एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १३

समाजातील बदल

सुधीर भिडे

मागील सहा प्रकरणांत आपण त्या काळात धर्माची काय स्थिती होती आणि धार्मिक सुधारणेसाठी काय प्रयत्न झाले, दलित आणि स्त्रियांचे काय प्रश्न होते ते पाहिले. आता आपण समाजाच्या स्थितीकडे वळू. असमानता, अज्ञान आणि गरीबी यांच्या गर्तेत समाज बुडाला होता. एकोणिसाव्या शतकात, १८१८ ते १९२० या काळात समाजात काय बदल झाले ते आपण पाहणार आहोत.

या भागात काही आकडेवारी पाहणार आहोत. आजच्या काळात भारत सरकार जी निरनिराळी आकडेवारी प्रसिद्ध करते त्याविषयी तज्ज्ञ प्रश्न उभे करतात. मग १०० वर्षांपूर्वीच्या आकडेवारी विषयी काय बोलावे! तरीही जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरून त्या काळातील समाजाच्या स्थितीची कल्पना येते.

जनगणना

जनगणनेची सुरुवात याच शतकात झाली. भारतात पहिली जनगणना १८८१ साली करण्यात आली. यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते. अशा प्रकारे भारतीय समाजाची १४० वर्षांतील वाटचालीची आकडेवारी उपलब्ध आहे. खालील तक्त्यात १८८१ आणि २०१०च्या जनगणनेचे आकडेवारीची तुलना केली आहे.

१८८१ २०१०
राज्ये १८ २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश
लोकसंख्या २५.४ कोटी १२१ कोटी
गावे ७ लाख ७९३५ गावे आणि ६ लाख खेडी
लोकसंख्येची घनता १८४ / वर्ग मैल ३८२ / वर्ग कि. मी.
हिंदू ७४% २०२० लाख हिंदू घरे
मुस्लिम १९.७% ३१० लाख मुस्लिम घरे
पुरुष % ५१ ९४० स्त्रिया दर हजार पुरुषांमागे
साक्षरता, पुरुष १०% ८२ %
साक्षरता स्त्रिया ०.६% ६५%
ग्रामीण जनता ९१%
मोठी शहरे, मुंबई लोकसंख्या ७.७ लाख १.२ कोटी
कलकत्ता लोकसंख्या ७.६ लाख १.५ कोटी
मद्रास लोकसंख्या ४. ० लाख ४६ लाख
दिल्ली ४.० लाख १.१ कोटी

दहा लाखांच्या वर वस्तीची देशात २०११ साली ४६ शहरे होती.

१९५१ २०११
हिंदू ३०.४ कोटी ९६.६ कोटी
मुस्लिम ३.५ ( ११.५%) १७.२ (१७.८%)

(Religious Composition of India, Pew Research Centre)

वरील आकडेवारीवरून हे निष्कर्ष काढता येतात -

 • गावांच्या संख्येत फार बदल दिसत नाही. पण शहरीकरण वाढले आहे.
 • १३० वर्षांत लोकसंख्या पाच पट झाली.
 • शहरीकरण आणि लोकसंख्येची घनता फार वाढली.
 • हिंदू आणि मुस्लिम यांची लोकसंख्या याची तुलना १८८१ आणि २०१० यांत होऊ शकत नाही कारण १८८१ साली सध्याचा पाकिस्तानाचा भाग भारतात होता. त्यासाठी १९५१ आणि २०१० या जनगणनांच्या आकडेवारीची तुलना केली. मुस्लिमांची टक्केवारी वाढत आहे.
 • साक्षरतेत चांगली वाढ झाली.

कुटुंब

कुटुंब समाजाचा सर्वांत लहान घटक असतो. या काळातील कुटुंबे कशी होती? १८१८च्या सुमारास मुलींची लग्ने ५ ते ८ या वयांत आणि मुलांची ८ ते १२ या वयांत होत. शतकाच्या शेवटी ही वये थोडी वाढली. मुलींची लग्ने १० ते १२ आणि मुलांची १५ ते १८पर्यंत होऊ लागली. विधवांचा विवाह होत नसे. विधवा झाल्यावर स्त्रियांना माहेरी परत पाठविण्यात येई. विधवांना केस कापून टाकावे लागत आणि लाल रंगाची साडी नेसावी लागे. विधवा आश्रितासारख्या रहात आणि घरातील पडेल ते काम करावे लागे. अशा विधवा पुष्कळ कुटुंबांत राहताना दिसत. संयुक्त कुटुंबात दहा बारा व्यक्ती रहात. मुले वडिलांचा व्यवसाय पुढे चालवीत.

१९९१च्या जनगणनेनुसार पुण्यात प्रत्येक कुटुंबात सरासरी ४.५ व्यक्ती होत्ये. यावरून शहरात एकत्र कुटुंबव्यवस्था नाहीशी होत चालली असे दिसते.

लोकसंख्या

लोकसंख्या आणि आयुर्मान हे आकडे पूर्ण देशाचे आहेत, फक्त महाराष्ट्राचे नाहीत.

बॉम्बे प्रेसिडेंसीची लोकसंख्या १९२१ साली २.६७ कोटी असल्याचा उल्लेख मिळतो (History of Education in Bombay Presidency, University of Chicago study, L. L. Andrew, 1925). सध्याची लोकसंख्या १२.५७ कोटी आहे. याचा अर्थ शंभर वर्षांत लोकसंख्या पाचपट झाली. वर पाहिल्याप्रमाणे देशाचीही लोकसंख्या पाचपट झाली. या आकडेवारीकडे आपण दोन प्रकारे पाहू शकतो. लोकसंख्या पाच पटीने वाढूनही आज आपली सामाजिक स्थिती १८१८ सालापेक्षा पुष्कळ चांगली आहे. दुसर्‍या बाजूने विचार केला तर ही लोकसंख्येची वाढ थांबविली असती तर आज जगातील श्रीमंत देशात आपली गणना झाली असती. लोकसंख्या वाढीविषयी प्रथम विचार आगरकरांनी प्रगट केले. त्यानंतर रघुनाथराव कर्वे यांनी संततीनियमनाचा प्रसार केला. रघुनाथराव कर्व्यांच्या कामानंतर शंभर वर्षांनी भारत सरकारच्या २०२०च्या आकडेवारीनुसार लोकसंख्यावाढ आता थांबलेली आहे असे दिसते. नॅशनल फमिली हेल्थ सर्वेक्षणानुसार सरासरी जननदर (Fertility Rate) १९५० साली ५.९ होता तो २०२०- २१मध्ये २ झाला. काही वर्षात भारताची लोकसंख्या कमी होऊ लागेल. सर्वेक्षणातून असे दिसते की जननदर शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षण जास्त तेवढा जननदर कमी.

आयुर्मान

(Life expectancy in India 1800-2020, Statista, Aaron O'Neill, Apr 8, 2020).

वर्ष आयुर्मान भारत आयुर्मान इंग्लंड
१८०० २५ ३९
१८५० २५ ३९
१८८० २२ ४५
१९२० २१ ४८
१९४० ३१ ६४

भारतात १८०० साली आयुर्मान २५.४ वर्षे होते. पुढे शंभर वर्षे आयुर्मान त्या आसपास राहिले. तसे पाहता १८७०पासून १९१०पर्यंत आयुर्मान कमी झाले. कारण त्या काळात दुष्काळ आणि रोगांच्या साथी आल्या. या सर्व कारणांनी आयुर्मान कमीच राहिले. स्त्रियामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पुरुषांनी दोन-तीन लग्ने करणे हे सामान्य असे. १८७० साली लोकसंख्या २४ कोटी होती आणि वाढीचे प्रमाण १० टक्के होते. विसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचे प्रमाण २० टक्के झाले. एकोणिसाव्या शतकात कमी आयुर्मानामुळे कुटुंबात जास्त माणसे नसत. विसाव्या शतकात कुटुंबांचा आकार मोठा झाला. १९२०पासून आयुर्मान आणि लोकसंख्या वाढत गेली. सध्या आयुर्मान ६९.७ आहे.

इंग्लंडच्या आयुर्मानाशी तुलना केली तर त्या काळात इंग्लंडमधील लोकांचे आयुर्मान भारताच्या दुप्पट होते. आज इंग्लंडचे आयुर्मान ८१ आहे. याचा अर्थ भारताने स्वातंत्र्यानंतर चांगली प्रगती केली आहे.

दुष्काळ आणि साथीच्या रोगांनी मृत्यू

Pandemics and Historical Mortality in India, Chimay Tambe, IIM Ahmedabad.

आजार कालखंड जग - कोटी मृत्यू भारत – कोटी मृत्यू
कोलेरा १८१८ ते १९२० १.९ ०.८
प्लेग १८९४ ते१९२० १.३ १.२
फ्लू १९१८ ते १९२० ४.० २.०
एकूण १८१८ ते १९२० ७.२

भारतात त्या कालखंडात चार कोटी मृत्यू झाले. जगातील मृत्युंपैकी ५४% मृत्यू भारतात झाले. हे दर्शविते की भारतात आरोग्य आणि स्वच्छता याची स्थिती अतिशय वाईट होती.

आरोग्य आणि स्वच्छता

स्वच्छतेचे दोन भाग असतात – वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता.

सामाजिक स्वच्छतेचा सर्वात मोठा भाग जमिनीखालील ड्रेनेज हा असतो. भारतात ड्रेनेज व्यवस्था १८१८ ते १९२० याच कालखंडात चालू झाली. १८६० साली देशाची राजधानी – कलकत्ता येथे ड्रेनेज सिस्टम बनविण्यात आली. मुंबईत १८८० साली जमिनी खालच्या ड्रेनेजची सुरुवात झाली. पुण्यात जमिनीखालील ड्रेनेज १९२३ साली सुरू झाले. (२०११च्या जनगणनेप्रमाणे अजूनही भारतात ५०% वस्त्यांत जमिनीखाली ड्रेनेज नाही)


Pears Ad

वैयक्तिक स्वच्छतेचा आंघोळ आणि साबणाशी संबंध असतो. आपल्या देशात पहिला साबण केव्हा आला? अर्थातच याच शतकात. भारताबाहेर अठराव्या शतकात साबणाचा वापर सुरू झाला होता. आपल्या देशात रीठा आणि शिकेकाई याचा वापर होत असे. या शिवाय हरबर्‍याच्या डाळीचे पीठ आणि हळद यांचाही वापर होत असे. १८८०मध्ये लिव्हर ब्रदर्स या कंपनीने इंग्लंडमधून भारतात साबण आयात करणे चालू केले. १८९७ साली मीरतजवळ साबण बनविण्याचा छोटा कारखाना चालू झाला. खर्‍या अर्थाने १९१८मध्ये जमशेटजी टाटा यांनी टाटा ऑईल मिल्समध्ये खोबरेल तेलापासून साबण बनविण्याचा कारखाना चालू केला आणि देशात मोठ्या प्रमाणावर साबणाचे उत्पादन चालू झाले. साबणाच्या वापराच्या आधी वैयक्तिक स्वच्छता नव्हती असे सांगणे नाही. पण साबणाच्या वापरातील सोय आणि सुधारलेली स्वच्छता हे समजण्यासारखे आहे.

एकोणिसाव्या शतकात ९० टक्के भारतीय समाज ग्रामीण भागात रहात असे. शहरीकरणाविषयी काही आकडेवारी पाहू -

साल शहरीकरण टक्के
१८७१ ८.७
१८८१ ९.३
१८९१ ९.४
१९०१ १०.८
१९११ १०.३
१९२१ ११.२
२०११ ३१.२

(Urbanization in India, Chinmay Tambe, Working paper for International Growth Centre, 2016) आकडेवारीवरून हे प्रतीत होते की एकोणिसाव्या शतकात समाज बहुतकरून ग्रामीण भागात राहत होता. १९२१नंतर शहरीकरणाला वेग आला.

पिण्याचे पाणी

नानासाहेब पेशव्यांनी पुणे शहरात कात्रज येथील तलावातून पाणी आणून मोठी सोय केली. भुयारातून पाणी शहरात हौद बांधून त्यात सोडण्यात आले. माझ्या लहानपणी हे हौद मी पाहिलेले आहेत. एकोणिसाव्या शतकात १८६७ साली खडकावासला धरण बांधण्यात आले. १९०० सालापासून पुण्यात पाण्याचे नळ टाकण्यास सुरुवात झाली. मुंबईत त्या आधीच नळाचे पाणी देण्यात आले. विहार येथे धरण तयार करून नळाने मुंबईत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

वैद्यकशास्त्र

आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे हॉस्पिटल. आधुनिक वैद्यकशास्त्र याच काळात युरोपमध्ये आकार घेत होते. इंग्रजांनीच या कल्पना भारतात आणल्या. भारतातील पहिली हॉस्पिटले प्रथम मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे सुरु झाली.

