अव्हेन्यू

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

अव्हेन्यू

- तुकाराम जमाले

'तौक्ते चक्रीवादळ काही तासांत मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार', असं सकाळपासून सगळीकडे बातम्यात सुरू होतं. हळूहळू वाऱ्याचा जोर वाढू लागला आणि दुपारी सोसाट्याचा वारा सुरू झाला. भर दुपारी भरलेल्या काळ्या ढगांनी चहूकडे अंधार करून टाकला. घराच्या चारी बाजूंनी झाडं आहेत. बेडरूमला लागून असलेल्या रस्त्याच्या बाजूने मोठा बहावा, दुसऱ्या बाजूनं बुंध्यात फुगलेलं, म्हातारं नारळाचं झाड, स्वयंपाकघराच्या बाजूनं एक गुलमोहर आणि जीर्ण आंब्याचा वृक्ष आहे. वाऱ्यानं वेडावलेली ही झाडं अंगात आलेल्या अन केस मोकळे सोडून घुमणाऱ्या बाईसारखी हलायला लागली. नारळाचं झाड भुजंगासनात शरीर ताणलेल्या माणसाप्रमाणे, जमिनीलगत वर्तुळाकार वळण घेत आकाशात झेपावलेले आहे, अन त्याचा शेंडा खाली उतरलेल्या ढगांशी लगट करू पाहतोय. नेहमी स्थिर दिसणारं ते उंच खोड उजवीकडून डावीकडे अन डावीकडून उजवीकडे असं शिस्तीत कारचा वायपर फिरावा तस बुंध्यापासून टोकापर्यंत हलतंय. मैफिलीत तल्लीन होऊन दाद देणाऱ्या बुजुर्ग श्रोत्यासारखं. जुन्या, मोठ्या खिडक्यांतून गार वारा आगंतुक घरात शिरला अन खिडक्या लावायची धावपळ सुरू झाली. सकाळपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या मला मात्र बेडरूमची खिडकी बंद करवेना.

हळूहळू वादळाचा वेग वाढला तशी अंधाराबरोबर आसमंतात एक अनामिक भीतीही पसरली. समोरच्या रहदारीच्या रस्त्यावरून अचानक माणसं गायब झाली अन पावसाच्या वेड्यावाकड्या धारांनी रस्त्याचा ताबा घेतला. वाऱ्यानं आडव्याउभ्या अस्ताव्यस्त दिसणाऱ्या धारांनी झाडांना झोडपायला सुरुवात केली. सकाळपासून गळालेल्या हिरव्यापिवळ्या पानांनी रस्ते आच्छादून गेले होते. पाण्याच्या लोटानं ते पांघरून विस्कटले अन रस्त्याच्या कडेला सरले. थोड्याच वेळात नेहमी धुळीनं करडा दिसणारा रस्ता पुन्हा त्याच्या मूळ काळ्याकुट्ट रूपात आला, अन त्याच्या अंगावरचे पांढरेपिवळे पट्टे अधिकच ठळक दिसायला लागले. वाऱ्यापावसाचा वेग वाढला तसे नारळाच्या झाडाचे हेलकावे वाढले अन आता ते समोरच्या बंगल्याच्या भिंतीला घासून करकर असा आवाज करायला लागलं. त्याचा तो फुगलेला, काळवंडलेला, जीर्ण बुंधा उन्मळून तुटून पडेल की काय असं वाटायला लागलं. ढगांचा गडगडाट अन त्यापाठोपाठ अंधाराला भेदून क्षणभर सगळं उजळून टाकणारा विजांचा प्रकाश, त्यात दिसणारी चिंब होऊन अस्ताव्यस्त हलणारी झाडं. अचानक बेडरूमच्या खिडकीबाहेर 'कडाडऽऽऽ' असा जोरात आवाज आला अन काळजाचा एक ठोका चुकला. झाड तुटलं नव्हतं पण टोकाचा, वाळलेल्या झावळ्यांचा एक झुबका तुटून खाली पडला होता. त्याच्या बुडाला असलेले चार-पाच नारळ सुटून रस्त्यावर घरंगळले.

बायको म्हणाली, "झाडं जरा जास्तच आहेत ना ह्या घराभोवती. इतरवेळी किती छान वाटतं पण वादळात टेन्शनच आहे बाई डोक्याला!"
"घरांच्या बाजूच्या झाडांना नेहमी घरापासून विरुद्ध दिशेला बाक दिलेला असतो", मी समजावत म्हणालो.

ह्या नारळाच्या झाडाचा बाक बेडरूमच्या विरुद्ध दिशेला आहे ह्या विचारानं जरा बरं वाटलं. पावसानं सगळ्यात पहिल्यांदा टाटा स्कायची रेंज गायब होते, त्यामुळे बातम्या पाहायचीही सोय उरली नव्हती. मग खिडकी बंद करून घेतली अन विलायची, अदरक टाकून मस्त चहा बनवला. एफएम रेडिओवर काही ऐकण्यासारखं आहे का ते पाहू लागलो. थोड्या वेळानं वाऱ्यापावसाचा जोर ओसरला अन टीव्ही सुरू झाला. पावसात भिजत ठराविक ठिकाणी पाणी साचल्याची, 'गेटवे'वर उधाणलेल्या समुद्राची दृश्य दाखवणारे प्रतिनिधी, अँकर्स ह्यांनी थोड्याच वेळात वीट आणला. मग पोरींबरोबर खेळायला लागलो.

अचानक बॉम्बस्फोट व्हावा तसा एक प्रचंड आवाज व्हरांड्याला लागून असलेल्या सडकेवर आला अन आम्ही सगळे काय झालं म्हणून बघायला व्हरांड्यात धावलो. बहाव्याच एक मोठं झाड उन्मळून रस्त्यावर आडवं झालं होत. एक 'होंडासिटी' थोडक्यात त्याच्याखाली येतायेता बचावली होती. थोड्याच वेळात म्युनिसिपालिटीच्या गाड्या, लोक पोहोचले अन त्यांनी रस्ता सील करून झाड हटवायला सुरुवात केली. हळूहळू वारं आणि पाऊस थांबला.

***

दुसऱ्या दिवशी त्या रस्यावर चालताना ते बहाव्याचं मोठं झाड नसल्यानं झालेल्या अवकाशाच्या पोकळीतून आभाळ एकदम अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. इलेक्ट्रिक करवतीनं फांद्या कापायचं काम वेगानं सुरू होतं अन तो आवाज अंगावर शहारे आणत होता. बुंधा उपटून बाहेर आल्यामुळे जमिनीत एक खड्डा तयार झालेला होता आणि तो लालगढूळ पाण्यानं भरला होता. झाडाची मुळं वेडीवाकडी त्या खड्ड्यात पसरली होती. मुख्य खोड कापल्यावर त्याच्या पांढऱ्या अंतरंगात 'झायलेम आणि फ्लॉएम' ह्या अन्नपाणी वाहणाऱ्या नळ्यांची बनलेली रेखाटनं दिसत होती. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना 'फॉरेन्सिक मेडिसिन'च्या पोस्टिंगमध्ये काही 'पोस्टमॉर्टेम' अटेंड करणं कंपल्सरी होतं. पावसाळ्यातल्या एका दुपारी मी हॉस्पिटलच्या एका कोपऱ्याला असलेल्या ऑटोप्सी रूममध्ये होतो. 'ऑरगॅनोफॉस्फोरस पॉयझनिंग'ची केस असावी, तो उग्र वास सगळ्या रूममध्ये पसरलेला. 'फॉरेन्सिक'च्या सरांनी छातीपासून खाली पोटावर इन्सिजन घ्यायला सुरुवात केली. हळूहळू स्काल्पेल दाबत दाबत बेंबीवरून खाली आणली. थोड्याच वेळात पोटाची कॅव्हिटी उघडली आणि भसकन व्हिसेरा बाहेर आला. मला उलटीची उबळ आली आणि मी बाहेर धाव घेतली. त्या बुंध्याकडे अन तो फटाफट कापणाऱ्या त्या लोकांकडे पाहताच हा प्रसंग पुन्हापुन्हा डोळ्यापुढे तरळायला लागला. येताजाता मी त्या बुंध्याकडे पाहायचं टाळत होतो पण अनावधानाने लक्ष जायचंच. एक कावळा त्या खड्यात आडव्या दोरीप्रमाणे धावणाऱ्या मोठ्या मुळीवर बसून जोरजोरात चोच आदळत होता. त्याला कशाचा राग आला होता कुणास ठाऊक? झाडाबरोबर कोसळलेल्या काही घरट्यांपैकी एक घरटं त्याचं असावं बहुतेक.

२००७मध्ये सायन हॉस्पिटल सोडून केईएममध्ये आलो तेव्हा इथली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे परिसरातली मोठमोठाली झाडं. कैलासपती, बहावा, उंबर, चिंच, आंबा, गुलमोहर, फणस, जांभळ, वड, पिंपळ ही अन ह्यासारखी अनेक झाडं दवाखान्याच्या परिसरात पाहून मला सुखद धक्काच बसला. १३ मजली इमारतीच्या गच्चीवरून पाहिलं की 'मुंबई हा दाटीवाटीनं उभारलेल्या वस्त्यांचा समुद्र आहे अन परळ अन गिरणगावचा परिसर हे एक त्यात असलेलं छोट जंगलाचं बेट आहे' असं वाटायचं. आता असलेले बहुतेक 'टॉवर्स' तेव्हा नव्हते. एरवी फारशी न दिसणारी वडापिंपळाची झाडं इथे बक्कळ पाहायला मिळतात. ह्या मोठ्या झाडांबद्दल, का कुणास ठाऊक, माझ्या मनात खोल कुठेतरी एक विचित्र भीती आहे. आजवर पाहिलेल्या झाडांहून ही जरा वेगळीच आहेत. गावाकडे कशी घरातील बुजुर्गाच्या तोऱ्यात माळावर विस्तीर्ण पसरलेली असतात. पण इथल्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या परिसरात मोठमोठे वडाचे वृक्ष गिरण्यांच्या भिंतींना घट्ट आवळून बसलेले, हा सहवास कधी संपेल अन कधी 'विकास' होईल याचा नेम नसल्याने भेदरल्यासारखे दिसतात. काळाचौकीत एका बंद गिरणीच्या परिसरात एक मोठं वडाचं झाड आहे. मिलची उंच भिंत झाडाच्या मुळांनी अशी वेटोळलीय की ती भिंत ह्या झाडाचाच भाग आहे असं वाटत. मिलचे दरवाजे उघडले तर ती नक्कीच रस्त्यावर येऊन पसरतील असं वाटतं.

ह्या सगळ्यांत मला भावलेलं प्रकरण म्हणजे हॉस्पिटलच्या मागे, परळ गावाच्या बाजूनं रस्त्यावर दुतर्फा असलेली, उन्हाचा शिरकाव होऊ न देणारी बहाव्याची अन शिरिषाची झाडं. 'थांबणं माहीत नसलेलं शहर आपल्या गावीच नाही' अशा थाटात धीरगंभीर, शांत उभी असतात. दोन-तीन जणांच्या कवेत मावणार नाही असा मोठा, तपकिरी, खडबडीत बुंधा; आयुष्याच्या मावळतीला, सुखदुःखाचे चटके सोसलेल्या वृद्धाच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यासारखा. 'दोन्ही बाजूंनी झाडे असलेला मोठा रस्ता' असा मूळ अर्थ असलेला 'अव्हेन्यू' हा आधुनिक शहरी संस्कृतीत अतिवापराने अर्थहीन झालेला शब्द आहे. घर, रस्ते, इमारती, दुकान ह्यापैकी कशालाही आजकाल तो वापरतात. हा रस्ता अव्हेन्यू शब्दाच्या मूळ अर्थाला जागतो. ह्याच्या सौंदर्याची प्रचिती यायची तर पहाटे पहिली बस रस्त्यावरून जायच्या आत इथे यायला हवं. बहाव्याची पिवळीजर्द फुलं एकामागून एक झाडापासून तुटतात, आणि स्वतःभोवती गरगरत खाली येत रस्त्यावर विखुरतात. त्या पिवळेपणावर, शालूच्या पदरावरच्या बुट्टीसारखी उठून दिसणारी, पांढऱ्या-जांभळ्या रेषांची शिरीषाची फुलं. गर्दहिरव्या पानांच्या घुमटाखाली शांत पडलेला, पिवळ्या फुलांनी अन त्यांच्या मंद सुगंधानं भरलेला हिरवा शालू नेसलेल्या अन हळद लागलेल्या अमलान नववधूसारखा हा रस्ता. दिवस उजाडू नये अन ती पहिली बस हे सगळं विस्कटू नये असं वाटत राहतं.

मागच्या गेटवर फक्त सकाळी ६पर्यंतच दिसणारा एक चहावाला असतो. नंतर दिवसभर तो कुठे गायब होतो कुणास ठाऊक! तिथून निघून हाफकिनकडे अन परत हॉस्पिटलच्या गेटकडे, असे सुगंध श्वासात भरत अर्धा तास सकाळी चालायचा माझा अनेक वर्ष नित्यक्रम होता. कुणी जुना मित्र भेटायला आला की रात्रीच जेवण आटोपून निवांत गप्पा मारत ह्या रस्त्याने पाय भरून येईपर्यंत फिरत राहायचं अन झोपायला परतायचं. आजही तिथून जाताना त्या खोडांवरून हात फिरवल्याशिवाय पुढे जाववंत नाही. लहानपणी भाऊ, काकी किंवा इतर कुणी रागावले की मी हमखास आजोबांच्या नाहीतर थोरली चुलती - अक्कांच्या कुशीत शिरायचो. मग त्यांचा रापलेला हात तोंडावरून फिरायचा अन मनाचं मळभ कुठच्या कुठं पळायचं. कितीदातरी तसाच कधी डोळे मिटून स्वप्नात प्रवेश केला ते कळायचही नाही. का कुणास ठेवून ह्या झाडांचा तो स्पर्श मला थेट माझ्या बालपणात घेऊन जातो अन गलबलायला होतं.

मी पहिली किंवा दुसरीत असेन. पांढऱ्या माती अन दगडाच्या आमच्या घराच्या मोठ्या अंगणात एक पिंपळाचं अन लिंबाचं अशी दोन मोठी झाडं होती. एकमेकांना खेटून असलेल्या घरांच्या त्या गल्लीत ते एकमेव मोठं मैदान होत. एका रामनवमीला वळवाचा जोरात पाऊस झाला अन तेव्हाच तो मोठा पिंपळ पडल्याचं सांगतात. पण त्या पटांगणाचं नाव 'पिंपळाखाली' जे पडलं ते पडलच. 'पिंपळाखाली' म्हणलं की सगळ्यांना आमच्या घरासमोरील ही रिकामी जागा अभिप्रेत असायची. नागपंचमीला इथल्या झाडांवर दोन-तीन मोठे झोके बांधले जायचे. ताईच्या सगळ्या मैत्रिणी तिथं झोका खेळायला यायच्या. ताई झोक्यावर उभी राहून एकाहून एक उंच झोके घ्यायला लागायची. मला भीती वाटायची, मग मला तिच्या पायांना पकडून पुढे उभं करायची, अन झोके घ्यायची. किती उंच न्यायचा ह्याचा तिचा एक ठोकताळा होता. झोका उंचावर पोहोचला की एका बाजूला उंचावर कावळ्यांनी बांधलेलं घरटी अन त्यातली फिक्कट, हिरवी-निळी अंडी दिसायला पाहिजे आणि दुसऱ्या टोकाला झाडाची पानं डोक्याला लागली पाहिजेत. माझी भीती गेल्यावर मी गल्लीतल्या इतर लहान पोरापोरींना बोलावून त्यांना झोका घ्यायचं शिकवत ऐट मारायचो. उन्हाळ्यात दुपार सर्वत्र उतरलेली असे अन उष्मा असह्य होई. लिंबाच्या झाडाची घनगर्द, गार सावली पडायची, अन त्यावर हिरव्यापिवळ्या लिंबोळ्यांचा सडा पडे. उकाड्याला कंटाळून आपापली पोती, चवाळी घेऊन इथल्या गारव्यात पडायला सगळी येत. अमुक एकजण कुठे गेलाय, सापडत नाही, "मग पिंपळाखाली बघा बरं एकदा" असा एकूण प्रकार. लिंबाच्या एका बाजूला 'माळकरी दादा'च बसकं घर, उत्तरेला 'डिगाभाऊं'चा चिरेबंदी वाडा, पूर्वेला गराच्या माती अन दगडांचा 'रामचंद्रभाऊ'चा वाडा. ह्या वाड्याची बाहेरून दिसणारी उंच भिंत खालून निम्म्याहून जास्त वेगवेगळ्या आकाराच्या अन रंगाच्या दगडांना मातीने सांधून बनलेली होती. ह्या दगडांवर मोठी पोर मंगळवारच्या बाजारात येणाऱ्या सिनेमाचं नावं रात्री गुपचूप लिहीत. 'हकीकत', 'शोले', 'गंगवा', गैर कानूनी' ही नाव आणि भिंत अजूनही जशीच्या तशी डोळ्यापुढी आहे. 'हा कोण आहे रे नमुना. मला कळू दे एकदा, मग आयुष्यात सिनेमाचं नाव नाही घेणार' अशी तंबी भाऊ (वडील) देत.

सकाळी आठच्या आत ते डाळ-चटणी आणि भाकरी (ह्याच मला नवल वाटे, हा मेनू कधीच बदलायचा नाही), डबा घेऊन नोकरीच्या गावी जात अन संध्याकाळीच परत येत. भाऊंचा आवाज आला की मी अक्काच्या खोलीतील कणगीच्या मागे लपायला धावे. ही भीती हायस्कूलला जाईपर्यंत कायम होती. भाऊंच्या 'मारा'च्या गोष्टी ऐकल्या होत्या. 'खोबऱ्याची आई नारळ मागते का?', 'भातापेक्षा वरण जास्ती झालं का? अशी त्यांची वाक्यं कुणीतरी मार खाणार ह्याची चाहूल असे. एकदा बुबा आणि मधल्या आत्याचा मुलगा, रमेश, ह्यांची कशावरून तरी भांडण झाली. जाड सोलनं दोघांच्याही पाठा लालेलाल झाल्या होत्या. एकदा कुणीतरी वर्गातल्या मुलीच्या दप्तरात 'दिलदार' असं लिहून चिठ्ठी टाकली, तिनं लगेच गुरुजींकडे अन गुरुजींकडून भाऊंकडे तक्रार केली. भाऊंनी एका क्षणात अक्षर ओळखलं आणि मग 'याद राखा असली थेरं कराल तर' म्हणून आम्हा सगळ्यांकडे बघत मार दिला.

सगळ्यांकडून त्यांनी 'हरिपाठ' पाठ करून घेतला होता. सर्वात मोठा चुलतभाऊ 'बुबा' नेहमी त्यांच्यासोबत असे, त्यामुळे आम्हांला काही पाहिजे असेल तर आम्ही बुबाकडे जायचो. संध्याकाळी सगळ्या पोरांनी हातपाय धुवून जेवायला जायच्या आधी हरिपाठाचा एक अभंग म्हणायची सूचना असे. एका दिवाळीत त्यांनी आम्हा सगळ्यांकडून मंगलाष्टकं पाठ करवून घेतली आणि तुळशीचं लग्न लावायला वेगवेगळ्या घरी पाठवलं.

पश्चिमेला रस्त्यापर्यंत एक चढण होती तिला 'उमाट' म्हणत, त्यावर पावसाळ्यात घसरगुंडी खेळायचो. लिंबाखाली निरनिराळे खेळ रंगायचे. माझा आवडता होता तो हिरव्या लिंबोळ्या बाभळीच्या काट्यांच्या टोकाला टोचून एका काठीभोवती रहाटपाळण्यासारख्या फिरवायचा. लिंबाच्या काडीला एका टोकाला वर्तुळाकार गुंडाळून मोगली एरंडाच्या चिकात बुडवून फुंकलं की मोठे फुगे तयार होत. झोपून वर पाहिलं की हिरव्यागार पानाच्या झुबक्यावर पिकलेल्या पिवळ्याधमक लिंबोळ्या पिवळे मण्याचे गुच्छ कानात घातलेल्या दागिन्यासारखे भासत. काही पोरं पिकलेल्या पिवळ्या लिंबोळ्या खायची. कधीकधी भाऊ किंवा सतुअण्णा बुक्कीने नारळ किंवा सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचे. नारळाची कवटी माणसाच्या कवटीपेक्षा दुप्पट टणक असते, त्यामुळे फाजील लाड चालणार नाहीत अशी ताकीद सगळ्यांना मिळे. सकाळी लिंबाचा फाटा काढून मोठी माणसे त्याचा ब्रश करून दात घासायची. बहुतेक जण कोळशाची पावडर अन मीठ एकत्र करून दात घासायला वापरायचे. त्यांच्या तोंडाला लिंबाच्या काडीने अगदी टूथब्रशप्रमाणे चांगला फेस यायचा. मग एकदा सकाळी मी गुपचूप काडी घेऊन तोंडात घातली अन दात घासायला लागलो. फेस काही होईना अन तोंडातला कडवटपणा तर वाढत चाललेला. मग पळत जाऊन आजोबांच्या खडीसारखेच्या डबीतून मूठभर खडे तोंडात टाकले.

पटांगणातलं ऊन-सावल्यांचं घड्याळ ताईला अवगत होतं. माळकरी दादाच्या दारात सावली आली की शाळेची पहिली घंटा, लिंबाखालच्या नरसोबावार पोहोचली की मधली सुट्टी अन वाड्याच्या भिंतीच्या मधोमध पोहोचली की शाळा सुटायची वेळ असं तिचं घड्याळ चाले. उन्हं चढायला लागली की मी आबांचा पानाचा बटवा, खडीसाखरेचा डब्बा, खलबत्ता, घोंगडं, पाण्याचा तांब्या हे सगळं घेऊन लिंबाखाली त्यांची बैठक बनवायचो. त्यांना पान कुटून द्यायचं आणि त्यातील थोड्याश्या पानाने तोंड रंगवायचं हा आवडता कार्यक्रम होता. दोन बोटं 'व्ही' आकारात ओठांवर ठेवून लांब पिंक मारायची आमची चढाओढ असे, अन त्या उद्योगात सारे कपडे खराब होत असत.

दुसरीत मला पेपर वाचता येतो ह्याचं आबांना भारी कौतुक होतं. त्यांचे अनेक मित्र लिंबाखाली गप्पा मारायला येत. मग ते मला बळीअण्णांकडे 'सोलापूर संचार' आणायला पिटाळीत. मी पहिल्यापासून शेवटच्या पानापर्यंत सगळ्या बातम्या वाचायला लागे. 'अमुक ठिकाणी ट्रक कोसळून ५० ठार', 'तमुक ठिकाणी गोळीबारात १०० जखमी' अशा बातम्या मी आबांच्या मित्रवर्तुळात मुद्दाम वाचायचो. कधीकधी मी '१० बळीचे ५० बळी' करी आणि त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया न्याहाळी. 'आर तिच्या मायला', 'अरे देवा', 'काळच वाईट आला' असले उदगार एकूण मजा घेई. त्या काळी शब्दकोड्यांच वेड लागलं होतं. सोलापूर संचारची सगळी शब्दकोडी मी जमवायचो, वामनाबाच्या दुकानात सामान आणायला गेलो की 'शब्दकोड्याचा कागद सामान गुंडाळण्यासाठी वापरा' असा आग्रह करीत असे. एकदा कोड्याचं उत्तर 'सोलापूर संचार'च्या पत्त्यावर पाठवलं, अन आपलं नाव कधी छापून येतंय ह्याची वाट पाहत बसलो. शेवटी एकदाचं ते छापून आलं, अन माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आबा चौकात 'शौकत'च्या हॉटेलात बसले होते, धावतच त्यांना गाठलं अन दाखवलं. आबांनी लगेच तिथे बसलेल्यांना चहा सांगितला, शौकतला एक किलो पेढे बांधायला सांगितले अन मला मारुतीच्या दर्शनाला पाठवलं.

दुपारी एकदोन तास मोठ्यांचा डोळा लागे डोळा लागे तेव्हा पिंपळाखाली स्वच्छ शांतता असे. घरातला स्वयंपाक, धुणीभांडी आवरून बायका मग 'दळण करायला', म्हणजे ज्वारी, डाळी सुपलून, त्यातले केर, खडे बाजूला काढून दळण्यायोग्य करायला घेत. आतापर्यंत बुजून असलेल्या चिमण्या दाणे वेचायला गर्दी करीत. मंद स्वरात गवळणी, गाणी सुरू होत. हाताच्या चार बोटांची टोपली सुपाच्या खाली अन धान्य वरखाली होत असताना सुपाच्या वर लागून एक मस्त ताल बाहेर पडे. तो ऐकत राहावं वाटे. दिवस कले तसं लिंबाखालची सावली विरळ व्हायला लागे, मागे हटायला लागे. मग घोंगडी, चवाळी आपली जागा बदलू लागत. नरसोबाला खेटून एके ठिकाणी मात्र सावली कायम दाट असे अन ती जागा नेहमी भीमादादानी अडवलेली असे. एक तळवट, खताच्या लहान पोत्यात कापूस अन जुनी कापडं टाकून बनवलेली मळकट उशी, अन दोन मोठे तांबे, एवढा लवाजमा सोबत घेऊन ऊन चढायला लागलं की भीमादादा जे लिंबाखाली येत ते दिवस मावळायला येईपर्यंय तिथेच पडून असत. ते आले की त्यांचा तांब्या मी पाण्याने भरून देई अन तळवट, उशी टाकून देई. तिथं येणाऱ्या बहुतेक पोरांशी भीमादादा फटकून वागत अन कुणाला जवळ फिरकू देत नसत.

त्यांच्या जवळ कायम एक आंबट वास येई. मला मात्र थेट त्याच्या पोत्यावर प्रवेश असे. त्यांच्या मळकट छाटणाच्या खिशातून कधी पाडाचा आंबा, जांभळं, गाभूळलेली चिंच असला मेवा मिळे. अक्काला त्यांचं असं आमच्या घरापुढे पडून राहणं आवडत नसे अन ती कुरबुर करी. 'संध्याकाळी भीमाचाबी टाक ग चहा' आबांचा आवाज आला की ती चिडे. दारू उतरलेली असे तेव्हा मात्र भीमादादा अगदी रंगात येत. चिपाटाची बंदूक, तुराट्याचा धनुष्य, गोफणीत दगड ठेवून बरोबर नेम मारायला शिकवत. कधीकधी त्यांच्या पिशवीतून हॉटेलातला शेवचिवडा चाखायला मिळे. आपल्या घरी तसला चिवडा का नाही बनवत असा हट्ट मी अक्काला धरी. दोन-तीन शेळ्या घेऊन कधी कधी ते बारवावरच्या शेतात चरायला घेऊन जात. इथं 'जमालवाड्या'तील बहुतेक सर्वांची एकेक एकरी का होईना शेतं होती. कागद्या, पतंग्या, आमट्या, केसऱ्या अशी अनेक आंब्याची झाडं होती. एकाशेजारी एक असलेल्या तीन आंब्यांतला मधला आंबा 'पाड' असला की भीमादादा शर्यतीवर बरोबर तो आंबा खाली पाडत.

लिंबाची सावली भिंतीवर 'हकीकत' असं लिहिलेल्या दगडावर आली की ताईला ५ वाजल्याचं समजत असे अन ती सर्व पोरांना लिंबाखालून पिटाळी. मग ते भलं मोठं अंगण खराट्याने साफ करून घेई, लिंबाच्या वाळलेल्या पानांचा मोठा पिवळा ढीग जमा होई. लालपिवळ्या पानांच्या करवतीसारख्या कडा मला आवडत. त्या पाटीवर ठेवून, घासून टोकदार केलेल्या पेन्सिलीने पानाचा आकार रेखाटायचा मी प्रयत्न करीत असे. ह्या लाल पिवळ्या पानाचा ढीग आग लावण्याआधीच पेटल्यासारखा भासे. मग शेजारून कुठूनतरी विस्तव आणून ती तो पेटवी. ओलसर पानांमुळे आग लवकर लागायची नाही, भसाभसा धूरमात्र बाहेर पडे अन सगळ्या अंगणात तो वास दरवळे. बरोबर तेव्हाच संध्याकाळी सहाचं 'डिझेल' रेल्वेस्टेशनात पोहोचत असल्याची शिट्टी ऐकू येई. हा वेळेचा अंदाज इतका अचूक असे की रेल्वेचाच धूर अंगणात पोहोचतो की काय असं मला अनेक दिवस वाटत असे. हळूहळू पिंपळाखाली अंधार दाटू लागे. ताई नरसोबाला तेलवात करी अन आम्हांला सगळ्यांना हातपाय धुवून जेवायला बोलवी. सगळ्यात लहान पोराचा आबांच्यासोबत ताटात जेवायचा मान असे. 'निरस्या दुधाचा भाकरीबरोबर केलेला काला अन जवसाची चटणी' हा आबांचा रात्रीचा ठरलेला बेत असे. ढाळजेला मोठ्या माणसांच्या अन गड्यांच्या शेतातील कामाच्या गप्पा सुरू होत, दूर मारुतीच्या पारावरून भजनाचा आवाज येई आणि अक्काच्या मांडीत 'फुलवंती-मधुवंतीची' पुन्हा-पुन्हा ऐकूनही शिळी न होणारी गोष्ट ऐकत कधी झोप लागली अन आपल्याला काकीच्या खोलीत आणल हे समजत नसे.

रामजन्माचा मोठा सोहळा असे गावातल्या मठात. एका रामनवमीला वळवाचा जोरदार पाऊस झाला अन दाणादाण उडाली. मंदिराच्या फरशांवर आम्ही गारा वेचत होतो. पाऊस उघडल्यावर घरी पोहोचलो तर अंगणात घोट्यापर्यंत पाणी आणि पिंपळाच झालं आडवं झालेलं. ते झाड गेलं अन त्यावरची किमान डझनावारी असलेली कावळ्यांची घरटी, रात्री आवाज करून घाबरावणारी घुबडं, अधूनमधून येणारे पोपट अन पांढऱ्या बगळ्यांचे थवे, पंचम्यांत झुलणारे झोके हे सगळं अचानक संपलं.

***

गावाच्या वेशीतून मध्ये आलं की डाव्या बाजूला दवाखाना, शौकतचं हॉटेल, हसीना सायकल मार्ट, एक मशीद, सार्वजनिक वाचनालय अन बाबूची चहाची टपरी, अन उजवीकडे ग्रामपंचायतीची माडी, सत्कार हॉटेल, रेशनदुकान, अन रोशनसाहेबाचं किराणा दुकान. मुसलमान गल्ली, गणेशाचा पार, बाजाररस्ता, जमाले गल्ली ह्या चारीकडून येणारे रस्ते ह्या चौकात थांबत. दवाखान्याला खेटून एक मोठं बुचाचं झाड होत. बुचाची फुलं अन बाबूच्या टपरीवर उकळणारा चहा ह्या दोघांचा मिळून एक मस्त वास तिथं नेहमी असे. शाळेकडे जाता-येताना मी खोल श्वास घेऊन तो जास्तीतजास्त आत घ्यायचा प्रयत्न करी.

पोतड्याचे कपडे घालून वर्षातून कधीतरी गावात येणारे वनवासी लोकांसारखं बुचाच्या भेगाळलेल्या काळसर सालीच्या आत एकदम मऊ आणि पिवळे खोड दिसे. पण त्याचं रूप खरं खुलायचं ते उन्हाळ्याच्या अन दिवाळीच्या सुट्टीत. लांब देठाच्या कळ्यांत असेपर्यंत ती सर्व फुलं झाडाला आकाशाकडे बोट दाखवून काय दाखवत असत कोण जाणे. मग कळीत अलगद सुगंधाने भरलेला वारा शिरे अन ती फुगायला लागे. मधून बाहेर पडण्याची घाई झालेले दोन-तीन दांडे त्या पाच पाकळ्याना अलगद बाजूला करून रात्री बाहेर येत. संध्याकाळी मिटलेल्या सर्व कळ्या सकाळी फुलं होऊन सडकेवर पांढरे पांघरून टाकीत. पानांचा हिरवा रंग झाकोळून टाकत ते पांढरे गुच्छ पौर्णिमेच्या रात्री आकाशात चमकणाऱ्या तारकापुंजासारखे वाटत. एकदा दादासोबत मारुतीच्या मंदिरात जाताना ओंजळभर फुलं गोळा करून घेतली. 'घुबडासारखी झाडाला उलटी टांगलेली ही मारुतीला आवडत नाहीत,' असं ते म्हणाले. ही फुलं एकमेकांत खोवून किंवा त्यांच्या लांब दांड्यांनी एकमेकांना बांधून दोरा न वापरता ताईला वेणी बनवता येई. तिच्या मागे लागून मी एक मोठी वेणी बनवली अन तिसरीच्या आमच्या बाईंना दिली. त्या एकदमच संकोचल्या अन सावरून म्हणाल्या, "छान आहे, पण ही अशी वेणी कुठल्याही बायकांना वाटत फिरू नकोस गावभर."

बाबूच्या चहाच्या दुकानात फक्त 'दिलबहार' असं ऑइल पेंटने लिहिलेला एक आरसा, उभा शेगडीचा स्टोव्ह, काळीकुट्ट जर्मनची पातेली, अन चहा गाळून लाल तपकिरी झालेली समोर ओळीनं टांगलेली फडकी असत. बाबूचे दात अन त्याच्या पातेल्यातील सतत उकळणारे दूध वगळता सर्व दुकानात तपकिरी काळपट रंग भरून राहिला आहे असं वाटे. तिथे जवळ पोहोचताच मात्र चहाचा हवाहवासा गोडूस वास येई. आरशाच्या एका कोपऱ्यात हायस्कूलमधल्या चिंगीसारखी दिसणाऱ्या एका सुंदर नटीचा फोटो होता. 'जो वादा किया वो निभाना पडेगा' सतत चालू असायचं अन ते ऐकत हायस्कूलमधला पिंट्या तिथं कायम पडीक असे. कायम इस्त्रीचे कपडे अन खिशात अत्तर लावलेला रुमाल बाळगणारा तो हायस्कूलमधला एकमेव पोरगा असणार. तो कोणत्या वर्गात आहे हे नक्की कुणालाच माहीत नव्हतं पण अंगाने थोराड, आणि रंगाने गोरा असलेल्या पिंट्याला पोरं टरकत. शाळेत कुणाशी भांडणं झाली की पोरं त्याच्याकडे घेऊन येत. तो अनपेक्षितपणे माझा चांगला मित्र बनला.

हायस्कूलमधली चिंगी सुंदर होती अन नेहमी बुचाच्या फुलाचा गजरा घालायची. त्या फुलांचा वास कायम तिच्यासोबत असे. मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ती हायस्कूलमधल्या इतर पोरींप्रमाणे डोक्यावर दोन शिंगांसारख्या फताड्या वेण्या घालत नसे. एकच सुंदर आणि लांब वेणी अन त्यात कायम मोठा गजरा माळी. तिला रोज, ताजी बुचाची फुलं कोण देत असे कुणाला ठाऊक, कारण चौकात कुणी बायका-पोरी फुलं वेचायला येत नसत. अनेक दिवस मला माझ्या चुलतभावावर - अप्पावर - संशय होता. मी ताईला म्हणायचो 'तू का नाही घालत चिंगीसारखी लांब वेणी?' ताई मोठे डोळे करून माझ्याकडे बघायची. सारखं उन्हात राहिल्याने चिंगीचा चेहरा लालसर, रापलेला दिसे पण तिचा मूळ रंग गोरा होता. माझी उंची तेव्हा दुसरीतल्या इतर मुलांच्या मानाने कमी होती अन मला ती 'बुटकेश्वर' म्हणायची. तशी स्वभावाने सरळसाधी होती पण तोंडाने फार फटकळ. तिच्या वाटेला कोणीही जात नसे कारण ती लगेच आईमाईवरून शिव्या द्यायला लागे.

तिच्या बापाने (तीही वडलांना बापच म्हणे) ओढ्याला लागून असलेल्या मारवाड्याचं शेत केलेलं होतं. म्हणजे खरंतर चिंगी अन तिची आई ह्या दोघीच सगळं करायच्या अन बाप पिऊन त्या शेतातील आमराईत पडून असे. मधल्या सुट्टीत ती जनावरांना चारापाणी करून मग शाळेत परत यायची. तिच्या शेतात दोन मोठी इंग्रजी चिंचांची झाड होती. आमच्या रानाच्या रस्त्यात तिचा गोठा लागे. सरपण फोडणं, म्हशीच्या धारा काढणं, दूध डेअरीला घालणं, गोठ्याची साफसफाई असं तिचं सारखं काहीनाकाही चालू असायचं. मला वाटे हिला आपण काहीतरी मदत करायला पाहिजे, मग 'जा लाईट आली का बघ', 'वासरं बांध' असं काहीतरी ती सांगे. येताजाता इंग्रजी चिंच, डाळिंब नाहीतर पाडाचा आंबा खायला देई. आमराईत कुणी आंबे चोरायला आलेलं दिसलं की ती शिव्या द्यायची. एकदा बाजाररस्त्याला खंडोबाच्या पारावर पोरांचं एक टोळकं बसलं होत. चिंगी जनावरं घेऊन रानात चालली होती. कुणीतरी शिट्टी वाजवली, अन सगळे हसायखिदळायला लागले. मग तिनं एका वासराच्या गळ्यातलं लोढणं काढून सगळ्यांदेखत त्या तीन पोरांना झोडपलं. हायस्कूलच्या मैदानात एका कोपऱ्यात एक विहीर होती. म्हणजे ही जागा गावच्या पाटलांनी संस्थेला दान केली तेव्हा ते त्यांचं शेतच होतं, त्यामुळे विहीरीसकट ती हायस्कूलला मिळालेली. हायस्कूलच्या तारेच्या कुंपणाला झुडुपांनीही वेढून टाकलेलं असल्याने रस्त्यावरून विहीर दिसत नसे. आम्ही त्या झुडपाच्या पानांनी 'पास-नापास' हा खेळ खेळायचो. पानाला मधोमध दुमडून घडी घालायची, मग पान मधून तुटे. त्या घडीची दोन्ही टोकं पकडून एकमेकांजवळ आणली की पानाच्या दोन्ही तुकड्यांमध्ये सप्तरंगी पडदा तयार होई. तो तयार झाला नाही तर 'नापास' होणार अशी भविष्यवाणी. एकदा मी असाच शाळेकडे चाललो होतो अन अजून शाळा भरायला वेळ होता म्हणून 'पास-नापास' खेळत हायस्कूलच्या कम्पाउंडजवळ रेंगाळलो होतो. झुडुपांच्या पलीकडचं काही दिसत नव्हते. कुणीतरी विहिरीजवळ कुजबुजतंय असा आवाज आला, मी हाताने झुडपं बाजूला केली आणि आत पाहिलं तर पिंट्या अन चिंगी विहिरीच्या कट्ट्यावर बोलत बसलेले. पिंट्याने तिच्या वेणीत बुचाच्या फुलांचा गजरा माळलेलं मी पाहिलं. मला पाहताच दोघंही घाबरली. आता आपली काही खैर नाही म्हणून मी शाळेकडे धूम ठोकली.

शाळा सुटली अन पिंट्या गेटवर माझी वाट बघत उभा. मी घाबरलो अन पळत हेडमास्तरांकडे जाऊन थांबावं असं वाटलं. पण पिंट्या एकदमच गोडीत आला. मला सायकलवर बसवून चौकात बाब्याच्या हॉटेलकडे आणलं. बाब्याला माझ्यासाठी एक प्लेट चिवडा द्यायला सांगितलं. ही माझी हॉटेलात बसून खायची बहुधा पहिली वेळ असावी. घरच्या कुणी आपल्याला असं हॉटेलात बसून खाताना बघितलं अन भाऊंना कळलं तर काय होईल याचा विचार डोक्यात सुरू. मी पटापट चिवडा, चहा संपवला. "चिंगी माझी मैत्रीण आहे. तुला कळायची गरज नव्हती पण आता कळलं. कुणालाही सांगायचं नाही. तू बिनधास्त असं, तुला कुणी शाळेत त्रास देत असेल तर मला सांगायचं."
आप्प्याने घरी आल्यावर विचारलेच, "पिंट्याबरोबर काय करत होतास तू चौकात. असल्या आवारागर्दी पोरांच्या नादाला कशाला लागतोस तू?"
चिंगीच्या वेणीत नेहमी दिसणाऱ्या बुचाच्या गजऱ्याचं गुपित कळलं आणि ते मी पोटात गप्प दडवून ठेवलं. शहरातून जयंत भागवत दुसरीत आमच्या वर्गात आला. त्याच्या आईची बदली आमच्या गावात झाली होती. तो बुचाच्या झाडाला 'आकाशलिंब' म्हणे. 'कुठं लिंबाचं झाड अन कुठं बुचाचं, काहीही बोलतो' म्हणून आम्ही सगळे त्याला हसायचो. सुरुवातीला गावच्या पोरांत फारसं न मिसळणारा जयंत नंतर नेहमी आमच्याबरोबर असायचा. चौथीत त्याच्या आईची पुन्हा बदली झाली अन तो गेला. वेशीजवळचं बुचाचं झाड मी आजवर पाहिलेलं पहिलं आणि सर्वांत मोठं. गावच्या वेशीत शिरलं की येणारा त्याचा दरवळ चिंगी, होगल्याचा पिंट्या, आणि जयंत ह्या तिघांच्या आठवणी घेऊन येतो. ह्या तिघांचाही सध्याचा पत्ता मला माहीत नाही.

त्या काळी भुतांवर माझा ठाम विश्वास होता. ह्याच मुख्य कारण म्हणजे मोठ्या भावंडांच्या, विशेषतः अप्पाच्या, गप्पांत नेहमी असणारी भुतं. शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या परव्यातील हडळ, 'पाच पिपर्णी' ह्या ओळीने बार्शी रस्त्याला लागून असलेल्या पाच पिंपळाच्या झाडांवरची भुतं, भैरीसाहेबाचा दर्गा अन मसनवाटा ह्यांच्या मध्ये असलेल्या अजस्र चिंचेच्या झाडावरची लहानमोठी भुतं, मारुतीच्या मंदिरामागे मरीआईच्या विहिरीत राहणारा मुंजा ही सगळी मंडळी जणू आपल्या घरातलीच आहेत; अशा प्रकारे मोठी पोरं गप्पा मारीत. म्हणजे उदाहारणार्थ, परव्यातील हडळ पाच पिपर्णीवरच्या भूताच्या तुलनेत चिल्लर आहे वगैरे. एखाद्या दुपारी अचानक जोरात वारा सुटे, धूळ-पाचोळा उडून डोळ्यांत जायला लागे. मग सगळीजण ओसरीला येऊन बसत. अशावेळी वातावरणात भीती भरण्यात अप्पाचा हातखंडा होता. धुळीच्या स्वतःभोवती फिरणाऱ्या अन वेगाने पुढे सरकणाऱ्या त्या लोटाला 'तो भुताचा अवतार' असं सांगे. मग आम्ही सगळे त्याकडे घाबरून एकटक बघत असू. धूळ, पाचोळा, वाळलेली लिंबाची पानं, इत्यादी मिसळून बनलेलं ते उंचच उंच वादळ एकदम जिवंतच वाटू लागे. त्याची उंची, आकार, वेग बघून अप्पा ते परव्यातली हडळ आहे, की चिंचेवरचा मुंजा आहे हे आम्हांला समजावून सांगी.

एकदा आमच्या वर्गातला जयंत भागवत लिंबाखाली खेळायला आला अन अप्पाने ह्या गप्पा सुरू केल्या. जयंतला हे सगळं नवीन होतं. तो जाम टरकला. पण वरवर तसं न दाखवता 'भूतबीत काही नसतं, हे सगळं खोटंय, माझे काका अमेरिकेत सायन्टिस्ट होते त्यांनी मला सांगितलंय' असं म्हणायला लागला. मग अप्पाने त्याला बाजूला घेतलं अन समजवायला सुरुवात केली, "तुला माहीत आहे का, असल्या वावटळीला इंग्रजीत काय नाव आहे? 'डस्ट डेव्हील'. प्रत्येक वावटळ ही भुताचाच अवतार असते हा शोध अमेरिकेतच लागलाय पहिल्यांदा." जयंत रडायला लागला, मग वावटळ ओसरल्यावर आम्ही सगळे त्याला घरी सोडायला गेलो.

आमच्या बांधला लागून असलेल्या शेतात अवाढव्य पिंपळ होता. त्या पाच-सहा एकर वावरात दुसरं कशाचंच झाड नव्हतं, त्यामुळे तो एकदम सगळीकडे नजर फिरवीत, हात बांधून, राखण करीत उभ्या असलेल्या माणसासारखा भासे. इतर झाडांसारखी लाल तपकिरी खडबडीत साल ह्याला का नसते कुणास ठाऊक, एकदम पिवळसर पांढरी, एखाद्या प्राण्याच्या कातडीसारखी ती दिसते, त्यातच लोकही खाली उदबत्त्या, कुंकू, हळद वगैरे लावून त्याचा दरारा अजूनच वाढवतात. तर ह्या पिंपळाच्या एका मोठ्या आडव्या फांदीवर ५-६ आग्या मोहळं होती. त्यांचा आकारही त्या झाडाच्या प्रचंड आकाराला शोभेल असाच होता. एका मोठ्या आडव्या दोरीवर ओळीने कुणीतरी चारपाच घोंगड्या टांगून ठेवली आहेत असं वाटे. अन तीच ह्या पिंपळावरची पाच भुतं आहेत असं कुणीतरी सांगितलेलं. रात्रभर ती फिरायला जातात अन सकाळी पुन्हा येऊन झाडावर लटकतात अशी नेमकी माहिती अप्पाने दिलेली. बाकी कुणीही त्यावर विश्वास ठेवायचं नाही पण मला वाटायचं, 'हो असं असणं शक्य आहे, रात्री तिथं जाऊन मोहळं जागेवर आहेत की नाही हे कुणी तपासलंय?' शेजाऱ्यांशी बांधावरून वर्षानुवर्षे भांडण होती, त्यामुळं आम्ही कुणी कधीच त्या वावरात जायचो नाहीत. एका वर्षी तिथं ऊस तोडून खोडवा केलेला होता. रान तयार करायला म्हणून साधू पौळाने खोडवा पेटवायला सुरुवात केली. हळूहळू धूर वाढला अन पाचही मोहळं उठली अन पाच झुंडी करून साधू पौळ अन त्याच्याबरोबरच्या चार-पाच गड्यांच्या मागे लागली. काळी घोंगडी पांघरून पाचजण पाच माणसांचा पाठलाग करतायेत असं दिसत होत. आणि आश्चर्य म्हणजे त्या पाच गड्यांव्यतिरिक्त ती इतर कुणाच्याच मागे जात नव्हती. चार माणसं चवाळी पांघरून कोट्यात येऊन बसली तर माशांच्या झुंडी त्यांच्या भोवती कोट्यात. साधू पौळ आमच्या कोट्यात शिरला पण माशा काही हटेनात. दादा शेवटी म्हणाले, "तू आता विहिरीत उडी मार अन पाण्यात बुडी घेऊन थोडा वेळ थांब". मग साधू पौळाने काठावरून विहिरीत मुटका मारला, पण माशा किती चिवट. तो पाण्यात बुडी घेई अन माशा तो वर यायची वाट बघत पाण्यावर घोंगावत. असं अर्धाएक तास सुरू राहिलं अन मग माशांनी त्या पाच जणांचा पिच्छा सोडला. अप्पा माझ्याकडं बघत म्हणाला,"बघ, म्हणलो होतो की नाही मी ती साधी मोहळं नाहीत म्हणून!"

ह्या सगळ्यांत दगडी बोळातल्या भुताला मी सर्वांत जास्त घाबरायचो. राममंदिराच्या बाजूने बाजाररस्त्याला यायचं झालं तर ह्या बोळातून यावं लागे. मित्राबरोबर किंवा अक्का, काकी ह्यांच्यासोबत शेतात जायचं असे तेव्हाही वाट गल्लीबोळांतून. सगळ्यांसोबत असताना काही वाटायचं नाही पण एकटं असलं की मात्र भीतीने गाळण उडे. दोन्ही बाजूने दोन चिरेबंदी वाड्यांच्या काळ्याकुट्ट दगडी भिंती अन खाली गुळगुळीत काळ्या दगडांचा रस्ता. एखाद्या काळ्या बोगद्यातून जातोय असंच वाटायचं. बोळात शिरताना 'राम, राम, राम, राम' सुरू व्हायचं ते बोळ संपते तिथल्या दगडी विहिरीपर्यंत.

चार-पाच वर्षंतरी भुतांवर माझा ठाम विश्वास होता. हा भेकड होत चाललाय, म्हणून मग मला मारुतीला रोज संध्याकाळी तेलवात करायला पाठवायला लागले. दिवस मावळायच्या आधीच मी हे काम उरकून घेत असे. मला माहीत असलेला अन भुताला न घाबरणारा एकमेव माणूस म्हणजे भीमादादा. शेजारच्या होगल्याच्या आजीच्या अंगात 'आसरा' यायच्या. उंच, हडकुळी अन कमरेत वाकलेली ही म्हातारी अचानक घुमू लागे. विस्कटलेले केस, घामाने कपाळभर पसरलेला मळवट, नऊवारी गडद हिरवी साडी घालून ती दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंतवून हात ताणून देई अन गोलाकार फिरायला लागे. कवड्यांची माळ, तेलकट, लाल कापड गुंडाळून केलेली मोठी वात, अन बांबूच्या काड्यांची शेणानं सारवलेली तिची परडी समोर ठेवून, रेल्वेचं डिझेल सुरू होताना निघतो तसा आवाज तोंडाने काढी. एरवी घरात कामात मग्न असलेल्या सगळ्या गल्लीतल्या बाया ह्या एकाच वेळी पिंपळाखाली जमा होत. काही वेळ सगळ्या जणी फक्त पदर घेऊन गोल तिच्याभोवती तिला न्याहाळीत बसत.

मग अक्का विचारी, "काय मागतंय?"
"आई नाराजंय."
"का?"
"पोराच्या लग्नाचा बोकड अजून कसा नाही कापला? बोकड मागतीय."
"पाऊसमान चांगलं नाही, सुगी नीट आली नाही, आईला सांग."
मग तो डिझेलच्या इंजिनासारखा आवाज वाढे, सगळ्या बाया एकमेकींकडे बघायला लागत.
"बरं, वड्याची आमटी कर मग."
सगळ्यांचा जीव मी भांड्यात पडे, अन वेग कमी होऊन स्टेशनात थांबणाऱ्या डिझेल सारखा आवाज करून ती थांबे. सगळ्या बायका पटापट मग तिच्या पाया पडत अन परत आपापल्या जागी जाऊन बसत. मी अक्काचा हात जो घट्ट पकडलेला असे तो सगळ्या बायका अन होगल्याची म्हातारी घरी जाईपर्यंत सोडीत नसे. एकदा असच होगले आजीच्या अंगात आलं अन ती घुमायला लागली. भीमादादा नेमके पारध्याच्या पिढीवरून तांब्या भरून लिंबाखाली आलेले. "लाथ मागतीय का पेकाटात?" असं म्हणले अन सगळ्या बाया त्यांच्या नावाने बोट मोडायला लागल्या. मग सगळं शांत झाल्यावर मी त्यांच्याकडे गेलो अन विचारले की तुम्ही होगलेआजीला असं बोलायला नको होतं, तिनं तुमच्यावर राग धरला तर? "मी देवालाबी नाही घाबरत, मग भुताला कशाला भिऊ?" ह्यामुळे भीमादादाबद्दल एकूण आदर वाढला.

एकदा सत्तूअण्णा आम्हांला गाडीत बसवून शेताकडे घेऊन चालला होता. गाडी परव्याजवळ आली अन नेमका कुणीतरी परव्यातल्या हडळींचा विषय काढला. मी मोठ्यानं रडायला सुरू केलं, सत्तूअण्णाला म्हणलं 'गाडी पळव'. त्यानं बैलांच्या शेपट्या पिरगाळल्या अन बैल उधळले. गाडीचं एक चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या सीताफळाच्या खोडावर चढलं अन गाडी उलथली. इतर कुणाला काही लागलं नाही पण माझ्या हातावर गाडीची साटी पडली अन हात टम्म फुगला. नंतर २-३ आठवडे रोज संध्याकाळी गावातल्या हाडवैदूकडे जाऊन लेप लावला.

एकदा शाळेतून परत येत असताना रस्त्यावर ठराविक अंतराने एकापाठोपाठ एक पैशाची नाणी सापडायला लागली. मी ती वेचली अन दप्तरात ठेवून घरी आणली. अप्पाला ती दिसली अन तो म्हणाला, "पाटलाची म्हातारी वारलीय, अन तिच्या प्रेतावरून टाकलेली ही नाणी तू घरी आणलीस? आता तुझी खैर नाही." मग त्याने ती फेकून देण्यासाठी माझ्याकडून घेतली अन मला "लवकर चल मारुतीच्या पारावर आता, शंभर प्रदक्षिणा घाल" असं म्हणून मारुतीच्या पाया पडायला घेऊन गेला. ह्या असल्या गोष्टी त्याला कुठून काळात असत कोण जाणे! पण आम्हां सगळ्यांचा त्याच्या सांगण्यावर ठाम विश्वास असे, अन बहुतांशी संबंधित काहीही शंका असली की सर्वजण ती त्यालाच विचारीत. माझी भीतीनं गाळणं उडाली होती. मारुतीच्या पारावर गेलो तेव्हा अंधारायला लागलेलं. मंदिराच्या मागेच मरीआईची विहीर अन त्याच्या पलीकडे मसणवाटा. प्रदक्षिणा मारताना मागच्या बाजूला गेलं की भीतीनं पायांचा वेग वाढे. कसाबसाच मी घरी पोहोचलो, अन जे रडायला लागलो ते थांबेचना. रानातून परत आलेली माणसं एकेक करून माझ्याकडे यायची अन काय झालंय म्हणून विचारायची.

मला नीट बोलताही येईना. काकींनी दृष्ट काढली, अक्काने मांडीवर घेऊन गोष्टीमागून गोष्टी सांगायला सुरुवात केली, आजोबा शेजारी येऊन बसले पण झोप काही येईना. रात्री उशिरा कधीतरी झोप लागली. गावात कुणी माणूस मेलंय असं घरात कुणाकडून ऐकलं की मी त्या दिवशी घराबाहेरच पडत नसे. हे आणखी भेकड होत चाललंय, असं दिसल्यावर मग सत्तूअण्णा मला रोज तालमीत सोबत घेऊन जाऊ लागला. हळूहळू ही भीती गेली पण मारुतीची तेलवात मात्र बरेच दिवस सुरू असल्याचं स्मरतं. मी एमबीबीएसला गेलो तेव्हा डिसेक्शन वगैरे करू शकेल की नाही ह्याबद्दल आमच्या तात्यांना गंभीर शंका होती. तो प्रकार फारसा आवडत नसला तरी भीती कधीच वाटली नाही.भुतांची भीती नेमकी कधी पळाली हे लक्षात नाही.

***

आमच्या एकूण तीन मोठ्या आमराया होत्या. ह्यांतली 'फडात बारवावरची' आणि 'नागवाटेच्या माळावरची' ह्या दोन मोठ्या. म्हणजे प्रत्येकी डझनभर आंब्याची मोठमोठाली, दोन-तीन पिढ्या इतकी जुनी झाडं तिथे होती. बहुतेक सगळे रायवळ, विविध चवींचे अन वैशिष्ट्यांचे आंबे. आंब्याचं नाव त्याचा गुणविशेष सांगणारं. लांब केळीसारखा दिसणारा केळ्या, द्राक्षाच्या घडासारखे आंबे लागणारा घड्या, दुधासारखा पांढरट रस असणारा दुध्या, नांगराच्या फाळासारखा टोकाला बाक असलेला नांगऱ्या, गोडीत तूपसाखरेशी स्पर्धा करणारा तुप्या अशी विविध नावं. काही नावं गमतीने, उपरोधाने ठेवलेली असत. दादांनी विहिरीजवळ असलेल्या आंब्याचे नाव ठेवलं 'खडीसाखऱ्या'. हा आंबा पिकला की लालबुंद दिसे आणि बघणाराला वाटे की हा खूप गोड असला पाहिजे. व्यवस्थित दाबून, चीक पिळून, ताटात ठेवलेल्या आंब्याचं ताट फजिती करण्यासाठी पाहुण्यांपुढे ठेवलं जाई. तोंडात घातला की त्या माणसाचं तोंड बघण्यासारखं होई अन सगळे हसत. फडातल्या एका गोड आंब्याला भीमादादा 'काळतोंड्या' म्हणीत, का तर थोडा जास्त पिकला की तोंडाला काळा पडतो म्हणून. फडातल्या कुठल्या आंब्याला पाड लागलाय ह्याची चाहूल सर्वांत आधी झाडावरच्या पक्ष्यांना अन त्यानंतर भीमदादाला लागते असं म्हणीत. कधीतरी त्यांच्यासोबत फडात गेलं की बरोबर नेम मारून ते आंब्याच्या पाडांचा ढीग उभा करीत. काही आंब्यांच्या पाडाच्या चवीची सर पिकलेल्या आंब्यांना येत नसे अन आम्ही फडशा पाडत असू.

माळावरच्या, गावापासून सर्वांत दूरवर असलेल्या आमराईचा 'आंबू' नावाचा, अनेक वर्षापासूनचा राखणदार होता. कुठल्या आंब्याला पाड लागलाय ह्याची वर्दी तो देई. हा तिथेच मुक्कामी असे, ना झोपडी ना निवारा, हा आंब्याखाली निवांत पडलेला असे. केस लांब वाढलेले अन कमरेचा धोतराचा तुकडा सोडला तर हा ऊन, वाऱ्यात उघडाच फिरे. एका मोठ्या आंब्याच्या ढोलीत त्यांचं सामान ठेवलेलं असे. माळावरची लाल माती तो खायचा आणि तिथला एक मोठा नाग त्याचा सोबती होता म्हणे. लाल माती खाऊन जगतो म्हणून कधीच आजारी पडत नाही अशी त्याची ख्याती होती. मला कधीकधी जटाधारी आंबू आंब्याच्या झाडाखाली डोळे मिटून ध्यानस्थ बसलाय अन त्याच्या गळयाभोवती तो नाग फिरतोय असं स्वप्न पडत असे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असत. आंबे खायला पाव्हण्यारावळयाची पोरं घरी आमच्याकडे आलेली असत. मग हे सगळं लटांबर गाडीत बसवून, आंबे भरायला रिकामी पोती, अन आंबे काढणाऱ्या उतारू लोकांच्या भाकरी घेऊन सतूअण्णा माळावर घेऊन जाई. चुलते, चुलत चुलते, चुलत चुलत चुलते अशा सगळ्यांचा आमराईत वाटा होता. एरवी ओसाड असलेल्या माळावर पोरांची वानरसेनाच जमायची. सूरपारंब्याचा खेळ रंगायचा. माणिकभाऊचे दोन खास खेळ होते. दोन्ही खेळांत जिंकणाऱ्यांना एक रुपयाचं बक्षीस असे. पहिल्याच, आडव्या फांदीवर सोल टाकून दोन्ही टोकं जवळ आणली जायची. एक टोक बैलगाडीच्या खिळीला मधोमध बांधलेले असे. त्या गाठीच्या दोन्ही बाजूंना पाय ठेवून उभं राहायचं अन दुसऱ्या हाताने दोर खाली ओढायचा. दोर ओढला जाताच खिळीवर उभे असलेले शरीर आंब्याच्या फांदीकडे वरवर घेऊन जायचं अन फांदीजवळ पोहोचताच दोन्ही गुडघ्यांनी फांदीला स्पर्श करायचा. बहुतेक जण अर्ध्या उंचीवरही पोहोचत नसत. आमच्या अप्पा किंवा आत्याचा मुलगा मनोज ह्यांसारखी काटक पोरं कशीबशी फांदीपर्यंत तर पोहोचत, पण गुडघ्यांनी फांदीला स्पर्श करण्याच्या स्टेपला मात्र पायाखालची खीळ सटकायची अन तो धपकन खाली वावरातल्या काळ्या ढेकळावर आपटायचा. दुसरा, अगदी सोपा वाटावा असा खेळ होता. १ ते ५०० हे आकडे एकही चूक न करता लिहायचे. प्रत्येकाला वाटे 'ह्यात काय मोठी गोष्ट?' पण जवळपास प्रत्येकजण २००च्या आतच एकतरी चूक करीतच असे. ह्याचं मला नवल वाटे. माणिकभाऊ शिक्षक होते त्या शाळेत त्यांनी म्हणे नोटीस बोर्डावर '१ ते ५०० उजळणी अचूक लिहा अन १ रूपया जिंका' अशी सूचनाच लिहिली होती.

पाच-सहा उतारू लोकांची टोळी फटाफट आंबे उतरी. संध्याकाळपर्यंत पाड खाऊन पोट भरे. काळ्याभोर मातीत हिरव्या आंब्यांचा मोठा ढीग उभा राही. आंब्याचा चिकाच्या वास सगळीकडे भरलेला असे. मोजणी सुरू होई. एका गाडीत ४-५ अशी आंब्याची पोती भरली जात, अन गाड्या गावाकडे निघत. वळणावर नागाचं मंदिर होत, नारळ फोडून एक आंबा प्रसाद म्हणून तिथं ठेवला जाई.

गावाजवळ असलेल्या शेतातली, कोट्यावरची, आंब्याची झाडं तेवढी जुनी नसावीत. सगळ्यात शेवटी ती उतरत. त्यामुळे अख्खा उन्हाळा आंबे सुरूच राहत. ठेवायला जागा पुरत नसे. गावातल्या बहुतेक मोठ्या वाड्यांत दगडी तळघरं होती, त्यांना 'लादनि' म्हणत असत. आंबे पिकवत ठेवायला घरात जागा पुरत नसे म्हणून 'जंगमाची लादनि' उन्हाळ्यात तीन महिने आमच्याकडे असे. तिथल्या मिट्ट काळोखात दिवसाही चिमणीच्या दिव्याचा उजेड घेऊन जावं लागे. १-२ आठवड्यांत आंबे पिकल्याचा घमघमाट थेट रस्त्यावर पसरे. मोठाली टोपली अन चिमणीदिवा घेऊन आम्ही सकाळी अन संध्याकाळी जंगमाच्या लादनित जायचो. सगळीकडे उसाचे पाचट टाकलेले असल्यानं दिवा पडला तर किती मोठी आग लागेल ह्याची मला कायम भीती वाटे. पिकलेले आंबे टोपल्यांत भरायचे, जंगमाच्या स्टीलच्या बारीक टोपलीत काही आंबे द्यायचे, हेच त्या लादनिचं भाडं, अन घरी यायचं. 'आंबे खायला या' असे निरोप पाहुण्यारावळ्यांना जात. तांबोळ्याकडून पानाची टोपली किंवा डाली मागविल्या जात. त्या भरून दूरच्या नातेवाईकांकडे पोहोचवल्या जात.

अनेक पाहुणे आंबे खायला येत. व्यवस्थित धुवून, चीक काढून, तोंड फोडून, मोठ्या परातीत आंबे व्यवस्थित ठेवले जात. कुणीतरी एकजण पाहुण्यांना सोबत म्हणून आंबे खायला बसे. एकजण धुवून पिळायचं काम करी. पोट जड होऊन सहज उठता येऊ नये अशा अवस्थेपर्यंत ,"हा बघा, हा माळावरचा तुप्या, हा बघा कोट्यावरचा केशरी.. " असा आग्रह चालत असे. सकाळी आंब्याचा नाश्ता, दुपारी रस अन पुरणपोळी, असं सगळं झाल्यावर 'गोड खाऊन जीभ शेवाळली असेल' म्हणून पाव्हण्याला रात्रीच्या जेवणात मासा, नाहीतर मटणाचा बेत होई. घर आणि अंगणात सगळीकडे आंब्याचा वास भरून असे. खाऊनही उरलेच तर मग बाजारात आंबे विकायला पाठवीत. दादा म्हणत "आंबे मायंदाळ झाले यंदा, पोरांची तोंडंसुद्धा पिवळी व्हायला लागली". माळावरचा आषाढ महिन्यात काढायला येणारा 'आकाड्या' आंबा आला की आता आंब्याचे दिवस संपत आल्याची चाहूल लागे. सुट्टी संपून शाळेला जाताना तोंडाभोवती चिकाच्या जखमांमुळे अन कपड्यावर आंब्याच्या डागांमुळे आमचं अगदी ध्यान झालेलं असे.

मोठ्या एकत्र कुटुंबाला 'खटलं' हा शब्द ज्याला सुचला तो माणूस हुशारच म्हणला पाहिजे. एका भांडणानंतर उन्हाळ्यात तडकाफडकी आम्हांला घेऊन भाऊ नोकरीच्या गावी घेऊन आले. त्या नव्या गावात पोहोचलो तोच वळवाचा जोरात पाऊस सुरू झाला अन आम्ही सारे भिजलो. गावाकडचं अंगण, माणसे, मित्र, गायबैल, झाड, विहिरी हे सगळं एका झटक्यात नजरेआड झालं. मला ते झेपेचना. नवी शाळा, मित्र, तालुक्याचं गाव, भाड्याचं घर ह्याच्यामध्ये भयंकर उपरं वाटायचं. सकाळी उठलं की दिवस अंगावर यायचा. शाळेत जायला जिवावर यायचं. भाऊ त्यांच्या मित्रांकडे घेऊन जायचे, त्यांच्या घरातल्या लहान मुलांच्या ओळखी करून द्यायचे, संध्याकाळी शाळेतून आलं की गावाबाहेरच्या रस्त्यावर फिरायला घेऊन जायचे. कधी एकदा दिवस मावळतोय, झोप लागते अन आपण स्वप्नात का होईना पण परत गावात जातोय असं व्हायचं. लिंबाखाली पोरं काय खेळत असतील, संध्याकाळ झाली आता शेतातून सगळे घरी आले असतील, दूध आलं असेल, आबांच्या ताटात कोण जेवत असेल, अक्का गोष्ट सांगीत असेल, असंच सारखं डोक्यात सुरू. त्या वर्षी आंबे नव्हते, मग भाऊंनी रोज बाजारात जाऊन मोठमोठे, आणि चांगले आंबे आणायला सुरू केलं. प्रत्येक आंबा खाताना माझं सुरू होई 'हा थोडा माळावरच्या केळ्यासारखा आहे', 'ह्याची कोय कोट्यावरच्या भोपळ्यासारखी आहे', 'बारवावरच्या केसऱ्याचा रस ह्यापेक्षा जास्ती घट्ट अन गोड झाला असता'. आई रागवायची अन गप्प करायची. गावाकडं ये-जा सुरू असे. उन्हाळ्याच्या अन दिवाळीच्या सुट्ट्यांतच गावाकडे निवांत राहणं होई. गावाकडून कुणीही आलं की मी त्या माणसाभोवती रेंगाळत असे. त्यांचं कोण कौतुक वाटायचं मला. गावाकडून दादा नाहीतर तात्या आलेले असत, भाऊसोबत त्यांच्या हिशेब, बियाणं, खतखरेदी असल्या चर्चा होत. अंगणातला लिंब, वेशीजवळचं बुचाचं झाड, आमराया ह्यांची अनावर ओढ लागलेली असे. कधी एकदा उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते असं होई, गावाकडे जायची एसटी संध्याकाळी चारला असे, तोपर्यंत मी बस स्टॅण्डवर तीनचार वेळा चकरा मारून 'चौकशी' च्या ठिकाणी बसल्या माणसाला "बस वेळेवर आहे ना आज?" असं विचारून वैताग आणीत असे.

दादा, भाऊ, आबा ह्यांचे मोठ्या आवाजातले वाद मी बाहेरून खिडकीला चिटकून बसून एकत असे. मग अक्का नाहीतर कुणीतरी मला तिथून लांब घेऊन जात. यथावकाश शेताच्या वाटण्या करून तिन्ही भावांचं वेगळं होणं हे रीतीनुसारच होतं. हळूहळू नवीन मित्र, नवीन खेळ, शिक्षक ह्या सगळ्यांनी तो अवकाश भरून गेलाच. पण ह्या घडामोडींनी त्या काळात माझ्या भावविश्वात मोठीच उलथापालथ झाली.

आमच्या शेताला 'वाटवडी विहिरीचं' शेत म्हणत. मध्यभागी कोटा, बाजूला विहीर, कोट्याच्या मागे केळीचा बाग अन ह्या सगळ्यांना सगळ्या बाजूने वेढलेली झाडं. तिथं १५-२० तरी मोठाली आंब्याची झाडं होती. ह्याशिवाय पपई, मोसंबी, नारळ, बोरी, शेवगा, हादगा, रामफळ, पेरू अशा लहानमोठ्या दाट झाडांनी ते शेत चारीबाजूंनी वेढलेलं असल्याने आमचा कोठा किंवा विहीर अगदी जवळ जाईपर्यंत दिसतच नसे. एक लहान भाऊ ३ वर्षाचा झाला तरी बोलायला शिकत नव्हता, उपरोधाने आजोबानी त्यांच नाव 'वकीलसाहेब' असं ठेवलं. तो इथल्या पाटातून वाहणाऱ्या पाण्याशी, झाडांशी, जनावरांशी बोलत असे.

नंतर काय झालं कुणास ठाऊक, एकेक झाड मरायला लागलं, अन कोट्यावरचं ते शेत एकदम भकास दिसायला लागलं. दोन नारळाची झाडं अन आजीच्या समाधीचा बाजूला असलेलं एक बोराचं झाड सोडलं तर तिथली झाड एकेककरून मरून गेली. पाऊसमान कमी झालंय, विहिरीचं पाणी कमी आलंय, कसला तरी रोग पडलाय… असं सगळे म्हणायचे. आजोबा म्हणाले,"मायाच आटली, आता कसली राहतेत झाडं!"

***

मी चौथीत असेन. आम्ही नव्याने आलेल्या ह्या शहरवजा खेड्यात जिकडतिकडं फक्त गुलमोहराचीच झाडं.पंचायत समितीचं कार्यालय, कोर्ट, जिल्हा परिषदेची शाळा, नगरपालिकेचे वाचनालय, कॉलेजचा परिसर जिकडे पाहावे तिकडे हाच उभा. उष्ण वातावरणात तग धरून राहण्याची कला अवगत असलेलं हे झाड मादागास्करमध्ये उगम पावलं आणि ब्रिटिशांबरोबर भारतात आलं म्हणतात. ह्या झाडाच्या सौंदर्याचं वर्णन करणारी एक कविता आमच्या मराठीच्या बाईंनी केली होती आणि त्यातली एक ओळ होती "फुले नसताना आपल्या पानांनी शरीराला आणि फुले असताना आपल्या सौंदर्याने मनाला सावली देणारे झाड". असलं काहीतरी. त्यातल्या वर्णनाशी कधीच 'रिलेट' होऊ शकलो नाही मी. गाव, मित्र सोडून अनोळखी ठिकाणी आल्याने मनात असलेली निराशाच असावी बहुतेक, इथलं काहीच आवडत नसे, अन त्याचाच एक भाग असावा. ही झाडं मला नेहमी उपरी वाटायची. कुणालातरी पकडून, त्याच्या मूळ ठिकाणावरून उचलावं अन सांगावं की, आता हे नवीन ठिकाण तुझं गाव, असं त्या झाडांच्या बाबतीतही खरंय. गुलमोहर मला नवीन गावातल्या माझ्या उपरेपणाची साक्ष वाटे.

गावाच्या दक्षिण टोकाला आमचं घर अन उत्तर टोकाला शाळा होती. यायच्या रस्त्यात एक आयटीआय कॉलेज होतं ज्याच्या आवारात एक मोठ्ठा गुलमोहर होता. आम्ही त्याच्या वाळलेल्या शेंगा आमच्या लढाईत तलवारी म्हणून वापरायचो. लुटुपुटुची असली तरी लढाई अगदी जिवंत असे. १५ -२० जणांची एक टीम, अशा दोन टीम बनत. पहिल्या रांगेत पाचजण धनुष्यबाण घेऊन, दुसऱ्या रांगेत पाचजण गुलमोहराच्या लांब काळ्या शेंगा घेऊन अन शेवटच्या रांगेत निशस्त्र सैनिक अशी सैन्याची रचना असे. मग एकजण शंखाचा आवाज तोंडाने काढी अन सैन्य एकमेकांना भिडे. ज्याची शेंग तुटेल तो सैनिक आडवा होऊन पडणार. असा खेळ तासन्‌तास चाले अन त्यासाठी भरपूर शेंगा लागत. झाडाच्या फांद्या आडव्या वाढत असल्याने एकदा खोडावर चढलं की मग कुठेही जाता येत असे. मुंबईतील गुलमोहर ह्या बाबतीत वेगळे दिसतात, आडवं वाढायला जागा नसल्याने ते थोडे उंच जातात अन मग त्यांच्या फांद्या खाली, जमिनीकडे, पारंब्यासारख्या लोंबायला लागतात.

आयटीआयचा एक चपराशी कायम दारूच्या नशेत असे अन आम्हांला तिकडे फिरकू देत नसे. एका दुपारी शाळेतून येताना तो नाही असं दिसलं अन आम्ही ह्या झाडावर चढून शेंगा काढायला लागलो. पटपट शेंगा तोडून झाडाखाली ढीग तयार केला आणि आता उतरणार म्हणता तो चपराशी परत आला. आम्हाला झाडावर बघून ओरडायला लागला, "आता याच खाली, बघतो एकेकाला!" आम्ही होतो तिथून आणखीच उंच फांदीवर चढून बसलो. "किती वेळ बसाल वर, कधीतरी यावंच लागेल ना खाली" असं म्हणून तो खाली ठाण मांडून बसला. थोड्या वेळाने तो जाईल ह्या आशेने आम्ही वर जीव मुठीत धरून बसून होतो, भीतीने थरथरत होतो. अंधार पडायला लागला होता आणि हा माणूस हलायची काही चिन्हं दिसत नव्हती. भूक, भीती ह्यांनी आमची वाईट अवस्था झाली होती. आम्ही रडू लागलो. एवढ्यात आमच्या शेजारचे काळे अण्णा सायकलवर जातांना दिसले अन मी "अण्णाऽऽऽ" म्हणून जोरात हाक मारली. अण्णा सायकलवरून उतरले अन कोण अंधारातून हाक मारतंय ते बघायला सायकल हाताने चालवत झाडाखाली आले. "अरे तू काय करतोयस झाडावर?" आम्ही ताबडतोब झाडावरून उतरलो. खाली बघितलं तर चपराशी अंधारात पिऊन झोपी गेलेला होता. शेंगाचा ढीग तसाच सोडला, सायकलच्या कॅरिअरला बॅग अडकवली अन समोरच्या नळीवर बसून मी घरी आलो.

नव्या आणि मोठ्या गावी जुळवून घ्यायला २-३ वर्षे लागली. यथावकाश मी ह्या ठिकाणी रुळलो, नवीन मित्र झाले, एनसीसी, व्हॉलीबॉल अन खोखोची टीम, ड्रॉईंग एक्झाम्स, ठरावीक अंतराने येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा ह्या साऱ्यांत गुंतत गेलो. अकरावी-बारावीची वर्षं तर अभ्यास आणि ट्युशन सोडून नीट आठवतही नाही.

***

एमबीबीएसला औरंगाबादला आलो. 'घाटी' ह्या टोपणनावाने आमचं कॉलेज प्रसिद्ध आहे. 'डोंगराकडे जाणारा रस्ता' असा घाटीचा शब्दकोशातला अर्थ आहे आणि तोच बहुतेक खरा असावा. गोगा महाराज टेकडी, हनुमान टेकडी ह्या टेकड्यांकडे हा रस्ता नेत असावा. आता मात्र कॉलेजच्या मागे थेट ह्या टेकड्यांपर्यंत दाट वस्ती आहे. अस असलं तरी होस्टेलच्या गच्चीवरून त्यांचं मनोहारी दर्शन होतं. तिथं उभं राहिलं की एका बाजूने खाम नदीचं पात्र आहे, होस्टेलला लागूनच असलेला खाम नदीचा मोठा वाहता प्रवाह दिसतो. समोर पंचक्कीचा तलाव अन परिसर. मागे थोडं चालत गेलं की बिबि का मकबरा. प्रवेश घेण्याआधी हे सगळं पाहून घाटी कँपसविषयी माझ्या खूपच रोमँटिक कल्पना होत्या. प्रवेशप्रक्रिया कॉलेजात पूर्ण केली अन पुढची ५-६ वर्षं जिथे घालवायचीत ते हॉस्टेल पाहूया म्हणून मी आणि भाऊ निघालो. 'कॉलेज के बिलकुल पिछे' असा पत्ता मिळालेला होता. एक अरुंद, निर्जन अन गवताने दोन्ही बाजूंनी वेढलेली सडक एका मोठ्या पिवळ्या इमारतीकडे जात होती. 'रस्त्यावर इतकी सामसूम कशी' असा विचार करत आम्ही त्या इमारतीच्या जवळ पोहोचलो. आसपासच्या शांततेला भेदणारा, कुत्र्याच्या ओरडण्याचा भेसूर आवाज मधूनच येई. 'हे भूतबंगल्यासारखं वातावरण का असावं हॉस्टेलमध्ये' असा विचार करत जवळ पोहोचलो तर 'ॲनिमल हाऊस' असं रंग उडाल्याने अंधुक झालेला बोर्ड दिसला. तिथल्या माणसाने सांगितलं की ह्याच्या बाजूची दुसरी इमारत होस्टेलची आहे. मग आम्ही
होस्टेलला एका ओळखीच्या सिनिअरच्या रूममध्ये पोहोचलो.

'जुने हॉस्टेल' अन 'नवं हॉस्टेल' अशा दोन इमारतींच्या मध्ये मोठं मोकळं मैदान होतं आणि बाजूलाच गुलमोहराचं एक मोठं झाड. 'इथंही तूच का' असं मनात आलं. घाटीच्या कॅम्पसमध्ये गुलमोहराची बक्कळ झाडं होती. मोठ्या गेटमधून एंट्री करताच डावीकडे, कॉलेजच्या समोरच्या मैदानात, लायब्ररी अन कॉलेजच्या मधल्या गवताच्या पट्ट्यात, ॲनाटॉमी हॉलच्या मागे (ह्याच्या फांद्या तर चक्क हॉलमध्ये शिरायच्या), वॉर्डन, डीन ह्यांच्या बंगल्यासमोर... जिकडे नजर जाईल तिथे. कॅम्पसमध्ये कुठेही जाऊन उभे राहा अन ३६० अंशात फिरा, प्रत्येक दहा अंशात तुम्हाला गुलमोहराच्या पान, फांदी, खोड किंवा फूल नजरेस पडणारच. होस्टेलच्या समोर असणारं झाड पुढची पाच वर्षं माझं शेजारी असणार होतं.

चिमणीचं पिलू घरट्यातून नुकतच बाहेर पडावं अन एकामागून एक जंगली पक्षी त्याच्यामागे टोचा मारायला लागावेत, तेव्हा त्या पिलाची जशी अवस्था होईल तसाच प्रकार फर्स्ट एमबीबीएसला आलेल्या पोरांच्या बाबतीत होई. बहुतेक सगळे लातूरचे 'शाहू कॉलेज',किंवा अहमदपूरचे 'महात्मा गांधी कॉलेज' ह्या 'ढिगांनी मेरिटमध्ये आणण्यासाठी प्रसिद्ध' असलेल्या कॉलेजातील. १०० पैकी ९९, ९८.५ वगैरे मार्क घ्यायची सवय लागलेले. ४ मार्कांच्या लाँग क्वेश्चनसाठी बरोबर ८ मुद्दे पाठ करून लिहिण्यात ह्यांचा हातखंडा, मग त्या आठ मुद्द्यांत स्वल्पविराम, पूर्णविरामांची जागासुद्धा बदलायची नाही असा एकूण तंतोतंत प्रकार बारावीपर्यंत अनुभवलेला. मग ॲनाटॉमीचं चौरासिया ('ग्रे ॲनाटॉमी'च्या वाटेला कुणी जात नसे), फिजिओलॉजीचं गायटन अन बायोकेमिस्ट्रीचं डेब अशी अनुक्रमे लाल,हिरवी आणि पिवळी घाबरवून टाकणारी पुस्तकं भेटत. त्यात पुन्हा प्रॅक्टिकल्स, डेमॉन्स्ट्रेशन्समध्ये फाडफाड इंग्रजीत बोलणारे ट्युटर्स अन इंग्रजी माध्यमातून आलेली काही औरंगाबादची स्मार्ट पोरंपोरी. कनिंगहॅमच डिसेक्शन मॅन्युअल सोबत घेऊन फॉरमॅलिनच्या वासाने भरलेल्या लांब आणि रटाळ दुपारी. कॉलेजचे लांब आणि भयंकर शांत असणारे कॉरिडॉर्स, उंच दरवाजे-खिडक्या, प्रवेश करताच अंगावर येणारे अर्धवर्तुळाकार उतरत्या बेंचचे लेक्चर-हॉल्स. पहिल्या महिन्यातच बारावीच्या मेरिट वगैरेंची नशा खाडकन उतरत असे. उरलीसुरली जबर रॅगिंगने उतरे. फर्स्ट इअरचा निकाल जेमतेम ५०-६० टक्क्यांपर्यंत लागे, म्हणजे जवळपास निम्मे फेल होत. त्यामुळे नापास व्हायची भीतीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर असे. फर्स्ट टर्म, मिड टर्म अशा अनेक परीक्षा होत. ह्यात १००पैकी ४०-४५ मार्क पडले तरी सेलेब्रेशन्स. ह्याचा निकालही बोर्डवर लावीत, बहुतेकांना पन्नास टक्क्यांहून कमी मार्क्स पडलेले असत आणि त्यांचे नंबर लाल शाईने लिहिलेले असत. एखादा अपवादानेच निळ्या शाईत ५१ किंवा ५२ असे मार्क्स मिळवलेला असे.

बहुतेक जण बारावीसाठी घराबाहेर पडलेले असल्याने बाहेर राहायला सरावलेले असत. माझी गत त्याहून वाईट होती, मी पहिल्यांदाच घर सोडलेलं. रबरी चपला, ढगळ पांढरा शर्ट, तेलाने चोपडलेले केस, ह्या अवताराकडे बघून तर एकने मला थेट समोरच्या बुटाच्या अन कपड्यांच्या दुकानातच नेलं अन अवतार सुधारायचा प्रयत्न केला.जबर रॅगिंग होई. पहिल्याच दिवशी आम्हां सगळ्यांना आगगाडी बनवून इंजिनाच्या शिट्यांचा आवाज वगैरे काढायला लावून सगळ्या कॅम्पसला चक्कर मारण्याचा कार्यक्रम झाला. मग थोड्याथोड्या अंतराने कंपाउंड वॉलवर उभं केलं आणि एकसुरात "साला मै तो डॉक्टर बन गया" असं ओरडायचा कार्यक्रम. 'एप्रन घालून हे लोक काय करताहेत', असा विचार करीत पेशंटचे नातेवाईक आमच्याकडे बघत. होस्टेलवरतर पहिले काही महिने दिवस-रात्र हेच चाले.एकीकडे अशक्यप्राय वाटणारा अभ्यास अन दुसरीकडे रॅगिंग. पहिली टर्म भयंकर खडतर असे. कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करायला जीवावर यायचं, कॅजुअल्टीच्या बाहेर लावलेल्या रेडक्रॉसच्या लाल रंगाशी स्पर्धा करणारी सर्वत्र फुललेली गुलमोहराची लालबुंद झाडं, त्याच्याखाली बसलेले दुरदुरून आलेले पेशंट्सचे नातेवाईक, फिनाईलच्या वासाने सगळा आसमंत व्यापलेला. झाडाची एक फांदी तर अनाटॉमी लेक्चर थेटरात घुसलेली होती. त्यामुळं त्या भडक लाल रंगाची अन फर्स्ट टर्मच्या भकास दिवसांची मनात जी सांगड बसली ती पुढची एक वर्षे कायम राहिली.

हळूहळू पाठांतर सोडून कॉन्सेप्ट्सकडे लक्ष दिल्यास अभ्यास सुसह्य होतो हे लक्षात आलं अन माझा 'चाळीशीच्या' गटात समावेश व्हायला लागला. हळूहळू नियमित रॅगिंगलाही सरावलो. बारावीच्या मेरीटलिस्टच्या फुगा फर्स्ट इयरमध्ये फुटे आणि पुष्कळजण डिप्रेशनमध्येच जात. आजवर सर्वांनी 'खूप हुशार, खूप हुशार' असं चढवून ठेवलेलं असे आणि त्यानंतर डोंगराएवढा सिलॅबस, पास होण्याचं आव्हान, फेल होणं हे प्रचंड मानहानीकारक वाटत असावं. ह्या तेजोभंगाला सेकंड इयरमध्ये गेलं की रॅगिंगच्या रूपानं exhaust मिळत असावा अन हेच रॅगिंगचं मूळ असावं असं मला वाटतं. ह्या ठिकाणी
आपण कुणापेक्षातरी सिनिअर अन सामर्थ्याने वरचढ आहोत, ही गोष्ट आतून भेदरून गेलेल्या जिवांना कुठंतरी दिलासा देत असावी. होस्टेलवर राहणाऱ्या मुलांची एक 'क्रोनिक' ही विशेष कॅटेगरी होती. २-३पेक्षा जास्त अटेम्प्ट घेऊनही पास होत नसलेली, दारूत डुंबून गेलेली, थोडक्यात सर्व आशा सोडून दिलेली ही मंडळी घाटीत डझनावरतरी होती. ह्यांची होस्टेलवर दहशत असे.

आनंदने मेडिकलला जायचंय ह्या इर्षेने पेटून बारावीला दोन-तीन ड्रॉप घेऊन मोठ्या जिकिरीनं एमबीबीएसला प्रवेश मिळवला होता. अनाटॉमीचा मिड टर्म चा रिजल्ट लागला होता अन हा त्या व्हरांड्यातल्या एका बाकावर बसून रडत होता.

''निकाल' शंभर टक्के लागलाय (सर्वांनाच ५० च्या खाली मार्क्स आहेत) मग रडायला काय झालं?"
"पास नापास चालत राहील, पण असा दुष्टपणा नाही करायला पाहिजे."
"काय झालं?"
"मला झिरो मार्क दिलेत अन तेही ० असं न लिहिता कॅपिटलमध्ये ZERO असं लिहिलंय."

ह्याने 'ग्रेट सेफॅनस व्हेन' हा लॉन्ग क्वेश्चन येणारच असं गृहीत धरून, रात्रभर जागून हा टॉपिक रटला होता, लाल हिरव्या रंगाने डायग्राम्सचीही तयारी केलेली. ग्रेट सेफनेस व्हेनवर २५ मार्कांचा लॉन्ग क्वेश्चन अपेक्षित होता पण पाच मार्काची शॉर्ट नोट आली अन दुसराच काहीतरी लॉन्ग क्वेश्चन आला. हा चिडला अन सगळ्याच प्रश्नांना ग्रेट सेफनेस व्हेन हेच उत्तर पेपरभर रिपीट करत राहिला. ट्यूटरच्या लक्षात आलं आणि 'अटेम्प्ट टू चीट द एक्झामिनर' असा शेरा लिहून त्यांने त्याला शून्य मार्क दिले. फायनल टर्ममध्ये परीक्षेच्या भीतीने सगळे सैरभैर झालेले असत. सकाळी ८ वाजता लायब्ररी उघडताच तिकडे जाऊन बसत, ते जेवायचा वेळ सोडला तर रात्री १२पर्यंत तिथेच. चांगदेव तर न्यूरो फिजिओलॉजीने एवढा गांगरला की दिसेल त्याला 'मला 'रेड न्यूक्लीयस' भेटला, तो 'ग्लोबस पॅलीडस'कडे चालला होता. म्हणाला माझी थेट 'पूटामेन'शी कनेक्शन आहेत वगेरे. मेंदूतल्या वेगवेगळ्या भागांशी बोलू लागला मग ह्याला सायकियाट्रीच्या प्रोफेसरांनी काही औषध देऊन शांत केलं. तीन महिने भय, अनिश्चितता हॉस्टेलमध्ये भरलेली असे.

माझ्या बाजूच्या रूममधला वागरेतर भलताच असामी होता. त्याचा विचित्रपणा पाहून काहीजण त्याला 'विचित्रवीर्य' म्हणत. असं म्हणलं की तो चिडायचा. एकदा अभ्यासाला बसला की हा तीन-तीन दिवस झोपायचाच नाही. कधीतरी मध्यरात्री दात घासत नाहीतर आंघोळ करायला बाहेर दिसायचा तेवढाच. आणि मग त्यानंतर जो झोपे तो दोन-तीन दिवस फक्त जेवण करायला अलार्म लावून उठे अन उरलेला सारा काळ झोपून राही. अलार्म वाजत राही पण हा काही उठत नसे. मग आजूबाजूची पोर त्याच्या रूमच्या कड्यांवर, दरवाजावर लाथा मारून उठवीत. एकदा तर हा उठेच ना म्हणून 'काही बरंवाईट झालं की काय' म्हणून दरवाजा तोडला. "कसले बोअर लोक आहेत राव तुम्ही, झोप मोडलीत", असं म्हणत डोळे चोळत उठला. सलग तीन दिवस जागून हा चौथ्या दिवशी चौथ्या मजल्यावरील एक्झाम हॉलमध्ये आला अन चक्कर येऊन पडला.

एक वेडा तरुण अधूनमधून कॅम्पसमध्ये दिसे. त्याला सगळे 'ग्रे' म्हणत. वरवर पाहता तो अगदी कुणाही रेसिडेंट डॉक्टर किंवा थर्ड इअर स्टुडन्टसारखा दिसे. पण तो स्किझोफ्रेनिक होता अन कधीकधी कॉलेजच्या लॉबीत येऊन मोठमोठ्याने कुणालातरी शिव्या देई. मग सायकियाट्रीचे डॉ. देशपांडे त्याला शांत करीत अन काही दिवसांसाठी ॲडमिट करीत. हा कोण आहे ह्याबद्दल एक चर्चा अशी होती की हा मेडिकल स्टुडन्ट होता, अन काही केल्या फर्स्ट इअरला ॲनाटॉमी पास होऊ शकला नाही. ग्रेचं ॲनाटॉमीचं पुस्तक वाचत वाचत ह्याला वेड लागलं. असं सगळं काळजात धडकी भरवणारं वातावरण. बरेच जण गुलमंडीचा सुपारी हनुमान नाहीतर खुल्ताबादच्या भद्रा मारुतीला शरण येत. पहाटे चार-पाच वाजेच्या एसटीने दर्शनाला जाऊन सकाळी आठच्या लेक्चरला परत पोहोचत.

जुनैद शेख नावाचा एक सिनिअर क्रोनिक गँगचा म्होरक्या होता. काही केल्या पास होत नव्हता, मग त्यांनही कंटाळून त्याच्या गावी जनरल प्रॅक्टिस सुरू केली होती अन ती तुफान चाले असं म्हणत. त्याची आम्हां फर्स्ट इअरच्या पोरांत भयंकर दहशत होती. तो २-३ महिन्यातून एकदा होस्टेलला यायचा. तो येणार आहे, अशी बातमी कळताच जुन्या होस्टेलमधली बरीच पोरं नवीन हॉस्टेलमध्ये मित्रांच्या रूममध्ये काही काळासाठी शिफ्ट व्हायची. रबरी चपलांचा करऽऽऽकरऽऽऽ असा आवाज आला की तो आलाय असं कळायचं. आमच्या फ्लोअरला राहायचा, आलं की माझ्या रूमचा दरवाजा वाजवी. मी गुपचूप ब्लँकेट, तांब्या, साबण, टॉवेल हे त्याला द्यायचो, काही दिवसांनी जातांना तोही गुपचूप हे सगळं परत आणून द्यायचा. तो आला की त्याचे इतर 'क्रॉनिक' मित्रही जमा होत. ह्यांचा दिवस रात्री 'कमांडो' बार मधून परत आले की एक वाजता सुरू व्हायचा. ह्यांच्यात एक घरात राजकारणाची बॅकग्राउंड असलेला अन राजकारणी (थेट आरोग्यमंत्री व्हायचं स्वप्न होत त्याचं) व्हायचं स्वप्न बाळगून होता. पिऊन आले की हे सगळे फर्स्ट इअरच्या पोरांना गेटसमोर जमा करीत. डोळे चोळत सगळी जमा होत, अन मग ह्यांचं सुरू होई, कुणाला नाचायला लाव, कुणाला गाणी म्हणायला लाव, अश्लील जोक सांगायला लाव असं सगळं पहाटेपर्यंत.

ह्यांतला एक बऱ्यापैकी गाणी म्हणायचा आणि त्याला सिनेमाचं वेड होतं. तो म्हणायचा एमबीबीएसला नसतो आलो तर आत्तापर्यंत डायरेक्टर झालो असतो. ह्याची एक विचित्र खोड होती. तो एकाला डुएट गाण्याचं मेल व्हर्जन म्हणायला लावी, दुसऱ्याला त्याच फिमेल व्हर्जन म्हणायला लावी. दुसऱ्या दोघांना त्यावर सिनेमात जशी पिक्चराईज झालीय तशी ॲक्टिंग करायला सांगे, आणखी कोणाला तरी तोंडानेच बॅकग्राउंड म्युझिक वाजवायला सांगे, आणि हा स्वतः उजवा हात कोपऱ्यात मोडून कॅमेऱ्यासारखा पकडून हा प्रसंग शूट केल्याची ॲक्टिंग करे. हे झालं की मग 'भावी आरोग्यमंत्री' पुढे येई. तो आला की सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद देणं अपेक्षित असे. तो मग 'घटनेतील अमुक अमुक कलम अन्यायकारक आहे', 'तमुक तमुक विधेयकाचा मी प्राण असेपर्यंत विरोध करीत राहीन', असं तासभर बडबडत राही. शेवटी त्याच्याबरोबरचा एक कार्यकर्ता 'स्टुडंट पावरऽऽऽ' अशी आरोळी ठोकायचा. मग आम्ही सगळे झटकन डोळ्यातील झोप झटकून 'नेशन्स पावर' अशी दाद द्यायचो अन टाळ्यांच्या कडकडाटात भाषणाची सांगता व्हायची. आरोग्यमंत्री नाही झाला तरी ती व्यक्ती महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वर्तुळात आज माहीत आहे. मोर्चे, आंदोलन, निदर्शने करण्याची एकही संधी हा सोडीत नसे. आज काय तर 'होस्टेलला पाणी नाही आलं' चला डीन बंगल्यावर बकेट मोर्चा! त्याच्यावर डीनना उद्धटपणे बोलला म्हणून शिस्तभंगाची कारवाई झाली, म्हणून 'सगळ्या पोरांना घेऊन 'पप्पी मोर्चा' काढला. म्हणजे ऑफिसात जाऊन सगळे डीनचे सामूहिक चुंबन घेणार, असले काहीतरी त्याचे अफलातून उद्योग चालत. हे सगळं ह्याला कसं सुचतं ह्याचं मला नवल वाटे. ह्या सगळ्या आंदोलनांत कार्यकर्ते म्हणून फर्स्ट इअरची पोरं.

हे असं चाललेले असताना फर्स्ट टर्म संपायला यायची अन मग रॅगिंग बंद, असा एक अलिखित नियम असे. ह्या सगळ्याबद्दल माझ्या मनात सुरुवातीला प्रचंड भीती होती. काही दिवसातच भीती जाऊन वैताग अन नंतर राग यायला लागला. नंतर नंतर तर ह्या लोकांबद्दल सहानुभूती वाटायला लागली. म्हणजे हे सगळे वर्षानुवर्षं पास होत नाहीत, ह्यांच्या घरी ह्यांना कुणी जवळही उभे करत नसेल, आपलं काय होणार ह्याचं ह्यांना किती टेन्शन येत असेल असे विचार मनात यायचे. आमच्या निमित्तानं ह्यांना आपण कुणीतरी आहोत ह्या जाणिवेनं क्षणभर का होईना सुख मिळतं असं वाटे. अगदी मित्र नाही म्हणलं तरी ह्यांतल्या बहुतेकांशी नंतर चांगले संबंध राहिले. आज ह्यांतले बहुतेक जण आपापल्या क्षेत्रांत स्थिरावले आहेत.

पहिल्यांदा हॉस्टेलमध्ये आलो तेव्हा समोरचा गुलमोहर निष्पर्ण अन काळ्या शेंगांनी लगडलेला होता. त्यात भर म्हणून अनेक फांद्यांवर फाटके कपडे अडकलेले. हे कपडे झाडावर कसे पोहोचले असतील ह्याचं नवीन आलेल्यांना आश्चर्य वाटे. झाडाची ही अवस्था हॉस्पिटलच्या गेटवर आपल्या हाडाच्या सांगाड्यावर कपड्याचे पोतेरे अडकवून बसलेल्या खंगून गेलेल्या काळ्याकुट्ट, भिकाऱ्यांची आठवण करून देई. धुळवडीला सगळे रंग खेळत आणि शेवटी एकमेकांचे कपडे फाडून ह्या झाडावर फेकीत. त्यानंतर अंत्ययात्रा निघे. हा एक भयंकर थोर कार्यक्रम दरवर्षी चाले. म्हणजे एखादा प्रेमात (बहुधा एकतर्फी) ठार झालेल्या 'मजनू'ला तिरडीवर झोपवलं जाई . आळीपाळीने खांदे देत 'रामनाम सत्य आहे' असं ओरडत सगळ्या कॅम्पसमधून फिरवत शेवटी अंत्ययात्रा लेडीज होस्टेलवर पोहोचे. तिथे तिरडी खाली ठेवून सामूहिक रडगाण्याचा कार्यक्रम सुरू होई. 'तुझ्या नादाने मेला', 'किती गुणांचा होता', 'आता कसा परत आणू ह्याला' असा विलाप चाले. कवितेचं नाव आहे 'दी नाईट' अशा सुरात प्रेमकवींचं संमेलनच भरे. मग थोड्या वेळाने वॉर्डन येऊन सगळ्यांना पेढे वाटीत, पैसे देत (ह्याची लगेच कुणीतरी दारू घेऊन येई), अन कसंबसं ह्या अंत्ययात्रेला परत बॉईज होस्टेलला परत पाठवीत.

हळूहळू वर्ष संपलं, पहिल्या वर्षाची शेवटची टर्म सुरू झाली. ऊन रणरणत असे. बाहेरच्या लालबुंद फुलांनी डवरलेला गुलमोहर म्हणजे जणू त्याच्या कृश खोडावर पेललेली मोठी जळती मशाल आहे की काय अशा उन्हाच्या झळा आत येत. जीवघेणा शुष्क, उष्मा सगळीकडे पुरून उरे. कुणी वाळ्याचे पडदे लावत, एखाद्याकडे कुलरही असे. पण बहुतेक जण उकाड्यावर तोडगा म्हणून 'पाणी भरायचा' कार्यक्रम करीत. सकाळी अकरा वाजता पाच-सहा बकेटभरुन पाणी रूममध्ये ओतून द्यायचं अन फॅन पाचवर करायचा. पूर्णपणे हटत नसे पण उष्मा थोडा सुसह्य होई. दोन-तीन तासांत ते पाणी भुर्र करून वाफ होई. मग असंच संध्याकाळपर्यंत पाच-सहा वेळा रूममध्ये पाणी भरायचा कार्यक्रम चाले. माझ्या रूममध्ये एक डुगडुगणारी लाकडी खुर्ची, अन खिडकीशी लावलेलं टेबल. त्यावर बी डी चौरासिया, गायटन, डेब, चौधरी ही मंडळी. खिडकीतून आत येऊ पाहणारा गुलमोहर. पुढचे ३-४ महिने आयुष्य म्हणजे हा कोपरा. गच्चीवरून गोगा महाराज टेकडी अन पायथ्याशी पसरलेला विद्यापीठाचा हिरवा कॅम्पस दिसे. संध्याकाळ झाली की चहासाठी दोघातिघांनी एक चक्कर गेटवर टाकायची अन पुन्हा आपापल्या कोपऱ्यात. त्यामानाने रात्री थोड्या सुसह्य वाटत. उष्मा बराच कमी झालेला असे.

अन वारा मंद सुगंध घेऊन येई. एखादा चॅप्टर मनाजोगता पूर्ण झाला की गच्चीवर जाऊन आभाळाकडे डोळे लावून चांदण्या न्याहाळीत पडायचं. शांतता सर्वत्र भरलेली असायची अन ती आत भिनून सर्वांग शांततेनं भरलंय असं वाटायचं. मधेच त्या लुकलुकणाऱ्या चांदण्यासारखे अनाटॉमीचे स्पेसिमेन्स, बायोकेमिस्ट्रीची समीकरणं, फिजिओलॉजीचे संभाव्य प्रश्न डोक्यात डोकावायचे. एखाद्या रूममधून उत्तम सिंग-उदित नारायणच्या गाण्यांचे परिचित सूर. मग पुन्हा आतबाहेर पसरलेल्या त्या नितळ खोल शांततेचा अनुभव. पुन्हा तापलेल्या उन्हाचे लोळ घेऊन येणारा दिवस उजाडूच नये अन ही रात्र संपूच नये असं वाटे. अधूनमधुन जाणाऱ्या स्ट्रेचरचा आवाज त्या शांततेवर ओरखडा ओढे अन तंद्री तुटे. मग कुणालातरी सोबत घेऊन त्या दिवसाचा सातवा किंवा आठवा चहा घ्यायला रात्री दहा वाजता गेटवर.

सेकंड इअरला आम्ही एमबीबीएसचे 'पिंक डेज' म्हणत असू. फर्स्ट इअरच मोठं ओझं डोक्यावरून उतरलेलं असे. मित्रमैत्रिणी जुळत. कँटीन, कॉलेज अन हॉस्पिटलच्या कॉरिडॉर्समध्ये गप्पांचे फड रंगत. ट्रेक्स, सिनेमा, नाटक, गॅदरिंग... एकूण निवांत वातावरण असे. अन मग अचानक कालपरवापर्यंत सगळ्यांसोबत बसणारी, मिसळणारी पोरं अबोल होत, शून्यात नजर लावून कुमार सानूची गाणी ऐकत बसत. सोबत जेवायला, चहाला यायला बंद झाली की आपण काय ते समजून घ्यायचं. फर्स्ट इअरचा मोठा दगड खांद्यावरून उतरल्याचे समाधान, भरपूर रिकामा वेळ, मुलींबरोबर वाढलेला संवाद, आणि हार्मोन्सची गडबड; प्रेमाचं घाऊक पीक येई. यांतली बहुतेक एकतर्फी आणि फार काळ न चालणारी असत.

माझा नेहमीच चहाचा पार्टनर नितीन एकदा असाच वेड्यासारखं वागायला. म्हणजे 'प्रेमात पडणं' त्याच्यासाठी नवीन नव्हतं, आतापर्यंत आठ की नऊजणींच्या प्रेमात पाडण्याचा एक अनोखा विक्रमच त्याच्या नावे होता. काही मोजक्या मुलींमागे बहुतेक सगळे. आम्ही लहान असताना गावाकडे 'रॉकेल सुटे'. ती बातमी मिळाली की रॉकेलचा डबा घेऊन लोक त्या गाड्यासमोर लायनी लावत. हा असाच दार तीनचार महिन्यांनी नवनव्या पोरींच्या मागे पागल व्हायला लागलेला पाहून ह्याला 'रॉकेलचा डबेवाला' म्हणायला लागले. म्हणजे 'सध्या कुठल्या लायनीत आहे डबा', असं काही. हळूहळू हा त्या पोरीशी नियमित बोलण्यापर्यंत पोहचे. अन मग "मी तुला तशा नजरेने कधीच पहिले नव्हतं" असं उत्तर मिळाल की हा पुढचे १-२ महिने डिप्रेशनमध्ये जाई. पण लगेच सावरून पुढच्या कामाला लागे. कमालच स्टॅमिना होता त्याचा. का कुणास ठाऊक, प्रत्येक वेळी हा माझ्या रूममध्ये येऊन मला त्याच्या प्रगतीचे अपडेट द्यायचा अन "तुला काय वाटतं? ती काय म्हणेल? आता विचारू का?" असं करून वैताग आणायचा.

विक्रम हा माझा खास म्हणावा असा, अन असल्या भानगडीत नसलेला मित्र. अभ्यास, आठवड्याला एक सिनेमा, महिन्यातून एकदा 'कमांडो'वर जेवण अन 'स्टेट'चा सिनेमा असा त्याचा एकदम शिस्तशीर कार्यक्रम चाले. फर्स्ट इअरला हा एवढा बुजरा होता की पहिले ४-५ महिने डिसेक्शन टेबलवर शक्यतो मुलींशी बोलायचाच नाही. बोलण्यावाचून चालेचना तेव्हा म्हणाला, "अहो, माधवी ताई, तो 'टेंडन' थोडा पलीकडे रिट्रॅक्ट करा बरं," टेबलवर जोरात हशा अन हा लाजून लाल.

तर सगळं गुण्यागोविंदानं चाललं असताना सेकंड इयरमध्ये हा जरा वेगळं वागायला लागला. चहाला सोबत येईना, रूमच्या बाहेर पडेना, सोबत सिनेमाला येईना. मी काय झालं विचारलं की 'काही नाही, काही नाही' करायचा. मग कळलं की हा एकजणीच्या प्रेमात पडलाय.
"तू बोललास का मग?"
"डेरिंग होत नाही."
"बोलल्याशिवाय कसं?"
"नाही म्हणाली तर?"
"तुझा वेळ वाचेल."
"आता तिलाही काहीतरी वाटत असेल असं मानून गुपचूप बघता तरी येतंय, ती खटकन नाही म्हणाली तर माझ्यासाठी संपलच की सगळं."
"ह्यापेक्षा स्वप्नातच पड की प्रेमात."
डिवचयचा प्रयत्न केला पण तो काही पुढाकार घ्यायला तयार होईना. संध्याकाळी लेडीज होस्टेलच्या गेटवर, सकाळी कॅन्टीनच्या जिन्यात, दुपारी लायब्ररीच्या कुलरजवळ असा ह्याचा 'बघत राहण्याचा' एककलमी व्यस्त कार्यक्रम चाललेला. हळूहळू ह्याची केस हाताबाहेर जाऊ लागली, मग मी म्हणालो ,"आता बस झालं तुझं! 'आशिकी आशिकी' खेळायचं. लगेच चल अन बोल तिच्याशी. काय तो निकाल लागू दे, नाहीतर 'कॅरी ओन' बसेल सेकंड इअरला अन मग 'क्रोनिक गँग'मध्ये भरती व्हायची वेळ येईल."
शेवटी मला काही त्याचे हाल बघवेनात अन मी मग माग घेऊन शोधलं की ती चतुर्थीला वरद गणेशाचं दर्शन घ्यायला जाते. त्याला घेऊन मी गणपतीच्या साक्षीनं काय तो सोक्षमोक्ष लागू दे म्हणून चतुर्थीला वरद गणेशाच्या मंदिरात पोहोचलो. हे इथं काय करतायेत म्हणून कुणी चौकशी करू नये म्हणून फुल, बेल, पान ह्यांचं एक ताट विकत घेतलं अन पायऱ्यांवर दबा धरून बसलो. शेवटी एकदा ती आली. मी म्हटलं 'आता बोल', 'हो', 'नाही' करत बसला तोपर्यंत ती आत गेली. मग मी म्हटलं "आता जाताना तरी डेरिंग कर". "हो", म्हणून हा दरवाज्याजवळ उभा राहिला अन तिथून थोड्या अंतरावर मी. ती बाहेर आली, ह्याच्याकडे तीच लक्ष गेलेलं पाहिलं. ती जसजशी जवळ यायला लागली तसतसा हा मागे मागे सरकू लागला, अन मंदिराच्या दरवाज्याजवळ ती येताच तो मागे वळला अन धूम ठोकली.
"तू काय करतोस इथे?"
"आलो होतो दर्शनाला सहजच, तू कस काय इकडे?" मी निरागस भाव चेहऱ्यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्नात.
"ह्याआधी कधी नाही पाहिलं तुला इकडे, तुझ्यासोबत कुणी आलं होतं का?"
"नाही. कुठं, कोण?"
तिने विक्याला नक्की बघितल होतं.

"कर तुझी काशी, मी आता तुझ्या फंदात पडणार नाही" परत आल्यावर मी काहीबाही ओरडलो. पण हे एवढ्यावर थांबायचं नव्हतं, गॅदरींगमध्ये 'चॉकलेट डे' होता. 'फाईव्ह स्टार' प्रेमासाठी, 'इक्लेअर्स' मैत्रीसाठी असलं कायकाय. असल्या प्रकारांपासून मी चार हात दूरच असायचो, पण एक चांगला पाणीपुरी स्टॉल ऑडिटोरियमच्या समोर लागला आहे असं कळल्यावर मी विक्याला घेऊन तिथे गेलो. सगळे एकमेकांना 'एक्लेअर्स' देऊन 'मित्र मित्र' खेळत होते. एव्हढ्यात झपकन ती आली अन विक्याच्या हातात फाईव्हस्टार देऊन पोरींच्या गर्दीत दिसेनाशी झाली. मी अवाकच झालो, हा वर्षभर अर्धवेडा होऊन पडलेला पण बोलायची हिम्मत केली नाही अन इथं हे असं. विक्या तर गांगरूनच लालेलाल झाला. काय झालंय हे नीट कळायलाच काही मिनिटं जावी लागली. मी चिमटा घेऊन त्याला हे खरंच आहे ह्याची खात्री करून दिली. एक पाच रुपयाचं फाईव्ह स्टार सोबत ठेवलं असतं तर सगळं इथल्या इथं पूर्ण झालं असतं, पण तसं व्हायचं नव्हतं.

आता हा चॉकलेट घेऊन तिला शोधायला लागला, ती मैत्रिणींच्या गराड्यात. ह्याने आता तरी धाडस करायला हरकत नव्हती, पण "तिला एकटीला दिसू देत", असं म्हणून इकडंतिकडं करीत राहिला. शेवटी दिवसभराचे कार्यक्रम संपले आणि पोरी होस्टेलकडे निघाल्या. "हा शेवटचा चान्स आहे तुला", असं म्हणून मी त्याला पिटाळलं. ती पुढे चालत होती अन हा हातात एक गुलाब अन 'फाईव्ह स्टार' घेऊन मागे. सुरक्षित अंतर ठेवून मीही मागे होतो. अंधारायला लागलं होतं. लेडीज होस्टेलच्या कंपाउंड गेटपासून इमारतीकडे नेणारा तो अरुंद डांबरी रस्ता गुलमोहराच्या पाकळ्यांनी गच्च भरलेला होता. गुलमोहराची बारीक पिवळी पानं वाऱ्याने भुरभुरत खाली येऊन सडकेवर पखरत होती. विक्याच्या आयुष्यातील एका मोठ्या घटनेचे आपण थोड्यात वेळात साक्षीदार होणार. मला क्षणभर यश चोप्राच्या सिनेमाच्या लोकेशन्सवर गेल्यासारखं वाटायला लागलं. थोड्या वेळाने कोण मागे मी येतंय म्हणून तिने पाहिले. त्याक्षणी ह्याने गुलाब अन फाईव्हस्टार दोन्ही एकदमच समोर धरलं. तिनंही ते घेतलं अन म्हणाली "अय्या तू?" आवाज वेगळा वाटला. नीट बघितल्यावर कळालं की अगदी तसाच गुलाबी ड्रेस घातलेली ही सेकंड इअरची कुणीतरी दुसरीच मुलगी होती. विक्या पुन्हा एकदा वळला आणि धूम पळाला. पळायचंच नशिबात असावं साल्याच्या!

झरझर वर्षं सरली. मित्रमैत्रिणी (सगळे मित्रच, एखादी अपवादापुरती मैत्रीण!), गॅदरिंग, क्लिनिक्स, पोस्टिंग्स, रुसवेफुगवे, हॅलोचा ग्रुप ह्या सगळ्यात चार वर्षे भुर्रकन उडाली. इंटर्नशिपला गेलो तेव्हा एक नितांत रमणीय सुखद स्टेशन सुटतंय अशी हुरहूर लागली. 'ते ॲनिमल हाऊस बरं' असं वाटायला भाग पाडणारं पण पाच वर्षं घर बनलेलं ओल्ड हॉस्टेल, कॉपरेटिव्ह मेस, इंद्रालीचा डोसा, अण्णाची कँटीन, मुशीरचा चहा, गेट, गुलमंडीतील उत्तम, सुपारी हनुमान, गौताळा-पितळखोरा ह्या सागाच्या जंगलातील ट्रेक, संगीता-अंजली,अंबा-अप्सरा, अभिनय-अभिनित, अनुराधा-अनुपमा ह्या जुळ्या थेटरातील सिनेमे... हे सगळं आपल्या अस्तित्वाचाच भाग बनलंय जणू असं वाटायला लागलं. इथेच रेसिडेन्सी करता आली तर किती बरं होईल असं वाटायचं पण नवी क्षितिज खुणावत होती अन निरोप घ्यायची वेळ आली. एका मुलीशी क्षुल्लक कशावरून तरी जोरात वाद झालेला. काही मित्र फारशी महत्त्वाची कारणं नसतानाही दुरावले, हे निस्तरायचं आपण आज उद्यावर ढकलत राहिलो.

इथून निघताना शेवटचं जाऊन यायचं तर कुठे, असा विचार केला तेव्हा होस्टेलची गच्चीच डोळ्यापुढे आली. सोबत मित्र होते पण सगळे आपापली पॅकिंग करण्यात, पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्लानिंग ह्या गप्पांत व्यस्त. मग एकटाच गच्चीवर आलो. पाच-सहाचा सुमार असेल. दूर नजर गेली, उन्हात निळी जांभळी गोगा बाबा टेकडी अन पायथ्याशी विद्यापीठाचा हिरवा कॅम्पस. सूर्य नुकताच मावळून गेलेला अन त्याच्या मागे उरलेला लाल पिवळा प्रकाश सर्वत्र पसरलेला. खाली नजर गेली. पानं, फुल, फांद्या ह्यांतलं काहीच नजरेस पडत नव्हतं. फक्त दोन्ही होस्टेलच्या दरम्यानच्या पटांगणावर नक्षीदार लाल मांडव घातलाय असा पसरलेला गुलमोहराचा बहर. फुलांच्या घोसांबोवती फेर धरल्यासारखी उभी हिरवीपिवळी बोंडं. त्यांच्याकडे नीट पाहिलं की आत विस्तव भरलाय आणि त्याचा प्रकाश त्या पारदर्शक पोपटी बोंडांतून बाहेर सांडतोय की काय असं वाटावं. चार एकसारख्या वाटोळ्या आकाराच्या गडद लाल पाकळ्यांमध्ये एक पिवळे ठिपके ल्यालेली ऐटदार पाकळी. डिसेक्शन टेबलावर गावाकडच्या चार मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या कॉन्व्हेंटच्या लोकल पोरीसारखी. आकाशात मावळतीच्या सूर्याची अन समोर गुलमोहराची लाली काठोकाठ भरलेली. रात्री ह्या रंगाचं काय होत असेल. सूर्य दुसऱ्या गोलार्धात जाऊन आपलं काम सुरू ठेवतो तस ह्या लालीचं रात्री काय होत असेल? आपल्या उपरेपणाची जाणीव तीव्र करणाऱ्या ह्याच्या वेड्यावाकड्या फांद्या आणि काळ्या शेंगाकडे पाहिलं अन आपण उगाचच ह्या झाडाबद्दल इतके दिवस मनात अढी धरून बसलो असं वाटायला लागलं. घरातल्या कर्त्या पुरुषानं स्वतः खस्ता खाऊन घरातील इतरांना खुश ठेवण्यासाठी आयुष्यभर खपावं तसं हे वेडंवाकडं गुलमोहराचं खोड. पानाफुलांना दरवर्षी पोसता खंगून गेलेलं पण तरीही आपलं काम चोख बजावणारं.

काळाच्या अविरत धावणाऱ्या गाडीत आपण जन्म झाल्याझाल्या बसतो अन शेवटच्या स्टेशनकडे धावायला लागतो. आपण मधल्या मुक्कामांत रमतो, आणि हा प्रत्येक मुक्काम आपल्यात स्वतःच काहीतरी टाकतो अन आपण पूर्वीचे उरत नाही. एकदम बुजरा, नापास होईल अशी भीती बाळगणारा, फारसं कुणांत न मिसळणारा असा मी बऱ्यापैकी बदललो होतो. आपल्या दृष्टीला जाणवत नसला तरी दरक्षणी चराचरांत बदल होतच असतो की. तो नियमच आहे सृष्टीचा. आपल्या बोडक्या फांद्यावर हिरवी पाने येतात, मग ती पिवळी होऊन झडतात, मग हिरवीपिवळी बोंडं, फुलं येतात, जातात, हे पाहून त्या झाडाला काय वाटत असेल? बदलाच्या वेगाचा फरक सोडला तर तेही ह्या बदलाला अपवाद नाहीत. माझ्यासारख्या कित्येकांनी ह्याआधी हे पाहिलं असेल आणि नंतरही कित्येक जण पाहत राहतील. उद्यापासून आपण इथं नसू तेव्हा ह्या सर्वांचा आपल्यासाठी उद्या काय अर्थ उरेल? डोळ्यांत पाणी दाटलं.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)