भीक आणि भिकारी

मी अनुभवलेले काही मासलेवाईक किस्से:
१.
.....ताक वाढा हो माय!
कल्याणच्या पारनाका भागात सुमारे ३५ वर्षांपूर्वी एक ब्राह्मण व्यक्ती दुपारच्या वेळी वाड्या-वाड्यांमधून फिरून तिला हव्या असलेल्या खाण्याच्या वस्तूचीच फक्त भीक मागत असे. वयाची पन्नाशी ओलांडलेला हा माणूस आमचाच आडनावबंधू म्हणजे गोगटे होता. खरं तर तो त्याच भागातील एका मोठ्या वाड्याचा वडिलोपार्जित मालक होता. परंतु भाऊ आणि भावजयीने वेडा ठरवून घराबाहेर काढल्याने भीक मागून पोटाची खळगी भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती!
पारनाक्यावरीलच एका वाड्यात मी माझ्या मुलाला जोशी नावाच्या काकूंकडे सांभाळायला ठेवत असे. एकदा सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी या काकूंकडे गेलो असता ‘... ताक असेल तर वाढा हो थोडे’, अशी आर्त विनंती करत फाटक्या कपड्यांमधील हा गोगटे त्यांच्या दाराशी आला. काकूंनी बाहेर येऊन त्याला भांडभर ताक प्यायला दिले.
भीक म्हणून फक्त ताक मागणार्‍या या आगळ्या भिकार्‍याचे मला कमालीचे कौतुक वाटले. ताक पिऊन झाल्यावर तो त्याच वाड्यातील एका झाडाभोवती बांधलेल्या कट्ट्यावर जाऊन बसला. मी तेथे जाऊन तो ताकाची भीक का मागतो, याची त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलेले कारण थक्क करणारे होते. माणसावरील खाण्या-पिण्याचे संस्कार त्याच्या विपन्नावस्थेतही कसे सुटत नाहीत, याची प्रचिती त्यावरून आली. पारनाका भागात एक मंगल कार्यालय आहे. त्या दिवशी या कार्यालयात एक लग्न समारंभ होता. कार्यालयाच्या बाहेर अनेक भिकार्‍यांसोबत हा गोगटेही जाऊन बसला होता. लग्नातील जेवणावळी उरकल्यानंतर कार्यालयातील नोकरांनी बाहेर बसलेल्या या भिकार्‍यांना अन्न आणून दिले. ती रीतसर वाढलेली पाने नव्हती. तर जेवणावळीत लोकांनी पानात टाकलेले पक्वान्न व अन्य पदार्थ एकत्र करून भिकार्‍यांना आणून दिले गेले होते. गोगटे मला म्हणाला, ‘त्यांनी दिलेल्या पोटभर जिलब्या खाल्ल्या. पण एवढे गोड खाल्ल्यावर ताक प्यायची लहानपणापासूनची सवय आहे. म्हणून ताक मागायला आलो.’
मी पुन्हा काकूंकडे जाऊन ही अवलिया व्यक्ती कोण़? असे त्यांना विचारले. काकूंनी या व्यक्तीची दयनीय कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. तो हवे तेवढेच, म्हणजे पोळी असेल तर भाजी व भात असेल तर आमटी किंवा वरण, मागून घेतो, असे काकू म्हणाल्या. भीक मागत असतानाही, हवे तेवढेच खाण्याचे व अन्नाची नाशाडी न करण्याचे संस्कार तो जपत होता, यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी अनामिक आदर निर्माण झाला.
---------------------------------------
२.
फक्त १७ रुपये कमी पडताहेत!
कल्याणमधील ‘राजा वाईन्स’ या दुकानासमोरून एके दिवशी पायी जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाने ‘शूक शूक’ करून मला बोलावले. तो साधारण कॉलेजकुमार वाटावा अशा वयाचा तरुण होता. चेहरेपट्टी व कपड्यांवरून तरी तो चांगल्या घरातील वाटत होता. मी त्याला ओळखत नव्हतो. तरी तो कशासाठी बोलावतो आहे, हे पाहण्यासाठी मी थांबलो. तो माझ्याकडे आला व म्हणाला, ‘फक्त १७ रुपये कमी पडत आहेत. जरा तेवढे द्याल तर मेहेरबानी होईल?’
यावरून काहीच उलगडा न झाल्याने मी विचारले, ‘कशाला १७ रुपये कमी पडताहेत?‘
तो निर्विकार चेहर्‍याने उत्तरला, ‘‘ ‘ओसी’ची (Officer`s Choice) क्वार्टर घ्यायची आहे. माझ्याकडील चिल्लरसकट सर्व पैसे मोजले. पण १७ रुपये कमी पडत आहेत’.
मी काहीही न बोलता त्याला २० रुपयांची नोट काढून दिली. दुकानात जाऊन त्याने हवी ती क्वार्टर घेतली व जाताना पुन्हा माझे मनापासून आभाार मानले. त्याने असे दारूसाठी पैसे का बरं मागितले असावेत, याचा विचार करत मी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात दुकानासमोरच उभा राहिलो.
त्यावेळी `राजा वाईन्स`च्या गल्ल्यावर मालक तेलीशेठ स्वत: बसलेले होते. त्या माणसाला मी पैसे दिले हे तेलीशेठ यांनी पाहिले होते. चांगले परिचयाचे असल्याने त्यांनी मला बोलावून घेतले. मी त्याला पैसे दिले याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व ‘पुन्हा कधी देऊ नका’, अशी सूचना केली.
तेलीशेठनी मला सांगितले की, तो तरूण दारूच्या खूप आहारी गेला आहे. व्यसनामुळे असलेली चांगली नोकरी त्याने गमावली आहे. घरच्या लोकांनीही कंटाळून त्याला पैसे द्यायचे बंद केले आहे. ‘तुम्ही त्याला दारू देऊ नका’ अशी विनंती करायला त्याचे वडील व भाऊ दुकानात आले होते. परंतु माझा धंदा आहे. गिर्‍हाईकाने पैसे समोर केल्यावर मी त्याला माल द्यायला नकार देऊ शकत नाही. तो आठवड्यातून दोन-तीन दिवस असाच दुकानासमोर उभा राहून लोकांकडे पैसे मागतो व क्वार्टर घेऊन जातो.
आपण त्या मुलाला दारूसाठी पैसे देणे योग्य की अयोग्य याचा विचार करतच घरी आलो. घडलेला किस्सा घरच्यांना सांगितला तेव्हा सर्वांनीच मला ‘तू चूक केलीस’, असे म्हणत दूषणे दिली. पण प्रामाणिकपणे विचार केल्यावर मला त्या मुलाचा राग आला नाही की कींवही वाटली नाही. उलट दारूसाठी उघडपणे पैसे मागण्याच्या त्याच्या धाडसी निर्लज्जपणाचा मला कौतुकमिश्रित हेवा वाटला!
यानंतर काही दिवसांनी एका रात्री ऑफिसमधील सहकार्‍यांसोबत दादर क्लबमध्ये गेलो. आता हयात नसलेले मराठीतील एक थोर कवी तेथे भेटले. आम्हाला पाहून ते आमच्याच टेबलावर येऊन बसले. मद्यपानासोबत भरपूर गप्पा झाल्या. आम्ही आमच्यासोबत त्या कविवर्यांचेही बिल चुकते केले. क्लबमधून बाहेर पडताना कॅश काऊंटरवरील व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून थक्क झालो. ‘हे कवी महाशय, कोणी तरी ‘पाजणारा भेटेल’ या आशेवर रोज संध्याकाळी क्लबमध्ये येऊन बसतात’, असे काऊंटरवरील त्या व्यक्तीचे सांगणे होते. हे ऐकून कल्याणला भेटलेल्या त्या तरुणाची आठवण झाली. मनात दोघांची तुलना केली आणि एकदा माणसान लाज सोडली की लहान-मोठेपणा किंवा प्रतिष्ठेची कोणतीही भीड-मुर्वत त्याला राहात नाही, हे सार्वत्रिक सत्य अधोरेखित झाले!
----------------------------------
३.
सज्जनगडाची भिक्षावारी!
एक दिवस सुट्टीच्या दिवशी दुपारी घरात बसलेला असताना दाराची बेल वाजली. उठून दार उघडून पाहिले तर बाहेर नऊवारी साडी नेसलेली व डोक्यावरून पदर घेतलेली एक वृद्ध स्त्री उभी होती.
‘काय हवंय आजी?‘, मी विचारले.
‘बाबा, ११ घरी मागून सज्जनगडावर जाईन, असा नवस बोललेय. काही तरी मदत कर’, ती वृद्धा उत्तरली.
मी तिला काही दिले नाही. उलट,‘जवळ पैसे नाहीत तर सज्जनगडावर कशाला जातेस? इथून मनापासून नमस्कार केलास तरी तो समर्थांना नक्की पोहोचेल’, असे सांगत मी तिची हेटाळणी केली. ‘नसतील द्यायचे तर राहू दे’, असे म्हणत तिने मला आशिर्वाद दिला व ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा घोष करत ती निघून गेली.
श्रद्धेचा पगडा माणसाला कसे हात पसरायला मजबूर करतो?, असे मनात येऊन मला त्या वृद्धेची दया आली. हा प्रसंग घडला तेव्हा इन्कम टॅक्स वाचविण्याकरता ‘नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट’ (NSC) घेण्यासाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे, या विवंचनेत मी होतो. आपणही ‘११ घरी मागून ‘एनएससी’ घेण्याचा नवस बोलावा का?’, असा मिश्किल विचारही माझ्या मनात आला. परंतु तो प्रत्यक्षात उतरविण्याचे निलाजरे धाडस मी करू शकलो नाही.
नंतर कधी तरी इस्लाम धर्माबद्दल वाचले. प्रत्येकाने आयुष्यात हज यात्रा करावी. पण ती स्वत:च्या पैशाने करावी. दुसर्‍याच्या पैशाने केलेल्या हजचे पुण्य मिळत नाही, असे इस्लाम सांगतो. ते वाचून सज्जनगडावर जाऊ इच्छिणार्‍या त्या वृद्धेची आठवण झाली. हजला जाण्याची ऐपत नाही म्हणून किती इस्लामी बांधवांची आयुष्याच्या कातरवेळी आध्यात्मिक कुचंबणा होत असेल? हिंदू धर्मात असे दुसºयाच्या पैशाने देवदर्शन व तीर्थाटन करण्यास मज्जाव नाही, ही केवढी मोठी सोय आहे याची जाणीव झाली. त्याच बरोबर त्या वृद्धेस काहीही मदत न करता वर हेटाळणी करून विन्मुख परत पाठविल्याची बोचही मनाला लागली.
-----------------------------------------------
४.
जेवायला बोलावून पश्चात्ताप
काही लोक, बोट दिले की अख्खा हात कसा खेचायला बघतात, त्याचा हा किस्सा.
एक दिवस काही तरी सामान आणण्यासाठी सकाळच्या वेळी बाजारपेठेतून चाललो होतो. एका माणसाने समोर हात पसरून मला हटकले. ‘दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. १० रुपये दिलेत तर मेहेरबानी होईल. एखादा वडापाव तरी खाईन’, असे तो माणूस काकूळतीने सांगत होता.
पैसे देऊन किंवा न देताही मला त्याला फुटविता आले असते. पण तसे न करता ‘पैसे मिळणार नाहीत. जेवायला हवे असेल तर घरी या’ असे त्याला सांगण्याचा आगाऊपणा मी केला!
तो म्हणाला, ‘ठीक आहे. जेवायला देत असाल तर घरी येतो’.
हे घडले तेव्हा सकाळचे १०-१०-१५ वाजले होते. मी दुपारी जेऊन सुमारे १.३०च्या सुमारास कामावर जाण्यासाठी घरातून निघत असे. त्याला एका कागदावर घरचा पत्ता लिहून दिला व १२-१२.३० वाजता जेवायला घरी या, असे सांगितले.
घरी येऊन पत्नीला सांगितले. ती म्हणाली, ‘जेवायला घालायला माझी हरकत नाही. पण जो येणार आहे त्याला मी ओळखत नाही व तो कोण आहे हे तुम्हालाही माहित नाही. तेव्हा तो येऊन त्याचे जेवण होईपर्यंत तुम्ही घरात थांबणार असलात तरच मी त्याला जेवायला देईन’. पत्नीच्या या प्रस्तावास मी होकार दिला. तो दुपारी एकच्या सुमारास आला. आम्ही दोघे एकत्रच जेवलो व एकत्रच घराबाहेर पडलो. आम्ही दोघे जेवत असताना पत्नी तिकडे फिरकलीही नाही. त्याआधी ऑफिसला जायचे कपडे घालण्यासाठी आत गेलो तेव्हा पत्नी व मुलीने ‘कोणालाही जेवायला बोलावून अगदी आग्रहाने जेवायला घातल्याबद्दल’ माझी यथेच्छ टिंगल केली.
त्या वेळी माझी पत्नी आमच्या घराच्या समोरच असलेल्या गणपती मंदिरात व्यवस्थापक म्हणून काम करत असे. दुसर्‍या दिवशी दुपारी जेवून नेहमीच्या वेळेला ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो. चौकात जाऊन रिक्षेत बसत असतानाच मोबाईलवर पत्नीचा फोन आला. ‘तो कालचा माणूस आज पुन्हा जेवायला आला आहे. तातबडतोब घरी परत या’, असे तिने संतापाने फर्मावले. घरी आलो तर ते महाशय दाराबाहेर उभे होते. पत्नीने मला घरात बोलावून घेतले. ती मला म्हणाली, ‘हा आलेला माणूस चोर आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिरात देवासमोर भाविकांनी टाकलेले पैसे चोरताना त्याला रंगेहाथ पकडून हाकलून दिले होते. तो पुन्हा घरी आलेला मला बिलकूल खपणार नाही.’
मी बाहेर आलो व त्याला विचारले, ‘आज पुन्हा कशाला आलात?’ त्यावर तो उत्तरला, ‘जेवायला हवे असेल तर घरी या, असे तुम्हीच म्हणाला होतात. आजही जेवायला हवे आहे. म्हणून आलो.’ हे ऐकून माझा पारा चढला: ‘जेवायला घरी या, हे फक्त कालच्यापुरते होते. तुम्हाला रोज जेवायला घालायला इथे अन्नछत्र उघडलेले नाही !’ मंदिरातील चोरीचाही मी उल्लेख केला. त्याने तसे घडल्याची कबुली दिली. ‘पुन्हा इकडे फिरकलात तर तंगडी तोडून हातात देईन’, असा दम देऊन त्याला हाकलून लावले. खरं तर, एरवी अगदी जेवणाच्या वेळी घरी आलेल्या परिचितासही ‘आता जेऊनच जा’, असे चुकूनही न म्हणणारा मी. पण त्या दिवशी त्या माणसाला घरी जेवायला बोलावण्याची दुर्बुद्धी कशी सुचली याचे कोडे मला अद्याप उलगडलेले नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विशेषत: 'सतरा रुपये कमी' आणि 'जेवायला घरी या'वाले किस्से.

