BIV:Thought Experiment
BIV:Thought Experiment
(कथा वाचायच्या आधी प्लीज
https://www.aisiakshare.com/node/9065
हा लेख वाचून घ्या. कथा समजायला मदत होईल. )
गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी.
एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक.
“हलो, अनंत, मी परब. आठवतंय?”
लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज.
मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला. एका स्त्रीचा करारी आवाज ऐकू येत होता,
“यू ब्लडी फूल...”
डाव्या हाताकडे पाहिले तर तो आपल्या जागी व्यवस्थित दिसत होता.
“सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? एक मिनिट, पाणी आणून देते. पाणी प्या म्हणजे बरं वाटेल.” माझी सेक्रेटरी शर्ली गोड आवाजात बोलत होती.
तिने आणून दिलेले थंड गार पाणी प्यालो. थोडं बरं वाटलं.
“शर्ली, काय झालं?”
“सर, मी हे लेटर फायनल करून तुमच्या सहीसाठी आणलं होतं तर तुम्ही उजव्या हातानं सगळीकडे चाचपत होता. माझ्याकडे, सर, तुमचे लक्ष नव्हतं. मी काहीतरी बोलले पण ते तुम्हाला ऐकू गेले की नाही काय माहित. मी थोडीशी घाबरले. आता ठीक आहे ना?”
“हो, इट्स ऑलराईट नाऊ. आणि थँक्स.”
हल्ली हे असं होतंय. विस्मरण म्हणजे माझ्या मोबाईलचा नंबर आठवत नाही. एकदा तर संध्याकाळी बायको बरोबर बागेत फिरत असताना मी माझे नाव विसरलो. घराचा पत्ता विसरलो.
“हलो, अनंत. मी परब. आठवतंय?”
तोच तो पॅनिक अटॅक. तीच लोकांची धावपळ. त्याच स्त्रीचा आवाज.
“व्हाट द फक, मूव्ह क्विक...ही इज सिंकींग.”
कुणीतरी माझ्या दंडाला धरून बोलत होतं, “अरे असं काय करतोयस? बरं वाटत नाहीये का? ह्या बाकावर बस तरी जरा.”
पॅनिक अटॅक. जसा आला तसा गेला.
कुणीतरी सुटकेचा निश्वास टाकला.
“जस्ट सेव्ड. चेक हिम आउट. त्याला विचार नाव काय, मोबाईल नंबर काय?”
“नाव, अनंत रामचंद्र कर्वे, मोबाईल नंबर ९८२३३.....”
“छान! लुक्स लाईक ही इज ओके, मॅडम.”
“अरे, तुला काय झालाय? तू कुणाशी बोलतोयस?”
“मॅडमशी.”
“कोण मॅडम?”
“माहित नाही.”
बायकोने माझा ताबा घेतला आणि गाडीत घालून डॉक्टर दिवटेंच्या इस्पितळात आणले.
डॉक्टर दिवटे आमचे फ्रेंड आणि फॅमिली डॉक्टर.
बायकोने सगळा किस्सा वर्णन केला.
“काय अंत्या, काय नाटक चाललाय? ऑ.”
दिवटेनी ब्लड प्रेशर तपासले. अजूनही काही तपासण्या केला.
“वहिनी, सगळे नॉर्मल आहे. हाय प्रेशर थोsssडे हाय आहे आणि लो अगदी लो आहे १५०/५५. लो ब्लड प्रेशरचा अटॅक असावा. वैनी पुन्हा अस झालं तर लगेच साखर खायला द्यायची. लिमलेट गोळ्या लिहून देतो. त्या नेहमी खिशात ठेवायच्या. अंत्या, “त्याच्यावर” थोडा कंट्रोल ठेव. नाहीतर गोळ्यांचा रतीब लावावा लागेल. आणि पळ.”
“त्याच्यावर म्हणजे कशावर?” बायकोने विचारले.
पण उत्तर द्यायला डॉक्टर थांबले नाहीत. बिझी माणूस.
हळू हळू सगळे सुरळीत झाले. परब पुन्हा माझ्या डोक्यात डोकावला नाही.
पण त्याची जागा आता शर्लीने घेतली. शर्ली म्हणजे तीच ती माझी सेक्रेटरी.
तिला पगारवाढ पाहिजे होती.
“सर महागई केव्हढी वाढली आहे! माझा नुसता मेकअपचाच खर्च आता महिना दहा हजारात गेला आहे. कसं जगायचं स्रियांनी.”
