कॉस्मिक सेन्सॉरशिप शेवटचा भाग -६

कॉस्मिक सेन्सॉरशिप

भाग -६

संध्याकाळचे पाच वाजले असावेत. रोज ह्याच वेळेला राघव 11KM रस्त्यावरून एक चक्कर टाकतो. राघव जिथे रहातो त्या कॉलनीच्या जवळून हा रस्ता जातो. संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरलं कि मन थोडं उल्हसित होत. “संध्याकाळचं फिरणं” ही थेरपी त्याच्या मनोवैज्ञानिक चिकित्सकानं सुचवली होती. आज्ञाधारक मुलाप्रमाणे राघव काटेकोरपणे त्याचं पालन करत होता. घराबाहेर पडायच्या आधी त्याने नेहमीची कवायत केली. शर्टाचा वरचा खिसा तपासला. खिशात स्वतःचे नाव, पत्ता आणि टेलेफोन नंबर लिहिलेले कार्ड असल्याची खात्री करून घेतली. हे कार्ड जवळ असणे फार महत्वाचं होतं. कधी कधी काय व्हायचं ना कि तो स्वतःचे अस्तित्व विसरून जायचा. अक्षांश रेखांश हरवलेलं विमान जणू. ते कुठेही भरकटत जाऊ शकते.
सेन्ट्रल प्लाझा जवळ तो असाच हरवला होता. डॉक्टर करमरकरांनी त्याचा ताबा घेतला होता. आणि त्याला विज्ञानाच्या विचित्र विश्वात फिरवून आणले होते. मधेच त्याला हाक ऐकू आली, “शुक, शुक. अहो डॉक्टर करमरकर...” डॉक्टरांना त्यांचा मित्र भेटला असावा. डॉक्टर वळले आणि मित्राबरोबर बोलत बसले. त्या क्षणी
डॉक्टरांनी त्याचा ताबा सोडला खरा पण राघवला स्वतःचा ताबा घ्यायला जरा वेळ लागला. तो पर्यंत राघव वेड्यासारखा सैर भैर भटकत होता. आपण कोण आहोत, का आहोत, कुठे आहोत? प्रश्नचिन्हेच प्रश्नचिन्हे!
त्या दिवसापासून तो ते कार्ड खिशात ठेवायला लागला.
राघवने छत्री घेतली आणि तो घराबाहेर पडला.
पंधरा वीस मिनिटे चालल्यावर तो सायकलच्या दुकानापाशी आला. दुकानाच्या बाहेर पोऱ्या ट्यूब डायहायड्रोजन मोनाक्साइड मध्ये बुडवून पंक्चर शोधत होता.
“मला जरा एक सांगशील का? ती करिष्मा लेन कुठे आहे?”
राघवने हा प्रश्न का विचारावा, कधीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या “करिष्मा लेन” चा पत्ता का विचारावा?
प्रत्येक घटनेला कारण असायला पाहिजे असं थोडच आहे? असा काही नियम आहे? आयुष्यात कितीतरी गोष्टी कारणाविना घडत असतात कि नाही?
“साहेब, इथून सीधा दहा मिनिटे चाला. उजव्या हाताला “करिष्मा लेन” भेटल बघा.”
“थॅंक्यू.”
राघव चालत राहिला. पोऱ्याने दहा मिनिटांचा हिशेब सांगितला होता खरा, दहा मिनिटे होऊन गेली होती. भवतालची सीन सिनरी फास्ट फॉरवर्ड होत होती. (फास्ट बॅकवर्डही असू शकेल. कळायला काही मार्ग नव्हता.) आजूबाजूची दृश्यं क्षणोक्षणी बदलत होती. आकाशातले ढग आकार बदलत होते. आत्ता इथे “हे” होतं त्याचे रुपांतर आता “ह्यात” झालं होतं. त्याच्या डोळ्यासमोर आकार बदलत होते. रस्त्यावरचे दबा धरून बसलेले सोडियमचे दिवे आणि दगडी फुटपाथ आकाशगंगेच्या अंतरावर जाऊ लागले. त्याने समोरून येणाऱ्या सभ्य

गृहस्थाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण भाषेचे पारदर्शक आच्छादन वास्तवाच्या चेहऱ्यावर सरकत होते, संज्ञांना त्यांचे अर्थ राम राम करून अदृश्य होत होते, भविष्याचा मागोवा घेणे अशक्य होते. ११ KM रस्त्याने स्वतः भोवती गिरकी घेऊन वळण घेतले आणि उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर सुपरइम्पोझ झाला. गर्दीतील एक चेहरा त्याच्याकडे वळला - एक फिकट गुलाबी, अर्थहीन मुक्त स्वरूप - थोडं पुरुषी थोडं स्त्रैण, ना कि मित्र की ना शत्रू! तो कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. तो जणू स्थल-काळाच्या भोवऱ्यात फेकला गेला होता. स्थल-काळाची वक्रता अनंताकडे वाटचाल करू लागली. राघवची शेवई झाली होती.
राघव जणू मायानगरीत पोहोचला होता. थोड्याच वेळात जीवघेणी चित्रफीत थांबली. भोवरे फिरायचे थांबले.
काल प्रवाह संथ झाला.
गंतव्य स्थान आले असावे.
समोर करिष्मा सोसायटी उभी होती.
राघवच्या मनावरील ताण जवळ जवळ नाहीसा झाला होता. राघव म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, हा परीसर त्यांच्या ओळखीचा होता. रस्ता रोजचा पायाखालील होता. करिश्माच्या प्रवेशद्वारापाशी “मालगुडी” रेस्तारंट होते. म्हणजे पूर्वी होते. आता तिथं रेस्टोबार होता. रस्त्याच्या दोनी बाजूला केकची, पिझ्झाची, मोमोची, चाटची दुकाने होती.
डॉक्टरांना जायचे होते “वाडेश्वर” मध्ये इडली वडा खायला. अखेर वाडेश्वर दृष्टीपथात आले.
राघव बाहेरच्या टेबलापाशी बसला. त्याची खात्री होती की डॉक्टर आपल्याला इथेच भेटणार आहेत. त्यांची यायची वेळ झाली आहे.
हवेत अनामिक बदल होत होते. थंडगार हवेची झुळूक संदेश घेऊन आली. राघवने डोळे मिटले.
“ओ गॉड,प्लीज प्लीज.”
“अरे राघव, डोळे उघड. हा बघ मी आलो आहे.”
राघवने डोळे उघडले. समोरच्या खुर्चीवर साक्षात स्वयं दस्तुरखुद्द डॉक्टर करमरकर अवतीर्ण झाले होते.
“थॅंक्स डेटा राघव, हा फिजिक्स राघव तुझा शतशः ऋणी आहे. आज केवळ तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर तू मला पुनश्च अस्तित्वात आणले आहेस.” फिजिक्स राघव भारावून बोलत होते, “प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद झालेल्या सिंहाची अचानक सुटका झाली तर त्याला काय वाटेल त्याची चुणूक मला मिळाली.”
“डॉक्टर, आधी ह्या छत्रीचा ताबा घ्या.” (डेटा) राघवने (फिजिक्स) राघवला छत्री परत दिली, “आणि मी विसरेन त्या आधी,” राघवने पैशाच्या पाकिटातून कॅफे "वाडेश्वर"ची जेवणाची पावती काढली आणि डॉक्टर राघवना दिली.
राघवला दोन वर्षांनंतर आज प्रथम मोकळं मोकळं वाटलं. सगळी बंधने, सगळे पाश तुटले होते.
“डॉक्टर हा काय प्रकार होता मला उलगडून सांगाल का?”
डॉक्टरांचे त्याच्या कडे लक्ष नव्हते. विचारांत गढून गेले होते. डॉक्टर शास्त्री आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत होते ते त्यांच्या डोक्यात शिरायला लागले होते. पंकज, धुरी, शास्त्री आणि आता मी.
“आता माझ्या लक्षात आले. सर्व काही सूर्यप्रकाशा सारखे स्पष्ट झाले. “त्यानी” मला तुझ्या विश्वात, तुझ्या देहात हद्दपार का केले.. मी माझे संशोधन थांबवावे अशी “त्यांची” इच्छा असणार.”
“ते” कोण असा प्रश्न राघवच्या ओठावर आला पण त्याने विचारला नाही.
डॉक्टर बोलत होते.
“तुमचे मानावे तितके आभार कमीच.” डॉक्टर करमरकर खुशीत येऊन बोलले, “ही छत्री माझे निसर्गापासून संरक्षण करणारं छत्र आहे. ती इतके दिवस नव्हती तर मला माझे संशोधन करता येत नव्हते.”
“निसर्गापासून संरक्षण? ओहो म्हणजे उन, पाउस, वारा, वादळ...”
“नाही नाही तसं नाही. उन, पाउस, वारा, वादळ... ही निसर्गाची सौम्य रूपे आहेत. निसर्गाच्या मनात आलं तर तो तो आपलं क्रूर रूप दाखवायला मागे पुढे बघत नाही. वेळप्रसंगी तो खुनशी सुद्धा होतो.”
“म्हणजे त्सुनामी, भूकंप. चक्री वादळं?”
“राघव, तू विज्ञानाचा अभ्यास केला आहेस? नाही? चालेल. तरी मी तुला समजावयाचा प्रयत्न करतो. निसर्ग मानवाला टाईम मशीन बनवू देणार नाही. का तर त्याला “क्रॉनॉलॉजी प्रोटेक्शन” करायचे असते म्हणे! सिंग्युलॅरिटीला तो इव्हेंट होरायझनची झूल चढवून सजवून धजवून सादर करेल. सिंग्युलॅरिटीचे नागडंउघडं रूप कधीच दाखवणार नाही. ह्याला कॉस्मिक सेन्सॉरशिप असं गोंडस नाव आहे. प्रकाशाच्या वेगापेक्ष जास्त वेगाने जाणारे अंतराळयान बनवू देणार नाही. ज्यांनी ज्यांनी ह्या सीमारेखा ओलांडायचा प्रयत्न केला त्यांना निसर्गाचा प्रकोप सहन करावा लागला. मला असं दुसऱ्या विश्वात, दुसऱ्या शरीरात फेकून नामोहरम करण्याचा त्याचा डाव होता. माझी छत्री त्यानेच हिरावून घेतली होती. पण याद राख बच्चमजी माझं नाव पण डॉक्टर करमरकर आहे. मरेन पण मागे हटणार नाही.”
डॉक्टर भावनातिरेकाने बोलत होते.
“राघव, माझी जायची वेळ झाली आहे.”
“डॉक्टर, तुम्ही तुमच्या शहरात आहात. माझे काय? मी कसा परत घरी – माझ्या विश्वात जाणार?”
“जसा आलास तसा जा. तुला सांगू? राघव, तू सुपर हिरो आहेस. तुला आता कशाची भीती?”
डॉक्टरांनी इडली-वड्याची आणि फिल्टर्ड कॉफिची ऑर्डर दिली. खाऊन झाल्यावर डेटा राघव पैसे देऊ लागला.
“राघव, तुझ्या विश्वातल्या नोटा आणि नाणी इथे चालणार नाहीत. बिल मलाच द्यायला पाहिजे.”
दोघेही आपापल्या मार्गाने जसे आले तसे स्वस्थानी परतले.
आज राघवची डॉक्टरांना भेटायची वेळ होती. राघव दर तीन चार महिन्यांनी डॉक्टर शास्त्रींना भेटतो. तसं काही विशेष कारण नाही, पण डॉक्टरांची अजून खात्री झालेली नाही. कारण DID मधून सुखरूप बाहेर पडणारी ही एकमेव केस आहे. राघव “डॉक्टर करमरकरांना “पुण्यात” जाऊन भेटला” ह्यावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. हे असे बोलणे म्हणजे त्यांच्या मते DID घुटमळतोयचे लक्षण आहे. जर कोणी हा विषय त्यांच्याशी बोलताना काढला, “त्याचं काय आहे ना, मिस्टर...अ, काय नाव म्हणालात?”
“मी प्रभुदेसाई.”
“हा तर प्रभुदेसाई, हल्ली एकेक खुळं निघतात. आता म्हणे लोकांना “नोमोफोबिया” होतो म्हणतात! नोमो म्हणजे “नो मोबाईल.” ते आपल्या मोबाईल पासून पाच मिनिटं दूर राहू शकत नाहीत. मोबाईल जवळ नसेल तर त्यांचा जीव घाबरा घुबरा होतो. “समांतर विश्व”
हा असलाच मॅनियाचा प्रकार आहे. सिनेमात. सिरिअल्समध्ये, विज्ञान कथात ... “
आता राघव करमरकर डॉक्टर करमरकर नाही. तो साधा करमरकर आहे. तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतो. चौकोनी कुटुंब आहे. कुटुंबाची काळजी घेणारी प्रेमळ पत्नी आहे. दोन गोजिरवाणी मुलं आहेत. मोठ्या मुलाने नुकतेच चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवलं आहे. श्री स्थानेश्वराच्या कृपेने सर्व सुरळीत चाललय.

मुलगा विज्ञान कथांचा फॅन आहे. तो सारखा टीव्हीला चिकटलेला असतो. डिस्नेप्लसवर वॉंडाव्हीजन, लोकी, समांतर अश्या सीरिअल बघत असतो. कधी मुलगा येऊन त्यांना लोकीच्या गोष्टी सांगतो. मधेच कधीतरी मुलगा येऊन विचारतो, “बाबा, आपण “समांतर विश्व” बघायला केव्हा जायचं?” “समांतर विश्व” ही विश्वामित्र आचार्य ह्या उद्योगपतीनं उभारलेली प्रति “डिस्नेलॅंड” आहे. हे असं मुलाने विचारलं की करमरकर का कुणास ठाऊक भयानक अस्वस्थ होतात.
मुलाचा अभ्यास ते स्वतः घेतात. अर्थात भौतिकी विज्ञान सोडून. अगदी आर्कीमेडीजचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो.
पुन्हा नको...
(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet