डॉ. शंतनू अभ्यंकर - सत्य असत्याशी मन केले ग्वाही
सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता
डॉ अनिल यशवंत जोशी
(विज्ञानविषयक लिखाण करणारे वाई येथील बहुआयामी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे नुकतेच दुर्धर आजाराशी सामना करत निधन झाले. त्यांच्या एका सुहृदाने त्यांना वाहिलेली आदरांजली.)
We are going to die, and that makes us the lucky ones. Most people are never going to die because they are never going to be born. The potential people who could have been here in my place but who will in fact never see the light of day outnumber the sand grains of Arabia. Certainly those unborn ghosts include greater poets than Keats, scientists greater than Newton. We know this because the set of possible people allowed by our DNA so massively exceeds the set of actual people. In the teeth of these stupefying odds it is you and I, in our ordinariness, that are here. We privileged few, who won the lottery of birth against all odds, how dare we whine at our inevitable return to that prior state from which the vast majority have never stirred?
- Richard Dawkins, Unweaving the Rainbow: Science, Delusion and the Appetite for Wonder
मला माहीत आहे. शंतनू रिचर्ड डॉकिन्सच्या याच उद्धृताचा विचार करत असणार. तसा शंतनू कुठल्याच आव्हानाला घाबरला नाही किंवा बिचकला नाही. प्रश्न मुळातून समजून घ्यायचा, त्याच्या सर्व पैलूंवर साकल्याने व शास्त्रशुद्ध विचार करायचा आणि 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियले नाही बहुमता' असे म्हणत अंतरात्म्याचा, विवेकाचा आवाज ऐकत कृती करायची ही त्याची पद्धती. मृत्यू समोर उभा असतानादेखील त्याने हेच केले. हल्ला कुठून होणार आहे ते समजून घेतले, आपल्याकडे बचावाची काय साधने आहेत आणि त्यांच्या काय मर्यादा आहेत ते जाणून घेतले आणि एखाद्या योद्ध्यासारखे या सर्वाला तोंड दिले. या लढाईत पत्नी रूपा, आई-वडील, मुले ,नातवंडे या सर्वांनी शंतनूला अत्यंत मोलाची साथ केली. गेले दोन-तीन आठवडे त्याची तब्येत खालावत चालल्याच्या बातम्या येत होत्या. काय होणार आहे त्याचा अंदाज असला तरी ते सत्य समोर उभे राहिल्यावर भावनांचा कल्लोळ मनात दाटून आला आहे. या सत्याला सामोरे जायची तयारी शंतनूनेच आमच्याकडून करून घेतली होती. त्याच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर त्याने स्वतःच त्याबाबत विस्ताराने लिहिले होते. रोग निदान, त्यासाठीच्या विविध प्रक्रिया तपासण्या, उपलब्ध उपचार त्या उपचारांच्या मर्यादा व उपचारांमुळे होणारे संभाव्य त्रास या सर्व गोष्टींचा शास्त्रीय उहापोह त्याने केला होता. या उहापोहामध्ये कसलीही दयेची याचना किंवा करुणा नव्हती. आयुष्यभर जे विचार म्हणी बाळगले आणि त्याप्रमाणे वर्तन केले त्याची एक प्रकारे ही परीक्षाच होती. शंतनू त्यात उत्तमरीत्या उत्तीर्ण झाला. स्वतःच्या आजाराकडे एखादा माणूस इतका त्रयस्थपणे कसा काय पाहू शकतो हा प्रश्न मला त्या वेळी पडला होता. अशा प्रसंगी भावनिक आधार देण्यासाठी देवधर्म या संकल्पना मदतीला येतात हा डॉक्टर म्हणून मला नेहमी येणार अनुभव. परंतु हे दार शंतनूने स्वतःच विचारपूर्वक व चिकित्सा करून बंद केले होते. आपले विचार, आपले लिखाण, आपले छंद आणि आपलं कुटुंब ही शस्त्रे वापरत त्याने कर्करोगाच्या वेदना ,यातना पेलल्या.
शंतनूपुढे 'अष्टपैलू' वगैरे शब्द फिका असेल. जीवनाच्या विविध क्षेत्रात अगदी सहजपणे, आनंदाने, ताकदीने आणि अतिशय उत्कृष्ट असे योगदान सहजपणे देणारा अतिशय उमदा, प्रामाणिक, पारदर्शक असा हा आमचा मित्र. त्याच्या या लोक विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे मला भावलेले काही पैलू या निमित्ताने सांगायला पाहिजेत.
१. चांगल्या डॉक्टरची अनेक लक्षणे सांगितली जातात. त्या डॉक्टरचे लोकशिक्षक असणे हा पैलू सर्वसामान्यपणे दुर्लक्षला जातो. डॉक्टरची रोगनिदान करण्याची क्षमता व त्याने केलेले उपचार यावरच डॉक्टरचे मूल्यमापन करण्याकडे समाजाचा कल असतो. रोगनिदान व उपचार यामध्ये शंतनू तरबेज होताच, शिवाय तो अतिशय उत्तम असा लोकशिक्षक होता. स्त्रीरोगतज्ज्ञ या शब्दाचे त्याला वावडे होते. त्याऐवजी तो स्वतःला स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून घ्यायचा. वैद्यकीय विश्वाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आपल्या रुग्णांना त्यांच्या आजाराची शास्त्रशुद्ध माहिती सोप्या मराठीत उपलब्ध व्हावी म्हणून तो वेळोवेळी समाजमाध्यमांवरून आणि पुस्तक स्वरूपात विपुल लेखन करायचा. मराठी भाषेवर त्याचे प्रेम होते. ही भाषा वाढावी समृद्ध व्हावी आणि विज्ञान लेखन रुक्ष न होता ते लालित्यपूर्ण असावे यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. अनेक अवघड इंग्रजी वैद्यकीय संज्ञांसाठी अत्यंत अर्थवाही मराठी शब्द तो वापरायचा आणि त्यामुळे ती संकल्पना क्षणार्धात समजायची. आम्हा डॉक्टर मंडळींच्या शिक्षण परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यात अनेक महत्त्वाच्या विषयावर शंतनू सादरीकरण करायचा. ही सादरीकरणे महाराष्ट्रातल्या परिषदांमध्ये तो आवर्जून मराठी भाषेमध्ये करायचा. अर्थात योग्य त्या ठिकाणी इंग्रजीचाही वापर व्हायचा. परंतु शास्त्रीय विषय मराठीतून लालित्यपूर्ण पद्धतीने तज्ज्ञांच्या परिषदांमध्ये देखील सांगितले जाऊ शकतात आणि ते लोकप्रिय होतात हे त्याने निःसंशयपणे सिद्ध केले.
२. आधुनिक वैद्यकशास्त्राची सद्यस्थिती, तंत्रज्ञानाचे वाढते आक्रमण हा त्याच्या चिंतनाचा विषय होता. वैद्यकशास्त्र सर्वसामान्य लोकांच्या अवाक्यात असले पाहिजे यासाठी तो जाणीवपूर्वक कृती करायचा. गर्भवती स्त्रियांना गर्भावस्थेचे शास्त्रीय शिक्षण मिळावे यासाठी तो त्याच्या रुग्णालयात खास शिबिरे घ्यायचा. विविध तज्ज्ञ मंडळी या शिबिरांत उत्साहाने सहभागी व्हायची आणि आपल्या विषयाची माहिती गर्भवती स्त्रियांना सुलभ मराठीत देऊन त्यांचे यथाशक्ती शंकानिरसन करायची. आहारविहार, तपासण्या, लसीकरण या सर्व बाबींची शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्यानंतर या गर्भवती स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व आत्मविश्वास पाहण्याजोगा असायचा. त्याची ही शिबिराची संकल्पना देखील लोकप्रिय झाली व इतर अनेक ठिकाणच्या डॉक्टरांनी याच पद्धतीने शिबिरे घ्यायला सुरुवात केली. शंतनू सिद्धहस्त व प्रथितयश लेखक होता. (अ)पाळीमिळी गुपचिळी, आरोग्यवती भव, आधुनिक वैद्यकीची शोध गाथा, मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, फादर टेरेसा आणि इतर वल्ली, ही त्याची काही गाजलेली पुस्तके. पुस्तकांच्या नावावरून महिला आणि मुले यांच्यात विज्ञानविषयक ज्ञान व प्रेरणा अंकुरण्यात त्याला किती रस होता ते स्पष्ट होते.
क्रॉसपॅथी प्रॅक्टिस हा भारतातल्या वैद्यक विश्वासमोरचा एक बिकट प्रश्न आहे. याबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला भलेभले लोक कचरतात त्यामुळे छद्मविज्ञान बळावते व अनेक गोरगरीब त्याला बळी पडतात व नाडले जातात. शंतनूने त्याच्या वैद्यकीय कारकिर्दीची सुरुवात होमिओपॅथीने केली. शिक्षण चालू असताना व नंतर त्याच्या मनात या शाखेच्या मूलभूत संकल्पनांविषयी अनेक शंका आल्या. या शंकांचे निरसन करण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केला परंतु त्याला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्या शोधयात्रेवरती त्याने पुस्तक लिहिले. ते अपेक्षेप्रमाणे वादात सापडले. या संदर्भात उपस्थित केल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची शंतनने शास्त्रशुद्ध पद्धतीने चिरफाड करून उत्तरे दिली. छद्मविज्ञानाला विरोध करताना तो अजिबात न डगमगता, परिणामांची तमा न करता टीका करायचा, परंतु या टीकेला नेहमीच संदर्भ व ज्ञान याची चौकट असायची व मुख्य म्हणजे त्याची भाषा अतिशय सुसंस्कृत असायची.
३. लहान गावातून पुण्यात गेलेले लोक उच्चशिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावात परत येत नाहीत; त्यांना महानगरीय आयुष्याची चटक लागते असाच सर्वसाधारण अनुभव आहे. शंतनूने मात्र जाणीवपूर्वक वैद्यक व्यवसायासाठी आपले वाई हेच गाव निवडले. वैद्यकीय व्यवसाय करत असताना वाईतल्या समृद्ध सांस्कृतिक वातावरणात त्याने मोलाची भर घातली. नवभारत नियतकालिक, लोकमान्य टिळक सार्वजनिक ग्रंथालय, वसंत व्याख्यानमाला यांच्या आयोजनात त्याचा नेहमीच पुढाकार असायचा. नवनवीन वक्ते, नवनवीन विषय मांडले जावेत व त्यातून सकारात्मक चर्चा व्हावी असे त्याला मनापासून वाटायचे.
४. भाषांतराची कला त्याने एका वेगळ्या उंचीला नेली होती. मुद्दुपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. ती देवदासी होती. तिने ‘राधिका सांत्वनम’ हे तेलुगू भाषेतील काव्य रचले. त्या काव्याचा मराठी भावानुवाद डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केला आहे. रूपा आणि तो मिळून या काव्याचे अभिवाचन करायचे. हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय असा व्हायचा. वाईतील नाट्यवर्तुळात शंतनूचा सहज वावर होता. (अ)पार्थिव या शवागार व शवविच्छेदनप्रक्रियेशी संबंधित अनुभवांवर लिहिल्या गेलेल्या माझ्या मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद शंतनुने केला होता. तो '(Im) mortal Remains' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या भाषांतराच्या प्रक्रियेत त्याच्याशी ज्या ज्या वेळेला बोलणे झाले त्या त्या वेळेला त्याचे मराठी प्रेम आणि मराठीवरची हुकूमत पाहून मी स्तिमित झालो आहे.
आपुले मरण पाहिले माझ्या डोळा । तो जाला सोहळा अनुपम्य ॥
असे म्हणत शंतनू पंचमहाभूतांत विलीन झाला आहे.
डॉ अनिल यशवंत जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com
प्रतिक्रिया
आदरांजली.
एका तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तीचे सर्व पैलू उलगडून दाखवणारा लेख.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
.
त्यांची फेस बुक पोस्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मृत्यूच्या दारात असतानाही माणसाने किती तर्कनिष्ठ असायला हवे याची पोच देणारी ती पोस्ट आहे.
श्रद्धांजली.
.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
वाईट झाले. आदरांजली..
वाईट झाले.
आदरांजली..
श्रद्धांजली
.
.
आदरांजली.
पाठ नक्की काय आहे? ‘असत्याशी’ की ‘असत्यासी’? आजच्या भाषेप्रमाणे दुसरा बरोबर वाटतो, पण सतराव्या शतकाचं माहीत नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
आदरांजली
फेसबुकवरचा लेख वाचून वाईट वाटले.
गेल्या काही दिवसात फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या बातम्या बऱ्याच ऐकल्या. यूट्यूबच्या सीईओचे निधनही या कॅन्सरमुळेच झाले. एका मित्रालाही हे निदान झाले आहे. हा कॅन्सर अलीकडे जास्त दिसतोय काय? कोविड१९ (किंवा त्याची लस) याचा दुष्परिणाम असावा काय?
