चांदणचुरा

आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.

गवताची गंजी, त्यांच्या गाठी, कापलेल्या भाजीपाल्यांचे ढीग, बी बियाणे भरलेली पोती, त्याच्याच बाजूला खतांच्या गोणी, ट्रॅक्टर , डिझेलचे कॅन, शेतीला लागणारी विविध औजारे आणि यंत्र सामग्री बाहेर पडलेली असायची. आमचे घर त्याच्या मागेच बांधलेले होते. घर प्रशस्त होतें आणि घराच्या मागच्या दारात उभे राहून समोर पाहिले की एक जुने चर्च दिसायचे. ते लांब होते परंतु मला आणि छायाला ते जवळ वाटायचे. ती दुपारी माझ्याकडे एक गलोल घेऊन यायची आणि त्याच्या मधल्या कातडी चिमटीत एक दगड पकडून गलोलचे रबर ताणायची. त्यातला दगड समोरच्या चर्चमध्ये जाऊन पडला तर ते चर्च जवळ आहे, अन्यथा नाही असे ठरले होते. माझाही नेम चुकायचा. मग ती रोहनला हाक मारायची. रोहन तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्याचा दगड सरळ रेषेत कधीच जायचा नाही आणि मग तो पळून जायचा.

पोनप्पा आणि त्यांच्या कुटंबियांनी आम्हाला भाडेकरू सारखे कधीच वागवले नाही. रोज ताजा भाजीपाला आमच्या घरी छाया किंवा रोहन देऊन जात असत. दूध विकत घ्यावं लागतं नसे. सणावाराला दोघांनी मिळून सण साजरा करायचा असाच शिरस्ता होता. पुथारी नावाचा कोडागु सण यायच्या अगोदर म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या सुमाराला घर रंगवायला सुरुवात करायची. सणाच्या दिवशी संध्याकाळी हातात पेटलेली समई घेऊन "पोली पोली देवा" असं म्हणत पोनप्पाच्या शेतात सगळीकडे हिंडायचं तेंव्हां आईच्या हातात पण एक पेटलेली समई असायची. शेतात सगळीकडे समई घेऊन फिरून परत यायला दोन तास लागायचे. त्यानंतर तंबिट्टू आणि पायसा हया दोन पदार्थांनी भरलेले केळ्याचे मोठे पान. चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, लिंबू , मीठ, दह्याचा वाडगा, तळलेले मेंथे मेणशिनकाई, बज्जे, दोन भाज्या आणि आमटी असे पदार्थ ताटात असायचे. मितवा कारल्याची भाजी तयार करायची ती कधीच कडू लागायची नाही. ती त्याच्यात काय घालायची माहिती नाहीं. कारली चिरल्यानंतर कांद्याच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवते असं तिनं आईला सांगितलं होतं म्हणे.

पहिला पाऊस येऊन गेला की कॉफीचा गंध मातीतून यायचा आणि मग दिवसभर अगदीं ताजं वाटायचं. आमच्या दारात चार दिवसातून एकदा एखादा साप पहुडलेला असायचा. हिरव्या रंगाचे साप जास्त दिसायचे. खिडकीच्या चौकटीवर आणि कधी कधी खिडकीतून आत नाग नागिणी भेटायला यायचे. त्यांची भेट केव्हा होईल याची एक भीती नेहमीच असायची. लहानपणी जी भीती वाटायची ती हळूहळू कमी होत गेली. त्यांच्या पासून एक विशिष्ट अंतर ठेवलं आणि हात जोडले की ते काहीं करत नाहीत याची खात्री झाली होती. सापाची बिळं कुठे आहे ते रोहनला माहीत होतं. त्याने बिळांच्या तोंडाशी " नागराजा प्रवेसद्वारा" असे पुठ्ठ्यावर लिहून त्याच्याच पाट्या तयार केल्या होत्या आणि खोचून ठेवल्या होत्या. त्या पाट्या वाचूनच साप बिळात घुसत असावेत!

पिण्याचे पाणी आणायला मात्र अर्धा किलोमीटर लांब असणाऱ्या विहिरीपर्यंत पायवाटेने चालावे लागायचे आणि ते ही चर्चच्या भिंतीच्या कडेने. रात्रीच्या अंधारात बॅटरी घेऊंन मी आणि आई जात असू पाणी आणायला तेंव्हा मी काठी आपटत जायची, आईच्या हातात कळशी असायची, एक मोठी आणि एक छोटी. मोठी कळशी, ज्याला आम्ही बिंदगी म्हणायचो ते ती कडेवर घ्यायची आणि छोटी बिंदगी पाचही बोटात पकडून उचलायची. मला स्पष्ट आठवतंय की आजूबाजूच्या दाट झाडीत काजवे चमकत असायचे. आमच्या पावलाचा आवाज आला की चमकणे कमी व्हायचे. बॅटरीचा प्रकाश टाकला की अदृश्य! मग आम्ही दहा पंधरा सेकंद थांबलो की पुन्हा चमकायला सुरुवात.
दिवाळीला अपार्टमेंटच्या गॅलरीत चमकणाऱ्या चिनी सिरीयल लॅम्प बघताना त्या काजव्यांचा थव्याची आठवण येत नाहीं अशी एकही दिवाळी अजून गेली नाही. जमिनीवर आकाशातील चांदण्यांची जत्रा भरली असावी आणि काहीं तारका गिरक्या घेत नाचत असाव्यात असे वाटायचे.

आकाशातल्या चंद्राला कात्रीने उभे आडवे कापून बारीक तुकडे केल्यावर वरून खाली पुष्पवृष्टी केल्याप्रमाणे उधळून टाकले असावे किंवा चांदण्यांना बारीक कुटून त्यांची राख चोहोबाजूला उधळली असावी आणि ते हवेत फिरत असावेत असे वाटायचे त्या काजव्यांना बघून. हे सगळे डोळ्यांच्या सरळ रेषेत असायचे. मान उंचावून पाहायची गरज नव्हती. आजूबाजूला मिट्ट काळोख असताना चमकणारे काजवे इतके जवळ दिसायचे की हात पसरावा आणि ओंजळभर घेऊन फ्रॉकच्या खिशात घालावेत असं मनात यायचं. जाताना आणि येताना संपूर्ण मार्गावर काजवे चमकत असायचे संपूर्ण किलोमीटर भर! कुठेही मान वळवली तरी या तारका हजर. त्या वेळी लहान वयात जी भावना मनात दाटून यायची, त्याचं वर्णन करणं अशक्य आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर तो त्या त्या वेळी अनुभवावा लागतो.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकतीच मी जेंव्हा, जुन्या आठवणीत गुंग व्हायला, मडीकेरीला गेले तेंव्हा पोनाप्पा, मितवा अजून आहेत की नाही ते पहावे आणि त्यांच्याशी बोलावे आणि जुन्या आठवणी जागवाव्या,असे ठरवले आणि मडीकेरीला गेले तेंव्हा आम्ही रहात होतो ती जागा कुठे गडप झाली ते कळलेच नाही. चर्च दिसले नाही.पोनप्पा दिसला नाही, ना आमचे घर दिसले. तिथेच जवळ उभे असलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाला विचारले , "इल्ले हाळे चर्च इर्तीत आदे यल्ले इदा अप्पा..? " हीच ती जागा असे त्याने सांगितले. पोनप्पाला ओळखतोस का असे विचारले तर त्याने वरती बोट दाखवले. मनात चर्र झाले. "अवन हेंडूती स्मिथा?" त्याने मान हलवली आणि तो निघून गेला. छाया आणि रोहन कुठे असतील ते कळेना. घशात दाटल्यासारखे झाले.

त्या जागेवर "रेनफॉरेस्ट रिट्रीट"असा बोर्ड दिसला आणि मी आत शिरले. चौकशी केली तर पोनप्पाने ही जागा त्यांना पंधरा सोळा वर्षांपूर्वी विकली असल्याचे कळाले. आता ती जागा होमस्टे झाली आहे आणि हाच व्यवसाय गेली अनेक वर्षे तिथले नवे मालक करतात असे तिथली केअर टेकर अँजेलो हिने सांगितले. मी तिला जुन्या गोष्टी सांगितल्या आणि आकाशातल्या तारा जमिनीवर हाताच्या अंतरावर कशा दिसतात त्याचं वर्णन केल्यावर "ते पाहायला खास पर्यटनाची सोय केलेली असते" असे ती म्हणाली. आज रात्री ते बघायला मिळेल असे तिने सांगीतल्यावर मी तिथे मंडला नावाच्या झोपडीवजा सिंगल रूम मध्ये राहायचं ठरवलं. तिथे आलेल्या पाहुण्यांची देखभाल केली आणि तिथे खड्डा खोदणे आणि झाडे लावणे अशा कामाला हातभार लावला तर चहा आणि जेवणाचे पैसे घेतले जाणार नाहीत, शिवाय राहण्याच्या खर्चात ही सूट मिळेल असे तिने सांगितल्यावर मी लगेच कुदळ आणि फावडा कुठे आहे असं विचारून, ते घेतले आणिअँजेलोने सांगितलेल्या जागी खड्डे खोदायला सुरुवात केली. समोर हिरवा साप! अरे व्वा! शेवटी साप दिसलाच. मी आवाज न करता मागे सरकले, जीन्सच्या खिशातून मोबाईल काढला आणि तो फणा काढायची वाट बघत राहिले. तो झाडावर चढू लागला तसा एक फोटो घेतला. नंतर तीन खड्डे खोदल्यानंतर थकून परत जाताना ॲपल ज्यूसची बाटली घेऊन खोलीत शिरले.

