राधेश्यामी

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLW3AuwkTiPTUPolnWeO_skM9Bw8QF1erTYsTevcZ_IGAXZ-gsrq9xN7xulc5JovSuXxtPIxoRRsCQv-tSS5ajiCH3wDmMM4454reMP5DafL5SVcuSKjXmfQ6Y9Jsg3MZ0lTFEgaykBKaxcl8VNtL4phEA=w181-h279-no?authuser=0
.
https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्‍या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.
फार विदारक चि त्रण आहे या परित्यक्तांचे, विधवांचे, त्यांना म्हणतात राधेश्यामी. चांगल्या घरातून आलेल्या पण आता पार दारिद्र्य, दुर्दैवात खितपत पडलेल्या या स्त्रिया आहेत, काहींना कोड उमटले आहे व त्यामुळे वाळीत टाकलेले आहे, काही विधवा झालेल्या आहेत. १५-१५ वर्षाच्या मुली विधव आहेत ज्यांचे लैंगिक शोषण होते. या मुलींना मिर्गी म्हणजे आकडीचे झटके येतात. कदाचित त्यामुळे टाकून दिलेले आहे. या स्त्रिया, मंदीरांमागे, गवताच्या, वेता-बांबूच्या झोपड्या झोपड्यात रहातात. अनेक मंदीरे आहेत पैकी वेगवेगळ्या मंदिरांत त्यांची भीकेकरता वर्णी लागते. कधीकधी त्या मंदीराच्या पायर्‍यांवरच, अन्नाची, पैशाची वाट पहात झोप लागते.
सडलेली भाजी खाउन त्या गुजराण करतात. यमुनेच्या तीरावर कलिंगडांचे (खरबूज) बरेच पिक येते. पैशाला २०-२० मिळतात तेव्हा त्या फक्त कलिंगडे खाउन रहातात.
या सर्व स्त्रिया एक कामना मात्र असोशीने धरुन आहेत - आपले शास्त्रोक्त क्रियाकर्म व्हावे. इथे दलाल आहेत. मुडद्याचे शास्त्रोक्त कर्म करणारे दलाल. बरेच जण तर त्या म्हातार्‍यांच्या शवाला ओढत नेउन यमुनेतच फेकतात पण कोणीतरी कदाचित कधीतरी कर्म करेल म्हणुन या म्हातार्‍या स्त्रिया, त्या त्या दलालची फुटकळ कामे नोकरासारख्या करुन देतात. मात्र त्या मेल्यावरती त्यांच्याभोवती अशा दलालांचा झुंडच उगवतो का तर एखादा सोन्याचा दात मिळेल, कनवटीला लावलेला चांदीचा दागिना मिळेल आदि.
या सदान कदा भुकेल्या स्त्रियांना कादंबरीत प्रेतात्मे म्हटलेले आहे व एक फार भयंकर प्रसंग चित्रित केलेला आहे. जेव्हा एकट्या स्त्रीला पाहून हा झुंड तिच्यावर झडप घालतो, त्यांना काय हवे असेल? कदाचित सोने. कदाचित नुसता एक स्पर्श - ते काही कळले नाही पण नायिका त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटते.
-------------------------------
इंदिरा गोस्वामी या लेखिका आहेत मग अर्थातच त्यांच्या संदर्भात वाचनास उद्युक्त झाले. या आसामी लेखिका असून ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आयुष्यभर 'डिप्रेशन' व्याधीने या लेखिका ग्रस्त असल्याचे वाचण्यात आले. आता ही माहीती इथे देण्याचे कारण हेच की अतिसंवेदनशीलता जी की या कादंबरीतून डोकावत रहाते. आपण जे प्रसंग पाहून सहज विचारांआड टाकून पुढे सरकू शकतो तेच प्रसंग संवेदनशील , भावुक मनाच्या व्यक्तीला त्रासदायक होतात/होउ शकतात, हाँट करु शकता आणि त्यातून मग या कलाकृती जन्माला येतात.
कादंबरी वाचताना, वृंदावनमध्ये फिरुन आल्यासारखे वाटते , इतके सुंदर वर्णन आहे. जिकडेतिकडे ऐतिहासिक, धार्मिक संदर्भ येत रहातात. गजनीने आक्रमण करुन, केलेली लूट व उध्वस्त केलेली शिल्पे डोळ्यांसमोर येतात तर कधी "मंदिर तोडा, मस्जिद बांधा' चे नारे देणारे , कधी तिथून आक्रमणांना घाबरुन पूर्वी पळून गेलेली लोकं ज्यांना चित्ते-तरस असलेल्या जंगलांचा आश्रय घ्यावा लागलेला - असे लोक. तर कुठे तो वटवॄक्ष दिसतो ज्याखाली तुलसीदासांना रामाने दर्शन दिले.
वृंदावनचे समाजदर्शन तर या कादंबरीतून, घडतेच अर्थात. तेथील मूर्तिकारांचे पोट अवलंबून असणारा अष्ट्धातूंच्या मूर्तिचा व्यवसाय, तर तेथील पंडे, स्ट्रीटस्मार्ट गाईडस. काही परंपरा - मदनोत्सव, राधाष्टमी आदिंचे तेथील उ त्सवी वातावरण. जत्रेतले खेळ. प्रत्यक्ष मंदिरांमध्ये होणार्‍या स्पर्धा, यमुनेची रुपे.
------------
वाचकाला काय मिळेल ते प्रत्येकाच्या झोळीवरती अवलंबून आहे. मला हे वेगळे जगाचे रुप पाहून, जरुर धक्का बसला. खरं तर सुन्न व्हायला होते. ईश्वराच्या प्रांगणात चाललेला हा दुर्दैवाचा बाजार प्रचंड काटा आणतो अंगावर आणि त्याहूनही वाटते "आपण काय केले म्हणुन या सगळ्यातून वाचलो? एक चांगले आई-बाप, कुटुंब आपल्याला मिळाले यात आपले कर्तुत्व काय?" फक्त एक happenstance? योगायोग? अचानक नियतीवादाचे विराट रुप असे समोर दिसते व खूप त्रास होतो.
--------------
ही कादंबरी विलक्षण पकड घेणारी आहे . जरुर वाचा

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet