एक नवंच शस्त्र

एक नवंच शस्त्र

नंदा खरे


This is How they Tell Me the World Ends

माणसांचे समूह, बरेचदा विशिष्ट भूभागातले समूह स्वतःला 'राष्ट्र' किंवा 'देश' म्हणवून घेऊ लागले. या वाक्यात राज्यशास्त्राच्या दृष्टीनं चुका असतीलच, पण..... तुम्हाला समजतं आहे, मी कशाबद्दल बोलतो आहे ते! आणि या देशांमध्ये रागलोभही उत्पन्न झाले. युद्धही झडू लागली. सैन्य बाळगणं हा देशांचा लक्षणगुण झाला. हेरगिरी ही भानगड उपजली. शस्त्रं आणि त्यांच्या 'प्रणाली'ही उपजल्या. एक ताजी, जास्तजास्त महत्त्वाची होत असलेली शस्त्र-प्रणाली तर मी तिच्या जन्मापासून पाहू शकलो असतो. मीच नाही, पन्नाशी गाठलेला कोणीही पाहू शकला असता ! तिचा आधार आहे आपलं ओळखीचं इंटरनेट (Internet). ते रचलं गेलं १९७६ साली, 'झोट्टीज' (Zotti's) नावाच्या स्टॅनफर्डजवळच्या एका गुत्त्यातून!

त्या तंत्राचे काही गुण सहज जाणवतात : पत्रांद्वारे दिलेल्या संदेशांना मिळालेले विजेचे पंख, टेलिग्राम या तंत्राला आलेलं मरण, याच्याच दृक्‌श्राव्य आवृत्त्यांनी (स्काईप, झूम, इ.) सभा, सभागृहं वगैरेंना केलेली इजा, शिक्षणाला एकीकडे 'ऑनलाईन' करून पोच वाढवणं आणि त्याचवेळी पोच कमी करून समाजाचं 'आहे रे / नाही रे' असे तुकडे पाडणं इ.इ.

काही संकल्पनांचा मुळातून पुनर्विचारही करावा लागणार आहे : देश-राष्ट्र, खाजगी-जाहीर, नैतिक-अनैतिक, इ.इ. आज संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान वगैरे विषयांच्या अभ्यासक्रमांत नीतिशास्त्र शिकवतात म्हणे. पण काही घटनांनंतर नेमकं काय शिकवलं जातं याचीही जाहीर चर्चा व्हावी, असं वाटतं. अशी एक 'घटना' म्हणजे "धिस इज हाऊ दे टेल मी द वर्ल्ड एण्ड्ज" हे पुस्तक (लेखिका निकोल पर्लरॉथ, प्रकाशक ब्लूम्सबरी, २०२१). मुळात पुस्तकाचं नाव टी. एस.एलियटच्या 'द हॉलो मेन' या कवितेतून घेतलं आहे, की जग संपतं ते धमाक्यानं नाही. ते संपतं कण्हत-केकाटत; not with a bang / but a whimper. पुस्तकाचं उपशीर्षक आहे "सायबर शस्त्र-स्पर्धा".

मी दूरान्वयानंही संगणक-तज्ज्ञ नाही; पण निराशावाद हा माझा स्थायीभाव होतो आहे. हिरोशिमा-नागासाकी स्फोट मी पहिले नाहीत, म्हणजे मी 'बँग' पहिला नाही. पण जागतिक तापमान, विषमता आणि लोकसंख्या वाढताना, पण सहिष्णुता मात्र घटतानाचं कण्हणं-केकाटणं मात्र सवयीचं आहे. तर या मर्यादांमध्ये निकोलच्या पुस्तकाची ओळख करून द्यायचा हा प्रयत्न आहे.

मूठभर साखर

मूठभर साखर किती इजा करू शकेल? अगदी तीव्र मधुमेहाच्या रोग्याला नव्हे, तर इतरत्र? १९७०-७२च्या सुमाराला, माझा पगार रु. ३०० दरमाह असताना साखरेनं रु. ३०,००० इजा केल्याचं मी पाहिलं आहे. कोणी तरी स्नेह्याच्या ट्रकच्या डिझेल-टाकीत साखर घातली. ती इंजिनभर पसरून, तिचा कोळसा होऊन इंजिनाला बरीच इजा झाली. इंजिन साफ करणं, काही सुटे भाग बदलणं, उत्पन्न बुडणं वगैरे अनेक तऱ्हांनी इजा झाली. न मोजता आलेली इजा म्हणजे माझा स्नेही, त्याचा ड्रायव्हर वगैरेंच्या मनातल्या शंका आणि धाकधूक. आजकाल हे सगळं FUD (फियर-अनसर्टनटी-डाउट ) म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, FUD वारंवार भेटणार आहे!

मग संगणक-युग आलं. माझी बांधकाम कंपनी पत्रलेखन, हिशेबनिशी वगैरेंसाठी संगणक वापरू लागली. मीही निवृत्त झालो तेव्हा पुढच्या पिढीच्या सल्ल्यानं एक डेस्कटॉप संगणक घेतला. आज माझ्यासाठी तो माहिती शोधतो आणि संदेश देतो-घेतो. त्यात सुरुवातीला (२००१-२००५) बरेचदा घोटाळे होत. मग एक विशीतले गुरुजी येऊन सगळं मूळपदावर आणत. काय झालं होतं असं विचारलं तर 'बग्स', 'हॅकिंग' वगैरे शब्द वापरले जात. जरा नंतर तशा 'लागणी' टाळायला 'पहारेदार', दुरुस्त्या करायला 'औषधं' वगैरे मिळू लागली. हे रोग कोण पसरवतं, का पसरवतं, वगैरे प्रश्नांना उत्तर दिलं जाई "आलास ना माझ्याकडे, यंत्र पुन्हा सुरळीत करायला?" आणि मग नवा 'अँटिव्हायरस' नवा 'हीलर' मिळायचा, पाच-सातशे रुपये मोजून. असं सांगतात की दुसऱ्यांच्या संगणक-आज्ञावल्या भेदणं आणि त्यांत फेरफार करणं हे प्रॅन्क किंवा गम्मत म्हणून, practical joke म्हणून सुरू झालं. ही मूठभर साखरच होती, प्रोग्राम्ससाठी. पण पुढे याच गलोलींचे अणुबॉम्ब होऊ लागले. मूठभर साखरेचं उपद्रवमूल्य कोटींमध्ये जाऊ लागलं. अमेरिकेनं एक मरीनर-१ नावाचं यान शुक्र ग्रहाचा तपास करायला पाठवलं. आज्ञावलीत एका छोट्या आडव्या रेषेची (hyphen) चूक झाली. उड्डाणानंतर २९४ सेकंदांत (५ मिनिटंही नाहीत) यान भरकटलं. शहरांना, जहाजांना इजा होऊ नये म्हणून ते यान पाडावं लागलं. तज्ज्ञ आज्ञावल्या रचणारेही (coders) चुकू शकतात. चुकवणारे असले तर...?

या प्रकारानं एक नवी भाषाच घडवली. एखाद्या प्रोग्रॅममध्ये, आज्ञावलीमध्ये जिथून घुसता येतं तिला 'शून्य-तिथी' (zero-day) म्हणतात. आपण 'खिंडार' म्हणू. खिंडारातून जाऊन प्रोग्रॅम बिघडवणारा, तो बग किंवा व्हायरस. आपण 'रोगाणू' म्हणू, आणि त्यानं होते ती 'लागण' किंवा 'घुसखोरी'. काही रोगाणू तुकड्यातुकड्यानं लागण करून पुढे एकत्र होऊ शकतात. एका प्रोग्रॅममधून दुसऱ्यात शिरू शकतात. या झाल्या अळ्या किंवा वर्म्स (worms). प्रोग्रॅम दुरुस्त करून पुढे लागण होऊ न देणं म्हणजे 'पॅचिंग'. आपण म्हणू खिंडार बुजवणं. हे सगळं करू शकणारे, त्यावर इलाज शोधणारे, हे सारे 'हॅकर्स' म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या सरकारला आवडतं काम करतात तेव्हा चांगले मानले जातात. सरकारची गैरमर्जी झाली तर वाईट, अगदी देशद्रोह्यांपैकी मानले जातात. आपला तो बाबासाहेब, दुसऱ्याचा तो बाब्या; ही वृत्ती जगभर आहेच. आता "तज्ज्ञता" (म्हणजे जे काय असेल ते) नसलेल्या व्यक्तीनं तज्ज्ञांच्या क्षेत्रात घुसखोरी करणं नवीन नाही. अॅलन ट्युरिंगनं जर्मन आरमाराचे संदेश हॅक केले. लिओनार्दो दा विंची चित्रकलेसाठी शरीरशास्त्र शिकायला प्रेतं उकरून शव-विच्छेदन करायचा; हेही हॅकिंगच होतं. टेलिफोनचा शोध लागल्यानंतर लवकरच लोक इतरांचे फोन हॅक करू लागले. १९९५च्या आसपास बिल गेट्सनं 'Netscape' या इंटरनेट-शोधणाऱ्या browser आवृत्तीबद्दल विचारलं "नेटस्केपचा सत्यानाश करायला किती खर्च येईल?" त्यावेळी तो 'दानशूर' व्हायचा होता. आज तो नेट-सुरक्षिततेचा कट्टर समर्थक आहे.

जसजसं इंटरनेट सबळ होत गेलं तसतसे हॅकर्स त्यावरच्या मेल्स हॅक करणं शिकू लागले. काही उद्योजक हॅकर्सकडून खिंडारं विकत घेऊ लागले. मोठ्या कंपन्या मात्र त्यांच्या प्रोग्रॅम्समधली खिंडारं दाखवणाऱ्यांना कोर्टात खेचायच्या धमक्या देत असत. हॅकर्स जी खिंडारं विकत, ती सहज स्पर्धक कंपन्या, सरकारी संस्था वगैरेंना विकता येत. जे.पी,वॉटर्स (J.P.Watters) यानं एक i-Defense नावाची कंपनी दहा डॉलर्सना विकत घेतली २००० साली. तिच्यातर्फे खिंडारं विकत घेतली जात. त्यांच्यातून घुसखोरी करता येते हे दाखवून दिलं जाई, आणि यासाठी $७५ हॅकरला मिळत. खिंडारात काही विशेष असेल तर किंमत $४००पर्यंत जाई. व्यवहार गुपचूप केला असेल, इतरांना न सांगण्याच्या बोलीवर, तर किंमत पन्नास हजार ते दीड लाख डॉलर्सही गाठत असे. ज्या कंपनीचा प्रोग्रॅम हॅक केला, तिला "तुमच्यात खिंडार आहे" हे सांगणारा एक i-Alert नावाचा प्रोग्रॅमही वॉटर्सनं घडवला! तर २००५ साली वॉटर्सनं त्याची कंपनी चार कोटी डॉलर्सना विकली, आणि तो इतर कामांना लागला. वॉटर्स हा खिंडारांचा ठेकेदार मानला जात असे, कारण तो आपल्या माणसांकरवी खिंडारं दुरुस्तही करून देई.

काही जण मात्र खिंडारलेल्या कंपन्यांशी संपर्क साधून ठेकेदाराऐवजी दलाल या पातळीवर जात. हॅकर्सना शेकड्यांत मिळणारे डॉलर्स दलालांच्या हाती सहज लाख-दीड लाखांना जात. मुख्य गिऱ्हाईक असायचं USAचं सैन्य. पण जागतिक राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलं. नोव्हेंबर १९८९ मध्ये बर्लिन भिंत पडली आणि USSRच्या विघटनाला सुरुवात झाली. १९९२ मध्ये USSRचा एक एकमेकांशी झगडणारा देश-संच झाला. USAमध्ये मात्र संरक्षण बजेट्स ६५-७०% केली गेली. बिगर-सरकारी इंटरनेट स्फोटक वेगानं वाढू लागलं, आणि संरक्षण खातं त्या वाटेनं आपले खिंडार-साठे वाढवू लागलं. काही अडचणी होत्या. सरकार-हॅकर कंत्राटांमघ्ये एक गुप्ततेचं कलम असायचं, NDA (नॉन-डिस्क्लोजर ऍग्रीमेंट). त्यामुळे अनेक हॅकर्स एकच खिंडार सेनेला पुनःपुन्हा विकण्याच्या घटना घडत. ही द्विरुक्ती रोखायची क्षमता सेनेकडे नव्हती. बरं, अनेक प्रसिद्ध US कंपन्या धडकून हॅकर्सना नोकऱ्याही देऊ लागल्या, आणि थेट खिंडारं विकतही घेऊ लागल्या. यांपैकी अनेक हॅकर्स इझ्राएली, माजी USSRचे घटक देश वगैरेमधील असायचे, तज्ज्ञ, पण निष्ठा शंकास्पद असलेले.

सेनेशिवाय इतरही US खाती खिंडार-साठे घडवू लागली; उदा. अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवणारे, कर-आकारणी करणारे इ. इ . अशा गोंधळाच्या स्थितीबद्दल एक बोरेनस्टाईन नावाचा हॅकर म्हणाला "जग नष्ट होईल ते अपघातानंच, असं अनेक लोक सांगतात. आणि अपघात घडवण्यातले पेशेवर (Professional) तज्ज्ञ संगणक क्षेत्रातून येतात!" हा बोरेनस्टाईन असातसा तज्ज्ञ नाही. मेलसोबत 'अटॅचमेंट' पाठवायला आपण जी 'पेपर क्लिप' वापरतो, तिचा तो संशोधक आहे!

चार्ली मिलर नावाच्या एका गणिती हॅकरला ही स्थिती दुखत होती. त्यानं सरकारी नोकरी सोडून खाजगी 'प्रॅक्टिस' सुरू केली. त्याला जाणवलं की सरकार हॅकर्सना मानानं वागवतं, पण पगार कमी देतं. उलट मोठ्या कॉर्पोरेशन्स पगार चांगले देतात, पण हॅकर्सना किडामुंगी समजतात. त्यानं पेशेवर सभांमधून हा प्रकार मांडायचा प्रयत्न केला, आणि खिंडार-बाजार उघड आणि नियंत्रित करायचं सुचवलं. तोही उत्तम आज्ञावल्या रचणारा होता; आणि ब्लॅक-हॅट, डेफ-कॉन वगैरे नावांनी भरणाऱ्या सभांमध्ये त्याला मान होता. आता सर्व तरुण हॅकर्स त्याचे समर्थक, आणि सरकारी खाती आणि कॉर्पोरेशन्स मात्र विरोधात असं चित्र दिसू लागलं. या गुप्त बाजारातले अर्थ-व्यवहार मात्र 'दिन दूना, रात चौगुना' अशा वेगानं वाढत होते. CIA या अमेरिकेच्या प्रमुख हेर-खात्याला हे व्यवहार झेपेनात. एक NSA (नॅशनल सिक्यूरिटी एजन्सी, किंवा त्राग्यानं 'नो सच एजन्सी') नवं खातं घडवून सर्व SIGINT (सिग्नल्स इंटेलिजन्स) त्यांच्याकडे सोपवला गेला..... पण CIA ही खिंडारं घेतच राहिली!

या नव्या खात्याचं 'घर' होतं सँडिया प्रयोगशाळा (अणुबॉम्ब रचणाऱ्या Los Alamos प्रयोगशाळेजवळ!). तिचा पहिला प्रमुख जेम्स आर.गॉस्लर हा सरकारी खिंडार-व्यवहारांचा पालक, गॉडफादर . तो १९८३ साली NSAत शिरला, आणि १९९० साली पाच लाख डॉलर्स असलेलं बजेट १९९५ मध्ये पाच कोटींना गेलं. कारण सोपं होतं. USAचा मॉस्को दूतावास खिंडारांमुळे 'गळत' (लीक होत) होता. सर्व उपकरणं अमेरिकन असूनही हे का घडतं, ते गॉस्लरनं उकलून दाखवलं. त्याच्या मते विश्वासार्ह, गप्प बसणारी, महत्त्वाकांक्षी, कुशल आणि ध्येयनिष्ठ माणसंच NSAला यशस्वी करू शकतील. अशा लोकांचा एक संच घडवून TAO (टेलर्ड ॲक्सेस ऑपरेशन्स) हा गट त्यानं सुरू केला. ११ सप्टेंबर २००१ (नाईन-इलेव्हन) हल्ल्यांनंतर अनेक कायदे खिंडार-बाजाराला अनुकूल झाले. पेट्रियट कायदा, फॉरिन इंटेलिजन्स अँड सर्व्हेलन्स कायदा वगैरेंनी दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टी भेदायला कोर्टाची परवानगी लागते, हे तत्त्वच नाकारलं. बचाव असा दिला जातो "चिनी लोक नाही आमच्या व्यापारी उत्पादनांचं हॅकिंग करत?"
Huawei या चिनी कंपनीनं अशा प्रकारचं व्यापारी हॅकिंग केल्याच्या आरोपावरून अनेक वर्षं त्यांची उत्पादनं विकत घेण्यावर अमेरिकन कंपन्यांना बंदी होती.

महासत्ता

आता USAच्या मॉस्को दूतावासातून माहिती "ऐकणारे" दुष्ट, अमेरिकन धंद्याची गुपितं "फोडणारे"दुष्ट, पण तरी USA सुपरपॉवर का?

इराणनं स्वतःचे अणुबॉम्ब्ज घडवायचं ठरवलं. यातला कळीचा टप्पा असतो युरेनियम शुद्धीकरणाचा. त्यासाठी सेंट्रिफ्यूज हे उपकरण वापरावं लागतं, तेही वारंवार. तर इराणकडे २००८ साली सुमारे ८,७०० सेंट्रीफ्यूजेस होते. इझ्राएल त्यांच्यावर बॉम्ब टाकू इच्छित होता. USAला मात्र सायबर-शस्त्र मोहवत होतं. एक स्टुक्सनेट (Stuxnet) नावाची अळी एका सेंट्रिफ्यूजमध्ये पाठवायची. तिचे तुकडे एकत्र होतील, यंत्र बंद पाडतील, आणि इतर यंत्रांनाही लागण होत जाईल! आधी USAमध्येच एका सेंट्रिफ्यूजला "आजारी पाडून" तो अळीमुळे फुटतो, हे सिद्ध केलं गेलं. मिनिटाला लाख किंवा जास्त वेळा चक्राकार फिरणारं यंत्र फुटतंही जोरानं! चाचणी यशस्वी झाल्यावर लक्षात आलं की अळी दुरूनच पोचवता येणार नाही. तिची "हॅन्ड-डिलिव्हरी" लागेल. हेही काम इझ्राएलच्या मदतीनं केलं गेलं; कारण इराणनं एक प्रेस-सभा घेतली, ज्यात घेतलेल्या फोटोंवरून खिंडारासाठीची चोरवाट सापडली! एकूण सात वेगवेगळ्या खिंडारांच्या संगनमतानं अळी सक्रिय झाली. २००९च्या अखेरीला ८,७००पैकी २,००० सेंट्रीफ्यूजेस बंद पडले. स्टुक्स्नेट अळी मात्र तेवढ्यानं थांबेना. ती जगभर विविध यंत्रणांना लागण करत जून २०१०मध्ये स्वगृही, USAत परतली! निकोलनं STUXNET (आणि त्यावरचा इलाज!) शोधणाऱ्या रॅल्फ लँगनरला प्रत्यक्ष भेटीत विचारलं "परतल्यानंतर अळीचं काय झालं?" लँगनरनं प्रतिप्रश्न केला "तुला खरंच जाणून घ्यायचं आहे?" तर....अशा घडतात महासत्ता!

सर्वांनाच हे पटतं असं मात्र नाही. पीटर जी. न्यूमन (Peter G. Neumann) हा संगणकतज्ज्ञ अखेर म्हणाला की "हेरगिरीच्या अतिरेकानं अमेरिका स्वतःलाच इजा करते आहे." न्यूमनला वजन यासाठी की आईन्स्टाईनशी व्यक्तिशः बोललेला तो शेवटचा हयात माणूस आहे! हेरगिरीचा अतिरेक कसा? २००७ साली एक सायबर कमांड घडवली गेली. तिचं पाहिलं बजेट २.७ अब्ज डॉलर्स होतं. २०१२ साली ते बजेट सात अब्ज झालं. सेनेची इतर अंगं आणखी सात अब्ज सायबर सेवांवर खर्च करत होती. यात US सुरक्षा जास्त मजबूत करण्याचा भाग नगण्य होता. मुख्य खर्च हल्ला करण्याची नवनवी तंत्रं शोधण्यावर होत असे. सायबर कमांडमध्ये आधी ९०० माणसं असत, ती वाढत जाऊन १४,००० झाली. इतर देशांच्या व्यवस्थांमध्ये जी हेरगिरी केली जाई तिचा जेमतेम एक-अष्टमांश भाग नियमितपणे तपासाला जात असे. त्यासाठी TURBINE नावाचा एक रोबॉट घडवला गेला. आधीचे प्रोग्रॅम्स बिघडवणं, इतर घुसखोरांना भरकटवणं, हाती लागेल तो डिजिटल माल चोरणं इ.इ. सायबर सेवा दिल्या जात. जर्मन Der Spiegel या वृत्तपत्रानं तर सायबर-शस्त्रांची एक पन्नास पानी पुस्तिकाच प्रकाशित केली!

पण हॅकर्सही आपण नैतिक भूमिका काय घ्यावी याबाबत संभ्रमात पडत. एका कुर्द (Kurdish) माणसाला प्रशिक्षण देताना एक तुर्की नागरिक भेटला. तुर्की सैन्यानं कुर्दांना, त्यातही या कुर्द माणसाच्या कुटुंबीयांना, बराच त्रास दिला होता. आपल्या 'विद्यार्थ्यात' त्या कुर्दाला ऑश्वित्झ या नाझी छळछावणीतल्या पहारेकऱ्यांचा भास होऊ लागला! वर USAने शड्डू ठोकायला सुरुवात केली; NOBUS (नोबडी बट US) नावानं की आमची खिंडारांची गरज आम्हीच पूर्ण करू. स्पष्टीकरण असं की रशिया, चीन आपल्या नागरिकांकडून हुकूम देऊन जी कामं करवून घेतात, त्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागतात, तेव्हा आमचेच माजी हेर हॅकिंग कंपन्या काढतील!

एकाच संस्थेच्या दोन भागांत विसंवाद आहे असं सुचवायला इंग्रजीत "डाव्या हाताला माहीत नाही उजवा हात काय करतो आहे ते" म्हणतात. जॉन ल कॅरेच्या एका हेरकथेत याचं अतिशयोक्त रूप भेटतं , "डाव्या हाताला माहीत नाही की डावाच हात काय करतो आहे"! काही हॅकर्स सांगत की ते सामुराई योद्ध्यांचा 'बुशीदो' (Bushido ) धर्म पाळतात; कठोर व्रत, ते. निकोल म्हणते की ते 'बुलशिट' (कचरा या अर्थी) धर्मच पाळत होते. एकदा तर USA हॅकर्स तेव्हा राष्ष्ट्राध्यक्षाची पत्नी असलेल्या मिशेल ओबामांचे प्रवास कार्यक्रम हॅक करत होते !

पेगॅसस

२०१६ साली एक भरवशाची माहिती देणारा खबऱ्या निकोलकडे आला. तो म्हणाला "माझ्या लॅपटॉपचे फोटो (स्क्रीनशॉट) काढ. त्यांच्या छापील प्रिंटआउट आवृत्त्या काढ. मग तुझा लॅपटॉप, क्लाउड स्टोअरेज वगैरे सर्व जागांवरून हा प्रकार पुसून टाक. कोणताही पुरावा ठेऊ नकोस." हे करणं खूप कठीण असतं, पण निकोलनं ते केलं. सगळे कागद NSO या इझ्राएली हेर-संस्थेबद्दल आणि पेगॅसस नावाच्या कशाबद्दल तरी होते. NSO ही २०११साली सुरु झालेली कंपनी हाती. पेगॅसस हे स्मार्ट-फोन्स हॅक करणारं शस्त्र होतं.

माहिती खाजगी ठेवण्यासाठी Apple, फेसबुक, गूगल वगैरे मोठ्या कंपन्या आपापले माहितीचे साठे सतत एका सर्व्हरकडून (संपर्क-संगणक) दुसऱ्याकडे टोलवत ठेवतात. जर कोणी दुरूनच फोन्स हॅक करू शकलं, तर ही हातचलाखी निष्फळ ठरते. या एका कौशल्यानं पेगॅसस फोन संभाषणं, टेक्स्ट संदेश, इ-मेल्स, स्काईप-झूम नोंदी, भेटीगाठींच्या नोंदी, GPS स्थानदर्शक माहिती वगैरे सगळं चोरू शकतं आणि या चोरीची नोंदही मागे राहत नाही. एक रूम टॅप नावाची जादा सेवाही मिळते. ती खोलीतले आवाज, फोटो वगैरेही 'उचलून' पाठवते. फोन्सचे स्क्रीनशॉट फोटो घेणं, जुन्या शोध-मोहिमा (browsing histories) चोरणं , काही व्यक्तींचे फोन्स 'बाहेरच्या बाहेरून' टोलवणं वगैरे सेवाही पेगॅसस देतं. लपून बसण्याची एक खतरनाक युक्तीही पेगॅससला जमते. सगळी माहिती चोरून बाहेर पाठवायला वीज लागते. पण बॅटरी फार उतरू न देता माहिती साठवून ठेवायची, आणि WiFi-चार्जिंग चालू असतानाच फक्त माहितीचं 'हस्तांतरण' करायचं, हेही पेगॅससला जमतं. त्याला बॅटरी-संवेदनशील असणं असा तांत्रिक शब्द आहे! एका फोन किंवा संगणकातून दूरवरच्या यंत्रालाही (air-gapped) लागण करता येते. पेगॅसस हे आपल्या समुद्रमंथनातून निघालेल्या घोड्यासारखं पौराणिक नाव आहे. ते किती सार्थ आहे हे त्याच्या कोशल्यांच्या यादीवरून जाणवलंच असेल.

आता ही कौशल्यं देणारं शस्त्र NSO स्वस्तात विकत नाही. तशीही NSO उत्पादनं इतरांपेक्षा दुप्पट महाग असतात. तर पेगॅससचा खर्च साधारण असा : पहिल्या दहा फोन्सना हॅक करायला $११.५ लाख (सुमारे रु. ९ कोटी) पुढे मात्र सरासरी $८,०००ना (सुमारे रु. ६.२ लाख) एकेक फोन जोडता येतो; पण शंभर किंवा जास्त जोडण्या लागतात. NSOचा दावा आहे की ते ही प्रणाली फक्त सरकारांना विकतात. त्यांच्या गिऱ्हाईक यादीत पन्नासेक देशांसोबत भारतही आहे. आणि कोणत्याही सरकारला ११० फोन्सवर पाळत ठेवायला १५ कोटी रुपये सहज परवडतात. फार कशाला, भारतातल्या अनेक राज्यांनाही तो खर्च सहज झेपतो. अगदी राज्य-CID, CBI, ED, IB, RAW वगैरेंनाही तो झेपेल. अर्थात, ती सर्व हॅकिंग-हेरगिरी स्वतःच्याच नागरिकांवर असेल. संवैधानिक तऱ्हेनं असं करणं अवघड असतं. पण असल्या अडचणींना सरकारं, सरकारी खाती वगैरे कधी घाबरतात!

तर हा "पवन वेग से उडनेवाला घोडा"(चित्रपट 'जय चितोड' १९६१) संयुक्त अरब अमिरातींनीही घेतला. त्यांच्या एका अहमद मन्सूर नावाच्या नागरिकाला काही विचित्र मेल्स आल्या, त्यांच्यात NSO आणि पेगॅसस हे शब्द वारंवार येत होते. त्यानं काही अमेरिकन मित्रांना ते संदेश पाठवले, "हे काय आहे?" विचारायला. त्याला २०११ साली गुन्हा "राजघराण्याचा अवमान" यासाठी पकडलं. मन्सूर टेलेकॉम तज्ज्ञही आहे आणि कवीही आहे! तो निकोलला म्हणाला "बंदुकीत गोळीही भरता येत नसून तुम्हाला आतंकवादी ठरवलं जातं!" तो, त्याची पत्नी यांचे फोन्स टॅप होताहेत हे कळल्यावर नातलग आणि स्नेह्यांनी त्यांना वाळीत टाकलं. २०१६ मध्ये "सामाजिक एकी व सुसंवाद बिघडवणे" या गुन्ह्यासाठी मन्सूरला १० वर्षांची शिक्षा झाली. पहिली दोन वर्षं तरी तो एकांत-कोठडीत आहे.

२०१६पर्यंत निकोलनं पेगॅससची लागण झालेले सत्तरेक संपर्क-संगणक (Servers) आणि ४००हून जास्त माणसं शोधून जाहीर केली होती. तिच्या यादीत मेक्सिको, अमिराती यांसोबत ४५ देश आहेत, ज्यांपैकी (तिच्या मते) अनेक देश मानवाधिकार जपण्याबद्दल फारसे सजग नाहीत. आणि हो, या यादीत भारतही आहे. निकोलला अनेक लोक मेक्सिकोतून मेल्स पाठवू लागले की त्यांनाही विचित्र आणि बहुधा लागण झालेल्या मेल्स येत होत्या. बहुतेक जण साधे डॉक्टर, पोषणतज्ज्ञ वगैरे लोक आहेत; पण एक नाव निकोलच्या NYT पेपरच्या मेक्सिकोतील प्रमुखाचंही आहे. NSO आणि इझ्राएल मात्र "आमचा संबंध नाही" असंच सांगताहेत.

एका नमुन्याची लोकशाही!

निकोलनं सँडिया प्रयोगशाळेच्या गॉस्लरला विचारलं की 'अभेद्य' प्रोग्रॅम्स लिहिता येणार नाहीत का. त्यानं एका हॅकर्सच्या सभेत एक छोटासा दोन हजार लाईनींचा प्रोग्रॅम लिहिला, जो तज्ज्ञ हॅकर्सनाही भेदता आला नाही, दोन खिंडारं मुद्दाम ठेवली असूनही! २००९ अखेरीला गूगलला एक इकडेतिकडे 'पळणारं' खिंडार सापडलं. सिलिकन व्हॅलीत प्रथम सापडलेलं हे 'उडतं' खिंडार जगभरात व्हॅलीबाहेर, गूगलबाहेरही दिसू लागलं. त्याला AURORA असं नाव दिलं गेलं, आणि ते चिनी बनावटीचं आहे असं समजून गूगलनं चीनला दमदाटीही करून पाहिली. AURORA हा पाच कोटी लाईन्सचा प्रोग्रॅम आहे. त्यात खिंडारं असणारच. पण ती शोधणं-बुजवणं मात्र शक्य दिसत नाही. बरं, चीन ही इतकी प्रचंड बाजारपेठ आहे की तिला धमक्या देता येत नाहीत. असं मानलं जातं की गूगलनं ALPHABET ही वेगळी कंपनी काढणं ही चीनपुढे स्वीकारलेली शरणागती होती. २०१६साली हे घडेपर्यंत BAIDU, TENCENT. ALIBABA वगैरे चिनी कंपन्या सिलिकन व्हॅलीत दुकानं आणि कारखाने थाटून USA कंपन्यांचं मार्केट आणि तंत्रज्ञही चोरू लागल्या होत्या!

विदेशांना धमकावणं तसंही सोपं नसतं. USA सेना (आणि सरकार) मोठ्या US कॉर्पोरेशन्सना काही माहिती 'दोस्तीत' मागत असे, तर कधीकधी कोर्ट-कचेऱ्यांचा वेळखाऊ बडगा उगारून माहिती घेत असे. ९/११ हल्ल्यांनंतर याला एक देशप्रेमाचा रंगही आला. पण USA हा भांडवलवादी देश आहे, "धंधे के लिये कुछ भी करेगा" नमुन्याचा. अखेर एका कॉर्पोरेशन-शिष्टमंडळानं क्लिंटन सरकारला भेटून सांगितलं की आम्ही तुम्हाला माहिती देतो हे सहज उघड झालं तर आमचं विदेशी मार्केट कमी होईल. तर आज यंत्रसामग्रीच नाही, प्रोग्रॅम्सच नाहीत, खिंडारंही US कॉर्पोरेशन्स "आउटसोर्स" करतात! मध्ये एकदा बिल गेट्सनं "मला सोयी-सवलती दिल्या नाहीत तर मी कंपनी उचलून बंगळुरूला नेईन." असं म्हटल्याचं अनेकांना आठवत असेल. तो Y2Kचा काळ होता. आज भारत एकटाच नाही! एका हॅकर सभेत एक आर्जेन्टिनियन हॅकर निकोलला म्हणाला "आज खिंडारांसाठीचा भारत आहोत आम्ही!" एका यंत्राशी कोणताही संपर्क न येता दुसऱ्या यंत्रात जाणारं खिंडार, वगैरे स्टुक्स्नेट किंवा पेगॅसस दर्जाची खिंडारं पाहून निकोलनं विचारलं "पण हे विकत घेणारं चांगलं पाश्चात्य सरकारच असेल, हे तुम्ही कसं ठरवता?" सोबती म्हणाला "चांगलं पाश्चात्य सरकार?", ज्या प्रश्नाचा अध्याहृत उत्तरार्ध होता "म्हणजे काय, गं ताई?"

निकोलला वसाहतवाद संपल्यावर काय होतं आहे हे आधीही कळलं असणारच. आता तिला साक्षात्कार झाला "हे नवे अणु-शास्त्री आहेत !" आणि मग "काय करून बसलो आहोत, आपण!"

१५ ऑगस्ट २०१२ला इराणनं सूड उगवला. त्यांनी ARAMCO या महाकाय तेल कंपनीचं जंजाळ भेदलं. USA मधली क्रेडिट-डेबिट कार्ड्स मोठ्या प्रमाणावर हॅक होत असतात. एकदा तर राष्ट्राध्यक्ष ओबामाचं कार्डही हॅक झालं ! आज इराणी अणुबॉम्ब घडवायला पूर्वीच्या ८,७०० सेंट्रिफ्यूजेसऐवजी अठरा हजार काम करताहेत.

ऑगस्ट २०१३मध्ये US संरक्षण-मंत्री पॅनेटा याला फोन आला की आम्ही दुरूनच एका मोठ्या धरणाचे दरवाजे उघडतो आहोत. दारं उघडली गेलीही, पण तसल्याच नावाच्या एका लहान धरणाची ! हा 'नमुना', Demo होता!

लास व्हेगसचा 'सॅण्डस' जुगारखाना, 'द इंटरव्यू' या चित्रपटाचं कार्यालय वगैरे खाजगी संस्थाही 'फोडल्या' गेल्या आहेत. मुळात हे USAला नाक खाजवून दाखवणं आहे.

एका घटनेत अपेक्षेपेक्षा खूपच जास्त व्यवहार झाल्यानं US वित्त-बाजार डगमगला, आणि बंद पडला. आम्हाला लहानपणी एक गोष्ट सांगत. एक उद्योजक एका बँकेवर चिडला. त्यानं शेकडो लोकांना बँकेत मामुली रकमा भरायला पाठवलं, आणि मामुलीच रकमा काढायलाही! याच कथेची Internet of Things जमान्यातली ही कथा ! तर काय, आज USAला नाक खाजवून दाखवणारे अनेक लहानथोर देश आहेत. एका तुलनेनं ताज्या घटनेत तर USचा राष्ट्राध्यक्ष होऊ पाहणाऱ्यानं निवडणुकीसाठी रशियन हॅकर्सची मदत घेतल्याचा आरोप आहे!

रशियानं IRA (इंटरनेट रीसर्च एजन्सी) नावाचं एक खातं सुरू केलं. उद्दिष्ट होतं "२०१६च्या USA निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांवरचाच नव्हे, तर एकूण राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास दुबळा करणे." २०१४ मध्ये दोन रशियन स्त्रिया कॅमेरे घेऊन अमेरिकेची वारी करून गेल्या. अमेरिकन वार्ताहर रिपब्लिकन राज्यांना 'लाल' रंग देतात, डेमोक्रॅटिक राज्यांना 'निळा' आणि अनिश्चित राज्यांना जांभळा. तर या स्त्रिया मुख्यतः जांभळी राज्यं कसा विचार करतात हे चाचपून गेल्या. रशियानं त्यांचा अहवाल वाचून धोरण ठरवलं; की बर्नी सँडर्स (जो जिंकून यायची काडीमात्र शक्यता नव्हती) आणि डॉनल्ड ट्रम्प यांना सोडून सर्व उमेदवारांवर सतत टीका करायची. अर्थातच २०१६ साली याचा अर्थ होता हिलरी क्लिंटनवर टीका! मतदार याद्यांमध्ये खिंडारं पाडायचंही ठरलं. प्रत्यक्षात काळे अमेरिकन क्लिंटनपासून दूर गेले, आणि ट्रम्प जिंकला.

२०१६ ऑगस्टमध्ये NSAचा सायबर शस्त्रसाठा आपल्या हाती लागल्याचा दावा करणारा एक ट्वीट जगभर फिरला. नंतर WannaCry (रडायचं आहे) या नावानं अनेकांच्या खात्यांना खंडणी-खिंडारं पडली. या ransomware प्रकारात तुमची माहिती चोरली जाते, आणि काही पैसे देऊनच ती परत मिळते, बहुधा काही भाग गाळून. अखेर ओबामा आणि चीनचे क्षी जिनपिंग तह करण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले!

म्हणजे जगभरातले देश USA ची दादागिरी सहन तर करत होते, पण प्रत्युत्तरंही देत होते !

ग्रिड आणि 'मश्रूम ढग'

आज (जून २०२२) रशिया-युक्रेन युद्ध जगाला अनेक पातळ्यांवर अस्वस्थ करतं आहे. बहुधा रशियाला आपलं साम्राज्य 'फुटल्याचं' दुःख आहे, तर युक्रेन थेटच रशियाच्या शत्रूंना, NATOला जवळ करू पाहतो आहे. USAनं कितीही सांगितलं की NATO हा बचावात्मक देश-समूह आहे, तरी नकाशा सांगतो की तो समूह रशियाची नाकेबंदी करतो आहे. पण फार पापं केली नसतील तर जगाची सहानुभूती लहान देशांकडे जाते. तसाही पाश्चात्य देशांचा रशिया-द्वेष हाच स्थायीभाव आहे. एरवी फिनलंड हा देश हिटलरतर्फे दुसऱ्या महायुद्धात लढला, हे विसरलं गेलं नसतं. आज फिनलंडची ख्याती शांतीप्रिय आहे. नेहेमीच ती तशी नव्हती.

२०१० पासून तज्ज्ञ लोक US सरकारला सांगत होते की अमेरिकेची वीज ग्रिड, रस्ते आणि रेल्वे व्यवस्था, वगैरे जंजाळांची संरक्षण-व्यवस्था बेभरवशाची आहे. २०१२पर्यंत या US रचनांवर सुमारे २०० हल्ले झाले. असंही सांगितलं जाऊ लागलं की इतर अनेक देशांच्या सायबर क्षमता USA इतक्याच आहेत. रशियाची वीज ग्रिडही तशीच हळवी होती, आणि तो देश २०३० सालांपर्यंत ग्रिड पूर्णपणे स्वयंचलित करू पाहत होता.

पण रशियानं एक अळी घडवली होती, USA नं 'सॅन्डवर्म' (Sandworm) असं नाव दिलेली. ती अळी घुसते, इजा करते, भटकते आणि अखेर स्वतःला नष्ट करते. यानं म्हणे नेमके लक्ष्यभेद शक्य होतात. USA च्या होमलँड सिक्युरिटी खात्यानं अळीचा अभ्यास करून अहवाल दिला, २०१४ मध्ये. २०१५ मध्ये तिनं युक्रेनी ग्रिडवर हल्ला केला. २३ डिसेंबर २०१५ला दुपारी साडे-तीनला युक्रेनमधले दिवे बंद पडले, टप्प्याटप्प्यानं. मग फोन नेटवर्क्स बंद पडली, आणि शेवटी वीज सब-स्टेशन्सचा आपात्कालीन वीज पुरवठा बंद पडला.

अशीच कहाणी जास्त गंभीर रूपात २०१९ साली घडली. USA नं एक रोगाणू बनवला, Petya नावानं. तो चोरून रशियनांनी जास्त जहाल केला. आणि या साऱ्याचा USA, युक्रेन वगैरेंना अंदाज होता. ते पेट्याशी लढू, अशा तयारीतही होते. मधल्या काळात मात्र रशियानं एक वेगळीच आवृत्ती रचली, जिला युक्रेनी 'नॉट-पेट्या' (notPetya) म्हणू लागले. त्यानं २०१९ अखेरीस युक्रेनी ग्रिड तर बंद पडलीच, पण चेर्नोबिल अणु-दुर्घटनेनं प्रभावित क्षेत्रातली किरणोत्सार मोजणारी यंत्रणाही बंद पाडली! एप्रिल १९८६ मधला चेर्नोबिल अणु-भट्टीतील स्फोट हा इतिहासातला सर्वांत मोठा अपघात मानला जातो. USSR चे शेवटचे अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह असंही म्हणून गेले आहेत की USSR च्या विघटनामागे चेर्नोबिल हेही एक कारण होतं. चेर्नोबिल युक्रेनमध्ये, पण रशियाशी असलेल्या सीमेजवळ आहे. वर्षानुवर्षं दोन्ही देश मिळून किरणोत्सार मोजत, त्यातली वध-घट पाहत, एकूण 'नजर ठेऊन' आहेत. २०१९मध्ये मात्र रशियानं मोजमाप यंत्रणाही बंद पाडली. मोजमाप-प्रमुख सर्जेइ गोंचारोव म्हणतो "आता कालगणना नॉट-पेट्याआधी आणि नॉट-पेट्यानंतर, अशी झाली आहे." गोंचारोवनं हातात धरायची उपकरणं वापरून, माणसांना अपघातक्षेत्रात पाठवून मोजमाप मात्र चालूच ठेवलं! सगळे युक्रेनी निकोलला एक मात्र आवर्जून सांगत "ही सगळी शस्त्रं, अस्त्रं, तंत्रं घडवली जाताहेत, ती तुमच्यावर (USA) वापरायला! आम्ही फक्त 'चांचणी-उंदीर' आहोत!"

असले हल्ले एकमेकांवर करणं, मग ते नॉट-पेट्या पातळीला पोचोत की न पोचोत, याचे मानसिक परिणाम काय होतात? त्यांचं वर्णन FUD असं केलं जातं; फियर, अनसर्टन्टी व डाउट. एक सततची भीती, कशाचीच खात्री नसणं आणि प्रत्येक व्यक्ती-वस्तू-घटनेवर शंका घेणं. USA नं इराकवर 'डेझर्ट स्टॉर्म' नावानं दोन युद्धं लादली. त्यांमधल्या काळात इराकमधली मानसिक रोगांसाठीच्या औषधांची मागणी दुपटीनं वाढली. आज एकमेकांच्या ग्रिड्स, एकमेकांच्या मूलभूत सोयी यांवर सतत सायबर हत्यारं उगारल्यानं USA, रशिया, युक्रेन, तुम्ही-आम्ही FUDमध्ये लोटले जाणारच. पण याची जाणीव, या धोक्यावर इलाज-उपाय शोधणं वगैरे काही होताना दिसत नाही.

हेही खरं नाही ! ट्रम्पच्या राजवटीत दोन मोठे बदल झाले. रोजच्या रोज राष्ट्राध्यक्षाला दिला जाणारा हेरगिरी अहवाल (Intelligence Report) ऐकणं ट्रम्पनं सोडून दिलं, कारण "कंटाळा येतो"! आणि २०१६ निवडणुकीत रशियाची मदत घेण्याच्या आरोपांवर ट्रम्प म्हणाला "रशिया, रशिया काय लावलं आहे? आपल्याला काय इतर शत्रू नाहीत का?" कोणीच आपलं ऐकत नाही या भावनेतून NSO (USA) आणि FSB (रशिया) या हेरसंस्थांच्या प्रमुखांनी एकमेकांना निरोप दिले की ग्रिडहल्ले अणु-केंद्र व तसल्या महत्त्वाच्या जंजाळांपासून दूर ठेवले जातील! ट्रम्प अर्थातच याला "देशद्रोहासारखा प्रकार" म्हणाला.

हो; या सर्व देशांच्या ग्रिड्समध्ये अणु-ऊर्जा केंद्रंही आहेत. मस्करीची कुस्करी होऊन केव्हा कोणत्या क्षितिजावर तो अळंबीच्या आकाराचा मश्रूम ढग उगवेल?

एक मुद्दा असा मांडला जाऊ शकतो की सगळ्यांना सगळं काही कळलं पाहिले असं मानून या पुस्तकाचं परीक्षण केलं जात आहे. पण सामान्य माणसांनी या नव्या शस्त्राबद्दल, शस्त्रस्पर्धेबद्दल अनभिज्ञ असणं धोक्याचं आहे, असं मला तरी वाटतं. कोविड-लॉकडाऊन स्थितीनं आपलं सायबर-अवलंबित्त्व अपार वाढवलं आहे. 'वर्क फ्रॉम होम' हीच जीवनशैली योग्य, असं अनेक जण मुक्त स्वीकारायला लागले आहे. माझ्या मते हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा 'स्क्रीन-टु-स्क्रीन', इंटरनेट ऑफ थिंग्स, अनियंत्रित कृत्रिम प्रज्ञा वगैरे गोष्टी सहज स्वीकारू नयेत, या इच्छेतून हे परीक्षण करतो आहे. आणि ज्या देशात अर्ध्याअधिक लोकांना LBW च्या मागण्या आणि त्यावरची DRS अपील्स यांचे नियम समजतात, त्यांना काय अवघड आहे !
--
नंदा खरे

THIS IS HOW THEY TELL ME THE WORLD ENDS
The Cyberweapons Arms Race

By Nicole Perlroth
528 pp. Bloomsbury.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण लेख! अभिनंदन!!! (किती लोक हे वाचतील/वाचू "शकतील" हा मुद्दा दुय्यम आहे. प्रथम हे ज्ञान उपलब्ध तर असले पाहिजे! ते केल्याबद्दल धन्यवाद!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

>>> 'वर्क फ्रॉम होम' हीच जीवनशैली योग्य, असं अनेक जण मुक्त स्वीकारायला लागले आहे.

यात चूक काय आहे हे समजून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात "चूक" काहीही नाही. तुम्ही कुटुंबाकडेही थोडेफार अधिक लक्ष पुरवू शकता. मात्र २४ तास घरी बसून प्रचंड बोअर होऊ शकते. व्यायामाकडेही योग्य लक्ष पुरवावे लागते. पण एकूण ही दिशा योग्य आहे.
तुम्ही खुर्चीत बसलात की गुरुत्वाकर्षणाचे तुमच्या स्नायूंना, हृदयाला आणि पचनसंस्थेला मिळणारे प्रचंड फायदे बरेच कमी होतात.
एक तासाचा व्यायाम आता सर्वच लोक करीत असतील. पण सात-आठ तासांची झोप आणि एक तासाचा व्यायाम सोडल्यास उरलेले पंधरा-सोळा तास तुम्ही काय करता हेही अत्यंत महत्वाचे ठरते .
त्याबाबत दिवसात किमान ३२ वेळा उठून उभे रहाणे . उभे राहून काम करण्याचे डेस्क वापरणे . दर तासात पंधरा मिनिटे उभे राहणे. फोन इकडेतिकडे चालत चालत वापरणे .
तसेच व्यायामाच्या चालणे, धावणे, वजने उचलणे या प्रकारात शरीराच्या "मोबिलायझर " स्नायूंना उत्तम व्यायाम होतो, पण "स्टॅबिलायझर" स्नायूंकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी योगासनातून स्नायूंना "ताण " देणे हा उत्तम उपाय ठरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

उत्तम पुस्तक परिचय. नुकतीच वाचनात आलेली एक बातमी आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायबर-सेक्युरिटीमध्ये करियरला प्रचंड वाव आणि पैसा आहे हे मराठी मनुष्यास सांगायलाच नको. त्या विषयात अमेरिकेत पी एच डी केलेल्या माझ्या भाच्यास पंधरा वर्षांपूर्वीच, पहिलीच नोकरी वर्षाला सव्वा-दोन लाख डॉलर्सची लागली होती.
भारतातून गेलेल्या एच वन बी इंजिनियरलाही आज त्या फील्डमध्ये किमान लाखभर डॉलर्स मिळतात आणि ते वेगाने वाढू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आमच्या सारखे जुन्या पिढीतले, या विषयावर वर्तमानपत्रांत वाचत असतात. पण त्यातील माहिती फारच तुटपुंजी आणि पत्रकारांच्या अज्ञानावर आधारलेली असते. या लेखाद्वारे तुम्ही या सर्व प्रश्नाचे गांभीर्य आमच्यापर्यंत पोचवले आहे. जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोचले आहे हे साचेबंद वाक्य काही वर्षे ऐकत आहोत. पण त्यातली भीषणता या लेखातून जाणवली. उत्तम लेख! जास्तीतजास्त लोकांनी वाचला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाचा परिचय उत्तमरित्या करून दिला आहे. नव्या जमान्यातील नवे शस्त्र सार्थ शिर्षक आहे.

अनेकदा शास्त्रज्ञ एखादा शोध लावतात. भले त्याचा उद्देश त्यांचा काही का नसेना किंंवा लोककल्याण असू शकतो. पण ते संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचले की त्या शोधाला अनेक वाटा फुटतात. त्याचा उपयोग कोण कसा करून घेतो याला काहीच सीमा नसते. अनेक उदाहरणे या बाबत देता येतील.

हॅकींग हे आताचे नसले तरी सायबर हॅकींग आताच्या युगातील आहे. वेबसाईटवरील सायबर अ‍ॅटॅक याच उद्देशाने केले जातात. वेबसाईट तर केवळ फ्रंट एंड असते. त्याही पेक्षा महत्वाचे बॅकएंंडचे सर्वर्स असतात. त्यातील माहिती फोडणे हा मोठा उद्देश या हॅकर्सचा असतो. असले सर्व्हर्स हॅक करून संपूर्ण काम बंद पाडणे व मोबदल्यात खंडणी, ती देखील क्रीप्टो करंन्सी मध्ये वसूल करणे अशी पद्धती असते. हे एका व्यक्तीचे काम नसते. अनेक शिक्षीत गृप या टोळीचे सदस्य असतात. या इथीकल हॅकींग नावाचा प्रकारही आहे जो हॅकींग करून चांगल्यासाठी सर्वर मधील कमतरता, पोर्ट ओपन, बग्ज इत्यादी दाखवून देतात.

सायबर अ‍ॅटॅक, हॅकींग जसे वाढले आहे तशी त्यावर मात करणारे डीव्हायसेस, टेक्नॉलीजी आदी देखील बदलले आहेत. न जाणो काही आय टी कंपन्या आपले उत्पादन पुढे विकण्यासाठी देखील असे अ‍ॅटॅक करत असतील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

माझा ह्या लेखावरील आधीचा प्रतिसाद डिलीटला गेला आहे असे दिसते. नंदा खरे यांचे दुःखद निधन झाल्याचे वाचून फार वाईट वाटले. आपला समाज अंधःकारात दिवसेंदिवस अजूनच गुरफटत चाललेला असताना ह्या अशा धैर्यशील मशाली एकामागून एक विझत जाव्यात हे आपले दुर्दैव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0