Skip to main content

राधेभय्या आणि कंपासबॉक्स मधली भूमिका चावला

आठवीत आमच्या क्लासमध्ये "राधेभय्या" होता. म्हणजे त्याचं खरं नाव काहीतरी कृनाल की कुणाल होतं पण त्याला सगळेच राधेभय्याच म्हणायचे. तो दिसायला अप्सरा पेन्सिल सारखा सरळसोट. हडकुळा. अंगावर कुठेही उंचसखलता नाही. बेंबीच्या खालपर्यंत पॅन्ट घालायचा. पोटाच्याखाली दोन बाहेर आलेल्या टोकदार हाडांवर ती पॅन्ट लोंबकळायची. व्यवस्थित धुतलेल्या आणि इस्त्री केलेल्या त्याच्या शर्टचा एक भाग बाहेर आणि एक आत राहायचा. चालताना पाठीला किंचित बाक आणून चालायचा. दर महिन्याला नवीन कुठल्यातरी हटके रंगाचा गॉगल घेऊन यायचा. कधी टायच्या नॉट मध्ये तर कधी बेल्टला गॉगल अडकवायचा.

एका कुठल्याश्या पावसाळ्या सोमवारी शाळेत आल्यावर वॉशरूमला त्याने जरा जास्तच वेळ लावला. प्रार्थना वगैरे आटपून वर्ग भोयर मॅडमची वाट बघत गपचूप बसला होता. कोणी वह्या पुस्तक काढत होतं कुणी घाईघाईने बाईंनी दिलेलं होमवर्क करत होतं आणि तेवढ्यात एंट्री झाली राधेभय्याची.

तो क्लासमध्ये येताचक्षणी सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे गेलं. अख्खी मिनिटभर शांतता पसरली. त्याने दरवाज्यातच एक ड्रामाटीक वगैरे पॉझ घेतला. डोळ्यावर काळा राउंड गॉगल. ओल्या केसांना जेल लावून केसांचे व्यवस्थित दोन भाग करून तयार केलले चंद्र.. गळ्यातला टाय वीतभर सैल सोडलेला. हातात खोट्या चांदीचं खोटंच निळसर फिरोझा स्टोन लावलेलं अघळपघळ असं ब्रेसलेट. तो त्याच्या बेंचपर्यंत येऊन पोहचेस्तोवर अख्ख्या क्लास मध्ये हशा आणि टाळ्या सोबतच सुरू होत्या. त्या दिवशी सकाळी राधेभय्याने अख्खा क्लास गाजवून टाकला.

"तुले सांगू चैत्या...."

गणिताच्या वानखेडे मॅडम आल्या नसल्यामुळे पिरियड ऑफ होता. आणि मी उगीचच राधेभय्याच्या कंटाळवाण्या गप्पा ऐकत बसलो होतो.

"सहा वेळा बघितला “तेरे नाम”. अलंकार मध्ये लागला होता. एकदा बाबासोबत गेलो होतो, नंतर एकटाच. सिनेमा संपल्यावर सायकलनेच सरळ धरमपेठला जाऊन “तेरे नामची” सीडी आणली. आणि घरी आणून पुन्हा बघितला. जितने भी बार देखा ना भाई मैने... हर बार एन्ड को फूट फूट के रोया...!"

हे हिंदीमधलं वाक्य कदाचित राधेभय्याने पाठ करून ठेवलं असावं..

"भाई ने क्या तोड ऍक्टिंग केलीय भाई. तू सोच.. जीसने उस लडकी को इतना प्यार किया उसको मरा हुआ देखकर क्या लगा हो राधे को...!!! काय रडला यार सलमान भाई त्या सिनला..”

आणि राधेभय्याने त्या वेळेस मी न बघितलेल्या सिनेमाचा महत्वाचा असा शेवट मला सांगून टाकला होता. तो सांगताना त्याच्या डोळ्यात तरळलेलं पाणी त्याच्या त्या अर्धवट चंद्राकार केसांच्या आडूनही मला दिसलं होतं.

त्याने त्याच्यासाठी शाळेत निर्झरा पण बघून ठेवली होती. नवव्या वर्गातली सृष्टी देशमुख. तिचे डोळे बघितल्यावर मला निर्झरा आठवते म्हणायचा. भूमिका चावलाचा फोटो पण त्याने कुठून तरी जमवला होता. कंपासमध्ये ठेवायचा. कितीतरी वेळ त्याच फोटोकडे बघत राहायचा. एकदा त्याने नववीच्या भूषण आठलेकडून तिची वही मागवली. वहीत

तेरे नाम
हमने किया है
जीवन अपना सारा सनम…!!