“लिपस्टिक आणि नेल पॉलिश. दररोज चेंज करायची गरज आहे का? दिवसातून दोंदाच्या ऐवजी दोन दिवसातून एकदा...”
“सर, तुमच्या सेक्रेटरीला ते शोभून दिसेल का? त्यापेक्षा तुम्ही माझा पगार का नाही वाढवत?”
“शर्ले, आताच तर तुला हजारचा रेज दिला होता ना.”
“आत्ताच? सर.त्या गोष्टीला सहा महिने झाले. जेव्हा आपले पंप्र रशियाला गेले होते तेव्हाची गोष्ट!”
शर्लीचे असे रडगाणे दर रोज चालू होते.
पूर्वी शर्लीचा प्रसन्न चेहरा दिसला कि बरं वाटायचं. पण हल्ली मात्र तिला पाहिले कि डोकं गरगरायला लागते. डोक्यात तिडीक उठते. असं का होत असेल?
हे असे रुटीन आयुष्य जगत असताना लता वैनिंचा फोन आला.
लता वैनी म्हणजे माझा परमप्रिय मित्र राघव जोशीची पत्नी. ( अवांतर, त्या कांदापोहे फर्मास बनवतात. असो.)
“हा बोला वैनी. काय कांदापोह्याचा बेत आहे...)
मला मधेच कटाप करून त्या म्हणाल्या, “तुम्ही ताबडतोब असाल तसे इकडे या.” फोन बंद झाला होता.
त्यांचा आवाजावरून त्या खूप घाबरलेल्या असाव्यात असे एकूण दिसत होते.
मी तत्काळ राघवच्या घरी पोचलो.
दरवाजा उघडावयाच्या आधी वैनिनी आतूनच विचारले, “कोण आहे? राघव घरी नाहीये.”
“मी अनंता आलोय.”
“जरा डाव्या बाजूला सरकून उभे रहा. हा ठीक आहे. मला दिसलात तुम्ही. मी दरवाजा उघडते,”
वैनिनी पुन्हा एकदा दरवाजा किलकिला करून खात्री करून घेतली, हळूच दरवाजा उघडला. मला आत घेऊन तितक्याच त्वरेने बंदही केला.
“काय प्रकार आहे? तुम्ही एव्हढ्या का घाबरल्यात? राघव कुठाय?” मी एका दमात सगळे प्रश्न विचारले.
“राघवला ते लोक घेऊन गेले,”
“कोण लोक. मला काही समजेलस सांगा.”
“एका तासापूर्वी पाच सहा धटिंगण घरात घुसले आणि राघवच्या छाताडावर बसून त्यांनी राघवला कसलेतरी इंजेक्शन दिले. त्यांनी राघवचे खिसे तपासले, राघव त्याच्या पाकिटात नेहमी ड्रायव्हिंग लायसेन्स आणि पॅन कार्ड ठेवतो, ते त्यांनी घेतले आणि त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांशी ताडून पाहिले.
“बरोबर आहे, डीटेल्स मॅच होताहेत. उचला ह्याला.”
“मग दोघांनी बाहेर जाऊन एक स्ट्रेचर आणला. त्याच्यावर बेशुद्ध राघवला झोपवला आणि घेऊन गेले. माझी तर भीतीने बोबडी वळली. तरी धैर्य एकवटून मी खिडकीबाहेर बघितले. एका अंब्युलंसमधून ते लोक निघून गेले. प्रसंगावधान राखून मी अंब्युलंसचा नंबर लिहून घेतला. हा पहा.” एव्हढे बोलून त्या रडायला लागल्या.
“रडू नका. घाबरू नका. अजून आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. आपण पोलिसात तक्रार करू.”
मी हे बोलत असताना दरवाज्याला लाथ मारून दोन गुंडे आत घुसले.
“कोण पोलिसात कंप्लेट करायच्या बाता करतोय? तुम्हीच का मिसेस जोशी? तुमचे मिस्टर सुखरूप परत यावेत अशी इच्छा असेल तर कुठेही कंप्लेट करायची नाही. शहाण्या मुलासारखं चूप बसायचं.”
अर्थात आम्ही पोलिसात कंप्लेट करायचं थोड्या अवधीपर्यंत तहकूब केलं.
विचार केला एक दोन दिवस वाट बघू, राघव परत आला तर ठीकच आहे, नाहीतर मग काय करायचं त्याचा विचार करू. वैनीना सांगितले कि तुम्ही आमच्या घरी चला. आजची रात्र तिकडेच काढा. त्यांना घेऊन घरी आलो आणि बायकोला झाल्या प्रसंगाची माहिती दिली.
पण असे कुणीही गुंडांनी यावे आणि शांतताप्रिय जीवन जगण्याराऱ्या एका सज्जन नागरिकाला बेशुद्ध करून किडनॅप करावे याला काही अर्थ आहे का? बरं जोशी दांपत्याकडून काही खंडणी वसूल करायची जर कुठल्या गँगची आयडीया असेल तर ती चुकीचीच असेल. जोश्याला झाडला तरी मुश्किलीने काही लाख रुपयेच मिळाले असते. घराचे आणि गाडीचे हप्ते भरण्यातच त्याचा पगार जात होता,
मला वाटायला लागले कि हा काहीतरी “मिस्टेकन आयडेटिटी”चा प्रकार असावा. त्या “ब्राझिल” पिक्चरमध्ये असा काही किस्सा आहे. एक दोन दिवसात “त्यांना” त्यांच्या चुकीची जाणीव होईल, गैरसमज दूर होतील आणि राघव घरी परतेल.
मी ही माझी थेरी सगळ्यांना समजावून सांगितली. वैनिंचा त्यावर चटकन विश्वास बसला. म्हणतात ना कि बुडत्याला काडीचा आधार. संकटात सापडलेल्याचा कशावरही चटकन विश्वास बसतो.
त्यांचा विश्वास बसला पण माझा मात्र बसला नव्हता. माझा कशावरही विश्वास बसत नाही. मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले.
माझ्याकडे फक्त एकच क्लू होता. तो म्हणजे त्या रुग्णवाहिकेचा क्रमांक.
आरटीओच्या साईटवर सर्च मारला तर समजले कि हि गाडी एका हॉस्पिटलच्या नावावर रजिस्टर केली गेली होती. (हॉस्पिटलचे नाव नाही लिहिणार).
आता ह्या हॉस्पिटलचे लोकेशन शोधणे आले. ते ही मिळाले.
शहराच्या बकाल वस्तीत हे हॉस्पिटल होते. मी नेटाने त्या वस्तीत घुसून हॉस्पिटलची जागा शोधून काढली,
ती अगदी मोडकळीसआलेली बिल्डींग होती. बिल्डींगच्या बाल्कनिंना जमिनीपासून लाकडी बल्ल्या लावून आधार दिले होते. बिल्डींगवर रंगाचा शेवटचा हात केव्हा फिरला असेल कुणास ठावं. तळमजल्यावर पोट सुटलेला उघडाबंब आणि घामाने थबथबलेला हलवाई सामोसे तळत होता. समोरच्या बाजूला कटिंग चहाचा ठेला होता. तिथे बाकड्यावर लोक चहाची वाट पहात बसले होते. चहा उकळी फुटायच्या बेतात होता. तो पर्यंत काय करायचे म्हणून लोक बिडी पीत बसले होते. ही जागा काळे धंदे करण्यासाठी योग्य होती. काय सांगावं हे हॉस्पिटलवाले लोक माणसांचे अवयव काढून त्याचा व्यापार करणाऱ्या टोळी पैकी असावेत. हल्ली हा धंदा तेजीत आहे असे ऐकतो. रक्तापासून माणसाच्या स्किन पर्यंत सगळ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार मागणी आहे असे म्हणतात म्हणे.
पण असे विचार करणे हे भ्याडपणाचे लक्षण. त्यातून केस माझ्या मित्राची होती. इथवर आलो आहोत तर आता परत फिरणे नाही.
“हॉस्पिटल” सहाव्या मजल्यावर होते. पण वर जाण्यासाठी लिफ्ट नव्हती. नव्हती म्हणजे होती पण ती सहाव्या मजल्यावरून खाली यायला तयार नव्हती.
शेवटी चालत चालत धापा टाकत सहाव्या मजल्यावर पोहोचलो खरा.
इथे सगळे सुमशान होतो. दरवाजा ढकलून घुसलो सरळ आत.
पण आत आल्यावर माहौल बदलला.
इथे म्हणजे फॉरेनला आल्याप्रमाणे वाटत होते. सगळा मजला एसी. भिंती जमीन सगळे काचेचे.