दुपारी प्लांटेशन ट्रीप असते. दोन किलोमीटर लांब विस्तीर्ण शेतावर जायचे. तिथे चालताना "पोली पोली देवा" हे शब्द माझ्या ओठातून आपसूक उमटले. विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुले पाहताना वेळ कसा गेला ते कळले नाही. ते सगळे पाहून परत आल्यानंतर रिट्रीटच्या इन हाऊस काऊंटर मध्ये वस्तू पाहिल्या. मला सर्वात आश्चर्यकारक गोष्ट वाटली ती कॉफी आणि कॉफीच्या बिया. या बिया "सिवेत" नावाच्या मांजराच्या विष्ठेतून गोळा करतात आणि त्याची एका किलोची किंमत दहा हजार रुपये आहे हे ऐकल्यानंतर चक्कर येऊन पडायची बाकी राहिले. अशा बियांचे पन्नास ग्रॅमचे एक पाकीट घेतले त्याची किंमत पाचशे रुपये.

रात्रीच्या जेवणानंतर काजवे पाहण्याचा कार्यक्रम असतो. प्लांटेशनच्या आतील भागात चालत जायचे. काजव्यांचे लक्ष विचलित होऊ नये आणि निसर्गाशी एकरूप व्हावे यासाठी कृत्रिम प्रकाश टाळायचा. अगदी चोर पावलाने चालावे लागते. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना खांद्यावर घ्यायचे. काजव्यांकडे पहायला बऱ्याच ठिकाणी पॉइंट्स केलेले आहेत. लाखो काजवे खोऱ्यात एकत्र चमकतात आणि नंतर अदृश्य होतात. हा खेळ चालत राहतो.

लहानपणी ज्या तारका मी रोज रात्री कित्येक वर्षे पाहिल्या आणि सुखावले तसा अनुभव मात्र आता आला नाही. जाने कहां गए वो दिन…?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं चांदणचुरा. काजव्यांबद्दल सहमत.
माडिकेरी एकदा गाठायचं आहे. ब्रम्हगिरी ट्रेक किंवा कुमारपर्वता एकदा पाहायचे आहेत. तोपर्यंत यूट्यूब विडिओंवर समाधान.

बाकी लिहीत राहा. माडिकेरीत लहानपण गेलं म्हटल्यावर उत्सुकता वाढली. आणखी काही कर्नाटक भटकंती असल्यास वाचायला आवडेल.

थँक्यू! मडिकेरी मधून मी पुढे कर्नाटकची सैर केली कारण बरेच नातेवाईक कर्नाटकात विखुरलेले आहेत. त्याबद्दल आणि इतर अनुभव यथावकाश लिहीनच. It would be a sort of travelogue but of a different kind. इथे फोटो अपलोड करायचे ते कसे कळत नाही. असो.

बरेच उपाय आहेत फोटोंसाठी.
त्यातला एक देतो.
https://postimages.org

या साईटवर (अकाउंट बनवलेत तर उत्तमच)
१)फोटो अपलोड करा.
२)तो अपलोड झाला की बाजूला/खाली पाच सहा लिंका दिसतील. त्यातली क्र (२)ची Direct Image link copy करा = (लिंक).
नंतर
३)खालील टेम्प्लेट वापरा -

फोटो क्र. .....
शीर्षक.......
<img src="लिंक" width="100%" />

फोटो क्र. .....
शीर्षक.......
<img src="लिंक" width="80%" />

---------------------------
आडव्या फोटोंसाठी पहिले टेम्प्लेट आणि उभ्या फोटोंसाठी दुसरे टेम्प्लेट वापरणे. माहिती भरून,योग्य 'लिंक' टाकून लेखनात जिथे पाहिजे तिथे copy paste करणे/ टाकणे. प्रतिसाद राइटिंग बॉक्सवर डोळ्याच्या
खुणेवर क्लिक केल्यास फोटो उमटणार का तपासता येईल. लेखात दुरुस्ती करण्यासाठी संपादन बटण वापरणे.

१)फोटो अपलोड करण्याचे खूप प्रयत्न केले, नो लक. Am I doing something wrong?

२)मला italics मध्ये कसे लिहायचे त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करा.

३) या मराठी संकेत स्थळावर एखाद्या लेखात/ कथेत इंग्रजीचे प्रमाण किती टक्के असावे याबद्दल काही संकेत पाळायचे असतात का त्याबद्दल ही कळवा.

थँक्यू सो मच.

२)मला italics मध्ये कसे लिहायचे त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करा.

लिहिताना चौकटीवर जी चिन्हे दिसतात त्यात I दिसेल. जेवढा मजकूर italicsमध्ये हवा तेवढा सिलेक्ट करून मग ते चिन्ह क्लिक करा. किंवा एचटीएमएल कोड कॉपी पेस्ट करता येतो - < em > मजकूर < /em > (यातल्या स्पेसेस काढून)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छान लिहिलंय. लेखातील भावनेशी सहमत. अशीच भावना "तोच चंद्रमा नभात " ह्या शांत शेळकेंच्या गाण्यात आणि (बहुतेक कालिदासाच्या) तशाच एका संस्कृत श्लोकात व्यक्त झालेली आहे. त्या काव्यातील भावनेचे हे गद्य रूप सुद्धा अगदी काव्यात्म तरलतेने लिहिलेले आहे.

थँक्यू. तो संस्कृत श्लोक बहुदा कालिदासकृत मेघदूत या काव्यात असावा असे वाटते. नॉट शुअर.

हा श्लोक - शीलाभट्टारिका नावाची कोणी एक तशी अज्ञात कवयित्री ७व्या-८व्या शतकामध्ये होऊन गेली. शार्ङ्गधरपद्धति नावाच्या एका जुन्या सुभाषितसंग्रहामध्ये - Anthology - तो तिच्या नावाने दाखविला गेला आहे आणि म्हणून श्लोकाची आणि तिची स्मृति टिकून राहून मम्मटापर्यंत पोहोचली आणि तेथून ती शांताबाईंना मिळाली.
संदर्भ - https://aisiakshare.com/node/5452

माझी शंका दूर केलीत, धन्यवाद.

तुमचा लेख आवडला. कर्नाटकातून तुम्ही एकदम दिल्लीला गेलात म्हणजे घरांत कोणाची फिरतीचीनोकरी होती का सरकारी बदल्या ?

वडील पोस्टात होते पण ते मडीकेरी इथूनच निवृत्त झाले. मी जेइइ मेन्स नंतर NIT सुरथकल इथून बी टेक आणि VGSOM खरगपूर इथून MBA in HR केलं. त्यानंतर इन्फोसिस म्हैसूरला प्रोजेक्ट मॅनेजर.

जुन्या आठवणी काढून कढ काढणे ही टिपीकल मध्यमवर्गी मानसिकता

- अहिरावण

अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.

एवढं कौतुक वाचल्यावर लेखिका पुढचा लेख टाकणार नाही हे नक्की झाले.
जाऊ दे.

हे इतक्यातितक्याने डिस्करेज होण्यातले प्रकरण वाटत नाही.

हे वाचले नाहीत काय?

या लेखनास देवदत्ताचा उतारा पाहिजेच.

(किंबहुना, देवदत्ताचा उतारा हा भविष्यात कधी ना कधी हा (किंवा असा) लेख येणार आहेच (आख़िर मराठी संस्थळ है, भाई!), या अंदाजानेच लिहिला गेला असावा, किंवा कसे, अशी शंका येते. (देवदत्तास दूरदृष्टी असली पाहिजे! (चूभूद्याघ्या.)))

——————————

(अतिअवांतर: ‘पोली पोली देवा’ हा ‘देवा मला पाव’ (इंग्रजीत: O Lord, Give Us Our Daily Bread’) यासारखा काही प्रकार असावा काय? (पक्षी: (कन्नडमध्ये) ‘देवा मला पोळी’?) कसे आहे, देशोदेशीच्या पद्धती भिन्न असतात – महाराष्ट्रातली पद्धत बाटली असावी; कर्नाटकाने प्रथा राखली असावी!)

——————————

म्हणून बेळगावबेळगावि कर्नाटकासच दिले पाहिजे!