ह्या ओळी लाल पेनाने लिहून त्यात मोरपीस वगैरे ठेवलं होतं. सगळा आळ भूषण आठलेवर आला आणि बंटी देशमुखने त्याला रडेस्तोवर चोपलं. तेव्हा सगळ्यांना कळलं की दहाव्या वर्गातला बंटी देशमुख हा सृष्टीचा सख्खा भाऊ आहे. त्या नंतर त्याने निर्झराचा नाद सोडला. (मार खाऊनही नाव न घेतल्याबद्दल राधेभय्याने भूषण आठलेला NIT गार्डन समोर मंचुरीयन नूडल्स खिलवले होते म्हणे.)

पावसाळाभर राधेभय्या त्याच्या तेरे नाम लुकमध्ये राहला. नंतर नंतर त्याच्या ब्रेसलेटची खोटी चांदी रंग सोडायला लागली. फिरोजा स्टोनचे घासूनघासून टवके उडाले होते. केसही चंद्राच्या आकाराला साथ देत नव्हते. एकूणच राधेभय्याचा बेरंग व्हायला लागला होता.

पण मग दिवाळीच्या सुट्टटी नंतर पहिल्या दिवशी राधेभय्या आला तो इंटरवल नंतरच्या राधेभय्यासारखाच.

बारीक चंपी कटिंग. पॅन्ट वर पोटापर्यंत घातलेला. शर्ट चांगली इन, हातातलं ब्रेसलेट गायब होतं. त्याच्या जागी पितळी कडं आलं होतं. चाल कमालीची बदलली होती. चेहऱ्यावर वेगळेच कारुण्य-भाव होते.

"क्यू राधेभय्या?? बाल वगैरा...??"

"अरे यार वो माँ यार.! दिवाळीच्या सुट्या लागल्यावर आईने घरीच कात्रीने भराभर केस कापून टाकले यार. उसदिन भोत रोया मैं. एखादबार वो अपनी नाइन्थ क्लास की निर्झरा नही मिली तो चल गया था रे. पर ये बाल....!"

त्या नंतर राधेभय्याने कधीच तसे केस वाढवले नाही. पण राधेभय्याच नावं नाहीच बदललं. त्याला आजही राधेभय्या नावाने हाक मारली की तो वळून बघतो.

आजही टीव्हीवर "तेरे नाम" लागला की आठवते राधेभय्याची ती क्लासमधली एन्ट्री...!! आठवतो हशा आणि टाळ्यांच्या गजरात बाकावर बसणारा राधेभय्या. आणि त्याच्या कंपासमधला जाड्या ओठांवाल्या भूमिका चावलाचा फोटो...!!

- चैतन्य देशपांडे

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

'न'वी बाजू Sat, 16/12/2023 - 22:24

‘भूमिका चावला’ हे परभाषकांच्या मराठी व्याकरणविषयक अज्ञानाचे द्योतक आहे, परंतु म्हणून तुम्हीही ते तसेच पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नव्हे.

(ते ‘भूमिका चावली’ असे पाहिजे. कुत्रा – चावला. भूमिका – चावली.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/12/2023 - 03:48

In reply to by 'न'वी बाजू

सर, तो सलमान खान, रश्दी नाही. त्यात तुम्ही एक!

'न'वी बाजू Tue, 26/12/2023 - 19:28

राधेभय्या आणि कंपासबॉक्स – मधली भूमिका चावला.

बोले तो, बाकाच्या (मराठीत: बेंचच्या) एका टोकाला राधेभय्या बसलाय, बाकाच्या दुसऱ्या टोकावर कंपासबॉक्स ठेवलेली आहे, नि दोहोंच्या मध्ये भूमिका चावला (चावली?) बसलेली आहे (आणि त्या मध्ये बसलेल्या भूमिकेबद्दलची गोष्ट आहे) असे काहीबाही दृश्य डोळ्यांसमोरून तरळून गेले.

चालायचेच.

(पुन्हा असली गोष्ट लिहू नका. म्हणजे मग, त्यावर असले प्रतिसाद लिहिणार नाही.)