देवांकडून देवांकडे

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

देवांकडून देवांकडे

- अभिरूची

जेव्हा आपण मनानं, विचारानं, परिस्थितीनं अगतिक होतो तेव्हा काही दृष्य आणि अदृष्य ताकदींना श्रेष्ठ मानायला सुरूवात करतो. पैकी जी ताकद अदृष्य असते, बहुतांश वेळेस, त्या ताकदीपुढे लीन होताना दिलासा मिळायला लागतो की आपल्या सोबत किमान कोणी आपले आहेत, जे आपला भार वाहू शकतात; त्यामुळे क्षणभर का होईना, उसंत मिळू शकते. आणि 'देव' या संकल्पनेचा जन्म झाला. लौकिक अर्थानं अदृष्य असणाऱ्या देवाचं अस्तित्व मानणं ही नुसती कल्पनाच कित्येकांना दिलासा देणारी होती आणि आजही आहे. अर्थात सगळ्यानांच ही कल्पना पटणारी नव्हती; अशांनी सूर्य, वारा, पाऊस इत्यादी दृष्य स्वरूपातील शक्तींना श्रेष्ठ मानलं. माणसाच्या आणि संस्कृतीच्यांही जन्म-विकास–ऱ्हास या अवस्थांच्या प्रत्येक टप्प्यात माणसानं आपापल्या विचारानं, सोयीनं त्याला श्रेष्ठ वाटणाऱ्या ताकदीच्या सोबतीनं स्वतःचं अस्तित्त्व शोधण्याचा आणि नंतर ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जो आजतागायत चालू आहे.

क्रमिक विकासाच्या सुरुवातीच्या काही अत्यंत कठीण अवस्थांनंतर (जगण्याच्या, वाचण्याच्या, तग धरून राहण्याच्या दृष्टीने कठीण अवस्था) माणूस जसजसा स्थिरावायला लागला, वसाहती करायला लागला त्यानंतरची काही हजार वर्षं मानवी इतिहासातील अतिशय महत्त्वाची वर्षं होती. त्यांतूनच कित्येक प्राचीन संस्कृती निर्माण झाल्या. अशाच काही अगदी सुरुवातीच्या, अत्यंत विकसित, संपन्न, वैभवशाली संस्कृतींपैकी एक होती, 'मिस्र' संस्कृती. त्या संस्कृतीच्या लोकांची बांधकामाची पद्धत, तेथील भौगोलिक परिस्थिती, वातावरणाचा प्रभाव अशा काही कारणांमुळे मिस्र संस्कृतीच्या खुणा अद्यापही टिकून असल्या तरी धागे पुरेसे उलगडलेले नाहीत. पण या संस्कृतीने इसवीसन पूर्व १३५३ (किंवा १३५१) ते इसवीसनपूर्व १३३६ (किंवा १३३४) या काळात काही विलक्षण वैचारिक आणि भौतिक स्थित्यंतरं अनुभवली. मिस्र देशच नव्हे तर आजूबाजूच्या देशांवर देखील त्याचे पडसाद उमटले. आणि इथं इतरांहून सर्वार्थानं निराळ्या असणाऱ्या प्राचीन मिस्रच्या अठराव्या राजघराण्यातील दहाव्या राजाची म्हणजेच 'अखेनातेन' (Akhenaten) याची गोष्ट सुरू होते.

पण या राजाबद्दल थेट काही जाणून घेण्याआधी, त्याच्या शासनकाळाच्या आधी साधारणपणे दोनहजार वर्षं ज्या पारंपरिक गोष्टी, रूढी तिथं चालू होत्या त्यांविषयी जाणून घेऊ म्हणजे अखेनातेननं जे पाऊल उचललं ते तिथं राहणाऱ्या प्रत्येकासाठी किती हादरवून टाकणारं होतं याची कल्पना येईल.

मिस्रवासियांची देवांबद्दलची कल्पना, त्यांचे विचार अतिशय गुंतागुंतीचे, जटील होते. देवादिकांच्या बाबतीत मिस्रवासियांच्या ठाम धारणा होत्या. त्यांच्यात मानव, वन्य प्राणी, पक्षी अशा स्वरूपातल्या देव-देवतांचा समावेश होता. सुरुवातीला प्राणी आणि पक्षी रूपांतले देव अधिक होते. कारण प्राणी, पक्षी, काही ठरावीक झाडं यांमध्ये आत्म्यांचा वास असतो अशी त्यांची समजूत होती. नंतरच्या काळात हा ओघ कमी होऊन पूर्णपणे मानवी रूपातल्या देव-देवता मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तेव्हा नाईलमधून सगळी वाहतूक चालत असे (अजूनही चालते). नाईल आणि तो परिसर प्रचंड आकारांच्या मगरींचं, पाणघोड्याचं आश्रयस्थान होतं. तसंच त्या भागात सिंह, चित्ता, मगर, कोल्हे, यांसारखे वन्य जीव तर बाज, ससाणा, पांढरा शराटी असे काही पक्षी दिसणं रोजचं होतं. या वन्य जीवांकडून हल्ले झाल्याच्या घटना सतत घडत. त्यामुळे त्यांनी आपल्यावर हल्ला करू नये म्हणून या प्राण्यांना आणि पक्ष्यांना देवाचं प्रतीक मानायला सुरूवात झाली. पण हे देव दाखवताना ते मिश्र स्वरूपांत दाखवण्यात आले म्हणजे डोक्याच्या जागी या पक्षी किंवा प्राण्याचं डोकं आणि त्याखाली माणसाचं धड. काही वेळेस त्या त्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे जे स्वभावविशेष आहेत त्यांना अनुसरून त्यांना त्या भूमिकेत मानलं. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी मृत्यूनंतर मृतदेह पुरून ठेवत तिथं कोल्हे मोठ्या संख्येनं दिसून आले. तिथं आला अनुबिस (Anubis) हा देव. त्याचं डोकं कोल्ह्याचं आणि धड माणसाचं होतं. तो मृतात्म्यांचे रक्षण करतो असं मानलं जायला लागलं.

तिथल्या एका रहिवाशाकडून मी ऐकलेली बाज पक्ष्याबद्दलची गोष्ट अशीच आहे. बाज म्हणजे त्यांचा हॉरस (Horus) हा देव. डोकं पक्ष्याचं, अंग मानवाचं. तर जिथं मृतदेहांना पुरलं जात असे त्या भागात आकाशात हे बाज मोठ्या संख्येनं स्थिर होऊन जागच्या जागी पंख हलवत थांबलेले दिसत. त्यावरून ते संरक्षण करण्यासाठी आकाशातून बघत आहेत असं मानायला सुरुवात झाली. बाज पक्षी देवाच्या स्वरूपात दाखवताना त्यानं प्राचीन मिस्र देशाचा मुकुट डोक्यावर परिधान केलेला असतो.

नाईलमुळे त्या भौगोलिक प्रदेशाचे दोन भाग (उत्तर आणि दक्षिण) झाले आहेत; वरचा भाग आणि खालचा भाग. या दोन्ही भागांतल्या राजांचे मुकुट वेगवेगळे होते. जेव्हा हे दोन्ही भूभाग एखाद्या राजाच्या अधिपत्याखाली येत तेव्हा तो राजा या दोन्ही भागांचे प्रतीक असलेले मुकुट परिधान करत असे. तसेच हॉरसच्या डोक्यावर या दोन्ही भागांचे मुकुट दाखवलेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा देव म्हणजे रा (Ra). तो दिसताना या हॉरससारखाच दिसतो पण या 'रा'च्या डोक्यावर मुकुट नसून नाग चिन्हांकित सूर्य आहे. रा ला सूर्य, आकाश, सगळे देव, जमीन, मृत्यूनंतरचा लोक यांचा देव समजलं जातं म्हणजे देवाधिदेवच. मगरीचं तोंड, अंग सिंहाचं आणि पाय पाणघोड्याचे अशा रूपात अम्मित (Ammit) नावाचा दैत्यदेखील या जंत्रीत होता. मिस्रवासियांनी प्रत्येक देवाच्या, दैत्याच्या संदर्भात काही आख्यायिका जोडल्या होत्या. त्या सगळ्या खऱ्या मानून तेव्हाचे राजे प्रसंगी त्या देवतेचं रूप घेऊन त्या ठिकाणी हजर राहत असत. या प्रकारच्या इतर काही प्रमुख देवांची नावं अशी - बास्तेत (मार्जार देवता) (Bastet), थोथ (डोकं आयबिस पक्ष्याचं आणि अंग माणसाचं) (Thoth), सोबेक (मगर आणि मानव) (Sobek), सेत (जो लांब तोंड असलेला एक काल्पनिक प्राणी होता असं अभ्यासकांचं मत आहे.) (Set), खेपेरा (भुंगेरा आणि मानव) (Khepera), सेखमेट (मादी सिंहाचे स्त्रीरूप) (Sekhmet), हेसत (गायीच्या रूपातली देवता) (Hesat).

नंतर त्या संस्कृतीमध्ये एक काळ असा आला जेव्हा त्या लोकांना मानवी रूपातले देव महत्त्वाचे वाटायला लागलं. तेव्हाच्या राजांपैकी काहींची आपण देवांचेच वंशज आहोत अशी धारणा होती. देवांचं त्यांच्या आयुष्यांत अनन्यसाधारण महत्त्व होतं. फक्त वैयक्तिक आयुष्यांतच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक संस्कारांचा केंद्रबिंदू देव होते. त्यांचा संबंध फक्त जिवंतपणीच्या आयुष्याशी नव्हता. मिस्रवासियांचा मृत्यूनंतरच्या आयुष्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्या आयुष्याशीदेखील देवादिकांचा संबंध असे. काही देव महत्त्वाचे होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती आवश्यक असे. काही त्यांच्यापेक्षा कमी महत्त्वाचे देव ठरावीक विधींपुरते लागत. अशा मोठ्या-लहान साधारण दोन हजार देवांनी मिस्रवासियांना व्यापून टाकलं होतं; तेव्हा अखेनातेन म्हणत होता त्यापैकी फक्त एकाच देवाला पुजायचं. एकल देव ही संकल्पना त्यानंच पहिल्यांदा मांडली असावी, जी तेव्हाच्या लोकांना मान्य नव्हती.

मानवी स्वरूपातील काही प्रमुख देवांपैकी पहिला देव म्हणजे अतुम (Atum), हा त्यांचा अधिदेव. अतुमच्या हस्तमैथुनातून टेफनट (Tefnut) ही देवता आणि शू (Shu) हा देव हे भाऊबहीण जन्माला आले. राजा मेल्यानंतर त्याचा आत्मा अतुमच्या मार्फत दुसऱ्या जगात नेला जातो असं लोक मानत. हा देव संध्याकाळच्या सूर्याचं प्रतीक म्हणूनदेखील पूजनीय होता. अतुमच्या खालोखाल महत्त्वाचा देव म्हणजे प्टाह (Ptah), याला देखील मूळ देव मानतात; स्थापत्याकारांची देवता म्हणूनदेखील याचा उल्लेख आहे. ज्यानं पहिला पिरॅमिड बांधला त्या इमहॉटेप (Imhotep) यानं मृत्यूनंतर दुसऱ्या जगात जाताना स्वतःला प्टाहचा मुलगा म्हणून संबोधलं आहे. ओसायरस (Osiris) हा देखील एक प्रमुख देव. मृत्यू, मृत्यूनंतरचं जग, पुनरुत्थान, नाईल नदीला दरवर्षी येणारा पूर यांचं प्रतीक म्हणून या देवाचं नाव घेतलं जात असे. तेव्हाचे राजे स्वतःला एखाद्या देवाचं प्रतीक मानीत. उदाहरणार्थ, तुतनखामुन (Tutankhamun) स्वतःला ओसायरसचा अंश मानीत असे. त्यामुळे त्याला जेव्हा जेव्हा चित्रित केलं तेव्हा त्याचा वर्ण काळसर दाखविला आहे. ओसायरस त्या वर्णाचा होता असं मानण्यात येतं. या ओसायरसची बायको आयसीस (Isis) हीदेखील महत्त्वाची देवता, मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींमध्ये तिची हजेरी अनिवार्य होती. त्या जीवनामध्ये या देवतेला मातेचं प्रतीक म्हणून संबोधलं आहे. अजूनही या देवतेची पूजा केली जाते.

राजा स्वतःला देवाचा अंश मानत असल्यामुळे कित्येक राजांनी देवतांच्या देवळांबरोबरच स्वतःचीही देवळं बांधली. प्रजेनं आपल्यामध्ये देवाला पाहावं यासाठी राजांनी स्वतःच्या ज्या मूर्ती घडवून घेतल्या, जे पुतळे बांधून घेतले ते प्रचंड उंच होते. (बरेचसे अजून देखील आहेत. काही पुतळे पंचवीस, तीस फुटांहून उंच आहेत.) राजारूपी देवाला सामान्य लोक दबून असत. त्यानंतर, अखेनातेनच्या आधी आणि नंतर एक काळ असा आला की पुजाऱ्यांचं महत्त्व राजांहून वाढलं. काही राजवटींमध्ये राजा हाच प्रमुख पुजारी होता. त्याकाळी विशेषतः देवळांची जी बांधकामं केली त्यांत एक ठरावीक आकृतीबंध आढळतो. राज्यातल्या सर्वांनाच देवळाच्या पूर्ण परिसरात जाण्याची मुभा नव्हती. नागरिकांना एका ठरावीक ठिकाणीच थांबावं लागे. त्यानंतर पुढे राजघराण्यातील लोक, देवळातले इतर पुजारी आणि राजा यांनाच जाता येत असे. देवळाच्या आतल्या भागात जिथं मूर्ती ठेवलेली असे तिथं फक्त पुजारी किंवा पुजारीण यांनाच जायची परवानगी होती. पुजारी देव आणि देवता या दोघांचीही पूजा करू शकत असे. पुजारणींनाही हा अधिकार होता पण तेव्हा त्या प्रामुख्याने देवतांचीच पूजा करत असत. पहाटे पूजेच्या आधी देवळात असलेल्या पवित्र तलावातच पुजारी आणि पुजारीण यांना स्नान करावं लागत असे. त्यांना शरीरावरील केस काढावे लागत आणि तागापासून तयार केलेला लांब झगा त्यांना परिधान करण्याचं बंधन होतं. पहाटे देऊळ उघडण्यापासून देवाला, देवतेला नैवेद्य दाखविण्यापर्यंत एकूण चाळीस विधी होते. रात्री देऊळ बंद करतानादेखील हे विधी उलट्या क्रमानं केले जात. देवाला, देवतेला नैवेद्य दाखवण्याचा अधिकार फक्त पुजारी आणि पुजारीण यांनाच होता. देवळांमध्ये, गाभाऱ्याच्या आत एक गर्भगृह असे. तिथे हे पुजारी आणि पुजारीण देवांशी संवाद साधत. तिथून ते बोलत तेव्हा त्यांच्या मुखातून देवच बोलत आहे असं समजलं जात असे आणि त्यांनी दिलेल्या आज्ञांचं पालन होत असे. पूजेचा अधिकार जसा यांना होता तसाच राजाच्या मृत शरीरावर संस्कार करण्याचा अधिकारदेखील फक्त मुख्य पुजारी आणि देवाच्या रूपातील इतर उपपुजारी या लोकांनाच होता. नंतरच्या काळात ममीकरणानंतर कबरी लुटून न्यायला कबरींवरचे पहारेकरी जेवढे जबाबदार होते तेवढेच पुजारीदेखील होते. पुजाऱ्यांकडे अपरिमित संपत्ती होती, जमिनी होत्या. देवाला म्हणून ज्या भेटी दिल्या जात, जे द्रव्य अर्पण केलं जात असे ते सगळं पुजाऱ्यांना मिळत असे. नुबिया, सुदान अशा बाहेरच्या देशांमधूनही देवळांना प्रचंड देणग्या मिळत असत. तेव्हाची ही देवळं परराष्ट्रीय, परप्रांतीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होती. पण यात पुजाऱ्यांचं वर्चस्व भीती वाटावी इतकं वाढलं होतं. सामान्य माणूसच नाही तर राजांनादेखील त्यांचा प्रमाणाबाहेर वाढलेला हस्तक्षेप मान्य नसे. पण पुजाऱ्यांना देवानंतर सर्वोच्च स्थान होतं त्यामुळे त्यांच्या विरोधात जाण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. ती केली फक्त एकाच राजानं, अखेनातेन यानं.

प्रत्येक मिस्रकालीन राजे आणि राण्यांची, देवादिकांच्या नावावरून पाच नावं असत. प्रत्येकाची दरवेळी ती सगळी नावं न घेता जे मुख्य नाव होतं तेचं इथं वापरलेलं आहे.
अखेनातेन अठराव्या राजवंशातील नववा राजा अमेनहॉटेप (तिसरा) (Amenhotep) आणि राणी ताय (Tiye) यांचा मुलगा. अमेनहॉटेप (तिसरा) वयाच्या बाराव्या वर्षी राजा झाला. तेव्हा प्राचीन मिस्र संस्कृतीचा सुवर्णकाळ होता. अमेनहॉटेप (तिसरा) यानं त्याच्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून देशाच्या वर्तमानाच्या आणि भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आणि चांगले निर्णय घेतले. त्याकाळी मिस्र देशातल्या सोन्याला चांगलीच किंमत असे. त्या सोन्याच्या बदल्यात इतर देशांतून घोडे, चांदी, काही मौल्यवान दगड ज्यांचा दागिन्यांमध्ये उपयोग होत असे, अशा रूपांत परकीय चलन मिळत गेलं.

अमेनहॉटेप (तिसरा) राजा असताना मिस्र देशाचे इतर देशांशी कायमचं शांततापूर्ण संबंध राहिले होते. पण जेव्हा युद्धाची वेळ येई तेव्हा अमेनहॉटेपने आपले युद्धकौशल्यपणाला लावत सैनिकांच्या मदतीने युद्धं जिंकली होती. त्याची प्रथम पत्नी ताय हिला राज्यकारभारात बरोबरीचं स्थान होतं. अमेनहॉटेपनं सूर्यदेव अमुन-रा याची देवळं बांधली. तेव्हाच्या थीब्समध्ये बांधलेल्या या देवाच्या देवळाचा मोठा विस्तार अमेनहॉटेपनं केला. त्यानं तेव्हाच्या प्रथेप्रमाणे स्वतःचे मोठे पुतळे असलेलं भव्य देऊळही बांधलं. त्यानं एकूण पस्तीस वर्षं राज्य केलं.

तर या अमेनहॉटेपचा मुलगा, अखेनातेन. त्याच्या जन्मसालाविषयी अभ्यासकांची अनेक मतं आहेत. कोणीही अजून ठामपणे ते सांगू शकलेलं नाही. याचा शासन काळ इ.स.पूर्व १३५३-१३३६ मानण्यात येतो. काही ठिकाणी इ. स. पूर्व १३५१- १३३४ अशी देखील नोंद आहे.

अखेनातेन हे त्याचं सुरुवातीपासून नाव नव्हतं. त्याच्या वडिलांच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं अमेनहॉटेप (चवथा). राजा म्हणून अखेनातेन त्याच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षापर्यंत त्याचं नाव अमेनहॉटेप (चवथा) हेच होतं. देवादिकांच्या बाबतीतदेखील पहिली पाच वर्षं त्यानं परंपरा जपली. पण हा राजा नेहमीच्या राजांहून काही वेगळा आहे ते त्यानं राज्यकारभाराला सुरुवात केल्यापासूनच सगळ्यांना कळून चुकलं होतं. एखाद्या राजानं त्याच्या शासनकाळाची तीस वर्षं पूर्ण केल्यावर तो सेड (Sed festival) नावाचा समारंभ आयोजित करत असे. अखेनातेननं राजा म्हणून तीन वर्षं पूर्ण झाल्यावर लगेचच हा समारंभ आयोजित केला होता. तीस वर्षं वाट न पाहता, तीन वर्षांतच हा समारंभ साजरा करणं, ही गोष्ट सर्वांसाठीच नवीन होती. तसच तो राजा झाल्यावर पहिल्याच वर्षी त्यानं कर्नाकमधल्या (तेव्हाचं थीब्स) अमुन-रा (Amun-Ra) या देवाच्या देवळाच्या आवारातच अतेन (Aten) या देवाचं देऊळ बांधायला सुरुवात केली. हे असं कधीच घडलं नव्हतं, कुणी याची कल्पनाही केली नव्हती. अमुन-रा हा सर्वोच्च देव असताना त्याच्या देवळाच्या आवारात कमी महत्त्व असलेल्या आणि मानवी रूप नसलेल्या देवासाठी देऊळ बांधलं जाणं हा विचार, ही कृती या पूर्ण संस्कृतीला धक्का देणारी होती. आपण ज्याला कर्मठ म्हणतो तसे ते लोक होते आणि अखेनातेन त्यांच्या अगदी विरुद्ध. अखेनातेन म्हणजे अतेनच्या प्रभावाखाली असलेला. तेव्हा पुजाऱ्यांचं महत्त्व राजाहून जास्त असल्याकारणाने त्यांच्याकडे राजांपेक्षा कितीतरी पट अधिक धनसंचय असे. अमेनहॉटेपला (चवथा) ते मान्य नव्हतं. त्यानं सूर्याचीच पण मनुष्य आणि प्राणी या मिश्ररूपातील स्वरूपाची पूजा न करता सूर्य तबकडीची पूजा सुरू केली आणि आपले नाव बदलून अखेनातेन (Akhenaten) ठेवले. मानवप्राण्याच्या रूपातले देव, पुजाऱ्यांचं वाढतं प्रस्थ यानं अखेनातेनचं मन उद्विग्न झालं. जेव्हा देव मनुष्य रूपांत असतो तेव्हा त्याला माणसाच्या व्यक्तिमत्वातले गुणावगुणदेखील जोडले जातात, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं काही स्तुतीपर कवनं लिहिली त्यात त्याचे विचार हेच होते, की सूर्याला तबकडीच्या रूपात पाहा. तबकडीच्या रूपातला सूर्य देव मिस्रवासियांसाठी नवीन नव्हता परंतु त्या रूपात तो कधीच प्रमुख देव नव्हता. अमुन आणि अमुन सोबत रा हेच मुख्य देव होते. त्यानं कर्नाकमधल्या देवळाच्या मागेच नवीन देवालयाचं बांधकाम सुरू केलं होतं तरी त्याला त्याच्या अतेन (Aten) या देवाचं स्वतंत्र देऊळ असावं असं वाटायला लागलं. देऊळ असणार म्हणजे त्याभोवती साम्राज्य उभारायला हवं, त्यामुळे नव्या राज्यासाठी अन देवळासाठी जागा शोधायला तो त्यावेळची राजधानी थीब्समधून बाहेर पडला. सूर्य तबकडीसाठी जे चिन्ह चित्रलिपीमध्ये (hieroglyphics) आहे तसाच सूर्य त्याला एके ठिकाणी दिसला आणि त्यानं आपला शोध थांबवला. हे ठिकाण थीब्स आणि मेन्फीस या शहरांच्या मध्ये होतं (अजूनही अवशेषांच्या स्वरूपात आहे.).अखेनातेन यानं त्या ठिकाणाला नाव दिलं, 'अखेतातेन' (Akhetaten) सूर्योदयाचं ठिकाण (The Horizon of the Aten). नंतरच्या काळात त्या ठिकाणाला लोक तिथं तेव्हा राहात असणाऱ्या लोकांवरून 'अमारना' म्हणू लागले. अखेनातेन यानं तेव्हाच्या पद्धतीनुसार मोठे दगड वापरून बांधकाम न करता विशिष्ट आकाराचे लहान दगडा वापरून (talatat) – प्रामुख्याने चुनखडकात बांधकाम केलं. दगडांचा आकार लहान असल्यामुळं ते वाहून नेण्यासाठी, उचलण्यासाठी सोपे होते.

त्यानं दहा वर्षांत आपलं राज्य कमालीचं सुंदर घडवलं. राज्याची सीमा ठरविण्यासाठी भव्य सोळा शिलालेख दगडांतून कोरून घडवले. त्यांवर देखील त्याने अतेनच्या स्तुतीपर काव्य लिहिले आहे. त्याच्या नव्या राज्यात सगळीकडे फक्त अतेनचीच देवळं होती. देवळांत सभामंडप बंदिस्त न ठेवता उघडा ठेवला होता. तेथील रहिवासीदेखील फक्त या एकच देवाची पूजा करत. त्या काळी त्या राज्याची लोकसंख्या साधारण वीस ते पन्नास हजार होती. ज्या मिस्रवासियांना (सामान्य लोक, धर्मगुरू, पुजारी) या नव्या देवाचा स्वीकार करायचा नव्हता ते थीब्स, मेम्फिसमध्येच राहिले असावेत असा माझा अंदाज आहे.

सूर्य तबकडीचं स्वरूपदेखील निराळं होतं. तबकडी पासून असंख्य हात खाली आले होते जणू ते सूर्याचा आशीर्वाद, सूर्याची कृपा लोकांपर्यंत पोहोचवत होते. पण सूर्य आणि सामान्य लोक यांच्यामध्ये राजा होता. म्हणजेच देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये राजाचं असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय कृपाशीर्वाद मिळणं शक्य नाही हे स्पष्टपणे त्यानं सूचित केलं होतं. त्यानं स्वतःची जी कबर बांधली होती त्यामध्ये एका चित्रात मुख्य पुजारी राजाला काही अर्पण करत आहे असं दाखवलं होतं. हे असं चित्र त्यामागच्या दोन हजार वर्षांत कधी दिसलं नव्हतं. अखेनातेननं मुख्य पुजाऱ्याला राजाहून खालच्या स्थानावर दाखवलं होतं. त्याकाळच्या लोकांसाठी, मुख्य म्हणजे पुजाऱ्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी गोष्ट होती. तो आता राजा असल्यामुळे त्याच्या विरोधात जाणं शक्य नव्हतं. त्याच्या राज्यातल्या प्रजेचा त्याला पाठींबा असावा.

एकल देवाच्या संकल्पनेमध्ये तो संपूर्णपणे बुडाला होता. तेव्हाच्या शेजारच्या राज्यांचे राजे आणि अखेनातेन यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातली काही पत्रं मिळाली आहेत. त्यांवरून असं दिसून येतं की ज्या पत्रांमधले मुद्दे अखेनातेनच्या वैयक्तिक संदर्भातले होते त्यांनाच त्यानं उत्तरं दिली आहेत. कित्येक राजांनी त्याच्याकडे शत्रूशी लढण्यासाठी मदत मागितली होती; आणि त्याकडे त्यानं पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्या राजांनी मिस्र देशाशी असलेले संबंध, व्यवहार पूर्णपणे तोडले जे याआधी कधीच झालं नव्हतं.

अखेनातेन स्वतःला आतेनचा मुलगा मानत होता. त्यामुळे सूर्य तबकडीच्या खाली प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक शिल्पामध्ये प्रत्येक चित्रात तो असे. त्याच्याबद्दल सगळंच कुतूहलजनक आहे. जर तेव्हाच्या बाकी मिस्र राजांची, राण्यांची शिल्पं आणि मूर्ती पाहिल्या तर त्या विलक्षण प्रमाणबद्ध आहेत असं लगेचच दिसून येतं. अखेनातेन याही बाबतीत अपवाद होता. प्रत्येक ठिकाणी तो या आधीच्या एकाही राजासारखा दिसत नाही. त्याचं डोकं मोठं, तोंड लांबडं, मोठे वक्ष, हात-पाय अगदी बारीक, पोट खाली ओघळलेलं असंच रूप सगळीकडं दिसतं.

अखेनातेन कैरो वस्तुसंग्रहालय पुतळा
अखेनातेनचा कैरो वस्तुसंग्रहालयात ठेवलेला पुतळा.

यानं स्वतःचं, त्याची बायको नेफरटीटी हिचं आणि मुलींचं हेच रूप सगळीकडं कोरून घेतलं. आता ती दोघं आणि त्यांच्या मुली अशाच दिसत होत्या की काय याबद्दल अजूनही एकमत नाही. (या दोघांना सहा मुली होत्या. त्याचा मुलगा ज्याला आपण तुतनखामुन या नावानं ओळखतो, त्याची आई ही नव्हे पण. त्याच्या आईची ममी जरी मिळाली असली तरी बाकी ओळख म्हणजे कोणाची मुलगी, कोणता वंश याबाबतीत काही माहिती नाही. अभ्यासकांनी तिला 'यंगर लेडी' असं नाव दिलं आहे.)
तोपर्यंत काही अपवाद वगळता राण्यांना राजाच्या बरोबरीनं दाखवायची पद्धत नव्हती. खाजगी प्रसंगी तर नाहीच. एका शिल्पाकृतीमध्ये वर सूर्याची तबकडी आहे. सूर्याची किरणं सरळ तिरकी खाली येताना दिसत आहेत. मध्ये अखेनातेन आपल्या मुलींसोबत खेळतो आहे आणि नेफरटीटीच्या हातातदेखील मुलगी आहे. संपूर्ण मिस्र संस्कृतीमध्ये असं कुठेच पाहायला मिळत नाही.

अखेनातेच्या रूपावरून इजिप्तज्ञांचं म्हणणं असं की त्याला मार्फन सिन्ड्रोम (जनुकीय आजार, ज्यामध्ये प्रामुख्याने हृद्य, डोळे, रक्तवाहिन्या आणि हाडांची हानी होते.) असावा. पण त्याची ममी चांगल्या अवस्थेत सापडली नाही त्यामुळे त्याच्या जन्ममृत्यूबद्दल, त्याला काही आजार असू शकतील का याबाबतीत कोणतीच विधानं ठामपणे करता येत नाहीत.

अखेनातेन कुटुंब सूर्य तबकडीची पूजा करताना
अखेनातेन आणि त्याचं कुटुंब सूर्य तबकडीची पूजा करताना.

अखेनातेन पूजा करताना
अखेनातेनच्या मृत्यूनंतरच्या विध्वंसामध्ये वाचलेल्या कलाकृतींपैकी एक, अखेनातेन पूजा करताना.

त्याकाळी राजवंशामध्येच लग्नं होत. प्रत्येक राजाला तीन-चार बायका असत. त्यामुळे लग्न होतांना ती भाऊ - सावत्र बहीण, चुलत भाऊ – बहीण, वडील - सावत्र मुलगी, काका – पुतणी अशा प्रकारे होत. त्यामुळे जवळजवळ सगळ्या राजांना काही-ना-काही जनुकीय आजार, विकार होते. इतर आजारही होते ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होत. त्या काळात माणसांचं आयुर्मान फार जास्त नव्हतं. रामसिस (द्वितीय), तुतमोस (तृतीय) यांसारखे आणखी एखाददोन राजे वगळता सगळे चाळीशीमध्येच त्यांच्या 'आवडत्या राज्यात' पोहोचले होते.

अखेनातेनचा मृत्यू कसा झाला हे कुणालाच माहीत नाही. त्याने स्वतःसाठी जी कबर बांधली होती त्यात त्याची ममी नव्हतीच. ती ममी सापडली 'व्हॅली ऑफ किंग्ज'मध्ये केव्ही पंचावन्न या कबरीमध्ये. ममीचं स्थलांतर होण्यामागे मोठं कारण आहे.

अखेनातेनच्या मृत्यूनंतर त्याच्या विचारांना विरोध करणाऱ्यांनी त्याचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा चंग बांधला. देवळं तोडली, सगळी बांधकामं पाडली. अखेनातेनचा देव अतेन आणि अखेनातेन यांची एकही मूर्ती, शिल्प शिल्लक राहायला नको अशा निश्चयानं पुजाऱ्यांच्या अनुयायांनी अमारना शहर होत्याचं नव्हतं केलं. सतरा वर्षं पुजाऱ्यांच्या मनात संताप खदखदत होता. अखेनातेन यानंदेखील जेव्हा अतेनची पूजा सुरू केली तेव्हा इतर देवांचं अस्तित्व संपवलं होतंच. इतकंच कशाला त्याच्या वडिलांचं नाव देवाच्या नावावरून असल्यामुळे तेदेखील त्याला जमेल त्या सगळ्या ठिकाणांहून काढून टाकलं होतं. आता त्याचे विरोधक हेच सगळं त्याच्या आणि त्याच्या देवाच्या बाबतीत करत होते. अखेनातेनच्या विश्वासातील लोकांना असं काही होणार याचा अंदाज आला असावा, म्हणून त्यांनी त्याची ममी अमारनामध्ये न ठेवता बाकी राजांच्या कबरी होत्या तिथे इतरांच्या नकळत हलवली. आज आपण जो भाग 'व्हॅली ऑफ किंग्ज' म्हणून ओळखतो साली एडवर्ड आयर्टन या पुरातत्त्व शास्त्रज्ञाला ती ममी के.व्ही. पंचावन्न या कबरीमध्ये ७ जानेवारी १९०७ला सापडली. जेव्हा त्यानं ममीवरचं तागाचं कापड दूर केले तेव्हा मातीसदृश पदार्थाची भुकटी हाताला लागण्याखेरीज आणखी काहीच मिळालं नाही.

अखेनातेन नंतर नेफरटीटीचं काय झालं कुणालाच माहीत नाही. काही अभ्यासक म्हणतात तिचा मृत्यू अखेनातेनच्या आधीच झाला होता. विरोधकांनी तिच्याही संदर्भातल्या एकूणएक खुणा मिटवल्या. काही अभ्यासक म्हणतात ती थीब्सला परत आली आणि तिनं दोन वर्षं वेगळ्या नावानं राज्य केलं आणि तिच्यामागे तुतनखामुन राजा झाला. तो राजगादीवर बसला तेव्हा अवघा दहा वर्षांचा होता. त्याला निर्णय घेण्याचा अधिकार कितपत होता शंका आहे. त्याला राज्यकारभारात आय हा सल्लागार मदत करत होता. (नेफरटीटी या आयची मुलगी होती असं म्हणतात.) असं म्हणतात की त्याने आयच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा सगळ्या आधीच्या देवांची पूजा सुरू केली आणि पुन्हा एकदा पुजारी श्रीमंत झाले.

त्यानंतरच्या राजवटीतल्या राजानं अगदी सुरूवातीपासूनच्या शासनकाळातले राजे, राण्या आणि त्यांची मुलं या सगळ्यांच्या नावांची जी नोंद ठेवली त्यात अखेनातेन, नेफरटीटी आणि तुतनखामुन यांची नावं लिहिण्याचं ठरवून टाळलं. जणू अखेनातेन या नावाचा कोणी राजा प्राचीन मिस्र भूमीमध्ये झाला होता की नाही अशी शंका यावी. त्याच्यानंतर मात्र अशाप्रकारे प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्नदेखील कोणी केला नाही.

अनेक प्रकारच्या देवांपासून सुरू झालेला हा प्रवास मध्ये सतरा वर्षं खंडीत झाला; मात्र नंतर पुन्हा त्या सगळ्या देवांपाशी येऊन पूर्ण झाला.

खुलासा :

मिस्र हा हिब्रू शब्द आहे, याचा अर्थ दोन तुकड्यांचा देश. नाईलमुळे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पडले आहेतच. नाईलच्या काठावरची काळीशार जमीन आणि तिथं असणारं वाळवंट यांमुळे या देशात राहाणारे मूळ रहिवासी त्यांच्या देशाला 'केमेत / केमेट (काळी माती)'' आणि 'देशरेत' (लाल भूमी) या नावांनी संबोधत.
या लोकांच्या महत्वाच्या देवांपैकी एक होता प्टाह (Ptah) त्यावरून या देशाला 'हट् का प्टाह' (प्टाहची भूमी) असं म्हणत. त्यावरून ग्रीकांनी 'एगिप्टॉस' म्हणायला सुरुवात केली. युरोपीयांंनी या शब्दाचा अपभ्रंश 'इजिप्त' प्रचलित केला.

संदर्भ :
१. Ancient Egypt : David Silverman
२. The Story of Egypt : Joann Fletcher
३. Akhenaten- Egypt's False Prophet : Nicholas Reeves
४. https://www.britannica.com/list/11-egyptian-gods-and-goddesses
५. https://www.worldhistory.org/article/885/egyptian-gods---the-complete-list/

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

देव, देवतांविषयीच्या संकल्पना कशा प्रचलीत होतात आणि कालांतराने रूढ होत जातात याची झलक या लेखात दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बालु की भित, पवन का खंबा |
देवल देख भया अचंबा ||
भोला मन जाने - अमर मेरी काया ||

इजिप्शिअन संस्कृतीबद्दल नेहेमीच एक कुतूहल आणि ओढ वाटत आली आहे ("द ममी" सारख्या पल्पपटांमुळे का होईना)
साधारण ३००० वर्ष (जुनी-नवी राजवट वगैरे धरून) टिकून राहिलेली संस्कृती बहुधा आजवर माहिती असलेल्यांत सर्वात प्रबळ असावी -
तुलनेने आपली आजकालची पाश्चात्य औद्योगिक संस्कृती ४०० वर्षं जुनी आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे नृसिंह अवतार अशाच प्रकारचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आज च्या पिढीला ह्या लेखाचा काहीच उपयोग नाही.
जगाची निर्मिती,माणसाची निर्मिती,माणूस च का हुशार झाला.मानवी ज्ञान इंद्रिय ना ज्याची जाणीव होते तेच सत्य आहे.खूप खूप प्रश्न आहेत .त्याची माहिती हवी आहे.
बाकी लेखात व्यक्त केलेले विचार आणि माहिती दोन तीन हजार वर्षापूर्वी पासून माणसाला पडत आहेत.
नवीन काहीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ0

लेखात जे वर्णन केले आहे की नैसर्गिक रित्या घडणाऱ्या घटनेची माणसाला भीती वाटत होती म्हणून देव ही संकल्पना निर्माण झाली.
तेव्हा असेल पण आता पण जे देव आहे (देव ह्या शब्दाचा अर्थ फक्त हिंदू देव नाहीत ,सर्व धर्माचे देव, असा घ्या .मी देव ह्या शब्दाचा अर्थ निर्माता असा घेतो)ह्या वर विश्वास ठेवून आहेत त्यांचे प्रश्न अनंत आहेत.
१) माणूसच का सर्व प्राण्यांना पासून वेगळा आहे.
२) माकड आणि माणूस ह्यांच्या शारीरिक रचनेत काडी चा फरक नाही.
मग माणसा चच मेंदू ची का उत्क्रांती झाली.
वातावरण,पर्यावरण,अन्नाची गरज सर्वांची एकच होती.
३) मानवी ज्ञान इंद्रिय जे माणसाला जाणीव करून देतात तेच सत्य आहे असे का मानावे.
४)
फक्त पृथ्वी वर च का जीवन आहे बाकी ग्रहावर का नाही.
ह्याची ठाम उत्तर माणूस तरी देवू शकणार नाही .
ती उत्तर जो देवू शकतो .
देव, निर्माता.
आणि ह्या प्रकारचं चेच अजुन अनंत प्रश्न आहेत ते आज च्या देव मानणाऱ्या माणसाला पडतात.
लेखात उल्लेख केलेले बकवास प्रश्न पडत नाहीत.
निसर्गात बघितले तर .
सर्व ओवोळ, नद्या,नाले हे जावून समुद्रात च मिळतात.
पण माणसं ज्यांना आपण हुशार प्राणी समजतो तो खरे तर पृथ्वी वरचा सर्वात मूर्ख प्राणी आहे.
प्रतेक नाला वाहत जावून कुठल्या तरी डबक्यात जात नाही.नदीत जातो.
प्रतेक नदी वाहत जावून कोणत्या तरी डबक्यात जात नाही.
समुद्रात च जाते.
पण
माणसांची विचारधारा
डाव्यांची अलग डबकी आहेत.
उजव्यंची अलग डबकी आहे.
नास्तिक लोकांची वेगळी डबकी आहेत
बुद्धिमान लोकांची अलग डबकी आहेत.
सर्व विचार प्रवाह हे समांतर वाहत जावून डबक्यात च जावून जमा होतात.
ह्या मुळे माणूस मूर्ख आहे असेच माझे मत आहे.
प्राण्यांचे वर्तन ह्याच्या विरूद्ध असते.भले त्यांनी भौतिक प्रगती केली नाही पण प्रतेक प्रजाती सुसंगत च वर्तन करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ह्या मुळे माणूस मूर्ख आहे असेच माझे मत आहे.

तुमची माणूसकी निर्विवाद आहे.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0