श्रमसाफल्य

HAPPY FAMILIES ARE ALL ALIKE; EVERY UNHAPPY FAMILY IS UNHAPPY IN ITS OWN WAY.
– Anna Karenina, Leo Tolstoy

शिवराज सिगरेट पेटवून स्टायलिशपणे यादगारच्या पान टपरीवाल्याकडे सहज बघतो तर त्याला तो त्याच्याकडेच रोखून बघतोय असं जाणवतं. त्याला वाटतं त्याच्या पाठीमागे कुणीतरी असेल म्हणून त्याच्याकडे बघत असावा. तो वळून बघतो तर कुणीच नसतं तिथे. तो मान फिरवतो तरी टपरीवाल्याची नजर त्याच्यावरच रोखलेली असते. तो नजर टाळण्यासाठी इकडे तिकडे बघायला लागतो.

सिगरेट संपत असताना त्याची नजर वरती आकाशाकडे जाते. नेहमी पिवळसर रंगाने पसरलेली क्षितिजावरील आभा आज गडद लाल रंगाची झालीय असं दिसतं त्याला. बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याला ते रंग आपल्यासाठीच एकवटलेत असं वाटतं. त्याच्या मनात येतं हा नेहमीचा क्षितीज नाही. काहीतरी वेगळंच लक्षण आहे हे. शुभ की अशुभ ते त्याला ठरवता येत नाही.

सिगरेट संपते. चहा न घेताच तो निघतो. यादगार समोरच पार्क केलेल्या त्याच्या टीव्हीएस रेडिऑन बाईकला चावी लावून किक मारून चालू करतो. पहिला गिअर टाकून गाडी पुढे घेणार की त्याला एक कांदे-बटाटे विकणारा हातगाडीवाला आडवा येतो. तो निघून जाता जाता त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकतो. शिवराजच्या नजरेतून ते सुटत नाही. त्याला वाटतं आपण आडवे आलो आहोत म्हणूनच तो बघतोय. हातगाडीवाला त्याच्याकडे बघतच निघून जातो.

दयानंद गेटच्या सिग्नलला थांबला असताना त्याच्या बाजूला एक मध्यमवयीन स्त्री मॅट ब्लॅक कलरच्या व्हेस्पावर येऊन उभी राहते. शिवराज सहज म्हणून तिच्याकडे बघतो तर ती अतिशय रागाने त्याच्याकडे बघतेय असं वाटतं त्याला. तो काही न बोलता झटकन मान वळवून सिग्नलकडे बघायला लागतो. सिग्नल ग्रीन झाल्यावर चटकन तिथनं निघून जातो. शिवाजी चौकात आल्यावर डावीकडे अंबाजोगाई रोडला वळणार तोच एक ऑटोवाला त्याच्या डाव्या बाजूला अचानक येऊन थांबतो. शिवराजला कचकन ब्रेक दाबल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. तो क्रुद्ध चेहऱ्याने त्याच्याकडे बघतो तर तोच रागाने त्याच्याकडे बघतोय असं वाटतं त्याला. त्याला ती नजर या आधीच्या तिघांच्या नजरेसारखीच आहे असं वाटतं. तो काही बोलणार इतक्यात ऑटोवाला रहदारीत दिसेनासा होतो. शिवराज विमनस्क मनस्थितीत अंबाजोगाई रोडला गाडी वळवतो.

जुन्या रेणापूर नाक्याच्या चौकात आल्यावर परत एकदा तो डावीकडे रेडिऑन वळवतो. एलआयसी ऑफिसला मागे टाकून उजवीकडे वळतो. त्याच्या कॉलनीच्या रस्त्यावर जरी लाईटचे खांब असले तरी त्यावर लाईट नसायचीच. आज नेमकं सर्व लाईट्स चालू असल्याचं दिसतं. तो थोडासा आश्चर्यचकित होतो. घरासमोर येतो. गेटसमोर थांबतो. त्यांच्या गेटच्या कोपऱ्याला चिटकून असणाऱ्या खांबावर लाईट नसते. त्यामुळे घराच्या आसपास अंधारलेलं असतं. तो स्मितहास्य करतच गेट उघडतो. उघडत असताना गेटच्या डाव्या पिलरवर ‘श्रमसाफल्य’ बोल्ड तर त्याखाली ‘सगरे निवास’ बारीक सोनेरी अक्षरात नाव लिहिलेली काळ्या संगमरवराची पाटी असते. ती अंधारात चमकतेय असं वाटतं त्याला. तो गाडी आत लावतो.

गुणगुणत, मनात काहीतरी विचार चालू असल्यागत पायऱ्या चढून दारासमोर येतो. बेल दाबतो. अर्ध्या मिनिटाने दरवाजा उघडला जातो. समोर आई असते. ती त्याला काही सेकंदच बघते. तो तोंड उघडायच्या आत झटकन वळून आत निघून जाते. त्याला आश्चर्य वाटतं. सँडल सोडून आत हॉलमध्ये येतो. तिथे त्याचे वडील व सासू-सासरे बसलेले असतात.

“अरे, काका-काकू कधी आलात?,” म्हणतच त्यांचे पाया पडतो. ते त्याचा स्वीकार करून न केल्यासारखं करत त्याच्याकडे बघतात. परत एकदा तो आश्चर्यचकित होतो. यादगारहून निघाल्यापासून जो कुणी दिसतोय तो चमत्कारिक वागतोय असं जाणवायला लागतं त्याला. काही न बोलता आत बेडरूमकडे जातो.

कपडे बदलत असताना त्याची पत्नी सायली दरवाज्यात येते. तिथनंच विचारते. “चहा घेणार.”

“हो. थोडाच. आलं घाल त्यात. ऐक ना, साय...,” ली शब्द त्याच्या जीभेवरच अडकतो तोपर्यंत ती निघून गेलेली असते.

फ्रेश होऊन स्वैपाकघरात येऊन एक ग्लास पाणी पितो. सायली चहा करत असते. कुणी आसपास नसतं म्हणून तिच्या जवळ जातो. तिच्या अंगाला येणाऱ्या डिओच्या वासाने त्याला धुंद व्हायला होतं. सायली त्याच्यापासून अंतर ठेवून उभी राहते. तो तिच्या मानेवर ओठ टेकवावेत म्हणून आणखी जवळ जातो तर ती तोंड फिरवून स्टीलचे डबे ठेवलेल्या ठिकाणी जाते. तो वैतागतो. काही बोलत नाही. स्वैपाकघराबाहेर जातो.

हॉलमध्ये आल्यावर रिमोट घेऊन एक मराठी न्यूज चॅनल चालू करतो. तिथे त्याचे आई-वडील व सासू-सासरे बसलेले असतात. तो हॉलमध्ये आला तरी ते काही बोलत नाहीत. तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सोफ्यावर बसून चॅनल बघायला लागतो. सायली चहा घेऊन येते. त्याला देते. तो प्यायला लागतो. चहा संपल्यावर परत चॅनल बघायला लागतो.

“शिव, ते चॅनल बंद कर. थोडं बोलायचंय तुझ्याशी.” त्याचे वडील बोलतात.

चॅनलच्या आवाजातही त्याला त्यांच्या बोलण्यातला गंभीर सूर चटकन कळतो. टीव्ही बंद करून त्यांच्याकडे बघायला लागतो तर त्याचे आई-वडील, सासू-सासरे व सायली त्याच्याचकडे क्रुद्ध भाव चेहऱ्यावर आणून बघत असतात. त्याला कळत नाही आज झालंय काय सर्वांना!

कुणी काही बोलणार इतक्यात सायली त्याच्यासमोर दोन कागद धरते. तो उत्सुकतेने बघतो. ते ब्लड रिपोर्टस असतात. वाचता वाचता त्याला दिसतं दोघांच्याही रिपोर्टसमध्ये ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असं लिहिलेलं असतं. ते वाचून त्याचे डोळे विस्फारतात. त्याला एकदम गरगरल्यासारखं व्हायला होतं. डोळ्यांसमोर अंधारी येतेय असं वाटतं. तो अत्यंत रागीट नजरेने सर्वांकडे बघतो. त्याची नजर जास्त वेळ टिकत नाही कारण सर्वजण त्याच्याकडे त्याच नजरेने बघत असतात.

“हे कसं शक्यय?,” तो थोडासा आवाज वाढवून विचारतो. त्याला ते सहनच होत नाही की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून. सायली पॉझिटिव्ह आहे हे विसरतो.

“तू सांग. हे कसं शक्य आहे?,” शिवचे वडील जरबेने बोलतात.

तो अवाक होतो त्या वाक्याने. काही बोलत नाही.

“कसं झालं ते सांग आधी.” परत एकदा ते विचारतात.

“मला माहित नाही.,” तो विषय टाळायचा म्हणून बोलतो.

“कसं माहित नाही?,” सायली बोलते. तिच्या बोलण्यात जाब असतो.

शिवराज बोलत नाही. त्यांची नजर चोरून बंद टीव्हीकडे बघायला लागतो. उर्वरित पाचजण त्याच्याकडेच नजर रोखून असतात.

“शिव, सांगणारेस की नाही?,” त्याची आई म्हणते.

तो गप्पच.

“तू लग्नापूर्वी पुण्याला गेला होतास त्यामुळेच तर हे झालंय ना!,” आई म्हणते. तो उत्तर देत नाही.

“कशासाठी गेला होता पुण्याला?,” सायली विचारते.

“आम्हाला माहिती नाही. अचानक गेला आणि परत आला. आम्हाला काहीच सांगितलं नाही.” आई सांगतात.

“शिव कशासाठी गेला होतात?,” सायली त्याला विचारते. तिचा टोन बदललेला असतो. त्यात काळजीयुक्त आत्मीयता असते.

तो गप्पच राहतो. हॉलमध्ये तणावाचं वातावरण तयार होतं. सीलिंग फॅनचा स्मूथ आवाज सर्वांना स्पष्ट ऐकू यायला लागतो.

“शिवराज तुम्हाला कुणी काहीही म्हणणार नाही. तुम्ही जे काही असेल ते स्पष्ट सांगा.,” त्याचे सासरे, सायलीचे वडील वातावरणातील शांतता भंग करत बोलतात. त्यांचा आवाज घुमतोय हॉलमध्ये असं वाटतं सर्वांना.

“मी आणि अजून दोघे जण बुधवार पेठेत गेलो होतो.,” शिवराज खाली मान करून फरश्यांकडे बघत बोलतो.

“अरे देवा!,” सायलीची आई चटकन प्रतिक्रिया देतात.

इतर कुणी काही बोलत नाहीत. सायली रडायला लागते. तिला भोवळ येतेय असं वाटून ती दरवाज्याचा आधार घेते. ते बघून शिवराजची आई तिला सावरायला तिच्याजवळ जातात. तिला धरून एका खुर्चीवर बसवतात. तसेच तिची आई, वडील व शिवराजचे वडील तिच्याजवळ येतात.

सायली खुर्चीवर विसावलीय दिसताच शिवराजचे वडील त्याच्याजवळ येतात अन् त्याच्या कानफटात मारतात.

“अहो, सगरे साहेब काय करताय?,” त्याचे सासरे त्यांना धरून मागे ओढतात.

“काय करू मग मी! हेच दिवस पाहण्यासाठी याला पुण्याला शिकायला पाठवलं होतं का? बीकॉम नंतर मागेच लागला एमबीए पुण्यात करायचय म्हणून. एमबीए झाल्यावर तिथेच नोकरी करतो म्हणाला तेव्हा म्हटलं ठीकय करियर असतं तुमचं तेव्हा रहा तिथे. नंतर अचानक लातूरला आला तिथली नोकरी सोडून. काही सांगायला तयार नव्हता काय झालं ते. इथे नोकरी मिळाली म्हणाला. आता नोकरी व इथंच राहायचं म्हणून स्थळ बघायला चालू केलं आम्ही. तुमची सोन्यासारखी मुलगी सांगून आल्यावर गंगेत घोडे न्हाले वाटलं होतं आम्हाला... पण हे काय वाढून ठेवलंय नशिबात!” त्यांच्या आवाजात भारलेपणा आलेला. बोलणं आवरतं घेतात.

त्याची आई जवळ येते. “कधीपासून चालूय हे?,” शांत आवाजात विचारतात. त्याला त्यातील धाक बोचते.

तो फरशीकडे बघतच बोलतो. “पुण्याला शिकायला गेल्यापासून.”

ते ऐकून त्या सुद्धा फाडकन त्याच्या कानफटात मारतात.

“आई, काय चालवलंय तुम्हा दोघांनी. तुम्ही थोडं बाजूला व्हा. शांत व्हा जरा. मी बोलतो शिवराजशी.,” वातावरणातील तणाव थोडं शिथील करावं म्हणून सायलीचे वडील बोलतात.

“शिवराज एक सांगतो ऐकून घ्या. आत्ता कुणाचाच मूड नाही काही बोलायचा. तुम्ही जे काही केलत त्याचे परिणाम तर आपण पाहतच आहोत. तुमच्यासारख्या यंग माणसाने असं वागणं योग्य नाही.”

“कशाला त्याला बोलताय. इतकं कळत असतं तर शेण खाल्लाच नसता.,” शिवराजचे वडील म्हणतात.

तेवढ्यात सायलीचा खाकारल्याचा आवाज येतो. ती खुर्चीवर सावरून बसते.

“मला इतकंच बोलायचंय मी अबॉर्शन करणारे. मला हे मुल नको.”

तिचं बोलणं ऐकून सर्वजण अवाक होतात.

“बेटा, काय बोलतीयेस?,” शिवराजची आई बोलतात. “जे काही झालं त्याची शिक्षा त्या बाळाला कशाला?”

“मी अजून माझं बोलणं संपवलं नाही.” पुढचं बोलण्या अगोदर दीर्घ श्वास घेते. “मी अबॉर्शन तर करणारेच सोबत मला घटस्फोट हवाय. मला हा संसार करायचा नाही. मी डॉक्टरांना विचारलं तर त्या म्हणाल्या हा रोग कंट्रोलमध्ये ठेवता येतो पण पूर्णपणे बरा करता येत नाही. अजून त्यावर पूर्णपणे बरा होण्याचे उपाय उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा रोग असाच अंगावर घेऊन आयुष्य काढावं लागेल.”

तिचं बोलणं संपल्यावर शांततेत वाढ होते. शिवराज गप्पच असतो.

“मी काय म्हणतो असं तडकाफडकी अबॉर्शन, घटस्फोटाची भाषा केल्यापेक्षा थोडं शांतपणे विचार करूया. डॉक्टर म्हणाल्यात कंट्रोल करता येतो म्हणून मग ट्रीटमेंट घेतल्यावर बदल घडेल.,” सायलीचे वडील बोलतात.

“तुम्ही असं कसं बोलताय बाबा. यांनी शेण खाल्लं त्याची शिक्षा मला का उगाच. माझी काय चूक यात! बायको आहे म्हणून मी का सहन करायचं हे.,” सायली प्रत्येक शब्दावर जोर देत बोलते.

“हे बघ जे झालं ते झालं. उगाच त्यावर आक्रस्ताळेपणे बोलण्याने काही होणार नाही. त्यांनी चूक केली हे मान्यय. त्यांनी मान्य सुद्धा केलंय चूक झाली म्हणून. तुला जशी शिक्षा मिळालीय असं वाटतंय तशी त्यांना सुद्धा मिळाली आहेच की. रिपोर्ट वाचला नाहीस का? ते पण पॉझिटिव्ह आहेतच की. त्यांना तुझ्यासारखं आयुष्यभर हा रोग अंगावर घेऊनच जगावं लागणारे. ट्रीटमेंट घ्यावी लागणारे. उगाच तुला एकट्यालाच यात शिक्षा झालीय असं म्हणायला कसलाच पॉईंट नाही.”

“पण त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मी का भोगायची? माझी काय चूक त्यात. यांनी वाट्टेल तसं वागायचं आणि मी त्याची शिक्षा भोगून निस्तरायचं का? माझी काही खूप मोठी स्वप्न नव्हती. नोकरी, करिअरच्या भानगडीत मला पडायचं नव्हतं. बीकॉम झालं खूप झालं. माझ्या मैत्रिणींसारखं लग्न करणे, मुलं सांभाळणे, गृहिणी म्हणून राहणे या पलीकडे मला काहीही करायचं नव्हतं. हे साधं स्वप्न सुद्धा मला जगता येत नसेल तर असल्या संसाराचा काय उपयोग! घटस्फोट घेतले तर निदान मी एकटी काहीतरी करून आयुष्य काढू शकते. रोग अंगावर घेऊन संसार करताना दररोज उठून एकमेकांचं तोंड बघत आयुष्य काढायचं का?”

“समजा, हे झालं नसतं तर तू अबॉर्शन, घटस्फोटाचा विचार केला असतास का?,” तिचे वडील विचारतात.

“आहे ते स्वीकारायचं की उगाच हे झालं असतं, ते झालं असतं असलं बोलत बसायचं.,” ती म्हणते. “या बोलण्याला काही अर्थच नाही. आयुष्यातला सगळा अर्थच निघून गेलाय. माझ्या सर्व इच्छा मरून गेल्यात.,” तिच्या बोलण्यातील निर्वाणीचा सूर कुणालाच आवडत नाही.

“मला माहित्येय मी बोलल्याने फारसा फरक पडणार नाही. जे झालंय ते कधीच भरून येणार नाही तरीही मी सॉरी म्हणतो. मला कळत नव्हतं मी असा का वागत होतो ते. पुण्याला शिकायला गेल्यापासून मला ही सवय लागली. सिंगल. एमबीए करताना आयुष्यात पुढं काय करायचं ठरवलं नव्हतं. शिकायला असल्यामुळे खूप मोकळीक मिळालेली. पप्पा पैसे पाठवायचे त्यामुळे अख्खं पुणे माझंचय वाटायचं. त्यातच मला माझ्यासारखेच मित्र मिळाले. आयुष्याचा भरभरून आनंद घ्यायचा इतकीच आमची फिलॉसॉफी होती. मग लेक्चर्स बंक करून दारू-सिगरेट पीत बसणे. पिच्चर बघायला जाणे. रात्री अपरात्री दारू पिऊन फुल स्पीडमध्ये बाईक चालवणे. एकदा तर ट्रिपल सीट बसून अॅक्सिडेंट केला होता म्हणून जेल होता होता वाचलो होतो. त्यातच एकदा एका मित्राने बुधवार पेठेत जायचं चॅलेंज दिलं. ते आम्ही पूर्ण केलं. त्यानंतर आम्हाला सवयच लागली होती तिकडे जायची. लातूरला परत आल्यावर मला राहवत नव्हतं. तिथेच जॉब करणाऱ्या एका मित्राने परत एकदा जाऊयात म्हणून चॅलेंज दिलं. मी गेलो.” सांगायचं संपलंय असं वाटून गप्प बसतो.

“आता अजून काय हवंय तुला सायली? शिवराजनी माफी मागितली.,” त्याचे सासरे बोलतात.

सायली बोलत नाही.

“सगरे साहेब तुम्ही बोला काहीतरी.” ते शिवराजच्या वडिलांना उद्देशून बोलतात.

“माझं मत सायलीसारखंच आहे. त्याने चूक केली त्याची शिक्षा तिने का भोगायची? आपल्या वागण्याचे काय परिणाम होणारेत याचा थोडाही विचार त्याने केला नाही. तिने का म्हणून याच्या संसाराची जबाबदारी घ्यावी? तू तुला आयुष्यात जे काही करायचय ते कर बेटा. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला.”

“काय बोलताय तुम्ही? असं मुलाला वाऱ्यावर का सोडताय? त्याने चूक केली म्हणून एवढी मोठी शिक्षा का देताय त्याला? आई तुम्ही बोला काहीतरी. तू तरी बोल की. किती वेळ झाली गप्पच आहेस.,” सायलीच्या आईकडे बघत ते म्हणतात.

“काय बोलू? बोलायला काही उरलंच नाही. असलं काही बघायला मिळेल वाटलं नव्हतं. माझं डोकच काम करेना झालय.” त्या बोलतात.

“आई तुम्ही तरी बोला.”

“मला वाटतं सायली जे म्हणतेय ते योग्यय. आम्ही चांगले संस्कार करायला कमी पडलो. मला वाटलं होतं माझा मुलगा अतिशय सात्विक, सोज्वळ, संस्कारी झाला असेल. पण इतका गैरगुमानी निघेल वाटलं नव्हतं. आम्ही अतिशय काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून याचं पालनपोषण केलं होतं. तरीही आमच्या नाकाखाली असले धंदे करत होता म्हटल्यावर सगळ्या संस्कारांची होळी करून टाकली याने. डोळ्यात अंजन घातलं आमच्या. समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मुलींमुळे आई-वडिलांना तोंड दाखवायला जागा उरत नाही असं सिनेमात बघितलेलं इथं आमच्या मुलानंच ही वेळ आणली. अशी वेळ कुणावरही येऊ नये.,” त्या शांतपणे बोलतात.

हॉलमध्ये नीरव शांतता पसरते. सायलीच्या वडिलांना ती जीवघेणी वाटते. ते सर्वांकडे बघतात. सगळे शून्यात बघत असतात.

“मला वाटतं इतका टोकाचा निर्णय घेतल्यापेक्षा सामोपचाराने यातनं मार्ग काढावा. आत्ता सर्वांना यातील चूक दिसतेय पण मला याचे उर्वरित आयुष्यावर होणारे परिणाम दिसतायत. राग थोडा शांत झाल्यावर परत एकदा यावर चर्चा करावी असं वाटतं. सायली, शिवराज तुम्ही शांतपणे यातून मार्ग काढा. हवं तर अबॉर्शन करून घ्या तुम्ही पण संसार मोडू नका. तुम्हा दोघांनाही उर्वरित आयुष्य काढणं जड जाऊ नये यासाठी म्हणतोय मी. चूक ती चूक आहे. ती सुधारता येणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने वागलं तर सर्व काही ठीक होईल असं वाटतं.,” शेवटचा प्रयत्न म्हणून सायलीचे वडील बोलतात.

त्यांचं ऐकून न ऐकल्यासारखं करत खुर्चीतून उठत सायली बोलते, “उद्या सकाळी लवकरात लवकर आपण बर्दापूरला जाऊ.” आणि आत बेडरूमकडे निघून जाते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे बर्दापूर कुठेशीक आहे म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0