कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग १

कॉस्मिक सेन्सॉराशिप
भाग -१
ccccccccccccccccccccccccccccccccccccccc
‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.
““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते.
शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल अकरा दिवस बेशुद्धावस्थेत इस्पितळात पडून होते. सगळ्यांनीच आशा सोडून दिली होती. पण कोमातून ते सही सलामत परत आले. दोन शस्त्रक्रिया झाल्यावर ते चालायला लागले होते. कुबड्यांच्या मदतीने का होईना पण ते चालायला लागले.. सहा महिन्यानंतर ते आज प्रथम प्रयोगशाळेत आले होते.
“स्वागत आहे, शास्त्रीजी. कशी आहे तब्येत? डॉक्टरांनी फिरायची परवानगी दिली का?” डॉक्टर करमरकरांनी डॉक्टर शास्त्रींचे स्वागत केले. डॉक्टर शास्त्रींच्या पुनरागमनाने त्यांच्या अस्वस्थ मनाला किती दिवसांनी आज जरा दिलासा मिळाला.
त्याला कारण ही तसेच होते.
“भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” ही संकल्पना जरी त्यांची होती तरी ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या कामी त्यांच्या सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. पंकज, धुरी आणि शास्त्री हे त्यांचे सहकारी त्यांच्या बरोबर नसते तर? एकटा माणूस कुठे कुठे पुरणार? ते बिचारे रात्रंदिवस त्यांच्या बरोबर राबले. खांद्याला खांदा लाऊन त्यांनी काम निभाऊन नेले. करमरकरांना त्या तणावपूर्ण रात्री आठवल्या. कॉफीचे प्याले रिचवत केलेल्या चर्चा आठवल्या.
पंकज! पंकज म्हणजे उत्साहाचे उधाण होते. डॉक्टर करमरकरांनी जी दोन समीकरणे आतापर्यंत सिद्ध केली होती त्यातील दुसरे समीकरण केवळ पंकजमुळे सिद्ध करणे शक्य झाले होते.
“सर, तुम्ही ह्यावर शोधनिबंध का नाही प्रसिद्ध करत?” पंकजने त्यांना विचारले होते.
“पंकज, हा चार समीकरणाचा संच आहे. आपल्याला केवळ दोनच माहिती झाली आहेत. ही चार समीकरणे एकत्रितपणे सोडवायची आहेत. जेव्हा आपण तो टप्पा गाठू तेव्हा आपल्याला पुढचा मार्ग दिसेल. कदाचित दिसणारही नाही. ह्या क्षणी हे संशोधन अपरिपक्व आहे. म्हणून मी प्रसिद्ध करायचे टाळतो आहे.” करमरकरांनी आपली भूमिका मांडली.
“सर, आपण ही दोन समीकरणं जगातील वैज्ञानिकांसमोर मांडली तर कदाचित कुणीतरी कुठेतरी हे संशोधन पुढे नेईल. ह्यात मानवजातीचा फायदा आहे. अस मला वाटत.” पंकजने नम्रपणे आपली भूमिका मांडली.
हा विषय तिथेच संपला.
दुसऱ्या दिवशी पंकज ऑफिसला आला नाही. त्याचा फोनही आला नाही. हे पहिल्यांदाच होत होते. असेल काही काम म्हणून डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
तिसऱ्या दिवशीही पंकज ऑफिसला आला नाही.
ऑफिसातून घरी जाताना डॉक्टर पंकजला भेटायला त्याच्या घरी गेले. पंकज सोफ्यावर बसला होता. डॉक्टरांना पाहताच त्याने उठून डॉक्टरांना मिठी मारली.
“अरे रामप्रशाद, कितने दिनोंके बाद आज मेरे घर आना हुआ. गावमे सब ठीक तो है?”
डॉक्टरांची मति गुंग करणारा प्रकार होता. स्वतःला सावरून त्यांनी स्वतःला पंकजच्या मिठीतून सोडवले. काय बोलावे? त्यांना काही सुचले नाही.
आतून पंकजची पत्नी बाहेर आली.
“अरे पंकज, मी डॉक्टर करमरकर.”
“तू डॉक्टर? तू रामप्रशाद नाही? मला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. मी वेडा नाहीये.” पंकज पत्नीकडे वळून तिच्यावर खेकसला, “मी तुला काय सांगितले होते? डॉक्टरांना बोलावू नकोस म्हणून. मग हा डॉक्टर इथे कसा उपटला?” पंकज उद्दीपित होऊन थरथर कापत होता. “यू डॉक्टर, रास्कल. गेट लॉस्ट. दफा हो जा मेरी नजरोंसे.”
डॉक्टरांना काय करावे समजेना. त्यांनी पंकजच्या पत्नीकडे अपेक्षेने पाहिले.
“करमरकर, प्लीज तुम्ही जा. नंतर मी आपल्याशी सविस्तर बोलेन.” तिने “डॉक्टर” हा शब्द कटाक्षाने टाळला होता हे डॉक्टरांच्या लक्षात आले. ते मुकाट्याने उठले आणि निघून गेले. नंतर त्यांना जे समजले होते ते भयावह होते.
डॉक्टरांशी समीकराणांबद्दल बोलल्या नंतर पंकज जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याला चित्र विचित्र भ्रम व्हायला लागले, कुठेतरी डॉक्टरांची राऊंड टेबल चालली होती. पंकजच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याबद्दल त्यांची चर्चा सुरु होती. पंकजला शब्द न शब्द ऐकू येत होता.
हा भ्रम पुन्हा पुन्हा होत राहिला.
त्या दिवसापासून त्याने डॉक्टरजमातीशी वैर धारण केले. औषधे घेण्याचे नाकारले.
आपल्याला कैद करण्यात आले आहे आणि जेलर आसुडाचे फटके मारत आहे हे दृश्य त्याने कितीतरी वेळा बघितले. वेदना इतक्या असह्य होत कि तो गुरासारखा ओरडत असे. मारू नका, मारू नका अशी गयावया करत असे.
पंकजने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
जेव्हा हे असह्य झाले तेव्हा त्याच्या पत्नीने हृदयावर दगड ठेऊन पंकजला मनोरुग्णालयात अॅडमिट केले आहे. आजमितीस तो तेथेच आहे.
धुरी. त्याचं काय?
धुरी हा तसं पाहिलं तर शास्त्रज्ञ गणला जाणार नाही. तो इंजिनिअर होता. खरा इंजिनिअर हा जन्मावा लागतो. त्याच्या प्रतिभेला मर्यादा नसतात. धुरी हा असा जातिवंत इंजिनिअर होता. त्याला तुम्ही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल अशी लेबलं चिटकवणे हा त्याचा अपमान करण्यासारखे होते. धुरी जागेवर नसता तर हा कोलायडरचा प्रकल्प उभा राहिला नसता हे निश्चित.
तर हा धुरी एके दिवशी नाहीसा झाला. सकाळी ऑफिसला जातो असं सांगून घराबाहेर पडलेला धुरी पुन्हा कधी कुणाला दिसला नाही. त्याची कार ऑफिसच्या रस्त्यावर बेवारशी सोडलेली मिळाली. सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी त्याने कुणाशी तरी संभाषण केले होते. कुणाशी? तो तपशील मोबाईल मधून पुसला गेला होता. नऊ वाजून तीस मिनिटांनी त्याने डॉक्टर करमरकर आणि डॉक्टर शास्त्री ह्यांना एसएमएस केला होता
“काळजी घ्या.”
डॉक्टर करमरकर सरांच्या समोर बसलेल्या शास्त्रींच्या मनात हाच संदेश घोळत होता.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
शास्त्रींना झालेला अपघात हेही एक गूढ होतं.
कार स्किड होण्याची प्रामुख्याने तीन कारणे सांगितली जातात. खूप वेगाने कार चालवत असताना अर्जेंट ब्रेक मारणे किंवा एकदम शार्प वळण घेणे, वळणावर वेग वाढवणे, तसेच गुळगुळीत गोटा झालेले टायर्स. रस्त्यावर तेल सांडलेले असेल तर सुद्धा टायर्स रस्ता सोडू शकतात.
डॉक्टर शास्त्रींच्या मते कुठलीही गोष्ट घडण्याची लाखात एक इतकी कमी शक्यता असली तरी ती घडू शकते. शास्त्रींच्या केसमध्ये हे घडले होते.
शास्त्री प्रयोगशाळेतून घरी परत चालले होते.
रस्ता सरळ होता. रात्र अमावस्येची होती. वेळ साडे दहाची. टायर्स नवीन टाकलेले होते. वेग पन्नास किलोमीटर्सच्या दरम्यान होता.
तारीख होती तेरा ऑगस्ट.
डॉक्टरांचे लक्ष क्षणभर रस्त्यावरून विचलित होऊन आकाशाकडे गेले, आकाशगंगेचे मनोहारी दर्शन झाले. त्यांच्या मनात विचार आला. मी जसा आकाशाकडे बघतो आहे तसच ह्या अथांग विश्वाच्या पसाऱ्यातील एखाद्या ग्रहावरील जीव माझ्याकडे बघत असेल का? हाऊ एक्सायटिंग! त्यानंतर काय झाले? शास्त्री शपथेवर सांगायला तयार आहेत की आकाशात एक तरंगता डोळा त्यांच्याकडे रोखून बघत होता. शास्त्रींच्या सर्वांगातून भीतीची लहर गेली.
डॉक्टर शास्त्री जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजेन मास्क होता, नाका तोंडात नळ्या होत्या, पालथ्या हातावर सलाईन लावले होते. त्यांच्याकडे बघून एक स्त्री आनंदाने स्मित करत होती.
डॉक्टर, नर्स लगबगीने पुढे आले. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. दहा पंधरा मिनिटांनी त्यांना जाणीव झाली कि आपण आयसीयू मध्ये पडलो आहोत, आणि ती मंद स्मित करणारी स्त्री त्यांची पत्नी आहे.
त्यांच्या खुब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मांडीच्या हाडात स्टीलचा रॉड टाकण्यात आला होता. त्यानंतर फ़िजिओथेरपी.
ह्या सगळ्या कालावधीत करमरकर वेळोवेळी त्यांना इस्पितळात भेटून धीर देत होते.
आज सहा महिन्यांनी शास्त्री डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते. काय बोलायचे कसे बोलायचे हा मोठा यक्षप्रश्न होता? त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव चालली होती.
“सर मी काही बोलू का? मला वाटत की कोलायडर मध्ये कृत्रिम कृष्णविवर बनवण्याचे प्रयोग आपण थांबवायला पाहिजेत. पंकजची बिघडलेली मनस्थिती, धुरीचे हवेत विरून जाणे, माझा अपघात ह्यांच्या मागे एक कॉमन सूत्र आहे. मला हे स्पष्ट करून सांगता येत नाहीये पण मला हे प्रतीत होतय.”
कोलायडर आणि कृत्रिम कृष्णविवर ह्यावर बराच काथ्याकुट झाला होता. पुण्यातल्या एका सेवाभावी संस्थेने बीएलएचसी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात खटला भरला होता. त्यांच्या मते ह्या यंत्राच्या प्रयोगात अतिसुक्ष्म कृष्ण विवरे तयार होतात. त्यापैकी एखादे विवर आजूबाजूचे अणुरेणू गिळंकृत करून विराट रूप धारण करून क्रमाक्रमाने प्रथम पुण्याचा नंतर महाराष्ट्राचा, भारताचा अखेरीस विश्वाचा ग्रास घेऊ शकते. त्यांनी हे प्रयोग ताबडतोब थांबवावेत असा हुकुम न्यायालयाने द्यावा अशी प्रार्थना करण्यात आली होती.
बीएलएचसीने आपल्या बाजूने जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना साक्षीदार म्हणून आमंत्रित केले होते.
प्रॉब्लेम असा होता की अतिसूक्ष्म कृष्णविवरे तयार होतात ह्याबद्दल कुणाचे दुमत नव्हते. पण त्यांचा जीवन कालावधीही तेव्हढाच क्षणिक असतो.
पण एखादे अतिसूक्ष्म कृष्णविवर राक्षसी रूप धारण करेल ह्याची शक्यता किती आहे? असे काही होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली. हा अत्यंत गहन आपण इथे सोडून पुढे जाउया.
ओह येस न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला होता.
“शास्त्री, तुम्ही त्या अतिसूक्ष्म कृष्णविवारांविषयी बोलत आहात काय?” डॉक्टर करमरकरानी विचारले.
“मी कशाविषयी बोलतो आहे? माझे मलाच माहित नाही. डॉक्टर, पंकज आणि धुरी ह्यांच्या विषयी म्हणजे त्यांची आठवण येत नाही तुम्हाला? सर, तुम्हाला असं नाही वाटत की अमानवी शक्ती आपल्या कामात अडथळे निर्माण करतेय? सर, मला अनामिक भीतीने ग्रासले आहे. डॉक्टर तुम्हाला ती घार आठवते आहे? ती घार भविष्यातून पाठवली गेली होती असंं मी म्हटलं तर ... ” शास्त्रींनी स्वतःला घाईघाईने सावरले. आणि विषय बदलून ते म्हणाले, “मी तुम्हाला भेटायला आलो होतो ते ह्याच्यासाठी,” शास्त्रींनी कोटाच्या आतल्या खिशातून लिफाफा काढला आणि डॉक्टरांच्या समोर ठेवला, “मी राजीनामा देतोय.”
डॉक्टर करमरकरांना आश्चर्याचा धक्का बसला. ते अवाक झाले.
“डॉक्टर शास्त्री, तुम्ही? डॉक्टर ह्या प्रोजेक्ट मध्ये मी अनेक अडथळ्यांना सामोरा गेलो. त्यांच्यावर यशस्वी मात केली. कशासाठी? डॉक्टर शास्त्री, तुम्हाला माहित आहे? आपल्या विश्वाचा अंत, ज्याला मी कोल्ड डेथ म्हणतो, होणार आहे. हे न टाळता येणारे सत्य आहे. त्या आधी एकेक करून विश्वातील दीर्घिका, नक्षत्रसमूह, तारे मालवत जातील. विश्वाचे तापमान शून्य अंश केल्विन झाले असेल. त्यावेळी आपण काय करणार आहोत? आपल्याला दुसऱ्या उबदार विश्वाकडे प्रस्थान करावे लागेल. आपल्या विश्वाच्या स्थलकालाची चिरफाड करून रस्ता बनवावा लागेल. अश्या शस्त्रक्रियेचं तंत्र विकसित करण्यासाठी मी प्रयोग करत आहे. ते मी थांबवावे अस तुम्ही मला सांगत आहात. खरच?”
“सर, आम्हा सर्वांना आपल्या विषयी आदर आहे. आणि त्यापेक्ष जास्त प्रेम आहे. त्या पोटी मी आपल्याला सांगतोय. मी वाचलो पण...” शास्त्रींना पुढे बोलवेना.
“तुम्हाला हेच म्हणायचे आहे ना कि “त्यांचे” पुढचे “लक्ष्य” मी आहे?” करमरकर हसून म्हणाले, “ ठीक आहे. मी हा तुमचा राजीनामा इथे माझ्या टेबलाच्या ह्या वरच्या खणात ठेवतोय. जेव्हा वाटेल तेव्हा या आणि परत घेऊन जा.”
शास्त्री खुर्चीतून उठले, आपल्या कुबड्या सावरल्या आणि जायला निघाले. लंगडत लंगडत दरवाज्यापाशी पोहोचले, क्षणभर थांबून मागे वळले, “सांगण्यासारखे काही राहिले नाहीये. एव्हढेच कि प्लीज स्वतःची काळजी घ्या.”
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
परिशिष्ट-१
भारत लार्ज हॅड्रॉन कोलायडर (BLHC) पुणे
काही जुजबी माहिती.
भारत लार्ज हॅड्रॉन कोलायडर (BLHC) पुणे हा जमिनीच्या खाली १५० मीटर तीस किलोमीटर लांब परीघाच्या भोगद्यात आहे.
ह्या संयंत्रात उलट सुलट दिशांनी वेगाने धावणाऱ्या दोन रेणूंच्या “बीम”ची समोरा समोर टक्कर घडवली जाते.
ह्या संयंत्रातील सर्व हवा काढून टाकण्यात येउन निर्वात पोकळी बनवली जाते.
प्रत्येक “बीम’ मध्ये रेणूंचे ३००० पेक्षा जास्त जत्थे असतात.
प्रत्येक जत्थ्यात १०० बिलिअन रेणू असणार आहेत.
जेव्हा हा कोलायडर आपल्या पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असेल तेव्हा त्याची कार्यशक्ती ताशी १६०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मोटारी इतकी असेल.
ह्या “बीम” चा वेग जवळपास प्रकाशाच्या वेगा इतका (अर्थात प्रकाशाच्या वेगापेक्षा काकणभर कमी) असणार आहे. ह्या वेगाने तो यंत्राच्या ११,२४५ चकरा मारेल.
जेव्हा हे यंत्र दहा तास सतत चालत राहील तेव्हा ह्या अणु रेणूंनी दहा बिलिअन किलोमीटरचा प्रवास केलेला असेल. हे अंतर नेपच्यून ग्रहाच्या “रिटर्न ट्रीप” एव्हढे आहे!
हे भुयार चतुःशृंगीच्या डोंगराखालून, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फिजिक्सच्या इमारीतीच्या खालून, औंध खालून जाते.
विशेष सुचना: कृपया ह्या माहितीचा वापर जपून करा. ही अत्यंत गोपनीय माहिती केवळ तुमच्या साठी म्हणून इथे लिहिली आहे. कृपया ह्याचा कोणी गैरवापर करणार नाही अशी काळजी घ्या. तसेच ह्या प्रकल्पाबद्दल जास्त चर्चा, शंका, कुशंका विचारू नका.
ज्यांना अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी कृपया
https://www.blhc.com/new4_all ह्या साईटला भेट द्यावी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet