कल्याणमधील गणेशोत्सव

कल्याणमधील गणेशोत्सव

नवीन पिढीला माहिती व्हावी आणि जुन्या गोष्टींची औपचारिक नोंद व्हावी यासाठी आज मी या पोस्टमध्ये आमच्या ऐतिहासिक कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे.

कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा किमान १३० वर्षांहून अधिक जुनी आहे. जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनसंघटनेचे आणि जागृतीचे एक माध्यम म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सन १८९३मध्ये पुण्यात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सार्वजनिक गणेशोत्सवाची पुन्हा सुरुवात केली. त्याआधी पेशवाईत पुण्यात पेशव्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव होत असे. ब्रिटिश अमदानीत ही बंद पडलेली परंपरा टिळकांनी पुन्हा सुरू केली. कल्याणमधील गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप त्याहूनही जुने आहे.

टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी कित्येक वर्षे आधीपासून कल्याणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव होत असत. परंतु त्यांचे स्वरूप ज्ञातीनिहाय होते. म्हणजे विविध ज्ञातींचा स्वतंत्र असा एकेक सार्वजनिक गणपती बसविला जाई. बरीच वर्षे कल्याणमधील अशा ज्ञातींच्या सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या २१ होती. ते गणपती ‘मेळा संघाचे गणपती’ म्हणून ओळखले जात व त्यांची एकत्रितपणे विसर्जन मिरवणूक निघे. या ज्ञातींच्या गणपतींची संख्या काळाच्या ओघात कमी झाली असली तरी आजही मेळा संघ आहे व एकादशीला त्यांची विसर्जन मिरवणूक निघते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघणारी पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यास जाता यावे यासाठी कल्याममधील मेळा संघाच्या गणपतींचे विसर्जन एकादशीला करण्याची प्रथा पडली, असे सांगितले जाते.

टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यावर कल्याणमधील त्यावेळची प्रतिष्ठित मंडळी लोकमान्यांना जाऊन भेटली. त्यातून कल्याणमध्ये संपूर्ण शहराचा व सर्व ज्ञातींचा मिळून एक सामायिक सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची कल्पना पुढे आली. यातूनच कल्याणमधील सुप्रसिद्ध ‘सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव’ सन १८९५ मध्ये सुरु झाला. या सुभेदारवाडा गणेशोत्सवाचे यंदाचे १२८वे वर्ष आहे. या गणेशोत्सवाचे एक कायमस्वरूपी विश्वस्त मंडळ आहे. त्यांच्यातर्फे विविध मंडळांकडून अर्ज मागवून गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एकेका मंडळास दोन वर्षांसाठी दिली जाते. त्या गणेशोत्सवासाठी स्वत: लोकमान्य टिळक कल्याणला आले होते. तेव्हा त्यांची कल्याण स्टेशनपासून शहरात बोकडाच्या गाडीतून मिरवणूक काढल्याची आठवण आमची आजी सांगायची.

कल्याण शहरात आताच्या गांधी चौकात कल्याणच्या सुभेदारांचा प्रशस्त असा चौसोपी वाडा होता. टिळकांपासून स्फूर्ति घेऊन शहराचा एकच असा सार्वजनिक गणपती याच सुभेदारवाड्यात सर्वप्रथम बसविला गेला. त्यानंतर काही वर्षांनी अक्षीकरांनी हा सुभेदारवाडा हायस्कूल चालविण्यासाठी रीतसर विकत घेतला. पुढे एकाहून अनेक शाळा सुरू झाल्यावर अक्षीकरांनी जनरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कल्याणचे हे हायस्कूल ज्या संस्थेतर्फे चालविले जाते ते त्या संस्थेहून जुने आहे. त्याचे औपचारिक नाव ज. ए. इन्स्टिट्यूटचे हायस्कूल, कल्याण असे असले तरी ते सुभेदारांच्या वाड्यात भरायचे म्हणून त्याला ‘सुभेदारवाडा हायस्कूल’ म्हणले जाऊ लागले. आजही ते हायस्कूल त्याच नावाने ओळखले जाते.

सुभेदारांच्या वाड्यात हायस्कूल सुरू झाल्यावर आणि खास करून ज. ए. सोसायटी स्थापन झाल्यावर हा सार्वजनिक गणेशोत्सव शाळेत कसा भरवायचा असा प्रश्न निर्माण झाला. यातूनच एके वर्षी संस्थेने गणेशोत्सवासाठी शाळेची जागा देण्यास नकार दिला. त्यावर्षी सुभेदारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी बाहेर गणपतीचा मंडप घालण्यात आला. परंतु लगेचच संस्थेला सुुबुद्धी सुचली व गणेशोत्सव मंडळ व ज. ए. सोसायटीमध्ये समेट झाला. त्यामुळे शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी झाल्याने आज लौकिक अर्थाने सुभेदारवाडा अस्तित्वात नसला तरी सुभेदारवाडा गणेशोत्सव शाळेच्याच जागेत अव्याहतपणे साजरा होत आला आहे. शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत भरते. परंतु गणेशोत्सवाचे १० दिवस दोन्ही सत्रांची शाळा अर्धवेळ भरते व दुपारनंतर शाळेचे संपूर्ण प्रांगण गणेशोत्सवासाठी मोकळे मिळते. अशा प्रकारे गणेशोत्सवाचे १० दिवस शाळा अर्धवेळ भरविण्याची विशेष सवलत शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळेला दिली जाते.

गेल्या शंभर वर्षांत कल्याण शहराचा विस्तार पाचपटीने व लोकवस्ती त्याहून अधिक पटींनी वाढली. परिणामी हल्ली गल्लोगल्ली हजारोंच्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात. तरीही सुभेदारवाड्यातील गणपती हाच सर्व शहराचा मानाचा गणपती मानला जातो. या गणपतीचे विसर्जनही मेळा संघाच्या गणपतींप्रमाणे एकादशीलाच होते. परंतु सुभेदारवाड्याचा गणपती मेळा संघात गणला जात नाही. मेळा संघाचे गणपती क्रमाने विसर्जनासाठी निघतात. मेळा संघातील शेवटचा गणपती ‘पास’ झाला की सुभेदारवाड्याचा गणपती विसर्जनासाठी बाहेर काढला जातो. विसर्जनाच्या आदल्या दिवशी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला दिले जाणारे मसाला दूध व पुरुषांसाठी पान-सुपारी आणि महिलांसाठी हळदी-कुंकू हे या गणेशोत्सवाचे कित्येक वर्षे जपले गेलेले वैशिष्ट्य आहे. या गणेशोत्सवाचे प्रत्येकी दोन वर्षांचे व्यवस्थापन दोन वेळा महिलांच्या मंडळाला दिले गेले व त्यांनीही तेवढ्याच दिमाखदारपणे उत्सवाचे आयोजन केले, हेही नमूद करायला हवे. हल्ली लाऊडस्पीकरच्या नियमांमुळे गणेशोत्सवाचे कार्यक्रम रात्री १० वाजता आटोपते घ्यावे लागतात. परंतु हे नियम नव्हते त्या काळातील रात्रभर रंगलेल्या अनेक दिग्गज गायकांच्या मैफिली जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहेत.

कल्याणच्या गणेशोत्सवात पुण्या-मुंबईसारख्या महाकाय मूर्ती व डोळे दिपविणारी विद्युत रोषणाई नसते. कल्याणमधील गणेशोत्सव अत्यंत देखण्या व सुबक मूर्ती आणि आटोपशीर पण कल्पक सजावट यासाठी ओळखला जातो. कासारहाटातील हजारे व प्रकाश साऊंड सर्व्हिस, घेलादेवजी चौकातील मगर, रामबागेतील कदम, आंबेडकर रोडवरील डी. पी. लोहार आणि मच्छी बाजारातील नळवाल्याचा गणपती हे खरे तर एका कुटुंबाचे पण सार्वजनिक दर्शनासाठी असलेले गणपती हेही कल्याणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पूर्वी शहरभर फिरून सर्व गणपती पाहणे हा हजारो लोकांचा एक सांस्कृतिक उत्सव असे. हल्ली तो उत्साह दिसत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कल्याण शहरात आताच्या गांधी चौकात कल्याणच्या सुभेदारांचा प्रशस्त असा चौसोपी वाडा होता.

हे कल्याणचे सुभेदार बोले तो तेच ते इतिहासप्रसिद्ध सुनेचे सासरे (आणि/किंवा त्यांचे वारसदार) काय?

——————————

तळटीपा:

यमीपेक्षा सहापट गोरी, ‘अशीच अमुची आई असती’१अ-फेम.

१अ आपली आई (पक्षी: वीरमाता जिजाबाई) ही निखालस कुरूप होती१अ१, याची साक्षात शिवबांकडून आलेली जाहीर कबुली समजावी काय ही?

१अ१ बट, इन एनी केस, व्हाय शुड दॅट मॅटर?

१अ : यमीपेक्षा सहापट गोरी, आणि निखालस कुरूप, ह्यादरम्यान सर्वसाधारण, चारचौघींसारखी, नाकी-डोळी नीटस वगैरे कॅटेगऱ्या असतात.
जिजाबाई ही लखुजी जाधवांसारख्या पिढीजात सरदाराची मुलगी होती. त्यामुळे काही पिढ्यांमध्ये तरी nutrition , गरोदरपणातली काळजी वगैरे गोष्टींची हेळसांड झाली नसावी. स्वतः शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष बघून काढलेल्या चित्रांवरून अंदाज करायचा झाला तर त्यांची आई निखालस कुरूप असण्याची शक्यता कमी वाटते. जिजाबाईच्या स्वर्गीय लावण्याची वगैरे (मस्तानीप्रमाणे) वर्णने उपलब्ध असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अंदाजच करायचा झाला तर जिजाबाई दिसायला सर्वसाधारण किंवा बऱ्यापैकी असाव्यात. शेवटी प्रत्यक्ष माहिती नसल्याने आपण केवळ अंदाजच करू शकतो. But I won't put my money on निखालस कुरूप.

कल्याणच्या सुभदारच्या सुनेला छत्रपतींनी साडी-चोळी देवून सन्मानाने परत पाठविल्याचा प्रसंग घडला तेव्हा,माझ्या महितींनुसार कल्याण सुभा स्वराज्यात नव्हता. म्हणून तर तो जिंकून घ्यावा लागला होता. त्याच मोहिमेत सुभेदारची सून मराठा सैन्याच्या हाती लागली होती. ही घटना सुमारे ३५० वर्षांपूर्वीची आहे. आक्षिकरांनी शाळा सुरू केली तेव्हा तो वाडा एवढा जुना नव्हता. कदाचित नंतर नवा वाडा बांधला गेला असावा. आक्षिकरांनी वाडा घेतला व नंतर तेथे गणेशोत्सव सुरू केला गेला तेव्हा बिवलकर सुभेदार होते. त्या कुटुंबाचे वारस आजही कल्याणमध्ये आहेत. शिवबांनी सुभेदारच्या सुनेच्या सौंदर्याची तुलना आपल्या मातेशी करावी, हे वास्तव नसून नंतर प्रचलित झालेली अतिशयोक्तीपूर्ण कविकल्पना असावी,असे वाटते.

माहितीबद्दल आभार.

कल्याणच्या सुभदारच्या सुनेला छत्रपतींनी साडी-चोळी देवून सन्मानाने परत पाठविल्याचा प्रसंग घडला तेव्हा,माझ्या महितींनुसार कल्याण सुभा स्वराज्यात नव्हता. म्हणून तर तो जिंकून घ्यावा लागला होता.

हे पटण्यासारखे आहे. शिवछत्रपती आपल्याच प्रदेशावर हल्ला करणार नाहीत, हे तर्कास धरून आहे; सयुतिक आहे.

शिवबांनी सुभेदारच्या सुनेच्या सौंदर्याची तुलना आपल्या मातेशी करावी, हे वास्तव नसून नंतर प्रचलित झालेली अतिशयोक्तीपूर्ण कविकल्पना असावी,असे वाटते.

माझाही तसेच मानण्याकडे कल होतो आहे.

आणि, तशी अतिशयोक्ती करताना, छत्रपतींना आपण प्रत्यक्षात निगेटिव लाइटमध्ये दर्शवीत आहोत, हे कवीच्या गावीही नसावे, हा दैवदुर्विलास!