साईनफेल्डच्या चाहत्यांनी लॅरी डेविडची कर्ब योर एन्थुझिॲझम ही मालिका अवश्य पाहावी. नुकतेच मी ८ सीझन पाहिले. आणखी दोन-तीन बाकी आहेत.
आवडलेल्या गोष्टी
- दररोजच्या जगण्यातले अनेकदा अर्थहीन असे संकेत, किंवा धार्मिक श्रद्धा, एलजीबीटी, फेमिनिझम, वगैरे संवेदनशील वाटू शकणाऱ्या गोष्टींची उडवलेली खिल्ली
- कसलीही भीडभाड/मर्यादा नसलेला विनोद.
- लॅरी डेविड काहीतरी विचित्रपणा करणार याची अपेक्षा असतानाही त्याच्या विचित्रपणाचे प्रसंग अत्यंत अनपेक्षित असणे
नावडलेल्या गोष्टी
- शिव्यांचा - अनेकदा गरज नसतानाही केलेला - मनमुराद वापर
- अनेक प्रसंगांमधील आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा
- काही ठिकाणी विनोदनिर्मितीसाठी केलेला विचित्रपणा
अर्थात नावडलेल्या गोष्टी एकंदर मालिकेच्या दर्जाला कमीपणा आणत नाहीत तरीही त्या टाळता आल्या असत्या तरी चालले असते.
ह्या आमच्या दैवताबद्दल जर काही संबंधित असेल तर ते त्वरित पाहण्यात येईल.
- if you want to look busy, look annoyed हा जॉर्जचा सल्ला यशवीरित्या अमलात आणलेला एक जॉर्जपंखा
त्यात सुझीचं पात्र सुरुवातीला फार शिव्या देत नाही. ते फार मिळमिळीत वाटतं. ती जेफला 'फॅट फक' आणि लॅरीला 'फोर आईड फक' म्हणायला लागते तेव्हापासून तिला तिचा मूड सापडला असं मला वाटतं.
क्वचित कधी विनोद मलाही आवडले नाहीत. उदाहरणार्थ वजन कमी केलेल्या बाईनं तोकडे शर्ट घालण्याबद्दल लॅरीला अडचण असते, ते सगळे विनोद.
बरा अर्धा आणि मी बरेचदा दुकानात चेकाऊटच्या रांगेत विचित्र वागणारे लोक; सिग्नलला विचित्र वागणारे लोक बघितले की "लॅरीला हे आवडणार नाही", अशी कॉमेंट न चुकता करतो.
लॅरी डेव्हिडचे बरेच मित्रमैत्रिणी 'कर्ब'मध्ये अधूनमधून येऊन लॅरीशी भांडतात; असं दिसतं. वाँडा साईक्स, रोझी ओ'डॉनल, टेड डॅन्सन, रिचर्ड लुईस, वगैरे. एक फक्त जेफचं पात्र लॅरीशी भांडत नाही. आणि लिऑन ब्लॅक हे पात्र त्याच्याशी भांडत नाही; पण त्याचं लॉजिक पाहता लॅरीचं त्याच्यासमोर काहीही चालणार नाही, असं दाखवलेलं लगेच पटतं. शेरील आणि लॅरी वेगळे झाल्यावर लिऑन ब्लॅक लॅरीचं पात्र जमिनीवर ठेवतो असं वारंवार वाटतं.
'कर्ब'मध्ये लॅरी डेव्हिड आणि रोझी ओ'डॉनल हॉटेलात जेवल्यावर बिल कोण भरणार यावरून भांडतात. हे भांडण 'मी पैसे देणार', 'नाही, मी पैसे देणार' छापाचं असतं. हे बघायच्या आधीपासून मी आणि एक मैत्रीण अशाच भांडतो. फार्मर्स मार्केटात एकत्र जायचं आणि भांडायचं हे आमचं रूटीन होतं. "आपण म्हाताऱ्या जोडप्यासारख्या भांडतो", असं तिचं म्हणणं. "आपण एकत्र शोभून दिसावं म्हणून मी केस वाढवत नाही", असं मी म्हणते.
सध्या तिच्या बाळंतपणामुळे आम्ही ब्रेक घेतला होता. पण लवकरच मुलांना घेऊन मार्केटात जायचं, आणि भांडायचं असा आमचा बेत आहे.
लसनिर्मिती उद्योगामधे गेल्या काही दशकांमधे झालेले क्रांतिकारी बदल
आयटी, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये कशी क्रांती झाली आहे याविषयी आपण गेल्या दोन सत्रांमधे माहिती घेतली. बायोटेक क्षेत्रामध्येही गेल्या काही दशकांत प्रचंड बदल / प्रगती झाली आहे. यातील सर्वच बदल IR 4 संबंधित आहेत असे नाही. बायोटेक क्षेत्रामधील भारतातील एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे लसनिर्मिती उद्योग. भारत हा जगातील सर्वात जास्त लसउत्पादन करणारा देश आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातील कंपनी जगातील सर्वात जास्त लसउत्पादन करणारी कंपनी आहे.
भारतात लसनिर्मिती विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सुरु झाली. (कॉलरा, प्लेग, रेबीज, इ.) स्वातंत्र्योत्तर काळात देवी (smallpox), क्षय (BCG), पोलिओ, धनुर्वात, गोवर, इत्यादी आजारांवर लसनिर्मिती होत असे.
मात्र, १९९०च्या दशकापासून या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत गेले.
‘संवाद’च्या पुढील सत्रात या बदलांबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत डॉ. राजीव ढेरे.
डॉ. ढेरे हे सीरम इन्टिट्यूटचे सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते लसनिर्मिती क्षेत्राशी गेली पस्तीस-चाळीस वर्षे संबंधित आहेत. १९९०पासून घडत गेलेल्या बदलांचे ते केवळ साक्षीदारच नाहीत, तर हे बदल घडवून आणण्यात त्यांचा वैयक्तिक सहभाग आहे. त्यांच्याकडून आपण हे क्रांतिकारी बदल जाणून घेऊयात २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता.
सर्वांना सस्नेह निमंत्रण.
तारीख आणि वेळ : रविवार २९ जानेवारी, सायंकाळी ५ वा.
स्थळ : वॉटरमार्क फिल्म क्लब, कोथरूड, पुणे. https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
डॉ ढेरे यांच्या दोन मुलाखती आपल्या बखर कोरोनाची मधे आहेतच
And the Band Played On — Film Screening and discussion
A threat no one dared face. A word no one wanted to speak. A fight for many, fought by few.
एड्सने जगभरात आत्तापर्यंत चार कोटींहून अधिक बळी घेतले आहेत. एड्सची महासाथ अमेरिकेत १९८०च्या दशकात सुरू झाली. आजार कशामुळे होत आहे याबद्दल सुरुवातीला माहिती नसल्याने परिस्थिती गोंधळाची होती. त्यातच हा ‘समलैंगिक लोकांचा आजार आहे’ असा (गैर)समज पसरल्यामुळे अमेरिकन सरकार आणि प्रसारमाध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वैज्ञानिकांमध्येही सगळे आलबेल नव्हते.
अशा सर्वव्यापी अनास्थेमुळे साथनियंत्रण, रोगसंशोधन, रोगनिवारण वगैरेंमध्ये अक्षम्य विलंब झाला. ही अनास्था, त्यामागील राजकारण, समाजकारण, समलैंगिकांच्या हक्कांसाठीची चळवळ, इत्यादींवर प्रकाश टाकणारा And the Band Played On हा शोधपत्रकार रँडी शिल्ट्स यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट पाहून आपण त्यावर चर्चा करणार आहोत — २६ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी पाच वाजता.
Trailer: https://youtu.be/PaHUzy-A05U
Whatsapp 9422016044 or 9730200711 for confirmation
Venue: Watermark Film Club, Kothrud https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
चित्रपटानंतर डॉ. विनय कुलकर्णी भारतातील एड्सविषयक परिस्थितीचा आढावा घेतील.
नील गेमन (आडनाव सांभाळून घ्या.) ह्या लेखकाची अमेरिकन गॉड्स नामक कादंबरी पूर्वी वाचली होती - प्रचंड आवडली.
आता त्याचं ऐकपुस्तक ऐकतो आहे- आणि मधेमधे पुस्तकही चाळतो आहे.
एकंदरीत सुंदर प्रकार.
अमेरिकेत आलेले लाखो स्थलांतरीत लोक. जमिनीवरून, जहाजाने, विमानाने प्रवास करून आपलं नशीब आजमावायला लोक इथे आले- सोबत आपापल्या मिथकांना, देवदेवतांना आणि सुष्ट-दुष्ट शक्तींनाही घेउन आले. सांप्रत काळी आधुनिक, तंत्रज्ञानाने जखडलेल्या जमान्यात ह्या देवदेवतांना लोक विसरत चालले आहेत. अतिपुरातन, प्राचीन आणि सर्वसामर्थ्यशाली अशा ह्या शक्तींची समाजावर एकेकाळी हुकूमत होती. पण आज त्यांना लोक विसरून गेलेत.
पण ह्या शक्ती अशा सहजासहजी विस्मरणात जातील का?
जाणून घ्यायचं असेल तर वाचा ..इ.इ.इ.
ह्या पुस्तकावर एक सिरीजही आहे म्हणे, पण अजून पाहिली नाही.
(नेहेमीप्रमाणेच डोक्यात किडा - हे जर भारतात कुणी केलं तर काय मजा येईल! अर्थात लेखक जिवंत राहिला तर. त्यापेक्षा मरणोत्तर तरी प्रसिद्ध करावे- अशी अट घालून कुणीतरी लिहिलं पाहिजे)
Workin' Moms नेटफ्लिक्स वर पाहते आहे. दोन सख्ख्या मैत्रिणींच्या मध्यवर्ती पात्रांभोवती गुंफलेली ही वेब सीरीज आहे. अॅन आणि केट या दोघी कायम व्यक्तिरेखा आणि त्यांच्या चार- पाच इतर मैत्रिणी सीरीज मधे ये- जा करतात. नवजात ते टीनएज ह्या रेंज मधे कुठेही बसणारी एक किंवा दोन मुलं ह्या बायकांना आहेत. अॅन आणि केट ह्या दोघी आपापल्या संसारात आई, बायको/पार्टनर/लव्हर, व्यावसायिक/नोकरदार, मुलगी, सून अशा वेगवेगळ्या भूमिका तारांबळ सांभाळत निभावताना दिसतात. अॅन आई आणि डॉक्टर म्हणून केटपेक्षा जास्त अनुभवी, परंतु स्वतःला आणि इतरांना सतत जज करणारी आणि संतापी तर केट फन लव्हिंग, काहीशी अविचारी-उत्स्फूर्त आणि सतत काही ना काही भानगडीत सापडणारी. दोघीजणी प्रापंचिक जबाबदाऱ्या पुऱ्या करता करता करियरमधे यशस्वी होण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. त्यांना येणारे भलेबुरे अनुभव आणि दोघींनी एकमेकींची समर्थपणे केलेली पाठराखण ही सीरीजची थीम आहे. भारतीय working moms ना असणारे गिल्ट यांनाही आहेत, पण त्यांचं आयुष्य त्याभोवती फिरत नाही. त्या व्यावसायिक आव्हानं बिनदिक्कत स्वीकारतात. गरज पडेल तेव्हा डे केअर, नवरा, आई , बेबीसिटर, जो कोणी हातात सापडेल त्याच्यावर मुलांना सोपवून करियर मागे धावतात. यश -अपयशाच्या, कौतुक आणि हेटाळणीच्या धनी होतात. इतर लोकांची मतं आणि सल्ले फाट्यावर मारून आपल्या निर्णयांवर ठाम रहातात मग भले ते चुकीचे ठरोत! पण परिस्थितीला किंवा कर्माला दोष देत चडफडत बसत नाहीत. पडून- झडून, पुन्हा उठून नव्या उमेदीने संधी शोधतात. भारतीय आयांच्या नशिबी सतत त्याग करायची जी सवय किंवा जबरदस्ती आणि त्यापोटी येणारा त्रागा असतो तो इथे दिसत नाही. त्यामुळे 'आई' एका स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात गुण- दोषांसकट बघायला मिळते. स्वतःच्या मुलांशी आणि नवऱ्याशी असलेलं त्यांचं नातं ह्या बाबतीत बरीच प्रश्नचिन्ह उरतात परंतु त्या दोघींच्या मनातही ती असतात, त्यामुळे ही दोन्ही पात्रं खरी वाटतात.
'एलेफंट व्हिस्परर्स' हा चाळीस मिनिटांचा लघुपट नेटफ्लिक्सवर आहे. या वर्षी त्याला ऑस्कर नामांकन आहे. मुदुमलाईच्या जंगलात अनाथ हत्तींचा सांभाळ करणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आहे. जरूर पाहावी अशी आहे.
ता.क. आताच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे पिले आपल्या कळपापासून दुरावू शकतात. ती जंगलात स्वतःहून टिकाव धरू शकत नाहीत. मुदुमलाई हे अभयारण्य असावे. त्यामुळे अशा हत्तींची जबाबदारी सरकार घेते.
समजते की पिलांना आई,मावश्या,आज्या सर्वजणी मिळून संभाळत असतात. आई मारली जाण्याची शक्यता कमी कारण इथल्या भारतीय हत्तीणींना सुळे नसतात.
तरीही असा काही माहितीपट पाहायला आवडेलच.
एक रशियन सर्कस हत्ती अनाथ होतो कारण खर्च न परवडल्याने मालक त्याला विकून टाकणार असतो. तेव्हा सर्कशीतलीच एक कलाकार मुलगी तो घेऊन भारताच्या प्रवासाला निघते. हत्ती तिकडे असतात तिकडे नेईन हा विचार. त्या प्रवासात काय होते तो सिनेमा मला यूट्यूबवर एकदा सापडला होता. छान आहे. (सिनेमावाले चांगल्या कथेला उगाचच पिळवटतात तसे यात शेवटचा भाग आहे. पण एकूण चित्रण भारी आहे. त्याची यूट्यूबवरची लिंकही याच धाग्याच्या मागच्या पानांवर मी दिली होती हे आठवले.
हत्ती हा प्राणी अजस्त्र,हुशार,इमोशनल असला तरी मला तो बिचाराच वाटतो. घोडा जरा कमी बिचारा आहे. पण माणसाने यांना युद्धांत, लढायांत वापरून (exploit, ) फारच दुखावले आहे.
मोठे कान असणाऱ्या प्राण्यांत गाढवही आहे. पण गाढवाने मोठ्या कानांनी कितीही ऐकले तरी इकडून तिकडे सोडून देण्याच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वतःला थोडे वाचवले आहे.
(अवांतर
पुढचा जन्म मिळाला तर मी त्यात गाढव होण्याची इच्छा धरून आहे. )
आणि करमणूक होते. वेळ चांगला जातो.
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये बरेच मराठी लोक हेच पाहताना सापडतात. म्हणजे ते मोबाईलवर काय पाहत आहेत हे तिरकी नजर करूनसुद्धा न पाहता दुरूनच कळते. चेहेऱ्यावरचे हावभाव पाहूनच. क्रिकेट मॅच बघताना तसं होत नाही.
‘The Big Short’ (2015) — Film Screening and discussion
२००८ साली अमेरिकेतील फायनान्शिअल मार्केट कोसळले, त्याचे पडसाद जगभर जाणवले. अमेरिकेत व मुख्यतः प्रगत देशांमध्ये मंदीची मोठी लाट आली. हे होण्याचे मुख्य कारण होते कच्च्या पायावर दिली गेलेली अतोनात गृहकर्जे. यासाठी अतिशय गुंतागुंतीची फायनान्शिअल इंस्ट्रुमेंट्स वापरण्यात आली होती. काही सजग व हुशार लोकांच्या हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीज शॉर्ट सेल करायला सुरुवात केली. बघताबघता मार्केट कोसळले. लेहमन ब्रदर्ससारखी अवाढव्य कंपनी दिवाळखोरीत निघाली. बातमी सार्वजनिक होण्याआधीपासूनच्या चित्तथरारक घटनांवर आधारित एक रंजक चित्रपट म्हणजे ‘द बिग शॉर्ट’
Trailer: https://youtu.be/vgqG3ITMv1Q
चित्रपटाचे स्क्रीनिंग २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता.
त्यानंतर अर्थतज्ज्ञ श्री. सुबोध पाठक प्रेक्षकांशी संवाद साधतील. श्री. पाठक यांना बँकिंग आणि फायनान्शिअल व्यवस्थांमधला दीर्घ अनुभव आहे. सध्या ते एका आंतरराष्ट्रीय बँकेत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत.
टीप :
१. सध्या सिलिकॉन व्हॅली व क्रेदि स्वीस बँकांना बसलेल्या धक्क्यामुळे पुन्हा एकदा २००८ची आठवण काढली जात आहे.
२.सध्या हिंडेनबर्गमुळे ‘शॉर्ट करणे’ याविषयी बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठीही हा चित्रपट बघावा.
Whatsapp 9422016044 or 9730200711 for confirmation
नुकताच माजिद माजिदींचा फादर हा इराणी चित्रपट पाहिला. लहानपणीच बापाचे छत्र हरवलेल्या एक अर्धवट वयातल्या मुलाची ही कथा आहे. नोकरी करुन आई आणि बहिणीसाठी पैशाचा आधार देणाऱ्या मुलाला गावी परत आल्यावर, आपल्या आईने एका पोलिस ऑफिसरशी लग्न केल्याचे समजते. त्या धक्क्याने तो नवीन वडिलांना स्वीकारु शकत नाहे. त्यातून उभ्या रहाणाऱ्या संघर्षाचे चित्रिकरण, या दिग्दर्शकाने आपल्या कलात्मक ढंगाने उत्तमरीत्या केले आहे.
जॅक रायनचा तिसरा सीझन प्राईमवर आहे. डोके बाजूला ठेवून पाहण्यासारख्या मनोरंजक गुप्तहेर मालिकांपैकी आवडलेल्या मालिकेचा हा तिसरा सीझन पहिल्या दोन्हीपेक्षा उत्कृष्ट वाटला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा घिसापिटा प्लॉट, अमेरिकेला मध्यवर्ती ठेवून रचलेला डोलारा वगैरेकडे दुर्लक्ष केले तर चांगला वेळ जाईल याची ग्यारंटी.
सध्या नोलनच्या चित्रपटामुळे ओपनहायमर चलतीत आहे. त्यावर १९८१ साली केलेली 'द डे आफ्टर ट्रिनिटी' ही डॉक्युमेंटरी तात्पुरती काही दिवस विनामूल्य पाहायला मिळेल. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
कार्लोस गोन. निसानचा हाय प्रोफाईल सीईओ. २०१८ मध्ये त्याला जपान मध्ये अटक झाली होती आर्थिक अफरा तफर केली म्हणून. जपान कोर्टाने त्याला जपान मधून बाहेर जाण्यास बंदी घातली होती. पण फ्रेंच सरकारचा त्याला पाठिंबा होता. (निसान - जापनीज ऑटोमेकर, रेनॉल्ट - फ्रेंच ऑटोमेकर हे पार्टनरशीप बिझनेस आहेत). मग त्याला जपानमधून अक्षरशः शिवाजी महाराजांसारखे पेटार्यात लपवून (म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या बॉक्स मधून आणि प्रायव्हेट जेट मधून) जपान मधून बाहेर लेबनॉनला आणले गेले. जपान सारख्या देशातून बाहेर पडायला इतकी "हाय प्रोफेशनल" मदत कोणी केली असावी हे कळत असले तरी गुलदस्त्यात राहील. प्रमाणाबाहेर (डिसप्रपोर्शनेट) संपत्ती असेल तर कायदे आणि व्यवस्था कशीही वाकवता येते याचे हे "दिसून आलेले" अलीकडचे उदाहरण आहे. अन्यथा अशी बरीच उदाहरणे असतात. म्हणून "टोकाची" आर्थिक विषमता असेल (इन्कम आणि कॅपिटल इनईक्वालिटी) तर लोकशाहीला आणि निरोगी भांडवलशाहीला (जेन्युईन कॅपिटलिझमला) पण हानिकारक आहे हा पिकेटीचा मुद्दा पटतो. टिआरपी पोटेन्शल असल्याने अर्थातच नेटफ्लिक्सने/अॅपल टिव्हीने या सनसनाटीवर अपेक्षेप्रमाणे सिरिज/डॉक्यूमेंट्री आणली आहे. अॅपल टीव्हीचा हा ट्रेलर. Wanted: The Escape of Carlos Ghosn — Official Trailer | Apple TV+ ब्लूमबर्ग ओरिजिनलचा यावरचा १३ मि. थोडक्यात पण मुख्य मुद्दे कव्हर करणारा व्हिडीओ. Inside Carlos Ghosn’s Unbelievable, Daring Escape
कालच थेटरात जाऊन ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ पाहून आलो. सुरुवातीची काही मिनिटे फालतू/रटाळ/कंटाळवाणा/कैच्याकै वगैरे वाटू शकतो, परंतु, थोडी कळ काढल्यास…
विषय अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे, नि हहपुवावर हहपुवा आहे.
(गौप्यस्फोट न करण्याखातर अधिक तपशिलांत शिरू इच्छीत नाही.)
२. थेरडा धर्मेंद्र (हा किती अतिरेकी भयंकर प्रकार असू शकतो, हे फक्त ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (उर्फ ‘व्हॉट झुमका’) हा चित्रपटप्रकार ज्यांनी पाहिला आहे, त्यांनाच समजू शकते!) झेलावा लागू शकतो. (बादवे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’सुद्धा मला आवडला होता, in spite of all the पंजाबियत and the थेरडा धर्मेंद्र!)
३. अगोदर म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीची वीसपंचवीस मिनिटे, चित्रपट वेग घेऊ लागेपर्यंत/कथानक प्रस्थापित होईपर्यंत (अ) हे काय चालले आहे, (ब) आपण हे काय (आणि का) पाहात आहोत, (क) आपण इथे झक मारायला (तेही पैसे देऊन) नक्की का आलो, अशा काहीबाही धारणा होऊ शकतात. (थोडक्यात, चित्रपट प्रथमदर्शनी बकवास वाटू शकतो.)
मात्र, पहिली वीसपंचवीस मिनिटे कळ काढा, आणि वरील गोष्टींकडे दुर्लक्ष करा (After all, Punjabis are a fact of life, and (Eastern) Punjab and Delhi are integral parts of India, आणि धर्मेंद्रसुद्धा कधी ना कधी थेरडा व्हायचाच होता, वगैरे वगैरे), आणि, ‘फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके’ या (केशवसुतप्रणीत१) वृत्तीने कथाविषयाचा गाभा/संकल्पना आणि त्याची हाताळणी/विस्तार यांच्याकडे लक्ष द्या; फुल्टू, extremely hilarious, धमाल आहे. निखळ करमणूक! अवश्य पहा. (In spite of all of the above, I still do recommend it! पंजाबियत, थेरडा धर्मेंद्र वगैरे केवळ बॅकग्राउंड नॉइज़ आहे.)
(थेरडेशाहीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकालासुद्धा आवडू शकला, ही बाब अवश्य लक्षात घ्या.)
(अर्थात, चित्रपट पाहिल्यावर समजा जर तुम्ही मला शिव्या घातल्यातच, तर मला त्याचे अजिबात दुःख वाटणार नाही, परंतु, मला जे प्रामाणिकपणे वाटले, ते मांडले, इतकेच.)
——————————
१ (अतिअवांतर, केवळ @मिसळपाव या आयडीकरिता:) ‘प्रणीत’मधला ‘णी’ ऱ्हस्व की दीर्घ, अशी शंका येथे उद्भवली होती. (म्हणजे, दीर्घ असायला पाहिजे, हे लॉजिकली पटत होते (प्र + नीत? चूभूद्याघ्या.), परंतु, ऱ्हस्व असायला पाहिजे, असे सारखेसारखे टोचूनटोचून सुचवून इंट्यूशन शेण खात होते.) मोल्सवर्थात पाहून खात्री करून घेतली. असो.
ही समीक्षा वाचून सिनेमा बघायचा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे नवऱ्याला सांगितलं मला "तेरी बातों में ऐसा उलझा जिया" सिनेमा बघायचा आहे. त्यावर त्याने "इस नाम की फिल्म क्यों देखनी है तुम्हे?" असा प्रश्न विचारला.
मग मी त्याला सांगितलं की एक न.बा. म्हणून आहेत त्यांनी सांगितली आहे बघायला.
"अब ये नबा कौन है नया?"
इथे हे सांगणं आवश्यक आहे की माझ्या नवऱ्याला अगदीच जुजबी मराठी बोलता/वाचता येतं. त्यामुळे तुमची समीक्षा वाचून दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा सिनेमा दाखवलेला बरा असा निष्कर्ष मी काढला. थिएटरमध्ये गेल्यावर मात्र आत सफाई चालू असल्याने बाहेर बसावं लागलं. तिथे वयोमानाप्रमाणे आणि लग्नाला दहा वर्षं झाल्यामुळे आम्हाला कंटाळा आला. म्हणून मी त्याला तुमचं वरील लेखन वाचून दाखवलं.
"थेरडा धर्मेंद्र किती अतिरेकी भयंकर प्रकार असू शकतो" या वाक्यावर सिनेमातल्या कृती सॅननसारखाच तो अडकून बसला. "अतिरेकी मतलब आतंकवादी. फिर ये adjective कैसे हो सकता है?" इथून सुरुवात झाली. असं असलं तरी एकूणच अमराठी असूनही या लेखनाला त्यानं अतिरेकी भयंकर दाद दिली. आणि स्क्रीनशॉट काढून स्वतःला पाठवला. नबांना एक नवीन फॅन मिळाला आहे आणि दुर्दैवाने तो आता माझ्याच घरी राहणार आहे.
सिनेमा खूपच आवडला. मीही अधिक काही सांगणार नाही.
अनेक वर्षांनी शाहिद कपूरचा चांगल्या क्वालिटीचा नाचही बघायला मिळाला. कृती सॅननच्या अभिनयाला दाद द्यायला हवी (ही काँप्लिमेंट आहे किंवा कसं हे मात्र नक्की ठरवता येत नाही.) पण मला ती 'बरेली की बर्फी' मध्येही आवडली होती.
असं असलं तरी एकूणच अमराठी असूनही या लेखनाला त्यानं अतिरेकी भयंकर दाद दिली. आणि स्क्रीनशॉट काढून स्वतःला पाठवला. नबांना एक नवीन फॅन मिळाला आहे
कृपया आमचाही ‘आदाब अर्ज़ है जनाब’ अवश्य कळवावा.
"अतिरेकी मतलब आतंकवादी. फिर ये adjective कैसे हो सकता है?"
कॉलेजात असताना आमचा एक (मराठीभाषकच, परंतु) मुंबईकर मित्र होता. माझ्या (पुणेरी) तोंडातून वारंवार स्रवणाऱ्या ‘तत्सम’ या शब्दावरून, ‘हा मनुष्य ड्रग्ज़विषयी काहीतरी बोलत आहे’ अशी त्याची समजूत होत असे.
त्याने हा शब्द त्यापूर्वी फक्त बातम्यांमधून, आणि तोही ‘अंमली आणि तत्सम पदार्थां’च्या संदर्भात ऐकला/वाचला होता, यात त्या बिचाऱ्याचा तरी काय दोष?
(आणि म्हणे मुंबई महाराष्ट्राची!)
(अतिअवांतर: याच काळातील आमच्या एका उत्तरप्रदेशी मित्राने, ‘गैरवर्तन’ या मराठी शब्दाचा अर्थ (निव्वळ तर्क लढवून) ‘परक्या मनुष्याचे भांडे’ असा लावला होता. कोण म्हणतो हिंदी आणि मराठी या अत्यंत जवळच्या भाषा आहेत म्हणून?)
सांगण्याचा मतलब, ‘अतिरेकी म्हणजे आतंकवादी’ हा तुलनेने पुष्कळच सौम्य प्रकार आहे.
——————————
(परंतु, तसेही, ‘अतिरेकी’ (नाम; हिंदीत: संज्ञा, इंग्रजीत: noun) म्हणजे ‘आतंकवादी’ नव्हे. ‘अतिरेकी’ (नाम) म्हणजे extremist, तर ‘आतंकवादी’ म्हणजे terrorist. दोहोंत फरक आहे. म्हणजे, दोन्ही सद्गुण एकाच व्यक्तीच्या ठायी अर्थातच असू शकतात, परंतु, असतातच, असे नाही. उदाहरणार्थ, माझाच एक परममित्र मला (अत्यंत प्रेमाने) extremist म्हणून संबोधीत असे (जो आरोप मला सर्वस्वी मान्य आहे). मात्र, आजतागायत माझा बाँब, (लहानपणी दिवाळीतल्या केपांच्या किंवा रंगपंचमीच्या दिवशी पाण्याच्या वगळल्यास) बंदुकी, किंवा तत्सम शस्त्रास्त्रांशी संबंध आलेला नाही. किंबहुना, या गोष्टींना मी प्रचंड घाबरतो. असो चालायचेच.)
'न'बा, तुम्ही सातत्यानं तळटिपांचे बाँब फोडता. तुमच्यामुळेच आदूबाळही असल्या दहशतवादी तळटिपांचे बाँब नाही तरी टिकल्या फोडत असतो. एवढा विनयशीलपणा नातायणपेठेला लाज आणतो, याची बूज तरी राखा.
माफक आतषबाजी. अधिक काही नाही. (दिवाळीत वगैरे फोडतात, तितपतच.)
तुमच्यामुळेच आदूबाळही असल्या दहशतवादी तळटिपांचे बाँब नाही तरी टिकल्या फोडत असतो.
आदूबाळाच्या लांबलचक कहाण्यांमध्ये ज्या मणभर तळटीपा असतात, त्यांचा मागोवा घेतघेत जर कहाणी वाचली, तर कहाणीतली एक ओळ ते त्यावरील तळटीप ते पुन्हा कहाणीतील पुढील ओळ या प्रवासात, एक तर आपण ट्रँपोलीनवर उड्या मारीत आहोत, नपक्षी कोणीतरी आपणास सारखेसारखे उचलून आपटीत आहे, अशी जी भावना होते, तिला तोड नाही! इतका परिणाम आम्हाला तरी आजतागायत साधता आला असेल, किंवा कसे, याबद्दल आम्ही साशंक आहोत. हॅट्स ऑफ!
आणि, आदूबाळाने आमच्यावरून प्रेरणा घेऊन जर हे सुरू केले असेल, तर आमच्या या मानसशिष्याचा आम्हांस निव्वळ, विशुद्ध अभिमान वाटतो. अशा शिष्याचे गुरुत्व लाभावयाससुद्धा भाग्य लागते! (आणि, ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ हेही खरे.) आमच्या सच्छिष्याचे आम्हांस कौतुक वाटते.
ही उज्ज्वल परंपरा वर्धिष्णु होवो, ही सदिच्छा.
(त्याउपर, आमच्याही एक पाऊल पुढे जाऊन, मूळ लिखाणातून तळटीपेकडे आणि तळटीपेकडून पुन्हा मूळ लिखाणातील पुढील ओळीअगोदर, अश्या उड्या मारण्याकरिता लिंकांची व्यवस्था करून आदूबाळ जे मूल्यवर्धन करीत असतो, त्यास त्रिवार वंदन! ही कल्पना आम्हांस बापजन्मी सुचली नसती, नि सुचली जरी असती, तरी (किंवा, आता सुचविण्यात आलेलीच आहे, तर) अंगभूत आळसामुळे आम्ही ती अंमलात आणली नसती, हे कबूल करणे येथे प्राप्त आहे. (शिवाय, आदूबाळाबद्दलच्या आदराखातर, आम्ही ही पद्धत स्वतः न ढापता, त्याची ‘सिग्नेचर’ म्हणून टिकवू इच्छितो, हाही भाग आहेच.))
(टीप: उपरोक्त प्रतिसादात वक्रोक्तीचा लवलेशही नाही, याची मनापासून ग्वाही या निमित्ताने येथे देऊ इच्छितो. आभार!)
इथे कुणी टेट्रिसप्रेमी आहेत का? पाहिली नसेल तर टेट्रिसवरची ॲपल टीव्हीवरची ही फिल्म आवर्जून पाहा. कम्युनिस्ट काळात सोव्हिएत रशियात तयार झालेला एक गेम जगभरात कसा पोचला त्याची ही गोष्ट आहे. ॲक्शन, विनोद आणि इतर बराच मसाला घालून, ऐतिहासिक सत्याला प्रसंगी सोयीस्कररीत्या वळवून, स्वतःला अजिबात गांभीर्यानं न घेता केलेली, थोडक्यात हॉलिवूडच्या प्रथेप्रमाणे केलेली फिल्म आहे. त्यामुळे डोकं बाजूला ठेवून पाहावी लागेल.
ओपनहायमर चित्रपटाला या वर्षीच्या बाफ्टा पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि काही सन्मान मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कारांतही भरपूर यश मिळेल असे दिसते. अजूनही पाहिला नसेल तर हीच ती वेळ.
खरंतर यावर एक वेगळा धागा लिहायचा होता पण कंटाळा. किरण रावचा लापता लेडीज आज बघितला आणि खूप आवडला. फेमिनिस्ट लेडीजना लगेच आवडेल असा आहेच पण एक गोष्ट म्हणूनही आवडला. मला सगळ्यात आवडलेली व्यक्तिरेखा रवी किशन या भोजपुरी सिनेमांतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्याने केलेली आहे. अतिशय हरामखोर तरीही कुतूहलग्रस्त आणि क्यूट इन्स्पेक्टर आहे तो. तोच सिनेमाचा नायक आहे.
नक्की बघावा असा सिनेमा आहे.
पुअर थिंग्ज खूप आवडला.
चांगला हॉरर म्हणून नाव असलेला "द किलिंग ऑफ सेक्रेड डिअर" आधीपासून पहायच्या यादीत होताच. पण गुगल वर समजले की हा योग्रोस लांटिमोस ह्या पुअर थिंग्जच्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. लगेच बघितला.
विचित्र आणि तणावग्रस्त गोष्ट आहे. बघण्यासारखा सिनेमा. अभिनयाग कॉलिन फेरेल, निकोल किडमन आणि बॅरी कोहीगन. फेरेल आवडत्या अभिनेत्यांमध्ये मागेच "In bruges" मधून आला होता, ह्यात त्याने नाव राखले.
ओल्डबॉय, द हँडमेडन आणि डिसीजन टू लीव्ह यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोरियन दिग्दर्शक पार्क चॅन-वूक यांनी एका पुलित्झर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर एक महत्त्वाकांक्षी मालिका The Sympathizer तयार केली आहे (HBO किंवा भारतात Jioवर उपलब्ध). व्हिएतनाम युद्धात अमेरिकन लोकांना हार पत्करावी लागली आणि सायगॉनच्या पतनानंतर पळ काढावा लागला. या काळात हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या एका कम्युनिस्ट डबल एजंटची ही कथा आहे. तिला ब्लॅक कॉमेडी म्हणता येईल, पण ती बऱ्यापैकी गंभीरही होते. गोष्ट अर्थात डबल एजंटभोवती फिरते, पण इतर अनेक व्यक्तिरेखाही लक्षणीय आहेत. रॉबर्ट डाउनी ज्युनियर मालिकेचा निर्माता आहे आणि अनेक अमेरिकन भूमिकांत कहर करतो. (त्यात एक ओरिएंटलिस्ट आणि एक Apocalypse Now सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.) एकंदरीत गुंतागुंतीची आणि महत्त्वाकांक्षी मालिका आहे. ट्रेलर इथे.
कादंबरी शोधली.. छोटेखानी आहे. आवडली. हायलाईट केलेली काही वाक्ये डायलॉग म्हणून जशास तशी वापरली आहेत. पण पहिली आणि शेवटची काही पाने चाळली तेव्हा कादंबरीतला शेवट वेगळा वाटला. खरं तर धर्मवीर भारतींनी ज्या पद्धतीने ते कथानक मांडलं आहे ते मास्टरपीस आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांनी त्याचे तर सोने केले आहे.
ता. क. बेनेगल यांची ही काही दिवसांपूर्वी घेतलेली ही मुलाखतही आवडली.
रिचर्ड डॉकिन्स आणि अयान हर्सी अली यांच्यातील चर्चा पाहिली.
अयान हर्सी अली या बाई सोमालियातून पळून नेदरलॅंड्समध्ये आश्रय घेऊन मोठ्या राजकारणी झालेल्या बाई. त्यांचे “Infidel: My Life” हे पुस्तक फार गाजलेले आहे म्हणे.
इस्लाम सोडून दहा-बारा वर्षे नास्तिक होऊन आणि नास्तिक्याचा प्रचार करून त्यांनी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
बाईंचे मुद्दे ऐकून निराशा झाली.
१. खाजगी मानसिक त्रासामुळे धर्माची आवश्यकता वाटली
२. सुंदर संगीत ऐकून किंवा कलाकृती पाहून आपण हेलावतो तसे वाटले. त्याला आव्हान देणे योग्य नाही कारण ते वेगळ्या प्रतलावर असते.
३. Workeism आणि नास्तिक्यामुळे युरोपात नैतिक पोकळी निर्माण झाली आहे आणि इस्लामसारखे वाईट धर्म ती भरून काढत आहेत. त्यांच्याशी लढायला ख्रिश्चन धर्म हवा. Modern secularism आणि moral philosophy हे ख्रिश्चन धर्मातूनच उदयास आले आहेत
इत्यादी गोष्टी बाई बोलल्या आहेत. बाई पक्क्या राजकारणी आहेत असे दिसते.
बाई राजकारणी आहेत, किंवा कसे, कल्पना नाही. मात्र, का, कोण जाणे, परंतु, मला (या बाईच नव्हेत — म्हणजे, त्या तर झाल्याच, परंतु) माणसांची ही एकंदर जॉन्रच पहिल्यापासून भंपक वाटत आलेली आहे.
किंवा, आमच्या वुड्डहौससाहेबाच्या भाषेत सांगायचे, तर, It’s like Shakespeare — Sounds great, but does not mean a thing. त्यामुळे, यांचे म्हणणे गंभीरपणे घ्यायचे नसते. घटकाभराची करमणूक, झाले. (If that’s your brand of entertainment, that is.)
शिवाय, Every person, it is said, has his or her price. Well, the price appears to have been met and paid in this case.
अडचण अशी आहे, की, (म्हणजे, ही अडचण आहे, की नाही, खात्री नाही, परंतु, असली तर) या बाई काय, किंवा डॉकिन्स काय, किंवा तुमचे ते सलमान रश्दी (रुश्दी?) काय… ही सर्व मंडळी विचारवंत आहेत, बुद्धिजीवी आहेत, वगैरे वगैरे असे पब्लिक उगाच समजते, नि यांना डोक्यावर घेऊन बसते. These are essentially people in love with the sounds of their own voices; याहून अधिक काही नाही.१ यांना तितपतच भाव द्यायचा असतो. आणि, यांच्या बडबडीने भारावून जायचे नसते. तुम्ही ती चर्चा पाहिलीत; मी त्या भानगडीतदेखील पडलो नाही.
असो चालायचेच.
——————————
१ हा आरोप आमच्यावरदेखील केला जाऊ शकतो, याची आम्हाला कल्पना आहे. फरक इतकाच आहे, की हा आरोप आम्हाला सहर्ष मान्य आहे. Of course I am in love with the sound of my own voice — आम्ही हे आनंदाने कबूल करतो. किंबहुना, त्याहीपुढे जाऊन, It takes one to know one, असेही विनम्रपणे सुचवू इच्छितो. असो.
माणसांना स्वतःचा विचार स्वत: करण्याची मेथॉडिकल सवय लावण्यात आधुनिक चर्चेसचा मोठा हातभार आहे हे विसरून चालत नाही. पोप सारख्या कर्मठ अधिकारी जागांनी आधुनिक मूल्ये स्वीकार करायला हळू हळू सुरुवात केली आहे. चर्चंतर्गत होणाऱ्या लैंगिक शोषणविरुद्ध कारवाया करतात. सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा नॉन ह्यूमन इंटेलिजन्स या नवीन मूल्यांना आता चर्चेस सुद्धा नाकारत नाहीत.
इस्लाम मुस्लिमांसाठी थोडाफार सुसह्य आणि परधर्मियांसाठी कर्दनकाळ आहे हे हिचन्स सारख्या लोकांनी वारंवार मांडले आहे.
इस्लामच्या अतिरेकी आक्रमणांना विरोध म्हणून पश्चिमेत रिएक्शनरी ख्रिश्चन धर्मानुनय वाढत आहे.
स्वीडन मधे बहुतेक नव मुस्लिम प्रजा शरिया कायद्याला प्राधान्य द्यायला कचरत नाही. तेव्हा असे आधुनिक क्रुसेडर तयार होणे स्वाभाविक वाटले.
"देव नाही ऐसे मनी, पण आधुनिक ख्रिश्चन धर्म जनी" असे खूप जण करत आहेत.
इतकेच का जर्मनीच्या होऊ घातलेल्या नव्या अति उजव्या चॅन्सेलर Alice Weidel बाई या उघड उघड समलिंगी आहेत (कर्मठ ख्रिश्चन सुद्धा हे नजरअंदाज करतात) तरीदेखील त्यांचा टोकाचा इस्लामोफोबिया लोकांना जास्त आवडतो.
लोकांना परंपरा आणि रिचुअल आवडतात आणि कोणतेही नास्तिक लोक नवीन परंपरा आणि rituals तयार करत नाहीत, पर्याय देत नाहीत त्यामुळे नास्तिक्य अशक्य बोअरिंग गोष्ट आहे. हे मूर्ख नास्तिकांना कधीच लक्षात येत नाही इतके ते स्वतःच्या rebelious पणाच्या प्रेमात पडलेले असतात.
बहुसंख्य लोक करतील ते करत नसलेले सगळेच अल्पसंख्य मूर्ख असण्याच्या जमान्यात नास्तिक मूर्ख असण्यात काय आश्चर्य? पण सगळे नास्तिक मूर्ख नसतात. रिचर्ड डॉकिन्सछाप लोक मूर्ख असतात फक्त; कारण त्यांच्या डोक्यात "It's easier to fool people than convincing them that they have been fooled" हे वाक्य शिरत नाही. त्याउलट भक्तांचा यथेच्छ फायदा उचलणारे बाबा-बुवा, नारायण नागबळी वगैरे काहीही करायला लावून लुटणारे भटुरडे, वाट्टेल ते फतवे काढून आणि न पाहिलेल्या जन्नतच्या गोष्टी सांगून लाखो लोकांच्या आयुष्याचा नरक करणारे मुल्ले, लोकांना लुबाडून प्रायव्हेट जेटने फिरणारे आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारे पाद्री वगैरे लोक खरे चतुर नास्तिक असतात.
साधारण वर्षापूर्वी न्यू यॉर्क टाईम्समधल्या एकानं 'ओपिनियन'मध्ये तिच्या धर्मबदलाबद्दल लिहिलं होतं. (दुवा)
तिनं धर्म बदलला, तिला धर्माची गरज आहे म्हणून नास्तिक लोक कसे चुकले आहेत, अशा छापाची विधानं होती, बहुतेक. शिवाय म्हणून ख्रिश्चन धर्म थोर असल्याचा दावाही होता, बहुतेक. रॉस डूदॅटचं लेखन मी फार वाचू शकत नाही, ५०० शब्द असतील तरीही पहिल्या ५० शब्दांत माझं लक्ष विचलित होतं. त्याचं लेखन आहे हे न बघता पान उघडलं तरीही हेच होतं.
म्हणून रिचर्ड डॉकिन्सचा व्हिडिओ उघडण्याची हिंमत नाही. खूप तिखट लागलं म्हणून साखरेचा डबा तोंडात उपडा करता येत नाही!
माझं चित्रपट पहाणे फार कमी आहे. मी बरेच जुने चित्रपट पाहिलेले नव्हते. पण अलिकडे काळाचा मागोवा घेण्यासाठी १९३०-१९६० दरम्यानचे प्रसिद्ध मुकपट आणि बोलपट(टॉकी) झरझर डोळ्याखालून घालतोय. गेल्या काही दिवसात मी १९३६ चा देवदास, १९३७ चा व्हि. शांतारामचा, नारायण हरी आपटेंच्या कथेवर आधारीत मराठी चित्रपट कुंकू, दो भिगा जमीन (चित्रपट १९५३ चा पण कथा आहे १९१४ मधली रविंद्रनातथ टागोरांची), अशोक कुमारचा परिणिता (१९५३ चा सिनेमा आहे पण शरदचंद्र चट्टोपाध्यायांची कादंबरी १९१४ ची आहे), १९५३ चा देवानंदचा टॅक्सी ड्रायव्हर, १९५७ चा मदर इंडिया इ. चित्रपट पाहिले. दोन महिन्यापूर्वी मी इंडिया आफ्टर इंडिपेन्डन्स हे पुस्तक वाचलं होतं. चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालिन अर्थकारण, समाजकारण, स्थल (उदा. मुंबई, कोलकात, दिल्ली वा खेडेगावं) याचे संदर्भ किती लागतायत ते शोधतोय. हे विकिपेज ज्यात त्या त्या वर्षातल्या हिट चित्रपटांच्या नोंदी आहेत.
१९१०-१९४० च्या दरम्यान गावी शेतमजूरी करून दिवसाला १ ते २ रुपये मिळत होते. शहरात आलात तर दिवसाकाठी ३ ते ५ रुपये कमाई असायची (जवळ जवळ दुप्पट). म्हणजे साधारण ६०-९० रुपये महिन्या काठी. त्यामुळे २० व्या शतकात शहराकडे स्थलांतर करण्यामागे हे अर्थकारण असावे. जे अर्थात आजही आहे.
दो भिगा जमीन (१९१४ ची कादंबरि, १९५३ चा चित्रपट) मध्ये रविंद्रनाथ टागोरांनी जो शंभू (बलराज सहानी) रंगवला आहे तो २६५ रुपयाच्या कर्जफेडीसाठी कोलकता शहरात जाऊन माणसाने ओढायची टॅक्सी चालवतो. तरीही सावकाराचं कर्ज फेडू शकत नाही. सावकारी आणि जमिनदारीची झळ मदर इंडियातूनही (१९५७) दिसते. तर दुसरीकडे शरदचंद्र चट्टोपाध्यायांचा देवदास (१९१७ ची कादंबरी, १९३६ चा सिनेमा) मात्र त्याच काळात ८०० रुपयाच्या आंगठीला चुन्नीलालला १००० रुपये देऊन मोकळा होतो आणि कुंकू (१९३७ चा मराठी चित्र्पट) मधला वाया गेलेला मुलगा बापाकडे २०० रुपयाची मनिऑर्डर मागतो. थोडक्यात जमिनदार, वकिली पेशा करणारे आणि सरकारी नोकरीवर मोठ्या हुद्द्यावर असणारी लोकं श्रीमंत होती.
देवदास आणि कुंकू मध्ये म्हातार्याने विशीतल्या मुलीशी लग्न करणं त्या काळात कॉमन होतं ते पण कळतं. (म्हातारा न इतुका अवघे पाउणशे वयोमान) त्यामुळे हरी नारायण आपटेंची कुंकू ही कथा काळाची कितीतरी पुढे होती असे म्हणता येईल.
देवदास मध्ये रेल्वेटेशनवरून पारोच्या गावी जायला बैलगाडीला २ दिवस लागतात. कुंकू मध्ये त्याकाळातली सर्व्हिस मोटार दिसते. एकंदर ट्रेन-सर्व्हीस मोटारी असल्या तरी प्रवास किती किचटक असावा याची कल्पना येते. त्यामुळे १८५६ मधल्या विष्णूपंत गोडसेंच्या "माझा प्रवास" या मराठीतल्या पहिल्या प्रवास वर्णनाची वाचून फक्त कल्पना करता येते. (यात पण श्रीवर्धन ते पुणे प्रवास दोन ते तीन दिवसांचा आहे तोही बैलगाडीचा)
१९५३ चा देवानंदचा टॅक्सीड्रायव्हर कुणी पाहिला नसेल तर जरूर पहा. इरॉस सिनेमा समोरच चर्चगेट दिसते, चर्निरोड वरून जाणारी लोकल ट्रेन दिसते, शेव्हरले कंपनीच्या टॅक्सी दिसतात. यात पण नायिका बेबी सिटींगसाठी राहून, खाऊन ७० रुपये पगाराची नोकरी करायला तयार होते.
१९५१ च्या काळात भारतात केवळ ९,३०,००० लोखंडाचे नांगर होते तर लाकडी नांगर जवळ जवळ ३१ मिलिअन होते. अन्नधान्य आपण आयात करत होतो. यावरून शेतीचा अंदाज घेता येतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या इन्फ्रामध्ये गुंतवणूक करणे गरजचे होते. १९५७ च्या मदर इंडियामध्ये त्याची झलक दिसते. मोठे कालवे करताना वापरली जाणारी जेसीपी सारखी यंत्रे दिसतात. भारताचा शेतीमधला वृद्धीदर ३% होता, जो आजच्या तुलनेत कमी वाटतो. पण गेल्या पूर्ण एक शतकातल्या मानाने (कलोनिअल पिरिअड) तो खूप चांगला होता. शिवाय जपान आणि चीनलाही शेतीमध्ये सुधारणा केल्यावर केल्यानंतर २.५% पेक्षा कमी वृद्धीदर गाठता आला होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रश्नोत्तरे,चॅटिंग वा तिचा वापर करून, मदत घेऊन चित्रं बनवणं जुनं झालं. आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संगीत आणि व्हिडिओ बनवणे रूढ होत आहे. अनेक गाणी AI वापरून बनत आहेत. उदा. खाली काही गाणी लिंकवत आहे.
शेवटची चुकीची लिंक दिल्येय का? मी ती पाहीली पण त्यात काही ए.आय. वापरून केल्याचा उल्लेख नाहीये.
व्हिडीओवर हा उल्लेख आहे;
"Altered or synthetic content
Sound or visuals were significantly edited or digitally generated. Learn more"
पण असं संस्करण म्हणजे ए.आय. नव्हे. डीजीटल अल्टरिंगसाठी भलेही ए.आय. बेस्ड प्रणाली वापरली असेल. तात्यानू, ह्या म्हणजे 'एअर फ्रायर' वापरून बांगडो भाजलेलो आसा. माका वाटला मुळात कायतरी 'बांग्देली' सारको काय नवो मासा ए.आय. वापरून केलेलो आसा :-)
आवशीचो घो त्या ए.आय. च्या - परवा मी त्येका "कापूसकोंड्याची गोष्ट सांग " म्हंटल्यावर मायझवो माका इचारतंय "कापूसकोंडा कोण होता? तो एक व्यक्ती होता की काहीतरी वेगळे?" !!!!

असे जाहीर करणे हे AI जनरेटेड कंन्टेन्ट ब्रॉडकास्ट करताना अपेक्षित असते. सर्वजण करतातच असे नाही. त्या गाण्यांचे शब्द लिहिण्यात AI ची मदत घेतली असली नसली हा वेगळा विषय पण संगीत AI ने बनवले आहे. सूचना देऊन बनवून घेणे आता शक्य आहे. सोरा (ओपन AI) ने तर आता व्हीडियो पण बनवणे शक्य केले आहे. तूर्त क्लिप्स पाच सेकंद लांबीच्या आहेत. पण वाढतील.
छान वाटली. विशेषतः त्यातले किचन आणि अंतर्गत घडामोडी व्यवस्थित मांडल्या आहेत. Perfect depiction of all the stress and fractures which is so peculiar of this hospitality business.
कर्ब योर एन्थुझिॲझम
साईनफेल्डच्या चाहत्यांनी लॅरी डेविडची कर्ब योर एन्थुझिॲझम ही मालिका अवश्य पाहावी. नुकतेच मी ८ सीझन पाहिले. आणखी दोन-तीन बाकी आहेत.
आवडलेल्या गोष्टी
- दररोजच्या जगण्यातले अनेकदा अर्थहीन असे संकेत, किंवा धार्मिक श्रद्धा, एलजीबीटी, फेमिनिझम, वगैरे संवेदनशील वाटू शकणाऱ्या गोष्टींची उडवलेली खिल्ली
- कसलीही भीडभाड/मर्यादा नसलेला विनोद.
- लॅरी डेविड काहीतरी विचित्रपणा करणार याची अपेक्षा असतानाही त्याच्या विचित्रपणाचे प्रसंग अत्यंत अनपेक्षित असणे
नावडलेल्या गोष्टी
- शिव्यांचा - अनेकदा गरज नसतानाही केलेला - मनमुराद वापर
- अनेक प्रसंगांमधील आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा
- काही ठिकाणी विनोदनिर्मितीसाठी केलेला विचित्रपणा
अर्थात नावडलेल्या गोष्टी एकंदर मालिकेच्या दर्जाला कमीपणा आणत नाहीत तरीही त्या टाळता आल्या असत्या तरी चालले असते.
आवडती सिरियल. दहावा सीझन
आवडती सिरियल. दहावा सीझन बघतोय सध्या. जॉर्जचे पात्र कसे बनले ते अगदी नीट समजते.
जॉर्ज
ह्या आमच्या दैवताबद्दल जर काही संबंधित असेल तर ते त्वरित पाहण्यात येईल.
- if you want to look busy, look annoyed हा जॉर्जचा सल्ला यशवीरित्या अमलात आणलेला एक जॉर्जपंखा
जॉर्जचे पात्र लॅरी
जॉर्जचे पात्र लॅरी डेव्हिडवरुन बनवलेले आहे. "कर्ब युअर..." चा हिरो लॅरी डेव्हिडच आहे. त्यात तो स्वत:चेच फिक्शनल पात्र रंगवतो.
+१
'कर्ब' मलाही आवडते.
त्यात सुझीचं पात्र सुरुवातीला फार शिव्या देत नाही. ते फार मिळमिळीत वाटतं. ती जेफला 'फॅट फक' आणि लॅरीला 'फोर आईड फक' म्हणायला लागते तेव्हापासून तिला तिचा मूड सापडला असं मला वाटतं.
क्वचित कधी विनोद मलाही आवडले नाहीत. उदाहरणार्थ वजन कमी केलेल्या बाईनं तोकडे शर्ट घालण्याबद्दल लॅरीला अडचण असते, ते सगळे विनोद.
बरा अर्धा आणि मी बरेचदा दुकानात चेकाऊटच्या रांगेत विचित्र वागणारे लोक; सिग्नलला विचित्र वागणारे लोक बघितले की "लॅरीला हे आवडणार नाही", अशी कॉमेंट न चुकता करतो.
लॅरी डेव्हिडचे बरेच मित्रमैत्रिणी 'कर्ब'मध्ये अधूनमधून येऊन लॅरीशी भांडतात; असं दिसतं. वाँडा साईक्स, रोझी ओ'डॉनल, टेड डॅन्सन, रिचर्ड लुईस, वगैरे. एक फक्त जेफचं पात्र लॅरीशी भांडत नाही. आणि लिऑन ब्लॅक हे पात्र त्याच्याशी भांडत नाही; पण त्याचं लॉजिक पाहता लॅरीचं त्याच्यासमोर काहीही चालणार नाही, असं दाखवलेलं लगेच पटतं. शेरील आणि लॅरी वेगळे झाल्यावर लिऑन ब्लॅक लॅरीचं पात्र जमिनीवर ठेवतो असं वारंवार वाटतं.
'कर्ब'मध्ये लॅरी डेव्हिड आणि रोझी ओ'डॉनल हॉटेलात जेवल्यावर बिल कोण भरणार यावरून भांडतात. हे भांडण 'मी पैसे देणार', 'नाही, मी पैसे देणार' छापाचं असतं. हे बघायच्या आधीपासून मी आणि एक मैत्रीण अशाच भांडतो. फार्मर्स मार्केटात एकत्र जायचं आणि भांडायचं हे आमचं रूटीन होतं. "आपण म्हाताऱ्या जोडप्यासारख्या भांडतो", असं तिचं म्हणणं. "आपण एकत्र शोभून दिसावं म्हणून मी केस वाढवत नाही", असं मी म्हणते.
सध्या तिच्या बाळंतपणामुळे आम्ही ब्रेक घेतला होता. पण लवकरच मुलांना घेऊन मार्केटात जायचं, आणि भांडायचं असा आमचा बेत आहे.
द लास्ट ऑफ अस चा पहिला एपिसोड
द लास्ट ऑफ अस चा पहिला एपिसोड पाहिला. केवळ जबरदस्त!
लसनिर्मिती उद्योगामधे गेल्या
लसनिर्मिती उद्योगामधे गेल्या काही दशकांमधे झालेले क्रांतिकारी बदल
आयटी, फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये कशी क्रांती झाली आहे याविषयी आपण गेल्या दोन सत्रांमधे माहिती घेतली. बायोटेक क्षेत्रामध्येही गेल्या काही दशकांत प्रचंड बदल / प्रगती झाली आहे. यातील सर्वच बदल IR 4 संबंधित आहेत असे नाही. बायोटेक क्षेत्रामधील भारतातील एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे लसनिर्मिती उद्योग. भारत हा जगातील सर्वात जास्त लसउत्पादन करणारा देश आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातील कंपनी जगातील सर्वात जास्त लसउत्पादन करणारी कंपनी आहे.
भारतात लसनिर्मिती विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सुरु झाली. (कॉलरा, प्लेग, रेबीज, इ.) स्वातंत्र्योत्तर काळात देवी (smallpox), क्षय (BCG), पोलिओ, धनुर्वात, गोवर, इत्यादी आजारांवर लसनिर्मिती होत असे.
मात्र, १९९०च्या दशकापासून या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत गेले.
‘संवाद’च्या पुढील सत्रात या बदलांबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत डॉ. राजीव ढेरे.
डॉ. ढेरे हे सीरम इन्टिट्यूटचे सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते लसनिर्मिती क्षेत्राशी गेली पस्तीस-चाळीस वर्षे संबंधित आहेत. १९९०पासून घडत गेलेल्या बदलांचे ते केवळ साक्षीदारच नाहीत, तर हे बदल घडवून आणण्यात त्यांचा वैयक्तिक सहभाग आहे. त्यांच्याकडून आपण हे क्रांतिकारी बदल जाणून घेऊयात २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता.
सर्वांना सस्नेह निमंत्रण.
तारीख आणि वेळ : रविवार २९ जानेवारी, सायंकाळी ५ वा.
स्थळ : वॉटरमार्क फिल्म क्लब, कोथरूड, पुणे. https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
डॉ ढेरे यांच्या दोन मुलाखती आपल्या बखर कोरोनाची मधे आहेतच
And the Band Played On — Film
And the Band Played On — Film Screening and discussion
A threat no one dared face. A word no one wanted to speak. A fight for many, fought by few.
एड्सने जगभरात आत्तापर्यंत चार कोटींहून अधिक बळी घेतले आहेत. एड्सची महासाथ अमेरिकेत १९८०च्या दशकात सुरू झाली. आजार कशामुळे होत आहे याबद्दल सुरुवातीला माहिती नसल्याने परिस्थिती गोंधळाची होती. त्यातच हा ‘समलैंगिक लोकांचा आजार आहे’ असा (गैर)समज पसरल्यामुळे अमेरिकन सरकार आणि प्रसारमाध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वैज्ञानिकांमध्येही सगळे आलबेल नव्हते.
अशा सर्वव्यापी अनास्थेमुळे साथनियंत्रण, रोगसंशोधन, रोगनिवारण वगैरेंमध्ये अक्षम्य विलंब झाला. ही अनास्था, त्यामागील राजकारण, समाजकारण, समलैंगिकांच्या हक्कांसाठीची चळवळ, इत्यादींवर प्रकाश टाकणारा And the Band Played On हा शोधपत्रकार रँडी शिल्ट्स यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट पाहून आपण त्यावर चर्चा करणार आहोत — २६ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी पाच वाजता.
Trailer: https://youtu.be/PaHUzy-A05U
Whatsapp 9422016044 or 9730200711 for confirmation
Venue: Watermark Film Club, Kothrud
https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
चित्रपटानंतर डॉ. विनय कुलकर्णी भारतातील एड्सविषयक परिस्थितीचा आढावा घेतील.
एन एच टेन
लोकसत्तेतला लेख वाचल्यामुळे, माझा एन एच टेन हा चित्रपट बघायचा राहून गेल्याचे लक्षात आले. फारच चांगला केला आहे हा चित्रपट. अनुष्का शर्माचे काम आवडले.
American Gods
नील गेमन (आडनाव सांभाळून घ्या.) ह्या लेखकाची अमेरिकन गॉड्स नामक कादंबरी पूर्वी वाचली होती - प्रचंड आवडली.
आता त्याचं ऐकपुस्तक ऐकतो आहे- आणि मधेमधे पुस्तकही चाळतो आहे.
एकंदरीत सुंदर प्रकार.
अमेरिकेत आलेले लाखो स्थलांतरीत लोक. जमिनीवरून, जहाजाने, विमानाने प्रवास करून आपलं नशीब आजमावायला लोक इथे आले- सोबत आपापल्या मिथकांना, देवदेवतांना आणि सुष्ट-दुष्ट शक्तींनाही घेउन आले. सांप्रत काळी आधुनिक, तंत्रज्ञानाने जखडलेल्या जमान्यात ह्या देवदेवतांना लोक विसरत चालले आहेत. अतिपुरातन, प्राचीन आणि सर्वसामर्थ्यशाली अशा ह्या शक्तींची समाजावर एकेकाळी हुकूमत होती. पण आज त्यांना लोक विसरून गेलेत.
पण ह्या शक्ती अशा सहजासहजी विस्मरणात जातील का?
जाणून घ्यायचं असेल तर वाचा ..इ.इ.इ.
ह्या पुस्तकावर एक सिरीजही आहे म्हणे, पण अजून पाहिली नाही.
(नेहेमीप्रमाणेच डोक्यात किडा - हे जर भारतात कुणी केलं तर काय मजा येईल! अर्थात लेखक जिवंत राहिला तर. त्यापेक्षा मरणोत्तर तरी प्रसिद्ध करावे- अशी अट घालून कुणीतरी लिहिलं पाहिजे)
मालिका पाहिली
मालिका पहिल्या सीझन मध्ये कधीमधी चांगली वाटते तर बऱ्याचदा बोरिंग. दुसरा सीझन तर बघवालाच नाही इतका भंगार निघाला.
एकंदरीत कल्पना चांगली आहे. पण कल्पनेचे नाविन्य संपले की मालिका बघायला बोर होते असे दिसते.
तेच मला गुड omens बाबतीत झाले.
Workin' Moms
Workin' Moms नेटफ्लिक्स वर पाहते आहे. दोन सख्ख्या मैत्रिणींच्या मध्यवर्ती पात्रांभोवती गुंफलेली ही वेब सीरीज आहे. अॅन आणि केट या दोघी कायम व्यक्तिरेखा आणि त्यांच्या चार- पाच इतर मैत्रिणी सीरीज मधे ये- जा करतात. नवजात ते टीनएज ह्या रेंज मधे कुठेही बसणारी एक किंवा दोन मुलं ह्या बायकांना आहेत. अॅन आणि केट ह्या दोघी आपापल्या संसारात आई, बायको/पार्टनर/लव्हर, व्यावसायिक/नोकरदार, मुलगी, सून अशा वेगवेगळ्या भूमिका तारांबळ सांभाळत निभावताना दिसतात. अॅन आई आणि डॉक्टर म्हणून केटपेक्षा जास्त अनुभवी, परंतु स्वतःला आणि इतरांना सतत जज करणारी आणि संतापी तर केट फन लव्हिंग, काहीशी अविचारी-उत्स्फूर्त आणि सतत काही ना काही भानगडीत सापडणारी. दोघीजणी प्रापंचिक जबाबदाऱ्या पुऱ्या करता करता करियरमधे यशस्वी होण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. त्यांना येणारे भलेबुरे अनुभव आणि दोघींनी एकमेकींची समर्थपणे केलेली पाठराखण ही सीरीजची थीम आहे. भारतीय working moms ना असणारे गिल्ट यांनाही आहेत, पण त्यांचं आयुष्य त्याभोवती फिरत नाही. त्या व्यावसायिक आव्हानं बिनदिक्कत स्वीकारतात. गरज पडेल तेव्हा डे केअर, नवरा, आई , बेबीसिटर, जो कोणी हातात सापडेल त्याच्यावर मुलांना सोपवून करियर मागे धावतात. यश -अपयशाच्या, कौतुक आणि हेटाळणीच्या धनी होतात. इतर लोकांची मतं आणि सल्ले फाट्यावर मारून आपल्या निर्णयांवर ठाम रहातात मग भले ते चुकीचे ठरोत! पण परिस्थितीला किंवा कर्माला दोष देत चडफडत बसत नाहीत. पडून- झडून, पुन्हा उठून नव्या उमेदीने संधी शोधतात. भारतीय आयांच्या नशिबी सतत त्याग करायची जी सवय किंवा जबरदस्ती आणि त्यापोटी येणारा त्रागा असतो तो इथे दिसत नाही. त्यामुळे 'आई' एका स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात गुण- दोषांसकट बघायला मिळते. स्वतःच्या मुलांशी आणि नवऱ्याशी असलेलं त्यांचं नातं ह्या बाबतीत बरीच प्रश्नचिन्ह उरतात परंतु त्या दोघींच्या मनातही ती असतात, त्यामुळे ही दोन्ही पात्रं खरी वाटतात.
एलेफंट व्हिस्परर्स
'एलेफंट व्हिस्परर्स' हा चाळीस मिनिटांचा लघुपट नेटफ्लिक्सवर आहे. या वर्षी त्याला ऑस्कर नामांकन आहे. मुदुमलाईच्या जंगलात अनाथ हत्तींचा सांभाळ करणाऱ्या एका जोडप्याची गोष्ट आहे. जरूर पाहावी अशी आहे.
ता.क. आताच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला आहे.
जंगलात अनाथ हत्तींचा सांभाळ करणाऱ्या . . .
जंगलातले 'अनाथ' हत्ती म्हणजे? वन्य हत्ती अनाथ नसतील. इकडे पाळलेले हत्ती कुणी जंगलांत सोडल्यावर त्यांना कळपात घेत नाहीत असे?
(नेटफ्लिक्सवर बघण्याची सोय नसल्यामुळे विचारत आहे.)
तुमच्या प्रश्नाचं उत्तर
तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरडफळ्यावरचा हत्तीच देऊ शकेल!
हाहाहा.
आता ते हेलिकॉप्टर विशेषणानंतर तुकारामांचे पुष्पक विमान हत्ती हे नाव घेतील असे वाटते. आणि एक लेख लिहितील.
जंगलातले 'अनाथ' हत्ती
वेगवेगळ्या कारणांमुळे पिले आपल्या कळपापासून दुरावू शकतात. ती जंगलात स्वतःहून टिकाव धरू शकत नाहीत. मुदुमलाई हे अभयारण्य असावे. त्यामुळे अशा हत्तींची जबाबदारी सरकार घेते.
हत्तींच्या डॉक्युमेंटरी पाहून
समजते की पिलांना आई,मावश्या,आज्या सर्वजणी मिळून संभाळत असतात. आई मारली जाण्याची शक्यता कमी कारण इथल्या भारतीय हत्तीणींना सुळे नसतात.
तरीही असा काही माहितीपट पाहायला आवडेलच.
एक रशियन सर्कस हत्ती अनाथ होतो कारण खर्च न परवडल्याने मालक त्याला विकून टाकणार असतो. तेव्हा सर्कशीतलीच एक कलाकार मुलगी तो घेऊन भारताच्या प्रवासाला निघते. हत्ती तिकडे असतात तिकडे नेईन हा विचार. त्या प्रवासात काय होते तो सिनेमा मला यूट्यूबवर एकदा सापडला होता. छान आहे. (सिनेमावाले चांगल्या कथेला उगाचच पिळवटतात तसे यात शेवटचा भाग आहे. पण एकूण चित्रण भारी आहे. त्याची यूट्यूबवरची लिंकही याच धाग्याच्या मागच्या पानांवर मी दिली होती हे आठवले.
हत्ती हा प्राणी अजस्त्र,हुशार,इमोशनल असला तरी मला तो बिचाराच वाटतो. घोडा जरा कमी बिचारा आहे. पण माणसाने यांना युद्धांत, लढायांत वापरून (exploit, ) फारच दुखावले आहे.
मोठे कान असणाऱ्या प्राण्यांत गाढवही आहे. पण गाढवाने मोठ्या कानांनी कितीही ऐकले तरी इकडून तिकडे सोडून देण्याच्या स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वतःला थोडे वाचवले आहे.
(अवांतर
पुढचा जन्म मिळाला तर मी त्यात गाढव होण्याची इच्छा धरून आहे. )
"महाराष्ट्राची हास्यजत्रा" चे
"महाराष्ट्राची हास्यजत्रा" चे काही भाग पाहिले.
कार्यक्रमाचे नाव सार्थ ठरविले आहे त्यातील कलाकारांनी ...
केव्हाही,कधीही, कुठलाही भाग पाहता येतो.
आणि करमणूक होते. वेळ चांगला जातो.
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये बरेच मराठी लोक हेच पाहताना सापडतात. म्हणजे ते मोबाईलवर काय पाहत आहेत हे तिरकी नजर करूनसुद्धा न पाहता दुरूनच कळते. चेहेऱ्यावरचे हावभाव पाहूनच. क्रिकेट मॅच बघताना तसं होत नाही.
‘The Big Short’ (2015) — Film
‘The Big Short’ (2015) — Film Screening and discussion
२००८ साली अमेरिकेतील फायनान्शिअल मार्केट कोसळले, त्याचे पडसाद जगभर जाणवले. अमेरिकेत व मुख्यतः प्रगत देशांमध्ये मंदीची मोठी लाट आली. हे होण्याचे मुख्य कारण होते कच्च्या पायावर दिली गेलेली अतोनात गृहकर्जे. यासाठी अतिशय गुंतागुंतीची फायनान्शिअल इंस्ट्रुमेंट्स वापरण्यात आली होती. काही सजग व हुशार लोकांच्या हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीज शॉर्ट सेल करायला सुरुवात केली. बघताबघता मार्केट कोसळले. लेहमन ब्रदर्ससारखी अवाढव्य कंपनी दिवाळखोरीत निघाली. बातमी सार्वजनिक होण्याआधीपासूनच्या चित्तथरारक घटनांवर आधारित एक रंजक चित्रपट म्हणजे ‘द बिग शॉर्ट’
Trailer: https://youtu.be/vgqG3ITMv1Q
चित्रपटाचे स्क्रीनिंग २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता.
त्यानंतर अर्थतज्ज्ञ श्री. सुबोध पाठक प्रेक्षकांशी संवाद साधतील. श्री. पाठक यांना बँकिंग आणि फायनान्शिअल व्यवस्थांमधला दीर्घ अनुभव आहे. सध्या ते एका आंतरराष्ट्रीय बँकेत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत.
टीप :
१. सध्या सिलिकॉन व्हॅली व क्रेदि स्वीस बँकांना बसलेल्या धक्क्यामुळे पुन्हा एकदा २००८ची आठवण काढली जात आहे.
२.सध्या हिंडेनबर्गमुळे ‘शॉर्ट करणे’ याविषयी बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यासाठीही हा चित्रपट बघावा.
Whatsapp 9422016044 or 9730200711 for confirmation
Venue: Watermark Film Club, Kothrud
https://maps.app.goo.gl/Vjn3hwkrmWmQhJ3s9
सर्वांना सस्नेह निमंत्रण !!!
फादर
नुकताच माजिद माजिदींचा फादर हा इराणी चित्रपट पाहिला. लहानपणीच बापाचे छत्र हरवलेल्या एक अर्धवट वयातल्या मुलाची ही कथा आहे. नोकरी करुन आई आणि बहिणीसाठी पैशाचा आधार देणाऱ्या मुलाला गावी परत आल्यावर, आपल्या आईने एका पोलिस ऑफिसरशी लग्न केल्याचे समजते. त्या धक्क्याने तो नवीन वडिलांना स्वीकारु शकत नाहे. त्यातून उभ्या रहाणाऱ्या संघर्षाचे चित्रिकरण, या दिग्दर्शकाने आपल्या कलात्मक ढंगाने उत्तमरीत्या केले आहे.
जॅक रायन
जॅक रायनचा तिसरा सीझन प्राईमवर आहे. डोके बाजूला ठेवून पाहण्यासारख्या मनोरंजक गुप्तहेर मालिकांपैकी आवडलेल्या मालिकेचा हा तिसरा सीझन पहिल्या दोन्हीपेक्षा उत्कृष्ट वाटला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा घिसापिटा प्लॉट, अमेरिकेला मध्यवर्ती ठेवून रचलेला डोलारा वगैरेकडे दुर्लक्ष केले तर चांगला वेळ जाईल याची ग्यारंटी.
'टाईमलेस'
'जॅक रायन' आवडला असेल तर 'टाईमलेस' बघून पाहा. जरा निराळी बाटली आणि तशीच काहीशी दारू आहे. शिवाय दोन सीझन मिळून २०-२२ भागच आहेत; फार वेळही जाणार नाही.
Guardians of the Galaxy
Guardians of the Galaxy volume 3 जबरदस्त सिनेमा आहे.
ओपनहायमर
सध्या नोलनच्या चित्रपटामुळे ओपनहायमर चलतीत आहे. त्यावर १९८१ साली केलेली 'द डे आफ्टर ट्रिनिटी' ही डॉक्युमेंटरी तात्पुरती काही दिवस विनामूल्य पाहायला मिळेल. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
कार्लोस गोन
कार्लोस गोन. निसानचा हाय प्रोफाईल सीईओ. २०१८ मध्ये त्याला जपान मध्ये अटक झाली होती आर्थिक अफरा तफर केली म्हणून. जपान कोर्टाने त्याला जपान मधून बाहेर जाण्यास बंदी घातली होती. पण फ्रेंच सरकारचा त्याला पाठिंबा होता. (निसान - जापनीज ऑटोमेकर, रेनॉल्ट - फ्रेंच ऑटोमेकर हे पार्टनरशीप बिझनेस आहेत). मग त्याला जपानमधून अक्षरशः शिवाजी महाराजांसारखे पेटार्यात लपवून (म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या बॉक्स मधून आणि प्रायव्हेट जेट मधून) जपान मधून बाहेर लेबनॉनला आणले गेले. जपान सारख्या देशातून बाहेर पडायला इतकी "हाय प्रोफेशनल" मदत कोणी केली असावी हे कळत असले तरी गुलदस्त्यात राहील. प्रमाणाबाहेर (डिसप्रपोर्शनेट) संपत्ती असेल तर कायदे आणि व्यवस्था कशीही वाकवता येते याचे हे "दिसून आलेले" अलीकडचे उदाहरण आहे. अन्यथा अशी बरीच उदाहरणे असतात. म्हणून "टोकाची" आर्थिक विषमता असेल (इन्कम आणि कॅपिटल इनईक्वालिटी) तर लोकशाहीला आणि निरोगी भांडवलशाहीला (जेन्युईन कॅपिटलिझमला) पण हानिकारक आहे हा पिकेटीचा मुद्दा पटतो. टिआरपी पोटेन्शल असल्याने अर्थातच नेटफ्लिक्सने/अॅपल टिव्हीने या सनसनाटीवर अपेक्षेप्रमाणे सिरिज/डॉक्यूमेंट्री आणली आहे. अॅपल टीव्हीचा हा ट्रेलर. Wanted: The Escape of Carlos Ghosn — Official Trailer | Apple TV+ ब्लूमबर्ग ओरिजिनलचा यावरचा १३ मि. थोडक्यात पण मुख्य मुद्दे कव्हर करणारा व्हिडीओ. Inside Carlos Ghosn’s Unbelievable, Daring Escape
तेरी बातों में…
कालच थेटरात जाऊन ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ पाहून आलो. सुरुवातीची काही मिनिटे फालतू/रटाळ/कंटाळवाणा/कैच्याकै वगैरे वाटू शकतो, परंतु, थोडी कळ काढल्यास…
विषय अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे, नि हहपुवावर हहपुवा आहे.
(गौप्यस्फोट न करण्याखातर अधिक तपशिलांत शिरू इच्छीत नाही.)
अवश्य पाहावा, अशी शिफारस.
नावावरून बकवास वाटलेला.
नावावरून बकवास वाटलेला.
आता पाहिन!
काही वैधानिक इशारे (परंतु तरीही कडक शिफारस!)
१. पंजाबियतचा अंमळ ओव्हरडोस होऊ शकतो.
२. थेरडा धर्मेंद्र (हा किती अतिरेकी भयंकर प्रकार असू शकतो, हे फक्त ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (उर्फ ‘व्हॉट झुमका’) हा चित्रपटप्रकार ज्यांनी पाहिला आहे, त्यांनाच समजू शकते!) झेलावा लागू शकतो. (बादवे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’सुद्धा मला आवडला होता, in spite of all the पंजाबियत and the थेरडा धर्मेंद्र!)
३. अगोदर म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीची वीसपंचवीस मिनिटे, चित्रपट वेग घेऊ लागेपर्यंत/कथानक प्रस्थापित होईपर्यंत (अ) हे काय चालले आहे, (ब) आपण हे काय (आणि का) पाहात आहोत, (क) आपण इथे झक मारायला (तेही पैसे देऊन) नक्की का आलो, अशा काहीबाही धारणा होऊ शकतात. (थोडक्यात, चित्रपट प्रथमदर्शनी बकवास वाटू शकतो.)
मात्र, पहिली वीसपंचवीस मिनिटे कळ काढा, आणि वरील गोष्टींकडे दुर्लक्ष करा (After all, Punjabis are a fact of life, and (Eastern) Punjab and Delhi are integral parts of India, आणि धर्मेंद्रसुद्धा कधी ना कधी थेरडा व्हायचाच होता, वगैरे वगैरे), आणि, ‘फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके’ या (केशवसुतप्रणीत१) वृत्तीने कथाविषयाचा गाभा/संकल्पना आणि त्याची हाताळणी/विस्तार यांच्याकडे लक्ष द्या; फुल्टू, extremely hilarious, धमाल आहे. निखळ करमणूक! अवश्य पहा. (In spite of all of the above, I still do recommend it! पंजाबियत, थेरडा धर्मेंद्र वगैरे केवळ बॅकग्राउंड नॉइज़ आहे.)
(थेरडेशाहीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकालासुद्धा आवडू शकला, ही बाब अवश्य लक्षात घ्या.)
(अर्थात, चित्रपट पाहिल्यावर समजा जर तुम्ही मला शिव्या घातल्यातच, तर मला त्याचे अजिबात दुःख वाटणार नाही, परंतु, मला जे प्रामाणिकपणे वाटले, ते मांडले, इतकेच.)
——————————
१ (अतिअवांतर, केवळ @मिसळपाव या आयडीकरिता:) ‘प्रणीत’मधला ‘णी’ ऱ्हस्व की दीर्घ, अशी शंका येथे उद्भवली होती. (म्हणजे, दीर्घ असायला पाहिजे, हे लॉजिकली पटत होते (प्र + नीत? चूभूद्याघ्या.), परंतु, ऱ्हस्व असायला पाहिजे, असे सारखेसारखे टोचूनटोचून सुचवून इंट्यूशन शेण खात होते.) मोल्सवर्थात पाहून खात्री करून घेतली. असो.
बघितला
ही समीक्षा वाचून सिनेमा बघायचा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे नवऱ्याला सांगितलं मला "तेरी बातों में ऐसा उलझा जिया" सिनेमा बघायचा आहे. त्यावर त्याने "इस नाम की फिल्म क्यों देखनी है तुम्हे?" असा प्रश्न विचारला.
मग मी त्याला सांगितलं की एक न.बा. म्हणून आहेत त्यांनी सांगितली आहे बघायला.
"अब ये नबा कौन है नया?"
इथे हे सांगणं आवश्यक आहे की माझ्या नवऱ्याला अगदीच जुजबी मराठी बोलता/वाचता येतं. त्यामुळे तुमची समीक्षा वाचून दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा सिनेमा दाखवलेला बरा असा निष्कर्ष मी काढला. थिएटरमध्ये गेल्यावर मात्र आत सफाई चालू असल्याने बाहेर बसावं लागलं. तिथे वयोमानाप्रमाणे आणि लग्नाला दहा वर्षं झाल्यामुळे आम्हाला कंटाळा आला. म्हणून मी त्याला तुमचं वरील लेखन वाचून दाखवलं.
"थेरडा धर्मेंद्र किती अतिरेकी भयंकर प्रकार असू शकतो" या वाक्यावर सिनेमातल्या कृती सॅननसारखाच तो अडकून बसला. "अतिरेकी मतलब आतंकवादी. फिर ये adjective कैसे हो सकता है?" इथून सुरुवात झाली. असं असलं तरी एकूणच अमराठी असूनही या लेखनाला त्यानं अतिरेकी भयंकर दाद दिली. आणि स्क्रीनशॉट काढून स्वतःला पाठवला. नबांना एक नवीन फॅन मिळाला आहे आणि दुर्दैवाने तो आता माझ्याच घरी राहणार आहे.
सिनेमा खूपच आवडला. मीही अधिक काही सांगणार नाही.
अनेक वर्षांनी शाहिद कपूरचा चांगल्या क्वालिटीचा नाचही बघायला मिळाला. कृती सॅननच्या अभिनयाला दाद द्यायला हवी (ही काँप्लिमेंट आहे किंवा कसं हे मात्र नक्की ठरवता येत नाही.) पण मला ती 'बरेली की बर्फी' मध्येही आवडली होती.
सूचना
सदर इसम तुझ्याच घरात किमान १० वर्षं राहत आहे. 'न'बा फॅनडम नवीन आहे. घरात राहणं जुनं आहे, लागण नवी आहे!
'न'बा, यात काही भर घालायची आहे का?
.
‘किमान’ या शब्दयोजनेस दाद द्यावीशी वाटते.
(म्हणजे, तर्कास धरूनच आहे अर्थात, परंतु…)
तर्क आणि उदारमतवाद.
लग्नाशिवाय एकत्र राहू नये, असं म्हणायला आपल्यापैकी कोण सनातनी आहे?
आभार
कृपया आमचाही ‘आदाब अर्ज़ है जनाब’ अवश्य कळवावा.
कॉलेजात असताना आमचा एक (मराठीभाषकच, परंतु) मुंबईकर मित्र होता. माझ्या (पुणेरी) तोंडातून वारंवार स्रवणाऱ्या ‘तत्सम’ या शब्दावरून, ‘हा मनुष्य ड्रग्ज़विषयी काहीतरी बोलत आहे’ अशी त्याची समजूत होत असे.
त्याने हा शब्द त्यापूर्वी फक्त बातम्यांमधून, आणि तोही ‘अंमली आणि तत्सम पदार्थां’च्या संदर्भात ऐकला/वाचला होता, यात त्या बिचाऱ्याचा तरी काय दोष?
(आणि म्हणे मुंबई महाराष्ट्राची!)
(अतिअवांतर: याच काळातील आमच्या एका उत्तरप्रदेशी मित्राने, ‘गैरवर्तन’ या मराठी शब्दाचा अर्थ (निव्वळ तर्क लढवून) ‘परक्या मनुष्याचे भांडे’ असा लावला होता. कोण म्हणतो हिंदी आणि मराठी या अत्यंत जवळच्या भाषा आहेत म्हणून?)
सांगण्याचा मतलब, ‘अतिरेकी म्हणजे आतंकवादी’ हा तुलनेने पुष्कळच सौम्य प्रकार आहे.
——————————
(परंतु, तसेही, ‘अतिरेकी’ (नाम; हिंदीत: संज्ञा, इंग्रजीत: noun) म्हणजे ‘आतंकवादी’ नव्हे. ‘अतिरेकी’ (नाम) म्हणजे extremist, तर ‘आतंकवादी’ म्हणजे terrorist. दोहोंत फरक आहे. म्हणजे, दोन्ही सद्गुण एकाच व्यक्तीच्या ठायी अर्थातच असू शकतात, परंतु, असतातच, असे नाही. उदाहरणार्थ, माझाच एक परममित्र मला (अत्यंत प्रेमाने) extremist म्हणून संबोधीत असे (जो आरोप मला सर्वस्वी मान्य आहे). मात्र, आजतागायत माझा बाँब, (लहानपणी दिवाळीतल्या केपांच्या किंवा रंगपंचमीच्या दिवशी पाण्याच्या वगळल्यास) बंदुकी, किंवा तत्सम शस्त्रास्त्रांशी संबंध आलेला नाही. किंबहुना, या गोष्टींना मी प्रचंड घाबरतो. असो चालायचेच.)
हे खरं नाही!
'न'बा, तुम्ही सातत्यानं तळटिपांचे बाँब फोडता. तुमच्यामुळेच आदूबाळही असल्या दहशतवादी तळटिपांचे बाँब नाही तरी टिकल्या फोडत असतो. एवढा विनयशीलपणा नातायणपेठेला लाज आणतो, याची बूज तरी राखा.
.
माफक आतषबाजी. अधिक काही नाही. (दिवाळीत वगैरे फोडतात, तितपतच.)
आदूबाळाच्या लांबलचक कहाण्यांमध्ये ज्या मणभर तळटीपा असतात, त्यांचा मागोवा घेतघेत जर कहाणी वाचली, तर कहाणीतली एक ओळ ते त्यावरील तळटीप ते पुन्हा कहाणीतील पुढील ओळ या प्रवासात, एक तर आपण ट्रँपोलीनवर उड्या मारीत आहोत, नपक्षी कोणीतरी आपणास सारखेसारखे उचलून आपटीत आहे, अशी जी भावना होते, तिला तोड नाही! इतका परिणाम आम्हाला तरी आजतागायत साधता आला असेल, किंवा कसे, याबद्दल आम्ही साशंक आहोत. हॅट्स ऑफ!
आणि, आदूबाळाने आमच्यावरून प्रेरणा घेऊन जर हे सुरू केले असेल, तर आमच्या या मानसशिष्याचा आम्हांस निव्वळ, विशुद्ध अभिमान वाटतो. अशा शिष्याचे गुरुत्व लाभावयाससुद्धा भाग्य लागते! (आणि, ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ हेही खरे.) आमच्या सच्छिष्याचे आम्हांस कौतुक वाटते.
ही उज्ज्वल परंपरा वर्धिष्णु होवो, ही सदिच्छा.
(त्याउपर, आमच्याही एक पाऊल पुढे जाऊन, मूळ लिखाणातून तळटीपेकडे आणि तळटीपेकडून पुन्हा मूळ लिखाणातील पुढील ओळीअगोदर, अश्या उड्या मारण्याकरिता लिंकांची व्यवस्था करून आदूबाळ जे मूल्यवर्धन करीत असतो, त्यास त्रिवार वंदन! ही कल्पना आम्हांस बापजन्मी सुचली नसती, नि सुचली जरी असती, तरी (किंवा, आता सुचविण्यात आलेलीच आहे, तर) अंगभूत आळसामुळे आम्ही ती अंमलात आणली नसती, हे कबूल करणे येथे प्राप्त आहे. (शिवाय, आदूबाळाबद्दलच्या आदराखातर, आम्ही ही पद्धत स्वतः न ढापता, त्याची ‘सिग्नेचर’ म्हणून टिकवू इच्छितो, हाही भाग आहेच.))
(टीप: उपरोक्त प्रतिसादात वक्रोक्तीचा लवलेशही नाही, याची मनापासून ग्वाही या निमित्ताने येथे देऊ इच्छितो. आभार!)
गैरवर्तन
‘गैरवर्तन’ या मराठी शब्दाचा अर्थ (निव्वळ तर्क लढवून) ‘परक्या मनुष्याचे भांडे’
:D
तसा काल तुमच्या अंमळ या शब्दाचा अर्थ acid असा घेतला गेला.
अं...
'अंमळ' या शब्दाचे 'मळमळ' या शब्दाशी साधर्म्य लक्षात घेता, खरे तर acidity असा अर्थ घेणे अधिक सयुक्तिक झाले नसते काय?
टेट्रिस?
इथे कुणी टेट्रिसप्रेमी आहेत का? पाहिली नसेल तर टेट्रिसवरची ॲपल टीव्हीवरची ही फिल्म आवर्जून पाहा. कम्युनिस्ट काळात सोव्हिएत रशियात तयार झालेला एक गेम जगभरात कसा पोचला त्याची ही गोष्ट आहे. ॲक्शन, विनोद आणि इतर बराच मसाला घालून, ऐतिहासिक सत्याला प्रसंगी सोयीस्कररीत्या वळवून, स्वतःला अजिबात गांभीर्यानं न घेता केलेली, थोडक्यात हॉलिवूडच्या प्रथेप्रमाणे केलेली फिल्म आहे. त्यामुळे डोकं बाजूला ठेवून पाहावी लागेल.
Dune भाग एक पाहिला. १ मार्चला
Dune भाग एक पाहिला. १ मार्चला दुसरा भाग येतो आहे. विचारप्रवर्तक लिखाण आहे.
ओपनहायमर
ओपनहायमर चित्रपटाला या वर्षीच्या बाफ्टा पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि काही सन्मान मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कारांतही भरपूर यश मिळेल असे दिसते. अजूनही पाहिला नसेल तर हीच ती वेळ.
बघणार नाही!
भौतिकशास्त्र न समजणाऱ्या दिग्दर्शकाचा सिनेमा मी बघण्याची शक्यता कमीच आहे. किमान बघण्यासारखे पुरुष आहेत का?
सिनेमा अमेरिकेत 'एन बी सी पीकॉक'वर आला आहे.
लापता लेडीज
खरंतर यावर एक वेगळा धागा लिहायचा होता पण कंटाळा. किरण रावचा लापता लेडीज आज बघितला आणि खूप आवडला. फेमिनिस्ट लेडीजना लगेच आवडेल असा आहेच पण एक गोष्ट म्हणूनही आवडला. मला सगळ्यात आवडलेली व्यक्तिरेखा रवी किशन या भोजपुरी सिनेमांतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्याने केलेली आहे. अतिशय हरामखोर तरीही कुतूहलग्रस्त आणि क्यूट इन्स्पेक्टर आहे तो. तोच सिनेमाचा नायक आहे.
नक्की बघावा असा सिनेमा आहे.
पुअर थिंग्ज खूप आवडला.
पुअर थिंग्ज खूप आवडला.
चांगला हॉरर म्हणून नाव असलेला "द किलिंग ऑफ सेक्रेड डिअर" आधीपासून पहायच्या यादीत होताच. पण गुगल वर समजले की हा योग्रोस लांटिमोस ह्या पुअर थिंग्जच्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. लगेच बघितला.
विचित्र आणि तणावग्रस्त गोष्ट आहे. बघण्यासारखा सिनेमा. अभिनयाग कॉलिन फेरेल, निकोल किडमन आणि बॅरी कोहीगन. फेरेल आवडत्या अभिनेत्यांमध्ये मागेच "In bruges" मधून आला होता, ह्यात त्याने नाव राखले.
सिंपथायजर
ओल्डबॉय, द हँडमेडन आणि डिसीजन टू लीव्ह यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोरियन दिग्दर्शक पार्क चॅन-वूक यांनी एका पुलित्झर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर एक महत्त्वाकांक्षी मालिका The Sympathizer तयार केली आहे (HBO किंवा भारतात Jioवर उपलब्ध). व्हिएतनाम युद्धात अमेरिकन लोकांना हार पत्करावी लागली आणि सायगॉनच्या पतनानंतर पळ काढावा लागला. या काळात हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या एका कम्युनिस्ट डबल एजंटची ही कथा आहे. तिला ब्लॅक कॉमेडी म्हणता येईल, पण ती बऱ्यापैकी गंभीरही होते. गोष्ट अर्थात डबल एजंटभोवती फिरते, पण इतर अनेक व्यक्तिरेखाही लक्षणीय आहेत. रॉबर्ट डाउनी ज्युनियर मालिकेचा निर्माता आहे आणि अनेक अमेरिकन भूमिकांत कहर करतो. (त्यात एक ओरिएंटलिस्ट आणि एक Apocalypse Now सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.) एकंदरीत गुंतागुंतीची आणि महत्त्वाकांक्षी मालिका आहे. ट्रेलर इथे.
सूरज का सातवाँ घोडा
थँक्स @चिंज.
सूरज का सातवाँ घोडा मी आत्ताच पाहिला. खूप आवडला.
कादंबरी शोधली.. छोटेखानी आहे. आवडली. हायलाईट केलेली काही वाक्ये डायलॉग म्हणून जशास तशी वापरली आहेत. पण पहिली आणि शेवटची काही पाने चाळली तेव्हा कादंबरीतला शेवट वेगळा वाटला. खरं तर धर्मवीर भारतींनी ज्या पद्धतीने ते कथानक मांडलं आहे ते मास्टरपीस आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांनी त्याचे तर सोने केले आहे.
ता. क. बेनेगल यांची ही काही दिवसांपूर्वी घेतलेली ही मुलाखतही आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
The God debate
रिचर्ड डॉकिन्स आणि अयान हर्सी अली यांच्यातील चर्चा पाहिली.
अयान हर्सी अली या बाई सोमालियातून पळून नेदरलॅंड्समध्ये आश्रय घेऊन मोठ्या राजकारणी झालेल्या बाई. त्यांचे “Infidel: My Life” हे पुस्तक फार गाजलेले आहे म्हणे.
इस्लाम सोडून दहा-बारा वर्षे नास्तिक होऊन आणि नास्तिक्याचा प्रचार करून त्यांनी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
बाईंचे मुद्दे ऐकून निराशा झाली.
१. खाजगी मानसिक त्रासामुळे धर्माची आवश्यकता वाटली
२. सुंदर संगीत ऐकून किंवा कलाकृती पाहून आपण हेलावतो तसे वाटले. त्याला आव्हान देणे योग्य नाही कारण ते वेगळ्या प्रतलावर असते.
३. Workeism आणि नास्तिक्यामुळे युरोपात नैतिक पोकळी निर्माण झाली आहे आणि इस्लामसारखे वाईट धर्म ती भरून काढत आहेत. त्यांच्याशी लढायला ख्रिश्चन धर्म हवा. Modern secularism आणि moral philosophy हे ख्रिश्चन धर्मातूनच उदयास आले आहेत
इत्यादी गोष्टी बाई बोलल्या आहेत. बाई पक्क्या राजकारणी आहेत असे दिसते.
.
बाई राजकारणी आहेत, किंवा कसे, कल्पना नाही. मात्र, का, कोण जाणे, परंतु, मला (या बाईच नव्हेत — म्हणजे, त्या तर झाल्याच, परंतु) माणसांची ही एकंदर जॉन्रच पहिल्यापासून भंपक वाटत आलेली आहे.
किंवा, आमच्या वुड्डहौससाहेबाच्या भाषेत सांगायचे, तर, It’s like Shakespeare — Sounds great, but does not mean a thing. त्यामुळे, यांचे म्हणणे गंभीरपणे घ्यायचे नसते. घटकाभराची करमणूक, झाले. (If that’s your brand of entertainment, that is.)
शिवाय, Every person, it is said, has his or her price. Well, the price appears to have been met and paid in this case.
अडचण अशी आहे, की, (म्हणजे, ही अडचण आहे, की नाही, खात्री नाही, परंतु, असली तर) या बाई काय, किंवा डॉकिन्स काय, किंवा तुमचे ते सलमान रश्दी (रुश्दी?) काय… ही सर्व मंडळी विचारवंत आहेत, बुद्धिजीवी आहेत, वगैरे वगैरे असे पब्लिक उगाच समजते, नि यांना डोक्यावर घेऊन बसते. These are essentially people in love with the sounds of their own voices; याहून अधिक काही नाही.१ यांना तितपतच भाव द्यायचा असतो. आणि, यांच्या बडबडीने भारावून जायचे नसते. तुम्ही ती चर्चा पाहिलीत; मी त्या भानगडीतदेखील पडलो नाही.
असो चालायचेच.
——————————
१ हा आरोप आमच्यावरदेखील केला जाऊ शकतो, याची आम्हाला कल्पना आहे. फरक इतकाच आहे, की हा आरोप आम्हाला सहर्ष मान्य आहे. Of course I am in love with the sound of my own voice — आम्ही हे आनंदाने कबूल करतो. किंबहुना, त्याहीपुढे जाऊन, It takes one to know one, असेही विनम्रपणे सुचवू इच्छितो. असो.
रिलिजन
माणसांना स्वतःचा विचार स्वत: करण्याची मेथॉडिकल सवय लावण्यात आधुनिक चर्चेसचा मोठा हातभार आहे हे विसरून चालत नाही. पोप सारख्या कर्मठ अधिकारी जागांनी आधुनिक मूल्ये स्वीकार करायला हळू हळू सुरुवात केली आहे. चर्चंतर्गत होणाऱ्या लैंगिक शोषणविरुद्ध कारवाया करतात. सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा नॉन ह्यूमन इंटेलिजन्स या नवीन मूल्यांना आता चर्चेस सुद्धा नाकारत नाहीत.
इस्लाम मुस्लिमांसाठी थोडाफार सुसह्य आणि परधर्मियांसाठी कर्दनकाळ आहे हे हिचन्स सारख्या लोकांनी वारंवार मांडले आहे.
इस्लामच्या अतिरेकी आक्रमणांना विरोध म्हणून पश्चिमेत रिएक्शनरी ख्रिश्चन धर्मानुनय वाढत आहे.
स्वीडन मधे बहुतेक नव मुस्लिम प्रजा शरिया कायद्याला प्राधान्य द्यायला कचरत नाही. तेव्हा असे आधुनिक क्रुसेडर तयार होणे स्वाभाविक वाटले.
"देव नाही ऐसे मनी, पण आधुनिक ख्रिश्चन धर्म जनी" असे खूप जण करत आहेत.
इतकेच का जर्मनीच्या होऊ घातलेल्या नव्या अति उजव्या चॅन्सेलर Alice Weidel बाई या उघड उघड समलिंगी आहेत (कर्मठ ख्रिश्चन सुद्धा हे नजरअंदाज करतात) तरीदेखील त्यांचा टोकाचा इस्लामोफोबिया लोकांना जास्त आवडतो.
लोकांना परंपरा आणि रिचुअल आवडतात आणि कोणतेही नास्तिक लोक नवीन परंपरा आणि rituals तयार करत नाहीत, पर्याय देत नाहीत त्यामुळे नास्तिक्य अशक्य बोअरिंग गोष्ट आहे. हे मूर्ख नास्तिकांना कधीच लक्षात येत नाही इतके ते स्वतःच्या rebelious पणाच्या प्रेमात पडलेले असतात.
मूर्ख नास्तिक
बहुसंख्य लोक करतील ते करत नसलेले सगळेच अल्पसंख्य मूर्ख असण्याच्या जमान्यात नास्तिक मूर्ख असण्यात काय आश्चर्य?
पण सगळे नास्तिक मूर्ख नसतात. रिचर्ड डॉकिन्सछाप लोक मूर्ख असतात फक्त; कारण त्यांच्या डोक्यात "It's easier to fool people than convincing them that they have been fooled" हे वाक्य शिरत नाही.
त्याउलट भक्तांचा यथेच्छ फायदा उचलणारे बाबा-बुवा, नारायण नागबळी वगैरे काहीही करायला लावून लुटणारे भटुरडे, वाट्टेल ते फतवे काढून आणि न पाहिलेल्या जन्नतच्या गोष्टी सांगून लाखो लोकांच्या आयुष्याचा नरक करणारे मुल्ले, लोकांना लुबाडून प्रायव्हेट जेटने फिरणारे आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारे पाद्री वगैरे लोक खरे चतुर नास्तिक असतात.
निमित्ताला टेकलेले
साधारण वर्षापूर्वी न्यू यॉर्क टाईम्समधल्या एकानं 'ओपिनियन'मध्ये तिच्या धर्मबदलाबद्दल लिहिलं होतं. (दुवा)
तिनं धर्म बदलला, तिला धर्माची गरज आहे म्हणून नास्तिक लोक कसे चुकले आहेत, अशा छापाची विधानं होती, बहुतेक. शिवाय म्हणून ख्रिश्चन धर्म थोर असल्याचा दावाही होता, बहुतेक. रॉस डूदॅटचं लेखन मी फार वाचू शकत नाही, ५०० शब्द असतील तरीही पहिल्या ५० शब्दांत माझं लक्ष विचलित होतं. त्याचं लेखन आहे हे न बघता पान उघडलं तरीही हेच होतं.
म्हणून रिचर्ड डॉकिन्सचा व्हिडिओ उघडण्याची हिंमत नाही. खूप तिखट लागलं म्हणून साखरेचा डबा तोंडात उपडा करता येत नाही!
१९३०-१९६० चे चित्रपट
माझं चित्रपट पहाणे फार कमी आहे. मी बरेच जुने चित्रपट पाहिलेले नव्हते. पण अलिकडे काळाचा मागोवा घेण्यासाठी १९३०-१९६० दरम्यानचे प्रसिद्ध मुकपट आणि बोलपट(टॉकी) झरझर डोळ्याखालून घालतोय. गेल्या काही दिवसात मी १९३६ चा देवदास, १९३७ चा व्हि. शांतारामचा, नारायण हरी आपटेंच्या कथेवर आधारीत मराठी चित्रपट कुंकू, दो भिगा जमीन (चित्रपट १९५३ चा पण कथा आहे १९१४ मधली रविंद्रनातथ टागोरांची), अशोक कुमारचा परिणिता (१९५३ चा सिनेमा आहे पण शरदचंद्र चट्टोपाध्यायांची कादंबरी १९१४ ची आहे), १९५३ चा देवानंदचा टॅक्सी ड्रायव्हर, १९५७ चा मदर इंडिया इ. चित्रपट पाहिले. दोन महिन्यापूर्वी मी इंडिया आफ्टर इंडिपेन्डन्स हे पुस्तक वाचलं होतं. चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालिन अर्थकारण, समाजकारण, स्थल (उदा. मुंबई, कोलकात, दिल्ली वा खेडेगावं) याचे संदर्भ किती लागतायत ते शोधतोय. हे विकिपेज ज्यात त्या त्या वर्षातल्या हिट चित्रपटांच्या नोंदी आहेत.
१९१०-१९४० च्या दरम्यान गावी शेतमजूरी करून दिवसाला १ ते २ रुपये मिळत होते. शहरात आलात तर दिवसाकाठी ३ ते ५ रुपये कमाई असायची (जवळ जवळ दुप्पट). म्हणजे साधारण ६०-९० रुपये महिन्या काठी. त्यामुळे २० व्या शतकात शहराकडे स्थलांतर करण्यामागे हे अर्थकारण असावे. जे अर्थात आजही आहे.
दो भिगा जमीन (१९१४ ची कादंबरि, १९५३ चा चित्रपट) मध्ये रविंद्रनाथ टागोरांनी जो शंभू (बलराज सहानी) रंगवला आहे तो २६५ रुपयाच्या कर्जफेडीसाठी कोलकता शहरात जाऊन माणसाने ओढायची टॅक्सी चालवतो. तरीही सावकाराचं कर्ज फेडू शकत नाही. सावकारी आणि जमिनदारीची झळ मदर इंडियातूनही (१९५७) दिसते. तर दुसरीकडे शरदचंद्र चट्टोपाध्यायांचा देवदास (१९१७ ची कादंबरी, १९३६ चा सिनेमा) मात्र त्याच काळात ८०० रुपयाच्या आंगठीला चुन्नीलालला १००० रुपये देऊन मोकळा होतो आणि कुंकू (१९३७ चा मराठी चित्र्पट) मधला वाया गेलेला मुलगा बापाकडे २०० रुपयाची मनिऑर्डर मागतो. थोडक्यात जमिनदार, वकिली पेशा करणारे आणि सरकारी नोकरीवर मोठ्या हुद्द्यावर असणारी लोकं श्रीमंत होती.
देवदास आणि कुंकू मध्ये म्हातार्याने विशीतल्या मुलीशी लग्न करणं त्या काळात कॉमन होतं ते पण कळतं. (म्हातारा न इतुका अवघे पाउणशे वयोमान) त्यामुळे हरी नारायण आपटेंची कुंकू ही कथा काळाची कितीतरी पुढे होती असे म्हणता येईल.
देवदास मध्ये रेल्वेटेशनवरून पारोच्या गावी जायला बैलगाडीला २ दिवस लागतात. कुंकू मध्ये त्याकाळातली सर्व्हिस मोटार दिसते. एकंदर ट्रेन-सर्व्हीस मोटारी असल्या तरी प्रवास किती किचटक असावा याची कल्पना येते. त्यामुळे १८५६ मधल्या विष्णूपंत गोडसेंच्या "माझा प्रवास" या मराठीतल्या पहिल्या प्रवास वर्णनाची वाचून फक्त कल्पना करता येते. (यात पण श्रीवर्धन ते पुणे प्रवास दोन ते तीन दिवसांचा आहे तोही बैलगाडीचा)
१९५३ चा देवानंदचा टॅक्सीड्रायव्हर कुणी पाहिला नसेल तर जरूर पहा. इरॉस सिनेमा समोरच चर्चगेट दिसते, चर्निरोड वरून जाणारी लोकल ट्रेन दिसते, शेव्हरले कंपनीच्या टॅक्सी दिसतात. यात पण नायिका बेबी सिटींगसाठी राहून, खाऊन ७० रुपये पगाराची नोकरी करायला तयार होते.
१९५१ च्या काळात भारतात केवळ ९,३०,००० लोखंडाचे नांगर होते तर लाकडी नांगर जवळ जवळ ३१ मिलिअन होते. अन्नधान्य आपण आयात करत होतो. यावरून शेतीचा अंदाज घेता येतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या इन्फ्रामध्ये गुंतवणूक करणे गरजचे होते. १९५७ च्या मदर इंडियामध्ये त्याची झलक दिसते. मोठे कालवे करताना वापरली जाणारी जेसीपी सारखी यंत्रे दिसतात. भारताचा शेतीमधला वृद्धीदर ३% होता, जो आजच्या तुलनेत कमी वाटतो. पण गेल्या पूर्ण एक शतकातल्या मानाने (कलोनिअल पिरिअड) तो खूप चांगला होता. शिवाय जपान आणि चीनलाही शेतीमध्ये सुधारणा केल्यावर केल्यानंतर २.५% पेक्षा कमी वृद्धीदर गाठता आला होता.
धागा शोधून दिल्याबद्दल
अनेक आभार!
काय पाहिलं आणि काय ऐकलं?…
काय पाहिलं आणि काय ऐकलं? या सदरात:
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रश्नोत्तरे,चॅटिंग वा तिचा वापर करून, मदत घेऊन चित्रं बनवणं जुनं झालं. आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संगीत आणि व्हिडिओ बनवणे रूढ होत आहे. अनेक गाणी AI वापरून बनत आहेत.
उदा. खाली काही गाणी लिंकवत आहे.
https://youtu.be/rp9f0b3QQ9M
https://youtu.be/Hn4dK1IUPeE
https://youtu.be/B0ciSE3-w1M
शेवटची चुकीची लिंक दिल्येय…
शेवटची चुकीची लिंक दिल्येय का? मी ती पाहीली पण त्यात काही ए.आय. वापरून केल्याचा उल्लेख नाहीये.
व्हिडीओवर हा उल्लेख आहे;
"Altered or synthetic content
Sound or visuals were significantly edited or digitally generated. Learn more"
पण असं संस्करण म्हणजे ए.आय. नव्हे. डीजीटल अल्टरिंगसाठी भलेही ए.आय. बेस्ड प्रणाली वापरली असेल. तात्यानू, ह्या म्हणजे 'एअर फ्रायर' वापरून बांगडो भाजलेलो आसा. माका वाटला मुळात कायतरी 'बांग्देली' सारको काय नवो मासा ए.आय. वापरून केलेलो आसा :-)
आवशीचो घो त्या ए.आय. च्या - परवा मी त्येका "कापूसकोंड्याची गोष्ट सांग " म्हंटल्यावर मायझवो माका इचारतंय "कापूसकोंडा कोण होता? तो एक व्यक्ती होता की काहीतरी वेगळे?" !!!!
"Altered or synthetic…
"Altered or synthetic content
Sound or visuals were significantly edited or digitally generated. Learn more"
असे जाहीर करणे हे AI जनरेटेड कंन्टेन्ट ब्रॉडकास्ट करताना अपेक्षित असते. सर्वजण करतातच असे नाही. त्या गाण्यांचे शब्द लिहिण्यात AI ची मदत घेतली असली नसली हा वेगळा विषय पण संगीत AI ने बनवले आहे. सूचना देऊन बनवून घेणे आता शक्य आहे. सोरा (ओपन AI) ने तर आता व्हीडियो पण बनवणे शक्य केले आहे. तूर्त क्लिप्स पाच सेकंद लांबीच्या आहेत. पण वाढतील.
प्रकाटाआ
प्र का टा आ.
गल्ली चुकलं.
मूलभूत प्रश्न
मला जर काही पाहायचे असेल, तर त्याकरिता मी अलीकडे कशाला जाईन?
(तसेही, अली कोण?)
The Bear