उरले उरात काही..

"तुला माहित नसलेली एक गोष्ट तुला सांगतो, प्लीज ऐकून घेशील.."
"तुझ्या कपाळावरच्या बारीक आठ्या, हनुवटीवरचा आत जाऊन बसलेला सुंदर खोलगट भाग, मानेचा जरासा झोक, ओठांची ताणाने होणारी थरथर आणि संपूर्ण चेहऱ्यावर धुंदी अशीच राहणार असेल तर मी तुझ्या कितीही गोष्टी ऐकायला तयार आहे.."
"गंमत करू नकोस..ऐक, ऐक ना, माझं लग्न ठरलं आहे!"
"ओह! ही मला माहीती नसलेली गोष्ट आहे का, असंय का?"
"होय‌‌..हीच गोष्ट सांगायला मी भेटलो आहे आज.."
"तू पहिल्यांदा मला भेटलास, त्याच दिवशी ही गोष्ट मला समजली होती, फक्त ती गोष्ट कधी ऐकायला मिळणार याचीच मी वाट पाहत होतो!"
"ओह! मला कळत नाहीये यावर आता काय बोलू मी.. राजा.. आपलं मन आणि शरीर यांचे दोन तुकडे करता आले असते तर किती बरे झाले असते.. असे तुकडे करून फक्त मनाला जपलं असतं..त्या मनात तू असताना नंतर दुसरीकडे पडलेल्या शरीराचं काय झालं असतं त्याचा मला काही फरक पडला नसता..आपल्या या खरंच नैसर्गिक ऊर्मी नाहीयेत का.. खरंच याचसाठी नसतील का, की शरीर आणि मनाचं एकजीव जिणं आपल्या नशीबी कधीच नसतं म्हणून....पण या आपल्या भावना खर्‍या नाहीयेत का... काय करू या भावनांचं.."
"राजा, माझ्या राजा.. किती विचार करशील.. मला तर मंद असलेला प्रियकर पाहिजे होता, नुसत्या शरीर-भोगात माझ्यात प्रेम पाहणारा..अश्या नसत्या जीवघेण्या कल्पनांनी कधीच न झुरणारा.."
"या फक्त तुला कल्पना वाटतात.. राजा..? भावना आणि कल्पनेत काही फरक नाहीये का... दाही दिशा बंद असतानाही, हतबल असतानाही तू कसा कुठे असशील अश्या तुझ्या काळजीत चूर होणारा मी.. ही तुला कल्पना वाटते.."
"नाही, राजा.. तुझी बुद्धिमत्ता चाचणी घेत होतो मी..!"
"तुला चेष्टा सुचतेय! थांब तुझंही लग्न ठरेन तर तेव्हा कळेल माझ्या आत काय तुटतंय... गच्च तुला असं मिठीत घेऊन असाच माझा जीव जावा असं वाटतंय मला..परत घराकडे ही पावलं नको जायला..."
"श्श्श! राजा! बस बोलू नकोस काही.. शांत हो! डोळे पूस बरं.. आणि मीही जगू शकतो का, असा माझ्या मिठीत तू जीव सोडलास तर.. तू भिरभिर माझ्या डोक्यात फिरत असतोस..हे ठाऊक नाहीये का तुला.. ऐक बरं.. बघ माझ्याकडे, माझ्या डोळ्यांत.. इकडे.. हात दे बरं तुझा.. हा उष्ण स्पर्श..हे तुझे डोळे.. तुझा उलून येणारा श्वास.. हे, हे माझं जीवन आहे.. जितकं पाणी या धरतीला जीवंत ठेवतं तितकं.. माझं जीवन आहेस तू.. आणि तुला एक सांगू.. तुझं लग्न ठरलंय याचा मला त्रास होत नाहीये का..आणि काय रे..तुझं फक्त लग्न होणार आहे ना.. ही शरीराची तर वाटणी होणार आहे ना.. हम्म तिचे शृंगारलेले, लालसेने, ऊर्मीने दाह दाह होणारे अंगांग तुझ्यासमोर असताना तू तुझ्या भावना माझ्यात गुंतवून रात्र-रात्रभर मनातल्या मनातच रडणार आहेस हे मला माहित नाहीये का.. आणि तुला काय वाटतं, तुझे शरीर माझं माझं समजून किती दिवस राहणार तुझ्यापाशी...तेही सोडून जाणार ना..की मृत्यूलाही तू थांबवून शकणार आहेस... खरं तर, तुला मला फक्त एकत्र बघू न शकणारं हे बाहेरचं जग आपल्या ऊर्मींना कधीच अनैसर्गिक ठरवून मोकळे झाले आहेत, त्यांच्या अनैसर्गिक शिक्क्यावर आपलं नैसर्गिक जगणं आपण मारून टाकायचे म्हणजे, एकप्रकारे मृत्यूच ओढवून घेणं आहे..नाही का वाटत तुला..राजा.. माझ्या राजा..ये माझ्या कुशीत.. किती सहन करशील रे तू... आपण आहोत ना सोबत इथे..नाही का..बस बरं किती रडशील.."
"राजा! आपण जाऊया कुठे.. या निष्ठूर जगापासून दूर कुठेतरी..!"
"रडू नकोस..राजा.. बघ बरं तुझं आताशी फक्त लग्न ठरलंय..झालं नाहीये..तू सासरी चाललेल्या मुलीसारखा रडतो आहेस बघ... हो.. हो.. मला माहित आहे, तू भावूक आहेस..आणि तुला आजवर सर्व जगाने हाच सल्ला जास्त दिलेला आहे की, इतकं भावूक असू नये..असं सारखं सारखं भरून येऊ नये..पण असा सल्ला माझ्याकडून तुला कधीही मिळणार नाही..राजा.. तू आहेस तसा..तुझ्या सारख्या भरून आलेल्या डोळ्यांनिशी माझ्या सोबतीला हवा आहेस..जरी ते व्हलनरेबल, कमकुवतपणाचं लक्षण वाटत असलं तरी..तू संवदेना कवटाळून राहिलास तरी मी तुझ्या या बाजूंना घट्ट कवटाळून राहील...तुला उब देईल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत..!"
"राजा..! तू आता काय म्हणालास..तुला मी सोबतीला हवा आहे.. शेवटच्या श्वासापर्यंत...खरंच...? ओह..राजा..काय बोलू मी यावर.."
"तुझा चेहरा खूप काही बोलतो.. राजा रे..राजा..!"
"आपण खरंच कुठे निघून जाऊया का दूर...?"
"हम्म..हो राजा..मला एक ठिकाण माहिती आहे..चल.. येशील ना.. घट्ट कवटाळून माझ्या सोबत..? मावळतीचे रंग आलेत की निघूया आपण... या पृथ्वीच्या उरात लपायला..
कधी तिने ठरवलं किंवा वाटलं तर ती मायेने आपल्याला परत शोधून काढेल.. आपल्या प्रेमाला तोवर तिच्या उरात राहू देत.. एकमेकांच्या श्वासांवर आपण जगूयात.. तिची माया किती अनावर आहे, ते पाहूयात!"
समाप्त.

*शीर्षक सुरेश भट यांच्या 'केव्हा तरी पहाटे' या प्रसिद्ध मराठी गझलेतील शब्द आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet