प्रस्तुत लेख हा आदरणीय सई केसकर ह्यांच्या सप्तशैय्या पॅटिस ह्या प्रस्तावित पदार्थाच्या रेसीपीची समिक्षा आहे.
आदरणीय सई केसकर
नुकतेच आपण प्रस्तावित केलेल्या सप्तशैय्या पॅटिस ह्या पदार्थाची पाककृती वाचण्यात आली. पाककृती आणि त्यासंबधीची शाब्दीक मुक्ताफळे चांगली आहेत. तुमचे लिखाण अगदी पु.ल. देशपांडे ह्यांच्या लिखणाइतपत चांगले नसले तरी चांगलेच आहे. (काही सदस्य 'रोचक' असा शब्द वापरतात परंतु तो वापरता येणे इथे अजिबात शक्य नाही पण तुम्ही तसेच काहीतरी समजा.) सप्तशैया म्हणजे काहीतरी 'लेअर्स'चा प्रकार असावा. चार लेअरची बिर्याणी, पाच लेअरचा केक, तसेच सात लेअरचे चांगले काहीतरी असावे. पण हा पदार्थ फक्त थिअरीमध्येच शक्य आहे असे दिसते.
आपल्या लेखात तुम्ही मध्यंतरी नाशिकमध्ये कुठेतरी उलटा वडापाव असा एक पदार्थ प्रसिद्ध झाला होता. असे म्हटले आहे. 'उलटा वडापाव' अश्या नावाचा कुठलाही पदार्थ नाशकात मिळत नाही. सतत युट्युब आणि इन्स्टाग्राम वापरुन डिजीफ्रेनीया झालेल्या मुलांनी त्या पदार्थाला दिलेले हे नाव आहे जे तो पदार्थ प्रत्यक्ष बनविणार्याच्याही गावी नाही. आपल्या कस्पटासमान आयुष्याला काही तरी अर्थ आणण्यासाठी कॉलेजची पोरे असे हॅशटॅग्ज बनवित असतात पण प्रत्यक्ष त्यांचा हा कॉन्फीडंट उथळपणा अर्ध्यावेळा वडापावच्या गाडीवरच उघडा पडतो.
तुम्ही ज्या पदार्थाचा उल्लेख करता आहात त्याला 'पाववडा' म्हणतात. पाव भिजवलेल्या बेसनपिठात बुडवून तळला की त्याचा पाववडा होतो. नाशकात वडापाव आणि पाववडा हे दोन पदार्थ गेली चाळीस वर्षे तरी मिळत आहेत आणि पुरेशी बौद्धीक क्षमता असणारे लोक पाववड्याला पाववडाच म्हणतात. देवळालीगाव शनिपार, सर्कल सिनेमा, मुक्तीधाम चौक, सिडको चौक ह्या ठिकाणी हा पदार्थ कित्येक वर्षे मिळतो आहे, त्याठिकाणचे विक्रेते पाववडा बनवितांना त्यात थोडी बटाट्याची भाजी भरतात जेणेकरुन तो अधिक रुचकर व्हावा. हा प्रयोग सगळेच करतात असे नाही, पाववड्यात थोडी बटाट्याची भाजी भरायलाच हवी असा नियम नाही, काही ठिकाणी ती सहजपणे टाकतात तर काही ठिकाणी नाही.
सुरक्षित लहानपणात वाढलेल्या तरुणांना 'पाववडा' फारसा माहित नसतो कारण तो वडापावपेक्षाही स्वस्त पदार्थ आहे. केवळ ह्या मुलांना ही माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नामकरण 'उलटा वडापाव' असे ठेवले आहे जेकी विक्रेत्यांना अजिबात मान्य नाही. स्नॅक्स सेंटरवाल्यांनी तरुणांच्या एका मोठ्या लोकसंख्येचा आठवडाभर अपमान केल्यास हा तिढा आपोआपच सुटेल असे वाटते. सध्या मी सोशल मिडीयावर नसल्याने तिथल्या चर्चेत सहभागी होउ शकलो नाही. तर तुम्ही हा प्रतिसाद हवा तर तिथे चिकटवू शकता, पण त्यापुर्वी....
तुम्ही सुद्धा बेकन ह्या महत्त्वाच्या पदार्थाचा उल्लेख डुक्कर असा केला आहे. डुक्कर हा एक पुर्ण प्राणी आहे तो मारल्यानंतर त्याच्या पोटाजवळच्या भागातले चर्बीयुक्त मांस अतिशय कलात्मकरित्या पातळ पातळ कापून त्याला स्मोक करुन बनविला जाणारा पदार्थ म्हणजे बेकन. अमेरीकेत किंवा अप्पर वरळी भागात स्थलांतरीत झालेल्या अनेक भारतीयांना बेकन अजिबात आवडत नाही तर काहींना ते प्रचंड आवडते. अमेरीकेतले काही स्थलांतरीत लोक बेकन हे जणू परमेश्वराच्या अस्तित्वातचा पुरावाच आहे असेही म्हणतात. हे जरा अतीच होत असते पण काहींसाठी बेकन खरोखरच तितके टेस्टी असु शकते.
तुमच्या पदार्थाची रेसीपी वाचतांना ती पहिल्या स्टेपमध्ये फक्त विनोद करु इच्छिते कारण त्यात एकच मटारचा दाणा आहे. त्यानंतरच्या दोन आणि तीन स्टेप्स तितक्याश्या वाईट/विनोदी/पुलेशु/अॅब्सर्ड/ नाहीत. फ्राईड बेकनबॉल्स असतात, फ्राईड बेकन बॉल्स विथ शेडर चिझ असू शकते (शेडर चीज म्हणजे आख्खी जर्सी गाय नव्हे), फ्राईड मॅश्ड पॉटेटॉ बेकन बॉल्स विथ शेडर चिझ असतात. तर इथपर्यंत आपण प्रपोज केलेला (प्रस्तावित केलेला) पदार्थ पोहचू शकतो. त्यानंतर तुम्ही थेट मॅगीवर आला आहात. पहिल्या तीन स्टेप्स न घेता ह्या एकाच स्टेपकडे निर्विकारपणे पाहिले तर त्यातुन मॅगी (रॅमीन नुडल्) एकत्रित करुन, त्याला गोल आकार देउन त्यापासुन हॅम्बर्गरचे आवरण २०१३ सालपासूनच बनविले जाते आहे असे मी आपल्या नजरेस आणुन देउ इच्छितो. केजू शिमामाटो ह्या जपानच्या ओसाका शहराजवळच्या खेड्यातल्या एका माणसाने रॅमीन बर्गर पहिल्यांदा बनविला आणि नंतर रॅमीनचा बर्गर फेमस झाला. अर्थात ह्या प्रकरणाची प्रसिद्धी करण्यासाठी लागणारी क्रियेटीव्हीटी त्याच्याकडे होती, पाववड्याला नुस्ताच उलटा वडापाव म्हणण्याइतपत तो आळशी नव्हता.
पदार्थाच्या चौथ्या थरापर्यंत आल्यावर मात्र चटकन स्टिव्हन पिंकर हे अर्थतज्ञच आठवतात, इथे वाचणार्याची सहनशक्ती संपू शकते, हा पदार्थ बनविण्याचे धाडस करणार्यासही ह्या स्टेपवर आल्यानंतर जीवनमृत्युच्या अगाध प्रश्नांची उत्तरे शोधावीशी वाटू शकतात, रुपर्ट मरडॉकने मायस्पेस.कॉम ही कंपनी का विकत घेतली होती ह्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकते. तुमच्या पदार्थाच्या पाचव्या थरात आलेले जिन्नस आणि ते आवडणारे लोक ठिकठिकाणाच्या पर्यटनस्थळांवर दिसुन आले आहेत. ही सतत फरसाण खाणारी माणसे हा दिर्घ संशोधनाचा विषय असल्याने त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तर लिहता येईल.