मुंबईत १६७७ साली युरोपियन जनरल हॉस्पिटल या नावाने एक हॉस्पिटल मुंबईतील युरोपियन लोकांसाठी चालू झाले. पुढच्या शतकात त्याचे सेंट जॉर्ज जनरल हॉस्पिटल असे रूपांतर झाले आणि ते सर्व लोकांसाठी खुले करण्यात आले. ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. हॉस्पिटल १८४५ साली चालू झाले.

मुंबईतील श्रीमंत व्यापारी डेव्हिड ससून यांच्या मदतीने पुण्यात १८६७ साली हॉस्पिटल सुरू झाले. हे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज अशा स्वरूपात आजही कार्यरत आहे.

मिरज येथे कॅनडाच्या मिशनरी सर्जन वॉनलेसने १८९४ साली हॉस्पिटल चालू केले.

मुंबईचे वर्णन हे पुस्तक १८६३ साली गोविंद नारायण माडगावकर यांनी लिहिले (पुन:प्रकाशन – समन्वय प्रकाशन, २०१२). या पुस्तकात देवीच्या (स्मॉलपॉक्स) साथीविषयी ते काय लिहितात ते पाहू –

कंपनी सरकारने १८१६-१७ या सालात देवीची लस शोधून काढली. जीव वाचविण्याचा इंग्रज लोकांचा हा नवा उपाय आमच्या लोकांस फारसा आवडला नाही. टोचून देवी काढल्याने देवीस राग येईल या भीतीने देवभोळे लोक मुलास देवी काढण्याच्या भरीस पडत नसत. देवी खात्यातील शिपाई दृष्टीस पडला की मुले दडवून ठेवीत. तथापि सरकारने लोकांच्या कल्याणाकरिता हा क्रम चालूच ठेविला. शिपाई लोक घरोघर जाऊन मुलांना लस लावत. मुलाला लस टोचली तर लोकांच्या बायका धाय मोकलून रडत. आता पन्नास वर्षांनंतर लोक खुशीने मुलांना देवी काढण्यास नेतात. मुंबई इलाख्यात १८६० साली २,६४,४३३ लोकांना देवीची लस टोंचली.

शिक्षण

१९०५ साली महाराष्ट्रात १०१९५ शाळा होत्या. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विषयक संस्थळानुसार आज महाराष्ट्रात १,१६,२३३ शाळा आहेत. यावरून हे दिसते की लोकसंख्या पाचपट वाढली तर शाळाची संख्या दहापट वाढली. १९०५ साली महाराष्ट्रात दहा महाविद्यालये होती. आज ८४८ महाविद्यालये आहेत.

खालील माहिती मुंबईचे वर्णन ह्या पुस्तकातून घेतली आहे. हे पुस्तक १८६३ साली गोविंद नारायण माडगावकर यांनी लिहिले (पुन: प्रकाशन समन्वय प्रकाशन २०१२). त्या पुस्तकात माडगावकर लिहितात -

आमचे कित्येक भोळे आणि नैष्ठिक ब्राह्मण छापलेल्या कागदास स्पर्श करण्यास भीत असतात व छापलेले पुस्तक वाचत नाहीत. परंतु आनंदाची गोष्ट ही की हल्ली मुंबईत ४० छापखाने आहेत. वर्तमानपत्रे, मासिके आणि पुस्तके छापली जातात. शाळांकरिता हजारो ग्रंथ छापून बाहेर पडतात. पारशी लोकांत विद्येची अभिरुची जास्त आहे. आमच्या लोकास ग्रंथ वाचण्याचा आळस आहे. जे हजार वर्षामागे वहिवाटीस आले तेच चालवावे. त्यात काही फेरफार करू नये, मग त्यापासून कल्याण होवो की अकल्याण होवो.

(ठळक ठसा लेखकाचा.)

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात एकच विद्यापीठ (युनिवर्सिटी) होते – बॉम्बे युनिवर्सिटी. मद्रास, कलकत्ता यांच्या बरोबरच मुंबईत विश्वविद्यालयाची स्थापना १८५७ साली झाली. २०२०मध्ये महाराष्ट्रात (अभिमत विद्यापीठे, Deemed Universities, वगळता) २४ विश्वविद्यालये आहेत.

साक्षरता

साल साक्षरतेची टक्केवारी
१८७२ ३.२५
१९०१ ५.४
१९२१ ७.२
२०११ ७४.०२

वरील माहिती संपूर्ण देशासाठी आहे, महाराष्ट्रासाठी अशी माहिती उपलब्ध नाही. वरील माहिती भारत सरकारच्या जनगणना विभागाच्या संस्थळावरून घेतली आहे. आपण विचारात घेत असलेल्या काळात बहुसंख्य समाज निरक्षर होता असेच म्हटले पाहिजे. १९०१ सालापर्यंत साक्षरता ५% होती. त्यावेळच्या, त्या काळातील समाजरचनेत स्त्रिया, मराठा आणि इतर सवर्ण, अस्पृश्य यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे लक्षात घेता साक्षर बहुतांशी ब्राह्मण असावेत असा अंदाज करता येतो. स्वातंत्र्यानंतर साक्षरता आणि शेती या दोन क्षेत्रांत आपण चांगली प्रगती केली. ज्या समासुधारकांनी या काळात काम केले त्यांनी स्त्रिया, मराठा आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणावर भर दिला हे योग्यच दिसते.

सेक्स रेशो

भारतीय लोकात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे हे प्रथम एकोणिसाव्या शतकात ध्यानी आले. १८९१ साली हे प्रमाण ९७२ / १००० होते. दुर्दैवाने पुढच्या १२ दशकांत हे प्रमाण आणखी घसरत गेले. २००१मध्ये हे प्रमाण ९३३ / १००० असे झाले. (लीला विसारिया, इंडिया सेमिनार, २०११). मुलगा म्हणजे ‘कुलदीपक’ ही भारतीयांची जी (गैर)समजूत आहे त्याचा हा (दुष्‌)परिणाम! अशा बिघडलेल्या प्रमाणामुळे पुष्कळ सामाजिक प्रश्न उभे होतात. इंग्लंडमध्ये त्या शतकात हाच प्रकार होता. आता इंग्लंडमध्ये परिस्थिती सुधारली आहे.

निष्कर्ष

वरील आकडेवारीवरुन आपण काही निष्कर्ष काढू शकतो.

समाजाची खरी अवस्था समजण्यासाठी जनगणनेची आवश्यकता असते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात जनगणनेची कल्पना नमूद केली आहे. पण त्या संबंधीचे काही उल्लेख मिळत नाहीत. खर्‍या अर्थाने जनगणनेची कल्पना इंग्रजांनीच १८७१ साली आपल्या देशात आणली. गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्राची लोकसंख्या पाचपटीने वाढली आहे. यामुळे कितीही प्रगती झाली तरी ती दिसून येत नाही. १९२० साली आयुर्मान २५ वर्षे होते ते वाढून आता ७०पर्यंत पोचले आहे. स्वातंत्र्यानंतर झालेली ही चांगलीच प्रगती आहे.

समाजाच्या आरोग्याची एकोणिसाव्या शतकात अतिशय वाईट अवस्था होती. साथीच्या रोगांत जगातील मृत्युंपैकी ५४% भारतात झाले असे आकडेवारी दाखवते. जमिनीखालील गटारे ही सार्वजनिक आरोग्याची आवश्यकता आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी या कामाला सुरुवात झाली. या क्षेत्रातमात्र स्वातंत्र्यानंतर व्हावी तशी प्रगती झाली नाही. वैयक्तिक स्वच्छतेत बर्‍यापैकी प्रगती झाली आहे. आरोग्याबाबत तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय सुविधा. शास्त्रावर आधारित वैद्यकाची याच काळात सुरुवात झाली. हॉस्पिटल ही कल्पना भारतात अस्तित्वात नव्हती; या काळात महाराष्ट्रात तीन हॉस्पिटले सुरू झाली. वाढलेले आयुर्मान लक्षात घेता आरोग्यक्षेत्रात स्वतंत्र भारताने इंग्रजांच्या काळाच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे.

