Skip to main content

सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप - १. थिंबल

खूप खूप वर्षांपूर्वी सँटा फे येथे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमध्ये तीन उन्हाळयांच्यात काम केले होते. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भन्नाट काळ होता.
तेव्हाचा अनुभव, त्या जगातल्या गोष्टी नुसत्याच सुट्या आठवणींसारख्या लिहून ठेवायला सुरुवात केली होती गेल्या वर्षी. झालेले लेख एकेक करून टाक्ते. नवीन लिहिले की ते ही टाकेन.
-------------

लिसा कधीही हात चेक करायची. एका हातात गारमेंट आणि दुसऱ्या हातात सुईदोरा असेच असायचे बहुतेकदा. पण लिसा सुईदोऱ्याच्या हाताचे मधले बोट चेक करायची. त्या बोटात थिंबल घातलेले नसेल तर हातातला गारमेंट काढून घ्यायची आणि जाऊन थिंबल बसवेपर्यंत द्यायचीच नाही.
भरगच्च आणि अनेक स्तरवाले गाऊन्स, बरीच अस्तरे असलेले लांबलचक कोटस, खूप स्तर एकवटल्या कोपऱ्यात शिवायची बटणे असे काहीही हाती शिवताना लिसाचा थिंबलचा आग्रह किती योग्य होता हे कळायचेच.
लिसा आमच्या टेबलची ड्रेपर होती. म्हणजे इथल्या संकल्पनेत समजवायचे तर मास्टर टेलरच्या पेक्षाही जास्त स्किल अपेक्षित असलेली जबाबदारीची जागा. संपूर्ण टेबलची प्रमुख. एकूण 7-8 टेबले म्हणजे टिम्स असायच्या. या सगळ्या टिम्स मिळून त्या त्या वर्षीच्या 4 ऑपेरांच्या कपड्यांच्या शिवणकामाची जबाबदारी उचलायच्या. लिसा ड्रेपर होती त्यावर्षी मी तिच्या टेबलच्या अप्रेंटीसपैकी एक होते. अप्रेंटीस हे केवळ हातशिलाई करण्यासाठी असत. गाऊन्स आणि इतर सर्व कपड्यांच्या हेमलाईन्स (तळाचा काठ), नेकलाईन्स, लेपलच्या आतले फिनिशिंग, कोटांच्या अस्तराचे फिनिशिंग, बटणे, वरून शिवून जोडल्या जाणाऱ्या accessories असे सर्व काही जे जे हाताने शिवायचे असते ते आमच्या अंगावर असे.
पॅटर्न तयार करणे, त्याबरहुकूम खोटे कापड कापणे, खोट्या ड्रेसच्या ट्रायल्स, त्यानंतर पॅटर्नमध्ये फेरफार करून खरे कापड कापणे, मशीनवर शिवणे वगैरे यातले काहीही अप्रेंटीसच्या हातात दिले जात नसे. हे काम अतिशय प्रेसिजनने चाले (थिंबलशिवाय हातशिलाई करायची नाही म्हणजे बघा!). आणि नवशिक्यांना अश्या गोष्टी देऊन काम बिघडवणे परवडत नसे. निदान पहिले दोन ऑपेरा तरी. मग हळूहळू अंदाज आल्यावर पिनिंग करून देऊन मग मशीनची शिवण घालायला दिले जाई वगैरे.
माझ्या तिथल्या पहिल्या वर्षी स्टीचिंग अप्रेंतीस म्हणून काम करताना तीन महिन्यात मी इतके हेमींग, बटणं लावणे वगैरे केलंय की नंतर परत युनिव्हर्सिटीत कॉश्च्युम शॉपमध्ये माझे विद्युतवेगाने हेमिंग करणे हा चर्चेचा विषय झाला होता. आणि थिंबलशिवाय हातशिलाई करता न येणे, लायनिंगमध्येही, कुठेही दिसत नसला तरी मॅचिंग धागाच वापरणे हे ही.

थिंबल

हल्ली हातशिलाईची सवय सुटली त्यामुळे त्यात आता सुबकताही राह्यलेली नाही आणि विद्युतवेगही. तारकामामुळे सुईदोऱ्याच्या ग्रिपचा घोळ होतो काहीतरी. पण आजही मला थिंबलशिवाय काम करता येत नाही.

पण माझ्याकडे सँटा फे ऑपेराच्या कॉश्च्युम शॉपच्या कहाण्या मात्र बऱ्याच आहेत. पुढची परत कधीतरी.

#सँटाफेऑपेराकॉश्च्युमशॉप #स्मरणरंजन #भूतकाळातल्यादिवसभराच्याकामातले #कॉश्च्युमशॉपच्यागोष्टी

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/08/2023 - 04:33

नीरजा, सांता फे शहर मला फार आवडतं. अत्यंत सुंदर आहे! लिहीच तिथल्या गोष्टी.

आजूबाजूच्या इतर ममव स्त्रियांसारखीच, माझी आईसुद्धा शिवणकाम करायची. लहानपणी माझे शाळेचे युनिफॉर्म तेवढे विकत आणलेले असायचे. बाकीचे सगळे फ्रॉक आईच शिवायची. स्वतःचे ब्लाऊजही. त्यामुळे आपल्याला शिवणकामाबद्दल बेसिक माहिती आहे, असं मला वाटायचं.

मग पुढे कधी युरोपात राहत असताना, वेगवेगळ्या दुकानांत थिंबलं बघितली पहिल्यांदा. विशेषतः बेल्जिमच्या ब्रूजमध्ये. ब्रूज हे गाव लेस बनवण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. सुंदर थिंबलं. पण हे कशासाठी ते माहीतच नव्हतं. 'असतील काय, काय ह्या श्रीमंतांच्या गरजा' म्हणून दुर्लक्षच केलं होतं. नंतर कधी तरी लक्षात आलं की लोकांना 'हे काय आहे', असं विचारता येतं; किंवा सरळ इंटरनेटवर शोधता येतं.

तेव्हा थिंबल काय आहे हे समजलं.

मी अजूनही क्वचित कधी स्वतःचे कपडे शिवते. अजूनही माझ्याकडे थिंबल नाही. तुझी लिसा मला वर्गाबाहेर काढणार, हे निश्चित!

नीधप Wed, 02/08/2023 - 07:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा मस्त प्रतिक्रिया.
थिंबल वापरून हाताशिलाई करून बघ. आपले हात आपल्याला दुवा देतात.
टाकू ना पुढचेही लेख?

सुधीर Wed, 09/08/2023 - 20:53

सँटा फे शहराचे नाव प्रथम मी "द गुड, द बॅड & द अग्ली" मध्ये ऐकले होते आणि ते तेव्हा शोधलेही होते. कारण तो चित्रपटच इतका आवडला होता. तेव्हा मला "सॅड हिल" पण आसपासच वा फार फार तर आसपासच्या राज्यात कुठेतरी असले पाहिजे असे वाटले होते. पण चक्क ते स्पेन मध्ये निघाले.