सिनेसंगीताच्या अनोख्या जगामध्ये...

गाणं आवडत नसेल असा माणूस विरळाच. गाण ऐकणं आणि गुणगुणणं हे बहुतेकांना आवडतं. गाण्याची उपजत आवड असणारे पुष्कळ असतात आणि आपल्यावर संस्कार करून घेत आपल्या रसिकतेची कक्षा रुंदावणारेही पुष्कळ असतात. गाणं साऱ्या खंडामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. मानवी जगण्याला इतकी लगत चिकटलेली, सातत्याने चिकटलेली कला दुसरी क्वचितच कुठली नसेल....
--- नवे सूर अन् नवे तराणे या पुस्तकाच्या पान चारवरून

नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार, जोडीला नवे तंत्र, नवे मंत्र – या साऱ्यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात बदलून टाकले चित्रपटसंगीताचा चेहरा. आपल्या आसपास रुंजी घालणाऱ्या या तरुण गाण्याविषयी एका सर्जन रसिकानं मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
--मलपृष्ठावरून

photo 1 डॉ आशुतोष जावडेकर या चित्रपट संगीत रसिकाने लिहिलेले नवे सूर अन् नवे तराणे या पुस्तकाद्वारे वाचकांना सिनेसंगीताच्या कालपटाची रोमहर्षक सफर घडवून आणली आहे. येथे आपल्याला या क्षेत्रातील अनेक जुने-नवे दिग्गज भेटतात. त्यांच्या कर्तृमकर्तृत्वाची आपल्याला ओळख होते. व या बेभरवश्याच्या क्षेत्रात नाव कमवण्यसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची, बौद्धिक श्रमाची आपल्याला कल्पना येते. के.एल. सैगल, नूरजहाँ, आर.सी. बोराल, शमशाद बेगम, देविका राणी, अशोक कुमार, शांता आपटे, के. सी. डे, गुलाम हैदर, सुरेंद्र, सुरैय्या, पंकज मलिक, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, जयदेव, शंकर जयकिशन, ओ.पी.नय्यर, मदन मोहन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, के. दत्ता, रवी, स्नेहल भाटकर, वसंत देसाई, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल इ.इ. जुन्या जाणत्या गायक/गायिका व संगीतकारांची येथे आपल्याला लेखक भेट घडवतात. त्याचप्रमाणे नव्वदी नंतरच्या दशकातील सिनेसंगीत क्षेत्रात चमकलेले (व चमकत असलेले) ए. आर. रेहमान, इलायराजा, एम एस क्रीम, हॅरिस जयराज, जतिन-ललित (पं जसराजचे पुतणे), नदीम श्रवण, अनू मलिक, उत्तमसिंग, राम-लक्ष्मण (खरे नावः विजय पाटील), राजेश रोशन, संदीप चावटा, शंकर महादेवन-एहसान-ल़ॉय (SEL), हिमेश रेशमिया, पार्श्व संगीतकार सलीम सुलेमान, प्रीतम चक्रवर्ती, माँटी शर्मा, आदेश श्रीवास्तव, संदेश शांडिल्य, विशाल (दादलानी)-शेखर(रावजिया), शंतनू मोईत्रा, नुसरत फतेह अलीखाँ, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, उदित नारायण, शान, सोनू निगम, सुखविंदरसिंग, मोहित चौहान, कैलाश खेर, अलिशा चेनॉय, महालक्ष्नी अय्यर, जसविंदर नरुला, वसुंधरा दास, चित्रा, आकृती ककर, शिल्पा राव, झुबिन, नरेश अय्यर, कुणाल गांजावाला, रेमो फर्नांडिस, अदनान सामी, इला अरुण, शुभा मुद्गल, कविता सेठ, बेला शेंडे, वसंत देसाई, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, श्रीधर फडके, भास्कर चंदावरकर, डॉ. सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, अजय-अतुल इत्यादींच्या चढउताराबद्दल, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सर्जनशीलतेबद्दल भरभरून लेखक सांगू इच्छितात. साठ-सत्तरच्या काळातील दहा-पंधरा कलाकारांची मक्तेदारी मोडून या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविण्याच्या प्रयत्नांना लेखक मनभरून दाद देतात व वाचकांना हे सर्व समजून घेण्यासाठी प्रेरित करतात. नावांची ही यादी वाचूनच वाचक भारावलेल्या अवस्थेतच पुस्तक वाचून संपवतो.

१९१३साली चित्रपट महर्षी फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपट निर्मीतीतून भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. व त्यानंतरच्या मूकचित्रपटांना साथ म्हणून थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना निवेदक अधून मधून दृश्य समजावून सांगत होता. तेव्हासुद्धा चित्रपटाच्या या जगात गाण्या-बजावण्याला काही स्थान मिळेल अशी अंधुकशी कल्पनाही नव्हती. परंतु १९३१साली ‘आलम आरा’ हा बोलपट झळकल्यावर मात्र गायक-संगीतकारांसाठी एक मोठ्ठ क्षेत्र सापडलं असे म्हणावयास हरकत नसावी. हे चित्रपट माध्यम गाण्याला आपलसं करणार आहे, एवढेच नव्हे तर गाणं व संगीत त्याचं मूळ शक्तिस्थान होईल याचा अंदाजही कुणी त्याकाळी करू शकले नसतील. परंतु गेल्या ७०-८० वर्षात सिनेसंगीताला प्राधान्य मिळाले व म्हणता म्हणता हे गाणे - बजावणे तमाम सर्व रसिकांना आवडू लागले.

लेखकानी आजच्या काळच्या संगीताबद्दल लिहिण्यापूर्वी हिंदी चित्रपट संगीताचा धावता आढावा चांदनी रातें या पहिल्या प्रकरणात घेतला आहे. त्या काळी चित्रपट निर्मिती स्टुडिओमधून होत होती. तंत्रज्ञ व कलाकारांना स्टुडिओचे मालक पगारावर नेमणूक करत व मोठ्या प्रमाणात पैसेही कमवत. मदन थिएटर्स, बंगाल न्यू थिएटर्स, इंपीरियल स्टुडिओ, वाडिया मूव्हीटोन, शांताराम यांचा प्रभात स्टुडिओ ही नावे त्या काळी चिरपरिचित होत्या .पार्श्वसंगीताची सोय उपलब्ध होती. परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहित नव्हते. न्यू थिएटर्सचे नितिन बोस यानी पंकज मलिक यांच्याकडून पहिल्यांदा प्लेबॅक पद्धतीचे गाणे रेकॉर्ड केले व चित्रपटात वापरला. तो कमालीचा हिट् झाला. मग मात्र गायकांचे व संगीतकारांचे कार्य क्षेत्र पूर्ण बदलले. त्यांना एक प्रचंड अवकाश मिळाला. व गेली ८० -९० वर्षे हा अवकाश सिनेसृष्टीत पसरला. (काही काळानंतर मुंबईचे बॉलिवुड हिंदी चित्रपटांची राजधानी झाली.)

महाराष्ट्रात प्रभातचे गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, बंगालमध्ये आर सी बोराल, पंकज मलिक यांचे नाव झाले. ३५-३६मध्ये ‘अछूत कन्या’ या चित्रपटातली गाणी गाजली. याच सुमारास कुंदनलाल सैगल आपले नशीब आजमावण्यासाठी कलकत्त्याला दोनशे रुपये पगारावर काम करण्यास दाखल झाला. व नंतर त्यानी एक काळ गाजविला. ३०-४०च्या दशकात ९०० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती झाली. व प्रत्येक चित्रपटात सरासरी दहाच्यावर गाणी होती. यातली कित्येक गाणी फ्लॉपही झाले असतील. परंतु ‘पूरण भगत’ या चित्रपटातील सैगलची एकूण एक गाणी हिट् ठरल्या. गंमत म्हणजे सैगल हा स्टार गायक – अभिनेता होता. अशा स्टार-गायक-अभिनेता/ अभिनेत्रीचाही एक जमाना होता. एकेक नावं चमकायला लागली. नूरजहाँ, शमशाद बेगम, देविका राणी, अशोक कुमार, शांता आपटे, के. सी. डे, गुलाम हैदर, पंकज मलिक, सुरेंद्र, सुरैय्या, अशी किती तरी नावे त्याकाळी गाजली. गाणी फार संथ होती. तरीसुद्धा प्रेक्षक आवडीने ऐकत होते. ४०-५०च्या दशकानंतरच्या काळात पंजाबी ढंगाच्या, उडत्या चालींच्या गाण्यांचा बहर आला. अनेक गाण्यामध्ये पाश्चात्य सुरावटीचे रंगही मिसळले गेले. एक वेगळं फ्यूजन संगीत क्षेत्रात पाय रोवू लागले. हा एक सर्वस्वी वेगळा प्रयोग होता. व प्रेक्षकांनी या प्रयोगांना भरभरून साद दिला. पुढील सुवर्णयुगाची ती चाहूल होती. संगीतकारांचा व गायक/गायिकेंचा एकच कल्लोळ पुढील २०-३० वर्षात ठळकपणे दिसू लागला.

या जमान्यात जगमोहन, ख़ान मस्ताना, जी. एम्. दुराणी, मास्टर निसार, सुरेंद्र, सैगल, तलत महमूद, रफी, किशोर कुमार, पारुल घोष, राजकुमारी, नूरजहान, उमादेवी (टुणटुण), गीता दत्त, ज्युथिका रॉय, मुबारक़ बेग़म, बेग़म अख़्तर, लता, आशा असे गाण्याच्या जगातील मातब्बर मोहरे कालपटावर चमकू लागले. शैलेंद्र, साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, राजा मेहदी अली ख़ान, मजाज़, फैज़ अहमद फैज़, सरदार जाफ्री, इ.इ. एकापेक्षा एक असे सरस गीतकार पटकथेच्या मागणीप्रमाणे गीत लिहू लागले. गीत-संगीतांच्या खाणीतील रत्नांना पैलू पाडणारे नौशाद, ख़य्याम, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, एन्. दत्ता, रवी, सी. रामचंद्र, कमल दासगुप्ता, सज्जाद हुसेन, हुस्नलाल-भगतराम इत्यादी संगीत रचनाकारांनी तो काळ गाजविला.. त्यांच्या सर्जनशीलतेला दाद द्यावी असा तो काळ होता.

शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, ओ.पी.नय्यर, मदन मोहन, सलील चौधरी, के. दत्ता, स्नेहल भाटकर, जयदेव इत्यादी संगीतकार नव- नवीन प्रयोग करू लागले. तंत्रज्ञानात सुधारणा होत होती. १९५०-७०च्या काळातील सिनेसंगीत खऱ्या अर्थाने लोकसंगीत झाले. गीता दत्त, लता व आशा या मंगेशकर भगिनीनी मुक्तहस्ताने स्वरांना उधळले. लता व रफी यानी गायिलेली गाणी या काळात हिट् ठरली. या गायक/गायिकाने चित्रपट रसिकांना भरभरून दिले. या काळात गायकीचा पोत आणि वजन पार बदलून गेले. याच सुमारास लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडींनी चित्रपट संगीताला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला. काही वेळा त्यानी उत्कृष्ट गाणे दिलेही असतील परंतु बहुतेक वेळा रद्दड गाण्याचा रतीब टाकल्यासारखे त्यांचे संगीत वाटू लागले. हिंदी सिनेसंगीतात लता-आशाची मक्तेदारी असलेल्या जमान्यात कल्याणजी आनंदजीचे एक मोठे श्रेय म्हणजे त्यांनी किती तरी नवीन आवाज समोर आणले.. मनहर उधास, कुमार सानू, अलका याज्ञिक, साधना सरगम, सुनिधी चौहान... अशी किती तरी नावे घेता येतील. राहुल देव बर्मन, बप्पी लाहिरीसारख्या संगीतकारानी संगीताचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला. संगीत हळू हळू पालटू लागले. तलत महमूद, सैगल, रफी इत्यादींचे उदास, संथगतीचे गाणे मागे पडू लागले. किशोर कुमारची तरूण मस्ती पसरू लागली. परंतु याच सुमारास काही तरी खटकू लागले याची जाणीव होऊ लागली. सुवर्णयुगाला ओहोटी लागली.गाण्यातील धागडधिंगा जाणवू लागला. नवे आवाज येत होते. येसूदासने काही काळ गाजविला. गझल गायकीचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश होऊ लागला. डिस्को संगीतानेसुद्धा ठसा उमटविला. नवे ठेके येत होते. लेखकाच्या मते नवे आवाज चांगले असले तरी अननुभवी होते. नव्वदीचे दशक उजाडले. नदीम श्रवण, रेहमान यांनी या क्षेत्रात क्रांती घडविली. एक मात्र खरे की जुन्या-नव्याची सांगड घालून कसलाही पूर्वग्रह न ठेवता संगीत ऐकणारा श्रोतृवर्ग याच काळात तयार होऊ लागला.

एका साध्या गाण्यासाठी या प्रकरणामध्ये लेखकानी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा आढावा घेतला आहे. संगणकांचा या क्षेत्रात प्रवेश झाला. नवीन सॉफ्टवेअर आले. एक काळ असा होता की दिवसदिवस गाण्याची रिहर्सल होई. वादक रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवसापासून आपापली वाद्यं घासून-पुसून सज्ज करून ठेवतं. संगीतकार बेचैन असे. गायक पलट्यावर पलटे घेऊन आवाज मोकळा करत बसलेला असे आणि अखेर खुद्द ध्वनिमुद्रणाचा दिवस उजाडत असे. परीक्षेला जाणाऱ्या मुलांसारखीच सगळ्यांची मनःस्थिती असे. तेव्हाचं मिक्सिंग या गोष्टीवर फारच मोठ्या प्रमाणात अवलंबून असे. जुन्या काळातला ध्वनिमुद्रक आज पुन्हा अवतरला, तर एक संगणक आणि काही सॉफ्टवेअर्स याच्या साहाय्यानं गल्ली बोळात उभे राहिलेले स्टुडिओ आणि तिथली अजागळ कार्यपद्धती बघून अवाक होईल. आजचा संगीतकार कोपऱ्यामधल्या खुर्चीवर व साउंड इंजिनिअर माउसची क्लिक क्लिक करत आज्ञा सोडत असेल.

एकेका वाद्याचे स्वतंत्र ट्रॅक्समध्ये ध्वनिमुद्रण करून त्याचे मनाजोगे मिक्सिंग करण्याचे तंत्र आत्मसात केले गेले. पूर्वीच्या काळची रिहर्सल्स, गायकांच्या चेहऱ्यावरील टेन्शन गायब झाल्या. ट्रॅक्सच्या मिक्सिंगवर अखेरचा हात फिरवून गाणं चमकदार करणारी मास्टरिंग तंत्र विकसित झाले. त्यामुळे पूर्वीच्या काळच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ ओस पडू लागल्या. अगदी गल्ली बोळातील एका छोट्या खोलीत, संगणक व इतर साधनांच्या साहाय्यानं गाणे रेकॉर्ड होऊ लागले. हवे तेवढ्या वेळा मनाजोगे गाणे बाहेर पडेपर्यंत संगणकाचा वापर होऊ लागला. त्यामुळे सर्जनशीलतेला मोठा वाव मिळाला. नवे ठोके, नवे बीट्स आले. प्रयोग करण्यास भरपूर वाव मिळू लागला. यातूनच संगीताचा कला ते विक्रीजन्य वस्तू म्हणून झालेला प्रवास हा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होऊ लागली. संगीतातील वैविध्यता जाणवू आली. ऑनलाईन व्हिडीओ, रीअ‍ॅलिटी शोज, गाण्याच्या स्पर्धा, रेडिओ चॅनेल्स, स्वतःचे यूट्यूब शोज इत्यादीमुळे भाऊगर्दी वाढू लागली, स्पर्धा वाढली. व त्यातूनच एखादा तारा चमकू लागला व त्याच्या गाण्याने, संगीताने ऐकणाऱ्यांना अक्षरशः वेड लावले. आताच्या काळच्या काही चमकलेल्या गायक, गायिका व संगीतकार यांच्याबद्दल लेखकानी लिहिले आहे.

अशाच चमकलेल्या ताऱ्यांपैकी ए. आर रेहमान, विशाल भारद्वाज व नुसरत अली फतेखाँ यांचा नंबर अगदी वरचा असेल. रोजा या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिलेला हा तमिळनाडूच्या ए. आर. रेहमानचे संगीत इतके दमदार होते की बघता बघता त्यानी त्या काळी सिनेसंगीताचे शिखर पादाक्रांत केले. त्याचा हम्मा हम्मा हे गाणे तरुण वर्गात गाजलं. नंतर आलेल्या बाँबे चित्रपटातील कहना ही क्या या चित्राच्या मधाळ आवाजातील गाण्याने, त्याच्या तालाने अक्षरशः सिने रसिकांच्यावर जादू केली. सुखविंदरसिंगच्या आवाजातील चल छैया छैय्या गाणं ऐकताना त्याच्यातील गहिरेपणा जाणवतो, ताल व ठेका डोक्यात भिनतो. ए आर गातोसुद्धा! रूढार्थाने त्याचा गळा गायकीचा नाही. त्याचे हिंदी शब्दोच्चार चांगले नाहीत. परंतु गाण्यातील शब्दांचा आशय तो रसिकापर्यंत पोचवतो. हा तरुण संगीतकार त्याच्या स्वतःच्या गाण्यात अडकून न पडता नवीन गाणे शोधतो, नवीन स्वर शोधतो व नाविन्यतेच्या शोधात हरवून जातो. म्हणूनच ऑस्कर पुरस्कार मिळाला तरी तो नम्र व मितभाषीच राहिला. रवींद्रनाथ टागोरांच्या अ‍ॅकला चलो रे या गाण्याला मूळ चालीसकट जावेद अख्तरच्या हिंदी शब्दांना त्यानी स्वर दिले. त्याच्याबद्दल वाचताना रेहमान हा एक लोकविलक्षण कलाकार आहे या लेखकाच्या मताशी नक्कीच सर्व सिनेरसिक सहमत होतील.

रेहमानप्रमाणे दक्षिणेतील एम एम क्रीम व हॅरिस जयराज यांच्याविषयीसुद्धा लेखकाचा अभिप्राय चांगला आहे. एम एम क्रीम यानी संगीत दिलेल्या क्रिमिनल चित्रपटातील तुम मिले, दिल खिले हे गाणे रसिकांना नक्कीच आठवत असेल. उज्वल भविष्य असलेला हा एक होतकरू कलाकार आहे. दक्षिणेकडील चित्रपटांसाठी संगीतासाठी तंत्रसहाय देणारा हॅरिस जयराज हा नुसता अरेंजर नसून त्याच्याकडे जबरदस्त तांत्रिक हुकमत आहे. व या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची अत्यंत गरज आहे.

विशाल भारद्वाज हा मूळचा दिल्लीचा. रेकॉर्डिंग मॅनेजर म्हणून तेथील एका स्टुडिओत काम करत होता. स्वतःमधील कलेच्या धुगधुगीला आवरत तो इमाने इतबारे तेथे काम करत होता. त्याला मुंबईतील कामाची एक संधी मिळाली व या संधीचे त्यानी सोने केले. मुंबईत गुलजारची भेट झाली. जंगल बुकचे शीर्षक गीत करण्यास सांगितले गेले. त्यांनी संगीतबद्ध केलेले चड्डी पहनके फूल खिले हैं सुपरहिट ठरले. पुढे यानी संगीत दिलेले मकबूल, माचीस, सत्या, चाची ४२०, गॉडफादरमधील गाणे हिट ठरल्या. विशालचे चप्पा चप्पा चरखा चले आलं तेव्हाच त्याचे वेगळेपण दिसून आले. नंतर तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पडला. इश्किया, ओंकारा चित्रपटांची निर्मिती केली. लहान मुलांसाठी 'द ब्ल्यू अंब्रेला' हा पारदर्शी रंगाचा चित्रपट विशालने आणला. विशालसारखाच दिल्लीहून आलेला अजून एक संगीतकार म्हणजे इस्माइल दरबार. ‘हम दिल दे चुके है सनम’ या भन्सालीच्या सुपरहिट चित्रपटाला त्यानी संगीत दिले होते. भन्सालीच्या 'देवदास'चे संगीतही इस्माइल दरबारचाच होता. १०-१५वर्षापूर्वीची त्यातील गाणी अजूनही ताजी वाटतात. यावरून या संगीतकाराची सर्जनशीलता जाणवते.

कव्वाली गायकीला आधुनिक स्वरूप देणारा व सुफी पंथातील गायकीला प्रसिद्धीच्या झोतात झळकविणारा नुसरत अली फतेखाँ हा पाकिस्तानी गायक होता. त्याच्या गाण्यात आर्तता, गूढ उदासीनता होती. सिनेसंगीतात कव्वाली हा प्रकार नवीन नाही. जुने चित्रपट ‘बरसात की रात’, ‘मुघले आझम’, ‘दिल ही तो है’ यातील कव्वाली रसिकांना नक्कीच आठवत असतील. कव्वाली हा आध्यात्मिक अनुभव आहे, असे सूफी पंथाचा दावा आहे. सूफी हा एक गूढ पंथ आहे असे अनेकांना वाटते. संगीताला आद्यात्मिक दर्जा दिलेला हा पंथ आहे. कव्वाली गायकीला अनेक नियमांनी व रूढी परंपरेने बंदिस्त केले होते. नियमांच विस्तारणं, पालटणं, हे अशक्यप्राय काम होतं. ते नुसरतने केलं व साचेबद्ध कव्वालीला मोकळ केलं. साचलेलं पाणी बोळा काढल्यावर जस घळाघळा वाहतं तस कव्वाली गायकीतील चैतन्य नुसरतमुळे वाहू लागले. त्यानी सरगम या संगीत प्रकाराचा कव्वालीमध्ये फार खुबीने वापर केला. ही सरगम त्याच्या गाण्याचे नंतरच्या काळात ट्रेड मार्क ठरले.

नुसरत गाऊ लागतो तेव्हा सगळ्या मैफलीत प्रसन्न वातावरण तयार होत आहे असे वाटू लागते. शेखर कपूरच्या बँडिट क्वीनमधील गाणी नुसरतने म्हटलेले आहेत. त्या गाण्यात त्यानी जीव ओतल्याचे जाणवते. नुसरतच्या सगळ्या कामामध्ये त्याचा वेगळेपणा उठून दिसतो. ए आर रेहमाननं भारताच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यादिनानिमित्त सादर केलेल्या वंदे मातरम चे गाणे नुसरतच्या आवाजात रेकॉर्ड केलेले आहे. परंतु हा अवलिया मैफल अर्धवट संपवून वयाच्या ४८व्या वर्षी कायमचाच काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावला. त्याचाच वारसा त्याचा मुलगा राहत अली फतेखाँ व अबिदा परवीन पुढे नेत आहेत.

स्कूल चले हम हे सर्व शिक्षा अभियानासाठी चित्रित केलेले गाणे (गायक कुणाल गांजेवाला) बहुतेकांच्या स्मरणात असेल. जाहिरातीच्या संगीतात एवढी भावगर्भता क्वचितच सापडेल. त्याला तालाचे, सुराचे, वेळेचे व व्यवहाराचे गणित जुळवून आणावे लागते. व ही किमया शंकर महादेवन, एहसान नुरानी, लॉय मेंडोसा या त्रिकुटाने करून दाखविले आहे. यातील शंकर महादेवन, जन्माने चेन्नईचा, व मुंबईत वाढला. टी आर बालामणी यांच्याकडे संगीताचे धडे घेत होता. मुंबईत श्रीनिवास खळे यांचे मार्गदर्शनाखाली तो तयार झाला होता. बघत बघता तो मोठमोठ्या संगीतकारांसाठी गाऊ लागला. हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ या भाषेतही गाऊ लागला. या त्रिकूटानी 'दस', 'दिल्लगी', 'शूल', 'ब्रॅडफोर्ड' या चित्रपटांचे संगीतकार म्हणून अनेक प्रयोग केले. 'दिल चाहता है'च्या संगीताने त्याना उच्च पदावर पोचविले. कल हो ना हो व 'अरमान'साठी त्यांनी आपली शक्ती पूर्णपणे पणाला लावली. गाण्यानुसार गायक व गायिका निवडत असल्यामुळे गाण्यात वैविध्यता आणण्यात ते यशस्वी झाले. 'बंटी और बबली'लाही याच त्रिकूटानी संगीत दिले होते. गंमत अशी आहे की त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी कधीच हिट झाले नाहीत. परंतु प्रत्येकातील एखादं दुसरं गाणं नक्कीच हिट झाले आहेत. त्याचबरोबर त्यानी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात प्रयोगशीलता नक्कीच जाणवते. लेखक यांच्याबद्दल भरभरून लिहित आहेत. ते मुळापासून वाचायला हवे.

मधलं सप्तकं या प्रकरणात लेखकानी गेल्या दोन-तीन दशकात यशस्वी ठरलेल्या काही संगीतकारांच्या वैशिष्ट्याचा आढावा घेतला आहे. संगीतकार जतिन-ललित या जोडीने संगीत दिलेले 'कभी हाँ कभी ना' व 'दिवाना' या चित्रपटातील गाण्याने व त्यातील टणाटण वाजणाऱ्या तबल्याच्या ठेक्याने लेखकाला झपाडून टाकले. नंतर आलेल्या 'जो जीता वही सिकंदर' व 'राजू बनगया जंटलमन'मधील गाणीसुद्धा तितकीच गाजली होती. तसे फार अल्पकाळात या जोडीला पुष्कळ यश मिळाले. हे यश त्या काळी इंटरनेट वगैरे काही नसतानासुद्धा मिळाले हे विशेष. चार वर्षामध्ये त्यानी आपला स्वतःचा ठसा या सिनेजगतात उमटविला. नंतर आलेल्या भन्सालीच्या 'खामोशी'मध्ये गोव्यातील लोकसंगीताचा बाज वापरून त्यांना एकजीव केला. त्याचे 'दिलवाले दुल्हनिया..'.मधील गाणे तुफान गाजले. तरुणाईतील जोश, ईर्ष्या, धाकधूक, दगदग, नशा, प्रेमाधील बोल्डनेस या सर्व गोष्टी त्यांच्या संगीतातून व्यक्त होत होत्या. मेरे ख्वाबो में जो आये या लताताईने उतरत्या वयात गायिलेले गाणेसुद्धा अप्रतिम होते. त्यांची गाणी चांगल्या अर्थाने भरकटवतात, या लेखकाच्या मताशी रसिक नक्कीच सहमत होतील. त्यांच्या सुराना धार नाही मात्र गोडवा आहे. ते वळणदार आहेत. माणसांना जोडणारे आहेत. या जोडीला जसराज, सुलक्षणा पंडित यांचा संगीताचा वारसा लाभला होता, हे त्यांच्या संगीतकृतीमधून जाणवते.

याच दरम्यान सांगीतिक वारसा न लाभलेली परंतु तुफान गाजलेली जोडी नदीम-श्रवण यांची होती. यांची गाणी सरळ, सोप्या चालीची, मृदु, तरल, बाळबोध ठेका असलेली होती. ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नही’, ‘परदेस’ या चित्रपटातील गाणी याची साक्ष देतात. १९९०-२००० या दशकभर नदीम-श्रवण यांनी संगीतक्षेत्र व्यापून राहिले. याच सुमारास अनू मलिकचे संगीतही गाजले. विरासत मधील पायले चुन चुन वा बाजीगरमधील ये काली काली आँखे ही गाणी ऐकताना आपोआप ठेका धरावासा वाटतो, यातच या संगीतकाराचे यश आहे. बप्पी लाहिरीप्रमाणे अनू मलिकने ठसक्याची गाणी दिली व आबालवृद्धांना त्याच्या ठेक्यानुसार प्रत्यक्ष नाचायला लावलं. त्यांनी गाण्यासाठी एखाद्या-दुसऱ्या गायक-गायिकेमध्येच अडकून न पडता अनेक गायक/गायिकांना संधी दिली व गाणाऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. यांची गाणी त्याकाळी फॅशनेबल गाणी या सदरात मोडत असे. याच सुमारास फॅशनेबल नसलेले दोन संगीतकार उदयास आले – उत्तमसिंग आणि ‘हम आपके है कौन’चे संगीतकार राम-लक्ष्मण. राम-लक्ष्मणमधील राम निवर्तल्यावरसुद्धा विजय पाटील यांनी नाव न बदलता सुमारे ७५ चित्रपट संगीतबद्ध केले. त्यात दादा कोंडके यांचे काही चित्रपटसुद्धा आहेत. . दीदी तेरा देवर दिवाना अजूनही रसिकांच्या लक्षात आहे. दिल तो पागल है मुळे उत्तमसिंगचे नाव सर्वदूर पोहोचले व या संगीतकाराला लोकमान्यता मिळाली. 'दिल तो पागल है' मधील त्याची एकूण एक गाणी गाजली. घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम ने इतिहास घडविला. ले गयी ले गयी या गाण्यातील मस्ती, लाडिकपणा अजूनही आठवतो. उत्तमसिंग यांची गायक निवड नेहमीच अचूक असते. चिठ्ठी न कोई संदेस गाण्यासाठी जगजितसिंगची निवड अचूक होती. लेखकानी राजेश रोशन व संदीप चोवटा यांच्याविषयीसुद्धा लिहिले आहे. एक मात्र खरे की या जुने-नवे संगीतकारांनी सिनेसंगीताला एक वेगळ्या वाटेने नेले व पुढच्या पिढीतील संगीतकांराना वाट मोकळी करून दिली.

संगीतनिर्मितीमधील सर्वात महत्वाचे टप्पे गाणे, गाण्यातील शब्द व त्याचे नेमके उच्चारण. संगीतनिर्मिती हे नेहमीच दोन टप्प्यात होत असते. एक संगीतकाराच्या मनात व दुसरी गायक/गायिकेच्या गळ्यात. या दोन्ही बाजू कला या सदरात मोडतात. त्यात सादरकर्त्याचे अनुभव, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचा पिंड, त्याचे बौद्धिक कौशल्य आदि सर्व गोष्टी येतात. त्याचबरोबर तंत्रामधील पारंगतता व रसास्वाद घेणाऱ्याकडील रसग्रहणाचा आवाका या गोष्टी पण येतात. गाणे / संगीत रसिकापर्यंत पोचविणाऱ्या स्पीकरच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती झाली. स्टिरिओ, ट्रेबल्, वूफर, बास इत्यादीमुळे गुणवत्तपूर्ण निर्मितीत संगीतकार व गायकांची जबाबदारी वाढली रसग्रहणासाठी सिनेसंगीताच्या इतिहासाची पाने उलटल्यास या क्षेत्राला अनेक गायकांनी सर्जनशील गाणी फुलवले आहेत, हे लक्षात येईल. लता, आशा, रफी, तलत, हेमंतकुमार, किशोरकुमार ही नावे व त्यांची गाणी आजही विसरले जात नाहीत. या सगळ्या मंडळींनी कित्येक वर्षे राज्य केले. पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे जुनं शिळं होत, नवं वाढतं. धक्का देत फाटे फोडत वाढतं, फोफावतं.

अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू, साधना सरगम, उदित नारायण ही मंडळी अत्यंत चिकाटीने व जिद्दीने या क्षेत्रात पाय रोवून उभारले व सिनेसंगीताला वेगळे आयाम देऊ शकले. परंतु त्या कधीही जुन्यांच्या स्पर्धेत गेले नाहीत. नवीन संगीतकारांना जे हवे ते देत आपला एक स्वतंत्र कोपरा शोधून त्यांनी नाव कमावले. आलिशा चिनॉय व शेरॉन प्रभाकरने बाजूचा रस्ता निवडून वेगळी वाट चोखाळली. या कलाकारांनी सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, शान, सोनू निगम, सुखविंदर सिंग, कैलाश खेर, बेला शेंडे, कविता सेठ, आदींना वाट मोकळी करून दिली.

भारतामधील पार्श्वगायनाची चौकट ओलांडून गेलेले हरीहरन, पलाश सेन, शुभा मुद्गल, अदनान सामी यांनी वेगळा ठसा उमटविला. लता-आशा यांच्या आवाजाच्या प्रारूपाला अलका याज्ञिकने वेगळ्या वळणाने पुढे नेले. अलका याज्ञिकची गाणी वर्षानुवर्ष न कंटाळता, न थकता रसिकापर्यंत पोहोचत राहिली. माधुरी दिक्षितवर चित्रित केलेले एक, दोन, तीन या राम लखन मधील गाणे आजही तितकीच लोकप्रिय आहे. कविता कृष्णमूर्तीचे वेगळेपण 'बाँबे'मधल्या तू ही रे मध्ये दिसले. अनुराधा पौडवालचे दिल है की मानता नही हे गाणंसुद्धा तितकेच लोकप्रिय आहे. श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या दोघींचे चाहते भारतभर आहेत.

या गायिकांचे जे विश्व आहे तसेच गायकांचेसुद्धा आहे. नव्वदीच्या दशकात कुमार सानू, सोनू निगम, अभिजित आणि उदित नारायण यानी गाजविला. कुमार सानूचे 'परदेस' मधील दो दिल मिल रहे है वा उदित नारायणचे लगानमधील लोकसंगीतावर आधारलेले ओ रे छोरी अभिजितचे 'मुन्नाभाई'मधील
एम बोले तो ही गाणी आपण विसरू शकत नाही. लेखकाच्या मते हिमेश रेशमिया हा एक अव्वल दर्जाचा संगीतकार व गायकही आहे. भरपूर वादविवादात तो सापडल्यामुळे माध्यमांनी त्याच्या प्रतिभेकडे फार लक्ष दिले नाही, ही लेखकाची तक्रार रास्त वाटते.

या सगळ्या गायकांनी प्रचंड संख्येने गाणी गायली आहेत. त्यांना ढिगाने पुरस्कारही मिळाले आहेत. एक मात्र खरे की आताच्या काळात नुसते अप्रतिम गाऊन चालत नाही.त्याच बरोबर अनेक हिकमती लढवाव्या लागतात. काळाला ओळखावे लागते. रसिकाच्या बदलत्या आवडी-निवडीचा वेध घ्यावा लागतो. चित्रपट क्षेत्रातील राजकारणाशी टक्कर द्यावी लागते. हे सर्व अंगावर घेण्यासाठी पक्का आवाजाची बावनकशी भांडवल असल्यास सर्व काही निभावता येते. या सर्व नवोदित गायक- गायिका या सर्व प्रोसेसमधून तावून सुलाखून इथपर्यंत पोहोचले आहेत हे आपण विसरता कामा नये. संगीताचे वाढणारे रूप कधी आनंददायी असते तर कधी धडाडी भरविणारी असते. त्यामुळे आजकाल कित्येक गायक सिनेक्षेत्राबाहेर जावून नाव कमवत आहेत. हरीहरनसारखा प्रयोगशील गायक नव कोरं संगीत घेऊन प्रसिद्धी मिळवत आहे. मोहित चौहान हा स्वतःचा बँड घेवून अल्बम काढत आहे. त्याच्याकडे स्टायलिश् आवाज आहे, असे लेखकाला वाटते. शोभा मुद्गल यांनी आपल शास्त्रीय संगीत रॉकशी, पॉपशी जोडत आहे. असे अनेक प्रयोग होत आहेत व रसिकांची पावती मिळवत आहेत.

मराठी पाऊल पडते पुढे या प्रकरणात लेखकानी मराठी सिनेसंगीताचा लेखाजोखा व भविष्यात अवधूत गुप्ते, मिलिंद इंगळेसारख्या नवोदित मराठी कलाकारांची झेप काय असेल याचे वर्णन केले आहे. हे सर्व मुळापासूनच वाचायला हवे.