पदार्थाच्या पाचव्या थरापर्यंत पोहचल्यावर चौथा थर निरपेक्षरीत्या पाहिला असल्याने त्यातुन पुढे सहाव्या आणि सातव्या थराकडे जाता येउ शकते. पण आधीचे टप्पे लक्षात घेतल्यानंतर पदार्थविज्ञानचे नियम पाळत तिथपर्यंत जाणे माणसाच्या प्रजातिला तुर्तास शक्य आहे असे दिसत नाही. ह्याकामी कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत निश्चितच घेतली जाउ शकते, पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात इतर मोठमोठी अर्थहीन कामे चालली असल्याने हा पदार्थ तुर्तास कुणी अभियंता मनावर घेईल असे दिसत नाही. त्यामुळे ह्या पदार्थाची चौथी शैय्या (पदर/लेअर/आवरण), हीच कापरेकर स्थिरांकासारखी स्थीर शैय्या म्हणून मानन्यात यावी अशी विनंती करतो. स्थीरशैय्या ह्या शब्दाचे दुसरे अर्थही निघू शकतात त्यामुळे हा शब्द उद्या एखाद्या मराठी शब्दकोषात सामाविष्ट करायचा असल्यास तो कुठल्या अर्थाने किंवा कुठकुठल्या अर्थाने घेतला जावा ह्यासंबधी थोडा तिढा आहे पण यथावकाश हा तिढा सुटेल अशी अपेक्षा करुयात.
आपण आपल्या लिखाणाने मराठी भाषा अशीच समृद्ध करीत रहाल अशी अपेक्षा आणि पुढच्या पदार्थसंशोधनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
उलटा वडापाव
सर्वप्रथम पुण्याची असूनही मी तुमची माफी मागते. कारण नाशिकच्या पाववड्याला उलटा वडापाव म्हणून मी तुमच्या भावना दुखावल्या कदाचित. मी पुण्याची आहे हे मी सांगितलं आहेच. पण फेसबुक आणि फेक न्युजमुळे माझा खऱ्या जगाशी संपर्क जवळपास तुटलेला आहे. त्यामुळे माझ्या स्क्रीनवर दिसेल ते खरं मानायची सवय मला लागलेली आहे. अर्थात तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे का हे बघायला मी नाशिकच्या एखाद्या मैत्रिणीला फोन करू शकले असते. पण मी यूट्यूबवर गेले. आणि हे पहा:
https://youtu.be/AonR9LnlrlM
हेबर्स किचन (जी ऑस्ट्रेलियात असते आणि तिथून तिचा चॅनल चालवते) सुद्धा याला उलटा वडापाव म्हणते आहे. हे बघून मला कमी अपराधी वाटलं.
पहिल्या चार थरांनंतर मी थांबायला हवं होतं हे अगदीच मान्य आहे. पण मी पाककृतीचं नाव आधी ठरवलं होतं. आणि मग त्या नावाला साजेसा रतीब घालत राहणं क्रमप्राप्त होतं. हल्ली माझ्यासारख्या फेसबुक्या लेखिका असंच लेखन करतात. कारण वर म्हणल्याप्रमाणे खऱ्या जगाशी काही संपर्कच उरलेला नसतो. :D
बाकी माझी पाककृती इतक्या बारकाईने वाचल्याबद्दल अनेक आभार. कधी पुण्यात आलात तर घरी जेवायला या. ही पाककृती कशीही असली तरी मी स्वयंपाक बरा करते. :D
अंमळ चुकतेय तुमचे!
'खरे जग' असे काही असते काय?
बाकी...
संबंधित सद्गृहस्थ पुण्यात टपकण्याची शक्यता सुतराम् नाही, याची खात्री दिसते...
आभार
आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी आपले आभार. तुम्ही पुण्याच्या असुनसुद्धा माफी मागता आहात ह्याचा अर्थ आपले हृदय विशाल आहे असे म्हणता येईल. पण सरासरीपेक्षा हृदयाचा आकार जास्त वाढणे है वैद्यकीयदॄष्ट्या फारसे श्रेयस्कर नसते त्यामुळे आपले हृदय नॉर्मलच आहे असे म्हणतो पण आपली प्रतिक्रीया एखाद्या विशाल हृदयाच्या माणसासारखीच आहे. मी शहरवादी नाहीये. मॅक्डॉनल्ड्सच्या शेअरहोल्डरास, रत्नांग्रीच्या सुपारीच्या व्यापार्यास आणि अॅस्ट्राझिनकाच्या मालकास शहरवादी असुन चालत नाही त्यामुळे आपण सर्वांनी 'हे विश्वची माझे मार्केट' ह्या तत्त्वाला अनुसरणारी भुमिका घेतली पाहिजे. मी नुकतीच कोथरुडात प्रतिज्ञा हॉल येथे भाड्याची खोली घेतली असुन त्या खोलीच्या धुम्रपुजेनंतर लकडी पुलावरील अलिकडच्या स्नेह्यांना भेटायला जाणार आहे. ह्यात आधीच्या दोन जेवणाच्या आमंत्रणाचा समावेश आहे आणि आपले आमंत्रण तिसरे जे मी स्विकारतो आहे. तीस दिवसातल्या तीन दिवसांच्या जेवणाची सोय अशी स्नेहाने होतांना पाहून माझ्यातल्या भाडोत्री पुणेकरांस अल्पसे गलबलुन आले आहे. ही भावना नेमकी काय आहे हे फक्त स्थानिक पुणेंकरासच समजून येउ शकते.
आपल्या प्रतिसादानंतर काही कळीचे प्रश्न उपस्थीत झाले आहेत. ज्या प्रश्नांची एक एक करुन उत्तरे देण्यासाठी मी आगामी दिवसात काही वेळ काढण्याचा प्रयत्न करणार आहे, लवकरच लिहीन.
धन्यवाद
आपला कृपाभिलाषी
काही बोलले नाही, तरी इथे चालते, त्यामुळे...
...काही लिहीत नाही.
(तसेही आवर्जून लिहिण्याच्या लायकीचे लेखात फारसे काही नाहीये, म्हणा. कदाचित तेवढा तो 'स्थिरशय्या' शब्दावरून विनोद करण्याचा प्रयत्न वगळला, तर; शुद्धलेखन बी डॅम्ड. मग उगाच कष्ट का घ्यावे?)
(प्रश्न एवढाच उरतो, की आमचा प्रतिसाद जर लिहिला नाही तरी चालण्यासारखा असेल (आणि, आय डेअरसे तो तसा आहे!), तर मग ज्या लेखाला तो दिलाय, त्या लेखाला काय म्हणाल? असो चालायचेच.)
(जाता जाता, ठळक मतभेदाचा एक(च) मुद्दा:
'आज मी (गुडलकमध्ये जाऊन) कोंबडी खाल्ली' असे जेव्हा कोणी म्हणते, तेव्हा संबंधित सद्गृहस्थाने आख्खी कोंबडी खाल्लेली असते काय? नाही! बहुतेक वेळा कोंबडीची (एकच) तंगडी आणि/किंवा (एकच) वक्षस्थळ खाल्लेले असते! (कोंबडीचे फक्त यकृत किंवा फक्त बोटे किंवा फक्त म्हशीचे पंख खाणारा 'आपण कोंबडी खाल्ली' असे सहसा म्हणणार नाही. मात्र, कोंबडीची (एकच) तंगडी आणि/किंवा (एकच) वक्षस्थळ खाणारा तसे म्हणू शकतो! (हे भाषेचे दौर्बल्य की सामर्थ्य, ते तुम्हीच ठरवा!) म्हणजे, कोंबडीची (एकच) तंगडी आणि/किंवा (एकच) वक्षस्थळ हे आख्खी कोंबडी म्हणून क्वालिफाय होऊ शकते, परंतु बोटे किंवा म्हशीचे पंख (आख्खी कोंबडी म्हणून क्वालिफाय) होऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष यावरून काढता यावा काय?)
(पिसे, चोच वगैरे (अभक्ष्य) अवयवांचा तूर्तास विचार केलेला नाही.)
'आज मी बोकड खाल्ला' म्हणणाऱ्याने तर (कोंबडीच्या तुलनेत) तेवढेदेखील खाल्लेले नसते.
(फॉर्दॅट्मॅटर, 'आज मी कोंबडी खाल्ली' आणि/किंवा 'आज मी बोकड खाल्ला' म्हणणाऱ्या/रीस (बहुतेक वेळा) आपल्या भक्ष्याच्या लिंगनिदानाचा कोणताही खात्रीलायक मार्ग उपलब्ध नसतो. तरीही तो/ती असा लिंगवाचक उल्लेख इतक्या छातीठोकपणे कसा/शी करू शकतो/ते?)
उर्वरित लेख आवर्जून वाचण्याचे कष्ट घेण्यासारखा वाटला नाही, सबब तपशिलात वाचला नाही, सबब मतभेदाचे इतर मुद्दे नाहीत; सहमती तर नाहीच नाही. त्यामुळे, अधिक लिहीत नाही. (लिहायचे नाही म्हणत असतानासुद्धा एवढे लिहिले, हेच पुष्कळ झाले.) असो चालायचेच.)
अतिशय महत्त्वाचा प्रतिसाद
आदरणीय न'वी' बाजू आपली प्रतिक्रीया वाचण्याचा प्रयत्न केला. ती एरव्ही अतिशय सुलभ आहे असे वाटतेय पण शब्दांकडे न पहाता एकुण प्रतिक्रीयेच्या चौकटीकडे पाहिल्यास तीच्यात खुप कंस आहे असे लक्षात येते. मी गणित ह्या विषयात ७५ पैकी ४५ पेक्षा कधीही जास्त मार्क पाडलेले नसल्याने आपला प्रतिसाद हा मला 'ड' गटातल्या प्रश्नांसारखा दिसतोय. गणिताचा पेपर सोडवित असतांना मला ड गटांतले प्रश्न खुप खुणवायचे पण मी ते सोडवु शकत नसायचो कारण त्यात खुप कंस असायचे. कंसयुक्त समिकरणे आणि कंसयुक्त लिखाण हे त्यामुळे मला नेहमीच आदरणीय वाटत आले आहे. ( असेच काहीसे ट्रिग्नॉमेट्रीचेही आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी). असो. आपल्या प्रतिसादाकडे एक लिखीत साहित्य म्हणून न पहाता स्क्रीनशॉट घेउन त्याच्याकडे एक सलग चित्र म्हणून पहाण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यातुन काहीतरी निष्पण्ण होईल अशी आशा वाटते.
धन्यवाद
हा हा हा...
राहुलला ट्रोल करण्याबद्दल सईचं अभिनंदन. ह्या कर्तबगारीबद्दल मी तिला ओवाळून, तिला पावभाजी खायला घालायला तयार आहे. (मात्र तिखट, मिरची वगैरे तिला आपापले आणावे लागतील.)
राहू द्या
राहू द्या हो, (बन) सोडा हो! असे शाब्दिक पीजे करण्याची उर्मी केवळ अशा लेखांमुळेच येते.
अयसा कयसा चलेगा!
राहू(ल) द्या ना हो... हे सुटलं!
उगाचंच
भलामोठा कोबी घेऊन आतून पोखरून जे जे मनापासून आवडेल ते ते व्हेज नॉनव्हेज काहीही कोबीच्या आत कोंबून वरुन ऑलिव्ह ऑईलचा शिडकावा करून मायक्रोवेव्ह मध्ये कूक करून कलिंगडाचे काप करतात तसे खावे.
:-) ;-)
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)