षेत्रात अनुभवी आणि ज्ञानी होते. दर काही दिवसांनी बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला त्यांनी चांगले आत्मसात केलेले होते. असे असले तरी ते इतरांच्या मतांचा देखिल आदर करीत असत. स्वत:चे एखादे चुकीचे मत बदलायला त्यांना कधीच संकोच वाटला नाही. आणि असे असूनही आज त्यांचा वाद विकोपाला जात होता.

------

चारुदत्त विमनस्कपणे त्याच्या कक्षामधे बसलेला होता. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आठवून त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले होते. पण घडणाऱ्या घटना थांबवणे त्याच्याही हातात राहिले नव्हते. काही न सुचून त्याने त्याच्या टेबलवरील इंटरकॉमचा रिसीव्हर हातात घेतला, सवयीने नंबर डायल केला. पलीकडे कांचन होती.
काही मिनिटातच कांचन त्याच्या कक्षात आली होती. नेहमीप्रमाणे तिच्याकडे निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक व्यावसायिक बाबी होत्या.

"ब्राईट च्या प्रकल्पाचं काम सध्या पूर्ण बंद आहे. करमरकरांचा निरोप होता की त्या प्रकल्पाचे प्रारूप त्यांना जाणून घ्यायचे आहे. पण आपली अजून काहीच तयारी नाही."
कांचनने तिच्या यादीतील पहिला मुद्दा चर्चेला घेतला होता.
"करमरकर म्हणजे ..."
चारुदत्त कपाळावर उजव्या हाताच्या दोन बोटाने आघात करीत आठवण्याचा प्रयत्न करत होता.
"ब्राईट मॅन्युफॅक्चरिंग चे ... "
कांचनने माहिती पुरवली.
"त्या प्रकल्पाचे काम कोणाकडे आहे ?" त्याने विचारले.
"शर्माकडे ... त्यालाच तेथे जायला सांगू का? म्हणजे आपल्याकडून काही काम होते आहे असे तरी दिसेल." कांचनने सुचवले.
"नाही नको, शर्मा नको... म्हणजे तुला माहिती आहे ना .." चारूदत्तने बोलणे अर्धेच ठेवले. परंतु कांचनला तो संदर्भ लगेच लक्षात आला होता.
"ते बरोबर आहे, पण मग कुणाला द्यायचे हे काम? कारण या प्रकल्पाचा आवाका मोठा आहे. आपल्याला मोठ्या प्रयत्नाने ही संधी मिळाली आहे. "
कांचन काळजीच्या स्वरात म्हणाली.
"ठीक आहे. बघतो मी आज उद्या. मला जरा ते सर्व तपशीलवार परत एकदा पाहायला पहिजे. " चारुदत्त म्हणाला.
"पण लवकर काही केले नाही तर हा करार निश्चितच मोडीत निघेल. ते आपल्याला आर्थिक दृष्ट्या फार तोट्याचे आहे. आणि बाजारातील संचित ची पत देखिल कमी होईल, आपले भविष्यातील प्रकल्प त्यामुळे धोक्यात येतील."
संचितच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मनातील विचारच कांचन व्यक्तं करीत होती. खरं म्हणजे चारूदत्तला हे सर्व नक्कीच समजत होते.
अजूनही तिला बरेच काही सांगायचे होते, परंतु चारूदत्तचा विचार काय आहे हे सुद्धा कळणे जरूर होते. कारण अंतिम निर्णय त्यानेच घ्यायचा होता. त्याला जर हा प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर पुढचे सारे बोलणे व्यर्थच होते.

चारूदत्तने आश्चर्याने कांचनकडे पाहिले. आजवर ती कधीच असं बोलली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्याच्या लक्षात आले की संजय आणि त्याच्या वादात, दोघांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होते. 'संचित' चे कर्मचारी इमानेइतबारे सारे निभावत होते. पण काही निर्णय त्या दोघांनीच घ्यायचे होते.
त्यालाही सर्व परिस्थितीची जाणीव होती. आजवर एकदिलाने आणि नेकीने नावारूपाला आणलेल्या व्यवसायाचे दोन तुकडे होतात की काय असे वाटत होते. आणि ही कल्पना चारूदत्तला सहन होत नव्हती. संजयबरोबर परत एकदा नीट बोलणे भाग होते. त्याने कांचन कडे बघत विचारले,
"संजय आज ऑफिसमध्ये आहे का?"
कांचन जे बोलू पहात होती त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता चारूदत्तने विषयांतर केले. कांचन नाराज झाली होती, परंतु तसे न दर्शविता म्हणाली,
"अजून तरी आले नाहीयेत ते. मी कीर्तीला विचारते," असे म्हणत तिने संजय देवकर ची मदतनीस कीर्तीला फोन केला.
"हॅलो .. कीर्ती संजय सर आले आहेत का? ......... अजून नाही? कधी येतील ? काही सांगितले आहे का? ....... बरं आले की सांग. "
"मग या प्रकल्पाबद्दल काय करायचे? " कांचन परत मूळ विषयावर आली होती.
" दिनेशला सांग मी बोलावले आहे म्हणून. बरं मग त्या विन्ट्रॉनिक्स चं पेमेंट आलं का? नसेल तर त्यांच्याकडे मालवीयला जायला सांग. फोन वगैरे नको.. फारच लांबवलं आहे त्यांनी. आणि ब्राईट साठी काही प्रोग्रॅमर्स लागणार आहेत आपल्याला त्याकरता जाहिरात द्यायची आहे.. मला त्याचा मसुदा करून दे मग ठरवू या ."

काही काळ दैनंदिन कामकाजामधे चारुदत्त व्यस्त होता. कांचन तिथून गेल्यावर चारूदत्तला परत विचारांनी घेरले. आता या नव्या प्रकल्पाचे काम कुणाकडे सोपवावे याचा तो विचार करीत होता. खरं म्हणजे असे निर्णय तो आणि संजय एकत्र मिळून घेत असत. परंतु त्या दिवशीच्या वादावादी नंतर संजय ने सर्व कामकाजातून स्वत:ला दूर ठेवले होते. दोघात इतका कडवटपणा आला होता की आता एकत्र काम करणे अशक्य आहे असे दोघांनाही वाटत होते. चारूदत्तला वाटले, हे सुपरचे प्रकरण उद्भवले नसते तर बरे झाले असते.

चारूदत्तने मनातले नकारात्मक विचार बाजूला सारले. तितक्यात दिनेश आला होता. मग ते दोघेजण करमरकरांच्या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यात गुंतून गेले. बराच वेळ झाला होता.. आणि कांचन चा फोन आला, संजय येतो आहे आहे हे सांगण्याकरता. चारूदत्तने दिनेशला निरोप देत सांगितले की उद्या पर्यंत या प्रकल्पाचे कच्चे प्रारूप तयार असायला हवे आहे.

दिनेश गेल्यावर चारुदत्त अस्वस्थपणे संजयची वाट बघत राहीला. तो आल्यावर काय बोलायचे हे ठरवायचा त्याने प्रयत्न केला पण ते काही त्याला जमेना. इतक्या वर्षांची त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक मैत्री, इतक्या क्षुल्लक कारणाने तुटणार होती. पण तो तरी काय करू शकत होता? एका हाताने टाळी वाजू शकत नाही. हे सारे टिकवायचे असेल तर दोघांनाही तसे वाटायला हवे होते. संजयच्या मनात काय आहे हे त्याने कधीच स्पष्टं केले होते. बोलण्यासारखे फारसे काहीच शिल्लक नव्हते.
चारुदत्त अशाच विचारांच्या आवर्तात गुरफटलेला होता, त्याच वेळी संजय ने तेथे प्रवेश केला. दोघांना जरा अवघडल्यासारखे झाले होते.

चारूदत्तने संजयकडे पहात म्हणले, "तुझीच वाट बघत होतो, बस ना..."
बराच वेळ दोघेही शांतच होते. कुठून सुरुवात करावी याचाच दोघे विचार करत होते.
"अरे ब्राईट चे करमरकर सारखे फोन करतायत. त्यांच्या प्रकल्पाला एकदा मार्गी लावायला हवे. मग बाकीचे ..." चारूदत्तने सुरुवात केली
"हो कांचनने सांगितले मला. पण मी शर्माला सांगितले होते यात लक्ष घालायला. त्याने काहीच केले नाही का अजून?" संजय म्हणाला.
"मी उद्या बोलतो शर्माला, आणि त्याला करमरकरांकडे जायला सांगतो. "
चारुदत्त अस्वस्थपणे संजयचे बोलणे ऐकत होता. शेवटी न राहवून बोलला,
"शर्मा नको .. मी दिनेशला बोललो आहे. त्याने या प्रकल्पाच्या प्रारुपाच्या आखणीला सुरुवात केली असेल.. "
संजय ने आश्चर्याने चारूदत्तकडे पाहिले. आजवर त्याने असा परस्पर निर्णय कधी घेतला नव्हता. मग चारूदत्तने स्पष्टीकरण दिले.
"तू ऑफिसमध्ये नव्हतास आणि करमरकरांनी तगादा लावला होता. काल त्यांनी निर्वाणीचेच बोलणे चालू केले. प्रकल्प हातून जातो की काय अशी वेळ आली .. म्हणून.. "
संजयकडे पहात तो पुढे म्हणाला, " आणि दुसरे म्हणजे मला शर्माकडे ही जबाबदारी द्यावी असे वाटत नव्हते. "
संजयला काहीच समजत नव्हते.. मग चारुदत्तच पुढे म्हणाला, "तुला हे कधीतरी सांगायचे होतेच. शर्मा तितकासा विश्वासू नाहीये."
"अरे असं काय बोलतोयस?" संजय जरा रागातच बोलला. "तुला माहिती आहे ना? नवीन, सरिताच्या माहेरच्या नात्यातला आहे. तो मला फसवायचा नाही कधी. कारण नातं आहे ना सरिताचं.." संजय घाईने बोलत होता. सरिता म्हणजे संजयची पत्नी. तिच्या नातेवाइकाबद्दल असे काही ऐकणे त्याला अवघड वाटत होते.
"माहिती आहे मला ते.. म्हणून तर आजवर मी बोललो नाही. तुला युनीटेकचा दातार माहिती आहे ना?" चारूदत्तने विचारले.
"हो अगदी चांगलाच. .. त्याचे काय? " संजयने विचारले.
"त्यावेळी आपण समृद्धी फायनान्स च्या प्रकल्पासाठी प्रयत्न करीत होतो. त्या प्रकल्पाच्या कामात नवीन शर्मा तुझा मदतनीस म्हणून काम करत होता, आणि तो प्रकल्प युनीटेकला मिळाला." चारुदत्त संजयची प्रतिक्रिया अजमावत काही क्षण थांबून राहीला.
संजयच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. त्या प्रकल्पामुळे त्याने बराच मनस्ताप सहन केला होता, आणि शेवटी अपयशच पदरी पडले होते. त्या सर्व घटना क्षणार्धात त्याच्या स्मृतीपटलावर उमटून गेल्या.

"संजय त्या वेळी हा शर्मा आपल्याकडे एक ज्युनियर प्रोग्रॅमर म्हणून काम करत होता. त्या सर्व घडामोडींनंतर त्याने लगेच एक नवीकोरी कार विकत घेतली. तू म्हणशील हा योगायोग असू शकतो. खरं आहे.. पण असे लहानमोठे योगायोग पुढे आणखी काही वेळा आले. संचितचा सर्व कर्मचारी वर्ग उघडपणे ही चर्चा करू लागला आणि त्यात मला प्रत्यक्ष दातारकडून देखिल माहिती मिळाली. कशी ते विचारू नकोस. पण माझ्यावर विश्वास ठेव. शर्मा आणि सरिताचे नाते आहे हे माहिती होते म्हणून केवळ मी त्याला सहन केले आहे. दुसरा कोणी असता तर कधीच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण त्याला शक्यतो प्रशासकीय आणि संघटनात्मक बाबींपासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो."

अनेक दिवसांपासून मनात असलेले सारे त्याने संजयला सांगितले. आता संजय काय म्हणतो त्याची तो वाट बघत होता. संजय काही काळ शांत राहीला. त्याचा चेहरा ताणलेला होता. मागच्या काही घटना तो आठवत होता. त्यावेळी त्याने त्यांना फार महत्व दिले नव्हते, पण आता त्याची संगती लागत होती.

"अस्सं .. हे घडत असताना मी एकटाच यापासून दूर होतो तर? मला हे आधी का नाही सांगितलस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे चारू. तू काही कारणाशिवाय, कोणाहीबद्दल असे बोलणार नाहीस ही खात्री आहे. पण तू मला आधी कल्पना दिली असतीस तर बराचसा मनस्ताप कमी झाला असता आणि नुकसान होणे टळले असते."
नाराजीने चारूदत्तकडे बघत संजय म्हणाला. त्याचे असे बोलणे ऐकून चारूदत्तच्या मनावरील ताण एकदम नाहीसा झाला होता.
"ते बरोबर आहे पण सरिता... " आणि पुढे काय बोलावे ते त्याला समजेना .

चारूदत्तचे बोलणे ऐकून संजयला अतिशय वाईट वाटत होते. नवीन शर्माने त्याचा विश्वासघात केला होता. सरिताच्या शिफारशीने तो संजयकडे आला होता. संजयने त्याला नोकरी देऊ केली. अनेक महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्याने शर्मावर सोपविली होती. आणि त्याने पैसे मिळविण्याचा वाममार्ग पत्करला होता. हे दुःखं तर खूप मोठं होतच, परंतु हे सर्व घडताना तो स्वत: बेसावध राहिला हे त्याला डाचत होतं. चारूदत्तने सारे काही नीट सावरून घेतले होते. नवीन शर्मा संजयच्या पत्नीचा नातेवाईक आहे हे माहिती असल्याने संजयकडे त्याची तक्रारही केली नव्हती. संजयने चारूकडे पहात म्हणले,
"क्षमा कर मला चारू, मी सावध राहायला हवे होते. व्यवहार वेगळा आणि नातेसंबंध वेगळे, हे आपण सुरुवातीपासून ठरवलेले तत्त्व मी विसरलो."
"ते राहू दे सारं.. विसर सगळं. झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपल्या समोर जे नवीन आव्हान आहे, किंवा संधी म्हणू या .. त्याच्याबद्दल बोलूया." चारुदत्त म्हणाला.

दोघेजण परत सुपर फार्माचा विचार करीत होते.
"मी बराच विचार केला चारू .."काही वेळानंतर संजय म्हणाला,
तो काय बोलेल याचा साधारण अंदाज चारूदत्तला होताच. त्याला ते ऐकणे नकोसे वाटत होते. परंतु अशा अनिश्चित परिस्थितीमधे जास्त काळ असणे सर्वच दृष्टीने वाईट होते. काहीतरी सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. तो सावरून संजयचे बोलणे ऐकत होता.

"मला असे वाटते की 'सुपर' च्या प्रकल्पाकरता आपण स्वतंत्रपणे प्रयत्न करूयात. दोघांपैकी कुणाला यश आले तर प्रकल्पाचे काम 'संचित सोल्युशन्स' करेल..."
संजय ने चारूदत्तकडे संमतीसाठी पाहिले. चारुदत्त विचारात पडला होता. हा उपाय चांगला वाटत होता परंतु त्यातील तांत्रिक अडचणी त्रासदायक ठरणार होत्या.
"संजय, कायदे आणि नियमानुसार असे करणे शक्य होणार नाही. कारण जो करार करतो, त्यानेच काम करणे अपेक्षीत असते. आणि संचित तर्फे दोन प्रस्ताव कसे सादर करणार?" चारूदत्तने लगेचच तांत्रिक मुद्दा उपस्थित केला.
आणि तो प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण करायचा हाच तर कळीचा मुद्दा आहे ना. त्या करता आपल्या दोघात एकवाक्यता असायलाच हवी. नाहीतर एव्हढा मोठा आवाका असलेला प्रकल्प योग्य प्रकारे पूर्णत्वास नेता आला नाही तर , व्यवसायाचा विस्तार तर दूरची गोष्ट -- आपली असलेली पत धोक्यात येईल. म्हणून तू माझ्या योजनेचा गंभीरपणे विचार कर . मला वाटते .. "
"तो ही विचार मी केला आहे चारू. तुझी योजना टाकाऊ आहे असे म्हणत नाही, पण माझा आक्षेप विशेषत: त्यातील टेस्टिंग च्या मुद्द्यावर आहे. त्याच्यावर चर्चा करायला हवीच आणि आपण आपला प्रस्ताव देताना दोन विभागात दिला तर नाही चालणार का? कारण आपण उत्तम दर्जाचे काम करणार आहोत, मग त्या करता बजेट .. "
चारूदत्तने निराशेने मान हालवली आणि म्हणाला,
"संजय तुलाही सर्व नियम, प्रक्रिया, कायदे माहिती आहेत आणि तरीही तू असे बोलतो आहेस? आपल्याला हवे त्यांनुसार ते त्यांच्या पद्धती का बदलतील? त्या पेक्षा दोन पर्याय मला दिसताहेत."
असे म्हणून तो थांबला. संजयचे बोलणे ऐकून त्याला असे वाटले होते की काही तरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. काही काळ थांबून त्याने पुढे बोलण्यास सुरुवात केली.
"एक म्हणजे आपण दोघांनी काही तडजोडी स्वीकारायला पाहिजेत. किंवा आपल्यापैकी एकाने 'संचित' च्या सर्व जबाबदारीतून राजीनामा द्यायला हवा."
दोघांनाही काय बोलावे समजत नव्हते.
संजय आश्चर्याने ऐकत होता. ही शक्यता त्याने कधीच गृहीत धरली नव्हती. काय बोलावे त्याला सुचत नव्हते.
काही वेळाने तो म्हणाला,
"तडजोडी स्वीकारायच्या म्हणजे काय? अरे माझी योजना तुझ्या योजनेपेक्षा बरीच वेगळी आहे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे?"
आता परत त्याच्या रागाचा पारा चढू लागला होता. परत दोघांची बोलाचाली सुरू झाली आणि कसलाही निर्णय न होताच चर्चेची समाप्ती झाली.

---------

चारुदत्त शांतपणे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघत होता. बाह्यतः तो कार्यक्रम बघतो आहे असे वाटत असले, तरी त्याचे त्यात अजिबातच लक्ष नव्हते. अनेक विचारांच्या भोवर्‍यामधे तो हरवून गेला होता. जुन्या स्मृती परत परत सामोर्‍या येत होत्या. संचितची सुरूवात, सुरुवातीचे संघर्षाचे दिवस आणि त्यात अखंड टिकून राहिलेली त्याची आणि संजयची भागीदारी... वसुमती, त्याची पत्नी तिथे आल्याचेही त्याला कळले नाही.

वसुमतीने दूरचित्रवाणीचा संच बंद केला तरी काहीच प्रतिक्रिया व्यक्तं न करता, हातातील पेल्याच्या कडेवर आपले बोट फिरवीत राहीला.
"चारू... लक्ष कुठे आहे तुझे?" वसुमतीने जरा मोठ्या आवाजात विचारले.
तिच्या आवाजाने जरासा भानावर येत चारुदत्त म्हणाला,
"काय? काय म्हणतीयस?"
"मला वाटलं तू तो मुलाखतींचा कार्यक्रम बघतो आहेस. पण मी टी. व्ही बंद केला तरी तुला समजले नाही." वसुमती बोलली.
चारुदत्त चांगलाच खजील झाला होता. वसुमतीला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्याच्यावरील कामाचा ताण तिला माहिती होताच. आणि या नवीन उद्भवलेल्या वादामुळे वाढलेल्या मनस्तापाची तिला जाणीव होती.
"मला समजत नाही चारू.. तुम्ही दोघे इतके बुद्धीमान, अनुभवी .. आणि तरीही तुम्हाला हा तिढा सोडविता येत नाही? नक्की अडतंय कुठे सगळं?" वसुमतीने विचारले. तिलासुद्धा हे सर्व असह्य झाले होते. व्यावसायिक ताणतणावांचा परिणाम घरातील वातावरणावर, विशेषत: मुलांवर होऊ नये या साठी ती नेहमी जागरूक असे. चारूदत्तने देखिल आजवर याकरता तिला पूर्ण सहकार्य केले होते. परंतु सध्याची परिस्थिती हाताबाहेर चालली होती. चारूदत्तच्या मन:स्थितीचा परिणाम त्यांच्या घरातल्या वातावरणावर होत होता. मुलांनाही समजत नव्हते त्यांच्या बाबांना झालंय काय?

"आता काय सांगायचे? तुला तर माहिती आहे सगळं. आज परत संजयबरोबर चर्चा झाली, आणि त्यातून काहीही निष्पन्न नाही. वसु, तूच सांग तुला काय वाटत? सुपर चा प्रकल्प मिळविणे आणि यशस्वीपणे पूर्ण करणे, आम्हाला दोघांनाही महत्वाचे वाटते आहे. पण ते कसे करायचे यात आमचे एकमत होत नाहीये. अशा परिस्थितीत संचितची भागीदारी सोडण्यावाचून मलातरी दुसरा पर्याय दिसत नाहीये."

चारूने अस्चस्थपणे हातातील पेला समोरच्या मेजावर ठेवला, मग उठून खिडकीचा पडदा बाजूला सारला. खिडकीबाहेर त्यांची छोटेखानी बाग दिसत होती. हौसेने आणून लावलेली फुलझाडे आणि शोभेची झाडे होती. पायऱ्यांच्या दोहोबाजूला आखीव रेखीव असे लॉन होते. मुख्यं दरवाज्याजवळ असलेल्या दिव्याचा मंद प्रकाश पसरलेला होता. ते नेहमीचे परिचित दृश्य बघताना त्याच्या मनावरील ताण जरासा हलका झाला. वसुमतीकडे बघत त्याने विचारले,
"तुझं काय मत आहे वसु. मी स्वतंत्रपणे या प्रकल्पाचे काम करू की संजयची योजना मान्यं करू?"
वसुमती काही काळ शांत राहीली. तिचा त्याच्या व्यवसायामध्ये सहभाग जरी नसला, तरी तिला त्याबद्दलची माहिती होतीच. सुरुवातीची काही वर्षे ती देखिल संचितची सक्रिय सदस्य होतीच की..
"चारू तू खरंच गंभीरपणे आणि विचारपूर्वक हे बोलतो आहेस का?" वसुमतीने आश्चर्याने विचारले.
संजय आणि चारूदत्तचे नाते तिला चांगलेच परिचयाचे होते. कधी कधी ती चेष्टेने म्हणे की, एकवेळ चारू मला घटस्फोट देईल, पण संजय ची आणि त्याची मैत्री कधी तुटणार नाही. आणि आता चारुदत्त संचित ची भागीदारी सोडण्याच्या गोष्टी करत होता.
"म्हणजे काय? तुला म्हणायचय काय? मी उगीच नसलेल्या समस्या उकरून काढतो आहे असे वाटतंय का तुला?" त्याने वैतागून विचारले.
"हो ! मला अस्संचं वाटतय." प्रत्येक शब्दावर जोर देत वसुमती म्हणाली.
चारूदत्तने ने काही बोलायला सुरुवात केली.. मग तो विचार सोडून देत तो गप्पं राहीला. वसुमतीच पुढे म्हणाली,
"विचार कर जरा.. तुम्हाला सुपर कडून फक्त विचारणा करण्यात आली आहे. जी अगदी सर्वसामान्य प्रक्रिया आहे. कुठलेही काम दूसर्‍यावर सोपविण्याची ही फक्त चाचपणी आहे. सुपर ही एक प्रथितयश व्यावसायिक संस्था आहे. त्यांनी यापूर्वीही अशी कामे कोणाकडून करून घेतली आहेतच की. मेहेरांनी संचितची शिफारस केली म्हणजे ते काम तुम्हाला मिळेलच असे नाही. बरं ते काम नक्की काय आहे? त्याचे स्वरूप आवाका इ. तुम्हाला काहीच माहिती नाही. सुपरकडून घालण्यात येऊ शकणार्‍या अटी-तटींची तुम्हाला माहिती नाही. असे असताना त्याचा ध्यास घेऊन इतकी वर्षे जोपासलेली व्यावसायिक भागीदारी मोडीत काढणे, म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठी जाण्या सारखेच आहे." चारूदत्तला वसुचे सांगणे कळत होते, पण ..
काही वेळाने वसुमती म्हणाली, "सरिता आली होती आज सकाळी. ती सुद्धा हेच सारे सांगत होती. त्यांच्या घरी देखिल हेच नाटक चालू आहे.. "
"वसु.. नाटक वगैरे म्हणू नकोस. तुला काय माहिती ?" चारू चिडून बोलला. त्याला थांबवत वसुमती म्हणाली,
"सगळं माहिती आहे मला, सगळं कळतंय सुद्धा. पण तुम्हा दोघांना ते समजत नाहीये हीच समस्या आहे. तुम्हा दोघांचं सध्या जे काही चालू आहे ते म्हणजे 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' असं आहे. अजून सारं काही अधांतरी आणि अनिश्चित आहे, आणि तुमचे विचार भागीदारी तोडण्यापर्यंत पोहोचले आहेत. अशा वागण्याला काय म्हणायचं?" असे बोलत ती दाराकडे वळली. जाताना म्हणाली,
"सोहमला आज वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळालं. त्याला तुला ते सांगायचय. बराच वेळ वाट पहात होता तो तुझी. पण आज तुला यायला खूपच उशीर झाला. उद्या सकाळी त्याच्याशी बोलल्याखेरीज जाऊ नकोस."
चारूदत्तच्या चेहर्‍यावर हलकेसे स्मित उमटले. वसुमती गेल्यानंतर तो परत आपल्या विचारात गुरफटला. पण आता थोडा फरक झाला होता. वसुमतीचे बोलणे त्याला आठवत होते. "खरच की.. कुठलातरी मोठा प्रकल्प मिळण्याची नुसती शक्यता, हे काही त्यांची भागीदारी तुटण्यासाठी पुरेसे कारण नक्कीच होऊ शकत नाही."

---------

सकाळी नेहमीप्रमाणे चारुदत्त त्याच्या कार्यालयामधे आला. आज त्याच्या मनावरचा ताण बराचसा कमी झाला होता. त्याने दिनेशला बोलावून घेतले. ब्राईट साठी त्याने तयार केलेला आराखडा बघून त्यात थोडेफार बदल सूचवले. करमरकरांना काय अपेक्षीत असू शकेल आणि त्यांना कोणती माहिती कशा पद्धतीने द्यायची यासंबंधी थोड्याफार सूचना दिल्या. दिनेशने तयार केलेला आराखडा खरंच चांगला होता. परंतु त्याला अनुभवाने माहिती होते की करमरकरांना त्यांमध्ये अनेक बदल हवे असणार. म्हणून त्याने दिनेशला सांगितले, की त्यांचे सारे ऐकून घे, फारसा विरोध दर्शवू नकोस, पण त्यावर निर्णय नंतर घेणार असे सांग.
दिनेश तिथून गेल्यानंतर परत त्याचे विचार सुपरकडे वळले. "खरच, मिळेल का हा प्रकल्प संचितला? आणि जरी मिळाला तरी तोवर संजय आणि तो एकत्रं असतील की नाही?" त्याला कसेतरीच वाटले. "संचित अखंडच राहायला हवी, आणि त्या करता शक्यं असेल ते सर्व करायला पाहिजे. कदाचित .."

तितक्यातच कांचन आली. मालवीयला विन्ट्रॉनिक्स च्या मेहेतांनी नुसते आश्वासन देऊन परत पाठविले होते. ही एक डोकेदुखीच होऊन बसली होती. प्रकल्प जवळ जवळ पूर्ण होत आला होता. आता निरनिराळ्या सिस्टीम्स चे टेस्टिंग चालले होते. त्यासाठी काम करणाऱ्या कन्सलटंट्स चे पगार तर देणे भाग होते. पण विनट्रॉनिक्सवाले फारच आखडूपणा करीत होते.
"आता त्या मेहेताकडे मलाच जावे लागेलसे दिसतेय.." चारुदत्त म्हणाला.

त्यानंतर कांचनने बंगळुरू येथे सुरू होत असलेल्या एका प्रकल्पासंबंधी त्याला तपशीलवार माहिती दिली. त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या कन्सलटंट्ससाठी एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करायचा होता. या सर्वाचेच व्यवस्थापन गेली कित्येक वर्षे कांचनच करत असे. चारूदतचा आणि संजयचा तिच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास होता.
दैनंदिन कामकाजात व्यग्र असल्याने सुपरचा विचार जरा मागे पडला होता. त्यात संजय देखिल आज नेहमीप्रमाणे कार्यालयात आलेला होता. त्यामुळे वातावरणातील ताण जरा सैलावला होता.

