Skip to main content

श्रीरामा, वाचव रे!

आज सकाळपासूनच टीव्ही लावला. इतकं पवित्र वाटत होते. लवकर उठलो. हिने १५ दिवसापूर्वीच उटणे आणले होते. ते काय आहे, कोपऱ्यावरच्या जोश्याकडे श्रीराम प्रतिष्ठापनादिनानिमित्त सुवासिक उटणे, गंध, उदबत्या आल्या आहेत. पेढे पण ठेवले आहेत. सातारी कंदी पेढे आण म्हंटले हिला. तर म्हणे शुगर सांभाळा आधी. अरे श्रीराम आहे माझा .. बघेल तोच. तोच काळजीवाहू, तोच जीवनदायी. या दिवशी पेढे नाही खायचे तर कधी? बायकोशी वाद घालण्याइतका वेळ नाही माझ्याकडे. मग मीच आणले जाऊन पेढे. शुगर काय शिंची.

लेले सांगत होता, हल्ली अशी खूप दुकानं वाढली आहेत म्हणे स्टेशनजवळ. तो कांबळे म्हणे लाडू पण ठेवतोय वेगवेगळे, घरगुती. पण आपला जोशी असताना त्या कांबळेकडे का जावं आपण? आपल्यातला ना जोश्या. म्हणे महाग विकतो १० टक्क्यांनी. मी साफ सांगितलं लेल्याला मी आपल्याच माणसाकडून विकत घेणार. तुम्हाला काय वाट लावायची समाजाची ती तुम्ही लावा.

पहाटे गजर लावून उठलो. ३.४५ ला. गजर माझ्या खोलीत. पण सून आणि मुलगा दोघे उठले आणि रागावले. त्यांच्या खोलीतून सुनेचा आवाज येत होता. गज्याला बोलत होती काहीतरी. गज्या आपला बावळट आला मला सांगत ' अण्णा आधी तो बंद करा. थोडावेळ झोपू द्या शांतपणे ' यांच्या बायका यांच्यावर आवाज चढवतात आणि हे मुळमुळीत ऐकून घेतात. आम्ही नाही असं केलं कधी. बायको आहे ती. तिने ऐकलंच पाहिजे. माझा आवाज जरा वाढला की तिची नजर हा अश्शी खाली गेलीच पाहिजे. हे आम्हाला शिकवतात पुरूषार्थ. अरे पुरुष काय असतो! असेल बायको म्हणून काय झालं तिने तिच्या पायरीवरच राहायला पाहिजे. मी एकदा हिच्या श्रीमुखात भडकावली होती तर एकदम पोलिसांना सांगेन म्हणायला लागली. घरातला कलह बाहेर जायला नको. अरे माझी काही इमेज आहे की नाही समाजात. मग तिला म्हंटले, ' गप्प बस बाई ' .. मी नरेंद्र आहे. आई नानांनी उगाच नाही ठेवलं हे नाव. आणि ही बिनडोक, उथळ बाई माझी तक्रार करायला निघाली पोलिसात. जग कुठे चाललंय देव जाणे. श्रीरामा, वाचव रे. या समाजाला रस्ता दाखव. तूच काय तो रक्षणकर्ता आता.

गजाननाने कटकट केली म्हणून गजर बंद केला आणि मग शेवटी ४.४५ ला उठलो. आज श्रीराम येणार, आज पुन्हा भारतवर्षात रामराज्य येणार. कढत पाण्याने आणि सुवासिक उटण्याने स्नान करावं म्हणून बाथरूम मध्ये गेलो. बायको मागून म्हणाली, 'आज पाणी नाही येणार. कालच वॉचमन सांगून गेला. तुमचं काही लक्ष नसतं.' तिला म्हंटले ' गप्प बस. खीर कर आज मस्त आणि शीरा पण. केळं घालून ' 'हो मग शुगर वाढली की निस्तरायला काय बायको आहेच.' ' ए बिनडोक बाई, आज श्रीराम येणार आहेत. आणि तुला शुगर ची पडलीय. आता सर्व फक्त आणि फक्त चांगलंच होणार. जाऊदे तुला अक्कल नाही. तुला कळणार नाही. '

पाणी नाही आंघोळ नाही, माझी चिडचिड झालीच. सून उशिरा उठते आमची. ७.१५ ला ही बाई बाहेर येऊन म्हणते, 'तुम्ही घ्या देवाचं नाव . आपोआप पवित्र व्हाल. आंघोळीची गरज नाही तुम्हाला.' मी तिच्याशी वाद घालत बसत नाही. तितकी तिची लायकी नाही. एवढ्या उशिरापर्यंत आमच्या आया बायका नाही झोपल्या कधी. तिला म्हंटले 'आज जाताना कुंकू लाव म्हणजे उपकार झाले.आजचा दिवस तरी साजरा करा.' तर ही उद्धट बाई शर्ट पँट घालून बाहेर पडली. मीटिंग आहे म्हणे कसली. डोक्यावर कुंकू नाही. हातात बांगड्या नाहीत. आणि कपडे तर हे असे पुरुषी. गज्या बिनडोक म्हणतो, ' अण्णा, सकाळी सकाळी नको ' याला शिंच्याला बायको सांभाळत नाही. आणि हा मला शिकवतो. हे हल्लीच्या मुलांचं काय होत चाललंय मला कळत नाही. काही म्हणजे काही रीतभात नाही. कसं वागायचं ते कळत नाही. पुरुष घराचा देव असला पाहिजे. उगाच नाही कर्तापुरूष शब्द आला. ते जे काही लिहून ठेवलंय आपल्या पूर्वजांनी ते काही उगाच नाही. तसं सगळं वाचलं नाही मी, पण वाचेन नक्की. सगळं आयुष्य गेलं माझं काम करण्यात आणि घर चालवण्यात. मी असं परवा लेल्याला सांगत होतो तर ही मागून म्हणाली ' रोज बाहेर पाट्या टाकल्या की त्याला घर चालवणं नाही म्हणत. अजून बरंच असतं घरात ' ही आमची करायची नोकरी. शाळेत शिकवायची. पण म्हणून ही अशी मिजास खपवून नाही घेणार मी. त्या दिवशी सरळ मी तिने केलेला सांजा न खाता बाहेर समोसा खाल्ला आणि माझा निषेध नोंदवला. मी घरी आल्यावर म्हंटले आता तरी ही माफी मागेल. पण शप्पथ! ही म्हणे मैत्रिणीकडे गेलेली. मग म्हंटले आज रात्रीही घरी जेवू नये. कळलं पाहिजे नवरा काय असतो ते आणि त्याचा मान कसा ठेवायचा ते. रात्री मी मिसळ खाल्ली... बाहेर

आंघोळ झाली नाही तर चिडचिड झालीच माझी. काय आहे हल्ली लाईट जातात फार. फारच वाढलं आहे हे. इन्व्हर्टर असतो तसा. पण आमच्या ४ खोल्या. त्यात तो ३-४ तास पुरतो मग नंतर आहेच. घाम आणि घाम.. काय करणार.

तो एकटा माणूस तरी किती काम करणार बिचारा. आधीच ३ तास झोपतो तो. या देशासाठी इतकं करतो. आपण तरी किती मागायचे? इतक्या वर्षांची घाण उपस्तोय एकटा. मंदिर करून दाखवलेच ना .. बाकीच्या गोष्टी क्षुल्लक. करेलच तो. मंदिराचे इतके पवित्र कार्य झाले त्याच्या हातून. धन्य धन्य तो.... मी पण लग्न करायला नको होतं. मग हा नरेंद्र पण काही करून दाखवू शकला असता. पण छे आम्ही आपल्या आईवडिलांचे ऐकले. आणि लग्न केले. नाहीतर ...

