आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'थर्टी नाइन स्टेप्स’

Thirty Nine Steps/Dir: Alfred Hitchcock/Britain/1935/100 minutes/B&W

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांची मनं रिझविण्यासाठी चित्रपट व्यवसायाच्या अगदी प्रारंभीच्या काळापासून प्रयत्न केले जात होते. जेव्हा चित्रपट मुके होते तेव्हासुद्धा देहबोली, मूकाभिनय (व माकडचेष्टा!) करत प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात हे मूकचित्रपट घेऊन जात होते. मूकचित्रपटातील आशय समजून देण्यासाठी चित्रपटाच्या अधे-मधे वाक्यं लिहिलेले पाट्यासुद्धा झळकत होत्या. व हे वाक्य लिहिणेसुद्धा येरा गबाळाचे काम नव्हते.

जेव्हा चित्रपट बोलू लागले तेव्हा तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आकाश मोकळे झाल्यासारखे या क्षेत्रातील व्यावसायिकांना वाटू लागले. हास्य चित्रपटाबरोबरच अद्भुतरम्य चित्रपटांची सद्दी आली. या अद्भुततेला कोंब फुटल्यासारखे प्रेक्षकांना खिळवून टाकणाऱ्या भयपटांनीसुद्धा चित्रपटसृष्टीला फार मोठे योगदान दिले. ज्या प्रकारे चार्ली चॅप्लिनसारख्या प्रतिभावंताचे नाव हास्यचित्रपटांच्या संदर्भात घेतले जात होते त्याचप्रकारे ‘थर्टी नाइन स्टेप्स’ या अप्रतिम चित्रपटाचे दिग्दर्शक ऑल्फ्रेड हिचकॉकचे नाव भयपटांच्या संदर्भात घेतले जाते. केवळ भयपटच नव्हे तर, पलायनवादी चित्रपटांची मुहूर्तमेढ हिचकॉकनीच रोवली असेही म्हटले जाते. चित्रपटाची भाषा काय करामत करून दाखवू शकते याचे पूर्ण ज्ञान असलेल्या या दोन्ही फिल्म मेकर्सनी एक काळ गाजविला होता हे आपण विसरू शकत नाही. अती सामान्य वाटणाऱ्या प्रसंगांतूनच अद्भुततेचा आभास देणाऱ्या त्यांच्या कलाकौशल्याचा जितके कौतुक करता येईल तेही कमी वाटेल. एवढेच नव्हे तर काही विशेष प्रसंगांची निर्मिती करून प्रेक्षकांची मती गुंग करण्यात हे दिग्दर्शक आपल्यातील सर्जनशीलतेची चुणुक त्याकाळी दाखवत होते.

1897मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेला हिचकॉक काही काळ जर्मनीतील एका स्टुडिओमध्ये चित्रपटविषयक प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतला. 1926मध्ये त्यानी त्याचा पहिला-वहिला चित्रपट ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मूकचित्रपट म्हणून या चित्रपटाची शूटिंग चालू करत असताना चित्रपटाला शब्दांची जोड देण्याचे तंत्र नुकतेच उपलब्ध झाल्यामुळे हिचकॉकचा हा चित्रपट इंग्लंडचा पहिला बोलपट म्हणून गणला जातो. 1924 ते 1938 या काळात त्यांनी सहा चित्रपटांची निर्मिती केली. या सहा चित्रपटात 1935 साली दिग्दर्शित केलेला ‘थर्टी नाइन स्टेप्स’ हा चित्रपट आहे. 1939मध्ये त्यांनी इंग्लंडहून अमेरिकेला स्थलांतर केल्यानंतर पुढील सर्व चित्रपट अमेरिकेतच निर्माण झालेले आहेत. अमेरिकेतील त्याचे चित्रपट अवाढव्य खर्च करून तयार केलेले आहेत. परंतु ‘थर्टी नाइन स्टेप्स’ मात्र कमी खर्चात असूनसुद्धा हिचकॉकच्या इतर गाजलेल्या सर्व चित्रपटातील वैशिष्ट्यं असलेली ही कलाकृती आहे.

xxx थर्टी नाइन स्टेप्स हा चित्रपट 1915साली प्रकाशित झालेल्या जॉन बुचन या लेखकाच्या साहसी कथेवर बेतलेला आहे. यात त्याकाळचे आघाडीचे नट रॉबर्ट डोनट व नटी मॅडेलिन कॅरोल यानी काम केले आहे. डोनट कॅनडाहून लंडनला काही दिवसासाठी येतो. एका थिएटरमध्ये ऑर्केस्ट्राबरोबर काही मजेशीर खेळ दाखविले जात असतात. तेथे तो खेळ बघण्यासाठी जातो. स्टेजवर एक जण प्रेक्षकांनी कुठलेही प्रश्न विचारले तरी ताबडतोब उत्तर देणारे मेमरीचा खेळ तो बघत असतो. हे चालू असताना पिस्तूल झाडल्याचा आवाज आल्यामुळे प्रेक्षक सैरावैरा इकडे-तिकडे पळू लागतात. डोनटच्या शेजारी असलेली एक महिला त्याला एका रात्रीसाठी त्याच्याकडे मुक्काम करण्याची विनंती करते. कारण विचारल्यावर ती एक गुप्तहेर असून इंग्लंडमधील गुप्त कागदपत्रे चोरणाऱ्या दुसऱ्या एका गुप्तहेर टोळीचे गुप्तहेर तिच्या जीवावर उठलेले आहेत, असे ती सांगते. तो तिला घरातील एका खोलीत आश्रय देतो. गप्पांच्या ओघात या स्पाय टोळीचा मुख्यस्थ स्कॉटलंडमध्ये आहे असे ती सांगते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास ती घाबरत, घाबरत थर्टी नाइन स्टेप्स.... करंगळी तुटलेला... असे म्हणत जीव सोडते. कारण तिच्या पाठीत कुणीतरी चाकूने भोसकलेले असते. डोनट घाबरून पोलीस व तिचा खून केलेले गुप्तहेर यांच्यापासून लांब पळून जाण्यासाठी एका खेड्यात लपून राहण्यासाठी जातो. रेल्वेतून प्रवास करत असताना मारेकरी डब्यात चढतात. त्यांना चुकविण्यासाठी एका कुपीत शिरतो व तेथे एकटीच प्रवास करत असलेल्या मॅडेलिनमुळे तो वाचतो. व तो त्या गुप्तहेरांच्या तावडीतून सुटून एका मोठ्या घरापाशी जातो. तेथे पार्टी चालू असते. हाही एक गेस्ट समजून त्याला खायला प्यायला दिले जाते. त्या पार्टीचा यजमान त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतो. एका निसटत्या क्षणी हा यजमान त्याला आपले हात दाखवत असताना त्याची करंगळी तुटलेली आहे, हे त्याच्या लक्षात येते. हाच गुप्तहेरांचा मुख्यस्थ असावा असे संशय आल्यामुळे तो तिथून पळ काढतो. त्याच गावातील एका शेतकऱ्याला रात्रीपुरते राहण्यासाठी जागा मागतो. हा शेतकरी फार संशयखोर असतो. त्याची बायको डोनटबरोबर पळून जाईल म्हणून तो पाळत ठेवतो. रात्री बायको काही निमित्ताने त्याच्याशी बोलत असताना तो पोलीस स्टेशनला फोन करतो. बायको त्याला तेथून निसटून जाण्यासाठी मदत करते. नवऱ्याचा जाडजूड कोट देऊन त्याला मागच्या दरवाज्याने पाठवते. तरी शेवटी मारेकरी त्याला गाठतात व त्याच्यावर गोळी झाडतात. परंतु ती गोळी खिशातील त्या शेतकऱ्याने ठेवलेल्या बायबलमधील प्रार्थनेच्या पुस्तकाला लागलेली असते. त्यामुळे तो वाचतो. पोलीस त्याच्यावरील खुनाच्या आरोपामुळे त्याला जेलमध्ये कोंडून ठेवतात. हा तेथून एका हातात बेडी घातलेल्या अवस्थेत निसटतो. त्याची गाठ रेल्वेच्या डब्यातील त्या तरुणीशी पडते. तो तिला आपण निरपराधी आहोत हे पटविण्याचा प्रयत्न करतो. तिला व त्याला पोलीस पकडून नेतात. वाटेत हिमवर्षावामुळे त्यांच्या गाडीला अपघात होतो. डोनट त्या तरुणीला घेऊन पळून जातो. पिस्तूलचा धाक दाखवून एका हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून दोघे तेथे राहतात. परंतु तेथेही मारेकरी पोचल्यामुळे तेथून दोघेही पळून जातात. तिला त्याच्यावर विश्वास बसतो. व त्या महिलेच्या खुनाचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते दोघेही शोध घेण्याचे ठरवतात.... अशा प्रकारे पुढे चित्रपट सरकत सरकत सुखांतापर्यंत पोचतो.

हिचकॉक ह्याच्या चित्रपटांचा केंद्रबिंदू खून किंवा हेरगिरी असा होता. त्यांत लबाडी, कपट, फसवणूक यांबरोबरच गैरसमजुतीतून उद्भवणारे प्रसंग आणि गुंतागुंतीच्या कटकारस्थानांनी गोवलेले कथानक असे. रहस्य तीव्रतर करून अखेरपर्यंत प्रेक्षकाला त्यात गुंतवून ठेवण्याचे अप्रतिम तंत्र त्याला साधले होते. यासाठी तो छायाचित्रणात नवीन उपक्रम व तंत्रांचा वापर आणि परिणामकारक ध्वनिमुद्रण (विशेषतः आवाजाचा पट्टा कमी-अधिक) करीत असे. कधीकधी त्याला ओढून ताणून आणलेल्या विनोदाची झालर आणि प्रासंगिक भेसूर गुंतागुंतीच्या दृश्यांची जोड असे. धक्कातंत्र वापरून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत असे. याच चित्रपटात अर्धे-अधिक चित्रपट संपत असताना मुख्य नटच गोळी लागून मरतो. अशा प्रकारच्या धक्कातंत्रामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळतो व पुढे काय होणार याची वाट बघू लागतो.

हिचकॉक ह्याच्या चित्रपटांतील कथानकात प्रामुख्याने तीन विषय-प्रकार आढळतात. एक, साधारणपणे सर्व चित्रपटांत आढळणारा विषय म्हणजे एखाद्या निष्पाप व्यक्तीला गैरसमजुतीच्या घोटाळ्यात अडकवून त्याची ससेहोलपट करून अखेर तो सच्चा माणूस म्हणून सादर करणे. दोन, अपराधी स्त्री मुख्य नायकाला जाळ्यात अडकवून एकतर त्याचा नाश करते (वा त्याला संपविते) किंवा तिला तो गुन्हेगारी जगतातून बाहेर काढून वाचवितो आणि तीन, मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींवर आधारित बेतलेले कथानक.

हिचकॉक याने दि लेडी व्हॅनिशेस (1938), रेबेका (1940), स्पेलबाउंड (1945), दि मॅन हू न्यू टू मच (1956) व्हेर्टिगो (1958), नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट (1959), सायको (1960), दि बर्ड्स (1963), मॅर्नी (1964) फ्रेंझी (1972) इत्यादी पन्नासहून अधिक रहस्यमय चित्रपटांचे दिग्दर्शन केले व सुमारे 200 दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती केली. ऑक्टोबर 1955 मध्ये 'आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट्स’ ही त्याची मालिका अमेरिकेत दूरदर्शनवर अतिशय गाजली. त्याने त्याच वर्षी वीस दूरदर्शन मालिका तयार केल्या. त्यांतून स्वतः भूमिका केल्या.

कॅलिफोर्नियातील बेल एअर येथे त्याचे 1980 साली निधन झाले.

चित्रपटासाठी येथे क्लिक करावे

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet