सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ५ - प्रेसिजन बिसिजन
हे प्रत्यक्ष सँटा फे ऑपेराच्या इथले नाहीये पण कॉश्च्युम शॉपचीच गोष्ट आहे म्हणून याच सिरीजमध्ये घेतेय.
------ ------------ - - --
मी आणि केविन एकमेकांच्या कटींग आणि पिनिंगवर हसायचो. कटींग म्हणजे कापड बेतणे आणि बेतलेले दोन कापडाचे तुकडे मशीनवर जोडताना आधी टाचण्या लावायच्या असतात ते पिनिंग. केविनला वेळ लागायचा. मी धडाधड करायचे. त्यामुळे मी माझे नाक खूप वर करायचे. मग यायची बाही. बाही गोल जोडताना - म्हणजे आधी बाही बनवून मग ती धडाला जोडणे - हे करताना बाहीची शिवण नेमक्या गोलाव्यात कधी कधी उसवायला लागायची मला. पण केविनला कधीही तसे करायला लागायचे नाही.
कापडाचे चार थर ठेवायचे. वरच्या थरावर पॅटर्न काढायचा. सगळ्या बाजूने शिलाईसाठी ठराविक माया सोडायची आणि एकदम चार थर कापायचे. नंतर कडेला कड जोडून जितकी माया सोडली असेल त्या हिशोबाने मशीन मारायची. हवं तर शिलाईच्या रेषेला काटकोनात टाचून घेऊन मशीन मारायची. किती सोप्पंय ना? मला असंच शिकवलं गेलं होतं इथे.
केविन म्हणजे माझ्यासारखाच असिस्टंटशिपवर एम एफ ए करणारा आणि असिस्टंटशिपचा भाग म्हणून कॉश्च्युम शॉपमधे काम करणारा माझ्यापेक्षा दोन वर्ष जुना विद्यार्थी आणि टिना आमची शॉप मॆनेजर. दोघेही माझी कापड बेतायची, कापायची, टाचायची पद्धत बघून अवाकच असायचे. इतकं ढोबळपणे कपडे शिवणे त्यांच्या पचनी पडत नव्हते.
एक दिवस मला माहिती असलेल्या पद्धतीप्रमाणे म्हणजे जिथे शिवण मारायची त्या रेषेला काटकोनात येतील अश्या प्रकारे पिना टाचून मशीन मारत असताना सुई नेमकी आपटली पिनेवर आणि सुईचा तुकडा पडला आणि उडाला. नशिबाने चेहऱ्यावर न येता कुठेतरी पडला. आणि केविन हसला किंवा मला तसे वाटले.
मग मी केविनची पद्धत समजून घेतली. एकावर एक चार थर बसवून कापड कापताना एखाद्या थरातले कापड थोडेसे मागेपुढे सरकू शकते. सर्व थरांवर पॅटर्न आखलेला नसतो. अश्या वेळेला ठराविक माया गृहित धरून तेवढे आतमधे असे समजून शिलाई मारली गेली तर पॅटर्नमधे गोंधळ झालाच म्हणून समजायचा. गळे, कॉलर्स, बाही वगैरे अश्या ठिकाणी असा एक मिलीमीटरचा फरक पण त्रासदायक ठरतो.
यासाठी जेवढे लेयर्स त्या प्रत्येकावर पॅटर्न आखला जायला हवा. आणि माया गृहित धरून शिवण न मारता. जिथे पॅटर्न आखलाय त्या रेषा म्हणजे शिलाईच्या रेषा जोडून कापड टाचले गेले पाहिजे. खरंतर कापड कापतानाही एकदम अनेक लेयर्स कापायचेच नसतात पण सर्व थरांवर पॅटर्न आखला की मग कापड एकत्र कापताना एखादा लेयर सरकला बिरकला तरी गोंधळ होत नाही.
मग येतं पिनिंग. तुमचं कापड घट्ट आहे, शिवणी सरळ आहेत तर दोन्ही बाजूच्या शिलाईच्या रेषा एकावर एक ठेवून त्या रेषांच्या काटकोनात टाचण्या लावल्या अंतरावर तर चालू शकते. मात्र मशीनच्या पायाखाली जायच्या आधी ती पिन काढून बाजूला करायला हवे नाहीतर मशीनची सुई टाचणीवर आपटून तुटणे, तो तुकडा उडून कुठेही लागणे, टाचणी वाकणे वगैरे गोंधळ होतात.
पण तुमचं कापड सुळसुळीत आहे, शिवणींच्यात गोलवा आहे तर मात्र दोन्ही बाजूंच्या शिलाईच्या रेषा एकावर एक ठेवून त्या रेषेवरच आणि अगदी कमी अंतरावर पिना टाचायला हव्यात. म्हणजे साधारण संपूर्ण शिलाई पिनांनीच केल्यासारखे कापड जोडले जाईल. कुठेही नको तशी चूण किंवा कापड ओढले जाणे होणार नाही. मशीनखाली ज्या दिशेला कापड जाणार त्या दिशेला पिनांचे टोचरे टोक ठेवायचे आणि कापड मशीनच्या पायात पुढे पुढे जाताना एकेक पिन मागे काढून टाकायची.
याला वेळ लागतो. पण प्रेसिजन हवे तर हे हवेच. या प्रेसिजनची सवय लागली, ही पद्धत हातात-डोक्यात बसली आणि मी पण केविनबरोबर पुरेसा वेळ घेऊन, दहा वेळा न उसवता कपडे शिवू लागले. अमेरीका देशी, जॉर्जिया प्रांती असलेल्या एका युनिव्हर्सिटीतल्या नाटकांच्या कॉश्च्युमसाठीही इतपत प्रेसिजन तर असायलाच हवे. किंवा कुठेही प्रेसिजन असायलाच हवे हा धडा मिळाला. असे विविध धडे वर्षभर गिरवत मी सँटा फे ऑपेराच्या कॉश्च्युम शॉपमधे काम करण्यासाठी, अजून पुढच्या पातळीचे प्रेसिजन शिकण्यासाठी सज्ज होत गेले.
बारीकसारीक गोष्टीत प्रेसिजन राखायला शिकलं की आपोआपच ते सगळ्या कामात, जगण्यात उतरायला लागतं. मग तुम्ही आयुष्यभरासाठी बरबाद होता. त्याची सुरूवात इथे झालेली होती.
#स्मरणरंजन #भूतकाळातल्यादिवसभराच्याकामातले #कॉश्च्युमशॉपच्यागोष्टी #शिलाईबिलाई #प्रेसिजनबिसिजन
- नी
प्रतिक्रिया
मग तुम्ही आयुष्यभरासाठी बरबाद
मग तुम्ही आयुष्यभरासाठी बरबाद होता
हेहेहे