पाकिस्तान- ७
“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)
"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले. आम्ही तर हल्लाही केला नव्हता की जिंकणे महत्त्वाचे ठरले असते.”
- ब्रिगेडियर चित्तरंजन सावंत.
1965 च्या निवडणुकांची रचनाच अशी होती की फातिमा जिन्ना यांना मिळालेला जनतेचा पाठिंबा असूनही अय्युब खान यांचा विजय निश्चित होता. मात्र, त्यांनी अयुब खान यांना हुकूमशहा आणि सिंधू खोरे करारात भारतापुढे गुडघे टेकावे लागलेला संबोधले. (या करारानुसार सतलज, रीवा, बियासचे पाणी भारताच्या वाट्याला आले आणि सिंधू, झेलम, चिनाबचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आले.)
निवडणुकीतील विजयानंतर अयुब खान यांना आपली ताकद दाखवावी लागली. त्यांना मुत्सद्देगिरीची फारशी समज नव्हती, पण ते लष्कराचे फील्ड मार्शल होते. हेच काम त्यांना चांगलेच जमायचे. युद्ध लढणे.
आणखी एक व्यक्ती मुत्सद्देगिरीसाठी त्यांना सामील झाली. त्या माणसाने अमेरिकेत शिक्षण घेतले होते, सोव्हिएट्सचा त्याच्यावर प्रभाव होता आणि भारताचा तो तीव्र तिरस्कार करायचा. त्यांच्यापेक्षा मोठा मुत्सद्दी पाकिस्तानी राजकारणात आजपर्यंत क्वचितच कोणी झाला असेल. ते होते झुल्फिकार भुट्टो.
भुट्टो पाकिस्तानचे तेल आणि खनिज मंत्री होते, पाकिस्तानकडे ना तेल होते ना विशेष खनिजे. इराण, इराक किंवा अरब देशांना जो सन्मान अमेरीका देते तो सन्मान कधीच पाकिस्तानला देणार नाही ह्याची त्यांना जाणीव होती. कारण पाकिस्तानात तेल नाही. तथापि, पाकिस्तानात तेल आहे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी सोव्हिएतांशी एक गुप्त करार केला की ते तेल शोधण्यासाठी पाकिस्तानात येतील. अमेरिकेच्या पाठीत हे खंजीर खुपसण्यासारखे होते, पण हे सगळीकडेच सुरू होते.
1962 मध्ये भारत-चीन वादाने युद्धाचे स्वरूप धारण केले होते. त्यावेळी अयुब खान यांना काश्मीरमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी होती. भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढणे कठीण झाले असते. त्यावेळी अमेरिका आणि इंग्लंडने अयुब खानचे हात बांधले. मी इतर लेखनात (केनेडी: बदलत्या जगाचे प्रत्यक्षदर्शी) याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे.
भुट्टो-अयुब खान जोडीने नव्या समीकरणाचा पाया घातला. त्यांना वाटले की आशियाचे दोनच मालक आहेत - चीन आणि सोव्हिएत. अमेरिकेच्या गणितात भारताचे स्थान जास्त, तर पाकिस्तानचे स्थान कमी. ह्यामुळे चीन पाकिस्तानला अधिक मदत करू शकतो. माजी पंतप्रधान सुहरावर्दीही चीनला गेले होते, पण आता हे नाते घट्ट होत होते. 1964 मध्ये, चीनने पाकिस्तानमध्ये लष्करी-औद्योगिक संकुल बांधण्याची ऑफर दिली आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी मदत देण्याचे आश्वासनही दिले. आता हिंदी-चिनी भाई भाई नव्हते, तर पाकी-चिनी भाई भाई होते.
जम्मू आणि काश्मीर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर स्वायत्त होते. त्याचे स्वतःचे पंतप्रधान आणि सदर-ए-रियासत, स्वतःचे संविधान होते. 1965 मध्ये त्या संविधानात सहावी दुरुस्ती करण्यात आली, त्यानुसार मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही पदे तयार होणार होती. याचा अर्थ भारताचे केंद्र सरकार स्वतःचे राज्यपाल नेमू शकत होते. गुलाम मुहम्मद सादिक हे पहिले काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. या निर्णयानंतर काश्मीर अस्वस्थ होत होते.
झुल्फिकार अली भुत्तो यांच्यासाठी ही सुवर्ण मुत्सद्दी संधी होती. त्यांनी शेख अब्दुल्ला यांना अल्जेरियात चीनचे राष्ट्राध्यक्ष चौ-एन-लाई भेटण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात येते. लाल बहादूर शास्त्रींना हे कळताच त्यांनी तात्काळ शेख अब्दुल्ला यांना भारतात बोलावले.
अमेरिकेचे पॅटन रणगाडे, चीनचा वरदहस्त आणि काश्मीरचे मुजाहिदीन यांच्यामुळे पाकिस्तान भारताशी लढायला तयार होत होता. जानेवारी 1965 मध्ये भारतीय सैन्याने सीमेवर अनपेक्षित हालचाली पाहिल्या. हे ना काश्मीरमध्ये होते ना पंजाबमध्ये. सिंधच्या खारट, पाणथळ कच्छच्या रणांगणात ही हालचाल होती.
भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जनरल अयुब खान यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठे होते. काही महिन्यांपूर्वी कैरोहून परतताना ते कराचीत थांबले होते आणि अयुब खान यांनी त्यांचे शाकाहारी जेवण तयार करून स्वागत केले होते. एका स्वत:ला शेतकरी म्हणायचा, तर दुसरा सैनिक. आता दोघेही युद्धात समोरासमोर होते.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
प्रतिक्रिया
आता पर्यन्त ची पूर्ण लेख मालिका वाचली
1ते7 सर्व भाग वाचले आणि एकच प्रश्न मनात थैमान घालू लागला.
जसे ब्रिटिश जाणार आणि सत्ता मिळणार ह्याची कानकुन लागल्या बरोबर सर्वच समाज घटकांच्या नेत्यांचे सत्ता मिळवण्याच्या दाबून ठेवलेल्या ठेवलेल्या,लपविलेल्या म्हणा हवं तर सुप्त इच्छा बाहेर येवू लागल्या ,.
ब्रिटिश तर जात च होते .
ह्यांच्यात च सत्ता वाटून घेण्याची स्पर्धा लागली मुखवटे मात्र समाज हिताचे.
भारत स्वतंत्र होत आहे ,सर्व मिळून भविष्याचे नियोजन करू या.
उत्तम राज्य व्यवस्था देशात निर्माण करू या.
लोकात फूट पडू नये ह्याची काळजी घेवु या.
कोणत्याच नेत्याच्या डोक्यात नाही.
कोणत्या समाज घटकाला भडकावून देवू की आपले सत्तेचे स्वप्न साकार होईल ह्या मध्येच सर्व नेते गुंतले होते.
त्याचा परिपाक म्हणजे भारताचे विभाजन,युद्ध,दंगली इत्यादी.
ब्रिटिश जर आलेच नसते तर भारताची भूमी एकत्र करण्याची कुवत कोणातच नव्हती .
ते आलेच नसते तर भारतीय उपखंडात टोळ्या च निर्माण झाल्या असत्या.
भारतात लोकशाही आहे,विचार स्वतंत्र ,पाकिस्तान मध्ये ह्या गोष्टी आहेत.
पण जगातील खूप राष्ट्रात.
लोकशाही आणि स्वतंत्र खूप प्रगत स्थिती मध्ये आहे.
आपण अजून 1947 मध्ये अडकलो आहोत.
पुढे जाण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही.
आज पण सत्ता मिळवायची असेल तर ब्रिटिश कालीन आणि ब्रिटिश नंतर दहा वीस वर्षाचा काळ हीच सामाजिक स्थिती ठरवुन गृहीत धरली जाते आणि त्या नुसार मत व्यक्त करणे गरजेचे आहे. असे पक्के सूत्र आहे सत्तेचे
2024 ल भारताची सामाजिक स्थिती सुधारली आहे कोणताच राजकीय पक्ष स्वीकारत नाही (सर्व स्वार्थी आहेतः एक नंबर चे)
त्या मुळे 1947 आणि मागे पुढे दहावीस वर्ष ह्या काळातून कोणालाच बाहेर यायचे नाही
भारतीय उपखंडातील नेत्यांमध्ये देश हिता पेक्षा सत्ता मिळवणे हे एक मेव ध्येय असते.
मग तो भारत असू,पाकिस्तान असू किंवा बांगलादेश
लेख माले च हाच निष्कर्ष मी काढला आहे