('सतरा रुपये कमी'वरून आठवले. आमचा एक सदैव कडकी असलेला एक हॉस्टेलमित्र. 'मला २ रु. ९५ पै. देऊ शकशील काय?' (ही १९८०च्या दशकातील गोष्ट आहे.) हो म्हटले. पण का बरे? तर म्हणे 'सिगारेटचे पाकीट घ्यायचे आहे. ३ रुपयांना पडते. खिशात ५ पैसे आहेत; फक्त २ रु. ९५ पै. कमी पडताहेत.' आता बोला!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमच्या हॉस्टेलमित्राचा अनुभवही मस्त आहे. असे बरेच लोक भेटतात. कोकणात आमच्या आजोळी एक माणूस ST स्टँडजवळच्या हॉटेलात दिवसभर बसलेला असे. त्याच्याकडे फक्त चुन्याची डबी असायची व तंबाकू मात्र तो येणार्‍या-जाणार्‍यांकडून मागून घेवून खायचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा शेवटचा किस्सा आणि त्याचा शेवट वाचून मला हल्लीच वाचलेला नवा शब्द आठवला. FOBI - Fear of Being Included.

ह्या शब्दाच्या हिशोबात FOMO - Fear of Missing Out बऱ्यापैकी रुळला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता मी अमेरिकेत राहते. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी बाहेर चालायला जायला सुरुवात केली आहे. शनिवारी एक (गोरी) मैत्रीणही असते.

एकदा अशाच चालताना समोरून एक जोडपं येताना दिसलं. ते लोक साधारण पन्नाशीचे असतील. तिनं त्यांना व्यवस्थित 'गुड मॉर्निंग' केलं; आम्ही भारतीयांनी एकमेकांची जेमतेम दखल घेतली. मग मी तिला म्हणाले, "हे लोक मराठी किंवा कन्नडिगा असतील अशी मला शंका येते. एरवी सगळेच भारतीय, पण या लोकांचे चेहरे बघून संशय येतो."

ती म्हणाली, "अगं, मग बोल की त्यांच्याशी."

मी, "परवाच मी चालताना फोनवर मैत्रिणीशी बोलत होते, एरवी काही तरी ऐकते एकीकडे. सुदैवानं यांच्या बाजूनं जाताना ती बोलत होती, आणि मी फक्त 'right, right' म्हणत होते. समज, मी त्यांच्याशी एकदा बोलले. मग बोलायला सुरुवात केल्यामुळे पुन्हा भेटले की बोलावं लागणार. मग समजलं की आपलं काही जमणार नाही; तुला तर माहित्ये मी किती वायझेड आहे ते! पण चालायला जाणं कसं टाळणार? मग अशी भेट होणार. मग उगाच बळजबरी बोलावं लागणार. त्यापेक्षा सुरुवातच केली नाही की झालं!"

मग तिलाही FOBI शब्द सांगितला. मग तिनं तिचे काही अनुभव सांगितले, की तिला थोडी FOBI असती तर बरं झालं असतं, वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचा किस्सा FOBIचा आहे, हे मान्य करता येईल. मात्र, लेखकाचा शेवटचा किस्सा FOBIचा कसा, ते समजले नाही.

असो चालायचेच.

——————————

समज, मी त्यांच्याशी एकदा बोलले. मग बोलायला सुरुवात केल्यामुळे पुन्हा भेटले की बोलावं लागणार.

त्यात पुन्हा आणखी एक भीती, की ते अॅम्वेवाले वगैरे निघाले, तर काय घ्या. मग आयुष्यात पिच्छा सोडणार नाहीत. कोणी सांगितलीय ती पीडा? नकोच ते!

तरी बरे, हल्ली ते अॅम्वेचे प्रस्थ फारसे दिसत नाही. १९९०च्या दशकात जळीस्थळीकाष्ठीपाषाणी असायचे. आता दारोदार हिंडून ख्रिस्तप्रचार करणारे असतात. (कोव्हिड सुरू झाल्यापासून – आणि इकॉनॉमीची एकंदरीत वाट लागायला लागल्यापासून – हेही अलिकडे दिसत नाहीत फारसे. कोव्हिडचा मानवजातीला केवढा मोठा आधार आहे!) मात्र, दारोदारचे ख्रिस्तप्रचारक सहसा देशी नसतात. अॅम्वेचे प्रस्थ जेव्हा होते, तेव्हा त्यात बहुतकरून देशींचाच भरणा असे. इतका, की, रस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी जर कोणताही अनोळखी देशी मनुष्य विनाकारण तुम्हाला गाठून तुमच्याशी संभाषण साधण्याचा प्रयत्न करू लागला, तर ‘तोचि अॅम्वे ओळखावा’, नि हाताला लागेल तो पहिला धोंडा त्याच्या टाळक्यात घालून, रस्ता क्रॉस करून, शीळ वाजवीत चालू लागावे. (गेले ते दिवस! राहिल्या, त्या फक्त आठवणी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं तर, एरवी अगदी जेवणाच्या वेळी घरी आलेल्या परिचितासही ‘आता जेऊनच जा’, असे चुकूनही न म्हणणारा मी.

ही लेखकाची फोबी असेलच असं नाही; पण मला फोबी असल्यामुळे मला हे फोबीचं उदाहरण वाटतं.

कदाचित हे फक्त शहरी आयुष्यात वेळ नसणं, घरातल्या स्त्रियांच्या कष्टाची जाणीव असणं अश्या अनेक कारणांतूनही आलं असू शकतं. शहरी आयुष्यातली धावपळ ज्यांना आकळत नाही त्यांनाही ही फोबीच वाटू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक आठवणी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉर्पोरेट भिकारी असतात त्यांचे द्यायला हवं होते.करोड ची भिक घेणारे कॉर्पोरेट भिकारी काय काय करतात ते माहीत पडले असते.
कर्ज जे परत करायचे नसते त्याला भीक च म्हणतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या सर्व गोष्टी ची तुलना
भीक
विनंती केली जाते समोर चे इच्छेने देतात.
अपहार.
विनंती केली जात नाही सरळ पैसे घेतले जातात.

लाच.
विनंती वैगेरे नाही खंडणी वसूल केली जाते.
ह्याचा विचार केला तर भीक मागणे हे खूप सज्जन पणाचे लक्षण आहे
चोरी.
ह्या साठी मेहनत आहे स्व कष्ट नी पैसे चोरले जातात.
भिकारी,आणि चोर .
ह्या पेक्षा .
अपहार करणारे,लाच घेणारे सर्वात मोठे क्रिमिनल आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0