बिग् बॉस

बिग् बॉस या टीव्हीवर भरपूर टी आर पी कमावणाऱ्या रियालिटी शोला अलिकडे उतरंडीची कळा लागली होती. प्रेक्षकांनी व जाहिरातदारांनी या शोकडे पाठ फिरवली होती. कदाचित आमची माती आमची माणसं याची टी आर पी सुद्धा तुलनेने बरी असू शकेल. सुरुवातीला टीव्ही प्रेक्षकातील आंबटशौकीनांना बिग् बॉसच्या 'त्या बंगल्या'तील चार भिंतींच्या आड नेमके काय घडत आहे याची उत्सुकता होती. एपिसोड एडिटर त्याचा पुरेपूर फायदा घेत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होता. बिग् बॉसला न जुमानता त्याच्याही नजरेआड अनेक गोष्टी घडत असाव्यात. परंतु त्या दाखवल्या जात नाहीत याबद्दल प्रेक्षक नाराज होते.

खरे पाहता 10 -15 सेलिब्रिटीजना एकाच ठिकाणी बाहेरच्या जगापासून दूर कुठे तरी 3 महिने वास्तव्य करण्यास सांगणे अत्यंत क्रूरपणाचे ठरेल. त्या सेलिब्रिटीजना ती एका प्रकारची मृत्युदंडाची शिक्षा आहे असे वाटत असावे. त्यापेक्षा गोयंकांचा 10 दिवसाचा विपश्यना शिबिरातील 'मंगल मौन' परवडला. बिग् बॉसच्या बंगल्यात टीव्ही नाही, मोबाइल नाही, संगणक नाही, लॅपटॉप नाही, इंटरनेट नाही, रेडिओ नाही, आयपॅड नाही, गाणे नाहीत... मग करायचे तरी काय? खाणे - पिणे, नुसत्या गप्पा, बडबड, वा एकमेकांची टिंगल ... टवाळी. किंवा टाइमपाससाठी नाच, गाणी, माकडउड्या, उचलकूद.... परंतु हे सर्व कॅमेर्‍याच्या करड्या नजरेतून... गुलामांचे जिणे.... पैसा कमविण्यासाठी माणूस कुठल्या पातळीपर्यंत जावू शकतो याचे हे एकमेव जिवंत उदाहरण असू शकेल. मात्र दर आठवड्याला एका 'शामळू'ला बंगल्याबाहेर काढताना मजा येत होती. तेवढाच रिलीफ...

बंगल्याच्या मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे ठेवल्यामुळे बिग बॉसची करडी नजर आपल्याला हवे ते करू देत नाही, ही एकमेव खंत बहुतेकांच्यात होती. मुळात सेलिब्रिटीजची जनसामान्यात असलेली प्रतिमा आणि बिगबॉसच्या बंगल्यातील त्यांचे वर्तन यात फार मोठा फरक जाणवत होता. एक - दोन दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या शक्ती कपूरच्या आवतीभोवती 10 -15 तरुणी असूनसुद्धा त्याच्यात खलनायकी हावभाव, अचकट विचकट हातवारे, द्वयर्थी संवाद यांचा कुठेही मागमूस नव्हता. शक्तीकपूरचे असले 'जंटलमन' वागणे प्रेक्षकांच्या दृष्टीने विसंगत होते. यातच या सिरियलचे भवितव्य लक्षात आले व शो फ्लॉप होऊ लागला. बिग् बॉस म्हणवून घेणार्‍या संजय दत्त व सलमानखान या जोडगोळीला मात्र हळू हळू उतरत चाललेल्या टी आर पी ची खंत नव्हती. बिग् बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतल्यानंतरसुद्धा टीव्ही प्रेक्षक बिग् बॉस न बघता चॅनेल बदलून जय गणेश, जय हनुमान सारख्या ऍनिमेशन फिल्म्स् बघतात याचा अर्थ काय? या प्रश्नाला बिग् बॉसच्या निर्मात्याकडे उत्तर नव्हते. या स्थितीत निर्माता असताना त्याची भेट एका संगणकतज्ञाशी होते व हा संगणक तज्ञ टी आर पी वाढविण्याची एक नामी युक्ती सुचवतो.