साक्षरतेची आकडेवारी हे दाखविते की शतकाच्या अंतापर्यंत बहुतेक सर्व साक्षर ब्राह्मण होते. इतर जातींत शिक्षणाला सुरुवात होत होती. शाळांची आणि कॉलेजांची संख्या पाहिली तर शिक्षणक्षेत्रात स्वातंत्र्यानंतर चांगली प्रगती झाली आहे.

लोकसंख्येतील स्त्री-पुरूषांचे प्रमाण हे दाखविते की समाजाने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. सर्व प्रगत राष्ट्रांत हे प्रमाण समान असते. कुटुंबाचा विचार केला तर आता कुटुंबाचा आकार चार व्यक्तींचा झाला आहे.

या भागात आपण काही आकडेवारीवरून त्या काळातील समाजाच्या स्थितीचा अंदाज बांधला. पुढच्या भागात – भाग १४मध्ये मुंबईचा विकास कसा झाला ते पाहू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

आकडेवारी आणि आकडे मोड हे गणिती मॉडेल आहे
लेखात लिहिले आहे.
1881 पुरुषांचे स्त्री लोकसंख्या शी प्रमाण 51,%
त्याच पुढे 2010 चे स्त्री ची लोकसंख्या पुरुषांच्या तुलनेत हा आकडा .
940 स्त्रिया पर 1000 पुरुष मागे.
एकाच तक्त्यात percent he praman वापरले आहे आणि 2010 आकडा सांगताना percent हे प्रमाण वापरले नाही
940 स्त्रिया म्हणजे किती टक्के.

1881 पेक्षा कमी टक्के.
हे समजू नये म्हणून चलाखी.
हेतू च साफ नसेल तर आव नक्कीच आणू नये
भारतात सरासरी आयुर्मान 25 वर्ष
का?
आयुर्मान कसे काढतात

त्याची पुढे सविस्तर पद्धत ध्या.
मलेरिया सारखे विषाणू मुळे होणारे आजार त्या मुळे लोक मारायची पण जे वाचायचे ते 100 वर्ष निरोगी जगायचे.हेतू मनात ठेवून कोणताच लेख लिहू नका.
हार्ट attack, cancer, मधुमेह,ब्रेन strock ह्याचे प्रमाण आता वाढले आहे
आणि अगदी पंचवीस वयात पण हे सर्व आजार होतात
म्हणजे स्थिती जैसे थे आहे असे आम्ही सहज बोलू शकतो
छान छान सायन्स विषयी लेख,आधुनिक वैधकीय शास्त्र किती प्रगत आहे ह्याचे गुणगान.
हे लेख वाचून लोकांची निर्माण झालेली चुकीची मत.

आणि जाहिराती चा भडिमार.
ह्या मुळे लोकांना वाटत आपण वैद्धकिय शास्त्रात खूप प्रगती केली आहे.
पण जेव्हा अवघड आजार होतो.
मग तो कॅन्सर,tb, हाडांचे आजार,किडनी चे आजार,लिव्हर चे आजार,अनेक असे खूप सारे .
ज्याला लोक किरकोळ समजतात ते पण ..अगदी दात हलने,पडणे असे किरकोळ पण.

आणि उपचार करायला सुरुवात करतो तेव्हा कळते.
आज पण मेडिकल सायन्स खूप मागास आहे.
कशाचाच भरवसा नाही.
बर व्ह्याल तर तुमचे शरीर आणि तुमचे गुणसूत्र च तुम्हाला वाचावतील.
मेडिकल सायन्स नाही.
सर्व काही भगवान भरोसे.
अनेक आजारी लोक बघून निर्माण झालेले मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोदरेज कन्झ्युमर या कंपनीच्या, २०२० च्या वार्षिक अवहालामध्ये २०व्या शतकातल्या सुरुवातीला बाजारात असलेल्या गोदरेज साबणाचे चित्र दिले होते. ( पान नं १९)

त्याकाळात जाहिराती कशा होत्या माहीत नाही. पण अ‍ॅनी बेझंट, सि. राजगोपालचारी, रविंद्रनाथ टागोर यांनी गोदरेज साबणाबद्धल कौतुकोद्गार काढले होते. महात्मा गांधींचे पण एक टिपण त्या पानावर आहे. (गोदरेज दावा करते की, त्यांचा साबण वनस्पती तेलापासून -अ‍ॅनिमल फॅट्स न वापरता-बनवलेला पहिला साबण आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषाणू आणि जिवाणू ह्या मुळे होणारे आजार हेच करण् होते लोकांच्या अकस्मात मृत्यू चे.

पण बाकी प्राणी ह्या आजाराने बळी पडत नव्हते माणूस च पडत होता.
हा वेगळा प्रश्न आहेच.
पहिला पण कुत्र वीस वर्ष जगायचं आज पण वीस वर्ष च जगतो.
त्यांच्या कडे कुठे औषध आहेत.
विषाणू,जिवाणू ह्यांची ओळख नव्हती.
विशाल जागा आणि कमी लोकसंख्या म्हणजे खूप मोठी मोकळी जगा उपलब्ध होती.
मानवी संडास पाच सहा दिवसात पूर्ण disposed होते.
सूक्ष्म जीव ते करतात.
त्या मुळे भुयारी सांडपाणी व्यवस्था नी आरोग्य ह्याचा त्या वेळी काडी चा संबंध नव्हता.
हा उगाचच जोडलेला संबंध आहे.
रिटा,शिकेकाई हे नैसर्गिक पदार्थ आताच्या कोणत्या हो साबण पेक्षा उत्तम कार्य. करतात.
स्वच्छता करण्यासाठी जे काही रासायनिक घटक गरजेचे आहेत ते सर्व रिटा आणि शिकेकाई मध्ये आहेत.
आताच्या आधुनिक सबनात पण ते नाहीत.
उलट हानिकारक रसायन आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या लेखमालेच्या तेराव्या भागावर एक प्रतिक्रिया आलेली आहे ज्याविषयी थोडे स्पष्टीकरण जरूर आहे.

हे वाचक लिहितात, 'हेतूच साफ नसेल तर आव नक्कीच आणू नये.'

मित्रहो, या लेखमालेच्या पहिल्याच भागात मी लिहिले होते, 'निरनिराळ्या स्रोतांमधून वरील विषयांवर जी माहिती मिळाली ती नोंदविली आहे. वरील सर्व विषयाची माहिती संदर्भग्रंथ आणि शोधनिबंध यातून घेतली आहे. जेव्हा असे म्हणतो की राणी लक्ष्मीबाईने या साली इंग्रजांना असे पत्र लिहिले त्यावेळी मी दुसऱ्या कोणाच्या तरी लिखाणाचा आधार घेत असतो. जर दिलेल्या संदर्भात चूक असेल तर ती माझ्या लिखाणातही आली. आधुनिक इतिहासलेखनाचे शास्त्र सांगते की मिळालेल्या माहितीवरूनच निष्कर्ष काढावेत . जेव्हा विषयाचा अभ्यास चालू केला त्यावेळी जी माहिती मिळत गेली त्या माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात ती स्थिती कशी निर्माण झाली, काय सुधारणा झाल्या याचे निष्कर्ष काढले आहेत. माझ्या मताप्रमाणे ते निष्कर्ष अपरिहार्य आहेत. अजून माहिती मिळाल्यास आणि त्यामुळे निष्कर्ष बदलणे जरूर आहे असे वाटल्यास तसे बदल मी जरूर करीन.'

कोणत्याच प्रकारचा हेतू मनात ठेऊन लिखाण केले नाही. काही सामाजिक विचार पुढे करावेत असा काहीच 'हेतू' नव्हता. मी पूर्णपणे अराजकीय व्यक्ती आहे. शास्त्रावर मात्र मी विश्वास ठेवतो.

पहिल्या तक्त्यात १८८१ साली स्त्रियांचे प्रमाण ४९% आहे असे लिहिले आहे. २०१०च्या जनगणनेप्रमाणे हजार पुरुषांमागे ९४० स्त्रिया असे लिहिले आहे. याचा अर्थ ९४० भागिले (१००० + ९४०) हे स्त्रियांचे प्रमाण येईल – जे ४८.४५ येते. याचा अर्थ स्त्रियांचे प्रमाण कमी झाले. हेच मी सांगत आहे. याच लेखात पुढे लीला विसारिया यांची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी पण हेच दर्शविते.

सरासरी आयुर्मान हे दर्शविते की व्यक्ती जन्माला आल्यानंतर किती वर्षे जगण्याची शक्यता आहे. साहजिकच देशात आरोग्यसुविधा चांगल्या नसतील तर आयुर्मान कमी राहणार. आयुर्मानाची माहिती विश्वसनीय स्रोतातून घेतली आहे. इंटरनेटवर ही माहिती सहज उपलब्ध आहे.

या वाचकाला शास्त्रीय वैद्यकाविषयी राग दिसतो. शास्त्रीय वैद्यकात निश्चितच पुष्कळ कमतरता आहेत. आपण हे लक्षात घेणे जरूर आहे की हे शास्त्र गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत पुढे आले आहे. या विषयावर लिखाण करण्याची माझी इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या आयडीला इथे कुणीही सिरियसली घेत नाही. तुम्हीही डोक्याला अजिबात शॉट लावून घेऊन नका हा सल्ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठरावीक लोकांनी टीका केली तर आपण योग्य मार्गावर आहोत असं समजावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विरोधी मत व्यक्त करणारा काही तरी वेगळा विचार करत असतो.

विविध विचारातून च नवीन माहिती निर्माण होते.
विरोधी विचार व्यक्त होणे म्हणजे जागरूकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे असणाऱ्या कोणत्या ही आयडी ची मत ही त्या आयडी ची मत असतात.विचार असतात.
," ह्या आयडी लं इथे कोणी गंभीर पने घेत नाही"

अशी कॉमेंट कोणी कसा देवू शकतो.

इथे असणाऱ्या असंख्य वाचकांना कोणाची मत गंभीर घेण्यासारखी वाटत असतात आणि कोणाची नाही.
ह्या विषयी वर कॉमेंट करणाऱ्या आयडी नी अभ्यास केला आहे का.
की स्वतःची मत पूर्ण ऐसी अक्षरे वर लादत आहात.

तुम्ही त्या त्या आयडी लं
गंभीर घेत नाही हे ठीक आहे तुमचे मत झाले पण इथे कोणीच त्या आयडी ला गंभीर पने घेत नाही.ह्याचा अर्थ काय.तुम्हाला सर्वांची मत माहीत आहेत का?की इथले सर्व आयडी तुमचे गुलाम आहेत आणि तुम्ही त्यांचे नेते आहात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्या ही विषयाचा अनेक बाजू असतात
तुमचे मी सर्व लेख वाचले आणि खूप आवडले.
मला एक प्रश्न नेहमी पडायचा.
माणूस पृथ्वी वर येवून लाखो वर्ष झाली.मानवी मेंदू ची अतिशय प्रगत झाला त्याला पण लाखो वर्ष झाली .
माणूस बोलू लागला लाखो वर्ष झाली
लिहू लागला लाखो वर्ष झाली
पण मानवी जीवनात फरक पडला तो काळ फक्त ५०० वर्ष जास्तीत जास्त जुना आहे
मानवी जीवन ,मानवी संकल्पना,यंत्र,शासन व्यवस्था,शिक्षण व्यवस्था, विज्ञान मध्ये प्रगती .
हे सर्व झाले ते फक्त ५०० वर्षात जास्तीत जास्त
लाखो वर्ष उलटून गेली तेव्हा हे घडले नाही आताच का घडले ..
ह्याचे उत्तर मला तुमच्या लेख वाचल्यावर मिळाले.
माणसाने च माणसाची प्रगती रोखली होती

१) रोज लढ्याया.
२) मीच श्रेष्ठ ही फालतू कल्पणा.(जात,धर्म,रंग हे फालतू मोजमाप.
३ ) माणसाची जंगली क्रूर वृत्ती
आणि अशी इतर अनेक कारणे .त्या मुळे माणसाची लाखो वर्ष प्रगती थांबली.
नाहीतर आज माणूस खूप म्हणजे खुप प्रगत असता.
आज पण माणसात श्रेष्ठ पणाच्या अतिशय फालतू कल्पना आहेत
त्या मुळे सर्व यंत्र तंत्र असून पण माणूस चुकीच्या दिशेने वेगाने जात आहे त्याचा शेवट विनाश च आहे.
मानवी मेंदू ची हीच कमतरता आहे.
योग्य मार्ग निवडण्याची मानवी मेंदू ची कुवत नाही.
ती असती तर आज माणसाने सर्व प्रश्नावर उत्तर शोधले असते.
माणूस विनाशाच्या मार्गाने गेला नसता.
आणि पृथ्वी आज कधी ही नव्हती इतकी सजीव साठी अनुकूल असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0