दुपारी दोघे मिटींगरूम मध्ये आले होते. दिनेश आणि त्याचे दोघे सहाय्यक, त्यांना करमरकरांकडील सविस्तर अहवाल देत होते. ते तिघेजण तेथून गेल्यावर चारुदत्त आणि संजय त्यांच्या नेहमीच्या विषयावर आले. सुपरचा प्रकल्प मिळणारच असे गृहीत धरून त्यांच्या योजना आखलेल्या होत्या. परंतु तो करार संचितला न मिळण्याची शक्यता ते दृष्टीआड करू पहात होते. बराच काळ त्यांची शेवट नसलेली चर्चा चालूच होती. परत चर्चेचा सूर वादविवादाकडे वळला होता. शेवटी संजय जरा रागातच बोलला,
"चारू आजवर मी नेहमीच तुझ्या मतांना मान दिलेला आहे. ही एकवेळ तू तेच करू शकत नाहीस का?"
"तुझ्या लक्षात नसेल, पण मी देखिल अनेकदा पडती बाजू स्वीकारली आहे. आणि संचितचे कर्मचारी अथवा ग्राहकांसमोर कधीच तुझा प्रतिवाद केलेला नाहीये. तू मात्र गेले काही दिवस असा वागतो आहेस, की आपल्या दोघात वाद आहे हे जगजाहीर झालेले आहे." चारुदत्त प्रत्युत्तर दिले.
"म्हणजे सगळी चूक माझीच ... " असे म्हणत संजयने त्याच्या समोरील संगणक बॅग मध्ये ठेवत जाण्याची तयारी केली. चारूदत्तला आता रहावेना. त्याला वसुमतीचे कालचे बोलणे आठवत होते. तुटे पर्यंत ताणण्यात काहीच अर्थ नव्हता. तो म्हणाला,

"संजय, कुठला एखादा प्रकल्प, मग तो अगदी सुपर सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा का असेना, इतका महत्वाचा आहे का? की त्या करता आपण आपली अनेक वर्षांची मैत्री, व्यावसायिक भागीदारी विसरून जावी?"
संजय ने आश्चर्याने चारूदत्तकडे पाहिले आणि काही न बोलता तिथून निघून गेला.

---------

पुढचे काही दिवस दोघेजण संचितच्या कामकाजात व्यग्र होते. बंगळुरूचा प्रकल्प सुरू होत होता. तिथले सर्व मार्गी लागेपर्यंत दोघांनाही स्वस्थता नव्हती. ब्राईट च्या मिटींग्स पण चालू होत्या. करमरकरांच्या शंकांचे निरसन करताना, दिनेश आणि त्याचे सहाय्यक अगदी टेकीस आले होते. काहीवेळा त्यांना चारुदत्त किंवा संजयकडे यायला लागे. संजय आणि चारूदत्तला हे काही नवीन नव्हते. दर चार दोन ग्राहकांमागे एखादा तरी असा अडेलतट्टू निघतोच हा त्यांना अनुभव होता. दिनेश आणि त्याचे सहाय्यक मात्र कधी कधी या प्रकाराने गोंधळून जात. मग त्यांना धीर देऊन, पुढे कसे जायचे, आपले म्हणणे समोरच्याला समजवून कसे सांगायचे इत्यादी बौद्धिके घ्यावी लागत. एकंदरीत तो सर्वच काळ व्यस्ततेचा होता. त्यामुळे सुपरचा विषय जरा मागे पडला होता.

एक दिवस सुपरकडून एक निरोप आला. त्यांच्या औषध निर्मितीच्या कारखान्याकरता त्यांना संगणकीय प्रणाली विकसीत करून हवी होती. त्या संबंधी प्राथमिक बोलणी करण्यासाठी आभासी बैठकीचे आयोजन करायचे होते. आता सुपर चा प्रकल्प एक पाऊल पुढे जात होता. बोलणी करायला जाण्याआधी त्या दोघांत एकवाक्यता होणे मात्र जरूरीचे होते, नाहीतर सारेच फिसकटणार होते. परत एकदा दोघांची चर्चा सुरू झाली. वाद वाढत होता. त्याबरोबर कटुताही.

---------

रविवारचा दिवस होता. चारूदत्तच्या हातात पुस्तक होते. नजर त्यातल्या मजकुरावर फिरत होती, पण काही अर्थबोध होत नव्हता. व्यवसायातील सारे त्रासदायक विचार काही काळ तरी दूर ठेवण्यासाठी त्याने पुस्तक हातात घेतले होते. पुस्तक वाचण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण त्याचा हेतू साध्य होत नव्हता. काही वेळाने वैतागून त्याने पुस्तक समोरच्या टेबलवर ठेवून दिले. तो घरासमोरील बागेमध्ये होता. सकाळचे कोवळे ऊन सुखद वाटत होते. लॉन चे नीटस कापलेले मऊसर गवत, तजेलदार दिसत होते. फुलझाडांवरील रंगीबेरंगी सुगंधी फुले फुलली होती. त्यांचा मंद सुगंध पसरलेला होता. सारे वातावरण, तिथे पसरलेल्या सूर्यप्रकाशासारखेच स्वच्छ आणि नितळ वाटत होते. त्याच्या मनातील अस्वस्थतेच्या कसल्याही खुणा भोवतालच्या परिसरावर जाणवत नव्हत्या. तितक्यात मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. चिरपरिचित निळ्या रंगाची कार आत येत होती. संजयची कार होती ती. चारुदत्त जरासा सावरून बसला. तेव्हढ्यात त्याचा सिक्युरिटी गार्ड सांगत आलाच होता, "देवकर साहेब आलेत.."
चारुदत्त आता उठून जरासा पुढे गेला. समोरून संजय आणि सरिता येत होते. बरोबर मुले पण होती.

"अरे आज काय एकदम अचानक?" चारूदत्तला खरच आश्चर्य वाटत होते. काल उशीरापर्यंत चाललेली त्यांची चर्चा त्याला आठवत होती.
सरिता मुलांना घेऊन घराच्या दिशेने निघाली. चारुदत्त आणि संजय तिथे मांडलेल्या टेबलकडे आले.
"बरं झालं तू आलास .. आता इथे शांतपणे कसलाही व्यत्यंय न येता आपण बोलू शकतो."
मग त्या दोघांनी परत आपले मुद्दे एक एक करून चर्चेला घेतले. अर्थात तरीही निष्पन्न काहीच नव्हते. निष्फळ चर्चेचा आता दोघांनाही कंटाळा आला असावा. मग ते समोर मुलांचा चाललेला खेळ बघत राहीले. मुले लगोरीचा खेळ खेळत होती. एकाने लांबुन, मध्यभागी ठेवलेल्या लगोरीवर चेंडू फेकला. लगोरीच्या लाकडी चकत्या इतस्तत: विखुरल्या गेल्या. मग दुसऱ्या गटातील मुलांनी त्या पुन्हा एकावर एक रचून लगोरी लावायचा प्रयत्न सुरू केला. मधेच काहीतरी बिनसले आणि वादावादी सुरू झाली. सगळे एकत्रं येऊन बोलू लागले. बहुदा काही निकाल लागेना. मग त्यांनी ठरवले परत पहिल्यापासून डावाला सुरुवात करायची. परत लगोरी रचली गेली आणि नवा डाव सुरू झाला.
चारुदत्त आणि संजय ने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावरील ताण आता दूर झालेला दिसत होता.

---------

चारूदत्तची कार संचित सोल्युशन्सच्या इमारतीच्या पायऱ्यांसमोर येऊन थांबली. संचित सोल्युशन्स च्या नाम फलकाकडे अभिमानाने बघत चारूदत्तने कार्यालयात प्रवेश केला. स्वागत कक्षामधे नेहमी प्रमाणे कविता आणि सुनील उपस्थित होतेच. आज तो त्याच्या कक्षात न जाता मीटिंग रूम कडे वळला. त्याच्या पाठोपाठ संजय देखिल तिथे आला. दोघांची बराच वेळ चर्चा चालू होती. आज रात्री आठ वाजता त्यांची सुपर च्या काही अधिकाऱ्यांबरोबर आभासी मीटिंग होती. त्यामुळे त्या आधी त्यांना दोघात असलेले वादाचे मुद्दे निकालात काढायचे होते. सुपरच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांची एकवाक्यता दिसणे जरूरीचेच होते. काही वेळा अशा आल्या की परत वाद होणार की काय असे वाटायला लागले. पण आता दोघांनी समजुतीने घ्यायचे ठरले होते. काही काळानंतर दोघांनी थोडी विश्रांती घ्यायची ठरवली. थोड्याच वेळात कॉफीचा दरवळ आला, दोघांनी दरवाज्याकडे पाहिले. तिथल्या उपाहारगृहातून गरम कॉफीचे मग्ज घेऊन सदा आलेला होता. दोघांना मनोमन हायसं वाटले.

"संजय मला वाटते, आपल्या चर्चेला आता पूर्णविराम द्यावा. बऱ्याच बाबी स्पष्टं झालेल्या आहेत. आता फक्त सुपर च्या अधिकाऱ्याबरोबर बोलताना, त्यांच्यासमोर एकमेकांना प्रतिवाद करायचा नाही. म्हणजे आपण आजवर करत आलो आहोत तसंच. आणि जर आपली आजची बैठक यशस्वी झाली आणि हा प्रकल्प संचित ला मिळाला तर पुढे प्रकल्पाची अंमलबजावणी , पूर्तता कशी करायची ते आपल्याच हाती असेल. मग त्या वेळी आपण आपले वाद, भांडणे परत सुरू करूयात" चारुदत्त हसत हसत म्हणाला.

"बरोबर आहे तुझ.." संजयने सहमती दर्शवली. "मला आज माझंच आश्चर्य वाटतय? गेले काही दिवस मला काय झालं होतं? जे अजून इतकं अस्पष्टं, अनिश्चित आहे, ते मिळविण्याच्या इर्षेने मी इतका कसा वाहवलो? नशीब तू गैरसमजूत करून घेतली नाहीस, मनात अढी ठेवली नाहीस, नाहीतर..." संजय बोलता बोलता थांबला. तो हे मनापासून बोलतो आहे हे चारूदत्तला कळत होते.
"मी सुद्धा काही वेगळा वागत नव्हतो. पण परवा वसुमतीने माझी चांगली कानउघडणी केली आणि मग मी भानावर आलो." चारुदत्त हसत हसत म्हणाला.

*****

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet