टॅक्सी ड्रायव्हर

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

टॅक्सी ड्रायव्हर

- मूळ लेखक आणि इंग्लिश अनुवाद - कर्तार सिंग दुग्गल

- मराठी भाषांतर - सोनिया वीरकर

लेखकाचा परिचय

कर्तार सिंग दुग्गल (जन्म १९१७) हे १९४०च्या दशकात प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी सातत्याने अनेक कथा लिहिल्या. त्यांच्यावर वास्तववादी विचारांचा प्रभाव असून त्यांनी मानवी वास्तवाची काळी आणि कुरूप बाजू अतिशय कौशल्याने रंगवली. त्यांच्या कथांमधे मानसिक वास्तववाद (psychological realism) दिसतो. डंगर, आग खान वाले, नवन घर आणि नवन आदमी हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत.

***

'हे साले बडे लोक!' दितु तिटकाऱ्याने उद्गारला. आपल्या खोलीसमोर टॅक्सी पार्क करताना त्याला टॅक्सीच्या मागच्या सीटवर एक पाकीट दिसलं. ते नोटांनी फुगलेलं होतं. नक्कीच ते कोणत्यातरी प्रवाशाचं होतं. ते पाहून त्याच्या पोटात आनंदाऐवजी भीतीची एक लाट उठली - आणि सगळा जीव कासावीस झाला. आता या पाकीटाचं काय करायचं? आधीच संध्याकाळी उशिराची वेळ होती. दिवसभर त्याच्या टॅक्सीनं शहराच्या पूर्ण लांबी आणि रुंदीत फेऱ्या मारल्या होत्या. त्यानं आजच्या शेवटच्या प्रवाशाला एका रस्त्यावरून टॅक्सीत घेऊन रेल्वे स्टेशनावर उतरवलं होतं. त्या पाकिटाच्या मालकाला तो कुठे शोधू शकणार होता?

दितुची खात्री होती की अशा प्रकारे सापडलेले पैसे नेहमी शापच ठरतात. मागे एकदा त्याला अशाच एका घटनेचा त्रास झाला होता. एक तरुण पोरगी तिची बॅग टॅक्सीमधे विसरून गेली होती - आणि ह्यांना याबद्दल फरक पडत नाही - हे पैसेवाले लोक! या असल्या सगळ्या गोष्टी आपल्याकरता नस्तर, काळ्या तापासारख्या असतात. तेव्हाच त्याच्या बायकोच्या अंगावर कोड आले होते. जेव्हा त्याच्या बायकोनं दुसऱ्या बाईची साडी आणि ब्लाउज वापरले, तेव्हापासून बरं न होणारं ते दुखणं तिच्या मागे लागलं.

त्यानंतर बराच काळ दितु टॅक्सीमधे बसणाऱ्या उतारूंना त्यांचं नाव आणि पत्ता विचारायचा. प्रवाशांना हा शीख टॅक्सी ड्रायव्हर चक्रम वाटायचा. दितु त्यांना समजावायचा की 'तुम्ही पैसेवाले फार निष्काळजी असता. कधीकधी तुमची काही वस्तू टॅक्सीमधे राहून जाते आणि गरीब टॅक्सीवाल्यासमोर मोठं संकट उभं राहातं. मी ती परत पण करू शकत नाही आणि स्वतःकडेही ठेवू पण शकत नाही.'

दितुला पुढे असं विचारणं थांबवावं लागलं. कारण दर वेळी त्यानं असं विचारल्यावर प्रवासी वाद घालायला लागायचे - आणि आज परत ही विसरलेली वस्तू! त्याला जर त्या पोरीचं नाव आणि पत्ता माहीत असता तर त्यानं जाऊन पाकीट परत केलं असतं आणि त्या लफड्यातून मोकळा झाला असता.

जेव्हा जेव्हा त्याचं लक्ष त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर असलेल्या कोडाच्या डागांकडे जायचं तेव्हा तेव्हा तो स्वतःला सांगायचा, 'जे माझ्या मालकीचं नाही त्या गोष्टीशी मला काहीही देणंघेणं ठेवायचं नाही. कधीच नाही.'

आज त्याच्या हातात कुणा दुसऱ्याचं पाकीट असताना त्याला एक जुना प्रसंग आठवला. अनेक वर्षांपूर्वी दूर पाकिस्तानातल्या त्याच्या गावातल्या मुख्य बाजारात ते घडलं होतं. तेव्हा तो 'दितु' नावाचा कुणी निर्वासित नव्हता. तो होता हरदित सिंग, एका सधन कुटुंबातला मुलगा. नुकतीच त्याची मॅट्रिकची परीक्षा झाली होती. एका संध्याकाळी तो सायकलवरून बाजारातून जात असताना त्याला रस्त्याच्या मध्यावर एक पार्सल पडलेलं दिसलं. तो सायकलवरून खाली उतरला आणि त्यानं ते उचलून घेतलं. ते व्यवस्थितपणे बंद केलेलं होतं. ते हाताला जडही लागत होतं. त्यानं आजूबाजूला नजर टाकली. त्याला वाटलं की बाजारातल्या सगळ्यांच्याच ते लक्षात आलं आहे. पण त्याच्याबद्दल अधिक विचार न करता दितुनं सायकलचे पायडल मारले आणि तो ते पार्सल घेऊन बाजारातून पुढे निघून गेला. नंतर पहिली संधी मिळाली तसा तो एका आडबाजूच्या कोपऱ्यात गेला आणि पार्सल उघडायला लागला. त्यानं एक कागद उघडला, मग दुसरा, आणि तो कागदांवर कागद उलगडतच राहिला. असं वाटलं की कोणीतरी त्याची चेष्टा केली होती. ते पार्सल म्हणजे नुसते कागदांचे अगणित थरांवर थरच होते. याचा अर्थ बाजारातले दुकानदार सामान्य माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत होते. जणू काय या दुकानदारांना येणारे-जाणारे ग्राहकच फसवत होते आणि याचा जणू सूड हे व्यापारी उगवत होते! दितुला आपलं तोंड काळं झाल्यासारखं वाटलं. जणू तो सापळ्यात फसलेला एखादा प्राणी होता. त्याला वाटलं आपल्या शरीराची शकलं होतायत. कोणातरी दुकानदारानं त्याला मूर्ख बनवलं होतं. त्यानं ते पार्सल रस्त्याजवळ असलेल्या एखाद्या दुकानात का नाही दिलं? ज्याचं कोणाचं ते असेल तो त्या दुकानात आला असता आणि त्या दुकानदारानं त्याला ते दिलं असतं. उलट दितु ते स्वतःकडे घेऊन बाजाराबाहेर गेला होता. ह्या प्रसंगानंतर लवकरच फाळणी झाली आणि या सर्व व्यापार्‍यांना आपलं शहर सोडावं लागलं. ही एक प्रकारे देवाची कृपाच झाली, नाहीतर दितुला त्यानंतर कधीही त्या बाजारातून जाववलं नसतं.

आजसुद्धा त्याच्यासमोर तसाच प्रश्न उभा राहिला होता. क्षणभर त्याला वाटलं, ते पाकीट तसंच मागच्या सीटवर राहू द्यावं. पण ते मूर्खपणाचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी होणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याचा लहान मुलगा टॅक्सी साफ करायला येईल. त्याला काय वाटेल? शिवाय त्याला दिवसभर टॅक्सी चालवायचीच आहे. एखाद्या परक्या माणसाचं पैशाचं पाकीट तो असं कसं बेवारस पडून राहू देईल? हे म्हणजे, कोणालातरी ते उचलण्याची संधी देण्यासारखंच झालं.

या विचारांमध्ये गढलेला असतानाच तो त्याच्या खोलीत शिरला. बंती त्याची वाटच पाहत होती. एकनिष्ठ बायको ना ती! रोज संध्याकाळी असंच करत असते. दितुच्या हातातलं पाकीट पाहताच तिनं लगेच त्याच्यावर झडप घातली आणि पापणी मिटते तोच ते त्याच्या हातातून ओढून घेतलं. आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला अंदाज आला की ते पाकीट कोणीतरी प्रवासी टॅक्सीमधे विसरून गेला होता. तिचा नवरा पाकीट कधीच वापरत नसे. मिळालेले पैसे तो आपल्या खिशातच कोंबत असे. घरी आल्यावर तो ते सगळे बायकोपुढे ओतायचा. मग बंती नोटा आणि नाणी वेगवेगळी करून ठेवायची.

'बघा, मी म्हणत नव्हते पाकिटात पैसे ठेवणं गैरसोयीचं असतं! आपलं पाकीट हरवतं तेव्हा सगळेच पैसे हरवून जातात.पण आपल्या टॅक्सीमधे पाकीट सोडून जाणारा हा नशीबवान कोण आहे?' त्याची बायको विजयी मुद्रेनं म्हणाली.

दितुला ते जर माहीत असतं तर त्यानं कधीच जाऊन ते त्याच्या मालकाला दिलं असतं.

'बंती, इतर लोकांच्या पैशांशी आपल्याला काही देणंघेणं नसलं पाहिजे.'

त्याचा चेहरा उदास होता. आपली बायको आपलं ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं. ती अशा बाबतीत त्याचं कधीच ऐकत नसे.

'कोण म्हणतं मला त्या पैशांशी काही देणंघेणं आहे? पैशांसाठी तगादा लावणाऱ्या आपल्या देणेकऱ्यांकडे मी ते पाठवून देईन,' ती सहजपणे म्हणाली.
दितु स्वतःशीच पुटपुटला, 'ही बाई म्हणजे कहर आहे!'
'त्यात काय चुकीचं आहे?' त्याचं नावं ठेवणं बंतीला ऐकू गेलं. 'ही बिळासारखी खोली काय जगायला लायक तरी आहे का?' अंधारी आणि घाणेरडी. आपण इथे किती काळ खितपत राहणार आहोत? आणि लवकरच आपला मुलगा शाळेत जाण्याच्या वयाचा होईल. मुलगी आता लहान आहे पण मुलींना मोठं व्हायला काही फार वेळ लागत नाही. आपले शेजारी तर त्यांची मुलगी जन्मल्यापासून लगेच तिच्या हुंड्याची चिंता करायला लागले आहेत. शिवाय, माझ्या सगळ्या आजारांसाठी पौष्टिक जेवण हा एकच इलाज असल्याचं सगळेजण सांगतायत.'
'ते मला पटतं, पण दुसऱ्याचे पैसे समोर असतानाच आपण या सगळ्याचा विचार का करायचा?'
'का म्हणून ते पैसे आपले नाहीत? ते आपल्याच मालकीचे आहेत. आपण कुठे जाऊन ते चोरी करून आणले नाहीत. कोणीतरी हे पाकीट आपल्या टॅक्सीमधे विसरलं. आपण काय ते फेकून द्यायचंय का?'
'तू हा फालतूपणा आधी थांबव!' दितु त्याचे कान बंद करायचा प्रयत्न करत होता.
'त्यात काय फालतूपणा आहे?' बंतीनं रागानं प्रत्युत्तर दिलं. 'कोणी आपली कष्टाची कमाई अशी हरवत असतं का? हा पैसा जर कष्टानं कमावलेला असता, तर त्याचा मालक असा निष्काळजी राहिला असता का?'
'म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?'
'माझं म्हणणं आहे की त्यानं ते पैसे जशा प्रकारे मिळवले तसेच घालवले. आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला ते सापडले.'
'निव्वळ मूर्खपणा! मी तुला त्या दुसर्‍याच्या पैशाला हात लावू देणार नाही.'
'मग तुम्हाला त्या पैशांचं नक्की काय करायचंय ते मला सांगाल का?'
'मी आपल्या देवळाला देणगी देईन.'
'देवळाची व्यवस्था चोर बघतात - ते पुजारी.'
'नाहीतर मी ते एखाद्या गरजू माणसाला देईन.'
'आता आपल्यापेक्षा अजून जास्त गरजू कोण आहे?'
'बंती, जे पैसे आपल्या मालकीचे नाहीत त्याच्याशी काही संबंध ठेवू नकोस. मी सांगितलं होतं तुला.'
'आणि मी ते पैसे घेतले तर...'
'मी तुला फोडून काढीन,' दितु ओरडला. तो त्याच्या बायकोशी इतका निर्दयपणे कधीच बोलला नव्हता.
आपण पुन्हा असेच संतापू या भीतीनं तो जाऊन पलंगावर पडला आणि झोपून गेला.

दितुला थोडा वेळ झोप लागते न लागते तोच वाईट स्वप्नं पडायला लागली. स्वप्नात तो सकाळी त्याची टॅक्सी काढून बाहेर पडला होता आणि त्याचा काही दोष नसताना मेन रोडवर असलेल्या ड्युटीवरच्या पोलिसाने त्याच्याशी हुज्जत घातली. त्यानं त्याची पुन्हा पुन्हा विनवणी केली, पण पोलीस काही त्याचं ऐकेना. जेव्हा दितुनं त्याचे पाय धरायचा प्रयत्न केला तेव्हा त्या निष्ठुर पोलिसानं त्याच्या पोटात लाथ मारली. नंतर दितु टॅक्सी स्टॅन्डजवळ सर्वांच्या आधी पोहोचला, पण त्याच्याकडे कोणताच प्रवासी फिरकला नाही. त्यानं खूप खूप वाट पहिली. शेवटी तो थांबून राहायला इतका कंटाळला की त्यानं टॅक्सी बाहेर काढली आणि कोणी प्रवासी मिळतायत का, ते पाहायला लागला. तो एक किलोमीटर पुढे गेला तेवढ्यात समोरून एक मिलिटरीचा ट्रक वेगानं आला आणि थेट त्याच्या टॅक्सीवर धडकला. त्यात त्या गाडीचा चुराडा झाला आणि ड्रायव्हरनंही तात्काळ जीव गमावला.

दितु झोपेतून खाडकन जागा झाला. तो घामानं डबडबला होता. बंती तिच्या अंथरुणावर गाढ झोपलेली दिसत होती. तिनं ते पैशाचं पाकीट आपल्या छातीशी घट्ट धरलं होतं. दितुनं ते तिच्याकडून ओढून घ्यायचा प्रयत्न केला. तिला दचकून जाग आली आणि ते दोघे पाकिटाची ओढाओढी करू लागले . त्या खेचाखेचीत दितुचा संयम सुटला आणि त्यानं तिला एक थोबाडीत मारली. बंती जोरात किंचाळली. त्यावर त्यानं अजून एक तडाखा ठेवून दिला.

दितुच्या वस्तीत घरगुती भांडणं ही रोजचीच गोष्ट होती. आसपासच्या टॅक्सीवाल्यांना अशा तमाशांची सवय होती. दितुचा कोणताही शेजारी जरी यात पडला नाही तरी त्याचा मुलगा गुलु त्या आवाजानं जागा झाला. त्यानं डोळे चोळत आपल्या आईकडे धाव घेतली. ती त्याच्या वडिलांना शिव्यांची लाखोली वाहत होती.

दितुला आपल्या वागण्याची लाज वाटली. त्यानं असं वागायला नको होतं. आजपर्यंतच्या आयुष्यात त्याचा राग कधी इतका विकोपाला गेला नव्हता. संपूर्ण पश्चात्तापाच्या भावनेनं तो पलंगावर पडला आणि त्यानं आपलं तोंड पांघरुणानं झाकून घेतलं.

'आई, बाबांनी तुला का मारलं?' गुलुनं आईला विचारलं. बंती गप्पच राहिली.
'आई, बाबांनी तुला का मारलं?' गुलुनं आईला तिसऱ्यांदा विचारलं.
'बेटा त्यानं काही फरक पडत नाही. नवरे कधीकधी आपल्या बायकोला मारतात,' बंतीनं त्याला समजावायचा प्रयत्न केला.

आणि त्यानंतर नेहमीपेक्षा काही वेगळं झालंच नाही, असं बंतीनं मुलाला कुशीत घेतलं, दिवा बंद केला आणि ती पुन्हा लवंडली. थोड्या वेळानं ती परत उठून बसली. तिनं कंदील लावला आणि तिनं दितुला सापडलेल्या पाकिटातल्या नोटा मोजायला सुरुवात केली. ती बराच वेळ त्या नोटा मोजत राहिली. मग अजून झोपेसाठी चुळबुळत असलेल्या आपल्या मुलाला तिनं हाक मारली.

'गुलु, तू कधी शंभर रुपयांची नोट पहिली आहेस का रे?'
'नाही आई'
'गुलु, तू कधी...'
आणि मग तिच्या लक्षात आलं की गुलु गाढ झोपून गेला आहे, अगदी तिच्या टॅक्सी ड्रायव्हर नवऱ्यासारखा. तो तर खोलीच्या दुसऱ्या टोकाला आपल्या पलंगावर कधीच गाढ झोपी गेला होता.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet