आउट ऑफ स्टेप:एक अबसर्डि्का -१

१९६०.
बाबांची बदली तालुक्याच्या गावाहून शहरात झाली होती. माझी चौथी पाचवी तालुक्याला झाली होती. शहरात जायचे म्हणून आई आणि माझा मोठा भाऊ खुश होते. बाबा रेवेन्यू खात्यात असल्यामुळे तालुक्यात त्यांचा वट होता. मी भाउसाहेबाचा पोरगा म्हणून नाही म्हटले तरी माझीही चलती होती.
मोठा भाऊ माझी खूप काळजी घेत असे.
“बबड्या, तुझी मला काळजी वाटते रे.” लांब चेहरा करून दादा म्हणाला.
“का? काय झाले?” मी घाबरलो.
“काय नाय. जाउंदे. काही सांगून उपयोग नाही. मी तरी तुझी किती काळजी घेणार?” दादाने निराशेचा सूर लावला. मी खूप विचारले, जंग जंग पछाडले. दादा काही ताकास तूर लाऊ देईना.
मागे एकदा तो म्हणाला होता, “बबड्या, मंगळ, बुध आणि गुरु ह्यांची पिधान युती होत आहे.”
माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. “होऊ दे. मला काय करायचे आहे.”
“बबड्या, अज्ञानात किती सुख असते नाही. हेच तुझे उदाहरण घे. पण नकोच. उगीच कशाला?” दादाला काय म्हणायचे होते काही समजेना. विचारले तरी बोलायला तयार नाही. शेवटी.
“हे बघ. तुझा जन्म मंगळवारचा. बुध आणि गुरु लांब होते तो पर्यंत ठीक होते. पण पिधान युति?” बोलणे अर्धवट सोडून द्यायची ही दादाची पेटंट स्टाईल.
मग भूगोलाचं पुस्तक घेऊन वाचत बसला.
“दादा, अरे नीट काय ते बोल. पिधान युतीने काय होणार आहे?”
“बबड्या, मला अभ्यास करू दे. उद्या माझी भूगोलाची टेस्ट आहे. उद्या मास्तरांनी मला विचारले की खारे वारे आणि मतलई वारे ह्यात काय फरक आहे किंवा “गरजणारे चाळीस” कुठे गरजतात? म्हणा तुला काय गरज पडलीय? तुला फक्त चाळीस चोर माहित असतील. हे चित्र बघ. हा एस्किमो सरपटत इग्लूमध्ये जातोय. बबडू, तू आतापासून सरपटत तुझ्या खोलीतून माझ्या खोलीत यायची प्रॅक्टिस कर. पिधानानंतर दोनी पाय कापावे लागले तर काय होणार?”
“ए दादा रे. माझे पाय कापू नकोस रे. काही तरी मार्ग काढ.”
“निघेल निघेल. मला विचार करावा लागेल. तुला माहित आहे ना...”
अर्थात मला माहित होते कि पिवळा हत्ती ओढल्यावर तो मार्ग काढेल.
“पैसे दे. घेऊन येतो.”
“तू पण न! संकटात कोण? तू. मार्ग कोण काढणार? मी. मी मार्ग काढणार आणि वर पैसे पण मीच द्यायचे?”
आईने खाऊसाठी दिलेल्या पैशातून मी दोन पिवळा हत्ती आणून दिले.
त्याने सिगारेटचे दोन झुरके घेतले आणि उपाय सांगितला. पुढील पंधरा दिवस रोज सकाळ संध्याकाळ भीमरूपी म्हणायची म्हणजे पिधान शांती होईल.
असा माझा दादा होता. तर त्याने शहरातल्या शाळेची अशी भीती घातली. सुरवातीला मी प्रचंड दडपणाखाली होतो. हळूहळू रुळलो.
तालुक्याच्या शाळेत एकच मास्तर सर्व विषय शिकवायचे. इथं म्हणजे प्रत्येक विषयाचे निरनिराळे मास्तर होते. इकडे टाईम टेबल वर मास्तर होते. वेळ झाली कि कुणी मास्तर येणार, तास संपल्याची घंटा झाली कि हे जाऊन ते येणार. भूगोलची वह्या पुस्तकं दप्तरात भरून इतिहासाची बाहेर काढायची.
त्या दिवशी...
गणिताचा तास संपला. मी गणित आत ढकललं आणि मराठी बाहेर काढलं. पण वर्गात आले इतिहासाचे मास्तर! मला पक्कं आठवत होतं कि इतिहासाचा तास काल होता. आणि तो काल होऊन गेला. काल आधी मास्तरांनी रझिया बेगमवर गृहपाठ दिला होता. तो तपासला आणि शेरशाह सूरी शिकवायला सुरुवात केली. डोळ्यासमोर चित्रफीत सरकावी तसं हे सगळं मला स्वच्छ दिसत होते. पण मला दिसून काय उपयोग सगळ्यांना दिसायला पाहिजे ना.
माझी सर्वसाधारण धारणा अशी होती, (अजूनही आहे) कि ह्या विश्वातले सर्व सजीव निर्जीव माझ्या विरुद्ध कट करत आहेत. आता “समय” पण त्याच्यात सामील झाला असं दिसतेय!
“दिनेश, आज वार कोणता आहे?” मी बाकड्या दोस्ताला विचारले.
“बबड्या, का काय झालं? मंगळवार आहे.” माझ्यासाठी मंगळवार काल होऊन गेला होता आणि आज बुधवार होता. नेहमीप्रमाणे मी एव्हरी टाईम आउट ऑफ स्टेप.
“चला, गृहपाठाच्या वह्या काढा. गृहपाठ काय दिला होता?” इतिहासाच्या म्हैसकर मास्तरांनी विचारले.
रझिया सुलतान. सगळा वर्ग एक मुखाने ओरडला.
माझ्याकडे पुस्तक, गृहपाठ, वर्गपाठवही काही नव्हते. कसं असणार? माझ्या विश्वात आज इतिहासाचा तास नव्हता. मास्तरांनी मला बरोबर पकडले. चेहराच माझा इतका बोलका आहे.
“काय नाव तुझं, मुला?”
“बबन धायगुडे.”
“बबनराव, रझिया सुलतान कुठे आहे? दाखव.”
मास्तर, आज तुमचा तास नाहीये. तुम्ही माझा गृहपाठ कालच तपासाला होता. असं काहीबाही सांगायचं माझ्या मनात होतं. त्या ऐवजी मी मान खाली घालून बोललो विसरलो म्हणून.
“पिताश्री काय करतात तुमचे?” हे बोलताना मास्तरांना आसुरी आनंद होत होता.
“कलेक्टर कचेरीत तलाठी आहेत.”
“बबनराव, लाड बापाच्या मांडीवर. काय? तुम्ही इथं शाळेत आला आहात. काय? समजलं? काय समजलं?”
“हेच की लाड...” मी काय समजलं ते सांगितलं.
छान, असं म्हणून मास्तरांनी माझा शर्ट चड्डीच्या बाहेर खेचला आणि त्याला गाठ मारली.
“म्हणजे पुन्हा गृहपाठ विसरणार नाही. घरी गेलात कि हे तलाठीबाबांना दाखवायचं. काय.”
मधली सुट्टी झाली. मी इकडे तिकडे टिवल्या बावल्या करत हिंडत होतो. तर आमच्याच वर्गातील झान्गोजी पवारने मला आवाज दिला.
“काय रे, तुला कुठेतरी बघितल्या सारखे वाटतय. कुठल्या शाळेत आहेस तू?” पवारने विचारले.
“कुठल्या म्हणजे? ह्याच न्यूमवीत सहावी ब मध्ये. तू तिसऱ्या लाईनीत बसतोस. मी पहिल्या लाईनीत शेवटच्या बाकावर बसतो.” माझ्या मते हे एव्हढे पुरेसे होते.
“अबे, ही न्यूमवि नाहीये. ही मॉरडन आहे. आणि ही शर्टाला गाठ का मारली आहेस?”
“ही म्हैसकर मास्तरांनी बांधली आहे. रझिया सुलतान केली नाही म्हणून.”
“आयला हा खुळा की वेडा. येरवड्यास्न पळून आला आहेस का? इकडे कोणी म्हैसकर मास्तर नसतात.”
म्हैसकर मास्तर नसलेली शाळा! कित्ती छान!
एवरीव्हेअर आउट ऑफ प्लेस.
(अवांतर--येरवडयाला वेड्यांचे इस्पितळ होते आहे किंवा नसेल तर बांधतील. पुण्याला ह्या इस्पितळाचा प्रचंड अभिमान होता आहे नसेल तर पुढे होईल. माफ करा पण हल्ली मला असेच लिहावं लागतंय. वाचक लोकं कुठल्या काळात वावरतात त्याची काही खात्री नाही.)
असं म्हणून त्यानं माझी कॉलर पकडली. “चल, तुला हेडमास्तरांकडे घेऊन जातो.” त्यानं मला फरपटत हेडसरांच्या ऑफिसात नेले. आणि त्यांना माझी स्टोरी ऐकवली. आमच्या हेडसरांचे नाव होते बापट.
“पवार, तू तुझ्या वर्गात जा. मी ह्याच्याशी बोलतो.” बापट मास्तरांनी पवारला पिटाळले. पवार गेल्यावर ते माझ्याकडे वळले.
“मुला, तुझे नाव काय? कुठल्या तुकडीत आहेस तू?”
“मी वसंत डावरे. मी सहावी ब मध्ये आहे.”
मास्तरांनी सहावी ब चा कॅटलॉग मागवून घेतला. त्यात माझे नाव नव्हते.
ही एक नवीन गाठ. गाठीवर गाठी. केव्हा सुटणार ह्या गाठी.
“कुठल्या शाळेत आहेस तू?”
“न्यूमवि त.”
“पण ही मॉडर्न आहे. तुझा काहीतरी गोंधळ होतो आहे. आर यू शुअर?”
“आर यू शुअर? म्हणजे काय?” (ते इंग्रजीत बोलले हे आता मला समजतंय.)
“आय अॅम सॉरी. वसंता, तुझे बाबा काय करतात? मी त्यांना फोन करतो. म्हणजे ते येऊन तुला घेऊन जातील.”
करा करा. स्वर्गात/नरकात गेलेले माझे बाबा ह्यांचा फोन घेतील.
“माझे बाबा कोविड मध्ये गेले. आई प्राथमिक शाळेत शिकवते. तिकडे फोन नसतात.”
“कोविड?” सर गोंधळले होते.
“होय कोविडची साथ. पाच वर्षांपूर्वी आलेली होती ती.”
“कुठल्या साली आली होती?”
“वीसशे वीस सालची.”
“मुला, सध्या काय साल चालू आहे माहित आहे?”
“हो, वीसशे पंचवीस.”
“अस्सं, हे क्यालेंडर बघ.” बापट सर आउट ऑफ टाईम.
“एकोणीसशे साठ. मिस्टर बापट तुम्ही एकोणीसशे साठ सालात लटकले आहात इज नॉट माय फॉल्ट. मल्टीवर्स, रोबोट्स, आर्टीफिशिअल इंटलीजेंसचा जमाना आहे. मी इथं का बरं माझा वेळ खर्ची घालतो आहे? मला दुसरी काम काय कमी आहेत.” मी हेडसरांची पाठ प्रेमाने थोपटून सांगितले, ”ग्रो अप मॅन.”
मी तिथून माझ्या वर्गाकडे गेलो. म्हैसकर सर गांधीजी शिकवत होते. पहा मधल्या वेळात मास्तरांनी सातशे आठशे वर्षांची उडी मारली होती.
“या बबनराव. इतका वेळ कुठे उंडारत होता?”
“पाणी प्यायला गेलो होतो. खूप गर्दी होती.”
“टाकी रिकामी केली नाही ना. चल जा जागेवर. पाणी पितोय. मोठा अगस्त्य ऋषींचा वंशज.”
दुसऱ्या दिवशी पुन्हा पवार भेटला.
“अजून गाठ सोडली नाहीस? कालपासून शर्ट बदलला सुद्धा नाहीस?”
“काल नाही आजच बांधली आहे.” मी.
“आणि इथे गळ्याला काय झाले आहे? बघू.” त्याने गळयाच्या गाठी दाबून पाहिल्या, “तुला सतीश गलांडे माहित आहे?”
“त्याचे काय? त्याच्या बाबांची लातूरला बदली झाली. तो त्यांच्या बरोबर लातूरला गेला.” मी पवारला माहिती पुरवली.
“तुला अंदर की बात सांगू? त्याच्या ह्या टॉसिल्स सुजल्या आणि फुटल्या...” त्याने हातानेच सतीश गलांडे कुठे गेला ते दाखवले. ते लातूर खचितच नव्हते.
मी काय समजायचे ते समजलो. “आता मग?”
“आता मग? जा, बाबांना सांग कि ऑपरेशन करा.”
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
बाबांना माझ्यासाठी वेळ नव्हता. आईला पापड लाटायचे होते. पीठ भिजवून लादी तयार होती. तिलाही वेळ नव्हता.
“पोरासाठी थोडा वेळ काढता येत नाही.” आई धुसमुसत होती.
“अग तो एक खुळा झाला आहे. त्याच्याबरोबर तू ही. तूच जा ना त्याला घेऊन डॉक्टरकडे.” बाबा पेपरातून डोकं काढायला तयार नव्हते.
“जणू माझा एकट्याचा मुलगा आहे तो.”
अशी आई बाबांची तणातणी सुरु झाली.
वादाला विषय भेटल्यामुळे दोघं मनोमन खूष होते.
माझा मृत्यू दबकत दबकत एक एक पाउल टाकत पुढं येतो आहे ह्याची त्यांना जाणीव नव्हती. आईबाबा मस्त एनजॉय करत होते.
आईचे पापड लाटून झाले होते.
“चल रे बबड्या, मीच तुला घेऊन जाते.”
“तू नको मी घेऊन जातो. तो म्हातारा काहीबाही सांगेल आणि तू पुन्हा माझं डोकं खाशील.” बाबांनी कोट टोपी चढवली आणि घेऊन गेले डॉक्टरांकडे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोष्ट आवडली.

गोष्टीतील पुढील लक्षणे लख्ख दिसत आहेत. चिरंजीव बबन धायगुडे उपाख्य वसंत डावरे हा आपल्या जनकजननीच्या मीलनप्रसंगी हमखास उपस्थित असणार. आणि, बाजूस उभे राहून, आपल्या जन्माकरिता नक्की काय (नि कसे) करावे लागेल, याचे तपशीलवार पाठ पायरीपायरीगणिक (स्टेप-बाय-स्टेप) आपल्या तीर्थरूपांस देत असणार.

(अर्थात, ‘दादा’ने तेथे बाजी मारलेली असल्याखेरीज. परंतु, ते शक्य वाटत नाही. काल‘गमना’ची कला बबन उर्फ वसंतास जशी अवगत आहे, तशी ती ‘दादा’स अवगत नसावी. किंवा, ‘पिवळ्या हत्ती’च्या कोवळ्या वयातील अतिसेवनाच्या दुष्परिणामी ती लोप पावली असावी. (येथे कोवळे वय हे ‘पिवळ्या हत्ती’चे नसून ‘दादा’चे होय, याची कृपया नोंद घ्यावी.) वास्तविक, भूतकाळात उपस्थित राहू शकण्याकरिता भविष्यात अतिधूम्रपान न करण्याची खबरदारी ‘दादा’ने घ्यावयास हवी होती. पण लक्षात कोण घेतो? चालायचेच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0