काफ्काच्या कथांचे भाषान्तर
नमस्कार
फ्रान्झ काफ्का या प्रसिद्ध ऑस्ट्रियन/चेक लेखकाच्या काही कथा नुकत्याच वाचल्या. त्याची Metamorphosis ही गाजलेली, अभिजात साहित्यात समावेश असणारी कथा. त्याखेरीजही त्याच्या अनेक कथा आहेत ज्यामध्ये खास त्याच्या काहीशा उपरोधिक शैलीत व्यक्त झालेले त्याला झालेले जीवनाचे आकलन दिसते. आशयाच्या दृष्टीने प्रगल्भ वाटल्याने आणि भाषांतर करायला आव्हानात्मक वाटल्याने त्याच्या 'Before the Law' आणि 'The Hunger Artist' या कथांचे भाषांतर करायचा प्रयत्न केला आहे.
Kafkaesque' म्हणजे काय हे ठाऊक नसल्याने काफ्काच्या कथा तश्या नव्हत्या असे विनोदाने म्हंटले जात असले तरी आपल्या दृष्टीने त्या 'Kafkaesque' च आहेत. म्हणून भाषांतरात, आशयाच्या दृष्टीने विचार करून, परिच्छेदातील काही वाक्ये कमीजास्त करणे, अदलाबदल करणे असे स्वातंत्र्य घेतले आहे. व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या, विरामचिन्हांच्या मात्र अनेक चुका झालेल्या असण्याची शक्यता आहे, त्या कृपया सांभाळून घ्याव्यात.
एकंदर भाषांतराबद्दलच्या प्रतिसादांचे आणि ते आणखी सुधारण्यासाठी काही सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे.
**************************************************************************************
न्यायाच्या प्रवेशद्वाराशी (Translation of Franz Kafka’s ‘Before the Law’)
तो खूप लांबच्या प्रवासानंतर न्यायाच्या प्रवेशद्वारासमोर आला आहे. न्यायाच्या प्रवेशद्वारासमोर एक द्वारपाल उभा आहे. तो आत प्रवेश मागतो. द्वारपाल त्याला नकार देतो.
मग मला, थोडे थांबल्यावर, नंतर प्रवेश मिळेल का? - तो विचारतो.
शक्य आहे, पण आत्ता प्रवेश मिळणार नाही-द्वारपाल उत्तरतो.
न्यायाचे प्रवेशद्वार उघडे असते, त्यातून खुणावणारा आतला रम्य प्रदेश पाहण्यासाठी तो आत डोकावून पाहतो.
आत जाण्याची तुला एवढीच इच्छा असेल तर खुशाल जा, पण लक्षात ठेव माझ्याकडे काही विशेष अधिकार आहेत. तुला आत दिसणाऱ्या अनेक दालनांपैकी प्रत्येक दालनाबाहेर एक द्वारपाल आहे, मी या सर्वांमध्ये सर्वात खालच्या दर्जाचा द्वारपाल आहे आणि त्यांचे अधिकार माझ्यापासून अधिकाधिक वाढत जाणारे आहेत. तुला तो जो समोर तिसरा द्वारपाल दिसतोय ना, त्याच्यापुढे उभं राहण्याची तर माझीही हिंमत होणार नाही-द्वारपाल सुनावतो.
न्यायाच्या दरबारात प्रवेश मिळणं इतकं अवघड असेल असं त्यालादेखील वाटलं नव्हतं. न्यायाचं प्रवेशद्वार सर्वांसाठी नेहमीच खुलं असणार अशीच त्याची समजूत होती. पण द्वारपालाचा तो अधिकाराची बिरुदं मिरवणारा पोशाख, त्याची भारदस्त शरीरयष्टी, करारी चेहरा आणि भेदक, जरब असणारी नजर पाहून, त्याच्याकडे प्रवेशाची परवानगी मागणेच अधिक श्रेयस्कर आहे हे त्याला उमगते. मग तो त्या दारापाशी द्वारपालाने दिलेल्या आसनावर बसून राहातो.
दिवस जातात, महिने जातात, वर्षं जातात. तो तसाच बसून राहिला आहे. आतापर्यंत त्याने पराकाष्ठा करून द्वारपालापाशी प्रवेशाबद्दल अनेक विनवण्या केल्या आहेत, त्याला अगदी हैराण केले आहे. द्वारपाल दरवेळी एका अलिप्ततेने त्याच्याकडे इकडच्या तिकडच्या चौकश्या करतो, त्याच्या गावाबद्दल, मुलामाणसांबद्दल विचारतो, अगदी सगळी मोठी माणसे छोट्या माणसांची विचारपूस करतात तशीच. पण शेवटी त्याला हेच सांगतो की आत्तातरी त्याला प्रवेश मिळणे शक्य नाही.
लांबचा प्रवास करून आल्यामुळे त्याच्याकडे अगदी किडूकमिडूक गोष्टींपासून मूल्यवान गोष्टींपर्यंत अनेक वस्तू असतात.तो द्वारपालाला या सगळ्यांची लाच देऊन पाहातो. द्वारपाल त्या स्वीकारतोही, पण त्याला हेच सांगून की तू तुझ्याकडून प्रयत्नांत काही कसूर ठेवली नाहीस असं तुला वाटावं याचसाठी मी या स्वीकारत आहे.
या सगळया काळात त्याची नजर अव्याहत त्या द्वारपालावर असते. आत असलेल्या इतर द्वारपालांबद्दल तो विसरून गेला आहे. त्याच्यासमोर असणारा हा पहिला द्वारपालंच, तो आणि न्याय यांच्यामधला सर्वांत मोठा अडथळा आहे अशीच त्याची समजूत झाली आहे. पहिल्या काही वर्षांत, तरुण असताना, न्यायाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश न मिळाल्याबद्दल तो आपल्या नशीबाच्या नावाने तारस्वरात आक्रोश करतो आणि वृद्ध झाल्यावर, क्षीण स्वरात, तीच तक्रार स्वतःशी आळवत राहातो. आता तर तो इतका भाबडा, अगतिक झाला आहे की द्वारपालाच्या पोशाखावर बसलेल्या चिलटांकडेही त्याने द्वारपालाचे मन वळविण्याची विनवणी केली आहे.
आता वृद्धत्वामुळे दिवसेंदिवस त्याची दृष्टी अधिकाधिक अधू होत चालली आहे. इतकी की, बाहेरच्या जगातच अंधार आहे की त्याची दृष्टी अधू होते आहे हेही त्याला समजेनासे झाले आहे. पण अश्या परिस्थितीतही, प्रवेशद्वारातून आत दिसणारी, सतत तेवत असणारी प्रकाशाची एक क्षीण रेषा त्याच्या नजरेतून सुटत नाही.
आता त्याच्याकडे फार वेळ उरलेला नाही. दुबळा झाल्यामुळे स्वतःचे शरीर उचलणे आता त्याला शक्य नाही. द्वारपालाच्या भारदस्त देहासमोर तो आता क्षीण, हतबल दिसू लागला आहे.
प्रवेशद्वारापाशी आल्यापासूनच्या या सगळ्या अनुभवाचा जणू सारांश असणारा, आत्तापर्यंत कधीही न विचारलेला एक शेवटचाच प्रश्न आता त्याला द्वारपालाला विचारायचा आहे. सर्व शक्ती एकवटून तो त्या द्वारपालाला खुणावतो.
आता आणखी काय जाणून घ्यायचंय तुला ? तुझं समाधान होणार तरी कधी ? - द्वारपाल उद्गारतो.
आपल्याला न्याय मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं. मग माझ्याखेरीज आणखी कोणी या न्यायाच्या प्रवेशद्वाराशी आत्तापर्यंत कसा आला नाही ? - तो विचारतो.
त्याचा मृत्यू अगदी जवळ आला आहे हे द्वारपालाला आता कळलेलं आहे. त्याला ऐकू जावं म्हणून मोठ्या आवाजात द्वारपाल ओरडतो-
आणखी कोणालाही इथे प्रवेश नाही कारण हे प्रवेशद्वार फक्त आणि फक्त तुझ्याकरिताच होते आणि आता मी ते बंद करीत आहे.
**************************समाप्त******************************
उपाश्या
(Translation of Franz Kafka’s ‘The Hunger Artist’)
गेल्या काही वर्षात उपाश्याच्या कलेची लोकप्रियता कमी कमी होत चालली होती. पूर्वी उपाश्याच्या कलेची प्रदर्शनने भरविणे व्यावहारिकदृष्ट्याही खूप फायद्याचे होते. एक दोघांना पाठीशी घेऊन भरवलेल्या अश्या प्रदर्शनात भरपूर पैसे मिळत. आता ते अजिबातच शक्य नाही. तो काळच निराळा होता. तेंव्हा सगळ्या गावाचं लक्ष उपाश्यावर असायचं. वाढणाऱ्या प्रत्येक उपाशी दिवसागणिक गावातली लोकं उपाश्यामध्ये जास्तीत जास्त गुंतत जात असत. दिवसातून एकदातरी उपाश्याला बघितल्याखेरीज लोकांना चैन पडत नसे. सीझन पास घेतलेले लोकं तर नंतर नंतर उपाश्याच्या पिंजऱ्यासमोर दिवसचे दिवस बसून राहात आणि रात्रीदेखील उपाश्याचा पिंजरा पाहायला खुला झाल्यावर ते त्याला टॉर्चच्या प्रकाशात निरखून पाहीत.
दिवस चांगला असेल तर उपाश्याचा पिंजरा बाहेर आणून विशेषकरून मुलांना दाखविला जाई. मोठ्या लोकांसाठी ही फक्त एक गम्मत म्हणून पाहायची टूम असे पण लहान मुले मात्र एकमेकांचा हात धरून, पिंजऱ्यात खाली टाकलेल्या गवतावर, निस्तेज चेहेऱ्याने बरगड्यांच्या फासळ्या आणि हाडांची काडं झालेलं शरीर दाखवणाऱ्या उपाश्याकडे अचंबित चेहेऱ्याने पाहात असत. तो कधी आज्ञाधारकपणे मुंडी हलवी, चेहेऱ्यावर कृत्रिम हसू आणून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देई किंवा कधी त्याचा काटकुळा हात पिंजऱ्याबाहेर काढून त्यांना स्पर्श करू देई. पण मग काही वेळातच तो, आजुबाजूच्या कोणाचीही पर्वा न करता स्वतःच्या कोषात परत जाई. डोळे बंद करून शून्यात बघत, ओठ ओले करण्यासाठी पाण्याचा घोट घेत असताना मग त्याला त्याच्या पिंजर्यात असणाऱ्या एकमेव घड्याळातले ठोकेही ऐकू येत नसत.
उपाश्या चोरून काही खात नाही आणि खरंच उपाशी राहतो आहे हे पाहण्यासाठी, लोकांनीच निवडलेले तीन वॉचमन (बहुतेक वेळी हे व्यवसायाने खाटीक असत) त्याच्यावर दिवसभर नजर ठेवीत. पण लोकांना दाखविण्यासाठी केलेली ही एक औपचारिकता होती हे मॅनेजरला ठाऊक होते. भुकेने कितीही व्याकूळ झाला तरी उपाश्या, कलेची प्रतिष्ठा जपण्यासाठी, कधी अन्नाचा एक कणही घेणार नाही याची त्याला खात्री होती.
पण कधी कधी काही वॉचमनना हे समजत नसे. रात्रपाळीचे काही वॉचमन, उपाश्याला चोरून काही तोंडात टाकायची संधी देण्यासाठी, कोपऱ्यात पत्त्यांचा डाव टाकीत आणि मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करीत. उपाश्यासाठी मात्र याहून अधिक मानसिक त्रास देणारी दुसरी गोष्ट नसे. त्याच्या कलेवरील निष्ठेवर असा संशय घेणे हे त्याला फार अपमानास्पद, लागणारे होते आणि मग अश्या वेळी त्याची प्रतिष्ठा पणाला लागत असे. हा संशय घालविण्यासाठी मग, अंगात शक्ती नसली तरी रात्रपाळीला अश्या वॉचमनसमोर तो वरच्या स्वरात एखादे गाणे गायचा एखादा प्रयत्न करी पण तो निष्फळ ठरे. कारण मधून मधून चोरून खाताना सुरात गाण्याचेही कौशल्य उपाश्याकडे आहे अशी समजूत करून घेऊन त्यांना त्याचे आश्चर्यमिश्रित कौतुकच वाटत असे.
पण उपाश्याला मात्र, हॉल मधल्या अंधुक प्रकाशात न बसता, पिंजऱ्याजवळ बसून त्याच्या तोंडावर टॉर्च मरून त्याच्यावर लक्ष ठेवणारे वॉचमन अधिक आवडत. टॉर्चच्या प्रखर झोताचा त्याला त्रास होत नसे कारण त्याला झोप तशी येतच नसे आणि तशी ती आलीच तर हॉल कितीही भरलेला असला, कितीही आवाज असला, तरी तो कधीही सहजच एखादी डुलकी काढी. या वॉचमनबरोबर, त्यांच्याशी चेष्टा मस्करी करत, आपल्या भटक्या आणि बेभरवशाच्या आयुष्याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या त्यांना ऐकवत, त्यांच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी ऐकत, स्वतःही न झोपता सर्व रात्र त्यांना जागे ठेवण्याची त्याची पूर्ण तयारी होती. पिंजऱ्यात खायला कुठेही काहीही लपविलेले नाही आणि आपली उपासा करायची क्षमता त्यांच्यापेक्ष्या कित्येक पटीने जास्त आहे हेच उपाश्याला सिद्ध करायचे असे.
दुसऱ्या दिवशी सकाळी,जेंव्हा उपाश्याच्याच खर्चाने, रात्रपाळी केलेल्या या वॉचमनसाठी भरपूर न्याहारी येत असे तेंव्हा मात्र त्याला खरा आनंद होई. अशी न्याहारी आली रे आली की वॉचमन त्याच्यावर तुटून पडत. काही लोकांना, ही वॉचमनना दिलेली लाच आहे असाही अनाठायी संशय येई पण शेवटी तो तसा अनाठायीच असे. कारण हेच लोकं, मग तुम्ही वॉचमन म्हणून या असे आव्हान देताच त्यासाठी तयार होत असत पण सकाळी तुम्हाला न्याहारी मिळणार नाही असे सांगताच मात्र तत्परतेने माघार घेत. तरीदेखील मनुष्यस्वभावानुसार ते तो संशय मात्र मनातून काढून टाकत नसत.
पण असा संशय, जसा कोणत्याही व्यवसायात असतो तसाच उपाश्याच्या व्यवसायाचा एक भाग होता. अर्थातच दिवस रात्र, अखंड, प्रत्येक मिनिटामिनिटाला उपाश्यावर लक्ष्य ठेवणे कोणत्याही वॉचमनला शक्य नव्हते. त्यामुळे उपाश्या पूर्णपणे प्रामाणिक राहिला का हे कोणीही वॉचमन आपल्या वैयक्तिक अनुभवावर सांगू शकत नसे. फक्त उपाश्याच्या स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीलाच हे ठाऊक होते आणि स्वतःच्या कलेचा एक तटस्थ प्रेक्षक म्हणून त्याचे समाधान झाले की नाही हेही तोच सांगू शकत असे.
त्याचं खपाटीला गेलेलं पोट, बरगड्या दाखविणारं, कृश, दुबळं शरीर बघणं अनेकांना अशक्य होई. त्याच्या कलेच्या यशस्वितेची खरंतर हीच कसोटी होती, पण तरीदेखील आपल्या कलेबाबत त्याचं स्वतःचं पूर्ण समाधान न होण्याचं आणखी एक कारण होतं. त्याने तो सतत अस्वस्थ, असमाधानी राहात असे आणि या अश्या सतत असमाधानी राहण्यामुळे त्याच्या कृशपणात अधिक भरच पडत असे. उपास करणं त्याच्या दृष्टीनं किती सोपं आहे हे त्यालाच फक्त ठाऊक होतं. याची कल्पना, ना त्याची प्रदर्शन आयोजित करणाऱ्याना होती, ना त्याला पाहायला येणाऱ्या बाहेरच्या लोकांना. सगळ्यासमोर याची वाच्यतादेखील त्याने कधी केली नाही, याचं मोठं अवडंबर केलं नाही. पण लोकांनी मात्र त्याच्यावर कधी विश्वास ठेवला नाही. बहुतेकांना तो, कलेचं नाव पुढे करून प्रसिद्धीसाठी हपापलेला एक तोतयाच वाटायचा. फक्त काही थोड्याच लोकांना तो, आपल्या कलेबद्दल वृथा अभिमान नसणारा एक विनयशील कलाकार वाटला असावा एवढीच काय ती जमेची बाजू.
अनेक प्रयोगांनंतरही ही अस्वस्थता, सततचे सूक्ष्म असमाधान याची त्याला आता सवय झाली असली तरी हळू हळू मनातून तो पोखरत चालला होता. कोणत्याही प्रयोगांनंतर त्याने आपला पिंजरा आपणहून कधी सोडला नाही, अजूनही काही सिद्ध करण्याचे बाकी असल्यासारखा. मॅनेजरनी उपासाचा कालावधी जास्तीत जास्त चाळीस दिवसांचा ठेवला होता. जिथे प्रेक्षकांची संख्या, तिकीटविक्री जास्त होती अश्या अगदी मुख्य शहरात देखील. आयोजकांच्या अनुभवावरून, आक्रमक जाहिराती करून चाळीस दिवसांपर्यंत तिकीटविक्री वाढवत ठेवता येत असे पण त्यांनतर मात्र त्यातील नाविन्य कमी कमी होत जाई. काही गावामध्ये, देशांमध्ये, हा आकडा थोडाफार वेगळा असावा पण सर्वसाधारणपणे चाळीस दिवस हा उपासाचा कालावधी सर्वांच्या दृष्टीने फायद्याचा आणि म्हणून योग्य ठरवला गेला होता.
मग चाळिसाव्या दिवशी, एका प्रशस्त हॉलमध्ये, प्रचंड संख्येने आलेल्या लोकांच्या उपस्थितीत पिंजऱ्याचे दार उघडले जाई, दोन डॉक्टर्स उपाश्याला तपासून त्याचे वजन, उंची इत्यादी मोजमापे घेत, ते आकडे मग सगळ्यांसमोर घोषित केले जात, मग लॉटरी ने निवडलेल्या दोन तरुणी उपाश्याला घेऊन जाण्यासाठी पिंजऱ्यात जात, त्याला घेऊन खाली ठेवलेल्या एका टेबलापाशी येत आणि मग काळजीपूर्वक फक्त त्याच्याचसाठी तयार केलेले अन्न त्याच्यासमोर ठेवले जात असे. हे अन्न मात्र पाहताक्षणीच त्याच्यात तीव्र अनिच्छा निर्माण करीत असे. आपले कृश हात त्याने स्वतःहूनच मदतीसाठी तरुणींच्या हातात दिले असले तरी हा उपास चाळीस दिवसांनंतर अचानक संपविणे मात्र त्याच्या अगदी मनाविरुद्धच झालेले असे. उपास करायच्या त्याच्या क्षमतेची, कौशल्याची आत्ता कुठे कसोटी लागत असताना, त्याच्या कलेची अभिव्यक्ती पणाला लागत असताना, त्याच्या कलासामर्थ्याचा सर्वोच्च बिंदू अजून यायचा असताना, आत्ताच का थांबायचे ? अजून अनंत काळ जरी हा उपास चालू राहिला तरी तो चालू ठेवण्याची त्याची तयारी होती, नव्हे इच्छाच होती. जगातला सर्वोत्कृष्ट उपाश्या बनण्याची संधी त्याच्यापासून का काढून घेतली जात होती हे न उमगून त्याला नैराश्याचे झटके येत.
जे लोकं त्याचा प्रयोग बघायला मोठ्या संख्येने येत, त्याच्या कलेचं कौतुक करीत, तेच लोक त्याचा हा प्रयोग संपवायला इतके उतावीळ का झाले होते? शिवाय, चाळीस दिवसानंतर तो थकून जात असे. पिंजऱ्यातल्या गवतावर आरामात बसलेला असताना, आता अचानक उठून त्याला अन्न ठेवलेल्या टेबलाकडे जावे लागत होते. अन्नाच्या नुसत्या कल्पनेनेच येणारी आणि वासाने अधिक तीव्र होणारी शिसारी तो केवळ, त्या नुसत्या प्रेमळ भासणाऱ्या तरुणींच्या खातरच चेहऱ्यावर दिसू देत नसे.
पण मग यानंतर घडणाऱ्या गोष्टी मात्र उपाश्याच्या नियंत्रणाबाहेरच्या असत.
मॅनेजर येई, उपाश्याकडे पाहून आपले हात पसरून आवाहन केल्याप्रमाणे वरती पाही आणि म्हणे की - पहा आकाशातील देवांनो पहा हाडांची काडं झालेल्या या दीन दुबळ्या हुतात्म्याकडे पहा आणि याला आपल्या करुणेची भीक द्या याच्यावर दया दाखवा. मॅनेजर मग उपाश्याकडे जाई, एका दिखाऊ काळजीने त्याच्या कृश, दुबळ्या शरीराला उचलत असताना तो कोणाला कळणार नाही याची दक्षता घेऊन एका सराईत धक्क्याने ते हलवी आणि मग उपाश्याचे हात, पाय आणि शरीराचे सगळे अवयव अनिर्बंधपणे खुळखुळ्यासारखे हलत. मग तो त्याचे शरीर भेदरून गेलेल्या त्या तरुणींकडे पुन्हा देत असे.
उपाश्याने आता सगळे सहन केलेले असे. कोणीतरी काही अगम्य कारणाने मुद्दाम ठेवलेलं असावं असं चेंडूसारखं छातीवर घरंगळलेलं त्याचं डोकं, आतून पोकळ झालेलं शरीर, प्रचंड वेदनेने स्नायू आखडावेत तसे वाटणारे गुडघे आणि खाली जमीन नसल्यासारखे पण जमीन शोधत असल्यासारखे घसटत आणलेले पाय. त्याचं गलितगात्र, पिसासारखं झालेलं शरीर एका तरुणीवर रेललेलं असे, त्याच्या डोक्याचा किळसवाणा स्पर्श होऊ नये म्हणून मानेला अनावश्यक ताण देऊन चालणाऱ्या त्या तरुणीला कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा असे कारण आपल्याला या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे याची तिला खचितच कल्पना नसे. दुसरी तरुणी उपाश्याचा काडीसारखा हात धरुन चाललेली असतानाच, लोकांच्या हास्यकल्लोळातही, त्या तरुणीला कधीकधी अनावर रडू फुटे पण थोड्याच वेळात पहिलीपेक्षाही उत्साही आणि उत्सुक असणारी कोणी तिसरी तरुणी येऊन तिची सुटका करत असे.
