चिकित्सा : ‘उत्क्रांती, एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ ठरवणाऱ्या समजुतींची

‘आकाशातील ईश्वराचा लाडका माणूस’ पृथ्वीवर राहतोय, तरी पृथ्वी आणि ती वरील ‘त्या’चा ‘लाडका माणूस’ विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. पृथ्वीभोवती सूर्य आणि सूर्याचे बाकी ग्रह देखील फिरत नाहीत. उलट, पृथ्वीच सूर्याभोवती फिरते, हे सिद्ध करण्याचा, म्हणजेच ‘बायबल चुकीचे ठरविण्याचा गुन्हा’ गॅलिलिओ(1564-1642) यांच्याकडून झाला. त्यापायी चर्चशी संबंधित व्यक्तींकडून त्यांच्यावर खूप टीका झाली. गुन्ह्याबद्दल गॅलिलिओला सॉक्रेटिससारखे विषप्राशन करावे लागले नाही, पण उरलेले आयुष्य नजरकैदेत घालवावे लागले. गॅलिलिओने आधुनिक विज्ञानाचा पाया घातल्याचे मान्य झाल्यानंतर देखील सामाजिक बदलांना वेळ लागलेला असल्याचे आणि अजूनही लागत असल्याचे काही जणांना जाणवत आहे. तसेच, सत्ता मिळवण्या-टिकवण्यासाठी काहींनी देवा-धर्मांचा वापर करून इतिहासाची चाके उलटी फिरवली आहेत. आजही हे सगळं चालू आहे. परंतु सर्वसाधारणपणे गॅलिलिओनंतर देवा-धर्मांच्या धाकाशिवाय ‘चांगलं वागणं’ अधिकाधिक माणसांना जमू लागलं. परिणामी, मानवी समाजाची सहिष्णुता थोडीबहुत वाढली. ती सहिष्णुता सोबत घेऊन स्त्रीरोगतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. अरुण गद्रे यांचे ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ हे 2021 मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक वाचणे चांगले. कारण प्रस्तुत पुस्तक शीर्षकाला अनुसरून उत्क्रांतीचा सिद्धांत ही एक ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा असल्याचे’ सिद्ध करू पाहते.


Arun Gadre Book Cover
चित्र आंतरजालावरून साभार

प्रजातींच्या निर्मितीमागील धर्माच्या कथा, परिसरासोबत अनुकूलन करण्याला निसर्गाच्या धर्मशास्त्राचा पुरावा मानणे अथवा प्रेषित किंवा ईश्वराचा बुद्धिमान अभिकल्प (इन्टेलिजंट डिझाईन) अशा कल्पना प्रचलित आणि प्रभावी होत्या. या सर्व कल्पनांना डार्विन यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी उत्क्रांती-सिद्धांत मांडला, तेव्हा आणि आजही त्याला विरोध आहे. अशा काळात चार्ल्स डार्विन (1809-1882) यांनी तरुण वयाची 22 ते 27 (1831 ते 1836) ही पाच वर्षे दक्षिण अमेरिका खंड आणि ऑस्ट्रेलिया-न्यू झीलँड येथील सजीवांची पाहणी करण्यासाठी ‘एचएमएस बीगल’ या जहाजावर निसर्ग-वैज्ञानिक (नॅचरॅलिस्ट) म्हणून वापरली. त्या खडतर प्रवासांतून वाट्याला आलेल्या तब्येतीच्या तक्रारींसह निवडलेले काम त्यांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. कामाचा भाग म्हणून त्यांनी काहीशे पानांच्या सचित्र नोट्स ठेवल्या आणि अनेक जीवाश्मांचे पुरावे गोळा केले. त्या नोट्सचा 20 वर्षे विचार करत आणि संबंधित विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करत सजीवसृष्टीतील प्रजातींमध्ये विविधता कशा निर्माण होतात, हे स्पष्ट करणारा उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी 1859 मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला. पुस्तकाचे संपूर्ण शीर्षक आहे ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज, बाय द मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर प्रिझर्वेशन ऑफ फेव्हर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ’. पहिल्या आवृत्तीपासून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मात्र ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हेच संक्षिप्त शीर्षक बहुधा आढळते. प्रस्तुत पुस्तक 14 प्रकरणांचे आहे. यात डार्विन यांनी ‘इव्होल्युशन (उत्क्रांती)’ याऐवजी डिसेन्ट (Descent with variation, उत्क्रांतीक्रम, कूळ, वंश) हा शब्द वापरला आहे. या लेखात मात्र सर्वत्र उत्क्रांती हाच जास्त रूढ शब्द वापरला आहे.

गद्रे यांच्या नजरेतून उत्क्रांती-सिद्धांतामधील उणिवा
वाचकांना फक्त कुतूहल हवं, एवढीच गद्रे यांची अपेक्षा पुस्तकाच्या मनोगतात सांगून ते वाचकांना दोन गोष्टींची हमी देतात. पहिली, पुस्तक जीवपेशींची भन्नाट सफर घडवेल; खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, बायोकेमिस्ट्री या विज्ञानशाखांना स्पर्श करेल. दुसरी हमी आहे वरील शाखांतील विज्ञान ‘विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनादेखील कठीण वाटेल एवढं विकसित झाल्यानं’ पुस्तक खूप खोलात न जाता विषयाला फक्त स्पर्श करेल. त्याशिवाय, उत्क्रांती-सिद्धांतातील दोन महत्त्वाच्या उणिवांमुळे उत्क्रांती-सिद्धांत ही वैज्ञानिक अंधश्रद्धा कशी बनली आहे, हेदेखील पाहावे लागणार असल्याचे ते सुचवतात.

डार्विन यांची पहिली उणीव
गद्रेंच्या पुस्तकातील ‘मनोगत’,‘उत्क्रांतीच्या अंधाऱ्या गुहेत’ हे पहिले प्रकरण आणि ‘विज्ञान म्हणजे काय रे, भाऊ?’ हे दुसरे प्रकरण असे गृहीत धरते की ‘निर्जीव पदार्थापासून पृथ्वीवर पहिला सजीव कसा तयार झाला’, हा जणू डार्विन यांच्या ग्रंथाचा गाभ्याचा विषय आहे. पण गद्रे यांचे हे गृहीतक चुकीचे आहे! डार्विन यांच्या लेखी पृथ्वीवर कित्येक सहस्रकांपूर्वी काही तरी घडले आणि सजीवत्व साकारले. ते ‘काही तरी’ कसे घडले हे डार्विन यांना, तसेच आजच्या घडीला कुणाही वैज्ञानिकाला छातीठोकपणे माहीत नाही. डार्विन यांनी एक शक्यता गृहीत धरली आणि ती वाचकांनादेखील गृहीत धरायला सांगितली, एवढेच. पृथ्वीवर मानवाच्या नजरेत प्राचीन काळापासून वैविध्यपूर्ण वनस्पतीसृष्टी आणि प्राणीसृष्टी अस्तित्वात होती, ती बहरलीही होती. ही विविधतापूर्ण सजीव-सृष्टी आहे, म्हणूनच डार्विन यांना तिच्या उत्पत्तीबद्दल सांगायचे होते. ते त्यांनी ‘ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या ग्रंथात सांगितले आहे. ‘निर्जीव पदार्थापासून पृथ्वीवर पहिला सजीव कसा तयार झाला’, हा डार्विनच्या उत्क्रांती-सिद्धांताचा गाभ्याचा विषय नाही. त्यामुळे ती डार्विन यांची उणीव ठरत नाही.

डार्विन यांची दुसरी उणीव
‘उत्क्रांतीचे संशयास्पद पुरावे आणि विकसित झालेल्या आधुनिक विज्ञान-शाखांतील संशोधनाचे निष्कर्ष उत्क्रांतीच्या विरोधात जाणे’ ही गद्रे यांना डार्विन यांची दुसरी उणीव वाटते. त्यातील संशयास्पद पुरावे म्हणजे 1. डार्विन यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित फिंच पक्षांच्या विविध प्रजाती हा त्यांच्या ग्रंथातील एकमेव पुरावा आहे. 2. उत्क्रांती-सिद्धांताप्रमाणे एकपेशीय सजीवातून उत्क्रांत होत होत पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणी सृष्टीचा पसारा चिक्कार वाढला आहे. वरील दोन्ही उणिवा डार्विन यांना मान्य आहेत. होऊन गेलेल्या लाखो प्रजातींच्या संख्येच्या तुलनेत डार्विन यांचेकडे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित फक्त एका प्रजातीचा पुरावा आहे. तसेच, त्या तुलनेत डार्विन या एका व्यक्तीने गोळा केलेले जीवाश्म पुरावे संख्येने अत्यंत कमी होते. एवढुसे टीचभर काम करून डार्विन यांना होऊन गेलेल्या त्यांच्या काळात अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांची ओळख करून देणारा शेकडो खंडांतील ग्रंथ रचता आला नसता हे उघड आहे. परंतु प्रजातींच्या विविधतेचा वेध घेणारा उत्क्रांती-सिद्धांत मात्र डार्विन यांना कल्पकतेने मांडता आला. यात त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि विचारशक्तीचीही विस्मयकारक झेप दिसते. ती गद्रे उत्तमप्रकारे मान्य करताना डार्विन यांचे ‘विजय’ जागोजाग सांगतात. परंतु या ‘विजयां’तच गद्रे यांना डार्विन यांचा ‘पराजय’देखील दिसतो. त्या पराजयाला आधार डार्विनोत्तर काळातील आधुनिक जीवशास्त्रातील वैज्ञानिक संशोधनात आहे असे त्यांचे मत आहे. पृष्ठ 48 गद्रे सांगतात अ) जीवांमधील कोणताही बदल हा जनुकांतील उत्परिवर्तनामुळे (म्युटेशन) घडतो आणि हाच घटक (गद्रे यांच्या मते) उत्क्रांती-सिद्धांताला हादरे देणारा आहे. ब) आधुनिक जीवशास्त्रातील संशोधन सांगते की जीवांमध्ये अविभाज्य गुंतागुंत आढळते. ती होण्यासाठी अनेक प्रकारचे जनुकीय बदल एकाच वेळी घडणे आवश्यक असते. गद्रे त्याची चर्चा जवळपास 170 पृष्ठांत (प्रकरण क्र. 3 ते प्रकरण क्र. 13) करतात. यांतील पहिल्या दोन प्रकारांतील [‘अ)’ आणि ‘ब)’] पुरावे जिवाला उपकारक, मारक, अथवा ना उपकारक-ना मारक अशी एकूण उत्परिवर्तनेच कमी घडतात असे सांगतात. त्यापैकी विशिष्ट प्रकारचा बदल घडण्यासाठी विशिष्ट जनुकांत उत्परिवर्तने घडावी लागतात. एकूण जनुकांतील उत्परिवर्तनांची संख्याच एका पिढीत खूप कमी असल्याने जनुकांत जर काही बदल होण्यासाठी एकाच वेळी दोन किंवा अधिक उत्परिवर्तने घडणे आवश्यक असेल, तर ती संख्याशास्त्रीय शक्यता इतकी कमी होते की (उदाहरणार्थ, पृष्ठ 82वर एकाच वेळी दोन उत्परिवर्तने होण्यास 100 बिलिअन वर्षे लागतील) त्यासाठी पृथ्वीचे आत्तापर्यंत सरलेले आयुष्यदेखील पुरत नाही, असे गद्रे यांचे गणित सांगते. परंतु गद्रे यांच्या गणितातील संख्याशास्त्रीय शक्यता प्रत्यक्षात फक्त 100 बिलिअनावे वर्ष संपण्याच्या क्षणालाच अवतरली पाहिजे, असे सांगणारा नियम विज्ञानात नाही. ती शक्यता 100 बिलिअन वर्षांत केव्हा तरी एकदा घडण्याची शक्यता जास्त आहे, एवढाच त्याचा सरळसाधा अर्थ आहे. हे शक्यतांचे वास्तव गद्रे लक्षात न घेता ते उत्क्रांती-सिद्धांत हा ‘शब्दांचा’ आणि ‘कल्पनांचा’ खेळ असल्याच्या निष्कर्षाप्रत येतात आणि म्हणतात, ‘आधुनिक विज्ञानानुसार जीवसृष्टीत उत्क्रांती अशक्य आहे; हे सत्य जर वैज्ञानिक अमान्य करत असतील, तर ती वैज्ञानिक अंधश्रद्धाच ठरते.’ असो.

डार्विन यांची तिसरी उणीव
पृष्ठ 48 वरील तिसऱ्या पुराव्यात गद्रे अ) आणि ब) दोन प्रकारांशिवाय क) हा आणखी एक प्रकार सांगतात. तो डार्विन यांची तिसरी उणीव मानण्याइतका वेगळा आहे. ही तिसरी उणीव अशी आहे: ‘जीवशास्त्रात आता पावलोपावली (निर्मिकांचे) बुद्धिमान भिकल्प ते अगदी डीएनएमधील आज्ञावल्यांपासून उघड-झाप होणाऱ्या जनुकांपर्यंत आढळून येताहेत.’ अशा अर्थाची विधाने गद्रेंच्या पुस्तकात अनेक ठिकाणी भेटतात. यासाठी ते सांगतात की जिवांमधील कोणताही बदल हा जनुकांतील उत्परिवर्तनामुळे (म्युटेशन) घडतो आणि हाच घटक (गद्रे यांच्या मते) उत्क्रांती-सिद्धांताला हादरे देणारा आहे. आधुनिक जीवशास्त्रातील संशोधन सांगते की जिवांमध्ये अविभाज्य गुंतागुंत आढळते. ती होण्यासाठी अनेक प्रकारचे जनुकीय बदल एकाच वेळी घडणे आवश्यक असते. परंतु गद्रे यांच्या गणिताप्रमाणे (पृष्ठ 82) ते तर अशक्य आहे. थोडक्यात, ‘जे जे विज्ञानाला माहीत नाही तो तो निर्मिकाच्या बुद्धिमान अभिकल्पाचा आणि म्हणून कदाचित निर्मिकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, असे गद्रे यांना वाटत असावे. त्यासाठी त्यांना वेगळा पुरावादेखील लागत नसावा. क्षणभर गद्रे यांचे वाटणे वाचकांनी चर्चेसाठी गृहीत धरले तरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे हे गृहीत धरल्याने वाचकांच्या किंवा गद्रे यांच्या ज्ञानात कोणती भर पडते? लोक निर्मिक, ईश्वर अथवा सुपरनॅचरल पॉवर यांचे अस्तित्व मान्य करत आहेत, एवढे समाधान फक्त त्यांना मिळेल. परंतु असा निष्कर्ष काढण्यापूर्वी जर त्यांनी या शाखेतील विज्ञानात निर्मिकाची लुडबुड नको असणाऱ्या नव्या संशोधनातून भर घालणाऱ्या संशोधकांचेदेखील काम नजरेखालून घातले असते तर या संशोधकांची जिद्द तरी त्यांना जाणवली असती. ते त्यांनी केल्याचे आढळत नाही. मानवाने मोठ्या जिद्दीने रचलेले ज्ञानच फक्त मानवाला उपयोगी पडू शकते, हे गद्रे यांनी लक्षात घेतले असते, तर आजचे अज्ञान भविष्यात उजळू शकेल यावर ते ठाम राहू शकले असते. त्या प्रयत्नांची एक झलक पुढे दिली आहे :

जैव-रासायनिक (बायोकेमिकल) प्रक्रियांचा वेग
गद्रे हे लक्षात घेत नाहीत की सजीव-सृष्टीतील बदलाच्या प्रक्रिया किती तापमानाला आणि दाबाला किती वेळात पूर्ण करू शकेल, याचे गणित रासायनिक गतिकी (केमिकल कायनेटिक्स) हीच ज्ञानशाखा अनुभवाच्या आधाराने करू शकते. सजीवांच्या पेशींतील जवळपास सर्व जैव-रासायनिक प्रक्रिया डीएनए, एन्झाईम्स, हार्मोन्स या प्रथिनांच्या म्हणजेच रसायनशास्त्रातील उत्प्रेरकांच्या (कॅटॅलिस्ट) मदतीने होतात. या प्रक्रिया अशा उत्प्रेरकांच्या मदतीशिवाय पेशीच्या तापमानाला आणि पेशीतील द्रवाच्या दाबाला कित्येक वर्षांत पूर्ण होणे अशक्य ठरते. उदाहरणार्थ, माणसाने खाल्लेले अन्न पाच-सहा तासांत पचते. तीच प्रक्रिया कुठल्याही उत्प्रेरकाशिवाय मानवी शरीराच्या नॉर्मल तापमानाला आणि दाबाला प्रयोगशाळेत करायची झाल्यास कदाचित काही महिने लागतील. त्याच प्रक्रिया पेशींतील हजारो उत्प्रेरकांच्या मदतीने कमी उर्जेची गरज असणारा मार्ग निवडून जास्त वेगाने आणि पेशीला इजा न पोहोचवता पूर्ण करतात. प्रक्रिया पूर्ण होताच उत्प्रेरके पूर्व स्वरूपात आणि पूर्व प्रमाणात बाहेर पडतात. परिणामी, एकाच वेळी जास्त उत्परिवर्तने घडण्याचीदेखील शक्यता वाढते.

उत्परिवर्तनांवर परिणाम करणारे घटक
फक्त उत्परिवर्तनामार्फत प्रजाती उत्क्रांत होत असल्या, तरी त्या छोट्याछोट्या-उत्परिवर्तनांवर परिणाम करणारे पुढील घटक आहेत 1) जीन संचय किंवा प्रजाती सभासदांची छोटी संख्या (Small Population [of individuals of a species]) 2) अनिर्बंध (वा) रूढीबद्ध लैंगिक संबंध (Non-Random Mating 3) नवनवी उत्परिवर्तने new Mutaions 4) जीन फ्लो किंवा प्रजातीच्या कमी सदस्यांचे स्थलांतर अथवा अलगीकरण (Gene Flow [in or Out flow]) 5) अनुकूलन (Adaptation). त्यातूनच काही सहस्र पिढ्यानंतर स्वतंत्र मोठे उत्परिवर्तन घडून स्वतंत्र प्रजाती अस्तित्वात येते.

वरील दोन्ही मुद्दे लक्षात घेऊनच उत्क्रांती शक्य आहे, असे आधुनिक विज्ञान पुराव्यानिशी भविष्यात जास्त खात्रीने सांगू शकेल हा आशावाद बाळगणे गरजेचे आहे. परंतु गद्रे यांनी वरील दोन मुद्द्यांचा विचार केल्याचे दिसत नाही. त्यामुळे गद्रेंचा डार्विन यांच्या उत्क्रांती-सिद्धांतावरील हा तिसरा आक्षेप गैरलागू आहे, असे म्हणणे भाग आहे.

विज्ञान अज्ञाताचा शोध असाही घेते!
डार्विननेही पृथ्वीवर पाहिला सजीव कसा उत्पन्न झाला असावा, याबाबत एक गृहीतक मान्य करायला सांगितले. त्यासाठी त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता हा गद्रे यांचा पहिला आक्षेप होता. खरं तर अशी गृहीतके स्वीकारणे ही विज्ञानाची अज्ञाताचा शोध घेण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. त्यातून विज्ञानाचा मोठा बोलका इतिहास साकारला आहे. त्याबाबतची दोन बोलकी उदाहरणे तेवढी पाहू या -

उदाहरण 1: प्रकाश कणरूपी आहे, असे युरोपभर प्रसिद्धी पावलेल्या आयझॅक न्यूटनचे म्हणणे होते. आणि त्या काळी ख्रिश्चन हिगीन्स (Christian Huygens 1629 to 1695) यांचे प्रयोगनिष्ठ मत प्रकाश तरंगरूपी (Wave Nature) आहे, असे होते. प्रत्येक मत प्रकाशाच्या अभ्यासक्षेत्रांतील मोजके गुणधर्म स्पष्ट करू शकत होते. पुढे प्रकाशाचे स्वरूप विद्युत-चुंबकीय लहरींचे आहे, आणि त्याच वेळी एक विशिष्ट स्थिरांक गुणिले प्रकाशाच्या प्रतिसेकंदातील वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) एवढ्या उर्जेच्या कणाएवढा प्रकाश-पुंज (फोटॉन हा ‘कण’) असतो, असे सध्या मान्य झाले आहे. म्हणजे न्यूटन आणि हिगीन्स हे बाद होण्याऐवजी ते दोघेही प्रकाश-विज्ञान शाखेच्या इतिहासाचे भाग बनले. 
जोहान्स केप्लर यांनी कित्येक रात्री ताऱ्यांच्या संदर्भात ग्रहांची स्थाने पाहून त्यांच्या नोंदी टिपण्यात घालवल्या. त्यातून त्यांनी सूर्याभोवती ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षांविषयी तीन नियम शोधले. पुढे काही वर्षांनी आयझॅक न्यूटन यांनी केप्लरच्या तीन नियमांमध्ये काही बदल करून ‘सर्वत्र’ लागू पडणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचे नियम सूत्रबद्ध केले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अल्बर्ट आईनस्टाईन यांनी गुरुत्वाकर्षणाची आणखी विस्तृत मांडणी करण्यासाठी जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि विशेष सापेक्षता सिद्धांत (स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) यांचीही जोड दिली. या तिघांनीही जी गृहीतके मांडली होती त्यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नव्हता. कल्पनेतील काही गृहीतके स्वीकारली होती. उदाहरणार्थ, आईनस्टाईन यांनी प्रकाशाचा निर्वात पोकळीतील वेग हा सर्वात जास्त वेग असल्याचे, गृहीतक मानले होते. त्यातून त्यांनी ज्ञानाची नवी विस्तारणारी भांडारे उभारली. 


उदाहरणे खूप देता येतील. परंतु सार एवढेच की आधुनिक विज्ञान एखादी नवी अफलातून कल्पना गृहीतक स्वरूपात स्वीकारून अनेक नैसर्गिक घटितांची सैद्धान्तिक स्पष्टीकरणे देऊ शकते. अशा सिद्धांतांना नंतर का होईना प्रयोगांचे आधार लाभतात, तोपर्यंतच्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण देण्याची आणि प्रयोगांनी तपासणे शक्य असणारी काही भाकिते वर्तविण्याची त्यांच्यात क्षमता असू शकते. ज्या सिद्धांतांत अशा जास्त गोष्टींची क्षमता असते, त्यांना जास्त विश्वासार्हता मिळते.

डार्विन यांचे ‘निर्जीवांपासून सजीवांची निर्मिती झाली असावे, हे गृहीतक त्याच प्रकारचे होते. कुणी सांगावे, कदाचित विज्ञान ते बरोबर असल्याची मोहोर भविष्यात त्यावर उठवेल किंवा दुसऱ्याच अगदी नव्या शक्यतेवर ती मोहोर उठवेल. त्यामुळे उत्क्रांती-सिद्धांताला काही फरक पडत नाही.
भविष्यात कधी जुना सिद्धांत अपुरा असल्याचे किंवा कधी बाद करावा लागण्याइतका चुकीचा ठरू शकतो. अशा शक्यतांना विज्ञान घाबरत नाही. ते जुनी सत्ये, जुने सिद्धांत यांचे अपुरेपण सिद्ध झाल्यास ते अपुरेपण विज्ञान मान्य करते. कधी त्यांवर फुलीदेखील मारते. यातून घडते इतकेच की प्रत्येक वैज्ञानिकाच्या पिढीचा मानवी बुद्धी आणि सृजनशीलता यांवरील विश्वास थोडा जास्त ठाम होतो. ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. नव्याने तयार झालेल्या मोकळ्या जागा पुढील पिढीकडून भरण्याची विज्ञान वाट पाहते. आणि हो, विज्ञान त्रिकालाबाधित सत्य कधीच सांगत नाही या नियमाची पुष्टी होते.

लेखाच्या शेवटी आनंद करंदीकर यांच्या ‘विचारवेध’वरील “उत्क्रांती चर्चा आणि वाद-विवाद” यावरील मांडणीचा तसेच, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अंनिस वार्तापत्र, येथे डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या याच विषयावर प्रसिद्ध झालेल्या लेखांचाही शांतपणे विचार करावा. त्याच वेळी संवादाचे वातावरण टिकून राहण्यासाठी ‘इतरांना स्वतःचे म्हणणे पटलेच पाहिजे’, हा दुराग्रह टाळावा. आणि उत्क्रांती हा माझा अभ्यासाचा विषय नसल्याने मोठा लेख त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. विनीता बाळ यांना त्यांच्या तज्ज्ञ मतासाठी दिला होता. त्यांनी तो लेख बारकाईने वाचून त्यात आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे मत दिल्याने प्रस्तुत लेख प्रसिद्धीस देण्याचा आत्मविश्वास मला आला. त्यांचे मनापासून आभार! तसेच माझा 5 हजार शब्दांपेक्षा मोठा असलेला मूळ लेख दोन हजार शब्द-संख्येत बसवण्याच्या कामी डॉ. अनंत फडके यांनी मोलाची मदत केली आहे. लेखक त्यांचाही मनापासून आभारी आहे.

---
शीर्षक : ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’

लेखक : डॉ. अरुण गद्रे

प्रकाशक : सुनिधी पब्लिशर्स, पुणे

प्रथम प्रसिद्धी : 2021

पृष्ठे : बारा +260

मूल्य : रु. 400/-

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

डार्विन यांचे ‘निर्जीवांपासून सजीवांची निर्मिती झाली असावे, हे गृहीतक त्याच प्रकारचे होते. कुणी सांगावे, कदाचित विज्ञान ते बरोबर असल्याची मोहोर भविष्यात त्यावर उठवेल किंवा दुसऱ्याच अगदी नव्या शक्यतेवर ती मोहोर उठवेल. त्यामुळे उत्क्रांती-सिद्धांताला काही फरक पडत नाही.
भविष्यात कधी जुना सिद्धांत अपुरा असल्याचे किंवा कधी बाद करावा लागण्याइतका चुकीचा ठरू शकतो. अशा शक्यतांना विज्ञान घाबरत नाही. ते जुनी सत्ये, जुने सिद्धांत यांचे अपुरेपण सिद्ध झाल्यास ते अपुरेपण विज्ञान मान्य करते. कधी त्यांवर फुलीदेखील मारते. यातून घडते इतकेच की प्रत्येक वैज्ञानिकाच्या पिढीचा मानवी बुद्धी आणि सृजनशीलता यांवरील विश्वास थोडा जास्त ठाम होतो. ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. नव्याने तयार झालेल्या मोकळ्या जागा पुढील पिढीकडून भरण्याची विज्ञान वाट पाहते. आणि हो, विज्ञान त्रिकालाबाधित सत्य कधीच सांगत नाही या नियमाची पुष्टी होते.

अख्ख्या पुस्तकाचं सार हेच म्हणावं लागेल. तुमच्या वाचन-ओढीला दाद दिली पाहिजे.

हे साधारणत: 'उत्क्रांती म्हणजे अंधश्रद्धा, आयुर्वेद म्हणजे सबकुछ, संस्कृतीमध्येच सगळंकाही' छाप लोकांचं आर्ग्युमेंट असतं. "तुमचं विज्ञान कुठे परिपूर्ण आहे?" नि काय काय. खरंतर शीर्षक वाचूनच ते पुस्तक हातात घेतलं नसतं म्हणा.

परत एकदा पुस्तक पूर्ण वाचल्याबद्दल दाद. कसं जमतं बा!

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लेखन कसं करू नये? - अरुण गद्रे आणि शंतनू अभ्यंकर यांचे लेख
यापुर्वीचे या विषयावरील हा लेख वाचावा.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मोठ्या जागतिक दर्जा च्या कंपन्या त्यांना हवं तेच विज्ञान म्हणून जगासमोर विज्ञान आणतात .
आणि विज्ञान ची half मर्डर करतात
आणि पुढे

कोणत्या ही शोधाचा अर्थ आपल्याला हवा तसा लावून बाकी समाज घटक अर्ध मेल्या झालेल्या विज्ञान च्या गळ्या वर शेवटची सुरी फिरवतात

तुमच्याकडे खूप पेशन्स आहेत, हे पुस्तक वाचण्यासाठी. मला ते अजिबात झेपलं नसतं. त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन.

विज्ञानाचा गाभाच गद्रेंना समजलाय, असं लेख वाचून वाटत नाही. उत्क्रांतीचा सिद्धांत निराळा आणि चार्ल्स डार्विन ही व्यक्ती निराळी इतकी साधी(!) गोष्टही त्यांना समजल्ये, असं हा लेख वाचून वाटत नाही. त्यामुळे 'मला डार्विनची भक्ती करायची नाही तर कुणा निर्मिकाची भक्ती करायची आहे', असा काहीसा गद्रेंचा विचार असावा असं वाटलं.

हे सगळं लेख वाचूनच. गद्रेंना कदाचित हे मत पटणार नाही; पण त्यांना मान्य होणारं किंवा आणखी योग्य मत मांडण्यासाठी मी पुस्तक वाचायला जाईनसं वाटत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणूनच आजवर डार्विनच्या थिअरीला थिअरीच म्हणतात. शिवाय डार्विनला उतारवयातदेखील नोबेल पुरस्कार मिळाला नाही हे देखील पुरेसं बोलकं आहेच.

हा घ्या ढळढळीत पुरावा. हा बटाटा कसा काय थेट अन्नसाखळीच्या वर पोचून उत्क्रांत होऊ शकतो?

x