सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ७ - सुरुवात

मेच्या सुरूवातीला सँटा फे ऑपेराच्या रांचला जाग यायला सुरूवात होते. कायमस्वरूपी रांचवर असणारा स्टाफ म्हणजे वेगवेगळ्या शॉप्सचा, थिएटरचा मेंटेनंस बघणारा स्टाफ, ॲडमिन ऑफिस, सफाई व व्यवस्था कामगार वगैरेंचे गेल्या आठ महिन्यांचे शांत जग ढवळून निघायला सुरूवात होते. प्रत्येक ऑफिसेसमधे माणसांची संख्या वाढायला लागते. हाउसिंग विभाग ओव्हर टाइम करून येणाऱ्या सर्वांच्या वकुबाप्रमाणे व्यवस्था करायच्या मागे लागतो.
मग दिग्दर्शक, डिझायनर्स आणि लाइट शॉप, कॉश्च्युम शॉप, सेट शॉप, प्रॉप शॉप, मेकप-हेअर सर्व विभांगातले, विविध टीम्सचे मुख्य लोक यायला लागतात. डिझायनिंग सहा महिन्यांपूर्वीच झालेले असते. परदेशांमधून मागवायच्या वस्तू म्हणजे उदाहरणार्थ युरोपमधल्या कुणा मास्क मेकरने बनवलेले मुखवटे, इटलीमधे बनवलेले ठराविक डिझाइनचे बूट, भारतातून मागवलेले खादी सिल्कचे तागे अश्या सगळ्या वस्तू येऊन पडलेल्या असतात. सर्व प्रकारच्या हत्यारांना आणि अवजारांना धार लावणे, त्यांचे सफाई, तेलपाणी, दुरूस्ती वगैरे विषेष काळजीने केले जाते. करायची कामे टीम्समधे विभागली जातात. प्रत्येक टीमच्या कामांचे वेळापत्रक तयार होते. त्याप्रमाणे मागवलेला कच्चा माल प्रत्येक टीमला वाटून दिला जातो.
इथवर येईतो मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला असतो. आता सर्व स्तरांवरचे गायकनट, म्हणजे मुख्य भूमिका गाणारे, दुय्यम वा तिय्यम भूमिका गाणारे आणि कोरसमधे गाणारे येऊन पोचतात. पहिल्या दोन अॉपेरांमधे नृत्ये असतील तर त्यासाठी स्त्रीपुरूष नर्तक येऊन पोचतात.
आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारपासून सगळ्या टीम्सच्या असिस्टंटस आणि शिकाऊ कामगारांचे कंत्राट सुरू होते. गुरूवारी दुपारपासून शिकाऊंच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधे एकेक घर भरायला लागते. शिकाऊ अपार्टमेंटसमधे जनरली दोन बेडरूमच्या घरात चार तर एक बेडरूमच्या घरात दोन शिकाऊ ठेवले जातात. शिकाऊ लोक विषम प्रमाणात असतील तर मात्र कुणा एकाची वा एकीची लॉटरी लागते आणि त्याला किंवा तिला आख्खी रूम मिळते. एकदा अशी लॉटरी लागलेली एक भारतीय मुलगी होती. दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमधे ती आणि दुसऱ्या रूममधे दोन मुलगे अशी व्यवस्था. पण त्या भारतीय मुलीला अचानक संस्कृती आठवली आणि मला नको एकटीला रूम पण मी मुलग्यांबरोबर एका घरात राहणार नाही शक्यतो असे तिने ठरवून टाकले. बिचारे मुलगे निको आणि स्टीव्ह उगाचच खूप गिल्टी वगैरे वाटून घेत राह्यले.
शुक्रवारी त्या दोघांबरोबर रांचवर पोचल्यावर ती भारतीय मुलगी तडक हाऊसिंगवाल्या बाईकडे गेली मला मुलग्यांबरोबर राहायचे नाही असं सांगून मोकळी झाली. ९० च्या दशकात भारतातून गेलेल्या आणि गेल्यावर दोन सेमिस्टर जॉर्जियामधे काढलेल्या मुलीला म्हणजे मला आपले दोन्ही रूममेटस गे आहेत आणि त्यामुळे खरंतर बेस्ट फ्रेंड मटेरियल आहेत हे उजाडलेच नाही. हाऊसिंगबाईने मला 'प्रयत्न करते आणि जमल्यास शनिवारी संध्याकाळी शिफ्ट करते' असे आश्वासन दिले. आणि ते मी नाचत नाचत निकोलाच जाऊन सांगितले. मग कामाचा दिवस सुरू झाला. कॉश्च्युमच्या सगळ्या शिकाऊ कामगार लोकांना रांचचा भूगोल समजावून दिला गेला. कुठल्या वाटा, कुठली ठिकाणे पडद्यामागच्या लोकांना निषिद्ध आहेत, पडद्यामागल्या लोकांसाठी वागायचे नियम काय आहेत ते समजावले गेले. मग सर्व ऑपेरांच्या कॉश्च्युम्सची डिझाइन्स समजावून सांगितली गेली. मग आपापल्या टीममधल्या सगळ्यांशी ओळखी आणि टीमकडे असलेल्या कामाची माहिती वगैरे होईतो. पहिला दिवस संपला. निको आणि स्टीव्हबरोबर गप्पा मारत मी घरी पोचले. त्या अपार्टमेंटमधे येऊन चोवीस तास झाले होते आणि अजून चोवीस तासांनी मी नवीन अपार्टमेंटमधे जाणार होते. शनिवारी संध्याकाळी माझी नवीन रूममेट केट मला घ्यायला आली.
मे चा तिसरा आठवडा संपल्यावरचा रविवार रांचवर महत्वाचा असतो. तोपर्यंत त्या वर्षीच्या सीझनमधे काम करणारे सर्व लोक आलेले असतात आणि ऑपेरांचा सोहळा साजरा करणार असतात. त्यामुळे त्या रविवारी सीझनची सुरूवात संध्याकाळी रांच बार्बेक्यूने होते. सगळ्या माफक नटून थटून आलेल्या अनोळखी लोकांपैकी काहींशी ओळखी होतात. आपल्या टीममधे काम करणाऱ्या लोकांना जन्मोजन्मीचे मित्र असल्याप्रमाणे भेटले जाते. डोळ्याला गारवा देणारी, मनाला चटका लावणारी मंडळी हेरली जातात. थोडे कामाबद्दल, थोडे एकमेकांबद्दल बोलले जाते. पुढचे दोन तीन महिने समोर येतील अश्या सगळ्या चेहऱ्यांना डोक्यात नोंदवून संध्याकाळ संपवून लोक घरी निघतात. सीझनच्या सुरूवातीचा सोहळा संपन्न होतो.

- नी

#सँटाफेऑपेराकॉश्च्युमशॉप #स्मरणरंजन #भूतकाळातल्यादिवसभराच्याकामातले #कॉश्च्युमशॉपच्यागोष्टी

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet