नाटकवाला वीकेंड

अखेरीस यावर्षी भारतात येणं झालं. महिनाभराचा काळ म्हणलं तर मोठा , म्हणलं तर छोटा ! या काळात मित्रांना/नातेवाईकांना भेटणे , घरातली कामे आटपणे, इतर काही गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे नाटकबिटक , गाणंबिणं याचा बॅकलॉग भरून काढणे असं सगळं करण्याचा प्लॅन असतो. हा वीकेंड ( तीस/एकतीस जुलै ) दोन प्रयोग पाहण्यात गेला. शनिवार संध्याकाळ भरत नाट्य मंदिरात शेखर नाईक प्रॉडक्शन निर्मित “व्हिन्सेंट वॅन गॉग” अभिवाचनाचा प्रयोग झाला. ही संहिता म्हणजे आयर्विंग स्टोनने लिहिलेल्या पुस्तकाचं माधुरी पुरंदरे यांनी केलेल्या भाषांतराचे ( प्रकाशन साल बहुधा १९७७/७८) काही तुकडे ! त्यानंतर रविवारी संध्याकाळी ज्योत्स्ना भोळे सभागृहात “लव्ह यू” या नाटकाचा प्रयोग पाहिला. दोन्ही संहिता या ‘अभारतीय’ आणि भाषांतरित असल्याने हा एक अनायासेच इंटरेस्टिंग खास विभाग झाला असं म्हणता येईल, आता पुनःश्च हनीमून आणि आणखी एखादं नाटक पहायला जमलं तर मजा येईल, असो! हे दोन्ही प्रयोग पाहिल्यानंतर पडलेले काही प्रश्न वगैरे मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर कोणत्याही कलाकृतीचं आस्वादन करताना आपल्याला कलाकृतीबद्दल , कलानुभवाबद्दल काही सांगता येतंच, परंतु आपण नक्की कोणत्या प्रकारचे आस्वादक आहोत याची, आपल्यात काही अंतर्विरोध असतील तर त्याची आपली आपल्यालाच ओळख होत जाते. दोन्ही प्रयोगांबद्दल एकाच वेळी किंवा समांतर , कधी मिश्र लिहितो आहे, परंतु मुद्दाम तुलना करण्याचा- डावं-उजवं करण्याचा हेतू नाही. मी फार वर्षांनी मराठी नाटक प्रत्यक्ष पाहतो आहे, माझा नाट्यानुभव आता पुष्कळ निराळा झाला आहे, त्यामुळे माझं आस्वादन समजून घेण्याची आवश्यकता मला वाटते आणि त्यातून हे लिहितो आहे. प्रेक्षकांनी दोन्ही प्रयोग आवर्जून पहावेत असं सुरुवातीलाच नमूद करतो.

चित्रावती :

‘ दोन अंकी अभिवाचन’ असं स्वरूप असलेला व्हिन्सेंटच्या वाचनाचा प्रयोग हा एकूण चांगला होतो, परंतु मला प्रभावी असा वाटला नाही, किंवा प्रभाव पाडता पाडता राहतो. मी पाहिलेल्या प्रयोगात सर्वच टीमचे वाचनकौशल्य चांगले होते. संगीत काही फार खास नव्हते, मागे व्हिन्सेन्टची चित्रे येतात त्याचं नक्की काय करायचं असा प्रश्न अधूनमधून पडतो, पण त्याबद्दल सविस्तर येईलच; तरीही ते ठीकच आहे. प्रेक्षकसंख्या त्यामानाने कमी होती ! हा प्रयोग लोकांनी जरूर पहावा/ऐकावा !

मूळ जर्मन नाटकाचं ‘लव्ह यू’ हे मराठी भारूपांतर. याचा प्रयोग सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप जोशपूर्ण आहे हे नक्की ! दोनच पात्रे असूनही ती मंचावरील ऊर्जा टिकवून ठेवतात हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. याची संहिता तरुणाईला आवडेल , भावेल अशी आहे आणि एकूण मांडणी त्यानुसार केलेली आहे.

मुख्य थाळी ( डिलक्स मिक्स )

सुरुवातीला प्रत्येक नाटकावर स्वतंत्र लिहावं असं वाटत होतं, परंतु दोन्ही नाटके पाहिल्याने आणि त्यात काही समान धागे असल्याने त्याची एक मिक्स थाळीच करावी असं वाटतंय. सर्वसाधारणपणे नाटक पाहून आल्यावर अभिनय/दिग्दर्शन यावर सुरुवातीला आणि जास्तीतजास्त बोलण्या/लिहिण्याचा आणि त्यानंतर संगीत , नेपथ्य आदी गोष्टींवर बोलण्या/लिहिण्याचा प्रघात आहे. तो योग्यही आहे, परंतु इथे सुरुवातीला संगीताबद्दल लिहितो.

नाट्यप्रयोगात लाईव्ह संगीत आणि रेकॉर्डेड संगीत अशा दोन शक्यता असतात आणि कुठल्याही अशा संगीताचं काम काय - तर प्रसंगाची खुमारी वाढवणे , त्याला पूरक अशी वातावरणनिर्मिती करणे, क्वचितप्रसंगी एखादा धक्का हायलाईट करणे हे असतं असं ढोबळमानाने म्हणावं लागेल. आपल्याकडच्या ( मराठी आणि कदाचित त्यातही पुणे-मुंबई परिसरातील नाटकाच्या संदर्भात ) नाटकांचे दोन हौशी /प्रायोगिक आणि व्यावसायिक असे ढोबळ विभाग जरी केले तरी या दोन्ही प्रकारांमध्ये पार्श्वसंगीतामध्ये पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा मिश्र वापर होण्याचं प्रमाण हे ऐंशीच्या दशकापासून आहे असं म्हणता येऊ शकेल आणि आज २०२२ मध्येही नाटकाचा विषयच अगदी अस्सल भारतीय मातीतला , लोकनाट्य प्रकारातील नाटक असेल तरच नाट्यप्रयोगात खास भारतीय संगीत ऐकायला मिळतं. आता कधीकाळी पाश्चात्य संगीत ( व्हायोलिन/पिआनोचे खास क्लासिकल तुकडे, कधी जॅझ/ब्लूजचे तुकडे ) हे भारतीय जनमानसात इतकं रुळलेलं नव्हतं. नव्वदच्या दशकानंतर संगीत ऐकण्याच्या आपल्या सवयी खूप बदललेल्या आहेत, परदेशवारी करणाऱ्या , तिकडचं संगीत ऐकणाऱ्या भारतीयांची संख्या तुलनेने खूपच वाढलेली आहे. यासंदर्भात नाटकाचं संगीत करणाऱ्या वेगवेगळ्या संगीत स्टुडिओना भेट देऊन जुन्या नव्या नाटकवाल्यांनी कोणत्या प्रकारचे तुकडे कोणत्या प्रसंगांसाठी निवडले , का निवडले, त्यामागे कोणते ट्रेंड, प्रवाह काम करीत होते ( किंवा नव्हते) याचा एक सर्वे करावा असं फार मनात येतंय. तर आजचा प्रेक्षक नक्की कोणतं संगीत कशा प्रकारे ऐकतो याचा आपला काय अभ्यास आहे , किंवा याची आपली काय समज आहे यावर कधीतरी मिळून बोललं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. तर व्हिन्सेंटच्या अभिवाचनात येणारं संगीत हे कुठल्याच प्रकारे विचारपूर्वक केल्याचं जाणवलं नाही. ( काहीच दिवसांपूर्वी प्रसाद वनारसे याच्या आयपार ग्रुपचे चार प्रयोग पाहण्याची संधी मिळाली; एखाददुसरा अपवाद वगळता त्यातलेही संगीत तुकडे उपरे म्हणून उगाच येतात असं जाणवलं होतं.) इथे मला दुसरा प्रश्न पडतो तो असा , की आजकाल रेकॉर्ड करण्याच्या , संगीत रचना करण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. असं असताना एका विशिष्ट प्रयोगासाठी खास संगीत बांधून घेत का नाहीत ? यामागे अर्थकारणाच्या मर्यादा आहेत की संगीताचं नाट्यानुभवामध्ये एक प्रकारचं दुय्यम स्थान आहे असा समज ( गैरसमज !) ?. अत्यंत खास आणि एकमेवाद्वितीय असं जीवन जगलेल्या व्हिन्सेंटसाठी खास संगीत द्यायला हवं, त्या पार्श्वसंगीताचा त्याच्या रेषांशी , त्याच्या पॅलेटशी कुठेतरी संबंध असायला हवा असं हा प्रयोग पाहताना माझं मन सांगत होतं. परंतु उलट हे संगीत मला आपल्याच जुन्या ( एका अर्थाने स्थानिक ) नाट्यपरंपरेशी बांधून ठेवत होतं. एक स्पॉयलर देतो : विन्सेंटच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, तरीही भर उन्हात शेतात त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली हे आपल्या जास्त परिचयाचं आहे ( आणि मूळ कादंबरीतही असाच घटनाक्रम येतो ), तर गोळी झाडण्याच्या प्रसंगाला ठाय असा ध्वनी हवाच का , त्याऐवजी निराळं काय करून हा क्षण अधोरेखित करता येईल याचा विचार व्हायला हवा ! तर प्रस्तुत ग्रुपला माझी विनंती आहे, की जमल्यास त्यांनी संगीतावर अधिक काम करून नवीन आणि या प्रयोगासाठीच्या खास रचना करून व्हिन्सेंटची सर्जनशीलता अधोरेखित करण्याचा प्रयत्न करावा.

लव्ह यू नाटकाचं संगीत त्याच्या जोशपूर्ण फॉर्मशी साजेसं आणि मजेशीर आहे, त्यात ढोलकीचे तुकडे , जर्मन गाण्यांचे तुकडे किंवा संगीत असल्याने आणि पुष्कळदा अभिनेतेच वेगवेगळे साऊंड इफेक्ट देत असल्याने एक निराळं आणि निवडलेल्या फॉर्मला साजेसं असं संगीत तयार होतं. ते थोडं कमी कर्कश झालं असतं किंवा त्याच्या लेवल मध्ये किंचित जरी बदल झाले असते तर ते अधिक सुसह्य झालं असतं.

अर्थात पार्श्वसंगीत आणि ध्वनीरचना ही नंतर येणारी गोष्ट आहे. यासाठी आधी मूळ फॉर्म , प्रस्तुतीकरणाचा मूळ ढाचा कसा असेल हे ठरावं/ठरवावं लागतं. संगीताचा आणि नाटकाचा संबंध म्हणजे फक्त या पार्श्वसंगीताशीच आहे असं नाही तर तो व्यापक अर्थाने सर्व नटांच्या आवाजाने मिळून तयार होणाऱ्या ध्वनीशीही आहे असं मला कायम जाणवत आलेलं आहे. परंतु याविषयी पुढे येईलच.

भाषांतरित किंवा रूपांतरित असण्याखेरीज आणि एका अर्थाने ‘अभारतीय’ असण्याखेरीज या दोन्ही प्रयोगांत एक मजेदार समान धागा होता तो म्हणजे -अभिवाचन. व्हिन्सेंट हे पारंपारिक अभिवाचन होतं, तर लव्ह यू हे अभिवाचन आणि अधिक काहीतरी असं होतं. तर आता अभिवाचन या फॉर्मबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न करतो. अभिवाचन हा शब्द नक्की कधी आला, की तो आपण निर्माण केला आहे हा मला पहिला प्रश्न आहे. अभि हा संस्कृत भाषेतला पूर्वसर्ग ( प्रेफिक्स ) असून माझ्या माहितीनुसार त्यामधून ‘... च्या जवळ जाणे ,... पेक्षा अधिक , ... कडे इंगित करणे , ...च्या संबंधी’ अशा अर्थच्छटा व्यक्त होतात. अभिनय या संज्ञेमध्ये -.... कडे इंगित करणे , त्या दिशेने इंगित करणे - हे अभिप्रेत आहे हे बहुधा सर्वश्रुत आहे. अभिवाचन करण्याची आपली सांस्कृतिक आणि काव्य , नाट्य संदर्भातली ही परंपरा नक्की किती मागे जाते हे मला माहीत नाही. मराठी सांस्कृतिक संदर्भात यात कथाकथनाचे प्रयोग देखील येतील हे नक्की , कारण त्यात पुलांसारखा एक मास्टर परफॉर्मर होऊन गेला आणि त्याने कथेतील नाट्य , त्यातला अभिनय यांचं एक निराळंच अवकाश आपल्याला दाखवलं. आधुनिक ( !) काळात म्हणजे पन्नास/साठच्या दशकानंतर बापट/पाडगांवकर/करंदीकर ही त्रयी काव्यवाचनाच्या क्षेत्रात आपल्याला माहित आहेच आणि पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अनेक कवी मंडळींनी हा फॉर्म ( कमीअधिक अर्थाने त्यात फारसा काही बदल न करता ) वापरलेला आहे , आजही वापरत आहेत - तर दुसरीकडे स्वतःच्याच कथा नुसत्याच मनोरंजक पद्धतीने न सांगता त्यातली नाट्यमयता समजून उमजून आणि खुलवून प्रस्तुत करणारे पुल, काही अंशी वपु , मिरासदार , स्वतःचा खास बाज असलेले शंकर पाटील असे जानेमाने लोक आपल्याला माहीतच आहेत. या कथाकथन फॉर्मचं आजचं चरित्र काय आहे यावर कोणी प्रकाश टाकला तर बरं होईल. कथाकथनाचा इथे उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या फॉर्मने पुणे-मुंबईतल्या सांस्कृतिक पटलावर एकेकाळी बराच प्रभाव टाकल्याचं दिसतं आणि अभिवाचन आणि कथाकथन या दोन्ही फॉर्ममध्ये काही समान धागे आहेत; उदा : एकच वाचक एकाचवेळी निवेदक आणि इतर अनेक पात्रे बनून येतो, आवाजाचे पोत बदलतो , क्वचित प्रसंगी देहबोलीचा वापर करतो. नाटकाचं किंवा नाट्यसंहितेचं अभिवाचन यातही दोन प्रकार संभवतील. एक म्हणजे खुद्द नाटककार स्वतःचं नाटक वाचून दाखवतो ( यात आळेकर सरांचं नाव प्रामुख्याने डोळ्यासमोर येतं, कारण ते ज्या पद्धतीने स्वतःची नाटके वाचतात ते ऐकल्यावर कधी कधी त्यांनीच ते नाटक करावं असं वाटतं) आणि दुसरं म्हणजे काही नट-नट्या मिळून , शक्यतो बसून , समोर संहिता घेऊन वाचन करतात. आता हा जो नुसतं ( स्टॅटिक / स्थिर ) बसून समोर कागद घेऊन वाचण्याचा फॉर्म आहे तो दृश्याच्या अर्थाने फारच रटाळ आहे. एकतर बसून राहिल्याने देहबोलीवर आणि काही अंशी आवाजफेकीवर मर्यादा येतात आणि त्यामुळे पूर्ण ताकदीनं काही सादर केलं आहे असा अनुभव होत नाही. एक तर नुसतेच बसलेले चारपाच लोक एकदा दिसले की नजर त्याला स्थिरावते आणि जास्तकरून ऐकण्याचं काम बाकी राहतं. मग अशावेळी डोळे बंद करून श्रुतिका ऐकतो तसं ऐकण्यावरच लक्ष केंद्रित केलं तर ? मी या प्रयोगात तसं करूनही पाहिलं परंतु व्हिन्सेन्टची मागे येणारी चित्रं बोलावत होती. परंतु अशी दृश्यमोही तत्वे नसलेलं अभिवाचन असेल तर मग त्यात अभिनेते पडद्यामागे बसले तरी असा किती फरक पडतो असं मला आजकाल वाटू लागलेलं आहे हे नक्की ! वास्तविक प्रस्तुत प्रयोगात धीरेश जोशी आणि अश्विनी गिरी हे अनुभवी आणि चांगले कलाकार एकूण छानच वाचत होते परंतु त्यातही या वाचनाच्या , त्यातल्या प्रतिक्रियांच्या डायनॅमिक्सचा/विणीचा एक पारंपारिकपणा- तो आपला पारंपारिकपणा परकीय संस्कृतीत घडत असलेल्या घटनेवर आरोपित करणे - किंचित तोचतोचपणा - एखादा संवाद ऐकल्यानंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या पुढच्या प्रतिक्रियेचं पूर्वानुमान होणे अशी अनेक तत्वे अनुभवताना वाटतं, की आपण अजूनही ऐंशी/नव्वदच्या दशकातून बाहेर न आल्याची खूण आहे का? परंतु याबद्दल मूळ संहितेतील वाक्ये/संवाद घेऊन सोदाहरण बोलावं लागेल , ते आत्ता शक्य नाही - म्हणून याचा केवळ उल्लेख करतो.