?
?
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
डॉ. अभ्यंकरांना आदरांजली!
डॉ. अभ्यंकरांना आदरांजली!
फारच लोभस व्यक्तिमत्व.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
वेगळेपण
डॉक्टर अभ्यंकरांच्या निधनाला आठवडा होत आला, तरी ती वेदना अजून ओली आहे. विज्ञानाची, किंवा एकूणच चिकित्सेची सगळीकडेच पीछेहाट होत असताना अशा विवेकनिष्ठ, उमद्या माणसाचे (अकाली) जाणे क्लेशदायक आहे.
माझा आणि त्यांचा परिचय फक्त फेसबुकवरचा. त्यांच्या तर्कनिष्ठ (पण तर्ककर्कश्श नव्हे) विचारांनी मी (आणि माझ्यासारखे कितीतरी) प्रभावित झालो. होमिओपॅथीविषयीचे त्यांचे विचार (मीही त्याच विचारांचा असल्याने) मला अगदी मनापासून पटून गेले होते. डॉक्टर अभ्यंकरांकडे त्या शास्त्रातील (?) पदवी होती म्हणून त्यांचा अधिकार मोठा. (यूट्यूबवरील त्यांच्या मुलाखतीवर आलेल्या असंख्य भाबड्या प्रतिक्रिया बघितल्या की हसावे की रडावे ते कळेनासे होते. एकूणच कोणत्याही गोष्टीने सारखे भारावून जायचे, तर्क आणि विवेक यांच्या वाटेलाही जायचे नाही हा जनसामान्यांचा स्वभाव कधी बदलणारच नाही असे वाटू लागते) विवेकाचा दिवा हातात घेऊन चालणे हे फार कठीण असते. (डॉक्टर दाभोळकरांचे उदाहरण आहेच. त्यांना तर आपल्या समाजाने मारूनच टाकले.) बर्याच ठेचा खाव्या लागतात, बर्याच वावटळींत हातातला तो दिवा जपावा लागतो आणि एवढे करूनही समाज, मठ्ठ, मद्दड समाज, आपल्या बाजूने कधीच उभा राहात नाही, उलट कायम आपल्या विरोधातच उभा ठाकतो. एवढे सगळे असले तरीही आपण चालत राहायचे? का? Because it is there!
असे करू पाहाणार्या वाटसरूंचा एक बिनीचा शेर्पा गळाला. काही लिटर पाणी आणि एक क्षाराची पिशवी यांतून निर्माण झालेली एक सरस आकृती पुसली गेली. फार वाईट झाले.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
माहितीपट
https://youtu.be/9dqIyxKTjVw?si=6x9YWSM353imboyj शंतनू अभ्यंकरांच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास या माहितीपटात आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आदरांजली
डॉ.अभ्यंकरांचे अकाली निधन दुःखद आहे. वैद्यकीय व्यावसायिक, लेखक, भाषांतरकार, वक्ते, तर्कनिष्ठ विचारसरणीचे व नास्तिकतावादाचे प्रसारक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास आदरांजली.
त्यांचे ब्लॉग अतिशय वाचनीय आहेत. त्यातील काही लेख डॉक्टरांच्या ग्रुप्सवर पुन्हा पुन्हा फॉरवर्ड होत असतात.
होमिओपॅथीवरील त्यांचा लेख व त्यावरच्या प्रतिक्रिया वाचायला खरंच मजा येते. असा लेख लिहून त्यांनी अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या!! प्रतिक्रिया देताना होमिओपॅथी व्यावसायिकांनी व इतर लोकांनी होमिओपॅथीची शास्त्रीय तत्वे सांगण्याऐवजी डॉ. अभ्यंकरांना वैयक्तिक दूषणे देण्यात व anecdotal cases बद्दल सांगण्यात समाधान मानले होते. त्यातून स्वतःच्या पॅथीची पोथीनिष्ठता, अशास्त्रीय दृष्टिकोन यांचे पुरावे स्वतःच देऊन, डॉ. अभ्यंकरांचेच म्हणणे सिद्ध केले होते.
आदरंजली च धागा धागा आहे
त्या धाग्यावर बाकी काही लिहणे योग्य नाही.
त्यांचे विचार न पटणारी लोक पण असतात .
आणि अशा धाग्यावर विरोध करणाऱ्या कॉमेंट करणे अयोग्य असते.