विनातिकिट रेल्वे प्रवास: काही अनुभव

काल गुरुवारी टाकलेल्या पोस्टमध्ये मी माझा विनातिकिट लोकलचा प्रवास व त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काही जण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला व त्यांच्या कर्मचाºयांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी व किती ठेवता येईल?
रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी खाली काही अनुभव देत आहे. यातील काही अनुभव प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलेल्या घटना आहेत. तर काही इतरांच्या बाबतीत, पण माझ्या समक्ष घडलेल्या घटना आहेत.
१.
बच्चोंका Fine नही लेते!
Jurassic Park हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हाची गोष्ट. त्या चित्रपटाच्या जाहिराती वृत्तपत्रात यायच्या व त्यांत डायनोसॉरचे चित्र ठळकपणे असायचे. माझा मुलगा तेव्हा लहान होता. त्याला सफाईदारपणे वाचता येत नव्हते, पण चित्र पाहून त्याला समजायचे. त्याने ती जाहिरात पाहिली व ते काय आहे?, असे विचारले. मी त्याला चित्रपटाविषयी माहिती दिली. तो चित्रपट पाहण्यासाठी मागे लागला. परंतु चित्रपट बॉलिवूडचा असल्याने त्याला त्यातील इंग्रजी संवाद कळणार नाहीत, असा विचार करून मी त्याची समजूत काढली.
काही दिवसांनी हिंदीमध्ये ‘डब’ केलेला तो चित्रपट प्रदर्शित झाला. असा हिंदीमधील चित्रपट कल्याणजवळील विठ्ठलवाडी येथील श्री राम टॉकिजमध्ये लागला होता. रविवारी सुट्टी होती, तेव्हा तो हिंदी चित्रपट दाखवायला मुलाला न्यायचे मी ठरविले.
रेल्वेने अंबरनाथ, कर्जत लाईनवर गेल्यास विठ्ठलवाडी हे कल्याणनंतरचे लगेचचे स्टेशन. स्टेशनवर गेलो तर तिकिटाला प्रचंड मोठी रांग होती. रांगेत उभे राहून तिकीट काढले तर लोकल जाईल व चित्रपटही चुकेल, हे लक्षात आले. ‘एकच स्टेशन जायचे आहे. जाऊ या विनातिकिट. ‘टीसी’ आला तर भरू दंड’, असा विचार करून मुलाला घेऊन धावत लोकल पकडली. दोनच मिनिटांचा प्रवास असल्याने गर्दीतून डब्यात आत न जाता पॅसेजमध्येच उभा राहिलो. लोकल सुरु झाली आणि माझ्या बाजूलाच उभ्या असलेल्या ‘टीसी’ने तिकिट विचारले. मी तिकिट नसल्याचे सांगून १०० रुपयांची नोट त्याच्या हाती दिली.
तेवढ्यात विठ्ठलवाडी स्टेशन आले. ‘टीसी’ आम्हाला सोबत घेऊन खाली उतरला. त्याने दंडाची पावती बनवून माझ्या हाती दिली. ती ५२ रुपयांची होती. (५० रुपये दंड व दोन रुपये प्रवासाचे भाडे)
यावेळी मी व ‘टीसी’ यांच्यात काहीसा असा संवाद झाला:
मी: गाडी व्हीटीसे आयी थी. फिरभी आपने सिर्फ कल्यान से विठ्ठलवाडीतकही किराया क्यू लिया?
टीसी: गाडी व्हीटीसे आयी थी, पर आप तो कल्यानमे गाडीमे चढे!
मी: आप या पॅसेंजर कुछ भी कहें. लेकिन रूलके मुताबिक आपको गाडी जहासे आयी वहासे किराया लेना चाहिये. आप उतना किराया लीजिये.
टीसी: आप जंटलमन है इसलिये यह कह रहे हे. लेकिन आप मेरे साथही कल्यानसे गाडीमे चढे यह मै खुद देखा है. इसलिये मै आपसे व्हीटीसे किराया नही वसूल कर सकता.
मी: आपने सिर्फ मेरा फाईन लिया है. लेकिन मेरा लडका भी मेरे साथ है. उसका भी पूरा फाईन व आधा किराया आप लीजिये.
टीसी: बच्चा छोटा और नासमझ है. आपने बिनाटिकट लाया इसलिये वह आया. अपने मर्जीसे वो बिनाटिकट नही आया.
मी: आप कह रहे है वह बिलकूल सही है. इसिलिये बच्चेका भी फाईन और किराया ले लो, ऐसा मेरा कहना है.
टीसी: आपने कहा ठीक है. लेकिन मै बच्चे का फाईन नही ले सकता.
शेवटी त्या ‘टीसी’ने आधीची पावती रद्द करून नवी बनवायला लागेल, अशी सबब सांगून होती तीच पावती व राहिलेली रक्कम मला दिली. माझ्या एकूण बोलण्यावरून कुतूहल वाटल्याने त्याने मला ‘आप क्या करते हो?’, असे विचारले. ‘मै इंडियन एक्स्प्रेस ग्रुपके मराठी अखबारका रिपोर्टर हूँ’, असे मी उत्तर दिले. तो ‘टीसी’ सिंधी होता व उल्हासनगरला राहणारा होता. माझे उत्तर ऐकून तो म्हणाला, ‘मेरे साले भागू तरनेजा इंडियन एक्स्प्रेसके उल्हासनगरके रिपोर्टर है. आप पहले बताते तो मै बनाया वो रिसीट भी नही बनाता’.
यावरून त्या ‘टीसी’ने मी पैसे द्यायला तयार असूनही नियमानुसार दंडवसूली न करून रेल्वेचा महसूल बुडविला हे स्पष्ट दिसते. शिवाय ‘मी प्रेस रिपोर्टर आहे’, असे सांगितले असते तर विानातिकिट असूनही माझ्याकडून अजिबात दंड न घेण्याचीही त्याची तयारी होती.
----------------------
२.
नियम बाजूला ठेवून मनमानी
विनातिकिट प्रवास करण्याच्या १२ वर्षांच्या कालखंडातच एके वर्षी देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी मी ऑफिसला जाताना तशाच पद्धतीने कल्याण ते व्हीटी हा प्रवास केला. लोकल रिकामी होती व दादरच्या पुढे तर डब्यामध्ये मी एकटाच प्रवासी होतो. गाडी मसजिद बंदर स्टेशनमधून सुटत असताना ‘टीसी’ डब्यात चढला. त्याने मला तिकिट विचारले. मी पाकिटात बाजूला काढून ठेवलेली १०० रुपयांची नोट त्याला दिली. तोपर्यंत व्हीटी स्टेशन आले. आम्ही दोघे गाडीतून खाली उतरलो.
आधीच्या प्रसंगाप्रमाणे याही वेळी ‘टीसी’ने मला ५४ रुपयांची पावती बनवून हातात दिली. त्याने ५० रुपये दंड व दादरपासूनचे तिकिटाचे पैसे अशा रकमेची पावती बनविली होती. गाडी कर्जतहून आली होती. त्यानुसार कर्जतपासूनचे भाड्याचे पैसे घ्यावे, असा मी आग्रह धरला. परंतु ‘टीसी’ने तसे केले नाही. या ‘टीसी’च्या शर्टावर ‘नेम बॅज’ लावलेला नव्हता. त्यामुळे मी त्याचे नाव विचारून घेतले. ऑफिसात जाऊन मध्य रेल्वेच्या मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या (Chief Divisional Commercial Manager) नावे, तुमच्या ‘टीसी’ने रेल्वेचा महसूल कसा बुडविला याचा तपशील देऊन त्याच्यावर कारवाई करण्यची मागणी करणारा अर्ज तयार केला. दुसर्‍या दिवशी तो अर्ज रेल्वेच्या संबंधित ऑफिसात देऊन रीतसर पोंच घेतली. त्यानंतर सहा महिने मी पाठपुरावा केला. परंतु त्या ‘टीसी’वर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
------------------------------------
३.
प्रवाशाने सांगूनही न ऐकणे
एकदा बोरिबंदर स्टेशनमधून बाहेर पडत असताना ‘टीसी’ने मला तिकिट विचारले. अर्थात माझ्याकडे तिकिट किंवा पास नसल्याने मी दंडाची रक्कम त्याला दिली. या ‘टीसी’ने मात्र ६८ रुपयांची पावती बनविली. यात ५० रुपये दंड व गाडी अंबरनाथहून आली होती म्हणून तिथपासूनचे दुसर्‍या वर्गाचे भाडे १८ रुपये होते. मी पहिल्या वर्गाने आलो त्यामुळे दंडाखेरीज माझ्याकडून पहिल्या वर्गाचे भाडे घ्या, असे मी सांगूनही ‘टीसी’ने तसे केले नाही.
--------------------------
आता यानंतरचे दोन किस्से माझ्याशी संबंधित नसले तरी, माझ्या समक्ष घडलेल्या घटनांचे आहेत.
४.
साहेब शांतूच्या लग्नाला यायचं हं!
एक दिवस नाशिकला जाण्यासाठी कल्याण स्टेशनच्या तेव्हाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर पहाटेच्या पहिल्या कसारा लोकलची वाट पाहात उभा होतो. आमची लोकल येण्यापूर्वी बाजूच्या प्लॅटफॉर्म क्र. २ वर कर्जतहून आलेली व्हीटीकडे जाणारी पहिली लोकल आली. एवढया पहाटेही फलाटावर जिन्यापाशी एक ‘टीसी’ उभा होता. आलेल्या लोकलच्या एका डब्यातून वारली/ कातकरी आदिवासींचा एक १५-२० जणांचा समूह खाली उतरला. त्यांच्यात सर्वात पुढे डोक्याला बाशिंग बांधलेला नवरदेव, त्याच्या सोबत दोन करवल्या व इतर वर्‍हाडी मंडळी आणि सर्वात शेवटी पांढरी टोपी घातलेला एक वृद्ध आणि त्याच्यासोबत हातात मेणकापडाची पिशवी घेतलेला एक १२-१४ वर्षांचा मुलगा होता. ही मंडळी जिन्यापाशी आल्यावर ‘टीसी’ने त्यांना तिकिट विचारले. पुढच्या मंडळींनी हाताने मागे खूण केली व ते जिना चढून वर गेले. कदाचित सर्वात मागून येणार्‍या वृद्धाकडे सर्वांची तिकिटे असतील असा विचार करून ‘टीसी’ने पुढच्या मंडळींना जाऊ दिले. तो वृद्ध जवळ आल्यावर..