लेखकानीच उल्लेख केल्याप्रमाणे माणसाला पूर्वी पहिल्यांदा गाणं कधी भेटलं असेल ते असो, पण आजच्या घडीला गाण्यानं माणसाचा पिच्छा पुरवला आहे. उठता-बसता, खाता-पिता, न्यू इअर ते ख्रिसमस, कॉलेज ते दवाखाना, लग्न समारंभ, यात्रा-जत्रा. कुठेही जा, केव्हाही जा, गाणं आपल्याभोवती फेर धरून नाचत आहे. आपली इच्छा असो वा नसो, आपली पसंती असो वा नसो, सुरांचा एकच मारा चारी दिशांनी होताना दिसत आहे. आता ही जी सारी वैविध्यं आढळून येत आहेत, ती सगळी एकजात छान असतील असे नव्हे. पण एकूण संगीत पुढे जाण्याच्या दृष्टीने फारच महत्वाची आहेत. त्या विविधतेला पुरा पडणारा संगीतकार विरळाच, म्हणून मग अशी उमदी कलाकार मंडळी ग्रुप तरी करतात किंवा दोघांच्या जोड्या बनतात. त्या ग्रुपमध्ये एक किंवा अनेक अरेंजर्स असल्याने त्यांच्या चालीमध्ये, सादरीकरणामध्ये निराळेपण येतं. ग्रुपमध्ये कसलं चैतन्य असतं तसलचं चैतन्य त्यांच्या संगीतात आढळतं.

संगीत ही माणसाची गरज आहे. प्राथमिक स्वरूपाची नसली तरी. ती नैसर्गिक आहे याचा प्रत्यय पुस्तकाची पाने उलटताना होतो. हीच लेखकानी घडवून आणलेल्या सिनेसंगीत कलाप्रवासाची खरी पावती ठरेल. गाणी मोबाइलवर असतात. कदाचित तो चिरका आवाज खऱ्या आवाजाला न्याय देत नसेलही. त्यामुळे खऱ्या रसिकाचा, खऱ्या गायकाचा प्राण घुसमटेल. परंतु या भोवऱ्यातून जो धैर्यानं वाट काढेल त्याचे भाग्य उजळून जाईल हे मात्र खरे.

नवे सूर अन् नवे तराणे संगीतआजच्या काळाचं
डॉ. आशुतोष जावडेकर,
राजहंस प्रकाशन,
किंमतः २०० रु, पृ.सं १७६

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गाण्यावरचा लेख म्हणून आधी उत्सुकतेने उघडला. पण जुन्याबरोबर आलेली नवीन नांवे पाहून उत्साह मावळला. म्हातारपणीही, येणाऱ्या नवनवीन टेक्नॉलॉजीज, साहित्यातले, नाटक सिनेमातले नवनवीन प्रकार, नवीन रुढी, असं सग्गळं नवीन आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांत बऱ्यापैकी रुळलोही.
पण सिनेसंगीताच्या बाबतीत मात्र, १९८० नंतर आम्ही आमच्या कानाचे दरवाजे नवीनाला बंद केले. शास्त्रीय संगीतात मात्र हे दरवाजे बऱ्यापैकी उघडे राहिले. अगदी नवीन,तरुण गायक गायिकांची कला पाहून स्तिमित झालो. पण फ्युजन प्रकार, आवडून घेण्याचा प्रयत्न करुनही नाही आवडला.
आताचे सिनेसंगीत आम्हाला आंग्लाळलेले, पंजाबडे आणि कायम टिपेच्या आवाजातले वाटते. ऐकले तरी लक्षांत रहात नाही, मनांत घर करत नाही. शास्त्रीय संगीतातही तरुण पिढी रियाजापेक्षा स्टंटबाजीला प्राधान्य देते असं वाटत रहातं. असो. आम्हीच झब्बु झाले असु!
त्यामुळे फक्त जुन्या संगीताचा आस्वाद घेत घेतच या इहलोकीचा प्रवास पूर्ण करायचा, हेच आमच्या प्राक्तनात दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दरवर्षी नवनवीन गाणी ऐकल्यामुळे, गाणी आणि स्मृती कम्पुटर प्रोग्रामिंग मधल्या इंडेक्स-मेमरी सारखे झाले आहे. एखाद्या वर्षाचे सुपरहीट गाणे त्या वर्षातल्या स्मृतींना आपोआप घेउन येते. अलिकडे केके गेला तेव्हा त्याची २००८-२००९ ची सुपरहिट गाणी त्या दिवसांच्या स्मृतींना घेऊन आली.

अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू, साधना सरगम, उदित नारायण ही मंडळी अत्यंत चिकाटीने व जिद्दीने या क्षेत्रात पाय रोवून उभारले.

आम्ही यांचीच गाणी ऐकत मोठे झालो. तरीही माझे बरेच मित्र किशोर कुमार, रफीचे फॅन आहेत. मी किशोर, रफीची गाणी (रातकली ख्वाब, जींदगी का साथ इ.) संजय मांजरेकरच्या तोंडून प्रथम ऐकली. त्यावेळी त्याचा एक अल्बम आला होता, त्याची कॅसेट होती माझ्याकडे.

बरेच गायक एखाद-दोन गाण्यासाठी कायमस्वरुपी लक्षात राहिले. जसे अलिशा चिनॉय म्हटलं की पटकन स्मृती जाग्या होतात त्या मेड इन इंडियाच्या, मिलिंद सोमणच्या आणि फोन वरून गाणं निवडायची सोय करून देणार्‍या चॅनलच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0