एका हॉलमध्ये संगणकाची दहा एक टर्मिनल होती. त्यांच्या समोर काही लोक बसले होते. एका टर्मिनलवर एक दृश्य दिसत होते. तेच आता जायंट स्क्रीन वर दिसायला लागले. त्या दृश्यात मी हॉस्पिटलच्या लॉबीत उभा राहून जायंट स्क्रीन वर मलाच बघतो आहे असे दिसत होते.
“आता त्याला इकडे आणला आहे. तो हॉस्पिटल बघत फिरतो आहे.” कुणीतरी हलक्या आवाजात बोललं.
“तो एव्हढा घाबरलेला का आहे? हसव त्याला थोडेसे.”
त्यांचे संवाद ऐकून मला हसायला येऊ लागले.
“पहा. तो आता हसतो आहे.”
“त्याला आत आण.”
एखाद्या झॉंबीसारखा मी आत गेलो आणि एका टेबलावर निपचित आडवा पडलो.
ते एक सुसज्ज ऑपरेशन थिएटर होते. माझ्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मध्यभागी ऑपरेशन चालू होते.
होय, राघव जोशीचे ऑपरेशन चालले होते. एक स्त्री त्यांच्यावर देखरेख ठेवत होती. राघवचे डोके भादरले होते. त्यामुळे त्याला ओळखणे अवघड होते पण त्याच्या नाकाच्या शेपवरून ओळख पटली.
“गिगली सॉ.”
नर्सने डॉक्टरच्या हातात गिगली सॉ दिली. राघवच्या कवटीचा सर्क्युलर सेक्शन घेतला जात होता, आपण जशी टोपी काढून बाजूला ठेवतो अगदी त्या प्रमाणे कवटीचा वरचा हाफ हळुवार हाताने अलग करून ट्रेमध्ये ठेवण्यात आला. ब्रेनस्टेम कट करून मेंदू स्पायनल कॉर्डपासून सेपरेट करण्यात आला.
ह्यानंतर सगळ्या क्रिया वेगाने करण्यात आल्या. ती स्त्री सगळ्याना घाई करत होती. मेंदू कवटीतून उचलून एका फिश बाउल सारख्या भांड्यात ठेवण्यात आला. त्या बाउलला अनेक तारांचे जुडगे जोडले होते. बाउलमध्ये ब्राऊन रंगाचे द्रव सर्क्युलेट होत होते.
एकजण इलेक्ट्रोएनसेफॅलोग्राफवर लक्ष ठेवून होता.
“मॅडम, इलेक्ट्रिकल सिग्नल्स डिटेक्टेड.”
“छान!. चेकिंग साठी म्हणून त्याला लक्ष्मी रोडवरून फिरवून आणा. तवर इकडे त्याच्या रिकाम्या कवटीत कॉटनवेस्ट भरा आणि कवटी बंद करा.”
सगळ्यांची नजर जायंट स्क्रीनकडे गेली.
जोशी बायको बरोबर पु ना गाडगीळ च्या दुकानात सोन्याची चेन विकत घेत होता.
बिल बनवणाऱ्या तरुणीने जोश्याला मोबाईल नंबर विचारला.
“९८३४४.....”
मॅडमने विचारले, “नंबर बरोबर सांगितला?”
“येस मॅडम.”
“गुड!”
अशी सगळ्यांना शाबाशकी देऊन मॅडम माझ्याकडे वळल्या. मॅडमनी तोंडावरचा मास्क काढला. अरे ही तर माझी सेक्रेटरी शर्ली होती.
“शर्ली, मी तुझा पगार वाढवून...”
“त्याची काही गरज नाही, सर. आणि घाबरू नका. तुमचे ऑपरेशन करायचे नाहीये, कारण तुमचा मेंदू तीन महिन्यापूर्वीच काढला आहे. पोस्ट ऑपरेटीव चेकिंग साठी तुम्हाला इथे आणण्यात आले आहे. सुरवातीला खूप त्रास झाला ना सर, पण आता तुमचा मेंदू स्टॅबिलाइज़ झाला आहे. तुमच्या प्रोजेक्ट वर काम करणारा प्रोग्रॅमर फ्रेशर होता. For that. I am extremely sorry sir. हो सके तो मुझे माफ कर दो. नही होता है तो, जा फ्लाय काईट. त्या परबच्या आणि तुमच्या मेमरीत काही झोल झाला होता. तेही बघायचे आहे. सो रिलॅक्स.”
(समाप्त)