प्रस्थान जवळ येत असतानाच्या नोंदी!

आता प्रस्थानाची तारीख जवळ येते आहे. खरेदी , पॅकिंग वगैरे बहुतेक झालेलं आहे. बाबा आजारी आहेत ( आज पुष्कळ बरं वाटतंय , तरी ). घरात आजारी माणूस , हवेत फक्त पाऊस, त्यामुळे गच्चीवर जाऊन वाजवण्याची सोय नाही; सुट्टीवर असल्याने काही रेग्युलर कामही करीत नाहीए, नुसतंच झोपणार आणि वाचणार किती वेळ; अशा वेळी एक प्रकारचा उबग येतो. आज दुपारी ठरवलं, बाहेर पडायचं आणि गावात जायचं. आम्ही नवीन तळेगाव भागात राहणारे. जुनं गाव आमच्यासाठी थोडं लांब आहे, पण मी थोडा चालत , थोडी लिफ्ट असे सर्व जुगाड करून निवांत गावात जातो नेहमीच. रॉयच्या चित्रांना फ्रेम करायला टाकल्या होत्या त्या आणायच्या होत्या. तर गावात गेलो, आणि तिथे गेल्यावर डोक्यात प्रकाश पडला, की अरे आज गावचा बाजार ! बाजारामुळे छोट्या गल्ल्या एकदम फुल्ल ! बाजार मला कायम आवडतो ! सगळयात मस्त म्हणजे बाजारात आल्यावर माणसांचे नैसर्गिक आवाज ऐकता येतात, बाजाराचा म्हणून कोलाहल असतो, पण तो अकोस्टिक प्रकारचा असतो. त्यात गाड्या , हॉर्न यांचे आवाज कमीतकमी येतात. इथे आल्यापासून हे नुसते गाड्यांचे आवाज आवाज ऐकून माझ्या दिमागचा जो चक्का झालाय म्हणता ! तर मस्तपैकी बाजारात भटकत सांध्यकालीन प्रकाशाचा आनंद घेत चाललो होतो. झाडंझुडं असलेल्या प्रदेशात मॉन्सूनच्या काळात संध्याकाळचा जो प्रकाश असतो तो आपण अजून चित्रात का पकडला नाही असं सारखं वाटत राहतं. असो, तर पहिल्यांदा बाबा आणि बायको यांच्या आग्रहाखातर पोरांसाठी कुर्ते घेतले, आणि वाटेत अजून काय काय गोष्टी भुरळ घालत होत्याच. पुन्हा ज्या वाटेने आधी गेलो तिथे काही वस्तू हेरून ठेवल्या होत्या, म्हणलं आधी महत्वाच्या गोष्टी उरकून घेऊन येताना जमलं तर घेऊयात. बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम स्वस्त आणि मस्त माल ! तर हातात दोन छोट्या बॅगा होत्या. चित्रांच्या फ्रेम मिळायला अजून साधारण तासभर होता. तेली आळीच्या गल्लीत भटकताना मित्राला सहज गंमत म्हणून फोन केला आणि इकडे बाजार बघायला ये असं गमतीचं आमंत्रण दिलं. तर तो कर्वेनगर भागातला, त्यानं ढोलताशाच्या आवाजाची तक्रार करायला सुरुवात केली. फोनवर बोलत असताना बाजूला उभ्या असलेल्या बीबी झकास कानातलं विकताहेत असं दिसलं. त्यातली काही फोनवर बोलत असतानाच नजरेत भरली. हे बायकोला चांगलं दिसेल , हे तिच्या एका मैत्रिणीला, आमच्या छोट्या शेजारणीला असं काय काय वाटल्यानं आणि ती कानातली एकदमच स्वस्त असल्याने लगेच धापाच घेऊनच टाकली. कानातली इतक्या उत्साहानं घेणारे पुरुष कमीच असावेत का? कारण त्या बीबींभोवती जास्तकरून बायाच होत्या आणि कानातली खरेदी करण्याचा माझा उत्साह आणि चपळाई बघून बीबी अचंबित झालेल्या होत्या. माझं घेऊन झालं तर बीबी म्हणाल्या , आता शेवटचं माझ्या आवडीचं काय ? त्यांच्यासमोरचा तो उभा स्टॅन्ड त्यांनी हळूहळू फिरवला आणि एक निवडून माझ्यासमोर ठेवलं. मलाही ते पसंत पडलं, बीबी खुश झाल्या. आता हे सगळं सुरु होतं विष्णू मंदिरासमोर. तिथून भजन कीर्तनाचा मस्त आवाज येत होता. म्हणलं आता हळूच देवळात जाऊन दर्शन घेऊयात आणि थोडा वेळ भजन कीर्तनाचा आनंद घेऊन पुन्हा बाजारातील फेरफटका कंटिन्यू करूयात ! आत गेलो, बॅगा बाजूला ठेवल्या, आता जातोय तेवढ्यात त्यांचा ब्रेक झाला बहुतेक आणि एकदम द्रोणातून मसाले भात आणि प्रसादाचा शिरा येऊ लागला. एक मनुष्य मला एकदम स्वागताचं या बसा म्हणाला आणि मी आरामात सतरंजीवर जाऊन बसलो. तळेगावात काही सुंदर आणि छोटी देवळे आहेत तसेच इथल्या गल्ल्यांत जगनाडे महाराज , खुद्द तुकाराम महाराज यांचं थोडा काळ का होईना वास्तव्य होतं अशा आख्यायिका आहेत, त्यामुळे मला इथे फार छान वाटतं. मी सतरंजीवर बसलो तर बाकीचं भजनी मंडळ चहा घेत होतं पण तरुण तबलावादक मात्र आपल्या नादात वाजवत होता. काळी चारचा तबला, आणि पखवाज अंगाची थाप ! त्याची सामग्री विशिष्टच होती, फारसे तुकडे किंवा लग्ग्या किंवा उठान त्याच्यापाशी नव्हत्या तरी जोशपूर्ण आणि त्या देवळाच्या आसमंताला शोभेल असा तबल्याचा ध्वनी होता. देऊळ आतून सुरेखच आहे. १८५० च्या आसपास बांधलेलं आहे हे देऊळ ! मलाही द्रोण मिळाला. मी एखादा घास खाल्ला असेल नसेल तो पुन्हा भजन सुरु झालं. गावातल्याच बायका एकाच रंगाच्या डार्क ग्रीन साड्या घालून गात होत्या. मी तबल्यात आणि गाण्यात रममाण झालो आणि आपसूक ताल देऊ लागलो , मध्येच वाहवा म्हणू लागलो! माझ्या शेजारी बसलेल्या मनुष्यानं ताडलं असावं की हा भाऊ संगीतातला आहे ! त्यांनी विचारलं, तुम्ही काय वाजवता की गाता ? मी म्हणालो थोडी हार्मोनियम वगैरे वाजवतो आणि कधी थोडा जुजबी तबला ! लगेच एकदम त्यानंच पुढाकार घेऊन देवळातली हार्मोनियम माझ्यापुढं आणून ठेवली. तिचं कव्हर मस्त होतं ( त्याचा फोटू नाही काढला तिच्यायला Sad ) मी लगेच पेटी काढली आणि सरसावून मुख्यभजनबाईंच्या बाजूलाच बसलो. मग तासभर आम्ही वाजवलं. आपल्या काल्याची, कृष्णजन्माष्टमीची ही पारंपरिक भजनं किती सुरेख आहेत ! आमचे जुने शेजारी सुरेश अंबिके यांच्या पत्नी फार सुरेल आणि लडिवाळ कृष्णभजनं गात असत. दोघेही आता नाहीत. त्या दोघांची मला या नवीन कर्कश तळेगावच्या पार्श्वभूमीवर फार आठवण येत असते. असो , तर या रेणुका भजनी मंडळाच्या चाली फार अवघड नव्हत्या , कधी एखाद दुसरी जागा मुश्किल होती , पण एकूण मामला सोपा आणि साधा आणि सर्व स्त्रिया एकतानतेनं गात होत्या , कधी माझ्या जागा वेगळ्या गेल्या तर बारीकसं हसत होत्या, मुख्यभजनबाई मात्र एकूण ग्रुपचं संचालन फारच छान करीत होत्या, पुन्हा त्यांच्यात वेळेची एक इंटरेस्टिंग समज दिसली. भजनी मंडळांची भजनं बहुतेक ठरलेली असतात, त्यामुळे दोन भजनात पॉज असा ते फारसा घेत नाहीतच; एकदम अचानक भलतंच स्केल सुरु करून धमाल उडवून देतात ! भजनांच्या चालींमध्ये अधूनमधून बारीक हिंदी गाण्यांची सुरवात डोकावत होती, पण त्याचं प्रमाण अगदीच कमी होतं. एकाच भजनाला , अभंगाला पुष्कळ वेगवेगळ्या चाली आपल्याकडे आहेत. वारकरी परंपरेत त्या चालींच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. जुन्या जाणत्या लोकांना या कहाण्या माहित असतात. पण ‘होईन मी भिकारी , पंढरीचा वारकरी’ या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये चाल कुठल्याही स्केलमध्ये असो ‘पंढरीचा वारकरी’ हे ओरडून तारस्वरात म्हणण्यासाठीच आहे! बाकी होईन मी भिकारी तिथे बसून अनेकवेळा ऐकताना खरंतर याचं फार सुरेख विवेचन जे कृष्णमूर्तींनी केलेलं आहे असं आठवू लागलं. सलग चार पाच भजनं झाल्यावर एकदम ते सर्व शांत झाले. मुख्यभजनबाईंनी त्यांच्यासमोरचा माईक एकदम माझ्यासमोर सरकवला आणि म्हणाल्या आता तुम्ही गा काहीतरी ! झालं ! एक तर माझा घसा थोडा बसलेला आहे, आणि पट्टीचं लफडं- तबला एकच होता काळी चारचा ! काळी चार मला फार वर आहे. तरी मग कसंबसं काळी पाचमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची माझी आवडती विरहिणी गायलो. ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणी फार सुरेख आणि गूढरम्य पण आहेत, त्यातली - ‘निळीये निकरे कामधेनू मोहरे’ गायलो; यथातथाच गायलो ! पण बाकीच्यांना आवडलेली दिसली. दुसरी विरहिणी ‘कृष्णे वेधिली विरहिणी बोले’ का आठवली नाही माहित नाही ! मग आणखी काही भजनं झाली. त्यात जनाबाई तर होतीच Smile त्यानंतर एक जुने विणेकरी ( ८१ वर्षे ) माईकसमोर उभे राहिले. त्यांनी काल्याचा सुरेख अभंग गायला तोही अहिर भैरव सारख्या स्केलमध्ये ! पांढरी सहाचा मस्त सूर ! ८१ वर्षाचे असूनही अंगकाठी ताठ ! चेहरा शांत आणि सुरेख ! अगदी साधाच कुर्ता आणि पायजमा! या कुर्त्याचा रंग कोणता हे अजिबात सांगता येणार नाही. एव्हाना साडेसात वाजून गेले होते, अशावेळी अहीर भैरवसारखं काहीतरी वाजवायला आणि ऐकायला काही वेगळंच वाटत होतं. दहीहंडी आली , त्यातला प्रसाद आला. नंतर टिपिकल आरत्या ( त्यातही आरत्यांच्या नव्या चाली हा एक सौतंत्रच विषय आहे !) यानंतर छोटं भाषण आणि त्या लोकांचा सत्कार वगैरे. आपण लोक रूढीप्रमाणे कपाळाला बुक्का, शाल-टोपी-नारळ देऊन अशा जुन्या खोडांचा सत्कार वगैरे करतो ते ठीकच आहे, पण १९५८ पासून वीणेकऱ्याचं काम करणाऱ्या अशा माणसांना त्यांची पट्टी कुठे आणि कशी सापडली याबद्दल त्यांच्याशी बोललं पाहिजे. जमल्यास अधूनमधून आपल्याही पट्ट्या शोधून दुरुस्त करीत राहीलं पाहिजे! मलाही सत्काराचा नारळ मिळाला. नंतर रेणुका भजनी मंडळाच्या त्या बायकांनी मला औतानच दिलं, अगदी हक्कानं म्हणाल्या - उद्या आमच्या विठ्ठल मंदिरात या वाजवायला ! मी सांगितलं, की मी आता पुढल्या वर्षी आल्यावर नक्की येऊन वाजवेन, तेव्हा त्यांचा विश्वास बसेना, की मी परदेशात राहतो ! त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो, एव्हाना बाजार आवरलेला होता, मी हेरून ठेवलेल्या वस्तू गायब झाल्या होत्या. फ्रेम घेतल्या. तास सव्वा तास जे धमाल सुरेख सूर ऐकलेले होते ते कानात साठवून रिक्षाचे हॉर्न, गाड्यांचे आवाज ऐकायच्या रणांगणात प्रवेश करता झालो. घरी आलो !

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छानच लिहिलंय,
तुझ्या (काही माणसांना बिन्धास्त तू म्हणावं वाटतं Lol आत एक झुळझुळ वाहणारा ॲब्सोल्यूट आनंदाचा निवांत-नितळ झरा असावा अशी मला दाट शंका येतेय.
तसा झरा सगळ्यांना मिळो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0