व्हिट्टोरियो डि सिक्का दिग्दर्शित 'बायसिकल् थीव्हज्'

Italy/1949/B&W/90’ Dir: Vittoriao De Sicca

विसाव्या शतकातील महायुद्धाच्या काळात (व नंतरही) चित्रपटसृष्टी पूर्णपणे सामान्य प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठीच राबत होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच त्याकाळचे चित्रपट भव्य, दिव्य, ट्रिक् सीन्सचे झगमगाट असलेले, प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे, काही वेळा सुखद धक्का देणारे, काही वेळा खदखदून हसविणारे, डोळे भरून रडविणारे, अंगावर काटा आणणारे, असे भरगच्च मालमसाल्यानी भरलेले असायचे. त्याकाळचे चित्रपट ग्रीक-रोमन ऐतिहासिक कथा, पुराणकथा, बायबलसारख्या धर्मग्रंथातील मिथके, गाजलेल्या कथा कादंबऱ्यावरील पटकथा असलेले, चॉकलेट हीरो व तथाकथित सौंदर्यसम्राज्ञीच्या रोमॅंटिक प्रसंगानी मनोरंजन करणारे, युद्धाचे, राष्ट्रभक्तीचे उदात्तीकरण करणारे, प्रेक्षकांच्या भावनांना उद्दीप्त करणारे असे होते. मात्र प्रेक्षक आपली दुःखं विसरण्यासाठी थिएटरमध्ये खिशातील पैसे खर्च करून येतात यावर एकूण एक सर्व चित्रपट निर्मात्यांचे एकमत होते. भव्य सेट्स, दृष्यवैभवानी नटलेले, लक्ष वेधून घेणारे, मन विचलित न करू देणारे कथानक इत्यादीमुळे प्रेक्षकांना (व त्याकाळच्या समीक्षकांनासुद्धा!) चित्रपट हा एक गल्लाभरू, झटपट पैसा कमविणारा व्यवसाय असे वाटत असल्यास नवल नाही. जरी चित्रपटात संगीत, नाट्य, नृत्य इत्यादी कला प्रकार असले तरी चित्रपट हा एक आगळा वेगळा (तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला) कलाप्रकार आहे असे मानण्यास कुणीही धजावत नव्हते. ( व आजही नाही.) अमेरिका, इटली, फ्रान्स इत्यादी देशामध्ये रतीब टाकल्यासारखे गल्लाभरू चित्रपटांची निर्मिती होत होती. चित्रपट हा एक कलाप्रकार असू शकतो याची पुसटशी जाणही त्याकाळात नव्हती. (काही तुरळक अपवाद वगळता 1960-70 पर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीलासुद्धा ही जाण नव्हती.)

इटलीतील मुसलोनीच्या कालखंडात त्या देशात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चित्रपट निघत होते. फॅसिस्ट वातावरणात कलेचा दर्जा असलेले चित्रपट तयार होणे अशक्यातलीच गोष्ट होती. तरीसुद्धा 1945च्या सुमारास चित्रपटसृष्टीला अपरिचित असलेल्या (व नंतरच्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर चढलेल्या) रॉबर्टो रोसलिनी या इटॅलियन दिग्दर्शकाचे दि ओपन सिटी हे चित्रपट साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. युद्धाच्या भीषणतेचे अत्यंत प्रभावीपणे चित्रण या चित्रपटात केले होते. कुठल्याही प्रसंगाचे उदात्तीकरण न केलेला हा चित्रपट वास्तवाशी जवळचे नाती सांगणारा चित्रपट होता. मानवता, जगण्याची आस या चित्रपटाचे मुख्य अंश होते. पुढील कालखंडात आलेल्या नववास्तव (Neo-realistic) चित्रपटांची मुहूर्तमेढ या चित्रपटाने केली.
रोसलिनीबरोबरच उदयास आलेला व शूशाइन, बायसिकल् थीव्हज्, मिरॅकल् इन् मिलान_ अशा अत्यंत नावाजलेल्या कलापूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारा व्हिट्टोरियो डि सिक्का हे नाव आपण कधीच विसरू शकत नाही. चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच पटकथाकार व नट म्हणूनसुद्धा त्याची ख्याती होती. शूशाइनमध्ये बूट पॉलिश करून जगणाऱ्या रस्त्यावर वाढलेल्या व नंतरच्या आयुष्यात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलावरील चित्रपट होता. घरदार नसलेल्या व थंडीवाऱ्यात कसेबसे जीवन जगणाऱ्यावर क्रूर अधिकारी सत्ता कसे गाजवितात याचे चित्रण मिरॅकल् इन् मिलान या चित्रपटात होता. चित्रपटाचा शेवट मात्र त्या गावात चमत्कार घडून सत्तेत असलेल्यांची कशी जिरली या प्रसंगाने होते. व्हिट्टोरियो डि सिक्काचा अत्यंत गाजलेला कलापूर्ण व वास्तववादी म्हणून वाखाणलेला चित्रपट म्हणजे बायसिकल् थीव्हज्.

या चित्रपटाची कथा अशी आहेः

नुकतेच दुसरे महायुद्ध युद्ध संपले आहे. देशाचा नाश होऊन जिणे दारुण होत आहे. सामान्यांना रोजगार नाही. जिवंत राहण्यासाठी कुठलाही उद्योग, मोल मजूरी चालेल अशी परिस्थिती आहे. पोटा-पाण्याला उद्योग हवा म्हणून थट्टे कट्टे पुरुष वणवण फिरत आहेत. या असंख्यात लोकांपैकी अण्टोनियोसुद्धा आहे. रोम जवळच्या एका बकाल उपनगरात अण्टोनियो, त्याची पत्नी मारियो, ८-९ वर्षाचा त्याचा मुलगा, ब्रुनो व एक लहान बाळ रहात असतात. अण्टोनियो बेकार असतो. त्याला नोकरीची नितातं गरज असते. कुठेही उद्योगावकाश नाही. त्या शहरातील कौन्सिल (म्युनिसिपालिटी) जुजबी रोजगार देत असते. त्यासाठीसुद्धा बेकारांची एम्प्लॉयमेंट एक्सचेजसमोर झुंबड. रोजगार देत असतानासुद्धा काही अटींची पूर्तता करावी अशी अपेक्षा असते. बांधकाम मजूर असल्यास, त्याची तयारी असली तरी, दुसऱ्या प्रकारचा रोजगार दिला जात नाही. तेथील प्रशासन नवीन कामं काढत नाही. कामगार युनियन प्रयत्नशील असूनसुद्धा उपयोग नाही.

photo 1

कामाच्या शोधात असलेला अण्टोनियो त्या दिवशी एम्प्लॉयमेंट एक्सचेजच्या ऑफिसजवळ बसलेला असतो. त्याचा मित्र पळत पळत येऊन तुला बोलवत आहेत अशी बातमी देतो. कौन्सिल (म्युनिसिपालिटी) तर्फे अण्टोनियोला भिंतीवर पोस्टर्स चिकटविण्याचे काम दिलेले असते. या कामासाठी स्वतःची सायकल असणे ही अट असते. परंतु मुलं-बाळ व बायको उपाशी पडतील म्हणून काही दिवसापूर्वी त्यानी स्वतःची सायकल गहाण ठेवलेली असते. तरीसुद्धा ते काम तो स्वीकारतो. घरी त्याची पत्नी मारिया पाणी भरत असती. पतीच्या चेहऱ्याकडे बघून तिने विचारपूस केल्यावर आपल्याला नोकरी लागलेली परंतु सायकल नसल्यामुळे तो करू शकत नाही अशी कबूली देतो. बायको लग्नाच्या वेळी भेट म्हणून मिळालेले व इतर काही कपडे गहाण टाकून गहाण ठेवलेली सायकल परत आणून अण्टोनियोच्या हातात देते. खांद्यावर सायकल घेऊनच तो कौन्सिलच्या ऑफिसला जातो. दुसऱ्या दिवसापासून कामावर हजर राहण्यासाठी सकाळी साडेसातला येऊन शिडी, पोस्टर्स, खळ इत्यादी वस्तु घेऊन जाण्यास सांगितले जाते. मारिया पतीचे ऑफिस बघण्यासाठी आलेली असते.तेथून परत घेऊन जात असताना मारियाला भविष्य वर्तविणाऱ्या एका बाईला भेटायचे असते. कारण तिने तुझ्या नवऱ्याला लवकरच रोजगार मिळेल असे भविष्य सांगितलेले असते. अण्टोनियो हे किती भंपक आहे हे सांगत असतो. रात्री त्याचा मुलगा, ब्रुनो सायकल साफ करतो. त्याला नोकरी लागल्यामुळे घरभर उत्साहाचे वातावरण असते.

दुसऱ्या दिवशी तो पेट्रोल पंपावर जुजबी काम करत असलेल्या ब्रुनोबरोबर पोस्टर चिकटविण्याच्या कामाला सायकलीवरून जातो. वाटेत ब्रुनोला पंपावर सोडून तो तेथील भितीला सायकल टेकवून शिडीवर चढून पोस्टर चिकटवित असतो. तितक्यात एक भुरटा चोर त्याची सायकल पळवितो. तो पळून जाताना पाठलाग करूनही तो सापडत नाही. त्या चोराची गँग त्याची दिशाभूल करते. गर्दीचा फायदा घेऊन चोर निसटतो. गर्दीतील लोकसुद्धा चोराला पकडण्यासाठी त्याच्या मदतीला येत नाहीत. अण्टोनियो पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यास जातो. पोलीस सायकल परत मिळवून देण्यास असमर्थता प्रकट करतात व तूच ते शोधून काढण्याचा सल्ला देतात. अण्टोनियो निराश होऊन मित्राकडे मदतीसाठी जातो ब्रुनो, अण्टोनियो व त्याचे अनेक मित्र बाजारात सायकलीच्या शोधात फिरतात. सायकलीचे सुटे भाग करून विकण्याची शक्यता असते. सकाळी सकाळी चोरीचा माल तेथील बाजारात मिळेल असे कुणीतरी सांगितल्यामुळे ते तिथे जातात. त्यामुळे ब्रुनो सायकलीचे बेल व पंप याचा शोध घेतो. बाकीचे इतर सायकलीच्या पार्टच्या शोधात असतात. परंतु हाती काही लागत नाही. पाऊस येत असतो. सगळे ओलेचिंब होतात. तरी सायकलीसाठी प्रयत्न करत असतात. त्यांना तेथे सायकलीचे रीम साफ करणारा एक जण दिसतो. रजिस्टर्ड नंबर दाखविण्यास आढेवेढे गेतो. शेवटी पोलीसाकडून चौकशी होते. परंतु त्याचा रजिस्टर्ड नंबर वेगळा असल्यामुळे ते निराश होतात.

पुन्हा एकदा बाप व मुलगा सायकलीच्या शोधात निघतात. ब्रुनो व अण्टोनियोला तेथे एक म्हातारा चोराशी बोलत असलेला दिसतो. चोर सायकलीवरून पळून जातो. अण्टोनियो व ब्रुनो त्या म्हाताऱ्याच्या शोधाला लागतात. म्हातारा ‘मला काहीच माहित नाही.’ असे सांगत नाहिसा होतो. हे दोघेही त्याचा शोध घेत असताना चर्चतर्फे चालविलेल्या एका मदत केंद्रात म्हातारा जाताना दिसतो. ते पाठलाग करत त्या केंद्रात जातात. जंग जंग पछाडले तरी म्हातारा दाद देत नाही. चर्चमध्ये प्रेयर चालविणारे स्वयंसेवक म्हाताऱ्यासकट या बाप-मुलाला हाकलून देतात. म्हातारा एक पत्ता देऊन निसटतो. तो पत्ता एका वेश्यागृहाचा असतो. अण्टोनियो घरात घुसून चोराला शोधत असतो. तेथील बायका आरडा ओरडा करू लागतात. तो माणूस सापडतो व त्त्याचा पाठलाग करत तो रहात असलेल्या गल्लीत जातो. तेथे तर चोराच्या घरचे तो किती साळसूद आहे अशीच भाषा करतात. अण्टोनियो त्याची मानगुट पकडून हमरी तुमरीवर येतो. परंतु नेमके त्याच वेळी चोराला फिट्स येतात. सगळे जण त्याच्या भोवती जमतात व अण्टोनियोशी भांडू लागतात. ब्रुनो तेथून हळूच निसटून एका पोलीसाला घेऊन येतो. घराची झडती घेतल्यानंतर तेथे काहीही सापडत नाही. पोलीस यानीच सायकल चोरली हे कशावरून व काही साक्षी पुरावे आहेत का अशी उलट तपासणी घेतो. शेवटी वैतगून बाप-लेक तिथून निघतात.

वाटेत ब्रुनो काही तरी बोलल्यामुळे अण्टोनियो चिडून त्याच्या थोबाडीत मारतो. ब्रुनो चिडतो. अण्टोनियोला मारल्याबद्दल फार वाईट वाटते. ब्रुनोला एका ब्रिजजवळ थांबायला सांगून तो पुन्हा कुठे तरी आपली सायकल मिळेल का याचा शोध घेण्यासाठी पुढे जातो. तेथे लोकांचा आरडा ओरडा ऐकून नदीकाठी जातो. एक मुलगा नदीत पडलेला असतो. आपलाच मुलगा नदीत पडला असे वाटून अण्टोनियोचा जीव घाबरा घुबरा होतो. ब्रुनोला पाहिल्यावर जीव भांड्यात पडतो. मृत्यु काय असते याची कल्पना तो करू शकतो.

दोघांनाही प्रचंड भूक लागलेली असते. हॉटेलमध्ये खात असताना आपल्याला किती पगार हवा याचा हिशोब दोघेही करतात. अण्टोनियो मनाशी काही तरी ठरवून बाहेर पडतो. काही तरी चमत्कार घडून आपली सायकल नक्कीच सापडेल असे त्याला वाटू लागते. वाटेत दोघेही भविष्य सांगणाऱ्या त्या बाईकडे जातात. ती काहीबाही सांगून त्यांना कटवते.

बाब-लेक एका फुटबॉल स्टेडियमपाशी पोचतात. फुटबॉल स्टेडियमवर मॅच चाललेली असते. ढिगाने तेथे सायकली लावलेले असतात. अण्टोनियोच्या मनात घालमेल चालू होते. तेथेच एका बिल्डिंगपाशी एक सायकल त्याला दिसते. काय करावे हे सुचेनासे होते. शेवटी मनाची ठिय्या करून सायकल चोरतो व टांग मारून पुढे जातो. तितक्यात सायकलीचा मालक आरडा ओरडा करत त्याचा पाठलाग करतो. वाटेत भरपूर लोक त्याचा पाठलाग करून पकडतात व मारतात. ब्रुनो रडतच बापाचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. बापाचा रडवेला चेहरा पाहवेना. तितक्यात एक मध्यस्थ येऊन पोलीसाच्या ताब्यात त्याला न देता तसेच सोडून देतो. ब्रुनो व अण्टोनियो पुढे जाऊ लागतात व गर्दीत मिसळून जातात. .... व चित्रपट संपतो.

परिस्थितीच्या रेट्यामुळे सामान्य माणसाचे काय होऊ शकते याचे एक सुंदर, नैज चित्रण आपल्याला या चित्रपटात बघायला मिळते. चित्रपटाच्या मुख्य पात्रासाठी त्याकाळच्या एखाद्या प्रसिद्ध नटाला घ्यायचा विचार डी सिक्काच्या मनात आला होता. शेवटी तो आपल्या ओळखीच्या अभिनयाचा गंध नसलेल्या एका कामगाराला हा रोल देऊन मनासारखे काम करून घेतो. ब्रुनोच्या कॅरेक्टरसाठी रस्त्यावरील मुलाला घेऊन त्यांच्याकडून काम करून घेतो. यातील बहुतेक कॅरेक्टर्स निजी जीवनातील असून दिग्दर्शनाच्या कौशल्यातून त्यानी त्या सर्वांकडून सहज अभिनय करून घेतला. सर्व शूटिंग्स प्रत्यक्ष शहरभरातील रस्त्यावर, बाजारात, पुलाखाली व भर पावसात केलेले असल्यामुळे तेथील सर्व प्रसंग खरेखुरे वाटतात. वास्तवाशी इतकी जवळीक तोपर्यंत कुणी चित्रित केली नव्हती. चित्रपटाच्या प्रसंगात प्रेक्षकांचाच सहभाग असल्यामुळे चित्रपट जास्त परिणामकारक व प्रभावी झाला आहे. चित्रपटाचा अनुभवच प्रेक्षकांचा अनुभव असे वाटू लागतो.

तसे पाहिल्यास चित्रपटाची कथा अगदी साधी व सरळ. परंतु हा साधेपणा केवळ भोळेपणातून वा अज्ञानातून आलेला आहे असे समजण्याचे कारण नाही. ही कथा फक्त अण्टोनियोची नसून ती त्याच्या कुटुंबाची आहे; त्याच्या वर्गाची आहे; व युद्धामुळे वाताहत झालेल्या समाजाचीसुद्धा आहे. अण्टोनियोवर कोसळलेल्या प्रत्येक प्रसंगातून त्याचा भोळा स्वभाव, जगाचे छक्केपंजे माहित नसणे, भावनाविवशता, अगतिकता, हतबलता, प्रेम, राग इत्यादी सर्व गोष्टी अधोरेखित होतात. चित्रपटातून व्यक्त होणारी सामाजिक जाणीव, सामान्यांच्या रोजच्या जगण्यासाठी होत असलेली ससेहोलपट व त्याबद्दलची कळकळ हे उठून दिसतात. चित्रपटाची ही कलात्मक अभिव्यक्ती त्याची कथा व बंदिस्तपणातून आलेली आहे हे लक्षात येते. सर्वात महत्वाचे म्हणजे कष्टमय जीवनातील सर्व बारकावे छोट्या ब्रुनोच्या दृष्टीतून बघण्यास लावल्यामुळे मानवीयता, संवेदना, सहानुभूती म्हणजे नेमके काय असतात याबद्दल प्रेक्षक विचार करू लागतो व हेच या चित्रपटाचे यश आहे. कदाचित अशा प्रकारच्या नववास्तववादी चित्रपटांनी चित्रपट व्यवसायाला कलाटणी दिली असे म्हणावेसे वाटते.
या चित्रपटाने अनेक होतकरू फिल्ममेकर्संना प्रभावित केले. त्यापैकी सत्यजित रॉयसुद्धा आहेत. त्यांनी पथेरपांचाली या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा लिहिलेली होती. त्यांनासुद्धा हा चित्रपट जास्तीत जास्त वास्तविक होण्यासाठी स्टुडियोमध्ये चित्रित न करता प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन करावेसे वाटत होते. परंतु त्यांचे सर्व मित्र व हितचिंतक त्यांना वेड्यात काढतात. 1950मध्ये जाहिरात कंपनीच्या कामासाठी म्हणून सत्यजित रॉय व त्यांची पत्नी सोळा दिवसाचा बोटीचा प्रवास करून लंडनला जातात. जाताना त्यांनी लंडनमध्ये बघण्यासाठी शंभरेक चित्रपटांची यादी केलेली असते. त्यात डी सिक्का यांचे बायसिकल् थीव्ह्जसुद्धा होती. या चित्रपटांनी वास्तववादी चित्रपटाची निर्मिती करण्याच्या त्यांच्या स्वप्नाला पुष्टी देते. व भारतात परतल्यानंतर वास्तवस्पर्शी चित्रपट काढण्याची ते तयारी करतात. नंतरचा त्याचा प्रवास सर्वश्रुत आहे.

1974साली वयाच्या 71व्या वर्षी पॅरिस येथे कर्करोगामुळे डी सिक्काचा मृत्यु होतो.

हा चित्रपट पहाण्यासाठी येथे क्लिक करावेः
https://www.youtube.com/watch?v=wpj52n7onK4

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा चित्रपट कायम संग्रही ठेवावा असाच आहे. हा भारतात दाखवला त्यास सुमारास आम्ही युकिवारीसो( Yukiwariso 1939?) हा जपानी अप्रतिम चित्रपटही पाहिला होता. तो मात्र आता कुठे उपलब्ध दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज पाहिला हा चित्रपट. त्यातल्या एका प्रसंगातून काही उलगडा झाला. गेल्या काही महिन्यापूर्वी मी डिकन्सचे क्रिसमस कॅरल (१८४३) वाचले होते. त्यात एका प्रसंगात एक स्त्री चोरी केलेले बेडशीट्स, पडदे चोरबाजारातल्या एका दुकानात विकायला घेवून येते असे वाचले, तेव्हा बेडशीट सारख्या गोष्टीत चोरण्यासारखे काय आहे असे वाटले होते. पण हा चित्रपट तर त्याहून १०० वर्ष लोटल्यानंतरचा आहे. चित्रपटातल्या स्त्रीला ६ बेडशीट्स चे ७५०० इटालिअन लिरा (बिंगच्या ए.आय.उत्तरानुसार आजचे जवळ जवळ २००-२२५ डॉलर्स) मिळतात. भूतकाळात आजच्या काही शुल्लक गोष्टींनाही किती मूल्य होते याची जाणीव या निमित्ताने झाली. अजून एक, एकंदर त्या काळात लोकं प्रवास कसा करत होती हे ही या चित्रपटातून कळते. बेडशीट विकून मिळालेल्या पैशातले ६१०० लिरा गहाण टाकलेली सायकल सोडवायला लागतात. आणि त्याला जो कामाचा मोबदला मिळणार असतो तो ६००० + बोनस + इतर सुविधा दर दोन महिन्यांनी मिळणार असतात. त्यामुळे सायकल पण २ महिन्याच्या पगाराइतकी महाग होती. सध्या वाचत असलेल्या पिकेटीच्या कॅपिटल इन २१ सेन्च्युरी मध्ये सुद्धा सायकलीची तुलना सरासरी उत्पन्नाबरोबर केली आहे. १८८० मध्ये साध्यात साध्या सायकलची किंमत साधारण कामगाराच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या ६ पट होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0