टीसी: आजोबा, सर्वांची तिकिटे आहेत ना तुमच्याजवळ, ती दाखवा.
आजोबा: बाल्या साहेबांना तिकटं दाखव की रं!
आजोबांच्या सोबत असलेल्या बाल्याने हातातील पिशवीतून हार काढून साहेबांच्या गळ्यात घातला व हातात नारळ दिला !
आजोबा: साहेब, आमच्या शांतूचं लगिन हाय सांजच्याला. नक्की यायचं हं!
'टीसी’ अवाक होऊन पाहात राहिला व त्याने त्या आजोबांना व त्यांच्या सोबतच्या बाल्यालाही जाऊ दिले.
----------------------------------
५.
नोकरी धोक्यात येण्याची भीती
एक दिवस शेवटच्या कर्जत लोकलने रात्री २.२० ला कल्याणला पोहोचलो. आमची लोकल प्लॅटफॉर्म क्र. ४ वर आली होती. बाजूच्या फलाटावर बर्‍याच उशिराने आलेली सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस येऊन नुकतीच थांबली होती. लोकलमधून उतरलेले तुरळक प्रवासी व सिद्धेश्वरमधून आलेले प्रवासी जिना चढून वर जाऊ लागले. जिन्यात माझ्यापुढे सिद्धेश्वरमधूून उतरलेले एक मध्यमवयीन जोडपे होते. त्यातील पुरुष सहा फूट उंचीचा, धिप्पाड आणि एखादा राजकीय नेता वाटावा असा पांढरा झब्बा, लेंगा व टोपी घातलेला होता. त्याच्या दोन हातांच्या आठ बोटांमध्ये खड्यांच्या अंगठ्या होत्या, त्याची पत्नीही उंचीपुरी, नऊवारी साडी नेसलेली व सोन्याने नखशिखांत मढलेली होती. एवढ्या अपरात्रीही जिन्याच्या वर एक ‘टीसी’ उभा होता. जिना चढून वर जाताच माझ्या पुढे असलेल्या या जोडप्याला ‘टीसी’ने तिकिट विचारले. आता काय होतंय हे पाहण्यासाठी मी दिसेल व ऐकूनही येईल एवढया अंतरावर बाजूला उभा राहिलो.
‘टीसी’ व या जोडप्यामध्ये झालेला संवाद मोठा मजेशीर होता:
‘टीसी’: कुठून आलात?
जोडप्यातील पुरुष: सोलापूरहून.
टीसी: तिकिट/ रिझर्व्हेशन जे काही असेल ते दाखवा.
पुरुष: तिकिट, रिझर्व्हेशन काय बी नाय.
टीसी: बाई, तुमचं तिकिट असले तर दाखवा.
बाई: माझ्याकडे बी नाय.
‘टीसी’ने सोलापूरपासूनचे दोघांचे भाडे व दंड यांचा हिशेब करून तेवढी रक्कम त्या पुरुषाकडे मागितली.
पुरुष: माझ्याकडे एक दमडीबी नाय.
टीसी: बाई, तुमच्याकडे पैसे असतील तर बघा.
बाई: माझ्याकडे काय नाय. पैशाचे सर्व यवहार धनी बघत्यात!
यानंतर ‘टीसी’ आणि या जोडप्यामध्ये आणखी काही संभाषण झाले. शेवटी ‘टीसी’ने त्या दोघांना कोणताही दंड न घेता जाऊ दिले.
जे जोडपे निघून गेल्यावर मी ‘टीसी’कडे गेलो व त्याने दंड न वसूल करण्याचे कारण विचारले. त्याने दिलेले उत्तर थक्क करणारे होते.
‘टीसी’ म्हणाला, दंड भरायला पैसे नाहीत म्हटल्यावर त्या दोघांना उद्या सकाळी कोर्टात उभे करेपर्यंत कोठडीत ठेवणे भाग होते. कल्याणच्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत फार तर १० लोक मावू शकतात. दिवसभरात पकडलेले २० हून अधिक लोक आधीच कोठडीत आहेत. त्यात आणखी या दोघांना कुठे ठेवणार? शिवाय बायकांसाठी वेगळी कोठडी नाही. अशा उफाड्याच्या आणि सोन्याने मढलेल्या बाईला तेथे नेऊन ठेवली व उद्या तिनेच कोर्टात माझ्याविरुद्ध अतिप्रसंग केल्याची बोंब मारली तर माझी २६ वर्षांची नोकरी धोक्यात येईल. रेल्वेला मिळणारे पैसे गेले गाढवाच्या xxx. नोकरी गेली तर मी भिकेला लागेन!
यानंतर एकदा मध्य रेल्वेचे त्यावेळचे मुख्य महाव्यवस्थापक राज कुमार जैन यांच्या पत्रकार परिषदेला गेलो. हे सर्व प्रसंग व घटना मनात होत्याच. जेवणाच्या वेळी गप्पा मारताना हे सर्व जैन यांना सविस्तर सांगितले. ऐकून तेही अचंबित झाले आणि याबाबतीत काहीही करण्यात त्यांनी सपशेल हतबलता व्यक्त केली!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्टेशनमधून बाहेर पडताना टीसीने विनातिकीट पकडल्यास कुठल्या प्रवासाचा दंड आकरतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किस्सा क्रमांक ४ भन्नाट आहे!

एक विचारतो - तुम्ही कायमच विनातिकिट प्रवास करीत आले होतात काय? आणि पकडले तर दंड भरायचा हे टीकच पण न पकडले गेलात तर प्रवास फुकटच की!

उल्हासनगरात काही इंशुरन्ससदृष कारनामे चालत. त्यांच्याकडे काही रक्कम भरून (प्रिमियम) नोंदणी करायची आणि बिन्धास्त विनातिकिट प्रवास करायचा. पकडलेच तर रीतसर दंड भरून पावती घ्यायची. आणि नंतर त्यांना दाखवून पैसे परत घ्यायचे. सध्या त्या आहेत की नाहीत याची कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दंड वसूल करणे हा उपाय नाही हे रेल्वे प्रशासन ल समजले पाहिजे होते.

पण रेल्वे चे नुकसान झाले तरी रेल्वे प्रशासन,अधिकारी,कर्मचारी ह्यांना पगार मिळतोच.देशाचे नुकसान होते
तीन महिने सक्त मजुरी कोणतीच कारणे बिलकुल स्वीकारू नयेत.बिना तिकीट वाल्यांना हीच शिक्षा योग्य आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन महिने सक्त मजुरी कोणतीच कारणे बिलकुल स्वीकारू नयेत.बिना तिकीट वाल्यांना हीच शिक्षा योग्य आहे

तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा अंमळ कमी आहे. त्यापेक्षा, फाशी (किंवा, नपक्षी, जन्मठेप) ही शिक्षा कशी वाटते?

शिवाय, आरोपी शिक्षक वगैरे असल्यास, पकडला न जाता तर भारताची भावी पिढी बनविता, ही गंभीर बाब विचारात घेता, देहान्त प्रायश्चित्तावाचून गत्यंतर तर नाहीच (जन्मठेपेचा पर्याय उपयुक्त नाही), परंतु, तीसुद्धा शिक्षा पुरेशी होणार नाही. त्यासोबत (मुख्य शिक्षेच्या अंमलबजावणीअगोदर) पुढील पुरवणी शिक्षांपैकी एक किंवा अनेकींचा विचार करता येईल:

१. पायाचे अंगठे धरून अर्धा तास (स्टेशनमास्तराच्या खोलीतील) टेबलावर उभे करणे, आणि/किंवा
२. हाताच्या बोटांच्या पेरांवर फूटपट्टीने, छडीने, अथवा लोखंडी रुळाने (रेल्वेचा निकामी झालेला एखादा रूळ या कामी उपयुक्त ठरू शकेल!) पंचवीस जोरदार फटके लगावणे, आणि/किंवा
३. फळ्यावर खडूने ‘मी यानंतर उभ्या आयुष्यात पुन्हा कधीही विनातिकीट प्रवास करणार नाही!’ असे पन्नास वेळा लिहायला लावणे. (यानंतर लगेचच फाशी द्यायची असल्याकारणाने, फळ्यावर लिहिण्याच्या विधानाची सत्यता निर्विवाद आहे, परंतु तरीही.) याकरिता फळ्याची योजना ही स्टेशनच्या नावाच्या पाटीशेजारीच, सर्वांना (येणाऱ्याजाणाऱ्यांना) सहज दिसेल, अशा बेताने करता येईल. शिवाय, लिहिताना शुद्धलेखनाची चूक वगैरे झाल्यास दस्तुरखुद्द स्टेशनमास्तराच्या हस्ते आरोपीच्या श्रीमुखात भडकाविण्याच्या उपउपशिक्षेचादेखील विचार करता येईल. (अवांतर: एका (स्टेशन)मास्तराने दुसऱ्या मास्तराच्या श्रीमुखात भडकाविण्याइतके नयनमनोहर दृश्य त्रिभुवनात दुसरे नसेल. ‘ग़र फ़िर्दौस बर-रू-ए-ज़मीं अस्त…’ असो चालायचेच.)

(आरोपी पत्रकार असल्यास, पुरवणी शिक्षा म्हणून त्याच्या (मुख्य) शिक्षेच्या अंमलबजावणीची बातमी (सिंगापूर स्टाइल, किंवा विक्रमादित्य स्टाइल) त्याच्याच पेपरात (फोटोसहित) छापून आणावी काय?)

—————

तळटीपा:

सिंगापुरात म्हणे (ऐकीव माहिती! चूभूद्याघ्या.) रस्त्यात कचरा फेकणे वगैरे किरकोळ गुन्ह्यांकरिता१अ तो रस्ता झाडायला लावणे अशी कायशीशी शिक्षा आहे. शिवाय रस्ता झाडतानाचे फोटो संध्याकाळच्या पेपरांत प्रसिद्ध करतात, म्हणे! खरेखोटे सिंगापुरीच जाणोत.

१अ त्याहून किंचित गंभीर गुन्ह्यांकरिता (जसे, लोकांच्या मोटारींवर स्प्रेपेंट फवारणे, वगैरे१अ१.) वेताच्या काठीने ढुंगणावर (पंचवीस? नक्की आकडा आठवत नाही; चूभूद्याघ्या.) जोरदार फटक्यांची सजा आहे, असे ऐकून आहे. शिवाय, जवळ अगदी एवढेसेसुद्धा ड्रग्ज़ चुकूनसुद्धा सापडल्यास, फारशी चौकशी न होता थेट देहान्त प्रायश्चित्त आहे, म्हणतात.

१अ१ १९९४ सालाच्या सुमारास अशी एक केस घडल्याचे आमच्या येथील पेपरांतून छापून आल्याचे अंधुकसे आठवते. झाले काय, की एक व्रात्य अमेरिकन कार्टा सिंगापुरात राहणाऱ्या आपल्या (घटस्फोटित/पुनर्विवाहित? सावत्र? नक्की तपशील आठवत नाहीत.) आईकडे राहावयास गेला. तेथे राहात असताना, कंटाळा आला म्हणून म्हणा, किंवा वेळ जात नाही म्हणून म्हणा, लोकांच्या, रस्त्यात पार्क केलेल्या रँडम गाड्यांवर स्प्रेपेंट फवारण्याचे उद्योग सुरू केले. पकडला गेला. नियमांप्रमाणे ढुंगणावर फटक्यांची शिक्षा झाली. मग अमेरिकन सरकारने यात हस्तक्षेप करून सिंगापुराच्या ‘फ्रेंडली’ सरकारवर ती शिक्षा रहित करण्यासाठी दबाव आणावा, वगैरे नेहमीची बोंबाबोंब इथल्या पेपरांतून नि माध्यमांतून सुरू झाली. पुढे अमेरिकन सरकारने हस्तक्षेप केला की नाही, त्या शिक्षेचे पुढे काय झाले, वगैरे तपशील आठवत नाहीत.१अ१अ असो.

१अ१अ तपशील नंतर गुगलून काढले. येथे पाहावेत.

‘या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माहीत असूनसुद्धा ती जर तू दिली नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायांशी लोळू लागतील.’ – प्रेतातला वेताळ (विक्रमादित्यास उद्देशून).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या असहमतीशी मी सहमत आहे! माझ्या कृत्याचा किंवा लिखाणाचा तुम्हाला कितीही राग आला तरी तो माझ्यावर काढून काय उपयोग? तुम्ही सुचवलेल्या शिक्षांचा कायदा करण्यास राज्यकर्त्यांना भाग पाडणे हाच यावरील उपाय आहे. तरीही तुम्हाला मन मोकळं करण्याची संधी मिळाली, हेही नसे थोडके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात, १. तो आख्खा प्रतिसाद उपरोधात्मक होता, आणि २. ज्या प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून दिलेला होता, त्या प्रतिसादाची रेवडी उडविणे या हेत्वर्थ दिलेला होता, हे स्वयंस्पष्ट असेल, असे वाटले होते. ते व्यक्त करण्यात मी कोठेतरी कमी पडलो, याबद्दल खेद वाटतो.

थोडक्यात सांगायचे, तर तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून किंवा तुमच्याबद्दल (किंवा तुमच्या लेखाबद्दलही) नव्हताच; त्याचे लक्ष्य वेगळेच होते. मूळ प्रतिसादातील विपर्यस्त सूचनांचा टोकाचा विपर्यास करून त्यातील निरर्थकता दर्शवून देण्याचा तो प्रयत्न होता. त्यात तुमचे कोलॅटरल डॅमेज व्हावे, अशी इच्छा नव्हती; किंबहुना, त्यात तुमचे कोलॅटरल डॅमेज होईल, अशी अपेक्षाही नव्हती. परंतु, ईश्वरेच्छा! त्याला काय करणार?

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोगटे साहेब आपल्या पत्रकारितेसाठी न’वी बाजू त्यांनी सांगितली. तुम्ही मात्र त्याकडे जु’न्या बाजूने पाहिलेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

त्याहून किंचित गंभीर गुन्ह्यांकरिता (जसे, लोकांच्या मोटारींवर स्प्रेपेंट फवारणे, वगैरे१अ१.) वेताच्या काठीने ढुंगणावर (पंचवीस? नक्की आकडा आठवत नाही; चूभूद्याघ्या.) जोरदार फटक्यांची सजा आहे, असे ऐकून आहे. शिवाय, जवळ अगदी एवढेसेसुद्धा ड्रग्ज़ चुकूनसुद्धा सापडल्यास, फारशी चौकशी न होता थेट देहान्त प्रायश्चित्त आहे, म्हणतात.

फटक्यांची शिक्षा आहे हे खरे आहे, पण दुर्दैवाने स्त्रिया आणि वय वर्षे ५० पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना फटके नाही मिळत. या गटातील काही जण या शिक्षेस पात्र उमेदवार असतात तरीही..

अंमली पदार्था बद्दल कायदे खूप कडक आहेत (आणि तसेच असायला हवेत) पण "फारशी चौकशी न होता.." या विधानात तथ्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

कितीही सुंदर यंत्रणा बनवली तरी माणसंच ती राबवतात; त्यामुळे मुलाचा दंड न घेणं, किंवा सभ्य व्यवसायात असल्यामुळे दंडाशिवाय सोडून देणं, वगैरे प्रकार चालतात. ते सगळीकडेच कमीअधिक फरकानं चालतात असं दिसतं.

आता प्रश्न असा आहे की एवढी हजारो वर्षं माणसांना अशा प्रकारची सवय झालेली आहे. हल्ली माणसांच्या जागी यंत्रं आणून ह्या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावरून गाडी चालवताना समजा स्पीड लिमिट ५० असेल (कुठली का एककं असेनात), आणि यंत्राला दिसलं की वाहनाचा वेग ५२.२ आहे. तर दंड होऊ शकेल. माणूस असेल तर असाही विचार होऊ शकेल की सार्वजनिक सुट्टीच दिवस असल्यामुळे रस्त्यावर फार गर्दी नाही; किंवा वाहनात एखादी स्त्री आहे जी आता प्रसुतीच्या उंबरठ्यावर आहे. पण यंत्रांना अशा गोष्टी दिसायची सोय करण्याची पद्धत अजून तरी आलेली दिसत नाही. मग नियम म्हणजे नियम!

पाचव्या किश्श्यात जी स्त्री आहे तिचे दागिने खरंच कुणी पळवले असते, किंवा तिच्याशी दुर्वर्तन केलं असतं तर ... असा विचार करायला यंत्राला शिकवलंच जात नाही. यात मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्य किंवा सत्ताहीन गटातल्या लोकांना उपद्रव होतो. स्त्रिया, गरीब, खालच्या जातीतले, (गौरेतर), कष्टकरी वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सदर आयाडीला विनातिकीट प्रवास करायचे व्यसन आहे किंवा लेखाला जोडायच्या डब्ब्याचया थापा आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Railway पास ही सुविधा आहे अत्यंत स्वस्त.

250 रुपयात 35 km अंतर प्रवास करता येतो पूर्ण30 दिवस आणि किती ही वेळा.
तरी काही लोक तिकीट तर घेत च नाहीत पण पास पण काढत नाहीत.
आर्थिक समस्या हे कारण नक्कीच नाही.

पावूस पडत असेल तर रेल्वे प्रवासी स्टेशन च्या प्रवेश द्वार शी येवून उभे राहतात .
आणि स्टेशन च मार्ग बंद करतात.
किंवा ब्रीज च्या तोंडाशी जावून उभे राहतात आणि रस्ता बंद करतात.
इतकी पावसाची भीती वाटत आहे तर प्लॅटफॉर्मवर च थांबा.
पण नाही
काही वर्षांपूर्वी परेल च्या ब्रीज वर चेंगराचेंगरीत लोक मेली होती.
त्याला लोकांची हेच वागणे जबाबदार होते.
शिकली सावरलेली लोक अशी का वागत असतील..
पावसाचे पाणी आत येते हे बघून पण खिडकी बंद न करणे.
बुट घातलेला पाय सीट वर ठेवणे.
बिसलेरी बॉटल,खाद्य पदार्थ ची covers train मध्येच टाकणे.
खिडकी मधून धुकने.

खूप विचित्र लोक असतात.
फक्त fine मारून ती सुधारत नसतात.
म्हणून मी वर तीन वर्ष सक्त मजुरी च हवी विना तिकीट प्रवाशांना असे lihale होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे किस्से आहेत खरे भारी ...
पण का कोण जाणे, ते वाचताना मला वाटत होते.. "उल्टा चोर -- कोतवाल को डाटे" अस घडतय का हे?

अर्थात हल्ली काही पत्रकार "स्टिंग ऑप." का काहीतरी करतात, त्या साठी असेल तर ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

पण का कोण जाणे, ते वाचताना मला वाटत होते.. "उल्टा चोर -- कोतवाल को डाटे" अस घडतय का हे?

असू शकेलही, कदाचित, (बहुधा नाही,) परंतु, माझ्या मते हा मुद्दा तुलनेने गौण आहे.

बोले, तो, मी चोरी केलेली आहे, असे चोर स्वतः कोतवालास सांगतोय, परंतु (चोराने स्वतः सांगूनसुद्धा) कोतवालासच कोतवाली करण्यात रस नाहीये, असा काहीसा मुद्दा आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(‘उल्टा चोर कोतवाल को डाँटे’मध्ये, माझ्या कल्पनेप्रमाणे, अटक केल्याबद्दल चोर कोतवालास रागे भरतो. येथे मला वाटते उलट प्रकार आहे, त्यामुळे तो वाक्प्रचार कदाचित लागू होणार नाही.)

अर्थात हल्ली काही पत्रकार "स्टिंग ऑप." का काहीतरी करतात, त्या साठी असेल तर ठीक आहे.

याबद्दल मात्र अनेक कारणांस्तव जोरदार असहमती दर्शविणे प्राप्त आहे.

१. एक तर हा स्टिंग ऑपचा प्रकार वाटत नाही. (फार फार तर एक सामाजिक प्रयोग वाटतो. तो वाजवी, की गैरवाजवी, हा पूर्णपणे वेगळा, नि गौण मुद्दा. तूर्तास तो आपला विषय नाही.) पहिली गोष्ट म्हणजे यात छुप्या मार्गाने ट्रॅप करून कोणासही (सनसनाटीपणे) एक्सपोज़ करण्याचा प्रकार दिसत नाही. (जे काही आहे, ते उघड आहे, आणि यात कोणालाही ‘अडकविलेले’ नाही.) दुसरी गोष्ट, जे काही माफक ‘एक्सपोझर’ आहे, ते आज, इतक्या वर्षांनंतर, या लेखात, आणि तेही वरवरचे, कोठल्याही ‘गुंतलेल्या’ व्यक्तीचे नाव न प्रसिद्ध करता. हे ‘स्टिंग’ ऑपरेशन खचितच नव्हे!

२. हॅविंग सेड दॅट, हे जर स्टिंग ऑपरेशन असते, तर त्या परिस्थितीत ‘तर ठीक आहे’ला जोरदार असहमती व्यक्त करणे भाग पडते. ‘स्टिंग ऑपरेशन’ हा प्रकार आजच्या (आणि कदाचित काही अंशी कालच्यासुद्धा) पत्रकारितेत बऱ्यापैकी प्रचलित असला, तरीही, त्यामागील नैतिकतेबद्दल मी नेहमीच साशंक राहिलेलो आहे.

असो चालायचेच.

——————————

तळटीपा:

या निमित्ताने, १९८०च्या दशकाच्या सुरुवातीची (अर्थात बाबा आदमच्या ज़मान्यातली अथवा ‘कालच्या पत्रकारिते’शी संबंधित अशी), इंडियन एक्सप्रेसच्याच एका पत्रकाराची (आद्य) केस आठवते. राजस्थान-उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश यांच्या सीमांनजीकच्या भागात महिलांचा कसा व्यापार चालतो, आणि संबंधित अधिकारी त्याकडे कसे दुर्लक्ष करतात, हे ‘एक्सपोझ’ करण्यासाठी, अश्विनी सरीन नावाच्या इंडियन एक्सप्रेसच्या एका तरुण पत्रकाराने, स्वतः धौलपुर (राजस्थान) येथे जाऊन, मध्य प्रदेशातील खेड्यातून तेथे विक्रीसाठी आणण्यात आलेली कमला नावाची मध्यमवयीन स्त्री तेथील बाजारातून २,३०० रुपये देऊन स्वतः विकत आणली, तिला दिल्लीतील आपल्या घरी नेले, आणि मग शांतपणे या सर्व गोष्टीचा तपशीलवार रिपोर्ट लिहून तो इंडियन एक्सप्रेसमधून प्रसिद्ध केला. (या घटनेवर आधारित ‘कमला’ नावाचा चित्रपटसुद्धा नंतर येऊन गेला. या घटनेची त्रोटक माहिती इंडिया टुडेच्या तत्कालीन अंकातील लेखाच्या या दुव्यावर पाहता येईल.) नो फर्दर कमेंट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी चोरी केलेली आहे, असे चोर स्वतः कोतवालास सांगतोय, परंतु (चोराने स्वतः सांगूनसुद्धा) कोतवालासच कोतवाली करण्यात रस नाहीये,

हे अंम्मळ असंभव वाटत नाही का? म्हणजे एकदा, दोनदा, तिनदा शक्य आहे ... पण १२ वर्षे? नेहमीच?
त्यांनी त्यांचे वार्ताहर असण्याचे ओळखपत्र त्या टी सी ला दाखवले असल्यास, त्याने घाबरून काही कारवाई केली नसणे शक्य आहे.

(‘उल्टा चोर कोतवाल को डाँटे’मध्ये, माझ्या कल्पनेप्रमाणे, अटक केल्याबद्दल चोर कोतवालास रागे भरतो. येथे मला वाटते उलट प्रकार आहे, त्यामुळे तो वाक्प्रचार कदाचित लागू होणार नाही.)
बरोबर आहे.. इथे असे म्हणणे योग्य ठरेल की चोर म्हणतोय मी चोरी केली यात माझा काही दोष नाही.. तुम्हीच घराचे दार उघडे ठेवले, नीट काळजी घेतली नाही... म्हणुन मला हे कृत्य करावे लागले.

२. हॅविंग सेड दॅट, हे जर स्टिंग ऑपरेशन असते, तर त्या परिस्थितीत ‘तर ठीक आहे’ला जोरदार असहमती व्यक्त करणे भाग पडते. ‘स्टिंग ऑपरेशन’ हा प्रकार आजच्या (आणि कदाचित काही अंशी कालच्यासुद्धा१) पत्रकारितेत बऱ्यापैकी प्रचलित असला, तरीही, त्यामागील नैतिकतेबद्दल मी नेहमीच साशंक राहिलेलो आहे.

... किंचित असहमत
"नेम ॲण्ड शेम" करू नये - कारण इथे वैयक्तिक दुश्मनी नाहीये, पण समाजाच्या कल्याणा साठी अधिकारी व्यक्तींना सप्रमाण या प्रकाराचा रिपोर्ट करायला काय हरकत आहे?

*** आजकाल छुपे कॅमेरे आणि माईक लावून लोकांचे खाजगी आयुष्य (उगीचच) उघड्यावर आणण्याचा जो प्रकार बिनदिक्कत चालू असतो, तो मात्र अती किळसवाणा आणि अनैतिक आहे हे खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||