टीव्ही बघतांना डोळे भरून येत होते वारंवार. काय ते रूप, काय ते तेज. मी खरोखर भाग्यवान मी या भारतवर्षात जन्मलो. मी खरोखर भाग्यवान मी हिंदू आहे. मी खरोखर भाग्यवान मी आज हा क्षण बघू शकलो. खरंतर मला अयोध्येला जायला हवं होतं. जाणारच होतो मी. पण हिने बरोबर यायला स्पष्ट नकार दिला. मग म्हंटले त्या लेलेला विचारावं. तर तो शिंच्या म्हणतो, 'घरी बोलून सांगतो ' पुरूषासारखा पुरुष आणि यांना घरी बोलावं लागतं. लाज आणतात अगदी. याची मुलगी नातीला याच्याकडे सांभाळायला ठेवून जाते. ही असली कामं आम्ही नाही केली कधी. आणि मुलगी असतीच मला तर एकदा लग्न लावून दिल्यावर कशाला हवीत ही झेंगटे. झालंय ना लग्न मग ते तिचं घर आता. हे नाही. बघावं त्यांनी त्यांचं. लेल्याला अक्कल आणि स्वाभिमान दोन्ही नाही. असो. आपल्याला काय करायचे आहे.
आणि मी काय जाईनच अयोध्येला... थांबतोय हो मी कुणासाठी!

ॲसिडिटी झाली आहे फार. त्या डॉक्टरच्या डोक्यावर पैसे आपटायला लागणार आता. परवाची मिसळ ... जाऊ दे. हिच्या लक्षात नाही आलं अजून..

नरेंद्र बरवे
२२ जानेवारी २०२४
तिथी - द्वादशी
विक्रम संवत - २०८०
शक संवत - १९४५

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

अस्वल Tue, 13/02/2024 - 23:25

निरीक्षण: आय.डी खोडसाळ आहे.
( नाही म्हणजे राजपाल यादवने स्वत:चं नाव "तुलसीदास खान" सांगितल्यावर मी मनमुराद हसलो होतोच. शिवाय रझाक खानने त्याला "अबे तू आदमी है की इन्डिया-पाकिस्तान बॉर्डर" विचारल्याचा कुणालाच राग आला नव्हता.)

'न'वी बाजू Wed, 14/02/2024 - 09:52

In reply to by अस्वल

काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, एखादी व्यक्ती ही 'खान' असण्याकरिता मुसलमान असण्याची आवश्यकता नाही.

चंगीझ खान, झालेच तर बगदादवर हल्ला करून तिथली खिलाफत धुळीस मिळवणारा त्याचा नातू हुलाकू खान, ही खानमंडळी मुसलमान नव्हती.

तेव्हा, एखादा तुलसीदास हा खान असण्यास तत्त्वत: अडचण येऊ नये.

(मात्र, 'खान'चे स्त्रीलिंग 'खातून' व्हावे; 'खान' नव्हे. (‘खानुम’सुद्धा होऊ शकावे बहुधा. (चूभूद्याघ्या.)))

irawatiKhan Wed, 14/02/2024 - 22:12

In reply to by 'न'वी बाजू

मला मदत करण्यास नेहमीच आनंद वाटतो. ID बदलणार असाल तर 'न'वा बाजा असाही एक पर्याय दिसतोय मला

विंदांची एक कविता आठवली, ऐका.
फुले येऊन उपयोग काय?
चाफ्या तुला नाकच नाय नाकच नाय.
ढगा पाणी असून फुकट
तुला कुठे लागते तिखट लागते तिखट.
================

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2024 - 03:55

कोण हे नरेंद्र बरवे? टाईम मशीन शोधलंय का यांनी? थेट अठराव्या शतकातून २०२४मध्ये पडलेत असं वाटलं.

irawatiKhan Wed, 14/02/2024 - 04:01

ऋतू हिरवा ऋतू बरवा ऐकण्यात आले असेल अशी अपेक्षा करते. त्यातले बरवे आहेत हे. गाण्याची लिंक देते हवी असल्यास. नाही तर तुम्हीच शोधून घ्या. तुमच्याकडे पण तीच दिसणार आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/02/2024 - 04:26

In reply to by irawatiKhan

अश्लील,अश्लील,अश्लील!

'न'वी बाजू Wed, 14/02/2024 - 19:18

In reply to by irawatiKhan

‘राममंदिर’वाल्यांना ‘हे राम!’वाल्याची अॅलर्जी असते, हा एक रोचक दैवदुर्विलास आहे.

(त्यांना हिटलर आणि इस्राएल दोहोंबद्दल एकसमयावच्छेदेकरून कौतुक अधिक सहानुभूती असते, हा दुसरा.)

irawatiKhan Wed, 14/02/2024 - 22:24

हिटलर आणि इस्राएल पर्यंत आपण नको जाऊया. आपल्या या जन्मभूमीचा आधी विचार करूया. विचार केल्यावर तिच्यासाठी कार्य करूया. मग बाकीचं जग पडलंय.  

Rajesh188 Fri, 16/02/2024 - 13:20

निवडणुकीचा तोंडावर अगदी वेळ साधून हिंदू च्या श्रद्धा स्थान विषयी विकृत लिहिणारे हे खरे तर bjp चेच समर्थक असतात.
महागाई,भ्रष्ट कारभार, बेरोजगारी ह्याला हिंदू वैतागून bjp ल मत दिले नाही पाहिजे असे ठरवतो तेव्हाच असे हिंदू च्या श्रद्धा स्थानावर लेख येतात आणि ही लोक परत bjp ल मतदान करतात.
पूर्ण वर्षात लेखकाला ह्या विषयावर लिहावे असे वाटले नाही .
आता निवडणुका जवळ आल्या तेव्हाच ह्यांची लेखणी जागृत झाली.
आयडी च वय 3 दिवस आहे आणि उच्च शिक्षित,अती बुद्धिमान लोकांना त्याने मूर्ख बनवले कारण इतक्या उच्च विद्या विभूषित लोकांनी काहीच न विचार करता कॉमेंट केली
.शिक्षण आणि बुध्दीमत्ता ह्याचा काडी च संबंध नाही ह्या दाव्याचा .
फालतू धागा आणि उच्च शिक्षित लोकांनी त्याची दखल घेणे .
ह्या सारखे दुसरे कोणतेच उदाहरण नाही

Rajesh188 Fri, 16/02/2024 - 14:24

देशातील वातावरण काय आहे देश अगदी संकटात आहे हिंदु च्या भावनेला हात खालून लबाड राजकीय पक्ष सत्तेत आहे.

देशातील सर्व आर्थिक वर्गातली (अती उच्च आर्थिक वर्ग सोडून)..
सर्व क्षेत्रातील लोकांचे स्वतंत्र, त्यांची रोजी रोटी धोक्यात आहे .
अशा च वेळी धार्मिक भावनेवर लेख इथे तीन दिवस ज्या आयडी च कार्य काळ आहे

कार्य काळ आहे तो आयडी लेख लीहातो.( आणि तो पण मुस्लिम नाव घेवून)
हिंदू चे श्रद्धास्थान वापरतो.
आणि ऐसी अक्षरे तो तो प्रसिद्ध पण करतो
उच्च विद्या विभूषित लोक कॉमेंट पण करतात.

.खरेच भारत धोक्यात आहे

चिमणराव Sat, 17/02/2024 - 14:45

गरीबी कुठे आणि केव्हापासून नाही?
!इजिप्तमध्येही (४५००वर्षे) होती. पौराणिक कथांत अश्वत्थामा द्रोण गरीबीतच होते.
फक्त तात्कालीन राज्यकर्ते लबाड होते का माहीत नाही. पण मला काही कुणाचा पुळका वगैरे आला नाहीये. कर्नाटक सरकारने परवाच जंगी बजेट सादर केलं गरीब आणि परित्यक्ता साठी. ते अचानक कुठून आले?
एकदम झेंडे घेतले खांद्यावर तर तेवढेच विरोधी झेंडेवालेही समोर उभे ठाकतात.