शांत बसून ऐकण्या/बोलण्याची आपली एक तऱ्हेची गुरु-शिष्य संस्कृती आहे किंवा होती याच्याशी या बसून अभिवाचन करण्याचा काही संबंध आहे का आणि असेल तर शांत बसून ऐकण्याच्या दैनंदिन सवयीचं / अभ्यासाचं आजचं चरित्र काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. शांत स्वस्थ बसल्याचे फायदे अनेक आहेत आणि त्यातून जीवनात शांत रसाची प्राप्ती होत असेल तर ते चांगलंच आहे, परंतु त्याने नाट्य निर्माण होत नाही खास ! दुसरी गोष्ट अशी की व्हिन्सेन्टचं जीवन हे इतकं वेगवान आणि वळ्णावळणाचं आहे की नुसतं बसण्यातून त्याला आपण काही न्याय देतो असं वाटत नाही.

मला सुचलेला बदल असा की , व्हिन्सेंटची ही संहिता जर नटांनी प्रेक्षागृहात फिरून , वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग करून त्यातलं डायनॅमिक्स चांगल्या प्रकारे आणि निराळ्या प्रकारे उठावदार होऊ शकेल, याने कदाचित सर्व अभिनेत्यांसाठी निराळ्या प्रकारे आवाज लावण्याची शक्यता निर्माण होईल . याचा परिणाम संगीत निवडण्यावरदेखील होऊ शकेल. अर्थात यासाठी प्रयोगाच्या जागेनुसार काही बदल करावे लागतील, परंतु आता लॅपल माईक उपलब्ध असल्याने हे फारसं अवघड नसावं.

सर्व नटांच्या आवाजाचा मिळून एक ध्वनी तयार होण्याबद्दल वर काही म्हणालो होतो ते अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक नटाच्या आवाजाचा एक पोत असतो आणि पट्टीदेखील असते. संचातील प्रत्येकाने आपापली मूळ पट्टी ओळखून, वाचत असलेल्या पात्राप्रमाणे त्या पट्टीत बदल करून आणि इतर नटांच्या पट्टीशी त्याचं कॅलिब्रेशन करून वाचन करण्याचा प्रयोग केला पाहिजे. तबल्यामध्ये तबल्याच्या मूळ स्वराच्या आसेच्या आजूबाजूला काम करून त्याच्या ध्वनीचा दर्जा वाढवण्याचे काही पारंपारिक आणि काही नवे असे प्रयोग झालेले आहेत, तसं सर्व नटांनी एका विशिष्ट आसेभोवती जर आपापले आवाज कॅलीब्रेट केले आणि त्यातही तो आवाज मूळ संहितेच्या जवळ जाणारा असेल तर फारच बढिया; तर त्यातून या प्रयोगाची रंगत वाढेल हे नक्की ! उदाहरणार्थ - सई नावाच्या तरुण नटीचा आवाज ती साकारत असलेल्या पहिल्या पात्राला साजेसा अवखळ आणि किंचित वरच्या पट्टीतील आहे, परंतु तिला प्रतिसाद देणाऱ्या तरुण व्हिन्सेंटचा ( धनेश जोशी) आवाज हा वाचनाच्या ( किंचित रेडिओ नाट्यासारखंही ) पारंपारिक पायंड्याप्रमाणे लगेच मुद्दाम खर्ज लावणारा येतो आणि तिथे सहज नाट्य निर्माण होण्याऐवजी हे आपण यापूर्वी ऐकलेलंच आहे, किंवा यात काय नवीन असा अनुभव मिळतो असं वाटून जातं. हे बोलण्याचं आणि आवाज लावण्याचं लफडं पुन्हा मूळ संहितेच्या भाषेशी, तिच्या घाटाशी थेट निगडित आहे. लव्ह यु मध्ये शिवराज वायचळ या तरुण नटाने आवाजाच्या संदर्भात आश्वासक कामगिरी केली आहे असं जाणवतं. पर्ण पेठेचा मंचावरील वावर एका अर्थाने फ्लॉलेस असला तरी आवाजाच्या बाबतीत तिची व्हेरिएशन ही केवळ कर्कश याच रेंजमध्ये जास्तकरून राहतात. पुन्हा एकदा त्या प्रयोगाचा एकूण टोन हा मुद्दामच जास्त कर्कश ठेवला आहे, की तो नकळत तसा झाला आहे हे कळायला वाव नाही. यातली मुख्य पात्रे ही वयाने लहान ( चौदा/पंधरा ?) वर्षाची असल्याने थोडा कर्कशपणा चालून जावा , परंतु तो प्रयोगभर राहतो. या नाटकाच्या दिग्दर्शिकेला मराठी भाषा समजते की नाही माहित नाही.

आवाज आणि संहितेचा परस्परसंबंध पाहताना भाषांतर इथे काय भूमिका बजावतं ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. भाषांतर करीत असताना मूळ संहिता - त्यातली भाषा - त्याचं इथल्या भाषा/संस्कृतीत रुचेल असं भाषांतर- त्यातली विषयवस्तू ( कन्टेन्ट या अर्थानेच ) - त्यात प्रतिबिंबित होणारं सांस्कृतिक चित्रण - ते चित्रण आपल्या भाषेत करण्यासाठी निवडली जाणारी शब्दकळा - आणि हे सर्व ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्यांचा भाषिक लसावि या सर्व गोष्टींचा मेळ भाषांतरकाराला घालावा लागतो आणि या अर्थाने माधुरी पुरंदरे यांनी केलेलं भाषांतर हे एक महत्वाचं मानावं लागेल. अर्थात ते जुनं आहे, त्यातली भाषा एकूणात चांगली आहे. पूर्वीच्या काळी मराठीमध्ये भाषांतराचं प्रमाण कमी होतं, पर्यायाने खास भाषांतरित मराठी वाचणारे वाचक कमी होते, तसेच प्रवासाच्या सोयी वगैरे फारशा नसल्याने युरोपदेशाबद्दल एक प्रकारचं भारावून जाणारं आकर्षण होतं, त्यामुळे भाषांतरित पाठ आणि वाचक यांच्यामध्ये पुष्कळ अंतर असे, हे अंतर त्या देशाचा काही अनुभव नसल्याने निर्माण झालेलं असे. उदाहरणार्थ Croissant चा उच्चार पूर्वी आणि आजही आपल्या लोकांना कठीण वाटत असला तरी आज Croissant आज आपल्या देशात मिळतो, त्याची चव पुष्कळ लोकांना माहित आहे, Makroni पूर्वी एखाद्या कथेत आली, की वाचक एखादं चित्र पाहून , वर्णन वाचून त्याची कल्पना करीत असे आणि आज मॅकरोनी सहज उपलब्ध आहे. तर मला वाटतं, की या बदलणाऱ्या अंतराला सामावून घेणारी भाषाशैली विकसित करण्याची गरज हे आजच्या भाषांतरकारांसमोर एक मोठं आव्हान आहे. व्हिन्सेंटच्या जुन्या भाषांतरामध्ये त्याचं जुनेपण आणि किंचित कृत्रिमपण डोकावत राहतं, त्याचा प्रभाव नटांच्या आवाज लावण्यावर होऊ शकत असेल ! नटांच्या आवाज लावण्यामध्ये अशा भाषेचा, भाषाशैलीचा काय प्रभाव पडतो , पडतो का याचा अभ्यास या निमित्ताने होऊ शकेल. ‘लव्ह यु’ ची मूळ संहिता एकदा वाचली पाहिजे, म्हणजे त्यात नक्की काय आणि कसे बदल झालेले आहेत याचा अंदाज येऊ शकेल. परंतु त्यातली भाषा ही त्यातल्या विषयाशी , आजच्या भाषेशी आणि त्यातही तरुणाईच्या भाषेशी जवळची आहे. ( उगाच खेकसत म्हणणे आय लव्ह यू ची आठवण झाली). लव्ह यु सारख्या नवीन संहितेबदल असंही म्हणता येऊ शकेल, की ती संहिता जर्मन नाटकाच्या परंपरेत नक्की कुठे, कशी बसते , तिथल्या नाट्य-सांस्कृतिक जीवनात तिचा सूर नक्की कसा आहे तो सूर इथे भाषांतरित होऊ शकेल का याचा विचार झाला आहे का आणि भाषांतरित संहिता हे नाटक कसं पहावं, त्याचा सूर कसा आहे याकडे काही इंगित करू शकतं का हे मला पडलेले काही प्रश्न ! उच्चारणाच्या बाबतीत व्हिन्सेंट पुष्कळ सरस वाटलं. लव्ह यू मध्ये -घटस्फोट- हा शब्द किमान अकरा वेळा तरी येतो आणि त्यातील ‘फ’ दन्त्योष्ठ्य (fricative) येत होता आणि त्याचा फार त्रास होत होता ( आता पुन्हा हे मुद्दाम केलं होतं की माहित नाही ). लव्ह यू मध्ये सुरुवातीलाच दिग्दर्शिका येऊन हिंदी/इंग्रजी मध्ये सांगून गेली, की याचा फॉर्म हा अभिवाचन आणि आणखी काहीतरी , आणि नाटक आणि त्यापेक्षा काहीतरी वेगळं असा आहे. यात दोन्ही पात्रे हातात संहितेच्या फाईली घेऊन प्रयोगभर वावरतात, अधूनमधून त्यात पाहून संवाद बोलतात. अशा प्रयोगाबद्दल आणि अनेक हालचाली करीत सफाईने फायली वागवल्याबद्दल एकूण टीमचं अभिनंदन तरी त्याची संपूर्ण प्रयोगभर गरज होती असं वाटत नाही. लव्ह यु मधली मराठी भाषा कधीकधी त्रासदायक वाटते, तरीही त्यातले आजी आजोबांचे प्रसंग इंटरेस्टिंग उतरले आहेत;परंतु अजून मूळ संहिता वाचली नसल्याने त्याबद्दल खूप लिहीत नाही.

