क. क. ची क.

तर बरं का.......
आज मी तुम्हाला क. क. ची क. सांगणार आहे.
गोंधळलात ना? आहो हल्ली अशाच नावाचा ट्रेण्ड आहे .. जसं डी डी एल जे, एम पी थ्री, क्यू एस क्यू टी इ.. तशीच ही क क ची क म्हणजे कल्पनेच्या कल्पनांची कथा .

कल्पना ही आपली कथानायिका. तशी साधीसुधीच, पण स्वतःच्याच कल्पनाविश्वात रममाण असणारी. तर तिच्या कल्पनांची ही कथा.

दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन .. आणि सगळीकडे सामसूम. कॉलेज मधले शेवटचे लेक्चर आटोपून कल्पना घरी निघाली होती.
अरे.. एक सांगायचं राह्यलच. कल्पना कॉलेज मध्ये व्याख्याती (म्हणजे लेक्चरर) आहे, विषय मानसशास्त्र.
तर कल्पना घरी जायला निघाली होती. स्कूटर घेण्यासाठी ती कॉलेजच्या सायकल स्टॅण्ड कडे निघाली होती. आता तुम्ही म्हणाल सायकल स्टॅण्ड मध्ये स्कूटर? त्याचं काय आहे, कॉलेज बरच जुनं आहे.. अगदी अशा काळातलं ज्या काळात अगदी प्रोफेसर सुद्धा सायकल वापरीत असत (आठवा' तरूण तुर्क म्हातारे अर्क' मधले प्रोफेसर बारटक्के). हल्ली कुणीच सायकल वापरत नाही पण स्टॅण्ड हा अजूनही सायकल स्टॅण्डच.
हा -- तर काय सांगत होते ? कल्पना स्कुटर घेण्यासाठी सायकल स्टॅण्ड कडे निघाली होती. आणि बघते तर काय ? तिच्या स्कूटरवर एक तरूण मुलगी बसलेली, आणि एक मुलगा ... म्हणजे त्या मुलीचा मित्र असेल बहुदा, तिला काहीतरी सांगत शेजरीच उभा..
झालं - कल्पनेचं कल्पनाचक्र गरगरायला लागलं...
"कोण असतील ती दोघंजणं? नक्कीच काहीतरी लफडं ... अं ... अफेअर असणार. काय तरी आजकालची मुलं? अजून शिक्षणं पूर्ण नाही झालीत आणि हे उद्योग? हं !"
तिने मानेला झटका देत एक नापसंतीदर्शक उद्गार काढला. मग त्या मुलीचा चेहरा नीट निरखून लक्षात ठेवला आणि अर्थातच मुलाचापण. पण त्याने गॉगल लावलेला असल्याने आणि डोक्यावर कॅप असल्याने तिच्या प्रयत्नांनाना म्हणावे तसे यश आले नाही. तिची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती.
इतक्यात ..
"मॅडम काय झालं ? स्कूटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का ?"
शंकर (स्टॅण्ड चा म्याणेजर .. असं तो स्वत:ला म्हणवून घेत असे) विचारत होता.
"नाही नाही .. " कल्पना घाई घाईने म्हणाली "काही प्रॉब्लेम नाही. आजकाल इतक्या एकसारख्या दिसणाऱ्या स्कूटर्स असतात, की माझी नक्की कोणती आहे तेच कळेना बघ. पण मिळाली आता."
ती वेगाने आपल्या स्कूटर जवळ आली.
"एक्स्क्युज मी.. मला माझी स्कूटर .."
आवाजात जमेल तेव्हढे मार्दव आणत ती त्या मुलीला म्हणाली.
मुलगी चटकन खाली उतरली आणि "सॉरी मॅम, सो सॉरी मॅम ... " असे म्हणत तिच्या मित्राबरोबर दिसेनाशी झाली.

घरी जाताना कल्पनेच्या मनात ती मुलगी आणि तिचा मित्रच होते. त्या विचारांच्या नादात तिने काही स्पीड ब्रेकर्स आणि काही खड्ड्यांना चुकवायचा जराही प्रयत्न्न केला नाही. मनात विचारचक्र भिरभिरत होते..
"कुठे जातील ते आता? आणि काय करतील? बहुतेक कुठलातरी निर्मनुष्य कोपरा शोधतील आणि ....
ई ऽऽ गं बाई , आज काल कशाच काही राहीलं नाही. सगळं म्हणजे अगदी ऽऽ हं !"
तिने मानेला पुन्हा एकदा झटका देत आपली नापसंती व्यक्त केली.

आता या वाक्याला काही अर्थ होता का? पण कल्पनेच्या मनात विचार असेच यायचे , त्याला ती तरी काय करणार?
कधी कधी ती मनातील अशी असंबद्ध वाक्ये मोठ्याने बोलायची आणि मग आजुबाजूचे बुचकळ्यात पडायचे. तिचा नवरा, सुहास सुज्ञ पणे गप्प बसायचा .. पण नुकतीच कॉलेजकन्यका झालेली, आणि प्रश्न विचारणे हा तरुण पिढीचा हक्क आहे असे समजणारी, तिची मुलगी काही गप्प रहायची नाही.
"अगं आई कशाचं काय झालं? आणि ईऽऽ असं का ओरडलीस ?"
तिचं असं खोदकाम सुरू झालं कि कल्पना वैतागायची..
"हल्लीच्या मुलांना म्हणजे अगदी म्हणजे कशाचंच काहीच राहीलेले नाही."
परत एक निरर्थक वाक्यं.

कल्पनेचं हे असं पहिल्या पासूनच होतं.
एकदा काय झालं... ती शाळेत असताना तिला एक निबंध लिहायचा होता. कल्पनेने भरपूर मेहनत घेऊन तो लिहिला आणि ती बेहद्द खूष झाली. तिच्या मताने तो उत्कृष्ट होता. मग तिला वाटले, वर्गशिक्षिका बाई तो नक्की मुख्याद्यापिकांना वाचायला देतील. मग त्या आंतरशालेय निबंध स्पर्धेत पाठवतील. तिथे बक्षीस मिळालं कि सगळेजण कौतुक करतील, मग कुठल्यातरी साप्ताहिकात किंवा मासिकात लिहायचे आमंत्रण मिळेल, मग त्या जाई, लिली, केतकीचा जळफळाट होईल, आणि मग .. इ इ इ. पण गंमत म्हणजे निबंध अजून तिच्याकडेच, वहीमध्येच होता. यथावकाश तो बाईंनी वाचला. त्यांनी तिला १० पैकी ५ १/२ मार्कं दिले आणि शेरा होता "विषयाची मांडणी नीट करा". कल्पनेच्या सुखस्वप्नाचा चक्काचूर झाला आणि त्या बाई अर्थातच तिच्या नावडत्यांच्या लिस्ट मध्ये गेल्या. पण त्याची कोणीच विशेष दखल घेतली नाही.

असे अनेक प्रसंग घडत .. आणि अनेक वेळा तिला असाच निराशेचा सामना करावा लागे. कॉलेज मध्ये तिच्या विषयाचे, सायकॉलॉजीचे प्रोफेसर सांगत होते कि तुम्ही सायकॉलॉजिस्ट होऊन काय करू शकता? त्यांनी सांगितले खूप हुशार आणि यशस्वी माणसे देखील मानसशास्त्रज्ञांची मदत घेतात. अनेक शैक्षणिक संस्था मानसशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शनाकरता पाचारण करतात. मग त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि थोर शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली ..
झालं कल्पनेच्या विश्वात, कल्पना त्या थोर लोकांच्या रांगेत केव्हाच स्थानापन्न झाली होती. पण नेहमीप्रमाणेच याचा सुगावा कोणालाच लागलेला नव्हता. त्या मुळे सर्व तिला एका सर्वसामान्य मुली प्रमाणेचे वागवत असत. आणि कल्पनेला ते स्विकारणं फारच कठीण जाई.

कल्पनेने पदवी परीक्षा पास केली आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. यथावकाश तिचा विवाह देखील संपन्न झाला. राजा राणीचा संसार. सुहास (तिचा नवरा) सुद्धा तिच्या प्रमाणेच प्रोफेसर पण गणित विषयाचा. त्याला सुद्धा तिच्या या कल्पनाशक्तीचा प्रत्यय आलाच.
सुहास कॉलेज मधील सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असे. त्या वर्षी तो नाटकाचे दिग्दर्शन करत होता. त्यामुळे कॉलेज च्या वेळा व्यतिरिक्त बराच काळ त्याचा बाहेर जाऊ लागला.
कल्पनेच्या कल्पनांनी तिला भेडसावयाला सुरुवात केली. सुहास घरी आला, की तिची प्रश्नावली सुरू होई ..
"कुठे होती आज प्रॅक्टीस? कोण कोण काम करणार आहे नाटकात? खूपच उशीर झाला रे आज ... नाटकात काम करणाऱ्या मुलींच्या घरी चालते का? किती मुली आहेत तुमच्या नाटकात?
एक ना दोन .. हजार प्रश्न
सुहास शक्य होईल तेव्हढे शांतपणे उत्तरे देत राही .. पण कल्पनेचे समाधान झालेले नसे. तिला वाटे तो आपल्याला काहीतरी सांगत नाहीये.
शेवटी सुहास म्हणाला,
"तुला जर नाटकामध्ये इतका रस आहे तर तु सुद्धा का येत नाहीस प्रॅक्टीस बघायला? आवडेल बघ तुला"
ही कल्पना तिला फार आवडली आणि ती त्याच्या बरोबर दोन तीन दिवस प्रॅक्टिस बघायला गेलीसुद्धा. पण लवकरच तिला ते कंटाळवाणे वाटू लागले.
"तेच तेच संवाद कितीवेळा म्हणतात हे लोक? एकदा काय ते नीट पाठ करून घडाघडा बोलायचे ना? हम्म.. म्हणूनच इतका वेळ लागतो याला, बरोबर आहे." कल्पनेच्या मनात आले. तिला तिथे विशेष असे काहीच अढळले नाही, त्यामुळे हळू हळू नाटकाच्या प्रॅक्टीस मधील तिचा इंटरेस्ट संपला, आणि तिची प्रश्नावली देखील बंद झाली .
दरवेळी इतक्या सहजी प्रकरण संपेलच अशी खात्री नसे. पण तरीसुद्धा कल्पनाविश्वातून बाहेर पडण्यास कल्पना तयार नव्हती. प्रत्येकवेळी तीचा तिच्या कल्पनांच्या सत्यतेवर तिचा ठाम विश्वास असे. आणि अशा अवास्तव कल्पना करत राहणे चुकीचे आहे हेही तिला मान्य होत नव्हते.

तर अशी होती कल्पना. तिला सर्व काही जाणून घ्यायची फार हौस .. बरं जे कळले, त्याचे ती स्वतःच्या समजूतीनूसार अर्थ लावत असे आणि मग त्यातून काही वेळा भलताच अनर्थ होई ..

काल तिची सख्खी शेजारीण गीता तिच्याकडे आली होती. नुकतेच तिचे सासु-सासरे तिच्याकडे काही दिवस राहून, परत त्यांच्या गावी गेले होते. त्यामुळे तिच्या जिभेवर जणू सरस्वती अवतरली होती. तिचे एक एक अनुभव ऐकताना कल्पनेला पण तिचे अगदी तस्सेच अनुभव आठवत होते. मग दोघी मैत्रीणी अगदी रंगून गेल्या. बोलता बोलता गीता म्हणाली .. "अगं शेवटी मी इतकी वैतागले कि संजयला सांगितले, आता आणखी काही दिवस असेच चालले तर मी जाईन माझ्या आईकडे, नाही तर काय?"
खरं म्हणजे हे ती तिची मनोवस्था वर्णन करण्याच्या ओघात बोलून गेली होती. पण तेच नेमके वाक्यं कल्पनेच्या चांगलेच लक्षात राहीले.

नेहमीच्या सवयीने कल्पनेच्या मनात गीताचे कालचे बोलणेच घोळत होतेच.. आणि विचार करता करता ती एकदम म्हणाली -
"खरच जाईल का रे गीता घर सोडून?"
सुहासला काही संदर्भ लागेना,
"अगं काय बोलते आहेस ?" त्याने आश्चर्याने विचारले.
"अरे काल गीता सांगत होती ... " आणि मग गीताने सांगितलेले सगळे पुराण तिने सुहासला सांगीतले.
आता सुहासला कल्पनेच्या स्वभावाची चांगलीच कल्पना होती. पण ती सांगत असलेला विषय जरा गंभीर होता. आणि गीताचा नवरा संजय, त्याचा चांगला मित्र होता. त्यांच्या घरात असे काही घडावे ही जाणीव त्याला अस्वस्थ करणारी होती. पण तो लगेच काही बोलला नाही. कारण कल्पनेसमोर काही बोलणे म्हणजे अजून गुंतागुंतीला आमंत्रणच, हे तो जाणून होता. पण त्याने ठरवले- " संजयला याबाबतीत विचारायलाच पाहिजे .. त्याच्याशी नक्की बोलायचेच."

रविवारचा दिवस होता तो. सकाळी मंडईला जायचे निमित्त करून सुहास बाहेर पडला. त्याने संजयला पण बोलावले होते. कल्पनेला त्यात काही विषेष वाटले नाही. कारण बऱ्याच वेळा त्यांच्या सोसायटीतील काहीजण, सहकारी तत्वावर भाजी खरेदीकरता एकत्र मंडईमध्ये जात असत.
सुहासने संजयला कल्पनेने कथन केलेली सर्व कथा ऐकवली आणि म्हणला,
"संजय तु समजून घे, आणि गीतालाही सांग. इतकी वर्षे तुम्ही सुखाने संसार केला आणि आता असे काय? मुलांचाही विचार करा जरा .."
सुहासने सांगितलेल्या गोष्टी संजयला नविनच होत्या. "गीता असं कसं बोलली? आणि ते ही घरी काही न बोलता शेजारणीकडे जाऊन का बोलली असावी?" या विचाराने तो अस्वस्थ झाला होता.

... आणि संध्याकाळी दारावरची बेल वाजली. कल्पना आणि सुहास नुकताच चहा संपवून टी. व्ही बघत होते. संजय आणि गीता दोघेही आले होते. गीताच्या चेहऱ्यावरून ती बरीच रडली असावी असे वाटत होते. आल्याबरोबर ती म्हणाली,
"काय हे कल्पना? अगं तू माझी मैत्रीण, म्हणून किती विश्वासाने मी तुला माझ्या घरातल्या, मनातल्या गोष्टी सांगितल्या? आणि तु त्या सगळीकडे बोलत सुटलीस? अगं घरा घरात राग लोभ हे असतातच .. कुठे काही दुखावलेलं असतं, काही बोचलेलं असतं. पण ते सगळच, सगळ्यांसमोर बोलून दाखवता येत नाही, म्हणून तुझ्याकडे मी मन मोकळं केलं. तर त्यातून तु काय भलते अर्थ काढलेस? आणि कधी नाही ते आम्हा दोघांमध्ये भांडण झाले .."
कल्पनेला अगदी कसंनुसं होत होतं.
"अगं तुमच्यात भांडण व्हावं म्हणून नाही गं.. खरच मला तुझी काळजी वाटत होती. आणि तु म्हणलीस ना, कि तु आईकडे जाशील म्हणून?"
गीताने डोक्याला हात लावला,
"अगं बाई बोलताना अनेक गोष्टी बोलतो आपण .. पण त्या सगळ्या खरच करतो का? काही गोष्टी नुसत्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात बाई. तू तर मानसशास्त्र शिकवतेस ना? मग तुला एव्हढे तरी नक्की समजायला हवे होते. जायचच असतं मला घर सोडून तर तुझ्याकडे का बोलत बसले असते मी? आणि बाई गं, माझे सासु-सासरे त्यांच्या गावी जाऊन आठवडा उलटून गेलाय ना? तरी मी अजून घरीच आहे ना? मग ? "
कल्पनेच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागले ..
"काय हे ? माझ्या मूर्ख कल्पनांपायी, माझ्याच मैत्रीणीच्या घरात भांडण झाले आणि सगळ्यांना मनस्ताप झाला तो वेगळाच."
तिला कधी नव्हे तो स्वतःचा राग आला होता.
मग संजय समजुतीने म्हणाला
"असू दे, वाईट वाटून नका घेऊ वहिनी. तुमचा हेतू चांगलाच होता. आणि त्या निमित्ताने मला ही माझ्याच घरात काय धुसफुस चालू होती ते कळले. शेवट गोडच झाला."
संजय आणि गीता गेल्या नंतर सुहासने कल्पनेकडे नाराजीने पाहिले, आणि म्हणाला ..
"आता मात्र शर्थ झाली. तुझ्या या कल्पनाविलासामुळे आज काय परिस्थिती आली आपल्यावर? माफी मागायला सुद्धा तोंड उरले नाही."
कल्पनेला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे वाटले .. पण तितके तिचे पुण्यं कुठले?
पण आता मात्र तिने ठरवले, कि या कल्पनांना आपल्या विचारातून तडीपार करायचेच ..

कल्पना कॉलेजच्या स्टाफरुम मध्ये बसली होती. तिच्या कॉलेज मध्ये युनिव्हर्सिटीच्या परीक्षेचे केंद्र होते, त्या मुळे तिला लेक्चर नव्हते. पुस्तक वाचता वाचता आजुबाजूला काय चालू आहे हेही तिला कळत होतेच.
"देशपांडे सर किती वेळ फोनवर बोलतायत ?"
कल्पना स्वतः शीच बोलली.
"आणि काय म्हणाले ते ? आपण मॅनेज करू सारं? तुम्ही त्याला फक्त परीक्षा द्यायला सांगा ?
ऑ? म्हणजे काय मॅनेज करणार आहेत देशपांडे? अगं बाई, काहीतरी पाणी मुरतय खास. भागवत बाई आल्या की सांगूयात त्यांना. शी‌ऽऽ! शिक्षणासारख्या पवित्र पेशात हे असं?"
भागवत बाईंना हे कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी होईल? या कल्पनेने तिला हसू येऊ लागले. दोघी मिळून प्राचार्याना सगळे सांगूयात. मग बघू त्या देशपांड्यांचे काय होते ते? नाहीतरी आजकाल फारच... "
कल्पनेचे विचारचक्र चालू झाले होते ..
आणि हद्दपार केलेल्या कल्पनांनी परत तिचा ताबा घेतला होता.

***

(ही कथा इथे देखिल आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोष्ट छान आहे.

कोठल्या म्हणीची आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क. क. ची क.

कहाटेकहाटे किसाळलेली केकता क्कपूर कावली काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ... नाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

नाही ही कुठल्या म्हणीची म्हणून नव्हती लिहिली.

"राईचा पर्वत करणे" किंवा "डोंगर पोखरून उंदीर शोधणे" या म्हणी कदाचित चालू शकतील.
पण त्यात सुद्धा राई किंवा उंदीर अस्तित्वात असणे जरूरीचे आहे म्हणा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||