"माणसाचा मेंदू हा विचार व कृती करण्यासाठीचा आपल्या शरीरातील इंजीन आहे. आणि महत्वाचे म्हणजे तो अमूर्त स्वरूपात नसून प्रत्यक्षपणे शरीरात घर करून आहे व त्याचे फिजिकल अस्तित्व जाणवते. त्यामुळे मेंदूच्या पृष्ठभागावर होत असलेल्या सूक्ष्म बदलावरून माणूस नेमका काय विचार करत आहे, कुठल्या कृतीचे नियोजन करत आहे, कुठल्या कृतीला अग्रक्रम देत आहे...याचा अचूक अंदाज घेणे माझ्या परम - 100 या संगणकामुळे आता शक्य होणार आहे. परम - 100 च्या आज्ञाप्रणालीच्या काही मर्यादा असल्या तरी बिग् बासच्या बंगल्याच्या आवारातील एखाद्या बंदिस्त खोलीत अत्यंत गुप्तपणे इन्स्टाल करून त्याला विशिष्ट प्रकारचे CCTV कॅमेरे जोडल्यास आपले काम फत्ते होईल. बंगल्यातील प्रत्येकाच्या हालचालींची कॅमेरा स्कॅनिंग करून नोंद ठेवील व या संगणकाला कॅमेराच्या स्कॅनिंगवरून त्या व्यक्तीच्या मेंदूची स्थिती कळेल. व मेंदूच्या स्थितीवरून ती व्यक्ती पुढील काही मिनिटात नेमके काय करू शकेल याचा अचूक अंदाज घेत त्याचे पूर्ण चित्रण आपल्याला उपलब्ध करून देईल. आपण हेच स्प्लिट स्क्रीन वर दाखवल्यास धमाल येईल. टी आर पी वाढेल... जाहिराती वाढतील...

संगणकाची कार्यप्रणाली भरपूर गुंतागुंतीची आहे हे मान्य करूनसुद्धा नियंत्रित वातावरणात 10-15 सेलिब्रिटीजच्या मेंदूत काय स्थित्यंतर होतात यावरून त्यांची पुढची कृती काय असू शकेल याचे निदान करणे शक्य होईल. संगणकाची ही आज्ञाप्रणाली प्राथमिक स्वरूपात असल्यामुळे संगणक फक्त पुढील काही मिनिटाचाच अंदाज देऊ शकेल. ही त्याची मर्यादा आहे. त्यानंतर अंदाजातील लहानातील लहान चूकसुद्धा कार्यप्रणालीला कोसळून टाकेल व संगणक निकामी होईल.

संगणकाची ही करामत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्यक्ष सहभाग घेणार्‍या व्यक्तीलासुद्धा माहित नसणार्‍या गोष्टी संगणकाद्वारे प्रेक्षकांना यानंतर कळू शकतील.

याचीच पुढची पायरी म्हणजे सेलिब्रिटीजच्या मेंदूचा ताबा घेत आपल्याला हवे तसे त्यांच्याकडून कृती करून घेणे. transcranial magnetic stimulationचा वापर करून संगणक सेलिब्रिटीजच्या विचार व कृतीवर नियंत्रण ठेवू शकेल, हवे तसे त्यांच्या कडून काम करून घेऊ शकेल, संवाद म्हणवून घेऊ शकेल. एवढेच नव्हे तर संगणक आपला ताबा घेतला आहे याचा थांगपत्ताही सेलिब्रिटीजना लागणार नाही. ते जे काही करतात ते सर्व त्यांच्या स्वत:च्या निर्णयानुसारच करत आहेत असेच त्यांना वाटेल. त्यामुळे संशयाला अजिबात जागा नाही. स्क्रिप्ट रायटरला (व प्रेक्षकांना) जे हवे ते आपण या संगणकामुळे देऊ शकू याची मला खात्री आहे."

निर्माता अवाक् होऊन हे सर्व ऐकत होता.

Source: The Deterministic Thesis of the French Mathematician Pierre - Simon Laplace (1749-1827)

पियरे लॅप्लास या फ्रेंच वैज्ञानिकाच्या मते भौतिकीतील एकूण एक सिद्धांतांची व नियमांची इत्थंभूत माहिती व विश्वभरातील प्रत्येक कणांचे विशिष्ट स्थान यावरून भविष्यात कुठे कुठे काय काय घडू शकते याचा अचूक अंदाज घेणे शक्य आहे. (Laplace's Demon) परंतु क्वांटम सिद्धांताने पूर्व स्थितीवरून कार्य कारण प्रक्रियेतून प्रत्येक वेळी अचूक अंदाज येईलच याची खात्री देता येत नाही, असे सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे लॅप्लासची भविष्यातील निश्चिततेच्या संबंधीची भविष्यवाणी खोटी ठरत आहे. लॅप्लासच्या कल्पनेतील निश्चिततेपेक्षा कित्येक पटीत अनिश्चितता या विश्वात आहे, याबद्दल दुमत नसावे.

क्वांटम प्रक्रिया व त्याचा प्रभाव अणू रेणूंच्या सूक्ष्मपातळीवर घडत असल्यामुळे आपल्या विश्वातील व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी लॅप्लासचे विधान अजूनही लागू होऊ शकते. कारण या विश्वातील प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असतेच. त्यामुळे कार्यकारणभावाच्या मधूनच घटनांचा वेध घेणे शक्य होत आहे. लॅप्लासचा निरीक्षक म्हणून आपण काम करताना पूर्णपणे अचूक अंदाज करू शकत नसलो तरी काही प्रमाणात तरी भविष्यातील घटनांचा वेध घेऊ शकतो. त्यामुळे संगणकतज्ञाचा परम -100 या संगणकासंबंधीचे विधान सैद्धांतिक पातळीवरील एक संभाव्य संकल्पना आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. .

परम - 100 संगणकाच्या अंदाजावरून बिग् बॉसचा शो बघताना तो कितपत प्रेक्षकाना आवडेल याविषयी शंका आहेत. कदाचित त्यांचा अपेक्षाभंग होईल. सेलिब्रिटीजचे वेळोवेळचे वर्तन वा विचार हा त्यांच्या मेंदूंच्या स्थितीगतीवरून व भोवतालच्या त्या वेळच्या परिस्थितीवरून संगणकानी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणेच घडत जाणार आहेत. बिग् बॉसच्या शोमध्ये भाग घेणारे संगणकाच्या हिशोबाप्रमाणे वागणार आहेत. म्हणजेच हे सेलिब्रिटीज संगणकाच्या हातातील बाहुल्यासारखे नाचणार आहेत असे म्हणावे लागेल. मुळात प्रेक्षकांना सेलिब्रिटीजना संगणक नाचवतोय की एपिसोड दिग्दर्शक नाचवतोय हेच कळणार नाही. किंवा संगणक परम -100 हा फक्त शोपीस आहे असेही वाटण्याची शक्यता आहे.

आपण ही समस्या कशा प्रकारे हाताळणार आहोत?

एक शक्यता अशी आहे की हे संगणक, ही आज्ञाप्रणाली, त्यातून मिळालेले अंदाज हे सर्व खोटे आहेत व या गोष्टी शक्य नाहीत, असे म्हणत ही संकल्पनाच पूर्णपणे नाकारणे. मुळात माणूस प्राणी हा free will वर जगणारा प्राणी आहे मी जे करतो ती माझी स्वत:ची जाणीवपूर्वक केलेली कृती असून त्यात कुणीही ढवळा ढवळ करू शकणार नाही, याचा मनुष्य प्राण्याला गर्व आहे. माणसाकडे मुक्त स्वातंत्र्य असल्यामुळे संगणकाच्या इशार्‍यानुसार तो कधीच वर्तन करणार नाही.

परंतु अशा प्रकारच्या नकारात्मक प्रतिसादातून जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तिचा आपण स्वीकार करणार नाही असा अर्थ ध्वनित होतो. आपल्याला परम - 100 संगणक ही संकल्पना संभाव्य आहे की नाही याची कारण मीमांसा करायची आहे, फक्त ते शक्य नाही असे तुटक उत्तर नको आहे.

दुसरी शक्यता अशी आहे की क्वांटमच्या अनिश्चिततेच्या सिद्धांताला शरण जाणे. येथेही आपल्या पदरी निराशाच येणार आहे. निश्चिततेच्या संबंधात आपण ज्या प्रकारे कल्पना लढवू शकतो वा विचार प्रयोग करू शकतो त्याच्या कित्येक पटीत अनिश्चितता या जगात आहे, असेच क्वांटम सिद्धांत विधान करते. कार्यकारणांची जंत्री कितीही अचूक वाटत असली तरी एखाद्या यादृच्छिक घटकाचा (random element) शिरकाव झाला की संभाव्यता कोसळून पडते व अनिश्चितता वरचढ होते. खरे पाहता आपण विचारपूर्वक केलेल्या कृतीत यादृच्छिक घटक असू नये याची पुरेपूर खात्री करून घेतलेली असते. तरीसुद्धा निश्चित स्वरूपातील प्रक्रियेला कुठे तरी तडा जावून आपण अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडतो. मुक्त स्वातंत्र्य आपल्याला या कठिण प्रसंगातून बाहेर काढणे अपेक्षित असते. परंतु तसे सहसा होत नाही.

वरील प्रश्नाला अजून एका प्रकारे उत्तर देता येईल.

परम - 100 संगणक जे काही सांगत आहे त्याला शिरसावंद्य मानून त्या आज्ञांचा स्वीकार करणे आणि असे केल्यामुळे आपल्या free will ला तडा जात नाही असे समजून वर्तन करत राहणे. संगणकाची आज्ञा पाळल्यास आपल्या विचार वा कृती स्वातंत्र्याला धक्का लागत नाही याची खात्री बाळगणे. संगणकानी अमुक खाद्य पदार्थ खा वा अमुक मैत्रिणीशी गप्पा मार असे सांगितल्यास ती आज्ञा आहे असे न मानता तो सर्वस्वी स्वत:च निर्णय होता, व त्या निर्णयाशी संगणकाचा संबंध नाही या गृहितकावर विश्वास ठेवत कृती करत राहणे, हेही त्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल. परंतु हेच खरे असल्यास बिग् बॉसच्या बंगल्यातील सेलिब्रिटीज स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्यास स्वतंत्र आहेत, या विधानाला काही अर्थ उरत नाही.

मुळात मुक्त स्वातंत्र्य ही संकल्पनाच या गदारोळात खोटी ठरत आहे. आपण विचारांती निवडलेली व जाणीवपूर्वक केलेल्या कृतीचे असे धिंडवडे निघत असतील तर मुक्त स्वातंत्र्याची संकल्पना बाद ठरते; जरी केलेली निवड काही क्षणापूर्वीची असो की फार दिवसापूर्वीची असो!

म्हणूनच कदाचित नशीब, दैव, नियती.. या संकल्पना अनादी काळापासून रूढ झाल्या असाव्यात!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

बापरे! कसली कल्पना आहे!
'बिग ब्रदर इज वॉचिंग' ची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बिग ब्रदर आणि लाप्लासचा राक्षस यांची सांगड आवडली.

मात्र मी, माझी फ्री विल, किंवा मी ला नियंत्रित करणारा संगणक असं द्वैतवादी चित्रण एखादं भगभगीत, हाय कॉंट्रास्ट चित्र डोळ्यांना त्रासदायक वाटावं तसं झालं.

लेख पुन्हा वाचून अधिक विस्तृत प्रतिसाद देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख क्लिष्ट पण विचार करण्यास उद्युक्त करणारा.

पियरे लॅप्लास या फ्रेंच वैज्ञानिकाच्या मते भौतिकीतील एकूण एक सिद्धांतांची व नियमांची इत्थंभूत माहिती व विश्वभरातील प्रत्येक कणांचे विशिष्ट स्थान यावरून भविष्यात कुठे कुठे काय काय घडू शकते याचा अचूक अंदाज घेणे शक्य आहे. (Laplace's Demon) परंतु क्वांटम सिद्धांताने पूर्व स्थितीवरून कार्य कारण प्रक्रियेतून प्रत्येक वेळी अचूक अंदाज येईलच याची खात्री देता येत नाही, असे सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे लॅप्लासची भविष्यातील निश्चिततेच्या संबंधीची भविष्यवाणी खोटी ठरत आहे.

"खोटी ठरत आहे" हे योग्य, अजुन "ठरली नाही" हे महत्वाचे.

म्हणूनच कदाचित नशीब, दैव, नियती.. या संकल्पना अनादी काळापासून रूढ झाल्या असाव्यात!

त्याला भट आळीतले लोक प्लेसहोल्डर वगैरे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< आपण विचारांती निवडलेली व जाणीवपूर्वक केलेल्या कृतीचे असे धिंडवडे निघत असतील तर मुक्त स्वातंत्र्याची संकल्पना बाद ठरते; जरी केलेली निवड काही क्षणापूर्वीची असो की फार दिवसापूर्वीची असो!>> हे तितकेसे पटले नाही.

प्रत्येक निर्णयाचा एक विशिष्ट परिणाम असतो - त्या निर्णयाचे काही फायदे असतात आणि काही तोटेही असतात. फायद्या-तोटयाचा सारासार विचार करून आपण छोटे-मोठे निर्णय घेत असतो. माझ्या निर्णयामुळे त्याचे स्वाभाविक फायदे तर मला मिळावेतच पण तो सोडून दुसरा (अगदी विपरीत) निर्णय मी घेतला असता तर जे फायदे मला मिळाले असते तेही मिळावेतच या असमंजस आणि अवास्तव मागणीमुळे हे धिंडवडे निघतात. पण अशी अवास्तव आणि असमंजस मागणी केली नाही तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमधून समाधान आणि आनंद अगदी २१ व्या शतकातही मिळू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्णय मी घेतला असता तर जे फायदे मला मिळाले असते तेही मिळावेतच या असमंजस आणि अवास्तव मागणीमुळे हे धिंडवडे निघतात. पण अशी अवास्तव आणि असमंजस मागणी केली नाही तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमधून समाधान आणि आनंद अगदी २१ व्या शतकातही मिळू शकतो.

मुद्दा परिणामाच्या अपेक्षेचा नसून कृतीशी निगडित असलेल्या स्वातंत्र्याचा आहे, मी करत असलेल्या कृतीचे स्वातंत्र्य मला नसून केवळ कारण-परिणामामुळे कृती घडत आहे हे लक्षात आल्यास खेद वाटणे सहाजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मर्यादित आकलनशक्तीमुळे नीट समजला नाही.

खरे पाहता आपण विचारपूर्वक केलेल्या कृतीत यादृच्छिक घटक असू नये याची पुरेपूर खात्री करून घेतलेली असते. तरीसुद्धा निश्चित स्वरूपातील प्रक्रियेला कुठे तरी तडा जावून आपण अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडतो. मुक्त स्वातंत्र्य आपल्याला या कठिण प्रसंगातून बाहेर काढणे अपेक्षित असते. परंतु तसे सहसा होत नाही.

यादृच्छिक घटक नसताना अनिश्चितता येईल हे पटत नाही. उदा. सामान्य तपमानाला, माझ्या डोक्यावर आणि हातावर काहीही आवरण नसताना, जिवंत, सुदृढ व जागृत अवस्थेत मी डोक्याला हात लावण्याची कृती निश्चितपणे करू शकतो. यादृच्छिक घटकांबद्दल पूर्ण माहिती नसणे यामुळेच एखाद्या कृतीतून यादृच्छिक घटक पूर्णपणे वगळणे शक्य होत नाही आणि अनिश्चितता येते.
शिवाय मुक्त स्वातंत्र्याचा संबंध एखाद्या कृतीच्या फलिताशी (Outcome) नसून ती कृती करण्याच्या वा न करण्याच्या निर्णयाशी आहे असे मला वाटते.
परम-१०० सारखा संगणक किंवा ब्रेनवॉश करणार्‍या सरकार, धर्मादि संस्था यामुळे मुक्त स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते पण असा संगणक तयार न करण्याचा निर्णय घेणे आणि या संस्थांवर विश्वास न ठेवणे याचे मुक्तस्वातंत्र्य नेहमीच असते.
मुळात विचार आणि निर्णय म्हणजे विद्युत-चुंबकीय किंवा रासायनिक प्रक्रिया आहे अशा पातळीवर गेल्यास मुक्त स्वातंत्र्य या संकल्पनेलाही एक रासायनिक रचना या पलीकडे काही अर्थ राहत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्मस्वातंत्र्य असते असे माझे देखील मत आहे, पण विज्ञानास ते पुर्णपणे मान्य नाही.

मुळात विचार आणि निर्णय म्हणजे विद्युत-चुंबकीय किंवा रासायनिक प्रक्रिया आहे अशा पातळीवर गेल्यास मुक्त स्वातंत्र्य या संकल्पनेलाही एक रासायनिक रचना या पलीकडे काही अर्थ राहत नाही.

भौतिक पातळीवर तसेच आहे असेच विश्लेषण अढळते, लेखापेक्षा थोडे अधिक क्लिष्ट असे इथे सांगितले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0