आपल्याकडचा व्हिन्सेंट फेनॉमेन ?

व्हिन्सेंटच्या आपल्याकडच्या लोकप्रियतेच्या संदर्भात काही बोलावंसं वाटतं. व्हिन्सेन्टचं जीवन एकाचवेळी नाट्यमय, प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही. युरोप खंडाने जगाला अनेक मोठे चित्रकार/शिल्पकार दिलेले आहेत. त्यातल्या काही कलाकारांचं जीवन देखील नाट्यमय आणि प्रेरणादायी आहे. परंतु आपल्याकडे इतर चित्रकार, त्यांचं जीवन याबद्दल फारसं लिहिलं गेलेलं दिसत नाही, किंवा आपण ( म्हणजे जास्तकरून मराठीच त्यातही पुणे-मुंबईवाले लोक ?) व्हिन्सेंटच्या जीवनाने जसे भारावून गेलेलो आहोत तसे इतर चित्रकारांच्या जीवनाने भारावून गेलेलो दिसत नाही. युरोप खंडातीलच एका देशात मी गेली काही वर्षे राहतो आहे परंतु व्हिन्सेन्टबद्दल जे प्रेम , जी आस्था , ज्या प्रकारचं भारावलेपण आपल्याकडे दिसतं ते आणि तसं आमच्याकडे फारसं दिसलेलं नाही. व्हिन्सेन्टच्या चित्रशैलीने भारावून जाऊन त्याच्यासारखं काम करण्याचे प्रयत्न पूर्वी युरोपात झालेले आहेत, परंतु आत्ता तिथली चित्रकला ज्या टप्प्यावर आहे त्यात व्हिन्सेन्टला फार जागा आहे असं वाटत नाही. त्याच्या जीवनावर, चित्रकलेवर पुस्तके, शोध वगैरे उपलब्ध आहेतच, तरीही व्हिन्सेन्टचं अस्तित्व तिकडच्या इतर फॉर्ममध्ये - साहित्य , काव्य , नाट्य - फारसं दिसत नाही. उलट आपल्याकडे मात्र ( पुन्हा त्यातही मराठी आणि पुणे-मुंबईकडचे लोक ?) व्हिन्सेंटचा साहित्य-कवितेमध्ये चांगलाच शिरकाव झाल्याचं जाणवतं. अजून आपल्याकडे चित्रकलेमध्ये विन्सेंटच्या पाऊलावर पाऊल टाकून ( कॉपी करून असं म्हणायचं नाही मला ) खूप काही प्रयोग झाल्याचं माहित नाही. तर व्हिन्सेन्टला चित्रकला सोडून इतर फॉर्म्समध्ये इतकं स्थान मिळण्यामागे काही प्रमाणात तरी आपली भक्ती परंपरा काम करते का असा प्रश्न मला पडतो. व्हिन्सेन्टबद्दल आपल्याला वाटणारं प्रेम अशा प्रकारे जर नीट तपासून पाहिलं तर कदाचित हा इंटरेस्टिंग फेनॉमेन म्हणून समोर येऊ शकेल. आता आपल्याकडचं नृत्यदेखील चौकटीतून बाहेर येत आहे. हे व्हिन्सेंट प्रेम असंच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये झिरपत राहिलं तर उद्या कदाचित कथक नृत्यात स्टारी नाईटचं इंटरप्रिटेशन पण दिसू शकेल.

अभिनय/नेपथ्य/ प्रकाशरचना आणि वेषभूषा वगैरे:

अभिवाचनाच्या प्रयोगात बहुतेक सर्वांचा वाचिक अभिनय चांगलाच होता आणि त्यातही अश्विनी गिरी आणि धीरेश जोशी यांनी खूपच समजून उमजून काम केल्याचं जाणवत होतं. धनेश जोशी याने अजूनही संवादांवर काम करण्याची गरज आहे आणि तरुण उत्साही व्हिन्सेंट ते आजारी, खचलेला व्हिन्सेंट आवाजातून अभिव्यक्त होण्यासाठी आणखी काय करता येईल याचा शोध घेण्याची गरज आहे. सई चांगली वाचते.

लव्ह यू मध्ये मला शिवराज वायचळ हा आश्वासक वाटला असं लिहिलं आहेच. त्याने आवाजाचा आणि हालचालींचा फारच सुयोग्य वापर केला आणि संपूर्ण प्रयोगात त्याची लय राखून ठेवली. पर्ण पेठेचाही एकूण वावर ( प्रेझेन्स या अर्थाने ) चांगला होता, परंतु आवाजातील कर्कशपणा कमी करता आला तर जरा बरं होईल. हे नाटक नक्की कसं बसवलं हे जाणण्याची उत्सुकता आहे. गमतीची गोष्ट अशी, की लव्ह यू हे नाटक आजच्या आपल्या ग्लोबलाईज्ड समाजाचं प्रतिनिधित्व करतं असं म्हणता येईल. जर्मन संहिता मराठीत येते आणि कोणी अमराठी दिग्दर्शिका याच दिग्दर्शन करते हे पडद्यामागचं इंटरेस्टिंग चित्र आहे.

व्हिन्सेंटच्या अभिवाचनात मागे प्रोजेक्ट होणारी त्याची चित्रे सोडली तर इतर काही खास दृश्य तत्व नव्हतं. लेव्हलची रचना ( त्यातही त्यावर आपलं नेहमीचंच काळं/राखाडी कापड ) आणि त्यावर एक लाल रंगाचा स्ट्रीट लॅम्प. प्रकाशयोजनेत व्हिन्सेंटच्या रंगांच्या खेळाची योजना करून या प्रयोगाची दृश्य संवेदना वाढवता आली असती. आणि म्हणूनच अशा दृश्याच्या पार्श्वभूमीवर मागे प्रोजेक्ट होणारी व्हिन्सेन्टची चित्रे कितीही भारी असली तरी ती एकूण दृश्याचा भाग आहेत असं वाटत नाही. ही चित्रे कथेनुसार येतात हे ठीक आहे, त्यात व्हिन्सेंटचा चित्रकलेतील प्रवास दिसत नाही ही मर्यादा समजून घेता येते, परंतु त्याची एकूण दृश्याशी सांगड घालता येत नाही. वेशभूषेच्या बाबतीत फारशी तक्रार नाही परंतु त्यातही आणखी काही ऑथेंटिक करता येईल का याचा विचार व्हावा.

लव्ह यु चं नेपथ्य आणि वेषभूषा विषयाला साजेशी आहे आणि त्याचा वापर अभिनेते फार चांगल्या प्रकारे करतात. त्यांचा एकूणच शारीरिक वावर हा उत्साहवर्धक , जोशपूर्ण आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन, परंतु त्यांनी उच्चारणाकडे अजून थोडं लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. तसेच या प्रयोगाची प्रकाश आणि ध्वनिव्यवस्थादेखील चांगली होती.

प्रयोगाच्या जागा आणि इतर आवाज :

व्हिन्सेंटचं वाचन भरत नाट्य मंदिरात होतं तर लव्ह यू चा प्रयोग ज्योत्स्ना भोळे सभागृहात होता. भरतमध्ये गेल्यावर जुन्या आठवणी वगैरे जागृत झाल्याच पण प्रेक्षगृहात बसल्यावर बाहेरच्या रस्त्यावरचे आवाज आणि गाड्यांचे हॉर्न बारीक का होईना ऐकू येत होतेच. Sad जेबीएसमध्ये ते खूपच कमी प्रमाणात झालं. परंतु जेबीएसची एकूण रचना अशी आहे, की आपण सिनेमास्कोप पाहतो आहोत असं वाटून जातं. नाटकाला प्रेक्षक येत आहेत हे बघूनच आनंद झाला होता Smile

असो ! इथे थांबतो. खूप वर्षांनी आपली नाटकं पहायला मजा येते आहे. सर्व नाटक करणाऱ्यांना धन्यवाद आणि खूप शुभेच्छा !

०३/०८/२०२२.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्हिन्सेंटच्या जीवनाने जसे भारावून गेलेलो आहोत तसे इतर चित्रकारांच्या जीवनाने भारावून गेलेलो दिसत नाही. युरोप खंडातीलच एका देशात मी गेली काही वर्षे राहतो आहे परंतु व्हिन्सेन्टबद्दल जे प्रेम , जी आस्था , ज्या प्रकारचं भारावलेपण आपल्याकडे दिसतं ते आणि तसं आमच्याकडे फारसं दिसलेलं नाही. व्हिन्सेन्टच्या चित्रशैलीने भारावून जाऊन त्याच्यासारखं काम करण्याचे प्रयत्न पूर्वी युरोपात झालेले आहेत, परंतु आत्ता तिथली चित्रकला ज्या टप्प्यावर आहे त्यात व्हिन्सेन्टला फार जागा आहे असं वाटत नाही. त्याच्या जीवनावर, चित्रकलेवर पुस्तके, शोध वगैरे उपलब्ध आहेतच, तरीही व्हिन्सेन्टचं अस्तित्व तिकडच्या इतर फॉर्ममध्ये - साहित्य , काव्य , नाट्य - फारसं दिसत नाही. उलट आपल्याकडे मात्र ( पुन्हा त्यातही मराठी आणि पुणे-मुंबईकडचे लोक ?) व्हिन्सेंटचा साहित्य-कवितेमध्ये चांगलाच शिरकाव झाल्याचं जाणवतं. अजून आपल्याकडे चित्रकलेमध्ये विन्सेंटच्या पाऊलावर पाऊल टाकून ( कॉपी करून असं म्हणायचं नाही मला ) खूप काही प्रयोग झाल्याचं माहित नाही. तर व्हिन्सेन्टला चित्रकला सोडून इतर फॉर्म्समध्ये इतकं स्थान मिळण्यामागे काही प्रमाणात तरी आपली भक्ती परंपरा काम करते का असा प्रश्न मला पडतो.

याविषयी प्रश्न पडला. 'लव्हिंग व्हिन्सेंट' नावाचा ॲनिमेशनपट २०१७ साली आला होता. त्याची सहदिग्दर्शिका पोलिश आहे आणि त्यातलं ॲनिमेशन पोलिश स्टुडिओत केलं गेलं होतं. संकलक, छायांकनकार वगैरे इतर तंत्रज्ञही तिथले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदीच. चिक्कार उदाहरणे आहेत याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हो , चित्रपट आला होता आणि मस्तच होता. मुळात विन्सेंटच्या जीवनावर आजवर बरेच चित्रपट येऊन गेलेले आहेत. परंतु आपल्याकडे ( म्हणजे पुण्या-मुंबईकडे जास्तकरून ) ज्या प्रकारची व्हिन्सेंट भक्ती दिसते आणि ती कविता/साहित्य/अभिवाचन अशा फॉर्ममध्ये नांदताना दिसते तशी मला इथे ( कदाचित अजूनतरी ) आढळलेली नाही इतकंच माझं म्हणणं आहे. हे जर खरं असेल तर आपल्याकडचा हा व्हिन्सेंट प्रेमाचा फेनॉमेन तपासून घेतला पाहिजे, त्यात काही रोचक गोष्टी सापडण्याची शक्यता आहे असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

परंतु आपल्याकडे ( म्हणजे पुण्या-मुंबईकडे जास्तकरून ) ज्या प्रकारची व्हिन्सेंट भक्ती दिसते आणि ती कविता/साहित्य/अभिवाचन अशा फॉर्ममध्ये नांदताना दिसते तशी मला इथे ( कदाचित अजूनतरी ) आढळलेली नाही इतकंच माझं म्हणणं आहे. हे जर खरं असेल तर आपल्याकडचा हा व्हिन्सेंट प्रेमाचा फेनॉमेन तपासून घेतला पाहिजे, त्यात काही रोचक गोष्टी सापडण्याची शक्यता आहे असं वाटतं.

कदाचित, पोपहून अधिक कॅथलिकत्वाचा/राणीहून अधिक इंग्रजत्वाचा फेनॉमेनन हिंदुस्थानात घडत असावा काय?

(बाटगा मुसलमान अधिक कडवा असतो/नवोदित मुल्ला प्रार्थनेसाठी आवाहन अधिक जोरजोरात करतो, असे काहीबाही ऐकून आहे ब्वॉ. खरेखोटे अल्लाच जाणे.)

नपक्षी, पिकते तेथे विकत नाही, असेही असू शकेल काय?

असो चालायचेच.

(अतिअवांतर: ‘आमच्या’त याला ‘झग्यातून पडणे सिंड्रोम’ म्हणतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे ( म्हणजे पुण्या-मुंबईकडे जास्तकरून ) ज्या प्रकारची व्हिन्सेंट भक्ती दिसते आणि ती कविता/साहित्य/अभिवाचन अशा फॉर्ममध्ये नांदताना दिसते तशी मला इथे ( कदाचित अजूनतरी ) आढळलेली नाही इतकंच माझं म्हणणं आहे.

कदाचित मला हा मुद्दा नीटसा कळलेला नाही. परदेशात विविध ठिकाणी भरलेली व्हॅन गॉगची काही प्रदर्शनं आणि प्रत्यक्ष ॲमस्टरडॅममधल्या म्युझियममध्ये जाण्याची संधी मला मिळाली होती. तिथली गर्दी पाहता (विशेषतः इतर काही चित्रकारांच्या प्रदर्शनांशी तुलना करता) तिथेही भावभक्तीच म्हणावी असं वातावरण दिसलं होतं.

अर्थात, तसं म्हणायचं तर लूव्रमध्ये मोनालिसासमोर जे दिसतं त्यालाही फेनॉमेनन म्हणावं लागेल. पण इथे ते अवांतर होईल कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||