मग उपाश्याचा जेवायचा समारंभ पार पडत असे. मॅनेजर, प्रेक्षकांशी हास्य विनोद गप्पा गोष्टी करत, गुंगीत असलेल्या उपाश्याला काही घास भरवी, उपाश्या मग त्याच्या कानात काही सांगत असल्यासारखे करी आणि नंतर ढोल ताशांचा वाद्यांचा एकच मोठा गजर होऊन हा सोहळा संपन्न होत असे. घरी परत जात असताना कार्यक्रम लोकांच्या अगदी मनासारखा झालेला असे, फक्त उपाश्याखेरीज. नेहमीच.... फक्त उपाश्याखेरीज.
दोन प्रयोगांमध्ये, प्रवास करताना, त्याला थोडी विश्रांती मिळायची पण ही कायम टोचणारी सल घेऊन तो असाच अनेक वर्ष जगला. जगाने त्याला मानसन्मान, प्रसिद्धी, सर्व लौकिक गोष्टी दिल्या पण त्याला टोचणारी सल शेवटपर्यंत दिवसेंदिवस वाढतच गेली. त्याच्या आतला तो दुखरा कोपरा कुणाला समजून घेता आला नाही. आणि लोकांना जरी तो समजता तरी ते त्याच्यासाठी काय करणार होते? कुणालाही याहून ज्यास्त काय हवं असतं असंच त्यांनी म्हटलं असतं. उपासाच्या ३०-३५ व्या दिवशी चुकून जर कुणी एखादा सहृदय माणूस येऊन त्याला दिलासा देण्यासाठी म्हणाला की तुझ्यातली ही निराशा ही तू खूप भुकेला असल्यामुळे आहे, तर संतापाची एक प्रचंड लाट त्याला तत्काळ व्यापून टाकत असे. आणि मग अनावर रागाने, उद्वेगाने तो पिंजऱ्याचे गज जोरजोरात हलवू लागी. मग असं काही झालं की मॅनेजर जाऊन सरळ लोकांची माफी मागी आणि ते भरल्या पोटी आल्यामुळे त्यांना भुकेपोटी येणारे असे रागाचे झटके समजणार नाहीत असाही युक्तिवाद करी.
उपासाचा कालावधी अजून खूप दिवस वाढवता येईल आणि तो पार पडायची माझी नक्कीच क्षमता आहे असं उपाश्याने मॅनेजरला खूप वेळा सांगून पाहिलं होतं. मॅनेजरनं उपाश्याच्या महत्वाकांक्षेचं, त्रास सोसून स्वतःला आव्हान देण्याच्या जिगरबाज वृत्तीचं तोंड देखल्या कौतुक केलं. पण त्याचे चाळिसाव्या दिवशी काढलेले मरणासन्न अवस्थेतले फोटो दाखवून हे करणं कसं धोकादायक आहे हेच त्याला समजावून सांगितलं.
सत्याचा असा विपर्यास त्याला असह्य होत असे. चाळिसाव्या दिवशीचे त्याचे शरीर हे त्याने जीव ओतून निष्ठेने साकारलेल्या कलेचा सर्वोच्च अविष्कार होता. त्याच्या शरीरावरचा हा परिणामच त्याच्या कलेची अभिव्यक्ती खंडित करण्याचे कारण म्हणून पुढे केला गेला होता. बाहेरच्या जगाची, त्याला समजून घेण्याची अशी असमर्थता त्याच्या निराशेत भर टाकत असे. दरवेळी मॅनेजरकडे ही विंनती करत असताना तो मॅनेजरच शांतपणे ऐकत असे पण त्याने दाखवलेले त्याचे फोटो बघितले रे बघितले की एक दीर्घ उसासा टाकून तो पिंजऱ्यातल्या गवतावर पुन्हा जाऊन बसे आणि लोक पुन्हा त्याला जवळून बघायसाठी पिंजऱ्याजवळ गर्दी करत.
अनेक वर्षांनी जेंव्हा लोकं उपाश्याची, त्याच्या त्या कलेची आठवण काढत, तेंव्हा एकेकाळी असा उपाश्या आपला पिंजरा घेऊन गावोगावी कला दाखवत फिरत असे यावर त्यांचाही विश्वास बसत नसे. एका रात्रीत हा बदल व्हावा एवढ्या गतीने सारे घडले होते. लोकांची आवड आता बदलली होती. त्याला काही व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कारण असतीलही पण त्याची कोण पर्वा करतो? आणि ती शोधून तरी आता काय होणार?
एक दिवस असा आला की आत्तापर्यंत ज्या उपाश्याला लोकांनी डोक्यावर घेतलं त्याच उपाश्याकडे आता त्यांनी पाठ फिरवली आणि ते इतर करमणुकींकडे वळले. मॅनेजरने, एक शेवटचा प्रयत्न म्हणून, अजूनही या कलेमध्ये लोकांना थोडाफार रस उरला असेल या आशेखातर उपाश्याबरोबर आजूबाजूच्या काही छोट्या देशांचा दौरा केला पण तो निष्फळ ठरला. या कलेविरुद्ध लोकांनी जणू कारस्थानच केल्याप्रमाणे त्यांच्याकडे चिटपाखरूही फिरकले नाही. खरंतर असा बदल काही एका रात्रीत होणे शक्य नाही. त्याची काहीतरी लक्षणं आधी दिसली असणारच. पण ती त्यावेळच्या यशामध्ये, लोकप्रियतेच्या आणि प्रसिद्धीच्या उन्मादामध्ये हरवून गेली असणार. अर्थात त्याविषयी आता काही करणे शक्य नव्हते. उपाशी कलेला पुन्हा कधीतरी चांगले दिवस येण्याची शक्यता असेलही पण त्या अनिश्चिततेतून, उपाश्याला जगण्यासाठी काही दिलासा मिळणार नव्हता.
आता उपाश्याने कसे जगावे? एकेकाळी ज्याला पाहायला लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत, त्याला कुठल्याश्या छोट्या गावातल्या जत्रेमध्ये आपली कला दाखवणे फारसे प्रतिष्ठेचे नव्हते. नवीन व्यवसायात पडावे म्हटले तर एकतर उपाश्याचे वय झाले होते आणि शिवाय आपल्या कलेशी तो इतका एकनिष्ठ होता की आणखी कोणतीही कला, व्यवसायकौशल्य तो कधी शिकलाच नाही. मग एक दिवस त्याने इतकी वर्ष एकत्र काम केलेल्या मॅनेजरला सोडचिठठी दिली आणि एका मोठ्या सर्कसमध्ये नोकरी पत्करली. गरजू असल्याने म्हणा किंवा आपल्या भविष्याची भीती वाटली म्हणून म्हणा, त्याने नोकरीच्या करारपत्रावर सही करताना ते धड वाचलेदेखील नाही.
अनेक लोकांचा, प्राण्यांचा, उपकरणांचा गोतावळा असणाऱ्या या सर्कशीत उपाश्याच्या कलेला थोडा का होईना वाव मिळणे अवघड नव्हते. त्याच्या मागण्याही अश्या काही अवास्तव नव्हत्या. शिवाय सर्कसला फक्त त्याचाच नव्हे तर त्याच्या नावाचाही फायदा झालाच होता. कोणालाही कोणत्याही वयात उपास करता येत असल्यामुळे, वाढत्या वयानुसार अभिव्यक्ती कमी न होणाऱ्या ज्या काही मोजक्याच कला शिल्लक होत्या त्यापैकी ही कला होती. त्यामुळे आपल्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ संपलेला एक कलाकार उतारवयात पोटापाण्यासाठी ही सर्कसची नोकरी करतो आहे असं म्हणायलाही कोणाला वाव नव्हता. उलट, मी अगदी तरुण असताना करायचो त्याहून जास्त तडफेने आत्तादेखील उपास करू शकतो अशी सूक्ष्म वल्गना उपाश्याने केली असती तरी त्यावर कोणाचाही पूर्ण विश्वास बसला असता. आणि खरोखरच त्याने सर्कशीच्या मॅनेजरला तसे सांगितले होते की त्याला जर त्याच्या कलाप्रयोगाची आखणी करायचे पूर्ण स्वातंत्र्य दिले तर सगळे जग अचंबा करील असा उपास तो करून दाखवील. असे स्वातंत्र्य त्याला दिलेही होते आणि त्याचा उत्साह बघून सर्कशीतले इतर कलाकार कौतुकाने हसत असत पण एका मोठ्या सर्कशीतला तो एक छोटासा घटक आहे हे त्यांनाही ठाऊक होते.
पण उपाश्याला त्या परिस्थितीची, काळाची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्याने मॅनेजर ला सांगितले होते की त्याचा पिंजरा हा सर्कसमधील मुख्य आकर्षण म्हणून मध्यभागी न ठेवता, बाजूला इतर प्राण्यांप्रमाणेच बघायचे एक आकर्षण म्हणून त्यांच्याच रांगेत ठेवावा.
तसा तो ठेवला गेला आणि उपाश्याची जाहिरात करणारी मोठमोठी पोस्टर्स त्याच्या पिंजऱ्याबाहेर लावली गेली. मध्यंतरात लोकं जेंव्हा प्राण्यांना पाहायला जायची तेंव्हा क्षणभर ते त्याच्या पिंजऱ्यासमोर थबकत असत. पण कोणाला शांतपणे, थोडा अधिक वेळ देऊन, नीट उपाश्याकडे पाहायचे असले तरी प्राण्याच्या पिंजऱ्याकडे जाणारा माणसांचा लोंढा इतका मोठा असे कि तो त्यांना पुढेच रेटत असे. उपाश्यासाठी मध्यंतरातला हा काळ जरी थोडा गडबडीचा आणि फारसा सुखाचा नसला तरी याचमुळे त्याच्या आयुष्याला थोडाफार अर्थ आला होता. पहिल्या पहिल्यांदा तो असा माणसांचा लोंढा घेऊन येणाऱ्या मध्यंतराची आतुरतेने वाट पाही पण नंतर त्याने स्वतःला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी तो लोंढा खरंतर पुढे असलेले प्राणी पाहण्यासाठीच आहे या सत्याचा त्याला नाइलाजाने स्वीकार करणे भाग पडे.
नंतर नंतर त्याला या सर्व लोकांना दुरूनच पाहणे सुखाचे वाटे कारण असा लोंढा जेंव्हा यायचा तेंव्हा त्याचे दोन भाग असत. एक, ज्याच्यामध्ये काही लोकांना उपाश्याच्या पिंजऱ्याजवळ आल्यावर हट्टाने तिथेच उभे राहून त्याच्याकडे पाहायचे असे आणि दुसरा ज्यांना फक्त प्राण्यांच्या पिंजऱ्याकडेच जायचे असे. आणि हे दोन गट नेहमी आपापसात आरडाओरडा, शिवीगाळ करत. अगदी क्वचित कधीतरी एखादा बाप आपल्या मुलांना घेऊन त्याच्या पिंजऱ्याजवळ येई आणि मुलांना उपाश्याबद्दल, त्याच्या कलेबद्दल, पूर्वी चालत असलेल्या अश्या कलेच्या प्रदर्शनाबद्दल, त्या भव्य दिव्य सोहोळ्यांबद्दल सांगत उभा असे. गोंधळलेली मुले त्याच्याकडे एकटक पाहत असत आणि उपाशी राहणे म्हणजे काय असा प्रश्न भाबडेपणाने वडीलांना विचारीत. काही असलं तरी त्या छोट्या मुलांनी त्याच्याबद्दल दाखवलेली उत्सुकता त्याच्या मनात त्याचे निस्सीम प्रेम असलेल्या या कलेच्या भवितव्याबद्दल थोडी आशा मात्र निर्माण करत असे.
प्राण्यांकडे जायच्या रस्त्यावरच त्याचा पिंजरा होता याचे त्याला आता थोडे वैषम्य वाटे. प्राण्यांशेजारीच तो असल्यामुळे बहुतेक लोकांचा कल कोणते आकर्षण पाहायसाठी असणार हे उघड होते. शिवाय रात्रभर चालणारे प्राण्यांचे ओरडणे, हिंस्त्र प्राण्यासाठी मांस घेऊन जाणारे कामगार, ते भरवत असताना ऐकू येणाऱ्या त्यांच्या डरकाळ्या या सगळ्याचा त्याला फार त्रास होत असे. पण याबाबतीत मॅनेजर कडे तक्रार करायचे त्याचे कधी धाडस झाले नाही. हे ही खर होतं की बहुतेक सर्व लोक प्राण्यांनाच बघायला येत असत. त्यापैकी एखाद दुसराच उपाश्याच्या पिंजऱ्यासमोर थांबत असे. मॅनेजरला त्याचा पिंजरा तिथे कुठेतरी असल्याची आठवण तरी होती की नाही कुणास ठाऊक. न जाणो, अशी काही तक्रार त्याने केली असती तर उलट त्याला प्राण्यांच्या कडे जाणाऱ्या वाटेवरचा एक छोटा अडथळाच समजून त्याची रवानगी भलतीकडेच कुठेतरी केली असती.
पण उपाश्या एक छोटा अडथळाच होता. दिवसेंदिवस आणखी छोटा छोटा होत जाणारा अडथळा.
उपाश्याने शब्दशः प्राण पणाला लावून कितीही दिवस उपास केला तरी लोक त्याच्याकडे दुर्लक्षच करीत असतील तर त्याचा काहीही उपयोग नव्हता. उपाश्याला आता आपले येणारे दिवस दिसायला लागले. ही कला काय आहे हे कुणाला कसे समजावून सांगायचे ? लोकांच्या अंगी काही मूलभूत संवेदनशीलता नसेल तर त्यांना हे समजावून सांगणं अशक्य होतं. त्याच्या पिंजऱ्याबाहेरच्या जाहिरातींची पोस्टर्स आता मळली होती, फाटली होती, त्यावरची अक्षर विरून गेली होती आणि हे कोणाला लक्षातही आलं नव्हतं. सुरुवातीला तिथे असलेल्या फळ्यावर त्याच्या उपासाच्या दिवसांची संख्या लिहिली जायची आणि रोज कोणीतरी येऊन तो आकडा एकाने वाढवत असे. मग तो आकडा दिवस चे दिवस तसाच राहू लागला आणि मग काही आठवड्यानंतर हे इतके क्षुल्लक काम करायलाही तिथल्या कामगारांना कंटाळा आलेला असे. आता उपाश्या अगणित दिवस उपास करू लागला, त्याच्या उपासाच्या दिवसांची गणती इतरच काय तोही विसरून गेलला असे. आणि कधीतरी कोणी त्याच्या पिंजऱ्यासमोर थांबला आणि शेवटी लिहिलेल्या आकड्याकडे त्याचे लक्ष गेलेच तर त्याचा पहिला संशय उपाश्यावर असे. पण याहून दुसरी दुर्दैवी गोष्ट नव्हती. खरंतर उपाश्या ने कोणाला फसवले नव्हते तर जगानेच त्याला फसवून त्याचा मोबदला त्याला दिलेला नव्हता हेच सत्य होते.
दिवसामागून दिवस उलटले आणि मग एक दिवस मॅनेजर ला कुजलेले गवत असलेला तो पिंजरा बघून तो रिकामा कसा राहिला याचे आश्चर्य वाटले. त्याने त्याच्या कामगारांना विचारले तर त्यांनाही काही सांगता येईना. मग अचानक एकाला तिथला तो फळा, त्यावरचे आकडे बघून उपाश्याची आठवण झाली. मग काहीजण पिंजऱ्यात गेले आणि गवतात काठ्या ढोसून ढोसून शेवटी त्यांना उपाश्या सापडला.
तुझा उपास अजून चालू आहे का? - मॅनेजर ने विचारले- तो अजून किती दिवस चालणार ?
मला माफ करा- क्षीण आवाजात उपाश्या म्हणाला
ठीक आहे. चल तुला माफ केले- मॅनेजर म्हणाला
तुम्ही माझ्या कलेचं कौतुक करावं एवढीच माझी इच्छा होती - उपाश्या
आम्हाला तुझ्या कलेचं कौतुक आहे - मॅनेजर
पण तुम्ही माझ्या कलेचं कौतुक करू नका - उपाश्या
बरं नाही करत, पण का नाही करायचं ? - मॅनेजर
कारण उपास ही माझ्यासाठी प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट नाही. तो माझ्याकडून आपोआपच होतो. - उपाश्या
अरे व्वा !! पण तो असा आपोआप कसा काय होतो बुवा ? - मॅनेजर
कारण--
आता उपाश्या मॅनेजरच्या अगदी जवळ येतो. एका निश्चयाने आपलं डोकं उचलून, तोलून मापून एकेक शब्द बोलण्यासाठी आपले ओठ मॅनेजरच्या कानाजवळ नेऊन उद्गारतो --
- कारण मला आवडेल असे अन्न मला कधी मिळालेच नाही. ते मिळाले असते तर काहीही तक्रार न करता मी तुम्हा सगळ्यांच्यासारखाच पोटभर जेवलो असतो.
हे त्याचे शेवटचे शब्द होते.
हा पिंजरा साफ करून घ्या रे ..... मॅनेजर ने कामगारांना सुनावले.
आणि मग सर्वानी उपाश्याला पिंजऱ्यातील गवंतासकट बाजूलाच खड्डा खणून पुरून टाकले.
आता त्या पिंजऱ्यात एक वाघ आहे. उपाश्याच्या जागी, पिंजऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दिमाखात फिरणाऱ्या त्या मस्तवाल जनावराला पाहून प्रेक्षकांमध्ये एकदम जान आली आहे. त्याला आवडेल तितके आवडेल ते मांस तत्परतेने पुरवले जाते, काहीही कमी पडू दिले जात नाही. त्याच्या दिमाखदार चालीतून, वन्य जीवनातलेच स्वैर स्वातंत्र्य तो पुन्हा उपभोगतो आहे असाच भास होतो. त्याने जबडा वासून डरकाळी फोडली की त्याची रसरसलेली जीवनेच्छा प्रकट होते आणि समोरच्या प्रेक्षकांचा भीतीने थरकाप उडतो. पण मग पुन्हा सावरून ते त्याचे कुतुहलाने निरीक्षण करीत पिंजऱ्यासमोर अगदी खिळून राहातात.
****************समाप्त************************
(पुण्याचे निरंजन पेडणेकर 'उपाश्या' या नावाने 'The Hunger Artist' चा नाट्यप्रयोग करतात असे समजले/वाचले. Hunger Artist साठी त्यांनी उपयोजिलेला हा शब्द आवडल्याने या कथेच्या भाषांतरात तसाच घेतला आहे. या शब्दाचे श्रेय त्यांचे आहे.)
प्रतिक्रिया
(रुमाल)
चांगला उपक्रम! असाच चालू ठेवा.
(तूर्तास इतकेच. जमल्यास सविस्तर लिहिण्यासाठी रुमाल टाकून ठेवीत आहे.)
धन्यवाद हे मराठीत आणल्याबद्दल
धन्यवाद हे मराठीत आणल्याबद्दल. हंगर आर्टिस्ट ही कथा काफ्काने केव्हा लिहिली हे अन्यत्र वाचून अंगावर काटा आला. त्यावेळी असाध्य असलेल्या टीबी रोगाने त्याचा मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी शेवटच्या फेजमधे त्याला गिळता येणे अति वेदनेमुळे आणि गळा बंद झाल्याने अशक्य झाले. अन्नग्रहण बंद होऊन मृत्यूचे कारण उपासमार हे नोंदवले गेले. त्याच शेवटच्या काळात त्याने ती कथा लिहिली. (विकिपीडिया)
भेदक
दोन्ही कथा भेदक आहेत आणि सार्वकालीनही आहेत. उपाश्या ची कथा वाचताना, भारतातले अगदी, स्वातंत्र्यकाळापासून आत्तापर्यंतचे अनेक 'उपाश्ये' मनांत येऊन गेले, ते या गोष्टीतल्या उपाश्यासारखे नसले तरी!
दोन्ही कथा अप्रतिम आहेत.
दोन्ही कथा अप्रतिम आहेत.
काफ्कासाहेबांचा दबदबा ऐकून होतो पण काही वाचण्याचा योग आला नव्हता.
ह्या निमित्ताने योग जुळून येतोय.
खरंच चांगला उपक्रम!
आवडले
पहिली कथा वाचली. भाषांतर अतिशय आवडले.
वाचताना काही गोष्टी जाणवल्या त्या नोंदवतो आहे :
लॉ ह्या शब्दासाठी "न्याय" ऐवजी "कायदा" हे रूप बरे राहील असे वाटते. ह्या कथेचे शीर्षक - "कायद्याच्या दारात" असे सुचवावेसे वाटते. न्याय हा शब्द "जस्टीस" ह्या अर्थाने वापरला जातो.
<<या सगळया काळात त्याची नजर अव्याहत त्या द्वारपालावर असते. आत असलेल्या इतर द्वारपालांबद्दल तो विसरून गेला आहे.>> - ह्या दोन वाक्यांमध्ये काळ सुसंगत वाटत नाही. "असते " - रीती वर्तमान काळ, आहे - चालू वर्तमान काळ.
पहिले वाक्य कदाचित "या सगळ्या काळात त्याची नजर सतत त्या द्वारपालावर आहे > असा करता येईल ?
<<दुबळा झाल्यामुळे स्वतःचे शरीर उचलणे आता त्याला शक्य नाही.>> स्वत:च्या शरीरासाठी "उचलणे " हे क्रियापद ऑकवर्ड वाटते - त्या ऐवजी "उठून बसणे" अधिक सहज वाटेल का ?
माझे प्रतिसाद "बेटा रीडर" च्या नोंदींसारखे आहेत. तुम्ही ते बेधडक नाकारू शकता, आणि ते सरळ-सरळ चुकीचे असतील तर तसेही सांगू शकता !!